Skip to main content

विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!

लेखक मारवा यांनी बुधवार, 09/09/2026 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या जो बापट यांनी ऐरणीवर आणलेला ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा आहे त्यावरुन विचार करतांना एक  मुख्य मुद्दा जाणवला आणि इतरही किरकोळ विचार मनात आले ते इथे मांडावेसे वाटतात. तर बघा गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासुन एक नविन विशेष वर्ग निर्माण झालेला आहे. हा म्हणजे पुर्वीच्या काळात जे व्यवसाय किंवा मुख्य उपजिवीका म्हणुन पारंपारीक ढोल ताशा वाजवणारे होते त्यांना मोठ्या प्रमाणात  हळूहळु रीप्लेस करणारा ढोल ताशे वाजवणारा सर्वसाधारणपणे तुलनेने अधिक शिक्षीत,  आर्थिक वरचढ, पांढरपेशा , लोकांचा सोयीसाठी आपण अभिजन ढोलताशा वादक म्हणुयात  ( फक्त सोयीसाठी इथे टीपीकल अभिजन विरुद्ध बहुजन ही विभागणी अपेक्षित नाही  हे कृपया लक्षात घ्यावे  )असा निर्माण झालेला आहे आणि दरवषी वेगाने त्यात वाढ होताना दिसतेय. 

तर असे अभिजन ढोल ताशा वादक वर्गातील जे लोक आहेत त्यांची वर म्हटल्याप्रमाणे काही वैशिट्ये आहेत. 

सर्वात मोठं म्हणजे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय नाही जसा तो पुर्वकालीन बहुजन ढोल ताशा वादकांचा होता / आहे.

दुसरं हे वादन करण्यामागची अभिजनांची मुख्य प्रेरणा ही पलायनवाद ही आहे म्हणजे रोजच्या कंटाळुन कुजवुन टाकणाऱ्या ऑफीस वर्क पासुन. त्याच त्या रुटीन ला हे ढोल ताशा वादन त्यांना हवा तसा मजबुत बदल बहाल करतं. म्हणजे उत्सवपुर्व सरावापासुन याची सुरुवात होते. एखाद्या ठिकाणी सर्व ग्रुप असणं, त्यात हास्य विनोद समुह संवाद होणं , शिवाय सर्व काम हे पुन्हा धार्मिक बाबीशी जोडलेलं असण्याने त्याच ही एक अधिकच समाधान मिळणं, तसेच चार दिवारी के घुटन से, रोजमर्रा कि जिंदगीसे वगैरे काही काळ आजादी मिळणं,  यात प्रामुख्याने युवा वर्ग असल्याने धागे जुळण्यातील शक्यतेने निर्माण झालेली आनंदह्र्द्य्स्पंदने , किंवा निव्वळ सहवासानंद , हा सुद्धा प्रेरणा असते. शिवाय निखळ ताल नाद यांची , ठेक्याची आवड संगितावर प्रेम हे ही एक प्रेरणा असते. यातही एरवी चे रटाळ तणावाचे तेच ते तेच ते विंदा म्हणतात तसे जीवन ज्यात कुठलाही ताल उरलेला नाही त्यापासुन पलायन ही देखील प्रेरणा असते.  यासाठी अभिजन वर्ग ढोल ताशे वादनाकडे कदाचित आकर्षित झाला असावा. शिवाय मोकळा अवकाश , खुली मैदाने आनंदी आनंद चोहिकडे. त्याशिवाय वाजवलेल्या ढोलाचे फोटो व्हिडीयो सेल्फ्या, स्टेटसे  मिरवणे वगैरे ( थोडे एनारायांसम )  नंतर आम्ही संस्कृतीत सहभागी आम्ही कितीही आधुनिक झालो तरी मुळांशी कसे घट्ट जोडलेलो आहोत वगैरे हे ही असते. 

तर  अशा अनेक प्रेरणांनी अभिजन या ढोल ताशा वादनाकडे वळले.

त्यात आर्थिक प्रश्न मुळातच नसल्याने मग आपल्या संघाचा विशिष्ट गणवेश बनवणे. त्यात पुन्हा फेटे वगैरे पायजामे कुर्ते जे एरवी च्या रहाटगाडग्यात वापरायला कमी च संधी मिळते शिवाय सेल्फ्या वगैरेही छान येतात लाइक्स ही मिळतात. तर संघ गणवेश असणे.  पुन्हा आपल्या संघाचे युनिक नाव ठेवणे  तांडव, मल्हार, ओमकारा इत्यादी मग तो लोगो वगैरे वापरणे. हा सर्व खर्च अभिजन आनंदाने करतात.  सरावासाठी जागा मैदाने ठरवतात व्हॉट्स अप फेसबुक ग्रुप बनतात एकंदरीत आनंदी आनंद असतो.

आणि श्री अवधुत गुप्ते यांनी जे अप्रतिम असे गाणे विद्यांनंद बापट यांच्यावर बनवलेले आहे. ( जे मला बेहद्द आवडले संगीत चाल सुमधुर तर आहेच पण ज्या ओळी आहेत त्याही कसल्या काटेरी आहेत ) त्यात ते म्हणतात तसे  बापटांना ते सल्ला देतात " विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा " हा  अभिजनांचा  आनंद काही विद्यानंदाच्या  लक्षात येतच नाही .

जसे विद्यानंदा च्या लक्षात येत नाही तसेच आनंदमग्न अभिजनांच्या सुद्धा आपण डीजे सारखेच लोकांचे कान आपल्या ढोल ताशाने फोडतो हे लक्षातच येत नाही.  एका मुलाखतीत डॉ कविता मांडके यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ढोल आपण पोटावर बांधतो आणि बदडतो तेव्हा जी कंपने सर्व शरीरभर पसरतात त्याचे ही मोठे दुष्परीणाम आहेत हे तर आनंदमग्न अभिजनांच्या गावीही नसते. 

हे ढोल ज्यांना परवडत नाहीत असा एक तुलनेने एक निन्म आर्थिक स्तरातील वर्ग आहे जो डीजे चा वापर करतो असे दाखवणारा एक व्हिडीयो बघितला. मला त्यामागील अर्थशास्त्र माहीत नाही  अनुभव नाही पण मुद्दा कन्विनसींग होता. 

