Skip to main content

ऍडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध: सत्य आणि विपर्यास

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 08/09/2026 22:30 या दिवशी प्रकाशित केले.

✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू 

✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश 

✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश 

✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ 

✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण? 

✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण 

✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं 

३ सप्टेंबर १९३९! दुसरं महायुद्ध नावाचं अग्नीकुंड ह्या दिवशी पेटलं. पोलंडमध्ये युद्धाला तोंड फुटल्यापासून हिरोशिमानंतर जपानने शरणागती पत्करण्यापर्यंतचे हे २१६३ दिवस! आधुनिक इतिहासातलं महाभारत आणि अतिशय नाट्यमय कालखंड. पराक्रम, क्रूरता, अमानुषता, स्वार्थ आणि जागतिक वर्चस्ववादाचा विलक्षण अविष्कार. दुसरं महायुद्ध हा माझ्यासाठी अतिशय जवळचा विषय. गेल्या ३ सप्टेंबरलाच युद्ध आणि हिटलरबद्दल एक वेगळा दृष्टीकोन सांगणारं हे पुस्तक वाचण्यात आलं. पराग वैद्य ह्यांची शैली आणि विषय मांडणी अशी‌ आहे की एकदा सुरू केल्यावर थांबवता आलं नाही. त्या पुस्तकाबद्दलची ही प्रतिक्रिया.

   

(माझा ब्लॉग. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, आकाश दर्शन, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.) 

ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल. 

प्रचलित- रूढ इतिहास सांगतो की, नाझी जर्मनीच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे हे युद्ध सुरू झालं. जर्मनी व जपान ह्यांचा साम्राज्यवाद, त्यांनी जगावर लादलेलं युद्ध व ब्रिटन- अमेरिका अशा लोकशाही देशांनी त्यांच्यापासून जगाचं केलेलं रक्षण. रूढ इतिहास हा आहे. ह्या इतिहासाची एक वेगळी फार समोर न येणारी बाजू हे पुस्तक सांगतं. जर्मनी देश म्हणून कसा होता, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याचं सामर्थ्य काय होतं आणि ब्रिटीश- अमेरिकन व रशियाचा खरा चेहरा काय होतं ह्याची खूप वेगळी चर्चा ह्या पुस्तकात आहे. जर्मनीचा तो आक्रमक साम्राज्यवाद आणि स्टॅलिनच्या रशियाने ओरबाडलेले पोलंड, लिथुआनिया, फिनलंड, लॅटव्हिया, युगोस्लाव्हिया व युद्धोत्तर काळात ग्रीस असे देश; नाझी हे मानवता विरोधी आणि साम्राज्यवादी; पण जगभर नाझींपेक्षा प्रचंड मोठ्या जुलुमी वसाहती असलेले देश मात्र शांतताप्रेमी ह्या प्रचलित रूढ इतिहासाची मोडतोड करणारी मांडणी पुस्तकामध्ये आहे. आणि त्यासाठी पुस्तकामध्ये अक्षरश: शंभरहून अधिक पानं भरतील इतकी संदर्भ सूची आहे. लेखक पराग वैद्य ह्यांनी हे पुस्तक प्रचंड अभ्यास करून लिहीलं आहे. आणि त्यांनी मांडलेली भुमिका व वेगळ्या दृष्टीकोनातून सांगितलेली तथ्यं खूप रोमांचक आहेत. 

दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीला जर्मनीचं सैन्य अतिशय तुटपुंजं होतं. आर्थिक मंदी होती आणि अनेक समस्या होत्या. त्यांचे असंख्य पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाझी जर्मनी युद्धखोर देश होता आणि त्यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे युद्ध सुरू झालं हा प्रचलित इतिहास केवळ सांगितलेला इतिहास आहे हे लक्षात येतं. आणि तेव्हा लोकशाही देशांच्या वसाहती जगभर होत्याच की. एका देशाने अनेक खंडांमध्ये ढिगाने देशांवर राज्य केलं तरी तो लोकशाही देश आणि दुसर्‍या एका देशाने व्हर्सायच्या तहात गमावलेले स्वत:चेच भाग- प्रदेश, शहरं किंवा अगदी जमिनीचा तुकडा परत घेतला तरी तो देश मानवताविरोधी अशी ही लोकशाही देशांनी उभी केलेली धारणा होती. 

