Skip to main content

गुडियाको गुंडे उठा ले गए!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 08/09/2026 06:24 या दिवशी प्रकाशित केले.

काल एक व्हिडियो पाहण्यात आला तर तेथे आश्चर्य चकित करणारी माहिती मिळाली.

उत्तर प्रदेश आता देशातील एक प्रमुख डिफेन्स आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग हब (संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र गा पै तुमच्या पासून प्रेरणा घेऊन हे लिहिले!) बनत आहे असे ऐकले.

योगी सरकारने केवळ कारखाने सुरू न करता, एकमेकांशी जोडलेली एक मोठी एकोसिसिटिम (औद्योगिक व्यवस्था? औद्योगिक प्रणाली?) तयार केली आहे. शासनाने 'उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर' अंतर्गत राज्यातील ६ शहरांची निवड केली.  आणि तेथे कामही चालू झाले. लखनऊ येथे अत्याधुनिक एरोस्पेस आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम होत आहे. पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर दणका देणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र लखनऊमध्ये बनवण्याचा ₹३०० कोटींचा मोठा प्रकल्प सुरू आहे.

कानपूर हे शहर जड शस्त्रास्त्रांचे केंद्र बनत आहे. येथे अदानी डिफेन्सने दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र प्रकल्प उभारला आहे. तोफांचे गोळे आणि काडतुसे बनवली जात आहेत. अलीगढ मध्ये पण बहुतेक ड्रोन की सॅटेलाइट सिस्टीमवर काम केले जात आहे. युपी मध्ये इतके ऐडव्हान्स काम? झाशीला लष्करासाठी लागणारी आरमड वाहने (गा पै भाषेत चिलखती वाहने?) आणि युद्ध साहित्य बनवले जात आहे. आग्रा आणि चित्रकुट येथे पण असेच काही आहे. या ६ डिफेन्स नोड्सना यमुना एक्स्प्रेसवे आणि गंगा एक्स्प्रेसवे ने जोडले आहे. जेवर विमानतळावर एक मोठे कार्गो हब आहे, त्यामुळे इथून ४८ तासांत हे साहित्य जगात कुठेही पाठवता येणार आहे.

इतके काम झाले आहे असे वाटत तर नाही. माझ्या मनातली इमेज अशीच आहे की युपी म्हणजे एक बिमारू राज्य आणि तेथोन मुंबईत आणि इतर सर्वत्र काम शोधायला येणारे लोकांचे लोंढे... युपी म्हणजे गुन्हेगारी खूप जास्त. गुन्हेगारांना आणि माफियांना राजकीय राजाश्रय. व्यापाऱ्यांकडून खंडणी. मुली तर पाच च्या आत घरात आणि शाळा वगैरे शक्यतो नाही आणी कॉलेज तर नाहीच. युपी म्हणजे तर

"गुडियाको गुंडे उठा ले गए!"  "घर में शौचालय बनवाएं और अपनी इज्ज़त व सेहत की रक्षा करें।" अशा सरकारी जाहिराती होत्या ना?

प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार, सरकारी नोकरीची भरती म्हणजे पात्रतेपेक्षा वशिल्याला जास्त महत्त्व, सरकारी नोकऱ्यांची उघडपणे विक्री, परीक्षा होण्यापूर्वीच पेपर लीक आणि कॉपी हा तिथला हक्क असाच राजकारण्याचा ऐकलेला धोशा.  अनेक लहान-मोठ्या दंगली, मुझफ्फरनगरची दंगल  आणि रामगढ मध्ये तर आमदाराच्या गाई म्हशी वळायला पोलिसपार्टी!

मग उत्तर प्रदेश मध्ये इतका मोठा ट्विस्ट कसा आला?

युपी राज्याला मागास मानले जाते ना? 

ते राज्य आता थेट १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे? उत्तर प्रदेशचे १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था? जगातील अनेक मोठ्या देशांपेक्षाही मोठा होणार आहे योगींचा युपी? तिसरे सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य? 

अविश्वसनिय वाटते हे सर्व!

असे असेल तर आदित्यनाथ योगींच्या नेतृत्त्वात उत्तर प्रदेशचा हा बदलणारा चेहरा खरोखरच थक्क करणारा आहे.


वाचने 1244
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

सत्तर, ऐंशी,नव्वद च्या दशकातला उत्तर प्रदेश आणी आताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. कारण,

 

मामाजी,बहेनजी जाऊन योगीजी आले आहेत.

 

हा बदल प्रत्यक्ष अनुभवला आहे.


In reply to by कर्नलतपस्वी

हा बदल प्रत्यक्ष अनुभवला आहे.

काय बदल झाला आहे? असे काय घडले की इतके मोठे डिफेन्स हब तयार होऊ लागले? लोक तर तेच आहेत. राजकारणी पण तेच आहेत. नोकरशाहीपण तीच आहे..