तर बापटांनी अनेंकांवर हल्ला चढवलेला आहे ज्यात प्रामुख्याने डीजे वर तर आहेच आहे असे म्हणुया बहुजनांवर त्याच बरोबर त्यांनी अत्यंत योग्य रीतीने ढोल ताशांवर सुद्धा तार्किक आक्षेप घेत हल्ला चढवलेला आहे.  सर्वात मोठी गंमत म्हणजे अभिजनांकडुन याच्यावर अळिमिळी गुपचिळी दिसतेय.  यातील तथाकथित सुशिक्षीतांना यापैकी कुणालाही कधीही स्वप्नातही आपण इतर नागरीकांना  आपल्या ढोल ताशाने उपद्रव निर्माण करतोय ते तर सोडा स्वत:च्या शरीरावर ही अन्न्याय करतोय हे माहीत नव्हते वा डोळेझाक केली असावी असे वाटण्यास वाव आहे.

बापटांच्या विरोधात जे बोलत आहेत त्यात अभिजनांचे मौन मला मोठे गंमतीदार वाटतेय. की आपण अरेच्च्या आपणही उपद्रवी आहोत या भावनेने लज्जा तर निर्माण झाली नसेल आणि त्याने गप्प  बसले असतील का ?  यात पुन्हा एक आहे जे जे पारंपारीक ते ते उत्तमच योग्यच असते हा एक मोठा गैरसमज वा पुर्वग्रह आहे .  ढोल ताशे पारंपारीक म्हणुन अर्थातच ते बडवणे ते ही देवाचे काम म्हटल्यावर तो फिर क्या कहने !  बापट अगदी योग्य म्हणतात तसे इतरांना सक्तीचे श्रोते बनवण्यात मग अडचण ती काय ? 

 

अभिजन ढोल ताशा पथकाच्या बाबतीत अजुन एक निरिक्षण आहे . यातील महीलांचा सहभाग.  एक मुंबईत गुढीपाडव्या ला साडी वगैरे नेसुन ते बुलेट वरुन फिरणे आणि दुसरे ढोल बडविणे.  हे एक रोचक आहे. म्हणजे यातील महीलांकडे एक " बघा आधुनिक आहेत मात्र आपल्या संस्कृतीशी नाळ जोडुन आहेत धर्माशी नाळ जोडुन आहेत "  असा एक पवित्रा असतो. यात  तुम्ही परंपरेचं जोखड अजुन भिरकावुन देऊ शकत नाही उलट या सर्वात तुम्हाला जोडुन परंपराच दृढ केली जात असते याची त्यांना क्वचितच जाणीव होत असावी. बरे परंपरा मुलत: चांगली असेल तर ते एक पण जेव्हा ती ढोल ताशे बडवण्यासारखी उपद्रवी विघातक स्वरुपाची असते तेव्हा त्यात आपण हातभार लावतोय त्याला प्रोत्साहन देतोय. हे ढोल ताशे बडवणाऱ्या अभिजन पथकातील महिलांना कधीच  लक्षात आले नसावे का ?  आले नाही किंवा बोलले नाही याचे आश्चर्य वाटते. कारण मी आजपर्यंत कुठल्याही अभिजन ढोल ताशे पथकातील कोणाही स्त्री पुरुषांना आपण हे काहीतरी चुकीचं करतोय असे वाटलेले दिसत नाही. अभिजनांकडुन अपेक्षा साहजिकच जास्त होती असते आहे.  कारण त्यांचे  शिक्षण वगैरे त्यांना ही माहीती असण्याची हे भान असण्याची शक्यता देते.

 

एका व्यक्तीने असे निरिक्षण नोंदवले की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले पुण्यातील मिरवुणीकत बहुसंख्येने असतात.  ही सुद्धा एक वेगळी पलायनवादी संख्या आहे.  यातील अनेकांना भविष्याची शाश्वती नाही, पास होण्याचे प्रमाण अत्यल्प , अनेक वर्षे वाया जात असलेली,  महानगरात दबुन जाऊन वावरणारी व त्याच वेळी सभोवतालच्या भौतिक जीवनाच्या लालसेने विचलीत असलेली,  सततच्या "चैन एक पल नही और कोइ हल नही " या अवस्थेत वावरणारी.  कदाचित जेव्हा समोर एखाद दुसरीच नाचण्याची झोकुन देण्याची संधी मिळत असेल तेव्हा बेभान होत आपले काटेरी वास्तव विसरवत असेल , तेव्हा त्या प्रेरणेने ही मुले नाचत असावीत.  

 

मुलत: एकंदरीत समाजच कठिण होत चाललाय. संधी संपत चालल्यात, अस्थिरताच कमालीची स्थिर झालेली तेव्हा या व्यतिरीक्त काय अपेक्षा करणार.  तसे पाहीले तर एकीकडे बेभान ढोल ताशे  डीजे वाजवणारे  दुसरीकडे तितकेच बेभान नाचणारे  हे सर्व च मुळ कठोर काटेरी झालेल्या वास्तवापासुन पळत आहेत.  तर अशा बेभानांकडुन  आपल्यामुळे दुसऱ्या कोणा नागरीकांना त्रास होतोय याचे भान त्यांना असण्याची अपेक्षा म्हणजे अवघडच आहे.

 

हा तसा सर्व समाजच एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. इथे जरी अभिजन ढोल ताशे पथक यांच्यावर भर दिलेला असला तरी तो एक वर्ग  मला डोळ्यात आला म्हणुन पण एकुण सर्वच आपण एका गर्तेत सापडलेले आहोत. त्याची कारणे खुप खोलवर आहेत. बाहेर येऊन नाचणे आणि बेभान होणे हे केवळ त्याचे बाह्य लक्षण आहे. आपण आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी असा झालेलो समाज आहे. 

