हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पूर्ण १ वर्ष घेऊन आता एकदाचा अतिरिक्त सेवादाते म्हणजे ओटीटीवर (कुठलं तर ॲमेझॉन प्राईमवरती) पाहण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबरला जेव्हा हा सिनेमा रिलीज झालेला, तेव्हा या सिनेमाला थिएटर्समध्ये अजिबात स्क्रीन्स मिळाल्या नाहीत. केवळ स्क्रीन्स मिळत नसल्यामुळे हा सिनेमा नाट्यगृहांमध्ये सुद्धा दाखवला जात होता. मी मागच्या वर्षी हा सिनेमा पाहिल्यानंतर, पुन्हा एकदा घरच्यांसोबत पाहण्यासाठी याची फार वाट पाहत होतो आणि आता ॲमेझॉन प्राईमवरती तो आलाय, या गोष्टीचा मला निश्चित आनंद होतोय.
दोन मित्रांची ही गोष्ट आहे—एकाने मुंबईतली नोकरी सोडलीये पण अजून बायकोला किंवा घरच्यांना सांगितलेलं नाहीये आणि तो थेट वेंगुर्ल्यात परत आलाय, तर दुसरा गावातच राहून काहीतरी करू पाहतोय. आपल्या गावामध्ये राहून आपल्या गावातल्या लोकांसाठी काम करण्याची आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची इच्छा बाळगणारे तरुण, किंवा पस्तिशी ओलांडली तरी गावात राहतो म्हणून लग्न जमत नाहीयेत असे तरुण, किंवा लग्न जमावे म्हणून शहरात केवळ १० बाय १० किंवा त्याहीपेक्षा लहान जागेत राहून संसार करणारे तरुण, शाळेतलं प्रेम प्रकरण असो, लग्न करून शहराकडे जाण्याची इच्छा असलेली तरुणी असो किंवा जिचा नवरा शहरात काम करतोय आणि आता तिला शहराचं आकर्षण गप्प बसू देत नाहीये असे लोक असोत; अशा विविध इच्छा-आकांक्षा बाळगणारी पात्रं या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र आलेली आहेत आणि त्यांच्या भूमिकांवर हा सिनेमा फार छान भाष्य करतो.
आणि हे सगळं करताना विनोदाची फोडणी वारंवार द्यायला लेखक अमरजित आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर, अर्थात अभिनेत्यांसह, कुठेच मागे पडत नाहीत हे या सिनेमाचं यश आहे असं मला वाटतं.
विशेषतः अमरजित आमले यांचं लिखाण ही या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. सिनेमात सुरुवातीलाच खूप सारी पात्रं आपल्या समोर येतात, समांतर गोष्टी सुरू राहतात, पण तरीही ही पात्रं कुठेही गोंधळ उडवत नाहीत किंवा इरिटेट करत नाहीत. प्रत्येक पात्राचे स्वतःचे असे पदर आहेत आणि अल्पावधीतच त्या पात्रांच्या खोडी, त्यांचे स्वभाव आपल्या लक्षात राहतात आणि त्यांच्याशी आपली मैत्री होऊन जाते.
प्रल्हाद कुडतरकर, साईंकित कामत, वीणा जामकर, वैभव मांगले, स्वानंदी टिकेकर आणि सुनील तावडे असे चांगले कसलेले कलाकार याच्यात घेतलेले आहेत हा एक मुद्दा आहेच; पण बरेच संवाद मालवणीत असूनही कोणीही मालवणीचा उगाच आव आणून बोलत नाहीये आणि म्हणून ती भाषा ऐकायला जास्त छान वाटते.
मुख्य म्हणजे आर्ट डिपार्टमेंट आणि सेट डिझायनर्सनी लोकेशन हंटिंग म्हणा किंवा इतर कामं चोख केलेली आहेत. खऱ्या आणि रॉ लोकेशन्स वापरण्याचा हा फायदा असतो की तुम्ही त्या गोष्टीला खूप चांगलं जोडले जाऊ शकता. सिनेमातली कुठलीच फ्रेम पाहताना ते खोटं वाटत नाही. म्हणजे मी आत्ता तिथेच त्या घराबाहेरच्या जागेजवळ खुर्ची टाकून बसलोय आणि ते आजोबा माझ्यासमोर काहीतरी बोलतायत, इतकं जिवंत वाटावं असं ते चित्रण केलेलं आहे.
अर्थात, सिनेमात काहीच उणिवा नाहीत असं नाही. एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत जाताना वापरलेले ट्रान्झिशन्स आणि काही गोष्टी थोड्या जुनाट वाटतात. पूर्वार्ध प्रचंड एंगेजिंग आहे, पण उत्तरार्धात आणि सगळी स्टोरी एकाच पात्राभोवती फिरू लागते. तिथे साईंकित कामतची भूमिका, दोन मित्रांमधले संवाद आणि व्यवसायातली त्यांची एकमेकांची साथ अजून थोडी खोलवर दाखवली असती, तर सिनेमा अजून जास्त खुलला असता असं वाटून जातं.
पण या छोट्या-मोठ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तर हा सिनेमा हळुवारपणे संदेश देऊन जातो—की व्यवसायात उतरायचं धाडस दाखवा, शहरातील आयुष्य आणि गावातील आयुष्य ह्यात तारतम्य ठेऊन केलेली तुलना महत्वाची आहे इत्यादी.
तर म्हणून मी सांगेन की जर तुमच्या मनात कोकणाबद्दल एखादा हळवा कोपरा असेल (आणि तुम्ही कोकणातले नसाल तरीही), किंवा गावात राहून चांगला उदरनिर्वाह चाललेला असताना शहराकडे जाण्याचा ज्याने अव्हेर केला म्हणून लग्न न ठरलेला एखादा भाऊ तुमच्या पाहण्यात असेल, तर हा सिनेमा तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत अवश्य पहावा असा मी सगळ्यांना आग्रह करीन.
आपण आपल्या आयुष्यातले दोन तास वाया घालवले असं तुम्हाला नक्की वाटणार नाही, इतकी खात्री मी देऊ शकतो. मला वाटतं या सिनेमाचं यश या गोष्टीतच आहे की त्यांनी तो सिनेमा इतका रिलेटेबल बनवला आहे, की आज जेव्हा हा सिनेमा ओटीटीवरती सगळ्या लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध झालाय, तेव्हा आज रोजी दिग्दर्शकांना, सहाय्यक दिग्दर्शकांना मनातून जो आनंद झाला असेल ना तोच मला सुद्धा झालाय! का कुणास ठाऊक?
असो, बघा आणि आपली मते कळवा.
-केप्या
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर परीचय
लेखामुळे उत्सुक आहे. जरुर पाहीन..