Skip to main content
लेखक प्रचेतस यांनी रविवार, 11/10/2026 09:53 या दिवशी प्रकाशित केले.

हपाट्याचा कडा करायचं कित्येक दिवसांपासून चाललेलं होतं पण वेळेअभावी काही जमत नव्हतं, एकतर मला हल्ली रविवारी कामावर जावं लागत असल्याने बऱ्याच भटकंतींवर पाणी फेरले जात होते आणि त्याच वेळी इतर वैयक्तिक कामांमध्ये सुद्धा गुरफटून जात  होतो. फिरणं होत होतं , नाही असं नाही पण त्याचं स्वरुप म्हणजे रात्री दहा साडेदहाला घरुन निघायचं, कुठतरी लांब भटकून पहाटेपर्यंत परत यायचं. कोंडेश्वर, शिळिंब, भीमाशंकर, दुर्गवाडी असे मावळ, मुळशी, जुन्नरातली ठिकाणे अशीच रात्रीतून कैकदा भटकून झाली, मध्यंतरी नाही म्हणायला शिवनेरी पायथ्याकडची तुळजा लेणी मात्र दिवसाउजेडी पाहून झाली पण एका दमदार भटकंतीची असोशी मात्र राहिलीच होती. तो योग आला १ ऑक्टोबरच्या रात्री. मित्रांना २ तारखेची सुट्टी असल्याने येथून रात्री नेहमीप्रमाणेच कुठेतरी भटकून यायचे ठरले, मग बऱ्याच दिवसांपासून करायचा राहात असलेला हपाट्याचा कडा करण्याचं ठरलं. मग काय निघालो रात्री दहा/ साडेदहाला मित्रांसवे. 

हपाट्याच्या कड्याला जायचा मार्ग म्हणजे नारायणगाव-ओझर-ओतूर-लागाचा घाट- ब्राह्मणवाडा-कोतुळ-पाचनई. पाचनई हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचं ठिकाण, तिथून साधारण ४ किमी अंतरावर डावीकडे हपाट्याच्या कड्याला जायचा मार्ग आहे. 

 

वाटेत खेड टोलनाक्यावर चहा घेऊन नारायणगाव मार्गे ओझर-ओतूर मार्गाला निघालो आणि अचानक रस्त्यावरुन शेतात घुसलेला  पूर्ण वाढलेला पट्टेरी तरस दिसला. 

 

 

हा त्या तरसाचा टिपलेला व्हिडिओ

 

 

 

 

सुरुवात तर दमदार झाली होती. पुढे लागाच्या घाटातून गाडीने ब्राह्मणवाडा पार करुन कोतुळ गाठलं आणि तिथून पाचनईच्या मार्गाला लागलो. मित्राने पोर्टेबल स्टोव्ह आणला होता, टेट्रापॅक वाले दूध सोबत घेतले होतेच, रात्री अडीच वाजता दरीच्या तोंडाशी गाडी थांबवून वाफाळती कडक कॉफीचे मग रिचवून पुढे निघालो. पुढे वनखात्याचे चेक पोस्ट आहे, हा भाग हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्याचा भाग आहे. माणशी रु ५० आणि कारचे दिडशे असे एकूण ३०० रु भरुन आम्ही आत प्रवेश केला. थोड्याच अंतरावर पुढे अजून एक देखणा पूर्ण लांबीचा पट्टेरी तरस दिसला.

 

 

 

वाटेत रस्त्यावरुन जात असताना हरणटोळ सरपट जाताना दिसला. गाडी थांबवून त्याला जाऊ दिलं मगच आम्ही पुढे निघालो.

 

 

वाटेत कित्येक ठिकाणी ससे उड्या मारत जाताना दिसतच होते. साधारण पावणेचारच्या सुमारास पाचनईला पोहोचलो. तिथला रस्ता बराच खराब आहे. पाचनईच्या पुढे साधराण चार किमीवर हपाट्याच्या कड्याला जायचा मार्ग आहे. तिथेच वनखात्याने एक प्रवेशद्वार उभारले आहे. चार वाजता तिथे पोहोचून कारमधेच तिघेही झोपलो. थोड्याच वेळात पहाट होऊन तांबडफुटी झाली. आणि नयनरम्य दृश्य सामोरे आले. 