सध्या तरी असे जाणवतेय 

 

मला असे प्रामाणीकपणे वाटते की आपण रस्त्यावर येउन जे काही करतोय आपण सर्वच तो एक परीणाम आहे एक सिम्प्टम आहे. आपल्या आत काहीतरी बिघडलय ते यानिमित्ताने आपण शोधायला हव असे मला वाटते.  आपण मुळ कारणे मूळ प्रेरणा या मागच्या शोधल्या पाहीजेत की आपण रस्त्यावर येऊन असे कुठल्या प्रेरणेने करतोय ?    याचा शोध घेणे अगत्याचे वाटते  या मंथनातुन काय बाहेर येइल माहीत नाही पण आपण आपल्या स्वत:ला पुर्वीपेक्षा अधिक चांगले जाणुन घेऊ शकु असे मला वाटते.

 

श्री अवधुन गुप्ते जे म्हणताय ते फार खोलवर आहे  त्यांचे आव्हान खुप खुप खोलवर जाण्यास सांगत आहेत ते अगदी बरोबरच म्हणताहेत

विद्यानंदा !

ओळख इथल्या आनंदी आनंदा !!!

तुम्हाला काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल.

 


वाचने 807
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

डी जे असो की ढोल ताशा, हे सगळे तुंम्ही म्हणता तशा 'आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी' समाजाच्या वैफल्याला वाट करुन देणारे मार्ग तरूण पिढीने अंगीकारलेले आहेत. बऱ्याच वेळा अंगठी जिथे हरवली तिथे शोधणे कठीण असेल तर जिथे उजेड आहे तिथे जाऊन शोधणे मूर्खपणाचे असले तरी काही तरी प्रयत्न केल्याचे समाधान देणारे असते. त्याचप्रमाणे, शिक्षणाची दुरावस्था, नोकरीचा प्रश्न यामुळे येणाऱ्या वैफल्याला न भिडता कुठेतरी आत्मसन्मान मिळवणे आवश्यक ठरते. ढोल ताशा पथके मुलांना अखंड २० -३० तास वाजवण्याचे सोपे आव्हान देऊन त्यात त्यांना 'यश' मिळवल्याचा आनंद आणि झिंग देतात. त्यामुळे सुध्दा यात मुले सामील होत असावीत असे वाटते.

लेख अतिशय मर्मग्राही झाला आहे.


बाहेर येऊन नाचणे आणि बेभान होणे हे केवळ त्याचे बाह्य लक्षण आहे. आपण आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी असा झालेलो समाज आहे. - +१

मूळ समस्या आहे तशी राहील. एकदा राजकारण मधे आले की सगळ्या गोष्टींचा फक्त विचका होतो. दुर्दैवाने तेच घडत आलेले आहे, आणि तेच होत राहिल.


बाहेर येऊन नाचणे आणि बेभान होणे हे केवळ त्याचे बाह्य लक्षण आहे. आपण आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी असा झालेलो समाज आहे.

१००% सहमत! अत्यंत तार्किक गोषवारा आहे. - (सामाजिक) सोकाजी


याच प्रश्नाचे राजकारण न केल्याने, नागरिकांनी पुढाकार घेत स्थापन केलेल्या कृती समितीच्या पुढाकाराने सोलापुरातला गणेशोत्सव डीजे मुक्त झाला आहे. हे घडवून आणताना कुठल्याही नेता तर दूर राहिला, 'पोस्टर बॉय'ची देखील गरज पडली नाही हे प्रकर्षाने दिसून येते. असो.


बाहेर येऊन नाचणे आणि बेभान होणे हे केवळ त्याचे बाह्य लक्षण आहे. आपण आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी असा झालेलो समाज आहे.

+

पूर्वी क्लास/ मास अशी रेषा अशा लक्षणानी दिसायची. परंतु आता सर्वच् समाज अस्थिरता या लक्षणांनी दिसते 👍

माझ्या आई वडिलांनी ज्या गोष्टीं धरून ठेवल्या त्यांची शून्यता मला समजली मी त्या सोडून दिल्या. मी ज्या काही गोष्टीं काही काळापूर्वी धरून ठेवल्या ती माझी मुलगी इतक्या कमी वयात त्यातली शून्यता समजून सोडून देतेय.

बदल... बदल... स्वीकारायला खुप धाडस लागते.जे सगळ्यांकडे यायला हवे. तेव्हाच "स्थिरो भव" होईल.


केवळ आनंद नव्हे तर तो नशेचाही विषय आहे.त्यांचा मेंदू हा ध्वनिप्रदूषण ला ट्यून असतो .त्यातून त्यांना नशा मिळते.अंगात माझीया भिनलाय ढोलिया या काव्यातून ती नशा व्यक्त होते.
डीजे, सामूहिक ढोलताशे हे झिंग देत असतात.मेंदुत त्यामुळे नशेचे रसायन स्त्रवते.नशेला प्रतिबंध झाला कि ते पिसाट होतात. खरच हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे.समूहउन्मादात माणसे विचार करण्याच्या अवस्थेत रहात नाहीत.जेव्हा ती स्वतःच त्या गोंगाटाचा भाग होतात तेव्हा त्यांना ध्वनिप्रदूषण जाणवत नाही. या खेळाला ग्लॅमर जाणीव पुर्वक जोपासले आहे. कारण त्यात अर्थकारण प्रचंड आहे. मास हिस्टेरिया निर्माण केला जातो. राष्ट्रीय प्रांतिक भाषिक वगैरे अस्मिता वेठीस धरल्या जातात. ग्लॅमर टिकवण्यासाठी क्रीडा पत्रकार,लेखक, मिडिया यांना चक्क भाड्याने घेतले जाते. विन विन सिच्युएशन चे फायदे लक्षात येतात. क्रिकेट वर होणारे बेटिंग, मॅच फिक्सिंग हा माहित असून सुद्धा त्याची एक नशा चढते. भव्य स्क्रिन्स वर मॅच बघत दारु चकना खात एन्जॉयमेंट मिळते. अशा वेळी तुम्ही मच्छर असला तरी गरुड भरारी घेता.
गणपती ला पुर्वी माणिकचंद गुटक्याने इतक घेरल होत की त्याच्या गळ्यात गुटक्यांच्या माळा घालण फक्त बाकी होत. सुदैवाने गुटक्यावर बंदी आल्याने गणपती वाचला आहे. आता डीजे ढोलाने घेरलय
गणेशोत्सवात ढोलताषे डीजे च्या गो़ंगाटात अतिरेक्यांनी बॉंबस्फोट घडवले तर अशी भीती मला वाटतेच