काय अनुभवले आहे हे वाचायला आवडेल.


लहानतोंडी मोठा घास पण 

आग्रा आणि चित्रकुट येथे पण असेच काही आहे. 

हे वाचून आज निनाद दादांचा अभ्यास कसा कमी पडला बुवा ? असा प्रश्न पडला मला. 

उरता उरला उत्तर प्रदेशचा प्रश्न तर योगींनी लॉ अँड ऑर्डर तगडे दुरुस्त केल्याचे सांगितले जाते आणि अनुभवले सुद्धा आहे मी स्वतः. पण एकंदरीत त्याच्या नंतर सुद्धा बाहुबली कल्चर, जमीन हडपणे इत्यादी धंदे सुखनैव सुरू आहेत असे माझे तरी निरीक्षण आहे. 

आता उरता उरला प्रश्न डिफेन्स प्रॉडक्शनचा तर तिथे खासगी म्हणण्यालायक फक्त अदानी डिफेन्सचा एक प्लांट आहे. बाकी सगळे केंद्र सरकारच्या कृपादृष्टीचा खेळ आहे कारण इतर सगळे प्लांट/ युनिट्स हे पी एस यू अंतर्गत येतात ज्याच्यात मेजरिटी स्टेक होल्डर केंद्र सरकार खुद्द असते. 

जुन्या काळी पण हाच इश्यू होता, कानपूरला एच.ए.एल. उघडणे वगैरे त्याच मांदियाळी मधले नमुने आहेत. उत्तर प्रदेश मध्ये औद्योगिक विकास हा एकतर (केंद्र) सरकारी खर्चाने किंवा कृपेने झाला आहे, ज्यात उत्तर प्रदेश सरकारने जमीन तितकी अधिग्रहित करून दिली आहे. 

दुसरे म्हणजे जो काही खासगी औद्योगिक विकास आहे तो उत्तर प्रदेशच्या नॅशनल कॅपिटल टेरिटरी मध्ये पडणाऱ्या जिल्ह्यात उदाहरण म्हणजे नोएडा (गौतमबुद्ध नगर) , गाझियाबाद बेल्ट मध्ये पहायला मिळतो, अगदी थोडा मेरठ मध्ये बघायला मिळतो, त्याशिवाय साखर कारखानदारी (तिकडे खासगी आहे सहकारी नाही आपल्यासारखी) आहे खासगी उद्योग म्हणून ती सहारनपूर/ मोदीनगर बेल्ट मध्ये, बाकी मग अलिगडची कुलपे, मुरादाबादची भांडी, कन्नौजची अत्तरे, कानपूरचे चामड्याचे प्रोडक्ट इतकेच काय ते उरते. एक मिर्झापुरचे गालिचे सोडून पूर्वांचलात तर बाकी आनंदी आनंद आहे आणि बुंदेलखंड तर अगदीच गाळात आहे. एकंदरीत खासगी उद्योग म्हणजे MSME सीन जास्त आहे. 

आता विषय येतो $ एक ट्रिलियन इकॉनॉमीचा. तर स्केल्स वर विचार करता, भारताची अर्थव्यवस्था एकूण ४ ट्रिलियन (+/-) त्यात महाराष्ट्रासारखे औद्योगिक विकास दृष्टिकोनातून कायम अग्रेसर असणारे राज्यच अजून $ एक ट्रिलियन इकॉनॉमीचे कोडे सोडवते आहे, त्यात उत्तर प्रदेश ने हिंमत दाखवणे स्तुत्य असले तरी प्रॅक्टिकल मधे उतरवण्याला माफक वेळ लागणार आहेच. त्यात आपली $ ४ ट्रिलियन अर्थव्यवस्था largely सर्व्हिस सेक्टर वर अवलंबून आहे, आणि त्या बाबतीत यूपीत आनंदी आनंद आहे. अगदी पुणे बंगळूर हैदराबाद सोडा पण उत्तरप्रदेश मध्ये एक गुरुग्राम सुद्धा विकसित झालेले नाही हे दुर्दैवाने दिसून येतेच. 

डिस्क्लेमर - माझा उत्तर प्रदेश किंवा योगीवर रागच आहे वगैरे भाग नाही पण जे आहे ते आहे.


In reply to by वृषभ खोंडे

आग्रा येथे भारतीय सैन्यासाठी लागणारे विशिष्ट दर्जाचे कपडे आणि सैन्य दर्जाच्या चामडी वस्तूंचे उत्पादन होते आहे आणि हेलिकॉप्टर असेंब्ली प्रस्तावित आहे. यामुळेच मी बुचकळ्यात पडलो. कारण हवाई तंत्र वगैरे सगळे बंगलोरू येथे होत असते असा माझा समज आहे (होता..) 

