Skip to main content
लेखक उपयोजक यांनी शनिवार, 26/09/2026 11:07 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या पाहण्यात युट्युबवर दोन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांनी करिअर विषयक दिलेले सल्ले आले. त्या व्हिडिओ मधले दोन सल्ले मी इथे टेक्स्ट स्वरूपात देतो आहे. हे सल्ले मला एकाच्या उलट दुसऱ्याचा अशा स्वरूपाचे वाटले. मला जसे वाटले तसेच तुम्हालाही वाटते आहे का? की माझाच काही गोंधळ झाला आहे? तुम्ही आपले विचार कृपया मांडा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मल्टीपल इंटेलिजन्स असतात. IQ हा फक्त ठराविकच गोष्टी सांगतो. तुम्हाला संगीतात गती आहे की नाही? हे IQ टेस्टवरून नाही कळत. तुम्हाला वाद्य पटकन शिकता येईल की नाही? इक वरून नाही कळत. तुम्हाला लोकांशी सहज संवाद करता येईल की नाही? IQ वरून कळत नाही. आणि लोकांशी चांगला संवाद करता येणं, चांगलं संगीत तयार करता येणं, चांगला नाच करता येणं, नृत्य करता येणं, चांगलं गाता येणं, कविता करता येणं, ह्याच्यामध्ये पण बुद्धी आहे.
 हे आजमावा. नसेल... तर तपास करा. आणि  करा फाईंड आऊट की आपली बुद्धी किती आहे? आणि एकच ठरवा की माझ्याकडे बुद्धी किती आहे याच्यापेक्षा माझ्या बुद्धीचा वापर मी किती करतो हे इम्पॉर्टंट आहे. जर माझ्याकडे एव्हरेज १०० इतका जर IQ असेल तर मला १००% त्याचा वापर करता आला पाहिजे. माझं म्हणणं तर असं असतं की जेवढे एव्हरेज असतात ना तेच अधिक चांगलं करतात. कारण एव्हरेज मुलांना माहिती असतं की मी एव्हरेज आहे. आणि मी हार्डवर्क केलं तरच मी काही करू शकतो. बुद्धिमान मुलं खूपदा मागे पडतात कारण त्यांना वाटतं की आहे बुद्धी माझ्याकडे. मला अभ्यास नाही केला तरी चालेल. आणि ते अभ्यास करत नाहीत आणि मागे पडतात.
 त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की आपली बुद्धी किती आहे ते आधी ओळखा. डोक्यात किती कॅण्डल पॉवरचा दिवा आहे तेवढ्याचा प्रकाश मला पाडलाच पाहिजे, लोड शेडिंग चालणार नाही. १०० वॅटचा दिवा असेल तर ६० वॅटची एनर्जी मी घेणार नाही. मला १०० वॅटचाच प्रकाश पाडला पाहिजे. माझ्या बुद्धिमत्तेचा मला १००% वापर करता आला पाहिजे. केला पाहिजे. कशात माझी बुद्धी आहे ते शोधू आपण.

मल्टीपल इंटेलिजन्स नावाचं एक संकेतस्थळ तुम्ही जाऊन पहा. Google वरती 'Multiple Intelligences' म्हणून. खूप छान आहे. कॉन्सेप्ट खूप छान आहे. त्याचा वापर करा.

पहिली बुद्धी. दुसरी इंक्लिनेशन.
  म्हणजे आवड काय आहे, काय करायला आवडतं. उदाहरणार्थ मी डॉक्टर असलो तरी मला बोलायला आवडतं. मला ऑपरेट करायला नाही आवडत. मला बोलायला आवडतं म्हणून मी सायकियाट्रिस्ट आहे. म्हणजे इंटरॅक्शन, कम्युनिकेशन ही माझी आवड आहे. आणि डॉक्टर हा माझा कोर्स आहे. बोलणं ही माझी करिअर आहे. आता कळला डिफरन्स? वकील पण झालो असतो मी, टीव्ही ॲक्टर पण झालो असतो. ॲंकर झालो असतो. काहीही होऊ शकलो असतो. कारण मला इंटरॅक्ट करायला आवडतं. I chose doctor as a profession, as a course. माझी करिअर बोलणं आहे. काही लोकांचं करिअर बोलणं नसतं, काही लोकांची करिअर फक्त फोकस राहून करणं असतं. काही लोकांना हँड्स-ऑन एक्सपिरियन्स पाहिजे असतात. प्रत्यक्ष हातात इन्स्ट्रुमेंट घ्यायला आवडतं त्यांना. They enjoy it.

म्हणजे आपली आवड कशात आहे ते बघा. कोर्स नको... कोर्सचा विचार करू नका इतक्यात. कोर्सने फक्त जवळ जाऊ शकता. So आपली आवड कशात आहे ते बघा.