In reply to by प्रकाश घाटपांडे

कॉर्पोरेट पार्टीमधे पण जो नशा करत नाही, सामिष खात नाही,  धिंगाणा करत नाही, अचकट विचकट नाचत नाही त्याला/ तिला मागास समजले जाते. जगण्यातला आनंद काय तो याच गोष्टीत आहे असे समीकरण ठामपणे डोक्यात असे काही  घुसवले गेलेले आहे, की आंतरिक आनंदात चोवीस तास सुखी असलेल्यालाही लाईफ एन्जॉय करण्याचा अनाहूत सल्ला हमखास मिळतो. डायव्हर्सिटी आणि इन्क्ल्जुजन मधे एलजीबीटीक्यू प्लस वगैरे सगळ्यांचा समावेश होतो (जे योग्य देखील आहे).  फक्त शांत, अंतर्मुखी आणि निर्व्यसनी  व्यक्ती हा एक प्रकार त्यात बसत नाही. असो,


In reply to by मूकवाचक

कॉर्पोरेट पार्टीमधे पण जो नशा करत नाही, सामिष खात नाही,  धिंगाणा करत नाही, अचकट विचकट नाचत नाही त्याला/ तिला मागास समजले जाते.

 

असं खरं तर नाही. हे बऱ्याच वेळेस आपल्याच  मनात असतं कि लोक आपल्याला मागासलेले समजतील.    

 

मी २२ वर्षे लष्करात नंतर ४ वर्षे कॉर्पोरेट जगात वावरून दारूच्या थेंबाला किंवा तंबाखूला किंवा तत्सम कोणत्याही नशा आणणाऱ्या पदार्थाला  स्पर्श न करता (महापुरात पोहून कोरडा) निघालेला माणूस आहे). मला कधी कुणी तुम्ही मागासलेले आहात असे म्हणाले नाहीत किंवा मला तसे कधीही वाटले नाही.

 

माझा भाऊ सिमेन्स सारख्या कंपनीत काम करून नंतर सध्या तीन कारखान्यांचा मालक आहे. त्याने सुद्धा कोणत्याही नशा आणणाऱ्या पदार्थांना  स्पर्श केलेला नाही.

धंदा करायचा असेल तर सरकारी लोकांना खूष ठेवावे लागते पासून पार्टीत "ड्रिंक्स" घ्यायला लागतात किंवा मैत्री टिकवायची असेल तर हे सर्व करावेच लागते हे  सर्व आपल्या मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण आहे.

 

दारू प्यायची तर प्यावी, समर्थन करण्याची गरज नाही           


गणेशोत्सव कालमानानुसार बदलत गेला. 

मेळे गेले,देखावे आले,कीर्तन प्रवचन गेले नाटक सिनेमे आले,देखावे गेले भव्य लाइटिंग, डिस्को म्युझिक वर थिरकणारे लाइटिंग आले,आता डि जे,लेझरने उच्छाद मांडलाय. 

मिरवणूक पालखी, बैलगाडीतून ट्रॅक्टर, ट्रकवर आली.गॅस बत्त्या गेल्या स्ट्रिट लाइट्स आले,मंडळाचे स्वताचे जनरेटर आले.

ढोल ताशे तेंव्हा होते आणी आताही आहेत.

व्यवसाय किंवा मुख्य उपजिवीका म्हणुन पारंपारीक ढोल ताशा वाजवणारे होते.

हा समज चुकीचा आहे. गणेशोत्सवात ढोल ताशा वाजवणे कधीच  उपजिवीकेचे साधन नव्हते.आजही नाही.पन्नास वर्षापुर्वी श्रीफळ शाल,थोडी बिदागी दिली जायची.

तुलनेने अधिक शिक्षीत,  आर्थिक वरचढ, पांढरपेशा , 

तुलनेने शिक्षणाचा प्रसार  जास्त झाला असल्याने असे वाटू शकते. मागील पिढीतील वादक तुलनेने कमी शिकलेले,मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असणारे असल्याने सहाजिकच हा फरक असला तर यात नवल काहीच नाही.

अभिजनांची मुख्य प्रेरणा ही पलायनवाद ही आहे

याच विधाना नंतर आपणच याचे खंडन केल्यासारखे वाटते व त्याच्याशी सहमत आहे.

ग्रुप असणं, त्यात हास्य विनोद समुह संवाद होणं , शिवाय सर्व काम हे पुन्हा धार्मिक बाबीशी जोडलेलं असण्याने त्याच ही एक अधिकच समाधान मिळणं. 

अशा समूहात मित्र मिळतात. वेगळा बदल होत असतो. दररोजच्या कंटाळवाण्या रिटर्न मधे बदल होतो. काहितरी केल्याचे समाधान  मिळते.

 अधुनिक युगात जग जवळ आले असले तरी ,व्यस्ततेमुळे सोशलायझिं कमी झाले आहे. माणूस घाण्यासारख चक्रात फसलाय. त्यामुळे  असे उत्सव    

पलायनवाद नसून विरंगुळा आणी सोशलायझिंग चे बदललेले स्वरूप आहे.

या व्यतिरिक्त,  सांस्कृति कार्यक्रम ,पथनाट्य, देखावे,सामाजिक कार्य असे अनेक उपक्रम राबवले जातात.  त्यामधे गणवेश  बनवणे ,तालमी करता वेळ देणे इ. असेही चालतेच ना. तेंव्हा पलायनवाद नसून काहितरी वेगळे करण्याची संधी,पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची संधी म्हणले तरी चालेल.

या पूर्वीही बेभान  होऊन नाचतच होते. या नाचण्यात आतमधून अस्वस्थ, अशांत आहोत असा निष्कर्ष काढणे कितपत योग्य हे मला कळत नाही. 