चित्रकूट  येथे आधुनिक युद्धसामग्रीसाठी लागणारी आधुनिक संरक्षण यंत्रणा येथे विकसित केली जात आहे. सिस्टम इंटिग्रेशन पण येथे होणार आहे. तसे असेल तर हे विभाग तर तंत्र क्षेत्रात अग्रगण्य होण्याच्या शक्यता आहेत.

 

दुसरे म्हणजे जो काही खासगी औद्योगिक विकास आहे तो उत्तर प्रदेशच्या नॅशनल कॅपिटल टेरिटरी मध्ये पडणाऱ्या जिल्ह्यात उदाहरण म्हणजे नोएडा (गौतमबुद्ध नगर) , गाझियाबाद बेल्ट मध्ये पहायला मिळतो, अगदी थोडा मेरठ मध्ये बघायला मिळतो, त्याशिवाय साखर कारखानदारी (तिकडे खासगी आहे सहकारी नाही आपल्यासारखी) आहे खासगी उद्योग म्हणून ती सहारनपूर/ मोदीनगर बेल्ट मध्ये

हे तर महाराष्ट्रात पण आहेच ना? सगळ्या इंडस्ट्रीज काही मुंबई पुणे बेल्ट मध्येच का असा प्रश्न तर कायमच आहे. एक असे केंद्र निर्माण केले जाते, जसेअ केण्द्र सरकारने केले आहे. मग इतर सेटेलाईट सिटीज तयार होतात, एक्स सप्लाय चेन तयार होत जाते आणि सगळीकडे अर्थव्यवस्था वाढत जाते. असेच मॉडेल असते ना? 

एकुण नॉयडा मध्ये येणारे उद्योगांची यादी पाहिली तर सॅमसंग ओप्पो डिक्सन टेक्नॉलॉजीज, एलजी शिवाय Amazon, TCS, HCLTech, Wipro, Cognizant Capgemini वगैरे आहेतच.  शिवाय ३,७०० कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प येतो आहे. योट्टा डेटा सर्व्हिसेस, अवाडा इलेक्ट्रो सोलर इत्यादी दिसतात.

टाटा मोटर्स लखनऊमधील आपल्या प्लांटचा विस्तार करून विद्युत बसेसच्या उत्पादनावर मोठा भर देत आहे. याचा चांगाला परिणाम असेल कारन वाहन उद्योग रोजगारासाठी फार मोठे बळ पुरवतो.

येणाऱ्या कंपन्यात ट्रॅफलगर स्क्वेअर कॅपिटल दिसते आहे. (हा एक बराच मोठा करार आहे.) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ग्रासिम आणि बायर हे पण येत आहेत.

म्हणजे पाईपलाईन तर दिसते आहे. 

पण इतका बदल कसा घडला या मुळे मात्र मी चकित झालो आहे. आणि मानसिकता बदलल्या शिवाय हे कसे काय घडते आहे हे समजत नाहीये. किंवा माझा काहीच अभ्यास याचा नाही, किंवा या बदलाकडे माझे लक्ष गेले नाही याचे वैषम्य वाटते आहे.


In reply to by वृषभ खोंडे

जवळपास हेच लिहायला इथे आले होते.

सर्व सरकारी प्रकल्प हे स्थानिक बाहुबलींना लांच म्हणून निर्माण केले जातात. आधी जमीन हडपणे मग ती सरकारला अधिग्रहण करायला लावणे तिथे सिमेंट पासून स्टील पर्यंतची चोरी करणे इत्यादी विविध लेव्हल वर इतका भ्रष्टचार होतो कि आम्हाला कल्पना सुद्धा नसेल. नोएडा वगैरे काही भाग सोडल्यास स्पर्धात्मक स्वरूपाचा एक सुद्धा उद्योगधंदा उत्तर प्रदेश मध्ये जात नाही. खरे तर ह्या प्रदेशांतील पराकोटीची गरिबी पाहिल्यास इथे लेबर इंटेसिव्ह प्रकारचे उद्योगधंदे जायला पाहिजे होते.