आणि तिसरी गोष्ट आपली पर्सनॅलिटी काय आहे ते बघा. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे बघा. व्यक्तिमत्त्व म्हणजे फार उंच आहे, छान आहे, देखणा आहे, स्मार्ट आहे... नाही! मी कशा प्रकारचा व्यक्ती आहे? मी एक्स्ट्रोवर्ट आहे की इंट्रोव्हर्ट आहे? मला लोकांशी पटकन कनेक्ट करता येतं की माझे दोन-तीनच पण जवळचे मित्र आहेत? मी ओपन आहे की नाही? मी नवीन कौशल्ये शिकायला तयार असतो की जे माझ्याकडे शिकलेलं असतं तेच मला परत परत वापरायला आवडतं? मला एखाद्या गोष्टीचं पटकन टेन्शन येतं की नाही येत? मी टेन्शन हँडल करू शकतो का? मी किती पटकन कम्युनिकेट करू शकतो? कितपत पटकन बाँड करू शकतो? माझ्यात किती अडॅप्टॅबिलिटी आहे? मी किती पट्कन अडॅप्ट करू शकतो नवीन सिच्युएशनशी? मी जर extrovert असेन तर मला अशाच प्रकारची करिअर केली पाहिजे की जिथे मला अशी संधी मिळेल. अशा प्रकारे इंटरॅक्ट करण्याची संधी. मी जर अडॅप्टेबल असेन तर मी फिरतीची नोकरी पटकन करू शकेन कारण मला सारखं नवीन नवीन ठिकाणी जावं लागतं. मी जर टेन्स असेन तर मला तीच कामं नेहमी करण्यात मला बरं वाटेल. कारण नवीन गोष्टींनी मी खूप टेन्स होतो, ॲंक्शिअस होतो, माझ्या कामाची क्वालिटी बिघडते , high neuroticism trait. मला हँडल नाही करता येत. Nothing wrong, काहीच चूक नाही त्याच्यात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. काही लोकांची असते, काही लोकांची नसते. Nothing right and wrong about it. काही चूक आणि बरोबर हे डोक्यातनं काढून टाकायचं. हे चूक आहे का बरोबर आहे? हे प्रॉपर आहे का इमप्रॉपर? नो! काही चूक नाही त्याच्यामध्ये. तुमचे आई-वडील आणि आमचे आई-वडील आणि तुम्ही आपण करिअरचा विचार करत असताना सतत चूक का बरोबर? चूक का बरोबर? चूक का बरोबर? Is a horrible thing! Open. Keep your mind open to see काय आहे? मग ठरवा चूक की बरोबर. आधी काय आहे ते समजून घेऊया. सारखं आपण चूक की बरोबर, चूक की बरोबर याच्यात अडकलेलो असतो. आणि त्याच्यामुळे आपली खरी पर्सनॅलिटी आपल्याला कळत नाही, आपला कम्फर्ट झोन कळत नाही आपल्याला."

डॉ. राजेंद्र बर्वे

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

तुम्ही ज्याच्याविषयी पॅशनेट असाल ना तेच तुमचं करिअर असलं पाहिजे. थांबा. पॅशन मला कशाचीही असू शकते. म्युझिकची असू शकते, पेंटिंगची असू शकते, ट्रेकिंगची असू शकते, पण ते necessarily माझ्या अर्थार्जनाचा सोर्स होईल असं नाहीये. म्हणजे असं सतत त्याचा विचार करत राहणं हा भाग खूप म्हणजे मला असं वाटतंय की हा वेडेपणा आहे.

पॅशन असेल, पण त्याच्या जोडीला जो महत्त्वाचा टिकऊ धरणारा जो मुद्दा आहे ना, तो आहे पर्पज. What gives me that sense of purpose? मला ते अर्थपूर्ण वाटतंय का मी जे करतीये ते? तर हा भाग आहे. आणि काही लोकांच्या बाबतीत ह्या सगळ्याचा एक सुवर्ण योग तयार होतो, तो म्हणजे माझ्याकडे ॲबिलिटी पण आहे, मला इंटरेस्ट पण आहे, आणि त्याच्यात संधी पण आहेत. So interest, ability आणि opportunity हा सुवर्ण योग काहीच लोकांच्या बाबतीत येतो.

पण ॲबिलिटी आणि opportunity ह्या दोनच गोष्टी असतील तर तिथे जॉब करता येतो ना. तिथे हा सुवर्ण योग असणार नाही. माझ्या इंटरेस्टच्या गोष्टी मी वेगळ्या करत राहीन. ज्याविषयी मी पॅशनेट आहे ते वेगळं करत राहीन आणि माझी ॲबिलिटी आणि opportunity जिथे जुळून येतीये, तो जॉब मी करत राहीन.