गणेशोत्सवा पुर्वी घराघरात उत्साहाचे वातावरण  असते. घरातील गणपतीचे विसर्जन करताना लोक नाचतात,विसर्जन झाल्यावर  थोडावेळ उदास, दुखी होतात. 

परंपरेचं जोखड अजुन भिरकावुन देऊ शकत नाही उलट या सर्वात तुम्हाला जोडुन परंपराच दृढ केली जात

ज्या परंपरा सकारात्मक उर्जा निर्माण करू शकतात, समाजातील कुठल्याही घटकाला नुकसान  पोहचवत नाही. ज्याने एक ओळख बनू शकते अशा परंपरांचे पालन केले तर काय बिघडते. 

 

गणेशोत्सवात व्यतिरिक्त गणेशोत्सव यात्रा, उत्सव, उरूस काही विशेष पारंपारिक पद्धतीनुसार   साजरे होतात.  माणूस समाजप्रिय आहे आणी अशाच गोष्टींमधून एकत्र येत असतो.

असो, मुळ मुद्दा फक्त आणी फक्त ध्वनिप्रदूषण आणी लेझर याबद्दल आहे. याला आता बरेच फाटे फुटले आहेत.

पन्नास, साठ वर्षापुर्वी ढोल ताशे होते, रस्त्यावर मंडप होते मिरवणुका निघत होत्या,  मशाली गॅसबत्त्या जळत होत्या. सामुहिक  खिरापती वाटत होते. कार्यकर्ते श्रमपरिहार करत होते. थोड्याफार प्रमाणात हुडदंग माजत होता.

लोकसंख्येत प्रचंड वाढ,तंत्र ज्ञान  विकास  यामुळे याचे स्वरूप विक्राळ व त्रासदायक  झाले आहे एवढेच.

 

 कमी कर आवाज, डी जे तुला ......

कुणाची शपथ देऊ म्हणजे आवाज कमी करशील. 

 

हे माझे मत माझ्या अनुभवानुसार.  आपणच म्हटल्यामुळे लिहिले आहे. 

 

कृपया मतभिन्नता आहे म्हणून व्यक्तीगत पातळीवर  कांमेटू नये हि विनंती.


In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी,

 

तुमच्याशी याबाबत सहमत आहे. विशेषत: पलायनवाद नाही यावर. ढोलबडवीस पलायन म्हंटलं तर पूर्वीच्या काळी लोकं थेटरात जाऊन सिनेमे पहायचे ( व हल्ली घरी पाहतात ) तो ही असाच पलायनवाद म्हंटला पाहिजे. पीसीवर शहरबांधणीची कसलीशी गेमं खेळणं हा पण प.वा. झाला.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

"मी मनातला अंधार थिएटरच्या अंधारात मिसळून द्यायला तिथे जातो. बाहेरचा उजेड माणसाला फसवू शकतो, पण थिएटरचा अंधार त्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो. माणूस बाहेरच्या जगात हजारो मुखवटे घालून फिरत असतो, जगाला दाखवण्यासाठी तो खोटं हसतो. पण जेव्हा तो थिएटरच्या त्या गर्द काळोखात जाऊन बसतो, तेव्हा त्याचे सगळे मुखवटे गळून पडतात. थिएटरचा तो अंधार माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची एक हक्काची आणि सुरक्षित जागा देतो. समोरच्या मोठ्या पडद्यावरच्या प्रकाशात जेव्हा एखादा भावुक प्रसंग येतो, तेव्हा माणसाच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहतात. तो अश्रू शेजारच्याला दिसत नाही, कारण तिथला अंधार त्या अश्रूला लपवून घेतो. माणसाच्या मनात साठलेला वर्षानुवर्षांचा अंधार आणि कोंडमारा, थिएटरचा हा दोन-अडीच तासांचा अंधार स्वतःमध्ये सामावून घेतो आणि बाहेर पडताना माणसाला हलकं करून पाठवतो.   

शिरीष कणेकर  

प्रत्येक वेळी  प्रत्येक बाबतीत पलायनवाद असेलच असे अर्थातच नाही.  असे म्हणायचे नाहीये.

मात्र  आज जे उत्सव  डोळ्यासमोर आहे त्यात बहुतांशी असेच मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे असे जाणवत आहे ते वरील  लेखात व्यक्त केलेले आहे.

 


In reply to by मारवा

पलायनवाद, मानसिक तणावा पासून सुटकेसाठीचा प्रयत्न.    एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे; परंतु कोंबडं  झाकून ठेवले तरी सुर्य उगवायचा थांबत नाही.

 

असा प्रयत्न सर्वच करतात. सार्वजनीक उत्सव, ट्रेकिंग, सिनेमे,सोशलायझिंग, भटकंती हे तात्पुरते उपाय असतात.  हे दररोजचे जीवन आहे. 

 

गणेशोत्सव पारंपारिक सण आहे आणी कित्येक वर्षांपासून  चालू आहे. या मधे संपूर्ण समाज एकत्र येतो. म्हणजे पूर्ण समाज पलायनवाद शोधतो आहे का? 

 

पलायनवाद  नकारात्मक विचार आहे. विरंगुळा सकारात्मक.  दोन्हीचा उद्देश  एकच. रोजचा मानसिक तणाव हलका करणे. आता दररोज एक प्रकारचा उपाय करणे शक्य नसते.

मिपावर लिहीणे पलायनवाद आहे की विरंगुळा🤔

तुम्ही पलायनवाद  म्हणा आम्ही विरंगुळा म्हणून.