सरकारी आणि PSU उद्योगांना कार्यक्षमता, नफा ह्यांचे काहीही सोयरसुतक नसल्याने उत्तर प्रदेश मध्ये त्यांना प्रकल्प नेण्यास काहीही रिस्क वाटत नाही. उत्तर प्रदेश मध्ये हल्ली पर्यंत अनेक सरकारी प्रकल्प असे होते जिथे वर्षानुवर्शे काडीचेही काम होत नव्हते म्हणजे शून्य काम. सरकारी नोकर फक्त येऊन हजेरी लावून घरी जाण्याचा पगार घेत होते. विजय सुपर स्कुटर प्रकल्प १४० एकर च्या जागेंत १९९७ पासून बंद होता आणि २०१८ मध्ये त्याला पूर्णपणे बंद करण्यात आले. तो पर्यंत इथे फक्त काम करण्याचे नाटक केले जात होते. CAG च्या जुन्या रिपोर्ट मध्ये UP सरकार ४० असे प्रकल्प चालवत होते जिथे काहीही काम होत नव्हते पण मंडळी पगार घेत होती. केंद्रीय प्रकल्पांचे सुद्धा काही प्रमाणात तेच आहे. AI ला विचाराल तर संपूर्ण उत्तर प्रदेशांत ह्या शून्य काम पण पगार चालू प्रकल्पांची असंख्य उदाहरणे सापडतील. रशियन मदतीने अमेठी मध्ये रायफल फेक्टरी UPA सरकारने निर्माण केली पण हि फॅक्टरी धड चालणारे एकही हत्यार निर्माण करू शकली नाही. शेवटी अर्धी २०१९ मध्ये मोदी सरकारने रशियन कंपन्यांना ह्यांत थेट गुंतवणूक करून फॅक्टरी चालवायला दिली. आता इथून किमान ६००,००० रायफल्स निर्माण होतात.

उत्तर प्रदेश मध्ये डिफेन्स प्रकल्प आणणे हा भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार ह्यांचा एक चांगला निर्णय आहे. उत्तर प्रदेश मध्ये खाजगी धंदे जात नाहीत कारण तिथे कायदा आणि सुव्यवस्था ठीक नाही आणि बाहेरून चांगले सुशिक्षित लोक येत नाहीत म्हणून भाग मागासलेला राहतो आणि कृषिआधारित बाहुबली सिस्टम चालू राहते. डिफेन्स प्रकल्प किंवा महाप्रचंड सरकारी प्रकल्प ह्याला चांगले उत्तर आहेत. हे प्रकल्प एका छोट्या शहरा प्रमाणे असतात. बाहेरून विविध स्किल घेऊन लोक येतात, सरकारी quarters बांधले जातात त्यासाठी त्यांना नवीन रस्ते वगैरे बनवावे लागतात, पाणी, कचरा व्यवस्थापन, वीज वाहिनी ह्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. सरकारी नोकरासाठी एखादे केंद्रीय विद्यालय निर्माण होते.  नवीन पोलीस स्थानके, आधुनिक सेवा सर्व हळू हळू निर्माण होतात आणि भागाचा विकास होतो. शहरीकरण हे देहात मानसिकतेचा उत्तम तोडगा आहे.

गोव्याच्या खाली कारवार शहर आहे. दर वर्षी किमान एकदा ह्या भागांत जावे लागते. नौसेनेच्या सी-बर्ड प्रकल्पाने ह्या शहरांत अनेक बदल घडवून आणले. कारवार आज गोव्यापेक्षा छान वाटते. 


उ प्र / म प्र आणि बिहार मिळून एक स्वतंत्र वेगळा प्रदेश बनवायला हवा.

हे तीघे भारताच्या एकूण प्रगतीतला मोठाच अडसर आहेत


In reply to by विजुभाऊ

माझी प्रतिक्रिया/ भावना इतकी टोकाची नसेल. खासकरून बिहार बद्दल, कारण मुळात जुन्याकाळी फ्रेट रेशनलायझेशन पॉलिसी अंतर्गत बिहार मधून आर्थिक सुबत्ता बाहेर वाटण्यात आली आहे. अर्थात सार्वजनिक स्वच्छता, सिविक सेन्स इत्यादींना हे कारण दिले जाऊ शकत नाही हे मान्य केले तरी एकंदरीत राजकारणी पुढारी मंडळींची हरामखोरी हे एखाद प्रदेशातील लोकांचा द्वेष करण्याचे एकक होऊ शकत नाही. असेच काहीतरी खुळचट तर्क काढून इतर लोक पण मराठीजनांचा द्वेष करतील तो पण justified नसेल.


In reply to by वृषभ खोंडे

जुन्याकाळी फ्रेट रेशनलायझेशन पॉलिसी अंतर्गत बिहार मधून आर्थिक सुबत्ता बाहेर वाटण्यात आली आहे.

अगदी खरे आहे. नेहरूंच्या या फ्रेट इक्वलायझेशन पॉलिसीमुळे बिहारचा हा हक्काचा फायदा नष्ट झाला.  (नेहरूंचा भर हा समाजवादावर आणि सरकारी मालकीच्या मोठ्या उद्योगांवर आणि तरीही बिहारमध्ये समाजवादी नेते निवडून येत राहिले हा केव्हढा विरोधाभास आहे.) बिहारमधून फक्त कच्चा माल बाहेर जात राहिला.  जेव्हा कच्चा माल देशात कुठेही सारख्याच किमतीत मिळणार होता, तेव्हा बिहारमध्ये खाणीजवळ कारखाने न काढता, बंदरे असलेल्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये कारखाने उभारणे पसंत केले गेले. कारण समुद्रामार्गे माल निर्यात करणे सोपे जात असावे. हे धोरण १९९३ मध्ये रद्द करण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोपर्यंत इतर राज्यांनी खूप मोठी आघाडी घेतली होती.