 

 

कड्यामागून सूर्यकिरणे डोकावू लागली होती

 

 

 

आता निघालो हपाट्याच्या कड्यावर जायला.  इथून साधारण पावणेदोन किमी अंतरावर आहे हपाट्याचा कडा. रस्ता पुरेसा रूंद आहे, फोर व्हिल ड्राईव्ह असणाऱ्या गाड्या किंवा चांगले स्पस्पेंशन असणाऱ्या मोटारसायकली इथून जाऊ शकतात पण खरी मजा मात्र चालत जातानाच येते. सौम्य चढउतार असलेली, मधूनच जंगलाचा दाट भागातून जाणारी, नैसर्गिक प्रवाहांवरील छोटा पूल पार करणारी ही पाऊण तासाची पायपीट आबालवृद्धांसह सर्वांनाच सहज करता येणारी अशी आहे. वाटेत सह्याद्रीच्या प्रचंड रांगांचे सुंदर दर्शन होते. डावीकडे हरिश्चंद्रगडगड, पाठीमागे कलाडगड आणि कोंबडा आणि समोरच नाफ्ता असे सह्याद्रीचे अचाट आणि अफाट दर्शन येथून होते.

 

हपाट्याचा कड्याला लगटून असणारा नाफ्ता १ आणि नाफ्ता २

 

 

पाठीमागे असलेला कलाडगड आणि डावीकडे कोंबडा

 

 

 

हपाट्याच्या कड्याला वनखात्याने रेलिंग लावलेले आहेत शिवाय निवांतपणे बसण्यासाठी विविध चौथरे आणि त्यावर छत्र उभारले आहेत. 

 

बाजूचा नाफ्ता अतिशय भव्य दिसतो. मात्र नाफ्ताचे रौद्र रूप पाहाय्चे असेल तर ते हरिश्चंद्रगडावरुन किंवा सादडे घाटातूनच दिसते.

 

 

 

 

हपाट्याचा कडा हा सरळ आठशे नऊशे मीटर तुटलेला कडा आहे. समोरच नाणेघाट, वऱ्हाड्या, भैरवगड आणि जीवधन दिसतो. वातावरण धूसर असल्याने मात्र ते अस्पष्ट दिसत होते. 

हरिश्चंद्रगड

 

 

सोनकीने कड्यांभोवती मस्त फेर धरला होता.

 

 

हपाट्याचा कडा पाहून निघालो ते परत अर्ध्या पाऊण तासात फाट्यापाशी आलो. तिथे परत मॅगी बनवली आणि ती खाऊन कॉफी रिचवली आणि पुढे निघालो. आता लक्ष्य होते फोफसंडी.

वाटेत पाचनईच्या पुढे मुठा नदी नेकलेससारखे वळण घेते, तिथे थांबून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन घेतले.

 

डावीकडे कुमशेतचा कोंबडा, दूरवर धुकटात दिसणारा आजोबा आणि त्याच्या बाजूचे व्ही आकारातले गुयरीचे दार ही दुर्गम घाटवाट, त्याच्या बाजुला पाथरा, पाठीमागे रतनगड आणि उजवीकडे दिसणारी घनचक्कर आणि शिरपुंज्याच्या भैरवगडाची रांग

 

त्याच्या बाजूलाच डावीकडे असणारा कलाडगड

 

 

आता निघालो फोफसंडीकडे. हपाट्याच्या कड्यावरुन फोफसंडी फक्त ४५ किमीवर मात्र दुर्गम रस्ता असल्याने जायला जवळपास दिड तास लागतो. कोतुळ- आंभोळ- आंबितखिंड-फोफसंडी हा रस्ता आहे मात्र एकदम मजेदार. एक उंच डोंगर चढायचा, तेव्हढाच तो खाली उतरायचा परत त्याहून उंच डोंगर चढायचा आणि चढण वर वरच जात राहते. अतिशय तीव्र चढ आणि वळणावळणाचा अरुंद रस्ता आहे. इथे येताना ड्रायव्हिंग स्किल उत्तम हवेच. अगदी थोड्या वेळात आपण प्रचंड उंचीवर पोहोचतो. सह्याद्रीत इतक्या तीव्र चढउताराचे रस्ते मी प्रथमच पाहिले. पुढे फोफसंडीच्या खिंडीत येऊन आपण झपाझप उतरुन त्या लहानशा गावात पोहोचतो. 