In reply to by कर्नलतपस्वी

पलायनवाद  आणि  विरंगुळा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

 

- (बद्द वाजणारं नाणं) सोकाजी


In reply to by कर्नलतपस्वी

+१

 

मानवी समाजाला नेहमीच ढोल सारख्या वाद्यांचे प्रेम वाटले आहे. जुन्या काळात चर्च ने ह्या वाद्यांवर बंदी आणली होती कारण ढोल घेऊन नाचणे चर्चच्या मते सैतानाची पूजा होती. इंग्रजीत पराया Pariah हा शब्द आहे ह्याचा अर्थ अस्पृश्य किंवा वाळीत टाकलेला असा होतो. पण हा शब्द तामिळ शब्दावरून इंग्रजीत आलेला आहे आणि तामिळ शब्दाचा अर्थ ढोल वाजवणारा असा आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना हा शब्द आवडला आणि त्यांनी त्याचा संबंध युरोपियन अनुभवांशी जोडला आणि आता इंग्रजीत तो सर्रास वापरला जातो. आधुनिक काळात असंख्य तरुणांना हार्ड रॉक वगैरेचे प्रेम आहे. ह्यांत कानठळ्या बसवणारे पण जोशपूर्ण संगीत असते. इलेक्ट्रिक गिटार वगैरे अत्यंत लोकप्रिय पण ध्वनी प्रदूषण करणारी वाद्ये आहेत .

बापट नास्तिक असल्याने त्यांचे शब्द पूर्वग्रह दूषित असतात.

ढोल वाजविणे ह्यांत काहीच चुकीचे नाही किंवा त्यांत पलायनवाद वगैरे नाही. सार्वजनिक ठिकाणी वाजवणे हा फक्त उपद्रव आहे. इतर देशांत हार्ड रॉक साठी जो मॉडेल वापरला जातो तोच इथे सुद्धा वापरून तरुणाईला ढोल बडविण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. उलट ह्यांच्या स्पर्धा वगैरे घेतल्या जाऊ शकतात, त्याशिवाय नगारे, तुतारी इत्यादी वाद्ये सुद्धा आणून ज्यांना आपले कान फोडून घ्यायचे आहेत त्यांना वाजविण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. फक्त सार्वजनिक ठिकाणी नको.

 

भगवान शिव च्या हातांत डमरू म्हणजे छोटा ढोल आहे. पाणिनीची अष्ठाध्यायी महेश्वर सूत्राने सुरु होते ज्यांत संस्कृत भाषेच्या मूळ अल्फाबेट ची ओळख होते. ह्याला महेश्वर सूत्र म्हणतात कारण पाणिनी ह्यांनी शिवाच्या डमरू चा आवाज ऐकला आणि त्यातून त्यांना हे सूत्र सुचले. (ह्या सूत्राचा बंध म्हणजे structure अतिशय अपूर्व आहे कार्यं त्या विशिष्ट structure मुले बाकीची सूत्रें शक्य झाली).

त्यामुळे भारतीय संस्कृतीशी ढोल आणि ढोल सदृश्य वाद्ये फार जुन्या काळापासून जोडली गेली आहेत. त्यांत पलायनवाद वगैरे शोधणे ढोंग आहे बुद्धिवाद नाही. 

 

परंपरेचं जोखड अजुन भिरकावुन देऊ शकत नाही उलट या सर्वात तुम्हाला जोडुन परंपराच दृढ केली जात

 

परंपरा हि जोखड आहे हा पूर्वग्रह आहे. कार्लोस फुएंट्स हा मेक्सिकन लेखक म्हणतो त्या प्रमाणे "There is no creation without tradition; the 'new' is an inflection on a preceding form; novelty is always a variation on the past."

परंपरा मानवी समाजाचा गाभा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही एक प्रगत समाज बनवू शकत नाहीत. परंपरा निर्माण करणे, चालू ठेवणे, त्यांत बदल आणणे किंवा त्या बंद करणे (सर्व काही व्यैयक्तिक पातळीवर) हे मूलभूत वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. परंपरा मुळे संस्था (इन्स्टिट्युशन्स) निर्माण होतात आणि संस्था मुळे विविध क्षेत्रांत प्रगती होते. 
 


आजचा नाही. गेल्या चार पाच वर्षापासून पुणेकरांनी लावून धरलाय. 

 

दोन वर्षापुर्वी एका जेष्ठ नागरिकाने मंडपात जाऊन डी जे बंद करा विनंती केली होती. तो कमी न करता किंचित वाढवला. मग आता त्याची सटकली आणी त्यांनी डी जे ची उपकरणे तोडून फोडून टाकली. त्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांना अनपेक्षित होती. पोलीसांनी जेष्ठ नागरिकाला अटक केली व गुन्हा दाखल  केला. नंतर  पब्लिक अपरोर नंतर काढून टाकण्यात आला असे समजले. 

 

मागील वर्षी गणेशोत्सवा  नंतर  आठ लोक अंधळे,बहिरे झाल्याचे रिपोर्ट नंतर महाराष्ट्र  टाइम्स ने नागरीकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. पण त्या सोईस्कर पणे कानामागे टाकण्यात आला.

 

या वर्षी बापटांनी थेट महासभेत प्रश्न विचारून प्रशासनाची गोची केली. त्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले. सत्ताधुंदानी अन्अर्गल वक्तव्य करून हवा दिली. 

वातावरण तापले. दबलेला आवाज बुलंद  झाला.

 

फटफट्यांनी गेले काही वर्षुु उच्छाद मांडला होता. प्रशासनालाच डोकेदुखी झाली असावी अशा सर्व गाड्यांचे सायलेन्ससर काढून रोड रोलर ने चेपून टाकले. स्वारांची वरात काढली. वर्कशॉप वर सखत कारवाई करण्यात  आली.

या वर्षी बहुतेक फरक पडेल असे वाटते.

 

-डी जे के धडकनेसे खडकती है खिडक्यांवर

खिडकियोंके खडकनेसे दुबकता है खडकसिंग.

 

-डी जे त्रस्त जे. ना.


अभिजन ढोल ताशा पथकाच्या बाबतीत अजुन एक निरिक्षण आहे . यातील महीलांचा सहभाग. एक मुंबईत गुढीपाडव्या ला साडी वगैरे नेसुन ते बुलेट वरुन फिरणे आणि दुसरे ढोल बडविणे. हे एक रोचक आहे. म्हणजे यातील महीलांकडे एक " बघा आधुनिक आहेत मात्र आपल्या संस्कृतीशी नाळ जोडुन आहेत धर्माशी नाळ जोडुन आहेत " असा एक पवित्रा असतो. यात तुम्ही परंपरेचं जोखड अजुन भिरकावुन देऊ शकत नाही उलट या सर्वात तुम्हाला जोडुन परंपराच दृढ केली जात असते याची त्यांना क्वचितच जाणीव होत असावी. 