In reply to by विजुभाऊ

मायावतींनी युपीचे तुकडेच करावेत असा काहीतरी प्रस्ताव दिला होता असे आठवते. उ प्र / म प्र आणि बिहार मिळून मोठा प्रदेश बनवला तर अजून अवघड अड्मिनिस्ट्रेशन होईल का? आहे तेच कुठे धड सांभाळले जात आहे?


In reply to by विजुभाऊ

UP बिहार मधील वेठबिगारी कामगारांनी जगांत इतरत्र अत्यंत चांगली शहरे वसवली आहेत. त्याशिवाय हे प्रदेश जुन्या काळी अत्यंत समृद्ध होते. त्यांचे सध्याचे पतन हे निव्वळ भारत सरकार मुळे झाले आहे. त्यांना वेगळे काढल्या इतर भारतापेक्षा जास्त त्यांची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. 


In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ,

 

हे तिघे भारभूत आहेत हा तुमचा मुद्दा पटतो मला. पण विचारमंथनार्थ विचारतो की, समजा काढले तर उर्वरित भारताची प्रगती कशी साध्य होईल? प्रगती म्हणजे नेमकं काय? 

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

सहमत आहे. फक्त पैसा आणि पैसा म्हणजे प्रगती जरी असले तरी तो पैसा ज्या यंत्रणेतून तयार होतो तिथे कामगार म्हणून युपी बिहारीच जास्त आहेत.  


In reply to by विजुभाऊ

विजुभाऊंचा प्रतिसाद निषेधार्ह्य आहे... त्यांच्या प्रतिसादातून नाझीवादाची झलक आणि द्वेष दिसत आहे.


In reply to by राज जोशी

नाझीवाद म्हणजे काय ते समजले नाही

महाराष्ट्रातून देशात सर्वाधीक रोजगार आणि कर मिळतो.

पण त्या कराचा योग्य वाटा राज्याला मिळत नाही.

बिहार आणि उप्र  मधील लोक रोजगारासाठी बाहेर जातात कारण तेथे रोजगार नाहीत.

पण ते त्याबद्दल त्यांच्या नेत्याना दोष देत नाहीत.

ते कामासाठी बाहेर जातात इतकेच नाही तर  महाराष्ट्रातील रेल्वे भरतीसाठी ते तेथून इकडे येतात. आणि इथले हक्काचे रोजगारही चोरतात.

माझ्या राज्यातल्या लोकांच्या हक्काबद्दल मी काही विचारले तर नाझीवादी कसा ठरतो? हेच जर उत्तरभारतीय माणसाने महाराष्ट्रात येवून हिंदीचा आग्रह धरला तर तो योग्य ठरवता. हे कसे काय तर्कशुद्ध आहे?

महाराष्ट्रात बरेच लोक येतात. राजस्थानी , गुजराथी दक्षीणभारतीय  पण त्या पैकी कोणीच उत्तरभारतीय लोकांसारखा माज दाखवत नाहीत.


In reply to by विजुभाऊ

महाराष्ट्रात बरेच लोक येतात. राजस्थानी , गुजराथी दक्षीणभारतीय  पण त्या पैकी कोणीच उत्तरभारतीय लोकांसारखा माज दाखवत नाहीत.

खरी गोष्ट आहे.

 


In reply to by विजुभाऊ

>>>नाझीवाद म्हणजे काय ते समजले नाही

ज्युंमुळे जर्मनीची प्रगती होत नाही, त्यांना दूर करावे असा मतप्रवाह वाढीस लागून सर्व ज्युंनी घेट्टोमधेच रहावे या स्तरापर्यंत आलेला ज्यु द्वेष नंतर ज्युंच्या हत्याकांडापर्यंत जाऊन पोहोचला.  नाझीवाद ज्युंचा घाऊक द्वेष करत होता. 

 

आता, या पार्श्वभुमीवर तुम्ही दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा "नीट" वाचून पहा. आग्रह नाही.

 

उ प्र / म प्र आणि बिहार मिळून एक स्वतंत्र वेगळा प्रदेश बनवायला हवा.

हे तीघे भारताच्या एकूण प्रगतीतला मोठाच अडसर आहेत


In reply to by राज जोशी

तुमचा निष्कर्ष तुम्ही हवा तसा काढू शकता. विपर्यास करायचा झालाच तर कशाचाही करता येतो. भूक लागली असे सांगितले की भुकेकंगाल, भूकबळी अशी  म्हणून संभावना करू शकता.

पण माझ्या राज्याच्या हिताला बाधक जे काही आहे त्याचा विरोध करायचाच नाही का?

मराठी भाषेचा आग्र्ह धरत हिंदीच्या आक्रमणाला विरोध केला की म्हणायचे संकुचीत. पण हिंदी लोकानी हिंदीचा हेक्का चालवला की म्हणायचे की ते योग्य आहेत.