पुस्तक पुराव्यानुसार दाखवून देतं की, इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. कारण असंख्य समस्या होत्या. शक्ती कमी होती. पुस्तक सांगतं की, जर्मनीवर युद्ध लादलं गेलं आणि मग तो देश जिद्दीने उभा राहिला आणि पुढे मोठ्या मोठ्या देशांना युद्धात जर्मनीने पाणी पाजलं. पण जगभर पसरलेली साम्राज्य- जागतिक अर्थसत्ता व रशियातलं मनुष्यबळ ह्यामुळे जर्मनीचा पराभव झाला. तो अपरिहार्यच होता पण तरीही जर्मनीने युद्धात दाखवलेला पराक्रम किती वेगळा होता ह्याचं सैनिकी विश्लेषण पुस्तक सांगतं. जर्मनी रशियाविरुद्ध हरण्यामागे असलेलं एक अज्ञात कारणसुद्धा त्यात येतं. 

ऍडॉल्फ हिटलर राष्ट्रप्रमुख म्हणून ह्या पुस्तकात समोर येतो. त्याचं पूर्वायुष्य व व्यक्तिगत जडण घडणीची संक्षिप्त चर्चा आलेली आहे. पुस्तकामध्ये अनेक उल्लेख आहेत जे दर्शवतात की, ३ सप्टेंबर १९३९ नाही तर हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला तेव्हापासूनच शत्रूंनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे शत्रू आणि युद्धाचे खरे सूत्रधार कोण हे पुस्तकातच वाचायला हवं. हिटलर व नाझींबद्दल अनेक धक्कादायक मतं पुस्तकात आहेत जी मला पटली नाहीत. पण ब्रिटन व अमेरिकेबद्दल लेखकाची मतं पटण्यासारखी आहेत. भारताला ह्या लोकशाही देशांनी दिलेली वागणूक कोण विसरेल? युद्धासाठी सगळा जोर लावत असताना १९४३ च्या दुष्काळात लाखो बंगाली लोकांना चर्चिल सरकारने मदत न करता मरू दिलं. जर्मनी व रशियाने एकमेकांची शक्ती कमी करावी व नंतर आम्ही त्याचा फायदा उठवू असं अमेरिकेचं गणित होतं. शिवाय स्टॅलिनने केलेली रशियन लोकांची दडपशाही, हत्याकांडं व छोट्या देशांवरचा वरवंटा लोकशाही देशांनी नजरेआड ठेवला. अशा अनेक विसंगतीवर हे पुस्तक बोट ठेवतं. 

लेखकांनी अभ्यासाने दिलेले पुरावे व संदर्भ वाचनीय आहेत. हिटलर आणि नाझी ह्यांना छळछावण्या, दडपशाही व जुलुमशाहीच्या ज्या अपराधांसाठी ओळखलं जातं, त्या गोष्टीही लोकशाहीवादी देशांनी व सूत्रधारांनी पसरवलेल्या आहेत असं पुस्तक सांगतं. पण त्याबद्दलचे पुरावे त्यात अजून हवे होते. लेखक ज्या गोष्टींना असत्य म्हणतात, त्या त्यांनी सिद्ध करायला हव्या होत्या. ज्याला दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास महत्त्वाचा वाटतो आणि ब्रिटन- अमेरिकेचं खरं चरित्र आणि चारित्र्य ज्यांना माहिती आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं! भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दुसर्‍या महायुद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातूनही हे पुस्तक वाचनीय आहे. हे पुस्तक बूकगंगा व इतर ठिकाणी उपलब्ध आहे. लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! 

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 सप्टेंबर 2026.


वाचने 453
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान परिचय! पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. माहीत नाही का पण मला नेहमी हे युद्ध इतका पराक्रम दाखवूनही जर्मन हरले कसे हे कोडे उलगडत नाही! जर्मनी हरण्याचे माझ्यामते एकमेव कारण म्हणजे जपान ने रशियावर न केलेला हल्ला! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्र बाहुबली,

 

जर्मनी दुसरं महायुद्ध हरली याचं प्रमुख कारण हिटलर आणि ज्येष्ठ नाझी गद्दार होते हे आहे. हिटलर सुरुवातीस गद्दार नव्हता. पण डंकर्कला इंग्लिश सैन्य सोडून त्याच्या गद्दारीचा श्रीगणेशा झाला. पुढे जर्मनीचा सत्यानाश करेस्तोवर गद्दारीची हद्द झाली.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