म्हणजे मुळातच ह्या सगळ्याचा एक अट्टाहास करण्याचं काही कारण नाही. हा सुवर्ण योग ज्यांच्या वाट्याला येतो जेवढा काळ येतो, पुन्हा तो सातत्याने तसाच राहतो असाही भाग नाहीये. त्यामुळे तो जेवढा काळ येतो, तेवढा काळ ठीक आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात हा आला पाहिजे असं नाही.

त्यामुळे निवड करताना साधारणपणे याची एक सांगड घालून की संधी कशामध्ये आहे, माझ्यामध्ये क्षमता कुठल्या आहेत? आणि इंटरेस्ट किंवा पॅशन म्हणजे that motivates me because I am very passionate or interested about it. So interest आणि पॅशन हे तुमचं शिकण्यासाठीचं मोटिव्हेशन होऊ शकतं. त्याची गल्लत करिअरशी करू नये.

शिरीषा साठ्ये


वाचने 180
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

IQ हा फक्त ठराविकच गोष्टी सांगतो. 

सहमत आहे. IQ वर विसंबून राहून करिअरचा निर्णय घेणे अनेक उदाहरणांमध्ये योग्य ठरत असले तरी सगळ्यांच्याच बाबतीत तसे योग्य ठरेल असे नक्कीच नाही. आणि अशा चाचण्यांवर करिअरचे सल्ले देताना काही ठोकताळे वापरले जातात. उदाहरणार्थ गणितात चांगला असेल तर जा इंजिनिअरींगला. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर १० वी च्या परीक्षेनंतर समजा IQ चाचणी केली असती तर मी गणितात खूप पुढे असल्याने मला हटकून इंजिनिअरींगला जा असाच सल्ला मिळाला असता. पण मला गणित खूप आवडत असले तरी विज्ञान तितके आवडायचे नाही. भौतिकशास्त्र थोडे तरी सहन करू शकायचो पण रसायनशास्त्र आवडायचेच नाही आणि जीवशास्त्राबरोबर ३६ चा आकडा होता. भौतिकशास्त्रातीलही काहीच भाग आवडायचे. इलेक्ट्रिसिटीशी संबंधित भाग आवडायचे नाहीत. असे असताना कोणतेही इंजिनिअरींग मला कसे आवडणार होते?तरीही गणित चांगले ना मग जा इंजिनिअरींगला असला गुडघ्यातला प्रकार आपल्याकडे चालू असतो.

दुसरे म्हणजे आपल्या समाजात इंजिनिअरींगला का इतके महिमामंडित करतात समजत नाही. बरेचसे इंजिनिअर जे शिकले त्यापेक्षा वेगळ्याच कोणत्यातरी क्षेत्रात पुढे काम करत असतात. तो थ्री इडिअट्समधला डायलॉग मला खूप आवडतो- वो देखो गधा. पेहले इंजिनिअरींग की बादमे एमबीए किया और अब बॅंक मै नौकरी कर रहा है. बॅंकमे ही नौकरी करनी थी तो इंजिनिअरींग क्यू की? मी स्वत: असा गधा बनून बराच काळ बॅंकेत काम केले आहे. इंजिनिअरींग सोडून दुसऱ्या पर्यायाचा विचारच करायला लोक तयार नसतात. तरी हल्लीच्या पिढीत तो स्वागतार्ह बदल झाला आहे पण माझ्या पिढीत गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळविणारा कोणी इंजिनिअरींग सोडून दुसरीकडे जायचा विचारही करायला लागला तरी त्याला मूर्खात काढले जायचे. त्यात काहीकाही क्षेत्रांविषयी बॉलिवूडने अगदी चुकीचे चित्र उभे केले आहे. वकिल म्हटले की- मेरे फाजील दोस्त, सभी गवाहोंके सबुतोंको मद्देनजर रखते हुए.... वगैरे कोर्टात  बडबड करणारेच बहुसंख्य लोकांच्या डोळ्यासमोर येतात. गुन्हेगारी कायदा हे कायद्यातील एक क्षेत्र झाले. कॉर्पोरेट लॉ हे खूप मोठे क्षेत्र आहे वगैरेंचा अनेकांना पत्ताही नसतो.   


In reply to by चंद्रसूर्यकुमार

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर १० वी च्या परीक्षेनंतर समजा IQ चाचणी केली असती तर मी गणितात खूप पुढे असल्याने मला हटकून इंजिनिअरींगला जा असाच सल्ला मि जेळाला असता. पण मला गणित खूप आवडत असले तरी विज्ञान तितके आवडायचे नाही. भौतिकशास्त्र थोडे तरी सहन करू शकायचो पण रसायनशास्त्र आवडायचेच नाही आणि जीवशास्त्राबरोबर ३६ चा आकडा होता. भौतिकशास्त्रातीलही काहीच भाग आवडायचे. इलेक्ट्रिसिटीशी संबंधित भाग आवडायचे नाहीत.