याला शुद्ध भाषेत बोटचेपे धोरण म्हणतात. 

तुम्हाला काय वाटते याने मलाच काय पण इथे कोणालाच काहीही फरक पडत नाही.

 


In reply to by विजुभाऊ

>>>तुम्हाला काय वाटते याने मलाच काय पण इथे कोणालाच काहीही फरक पडत नाही.

 

अगदी बरोबर. त्यानुसार तुम्हाला काय वाटते याने याने मलाच काय पण इथे कोणालाच काहीही फरक पडत नाही.

आणि हे सर्वच बाबतीत लागू पडते. तरीही आपण विचारांची देवाण घेवाण म्हणतात. आणि त्यातून आपली वैचारीक घुसळण होत असते. 

असो.

 

जग बदलत आहे. 

Self-deport, Mr Singh: US govt's racist poster sparks outrage

Read More:
https://www.moneycontrol.com/news/trends/self-deport-mr-singh-us-govt-s-racist-poster-sparks-outrage-netizens-call-it-disgusting-14026925.html

 

आणि आपण इथे आपल्याच सारखे डीएनए असलेल्या व्यक्तींबद्दल एकाचा भाषाकुलातील असूनही आकस बाळगत आहोत.  केवळ राज्याचा विचार करायचा की एक भारतीय म्हणून पुढे जायचे याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागला तर आपली भुमिका कशी राहील याचा विचार आजच करावा लागेल. कदाचित उद्या उशीर झालेला असेल. 

 

 


वृषभ खोंडे,

 

जुन्याकाळी फ्रेट रेशनलायझेशन पॉलिसी अंतर्गत बिहार मधून आर्थिक सुबत्ता बाहेर वाटण्यात आली आहे.

टाटांनी जमशेदपुरात पोलादाचे कारखाने उभारले होते. त्यांचा या वस्तुवितरणसमानता धोरणाशी संबंध नाही. पण आज पुण्यात वा पिंचिंत बड्या कारखान्यांच्या सोबत जशी सहायक उद्योगव्यवस्था ( = आन्शिलियरी इंडस्ट्री ) उभी राहिली तशी काही जमशेदपुरात वा धनबादेत दिसते का? ( उत्तर बहुधा नकारार्थी असावं. )

 

यामागील कारण काय? स्थानिकांची मनोवृत्ती हे उघड कारण आहे. इतर काही कारणं आहेत का? आज जमशेदपूर सुबत्तेचं केंद्र म्हणता येईल का? मानसिक औदासिन्याचं निश्चित आहे आणि म्हणूनंच आत्महत्येचं प्रमाणही तिथे देशांत सर्वोच्च आहे. उद्योग असूनही भरभराट का नाही?

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

नुसता उद्योग असून भागत नाही. उद्योगासाठी आवश्यक भांडवलाची कमतरता, जोखीम  घेण्याची मानसिकता, एखादा कमी पडत असेल तर त्याला आधार देण्याची मानसिकता ह्या बाबी मराठी आणि बिहारी दोन्हीकडे समान आहेत. त्यामुळे दोन्ही कडे उद्योजक कमी आणि नोकर जास्त अशी स्थिती आहे. त्यातल्या त्यात मराठी १ टक्का का होईना बिहारी युपी पेक्षा बरा.   गुज्जू मारवाडी इथे सरस ठरतात. आणि "खरा" गुज्जु मारवाडी मराठी युपी बिहारी मनुष्याला कमी न लेखता त्याच्याकडुन कामे करुन घेतो. शेवटी सहकार्य गरजेचे आहेच... दोघांचे हेतू साध्य होणे महत्त्वाचे. 

 


In reply to by राज जोशी

भारत सरकार जर ड्रोन इकोसिस्टीम, सेमीकंडक्टर इकोसिस्टीम, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि मॅनुफॅक्चरिंग (पळत्या भुताची लंगोटी टाईप) इकोसिस्टीमला प्रमोट करू शकत असेल तर राजो म्हणतात तसे बिहार झारखंडच्या/ उत्तर प्रदेशच्या औद्योगीकरणाची पण धुरा खांद्यावर वाहू शकतात की.  


In reply to by राज जोशी

नुसता उद्योग असून भागत नाही. उद्योगासाठी आवश्यक भांडवलाची कमतरता, जोखीम  घेण्याची मानसिकता,

विनोदी वाक्य आहे हो जोशीसाहेब. स्वत:लाच कॉन्ट्रॅडिक्ट करतेय. उद्योग येतात ते भांडवल निर्माण करतात.

प्रत्येक उद्योगासाठी मोठे भांडवल असावेच लागते असे नाही. अमूल , लिज्जत सारखे उद्योग हे अक्षरश:  अत्यल्प भांडवली सुरू केले गेले.

