Skip to main content

गुरुचरित्र वाचन: अनुभवांची देवाणघेवाण

लेखक प्राध्यापक नागुतात्या आढये यांनी मंगळवार, 15/09/2026 11:42 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकर बंधु भगिनींनो,

 

गेल्या वर्षीपासुन गुरुचरित्र वाचायची इच्छा होत होती. विश्वास ठेवा अथवा नको (मला स्वत:ला अजुन विश्वास बसत नाहीये), तीनेक आठवड्यांपुर्वी गुरुवारी दुपारी साधारण १ च्या सुमारास बाहेर काही कामानिमित्त पडलो होतो. घरापासुन साधारण एक किलोमीटर अंतरावर पिंपळ आणि त्याला बांधलेला पार आहे, जिकडे लोकं संध्याकाळी बसुन गप्पा टप्पा मारतात. त्याच्या विरुद्ध बाजुच्या पदपथावरुन चालत असताना त्या पारावर एकटं बसलेल्या एका साधारण ७५-८० वर्षांच्या एका आजोबांनी हाक मारली. त्यांना काही मदत हवी असेल असं वाटुन मी रस्ता ओलांडुन तिकडे गेलो.

आजोबांनी थेट माझ्या आयुष्यात सद्ध्या घडत असलेल्या काही गोष्टी ज्या फक्तं आणि फक्तं घरच्यांना आणि दोन अत्यंत जवळच्या मित्रांना फक्तं माहिती आहेत त्या घडाघडा सांगितल्या. त्यात येत असलेल्या काही अडचणी नावं घेउन सांगीतल्या. ह्या वर्षात घडलेल्या काही घटना (जन्म,मृत्यु, आर्थिक बाबी) वगैरे वगैरे जश्याच्या तश्या सांगितल्या. आणि वरुन सगळ्या अडचणी आणि समस्या डिसेंबर अखेर संपतील किंवा त्याची तीव्रता बऱ्यापैकी कमी होइल असंही सांगितलं.

वरुन दर वर्षी किमान एकदा गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलं. आणि शनीमहाराजांना दर शनिवारी तेल, काळे उडिद आणि खडे मीठ वहायला सांगितलं. शनीमहाराजांचं मी तसही करतो.

 

मी होकार देउन जेमतेम १०० पावलं पुढे येउन जे काय काम करायचं होतं ते करुन मागे फिरलो. जेमतेम २-३ मिनिटं लागली असतील. परत फिरलो तर आजोबा कुठेही दिसले नाहीत. तो एकच सरळसोट रस्ता असल्याने आजोबांचं वय लक्षात घेता लिफ्ट मिळाल्याशिवाय नजरेआड व्हायची काहीही शक्यता नव्हती.

 

एकुणात सगळ्या घटना लक्षात घेता, गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलेलं आहे. सासरेबुवा अध्याय वाचतात त्यामुळे त्यांनी गुरुचरित्राची नवी कोरी पोथी भेट दिलेली आहे. अजुन माहिती गोळा करायला सुरुवात केली असता पारायणाचे नियम, पथ्यपाणी वगैरे नियम हळुहळु गोळा होत आहेत.
 

माझा आत्तापर्यंतचा अनुभव:

१. दत्तमहाराज किंवा कुलदेवतेच्या देवळात गेल्यावर डोळ्यातुन अत्यंत घळाघळा पाणी येतं आहे. मोकळं वाटतं आहे खुप.

२. मी फारसा देव देव करत नसतानाही गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना, आयुष्यात आलेल्या व्यक्ती, प्राणी आणि आलेले काही अनुभव लक्षात घेता माझी गुरुचरित्र पारायणाची इच्छा प्रबळ होत आहे.

३. हा अनुभव मी जेवढ्यांशी खाजगीत बोलतोय, फोनवर बोलतोय तेव्हा तेव्हा गळ्यात आवंढा दाटुन येउन डोळ्यात पाणी येतं आहे. असं आजपर्यंत फक्तं माझे आजोबा गेले तेव्हा झालयं. एरवी मला असं कधीही होत नाही.
 

अनेक अनुभव जे आत्तापर्यंत ऐकले किंवा वाचले आहेत त्यानुसार पारायणाचे पहिले तीन दिवस अडचणी होतात, विचित्रं अनुभव येतात वगैरे ऐकलं आहे.

इथे मिपावर कोणी गुरुचरित्र वाचत असल्यास त्यांचे अनुभव, संकल्प कसा करावा वगैरे माहिती मिळाल्यास नक्कीच मदत होइल. मी मन:शांती आणि एकाग्रता वाढावी म्हणुन गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलेलं आहे. मिपाकरांनी त्यांचे अनुभव खाजगी माहिती टाळुन इथे टंकल्यास अत्यंत छान वाटेल.

 

मी ठरवलयं ते पार पाडणारच. पण इथले अनुभव वाचुन मदत नक्की होइल.

 

जे करतोय ते मी माझ्या श्रद्धेचा भाव म्हणुन करणार आहे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देणं टाळल्यास अत्यंत आभारी असेन.

 

प्राध्यापक नागुतात्या आढ्ये

(जगातले सगळे प्राध्यापक गाढव असतात. आम्हाला बटाट्याच्या चाळीतले लोकं प्रेमाने प्राध्यापक म्हणतात).

 

 

 

 

 

लेख वर्गीकरण

वाचने 65
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

"मी मन:शांती आणि एकाग्रता वाढावी म्हणुन गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलेलं आहे."

केवळ आणि केवळ याच उद्देशाने जर गुर चरित्र वाचणार असाल तर नक्की वाचा, काहीतरी चमत्कार होईल दिव्य अनुभव येइल अशी कोणतीही इच्छा मनात न बाळगता वाचा आणि आपले अनुभव तटस्थपणे इथे नोंदवत रहा.

पैजारबुवा, 

 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

<div style="border-left:6px solid lightgrey;padding:2px 2px 2px 10px;font-style: italic;">
    केवळ आणि केवळ याच उद्देशाने जर गुर चरित्र वाचणार असाल तर नक्की वाचा
</div>
ह्यासाठी गुरुचरित्रच का वाचायचे? पुलंचं, वपुंचं किंवा दमांचं पुस्तक किंवा गेलाबाजार सुशींची कादंबरी वाचली तर नाही चालणार का?
- (कुतुहल चाळवलं गेलेला) सोकाजी 

माझ्या श्रद्धेनुसार चार शब्द सांगतो, पहिले तर आलेल्या सदेह दर्शनात्मक अनुभूती अशा वाटण्याच्या नसतात असे वाटते. त्यामुळे धाग्याचे कार्यकारणभाव हे फक्त श्रीगुरुचरित्र पारायण अनुभव आदानप्रदान ठेवायला हवे होते तुम्ही (थोडेसे आगाऊ बोलतोय पण राहवले नाही म्हणून चांगल्या मनाने सांगतोय

दुसरे, तुम्हाला गुरुचरित्राचा आदेश आलेला आहे, तुम्ही प्रचंड नशिबवान आहात

 

तिसरे, दत्तगुरूंच्या क्षेत्री किंवा कुलदेवतेच्या क्षेत्री डोळ्यातून आसवे येणे हा अष्टसात्विक भाव जागृत होण्याचा एक एकक म्हणून बघता येईल (परत हे मानणे न मानणे आपापल्या श्रद्धेचा भाग) पूज्य अन् पूजक संपर्क स्थापन होण्याची एक पहिली पायरी. जरूर पारायण करा श्री दत्तगुरु आपणास पुढील मार्गक्रमणा करण्यास सिद्ध करो. ही प्रार्थना. 

(साधक) खोंडे