काहीही! हिटलर का गद्दारी करेल स्वतच्या देशाशी?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा,

 

कूं गद्दारी किया ऊ आमको नाय मालूम. पण किया तो सही. इदर गद्दारपनके पंचावन्न केसेस हय. अंग्रेजीमां लिखे : https://blog.thegovernmentrag.com/2025/05/25/24763/

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

यातील सगळे मुद्दे कैच्याकै वाटले. हिटलर का हरला ही ओढून ताणून कारणे बनवून ते सगळे हिटलरने मुद्दामून इंग्लंडच्या सांगण्यावरून केले असे म्हणायला काय अर्थ आहे? अनेकदा अति आत्मविश्वास नडतो, निर्णय घेताना चुका होतात- काही महत्त्वाचे मुद्दे निसटतात वगैरे सगळ्या मानवी चुकांमुळेच हरणारे लोक युध्द हरतात. 

 

त्याच न्यायाने कारगीलमध्ये इतक्या उंचीवर भारतीय हवाईदल हल्ले करू शकेल हेच मुळात मुशर्रफच्या ध्यानात आले नाही म्हणजे मुशर्रफने दीड-दोन हजार पाकडे सैनिक मरायला तिथे पाठविले आणि तो वाजपेयींचा एजंट होता असे म्हणावे का?

त्याच न्यायाने कोणीही कोणाचाही एजंट होता असे दावे करता येतील. उदाहरणार्थ औरंगजेब शिवाजी महाराजांचा एजंट होता, प्रभाकरन श्रीलंका सरकारचा एजंट होता, अमेरिकेचे सरकार रशियाचे एजंट होते आणि रशियाचे सरकार अमेरिकेचे एजंट होते (म्हणजे दोघेही एकमेकांचे एजंट होते) वगैरे वगैरे. 

कसलाही आगापिछा नसलेले कोणीतरी काहीतरी लिहिते आणि त्यावर लगेच तुम्ही विश्वास कसा ठेवता तेच समजत नाही.

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार,

 

एखाद दोन चुका ठीक आहेत. शिवाजीच्याही झाल्या होत्या. पण तब्बल ५५ गफलती? 

 

डंकर्कमध्ये सोडून दिलेलं भलं मोठं ३,३८,०००+ सैन्य? मॉस्को पडायच्या बेतात आलेलं असतांना अचानक मोहरा वळवून पार दूरवर सरित्सिन ( = स्टालिनग्राड ) वर आक्रमण? नाझी सैन्य थोडं मागे यायच्या पाऊलुशच्या विनंतीस चक्क नकार ? दोस्त सैन्य नॉर्मंडीत उतरणार हे हिटलरला पक्कं ठाऊक होतं. तरीपण केलेलं दुर्लक्ष काय दर्शवतं? फ्रांकोला विचारून ( वा न विचारता ) जिब्राल्टर का ताब्यात घेतलं नाही? 

 

कोणते प्रश्न विचारायचे हे महत्त्वाचं असतं.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

हे सगळे पश्चातबुध्दीने लिहिणे खूप सोपे असते. त्यावेळेस हिटलरकडे निर्णय घ्यायला नक्की कोणते इनपुट्स होते, त्यावर निर्णय घेताना त्याच्या कोणत्या मानवी भावना, चुका वरचढ ठरल्या, शत्रूची किती तयारी आहे याविषयी त्याला काय माहिती होती वगैरे आपल्याला पूर्ण माहिती आहे का? २२ जूनला रशियावर हल्ला सुरू केल्यानंतर सप्टेंबरमध्येच स्मॉलेन्स्क जिंकले होते. ते ठिकाण मॉस्कोपासून रस्तामार्गाने ४०० किलोमीटरवर आहे. पण तिथेच जर्मन सैन्य बसून का राहिले आणि मॉस्कोवर हल्ला करायला डिसेंबर का उजाडला हा प्रश्न मलाही पडतो. मॉस्कोला त्यावेळी 'जनरल स्नो' ने वाचवले. पण तेव्हा हिटलरला वाटले की मॉस्कोपेक्षा युक्रेनमधील सुपीक प्रदेश आणि लेनिनग्राड हे मोठे औद्योगिक शहर ताब्यात घेतले तर रशियाचे कंबरडे मोडेल. लेनिनग्राड शहराचे नाव सुध्दा त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते- समजा सेंट पीटर्सबर्ग हेच नाव असते तर कदाचित हिटलरला त्या शहराचे महत्त्व तितके वाटले नसते. इथे त्याचा इगो इश्यू आणि एरर ऑफ जजमेंट येते. तीच गोष्ट स्टालिनग्राडची. त्याला अझरबैजानमधील बाकू जवळच्या तेलखाणी हव्या होत्या त्यासाठी कॉकेशसचा प्रदेश महत्त्वाचा होता. खुद्द स्टालिनग्राडमध्ये अडकून न पडता आजूबाजूचा प्रदेश जिंकून बाकूला पोचता येईल हे हिटरलचे सेनानी पण सांगत होते. पण आपला कट्टर शत्रू स्टालिनच्या नावाने असलेले शहर जिंकायचेच हा इगो इश्यू. जनरल पॉलस आधीच माघार घेण्यासाठी परवानगी मागत होता तेव्हा ती न देता- अरे तू शुध्द जर्मन रक्ताचा आणि त्या खालच्या स्लाव्ह वंशीय लोकांना पाठ दाखविणार का हा फुकाचा वंशश्रेष्ठत्ववाद. 