फोफसंडी हे तसे ३०/४० उंबऱ्यांचे लहानसे गाव, पाठीमागे जणू आधारवड असा कुंजरगड आहे. अक्षरश: शेकडो धबधबे येथे आहेत, जिथे नजर जाईल तिथे निसर्गसौंदर्य, चहूबाजूंनी उंच उंच पर्वतांनी वेढलेल्या ह्या गावात सूर्योदय तासभर उशिरा होतो तर सूर्यास्त तासभर लवकर होतो. अतिशय दुर्गम. इथे आजही गुहेत वस्ती करुन राहणारे गावकरी आहेत, गुहा आहेत,  इथे यायचे तर मुक्कामाच्या तयारीने यावे कारण इथली विविध ठिकाणे पाहायची तर पायपीटीची तयारी हवी. इथे घरगुती मुक्कामाची आणि जेवणाची सोयही आहे. आता आपल्याला वाट असेल हे गाव उंच डोंगरांच्या पायथ्याला वसले आहे तर तेही पूर्ण खरे नव्हे, खरे तर ते वसलेले आहे डोंगराच्या उतारावरच्या एका सपाटीवर, येथूनही खालच्या बाजूला खोल दरी आहे आणि तेथून जाणारी अतिशय सुंदर अशी मांडवी नदी आहे. वनखात्याने येथे जागोजागी रेलिंग्स लावून मचाणे उभारली आहेत.

 

फोफसंडी गावातून दिसणारा आंबेतखिंडीमार्गे येणारा रस्ता

 

 

उतारावरील शेती आणि अजूनही खाली असणारी दरी

 

 

चहूबाजूंनी हिरवागार असलेला परिसर

 

 

मांडवी नदी आणि त्यावरील पूल

 

 

आम्ही फोफसंडी पाहिली ती ही अशी, वेळेअभावी. फक्त नजरभेट व्हावी इतकीच, मात्र येथे पुन्हा यावेच लागणार आहे, त्याला पर्यायच नाही. इथून परतताना परत उलटे कोतुळला जाण्यात काही अर्थ नाही, फोफसंडी-उदापूर- मुठाळणे हा घाटमार्ग तुम्हाला तासाभरात ओतूरला घेऊन जातो. हा रास्ता मात्र तसा खराब आहे. पुण्यावरुन फोफसंडीला यायचे तर जवळचा मार्ग हाच पण उदापूर मुठाळणे रस्त्याने येणे आणि कोतुळ मार्गे जाणे किंवा उलट असाच प्रवास करावा जेणेकरुन हे दोन्ही घाटमार्ग पाहता येतील. दोन्हीकडून रस्ता अरुंदच आणि तीव्र चढउतारांचाच आहे. मुठाळणे मार्गाने जाताना धाकोबा आणि सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगररांगांचे परत सुंदर दर्शन होते.

 

उदापूर मुठाळणे घाट

 

घाट उतरुन ओतूरला पोहोचलो. तिथे जेवण करुन ७ वाजेपर्यंत घरी अशी रात्र आणि दिवसभर अशी मस्त भटकंती झाली.

 


वाचने 192
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

प्रचि, चलचित्र सुंदर आहेत.

 

निसर्ग केव्हा ही मस्तच असतो. नवरसाचे  दर्शन एकाच जागी मिळते.


मस्त, हा कडा खुप प्रसिद्ध आहेच.

फोफसंडी पावसाळ्यात कमाल जागा आहे. विशालदादा दर पावसाळ्यात ट्रेक काढतो पण अजून योग आला नाही...

https://www.instagram.com/reel/DcDcnDvKpDG/?exln=MWhiOWY5bjlvbnU4ZQ==


ठिकाणाची नोंद घेतली आहे.

बघू केव्हा योग जुळून येतो.

 

- वल्लीच्या मुशाफिरीचा एक फॅन 


कितीही मोठ्या ट्रिपा केल्या तरी शे दोनशे किलोमीटरांतील सहली हव्यातच. आले मना की चालले. रजा टाका, जमवाजमव काही नाही.

शेवटून सातवा फोटू विशेष आवडला.


प्रचेतस जी, फोपसंडी मागे उभा कुंजीर गड याबद्दल मला माहिती जाणून घ्यायला हवी आहे. कुंजीर गडावर आणि आसपास गडावर नैसर्गिक गूहा आहेत. याठिकाणी आपण गेला असाल तर बोगदेवजा गूहांचे फोटो पहायला आवडेल. 


आज मिपावर येण्याचे सार्थक झाले.  अतिशय सुंदर फोटो आणि थोडक्यात पण दमदार वर्णन. तुमच्या  हिंमतीला त्रिवार सलाम. नोकरी, प्रपंच वगैरे सगळे नीट सांभाळत असे रात्रीबेरात्री जंगलातून फिरणे वगैरे थोरच. फिरत रहा लिहत रहा. शुभेच्छा.