पण बीहारी नेत्यांची अणि जनतेची  जी सरंजामी वृत्ती आहे  त्यामुळे बसल्या जागी मला सगळे मिळायला हवे. जे दुसऱ्याने कष्टाने मिळवले ते मला फुकट मिळणे हा माझा हक्क आहे  असे त्याना वाटत असते.

महाराष्ट्रात उद्योग उभे झाले ते मराठी माणसाच्या कष्ट करण्यातूनच किर्लोस्कर , ओगले , डी एस के , शिर्के अशी अनेक नावे घेता येतात.

इथल्या नेत्यानी  सहकारी चळवळ राबवले त्यातून साखर कारखाने, दूध संघ उभे राहिले. शिक्षण सर्वत्र पोहोचले.

जोशीसाहेब बीहार आणि  महाराष्ट्राची  तूलना करताना एक पहा की स्वातंत्र्यानंतर विकासासाठी  महाराष्ट्राला आणि   वर्षे बीहारला  तीतकीच वर्षे विकासासाठी मिळाली .

यावरूनच मनोवृत्तीतला फरक दिसून येतो.


In reply to by विजुभाऊ

माननीय विजुभाऊ साहेब,

 

दंडवत. 

>>>विनोदी वाक्य आहे हो जोशीसाहेब. स्वत:लाच कॉन्ट्रॅडिक्ट करतेय. उद्योग येतात ते भांडवल निर्माण करतात.

माझेकडून अनेकदा विनोदी लिहिले जात असते. मला विनोद आवडतो. त्यामुळे अनेकदा माझ्या गांभीर्याने लिहिलेल्या / बोललेल्या वाक्यांना सुद्धा विनोदी समजले जात असते. त्याला इलाज नाही. असो. मुद्यावर वळू या. उद्योगाचा मुख्य हेतु  नफा कमावणे असतो. तो नफा पुन्हा उद्योगात गुंतवून भांडवल वृध्दी होते हा भाग झाला. मात्र, उद्योग सुरु करण्यासाठी भांडवल लागते. हे भांडवल केवळ वित्त/पैसा या स्वरुपातच नसून श्रमशक्ती, कच्चा माल, बाजारपेठेची आक्रमक मागणी, विनासायास आणि कमी खर्चात उपलब्ध होणारी जमीन, पाणी, वीज, इत्यादी मुलभूत सोयींची पुर्तता, सरकारी स्तरावर लागणा-या परवानग्यांची सहज मंजुरी अशा सर्व गोष्टी मिळून भांडवल ही संकल्पना पूर्ण होते असे माझे आकलन आहे. चूक असल्यास दर्शवल्यास आनंद वाटेल. 

 

आपण अमूलचे उदाहरण दिलेत. अतिशय योग्य उदाहरण आहे. दूध हे भांडवल नसते तर अमुल आज अमुल असते का? सहकारी संस्था उभारुन दूध हेच भांडवल धरुन चिकाटीने केलेला प्रयत्न. असा प्रयत्न केल्यास त्याला यश येईल अशी कोणतीही भविष्यवाणी नसतांना घेतलेली जोखीम हा चमत्कार करु शकली हे आपण मान्य कराल. आग्रह नाही. 

 

>>>बीहारी नेत्यांची अणि जनतेची  जी सरंजामी वृत्ती आहे  त्यामुळे बसल्या जागी मला सगळे मिळायला हवे. जे दुसऱ्याने कष्टाने मिळवले ते मला फुकट मिळणे हा माझा हक्क आहे  असे त्याना वाटत असते.

 

आपण जे नेत्यांबद्दल बोलत आहात ते कदाचित खरे असावे. पण, महाराष्ट्रात जी बिहारी जनता आली आहे ती कष्टाळू आहे. त्यांचे बिहारातील नातेवाईक सुद्धा कष्टाळू आहेत असे माझे त्यांच्याशी होत असलेल्या नियमित वार्तालापातून जाणवत आहे. अन्यथा, जर ते कष्टाळू नसते तर त्यांना कुठेच रोजगार मिळाला नसता. उलटपक्षी, युपी बिहारी आमचा रोजगार बळकावत आहेत अशा पद्धतीची ओरड इतर प्रदेशातील लोकांनी केली नसती. त्यामुळे सर्वसाधारण जनतेवर थेट आरोप मी तरी लावू शकत नाही. तुम्हाला लावावयचा असल्यास माझी हरकत नाही. 

 

>>> महाराष्ट्रात उद्योग उभे झाले ते मराठी माणसाच्या कष्ट करण्यातूनच किर्लोस्कर , ओगले , डी एस के , शिर्के अशी अनेक नावे घेता येतात.