 

प्रत्येक वेळेस हरणारा कोणत्या तरी चुका करूनच हरत असतो आणि बहुतेक वेळा त्या चुकांमध्ये असे काही मानवी एलिमेंट्स सापडतील (आणि काही वेळेस पूर्ण नशीबाचा खेळ). त्याचा अर्थ प्रत्येक वेळेस त्या सगळ्या गोष्टी शत्रूच्या सांगण्यावरून शत्रूचा एजंट म्हणून केलेल्या असतात असे म्हणणे पटलेले नाही. कोणालाही, विशेषत: हिटलरसारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला असा शत्रूचा एजंट म्हणायला एकदम जबरदस्त पुरावा हवा. असे असेल- तसे असेल हे सगळे तर्क झाले. अशा तर्कांना कितपत महत्त्व द्यावे?

 

हिटलरला नॉर्मंडीचे डी-डे लॅंडिंग होणार हे पक्के माहित होते हे कुठून कळले? परत त्याच साईटचा संदर्भ देऊ नका. मी वाचले आहे त्याप्रमाणे जिथे असे डी-डे लॅंडिंग होऊ शकेल अशी फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील चार ठिकाणे जर्मन सैन्याने निश्चित केली होती. कात्रजचा घाट दाखवायला  म्हणून नॉर्मंडीमध्ये दोस्तांचे सैन्य उतरणार नाही तर दुसरीकडे उतरेल हे वातावरण व्यवस्थित उभे केले होते. त्यात हेरांमधील डबल एजंट पण होते. तसेच ४-५ जूनला इंग्लिश खाडीत वादळ असताना दोस्त सैन्य खाडी ओलांडू शकणारच नाही या अति आत्मविश्वासातून हिटलरच्या अगदी असामान्य जनरलपैकी एक- रोमेल आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त जर्मनीत गेला होता. आता ही अति आत्मविश्वासातून झालेली चूक की रोमेल पण दोस्तांचा एजंट होता?

 

दुसरे म्हणजे आफ्रिका मुसोलिनी घेईल म्हणून हिटलरने त्याचे मुख्य ध्येय- पूर्वेकडील खालच्या वंशाच्या लोकांचा उच्छेद करून ती जागा शुध्द जर्मन वंशाच्या लोकांसाठी मोकळी करणे याकडे लक्ष केंद्रीत केले. पण मुसोलिनी एक नंबरचा फद्या निघाला. ग्रीसने पण त्याला पळता थोडी भुई केली होती. मग शेवटी ग्रीस आणि आफ्रिका दोन्ही आघाड्या हिटलरलाच बघाव्या लागल्या. पण त्याला त्या आघाड्यांमध्ये विशेष रस नव्हता- त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे आणि ते पण वंशश्रेष्ठवादामुळे. तसेच ब्रिटिश लोकही शुध्द रक्ताचे आहेत हे त्याचे मत असल्याने त्याला खरं तर ब्रिटन आणि फ्रेंचांविरूध्द भांडण नकोच होते. नाहीतर पूर्वेकडे सुएझ कालवा आणि पश्चिमेकडे जिब्राल्टर चोक केले असते तर इंग्लंडपुढील अडचणी खूप वाढल्या असत्या. पण त्याचे खरे लक्ष होते पूर्वेकडे- पोलंड, रशिया वगैरे. हिटलरच्या एकूणच धोरणांमध्ये वंशश्रेष्ठवादाचे स्थान ध्यानात घेतले तर बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा उलगडा होईल.  