 

आपण समाजहिताचा काहीतरी विचार मांडत आहोत असे या धाग्यावरील लिखाण भासविण्याचा प्रयत्न करते. पण या लिखाणातून हिंदुद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणारा स्लो पॉइझनसदृश्य कॉमरेडी कावा मात्र या वरील परिच्छेदातून साफ उघड पडला आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, प्रकाश प्रदूषण इ पर्यावरणाच्या दृष्टीने वाईटच आहे यात कसलाच वाद नाही. पण त्याला विरोध करण्याच्या निमित्ताने हिंदू धर्म, संस्कृती व परंपरांना तुच्छ लेखणे व एकूणच हिंदू असणे लाजिरवाणे आहे असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा अश्या प्रकारच्या लिखाणाचा दुष्ट कॉमरेडी कावा असतो. 

 

पहिली बाब म्हणजे, एकीकडे आम्ही पुरोगामी आहोत असे भासविणे पण प्रत्यक्षात मात्र स्त्रियांच्या साड्या, त्यांचं दुचाकीवर फिरणं आदींना हीन दृष्टीने पाहणे ही अशा लोकांची स्त्रीद्वेष्टी मनोवृत्ती. अश्या लोकांच्या पुरुषसत्ताक पद्धतीत - सुरुवातीला स्त्रियांच्या कपड्यावर निर्बंध, नंतर त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर निर्बंध त्यापुढे त्यांच्या एकूणच आयुष्यावरच निर्बंध शेवटी त्यांना शटलकॉक बुरख्यात बंदिस्त राहण्याचे निर्बंध या सगळ्या पुढच्या पायऱ्या असतात. 

 

१. स्त्रियांनी त्यांना हवे तसे कपडे घालू नयेत त्यांनी वाहने चालवू नयेत त्यांनी चार भिंतीतच कोंडून राहावे - कॉमरेडी विचार  
२. स्त्रियांनी हवे ते कपडे घालावेत त्यांनी योग्य ती वाहने चालवावीत, मुक्त वातावरणात वावरावे - हिंदू धर्म विचार  
वरीलपैकी क्रमांक २ हाच विचार श्रेष्ठ आहे, स्त्रियांचा आदर करणारा आहे, तोच जोपासायला हवा व त्याचे संवर्धन करायला हवे हे स्पष्टच आहे. 

 

दुसरी बाब म्हणजे परंपरा. ध्वनी प्रदूषणायाला वाईट ठरविताना त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या हिंदू परंपरेलाही वाईट ठरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणे ही बाब म्हणजे सामाजिक संवादाची पातळी किती रसातळाला गेली आहे याचे द्योतक आहे. यापूर्वीही मिपावर हिंदू धर्म परंपरेची हेटाळणी करण्याचा हीन प्रयत्न झाला होता पण जागरूक मिपाखरांनी "हिंदू धर्म हीच एक प्रचंड परंपरा आहे. जिच्यामुळे दीडशे कोटी हिंदू एकमेकांचा गळा न घोटता जिवंत राहताहेत.सरसकट टीकाकारांनी तो आधार आधी सोडावा" असा टोला हाणत तो प्रयत्न हाणून पडला. 

शालेय शिक्षणापासून म्हटली जाणारी प्रतिज्ञा "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" ही शिकवण देते. पण हे कॉमरेडी लोक्स् मात्र त्याच परंपरेला जोखड ठरवण्याचा संविधानविरोधी प्रयत्न करतात. 

 

अपेक्षेप्रमाणे तिसरी बाब म्हणजे या कॉमरेडी लोकांना अकारण खुपणारी धर्माची नाळ. ज्यांच्या दृष्टीने धर्म ही अफूची गोळी आहे त्यांच्याकडून हिंदू धर्म व त्यासंबंधित जे दिसेल त्यावर दुगाण्या झाडणे अपेक्षितच आहे. 

तथापि, "धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्॥" अशी हमी पवित्र हिंदू धर्म देतो. त्या सर्वश्रेष्ठ धर्म परंपरेवर प्रश्नचिन्ह उभे करू पाहणाऱ्या मानवताविरोधी कॉमरेडी विचाराला दिसेल तिथे हाणून पाडायलाच हवे, नाही का? 

 

- (जागरूक मिपाखरु) कांदा लिंबू


In reply to by कांदा लिंबू

२. स्त्रियांनी हवे ते कपडे घालावेत त्यांनी योग्य ती वाहने चालवावीत, मुक्त वातावरणात वावरावे - हिंदू धर्म विचार

 

हिंदू धर्म विचार म्हणजे काय? हे नेमकं कोणत्या धर्म ग्रंथात लिहीलंय? 

घुंघट / पडदा ह्या प्रथा हिंदू धर्म विचारात नसताना का पाळल्या जातात आजही, काहीतरी गडबड आहे का, नेमकं कोणता धर्मग्रंथ आधार मानायाचा यासाठी ?

 

"धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्॥" अशी हमी पवित्र हिंदू धर्म देतो.

 

एवढी हमी जर असेल तर कोणत्याही विचाराला, आपण (मनुष्याने), दिसेल तिथे हाणून पाडायची गरजच काय, पवित्र हिंदू धर्म  सक्षम आहे त्याची त्याची रक्षा करायला, नाही?

 

- (प्रश्नांकित) सोकाजी 


In reply to by कांदा लिंबू

गणेशोत्सव हि परंपरा  आहे

डी जे किंवा ठणाणा वाजणारे ढोल ताशे नव्हे.

शास्त्रात रूढी:  बलियसी या नात्याने परंपरा बाजूला राहिली आणि जितका जास्त आवाज तितके आम्ही हुशार हि रूढी होऊ लागली आहे. 
हे ताबडतोब आणि कायमचे थांबवले पाहिजे.

आमचे आजोबा लष्करातून निवृत्त होऊन पुण्यात सोमवार पेठेत आपल्या वडिलोपार्जित घरी राहावयास आले होते. १९८३ साली प्रथम गणेशोत्सवात त्यांच्या घरी गेलो असता ते वेडेपिसे झालेले होते. कारण त्यांच्या गल्लीत दोन आणि मागच्या गल्लीत एक असे लाऊड स्पीकर दिवस भर ठणठणाट करताना ऐकू येत होते. 