 

Perfect!

 

शाळेत असल्यापासूनच गणित सहज जमायचे. अगदी आयत्यावेळी केलेल्या थोड्या अभ्यासातून भरपूर गुण मिळायचे. ११ वी त असताना सहामाही परीक्षा सुरू असताना शेवटच्या दिवशी गणिताची परीक्षा होती.  त्यावेळी एका चित्रपटगृहात तीसरी मंजिल चित्रपट आला होता व तो शेवटचा दिवस होता. मी ६-९ तो चित्रपट पाहिला. नंतर घरी पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता व वीज नव्हती. त्यामुळे अंधारात काहीच अभ्यास करता आला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून थोडा अभ्यास केला. परंतु परिक्षेत १०० पैकी ६६ गुण मिळाले.‌

 

भौतिकशास्त्र बऱ्यापैकी जमायचे, पण इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल अजिबात जमत नव्हते. 

 

रसायनशास्त्रातील भौतिक रसायनशास्त्र हा विषय त्यातील गणितांमुळे जमत होता, पण ऑर्गगॅनिक रसायनशास्त्र, इनऑरगॅनिक रसायनशास्त्र, औद्योगिक रसायनशास्त्र या विषयांसमोर थरकाप व्हायचा. जीवशास्त्र तर पाकिस्तानसारखा कट्टर शत्रू. ११ वी त जीवशास्त्रात अक्षरशः काठावर सुटलो आणि १२ वी त गेल्यानंतर जीवशास्त्र सोडून मराठीत भूगोल विषय घेतला. भुगोलाचे पुस्तक जेमतेम ७५ पानी होते व नजर टाकल्यावर लक्षात आले की यासाठी एकही मिनिट अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. १२ वी च्या अंतिम परिक्षेआधी ते पुस्तक एकदाच चाळले आणि घसघशीत ७३ गुण मिळाले. 

 

एकंदरीत गणित, संख्याशास्त्र, आकडेमोड, आकडेवारीचे विश्लेषण हाच माझा आवडता भाग. संगणकशास्त्रात द्विपदवीधर होताना गणिती विषय आवडणे व सहज समजणे आणि जमणे याचा खूप उपयोग झाला. 


In reply to by श्रीगुरुजी

खरंच ज्या विषयांची आवड नाही ते विषय शाळेतच टाळता यायला हवेत खरंतर.


आपल्या समाजात इंजिनिअरींगला का इतके महिमामंडित करतात समजत नाही.

 

काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी पदवी घेतल्यास नोकरी हमखास मिळत असे.( आता अशी स्थिती राहिलेली नाही कारण पैशाला पासरी इंजिनियर्स आहेत)  

अशी स्थिती बी ए बी कॉम ची गेली ५० वर्षे तरी अजिबात नव्हती.

१९८८ साली जॉन्सन & जॉन्सन मधेय बी कॉम (प्रथम वर्ग) कारकुनाची नोकरी यासाठी ३३०० अर्ज आले होते. त्यातील कुणाला निवडणार आणि 
मुलखात तरी काय घेणार?

२००५ मध्ये मला इन्फोसिस च्या उपाध्यक्ष भेटला होता.

त्याला मी विचारले तुम्ही सॉफ्टवेअर साठी फक्त इंजिनियरनाच घेता. पण सिव्हिल किंवा मेक च्या इंजिनीयरचा सॉफ्टवेअर शी संबंध काय?

त्यावर तो मला म्हणाला को डॉक्टर, सॉफ्टवेअर विकासासाठी तर्कशुद्ध विचार (LOGICAL THINKING)   लागतो. इंजिनियरिंग शिक्षणात ते आपोआप येतं. त्यांना प्रशिक्षण देण्यास आम्हाला जास्त दिवस नि पैसे खर्च करावे लागत नाहीत.

सद्यस्थिती --  एक माझा मित्र AICTE ला सल्लागार म्हणून काम करत असे. तो म्हणाला बहुसंख्य डीम्ड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकांना जे शिकवता येतं  ते शिकवलं जातं उद्योगाला काय हवं आहे त्याचा संबंध नसतो. 
म्हणजेच पदवीचा आणि ज्ञानाचा संबंध नाही      

             


In reply to by सुबोध खरे

सॉफ्टवेअर विकासासाठी तर्कशुद्ध विचार (LOGICAL THINKING)   लागतो. इंजिनियरिंग शिक्षणात ते आपोआप येतं.

माझ्या बाबतीत उलटे झाले होते. मी शाळेत असताना खूपच जास्त शार्प होतो पण इंजिनिअरींग पूर्ण होता होता बत्थड झालो होतो. तर्कशुध्द विचार सोडूनच द्या साधा विचारही करता येण्यावर परिणाम झाला होता 😀