 

तिसरे म्हणजे दोस्त राष्ट्रांपैकी अमेरिका आणि इंग्लंडचे सैनिक एकत्र लढले असे अनेकदा झाले. पण अक्षराष्ट्रांपैकी जर्मनी आणि जपान एकत्र लढले असे एकही उदाहरण नाही. कारण त्यांच्यात अंतरही तितकेच होते. त्याहून महत्त्वाचे दोघांचे ध्येय समान नव्हते. जपानला रस होता चीन आणि पॅसिफिकमध्ये विस्तार करण्यात तर हिटलरला हवा होता पूर्व युरोप.  त्यामुळे जपानचे अमेरिकेशी वैर होणे क्रमप्राप्त होते. कारण फिलीपीन्स जिंकल्याशिवाय जपानला अधिक विस्तार करता आला नसता हे पुढील नकाशा बघितल्यावर कळेलच. आणि फिलीपीन्स त्यावेळेस अमेरिकेची वसाहत होती म्हणजे अमेरिकेशी भांडण काढणे आलेच. जपानने अमेरिकेशी भांडण काढण्याऐवजी पूर्व रशियात- व्लाडिवोस्टॉक वगैरे भागात हल्ला केला असता तर रशिया वाचणे कठीण होते. पण जपानला तसे करायचे नव्हते. जपानने अमेरिकेशी भांडण काढल्यावर खरं तर हिटलरला अमेरिकेविरोधात युध्द जाहीर करायची तशी काही गरज नव्हती. मात्र एकदा अमेरिका युध्दात आल्यानंतर कधीनाकधी जर्मनीवरही उलटलीच असती त्यामुळे अमेरिकेविरूध्द हिटलरने युध्द जाहीर करणे किंवा न करणे याने फार फरक पडला असता असे वाटत नाही.

जपान 

 

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हिटलरच्या या सगळ्या चुका आता इतक्या वर्षांनंतर बोलायला सोपे असते. पण त्यावेळेस नक्की परिस्थिती काय होती, कोणते इनपुट्स त्याच्यापुढे होते, वर्णवर्चस्ववाद त्याच्यासाठी किती महत्त्वाचा होता वगैरे गोष्टी बघितल्या की मग त्याने अशा काही अनाकलनीय चुका का केल्या हे काही अंशी समजते. त्या सगळ्या चुका इंग्लंडच्या सांगण्यावरून केल्या होत्या हे खूपच एस्ट्रापोलेशन झाले. 

 

अगदी शिवाजी महाराजांनीही एखाद-दोन चुका केल्या पण हिटलरने थोड्याथोडक्या नाही तर ५५ चुका कशा केल्या हा प्रश्न विचारला आहे. पण शिवाजी महाराजांच्या लढायांची स्केल आणि दुसरे महायुध्द यात कुठेच तुलना करता येणार नाही. जर ते मानवी इतिहासातील सगळ्यात मोठे युध्द असेल, थोडेथोडके नाही तर ६+ वर्षे चालू असेल आणि त्यात ७-८ कोटी लोक मारले गेले असतील तर ते युध्द हरलेल्या बाजूने पण भरपूर चुका केल्या असतील यात नवल काय?

 


पुस्तक पुराव्यानुसार दाखवून देतं की, इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. 

ऑ? समजा १९३९ मध्ये जर्मनी युध्द सुरूच करू शकत नव्हता आणि जर्मनीची सैनिक क्षमता तुटपुंजी होती तर काही दिवसात पोलंडला पूर्ण लोळवू कसा शकला? त्यानंतर अवघ्या ९ महिन्यात फ्रान्ससारख्या बलाढ्य देशाला अवघ्या पंधरा दिवसात चारीमुंड्या चीत कसा करू शकला?

 

३ सप्टेंबर १९३९ नाही तर हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला तेव्हापासूनच शत्रूंनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे शत्रू आणि युद्धाचे खरे सूत्रधार कोण हे पुस्तकातच वाचायला हवं. 