मी १८ वर्षांचा असून अर्ध्या तासात त्रासलो तर ६५ वर्षाचा वृद्ध माणूस दिवसभर कसे सहन करेल?

गणपतीची आरती दिवसात सहा वेळेस ( तीन मंडळांची दिवसात दोन वेळेस) लाऊडस्पिकर वर आरती ऐकणे हा सण किंवा परंपरा कशी असेल?        

हा आपला सण नव्हे. उगाच परंपरांचा उदो उदो करायची आवश्यकता नाही.

गणेशोत्सवाची मिरवणूक हि केवळ झाँज आणि टाळ चिपळ्या सारख्या हाताने वाजवायच्या वाद्यांनी झाली पाहिजे

आणि रात्री दहा वाजता सार्वजनिक गणपतींची मिरवणूक संपली पाहिजे.

रात्रभर लाऊडस्पिकर वाजवून परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक शांततेचा भंग करण्याची परवानगी कुणालाही द्यायला नको.

मग ती मोहरम ची मिरवणूक असो मी आंबेडकर जयंती अथवा अण्णाभाऊ साठे यांची  जयंती असो.     

 

आवाजाची मर्यादा ८५ डेसिबल ओलांडली तर गणेश मंडळांना १ लाख रुपये आणि लाऊडस्पिकर च्या मालकाला पाच लाख रुपये दंड

दुसऱ्या गुन्ह्यास पाच लाख नि दहा लाख

आणि तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास सहा महिने तुरुंगात.  

असे केल्यास सर्वांच्या परंपरांचा जाज्वल्य अभिमान आणि उन्माद आपोआप कमी होईल.

 

पुण्यात कोण पारंपरिक घरात राहतो आणि शेणाने घर सारवतो. कुणाच्या आया बहिणी नऊवारी साड्या  नेसतात.

 

परंपरेचा उन्मादकपणे वापर हा संपूर्ण दांभिकपणा आहे.              


In reply to by सुबोध खरे

>>>पुण्यात कोण पारंपरिक घरात राहतो आणि शेणाने घर सारवतो. कुणाच्या आया बहिणी नऊवारी साड्या  नेसतात.

 

सहमत आहे. पुण्यात हल्ली लोक घरात कमी आणि कार्यालय आणि जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच जास्त वेळ असतात. आणि कमीत कमी कपडे वापरण्याची पद्धत आहे. उकाडाच फार आहे त्याला काय करणार?

 

>>परंपरेचा उन्मादकपणे वापर हा संपूर्ण दांभिकपणा आहे.              

सहमत.
 


In reply to by वृषभ खोंडे

गळ्यातल्या उपरण्याने पुसून घ्या ! बरं दिसत नाही भरल्या घरात रडणं.


In reply to by सुबोध खरे

गणेशोत्सव हि परंपरा  आहे

डी जे किंवा ठणाणा वाजणारे ढोल ताशे नव्हे.

 

शंभर टक्के खरे आहे. डीजे लेझर व अश्या इतर बीभत्स बाबींचा विरोध व्हायलाच हवा. वैयक्तिक व सामूहिक अश्या दोन्ही पातळींवर प्रबोधन व्हायला हवे. राजकीय दबाव वापरून हे प्रकार बंद पाडायला हवेत.

पण त्याचबरोबर यानिमित्ताने जर कुणी धर्म परंपरांचा अवमान करू पाहत असेल तर त्या प्रवृत्तींचा ही समाचार घ्यायला हवा.

बाकी,

महाराष्ट्रात या उपद्रवांवर किमान चर्चा तरी होते, सोलापूरसारख्या काही ठिकाणी जनजागृती होऊन असे प्रकार बंदही झाल्याचे दिसते. इथे हैद्राबादेत मात्र सगळाच आनंदीआनंद आहे. "वो लोगां करते फिर अपन कैकु नइ करना?" अश्या प्रतिप्रश्नापासून संवादाला सुरुवात होते.

तरीही चित्र अगदीच अंधारमय नाही. जुन्या शहरात काही मोजकी गणेश मंडळे ठरवून मातीची गणेश प्रतिमा बनवितात. आम्ही इथे व गावाकडे कायम मातीची गणेश मूर्ती बसवत असतो. श्रीकृपेने, इथेही किमान वीस कुटुंबांना पीओपी मूर्ती सोडून मातीची गणेश मूर्ती बसविण्यासाठी आम्ही कायमचे प्रेरित केले आहे! मागच्या सात-आठ वर्षांपासून आमचे स्थानिक नगरसेवक लोकांना मातीची गणेश प्रतिमा मोफत वाटप करतात. 

 


In reply to by सुबोध खरे

अशा मंडळींना पैशाची ददात नसल्याने (त्यांच्या मागं बडी स्थानिक राजकीय धेंडं असल्याने) ती एक वेळ दंडही भरतील पण किमान पाच वर्षे सक्तमजुरीचीच शिक्षा कठोरपणे अमलात आणली गेली तर फरक नक्की पडेल. या त्रासामुळे जीवितहानी अथवा दृष्टी गमावणे अशा घटना घडूनही किती जणांना तुरुंगवासाची परिणामकारक शिक्षा झाली आहे? या बाबतीत न्यायालयाकडूनच आवश्यक ते कठोर उपाय योजले गेले पाहिजेत कारण राजकीय-सामाजिक नेतृत्व हे निर्लज्जपणे या प्रदूषकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले दिसत आहे.


मागील वर्षी गणेशोत्सवात गावात डि जे वर दर आर्ध्या तासाने हेच गाणे लागत होते. 

काय माहित डी जे वाल्या बाबूचे आणी अश्वीनीचे  काय झेंगाट आहे.

 

डी जे शपथ खोटे बोलत नाय.....

गणेशोत्सवानंतर काही दिवस  .....

जाऊ द्यात, म्हणाल म्हातारचळ लागलाय. 

.