त्याच सूत्रधारांनी त्यापूर्वीची काही वर्षे हिटलरचे लांगूलचालन केले होते त्याविषयी पुस्तकात काय म्हटले आहे? १९३६ मध्ये हिटलरने ऱ्हाईनलॅंड घेतले तेव्हा त्याने काहीही चुकीचे केलेले नाही- व्हर्सायच्या तहात गेलेला जर्मनीचाच प्रदेश त्याने परत मिळवला असे हिटलरविरोधात अगदी सुरवातीला युध्द पुकारणाऱ्या त्या तथाकथित शत्रूंचे मत होते. खरं तर ऱ्हाईनलॅंड घेताना हिटलर घाबरला होता. जर फ्रेंच सैन्याने हल्ला केला तर सरळ माघार घ्या असे त्याने आपल्या सैनिकांना सांगून ठेवले होते. तरीही हिटलरला त्या तथाकथित शत्रूंनी बिनबोभाट ऱ्हाईनलॅंड घेऊ दिले. पुढे मार्च १९३८ मध्ये ऑस्ट्रीया रक्ताचा थेंबही न सांडता त्याने ताब्यात घेतले. तेव्हाही त्या तथाकथित शत्रूंनी काहीही केले नाही. सप्टेंबर १९३८ मध्ये हिटरलने झेकोस्लाव्हाकियातील सुडेटनलॅंडवर आपला दावा सांगितला. तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन तीन वेळा हिटलरला भेटायला त्याच्या बर्खटेसगाडन या खाजगी रो हाऊसवर गेले होते. मग प्रदेश झेकोस्लाव्हाकियाचा पण त्या देशाला न विचारताच तो प्रदेश इंग्लंड आणि फ्रान्सने हिटलरला देऊन टाकायच्या (म्हणजे नांगी टाकणाऱ्या) म्युनिक करारावर त्याच चेंबरलेननी सही केली होती. तो करार करून लंडनला परत गेल्यावर आपण कसे युध्द टाळले ही फुशारकी त्यांनी विमानतळावरच मारली होती तो व्हिडिओ आजही युट्यूबवर बघता येईल. त्यानंतर मार्च १९३९ मध्ये हिटलरने उरलेला झेकोस्लाव्हाकियाही गिळंकृत करून टाकला. तेव्हाही त्या तथाकथित शत्रूंनी काहीही कारवाई केली नाही. नंतर ऑगस्ट १९३९ मध्ये पोलंडमधील डॅंझिंग बंदरावर हिटलरने दावा केल्यावर शेवटी त्या तथाकथित शत्रूंचे डोळे उघडले आणि मग हिटलरने पोलंडवर हल्ला केल्यानंतर इंग्लंड-फ्रान्सने त्याच्याविरोधात युध्द पुकारले. 

 

हे सगळे हिटलरच्या लांगूलचालनाच्या प्रकारांविषयी त्या पुस्तकात काय म्हटले आहे? की ते पण हिटलरला युध्दात लोटायचे प्रयत्न होते- मास्टरस्ट्रोक?

 

आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याविषयी लेखात काही नमूद केलेले दिसले नाही. पुस्तकात काय म्हटले आहे की काहीच म्हटलेले नाही याची कल्पना नाही. तो मुद्दा म्हणजे हिटलरचा वर्णद्वेष. असा दावा नेहमी केला जातो की व्हर्सायच्या तहामुळे जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्या गेल्या म्हणून हिटलरचे इंग्लंड-फ्रान्सशी भांडण होते. पण प्रत्यक्षात हिटलरला इंग्लंड-फ्रान्सशी युध्द नकोच होते. कारण त्याच्या मते इंग्लंड आणि फ्रान्सचे लोकही जर्मन लोकांप्रमाणे शुध्द वंशाचे आहेत तर पूर्वेकडील लोकांच्या रक्तात भेसळ झाल्याने ते लोक खालच्या वर्णाचे आहेत. जर इंग्लंड-फ्रान्सने हिटलरविरोधात युध्द पुकारले नसते तर तो स्वत:हून त्यांच्यावर हल्ला करायला गेलाच नसता. बेल्जिअमचा राजा लिओपोल्डने अचानक शरणागती पत्करल्यानंतर अडकलेल्या तीनेक लाख ब्रिटिश सैनिकांना पाहिजे असते तर हिटलर तिथेच संपवू शकला असता. पण त्याने तसे केले नाही आणि त्या सैनिकांना सुरक्षितपणे फ्रान्समधील डंकर्कच्या किनाऱ्याला त्याने जाऊ दिले. त्याचे कारण तेच होते- जर चांगुलपणा दाखवून इंग्लंड-फ्रान्सशी संघर्ष टाळता आला तर बघावा. त्याचा तो डाव यशस्वी झाला नाही ही दुसरी गोष्ट पण त्याला मुळात व्हर्सायच्या तहात अपमानास्पद अटी लादणाऱ्यांविरोधात संघर्ष नकोच होता- कारण ते शुध्द रक्ताचे होते. पूर्वेला रशियाशी युध्द सुरू केल्यानंतरही रशियन युध्दबंद्यांना दिलेली वागणूक आणि ब्रिटिश-फ्रेंच युध्दबंद्यांना दिलेली वागणूक यात खूप फरक होता- कारण रशियन लोक हलक्या वंशाचे होते. हिटलरचा पहिला मोठा- अगदी सपाटून पराभव झाला स्टालिनग्राडमध्ये. मुळात रशियात इतक्या आत घुसलेल्या जर्मन सैन्याला रसद आणि दारूगोळा वगैरेंचा प्रश्न येणे सुरू झालेच होते. त्यात दक्षिण रशियातील कॉकेशसजवळच्या भागातील तो हिवाळा- अशा हिवाळ्याची जर्मन सैन्याला सवय नव्हती. त्यामुळे लढणे जड जायला लागले हे लक्षात येताच जर्मन सेनानी पॉलसने हिटलरकडे माघार घ्यायची परवानगी मागितली होती. तेव्हा हिटलरने अजिबात माघार घ्यायची नाही हे सांगितले. ते का- तू शुध्द जर्मन रक्ताचा आणि त्या हलक्या रक्ताच्या स्लाव्ह वंशाच्या लोकांना पाठ दाखवून तू माघार घेणार? हिटलरने तेव्हाच माघार घ्यायला परवानगी दिली नाही आणि मग रशियन सैन्याने जर्मन-रोमानियन सैन्याची पिछाडीवरील बाजू कापून काढली आणि सगळ्या बाजूंनी जर्मन सैन्याला कोंडीत पकडले. तसे झाल्यावर पराभव अटळ होता. भले अधिक चांगली तयारी करून नंतर परत हल्ला करायच्या उद्देशाने का होईना वेळीच माघार घेतली असती तर मग नंतर स्टालिनग्राडचा मोठा पराभव टाळता आला असता. पण वर्णवर्चस्वाच्या फुकाच्या कल्पनांमुळे हिटलरने आपला मोठा पराभव तिथे ओढावून घेतला.

 

बाकी इंग्लंड-फ्रान्स आणि इतर पश्चिम युरोपिअन अजिबात धुतल्या तांदळासारखे- अजिबात शांततावादी नव्हते यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. वर उल्लेख केलेल्या बेल्जिअमच्या राजा लिओपोल्डने आफ्रिकेत लाखांच्या कत्तली केल्या होत्या. स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिकेत तर माया आणि इंका संस्कृतींचे नामोनिशाण पुसून टाकले होते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मूलनिवासी लोक अजूनही थोड्या प्रमाणावर का होईना सापडतात पण अर्जेंटिना, चिली वगैरे देशांमध्ये अशा मूलनिवासींचे नामोनिशाण पुसले गेले. शांतीप्रियांनी व्यापलेल्या भागात त्यांनी जो प्रकार केला तोच स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिकेत केला होता. तरीही हिटलरविरोधात आधीच युध्द पुकारले होते, १९३९ मध्ये हिटलरची काहीही तयारी नव्हती वगैरे दावे अचाट वाटले.

 

 

 


हे ताजमहाल नव्हे तेजोमहालय ह्या पुस्तकाच्या धाटणीतले पुस्तक वाटते. इतक्या जास्त subaltren घाणी मधे एक इतिहासाचा अकॅडमिक विद्यार्थी म्हणून हात घालायची ईच्छा होत नाही. त्यामुळे पास.  

 

(हिरोडोटस) खोंडे


वाचनाबद्दल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सर्व प्रतिसाद वाचले. ह्या विषयात खूप वेगवेगळ्या बाजू आहेत. मी लेखात केवळ पुस्तकाबद्दल एक प्रतिक्रिया दिली होती. काही मुद्दे पटले, काही पटले नव्हते इतकंच. धन्यवाद.