ही फार थोडी नावे आहेत. मराठी माणूस कष्ट करत नाही असा माझा दावा नाही. मराठी माणूस अभावाने उद्योगाकडे वळतो,  त्याचे मुख्य ध्येय नोकरी मिळवणे एवढेच असते. त्यापलीकडे नाही आणि त्याच्या अलिकडे नाही. विचार करा. पटेल तुम्हाला. 
 

>>>इथल्या नेत्यानी  सहकारी चळवळ राबवले त्यातून साखर कारखाने, दूध संघ उभे राहिले. शिक्षण सर्वत्र पोहोचले.

आज या तीनही क्षेत्राबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. 

 

>>>जोशीसाहेब बीहार आणि  महाराष्ट्राची  तूलना करताना एक पहा की स्वातंत्र्यानंतर विकासासाठी  महाराष्ट्राला आणि   वर्षे बीहारला  तीतकीच वर्षे विकासासाठी मिळाली .

 

साहेब म्हणू नका. माझी ती लायकी नाही. मी एक सामान्य मनुष्य आहे. नुसते जोशी किंवा जोशा असे म्हटले तरी मला फारसा फरक पडणार नाही.

मुद्याकडे वळू, महाराष्ट्रात बाजुच्या गुज्जू, मारवाडी लोकांनी उद्योग उभारले. (काही परत गुजराथला पळवले असे उबाठावाले म्हणतात. तो मुद्दा बाजुला) त्यात मराठी, दाक्षिणात्य, युपी, बिहारी सर्वच लोकांनी कष्ट करुन महाराष्ट्राला अग्रेसर बनवले.  बिहारकडे दुषित नजरेने सतत पाहिले गेले. त्यामुळे तिथे उद्योग वाढले नाहीत आणि त्यांना दुसरीकडे जावे लागले. 

 

असो. चर्चा करुन आनंद वाटला. धन्यवाद. 

 

 


In reply to by राज जोशी

यात काही त्रुटी राहून गेल्या आहेत.

बिहार किंवा उत्तर प्रदेशातील "स्थानिक जनता" मराठी बांधवांइतकीच आळशी आहे.

ज्यांना काही करायचे आहे ते तो प्रदेश सोडून बाहेर पडले त्यामुळे आपल्याला येथे दिसणारे भैये किंवा बिहारी कष्टाळू दिसतात.

प्रत्यक्ष तेथे गेलात तर असे दिसते कि स्थानिक जनता सकाळी दाढे खाली तंबाखू  लावून थंड बसलेली असते.

शेतात बी पेरलं कि झालं दर वर्षी नित्यनियमाने येणाऱ्या पुरामुळे हिमालयातील खनिजयुक्त माती त्यांच्या शेतात आपोआप पसरते त्यामुळे गंगेच्या खोर्यातील हा प्रदेश अत्यंत सुपीक आहे.  (अर्थात याचमुळे त्याप्रदेशात सर्वात जास्त लोकवस्ती झालेली आहे).

परंतु महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी गव्हाचे एकरी ३० -३२ क्विंटल पीक घेतो तर तेथे काहीही कष्ट ना करता २० क्विंटल पीक घेऊन लोक थंड बसून राहतात.

हे आकडे जुने आहेत पण मुद्दा समजून घेण्यासाठी ठीक आहेत.          

उद्यमशील मारवाडी गुजराती आपली गावे सोडून महाराष्ट्रात का आले? तर तेथे शिक्षणची काहीही सोय नव्हती किंवा नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती पोटाला काहीही मिळणे शक्य नव्हते. येथे येऊन त्यांनी अखंड कष्ट करून उद्योगधंदे उभे केले. ब्रिटीश काळापासून मुंबईसारखे उत्तम बंदर असल्याने उद्योगउभारणीसाठी आणि व्यापारासाठी अनुकूल वातावरण होते. यामुळे पोटासाठी आलेल्या उद्यमशील पण अशिक्षित गुजराती मारवाड्यानि उद्योग उभारले आणि शिक्षित मराठी माणसाने सुरक्षित असा नोकऱ्यांचा पर्यंत निवडला.  नेसत्या वस्त्रानिशी सिंध सोडून आलेले सिंधी बांधव आज येथे अनेक उद्योगांचे मालक कसे झाले हे आपण पाहणे रोचक ठरेल. उद्योग धंदे उभारून वर मुंबईत असलेली हिंदुजा जसलोक रहेजा सारखी मोठी रुग्णालये त्यांनी बांधली.

आणि आपले राजकारणी जय भवानी टाक खंडणी हे धोरण अजून चालवत आहेत. 
त्याची आपल्याला ना लाज ना शरम आणि ना खंत ना खेद      

त्यांच्या मानाने महाराष्ट्रात  निसर्गाची कृपा होती शिवाय इथे शिक्षणाची उत्तम सोय होती आणि मराठी माणूस अल्पसंतुष्ट राहिला.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसली कि माणूस तितका धडपड करू इच्छित नाही.  शिक्षण आणि संस्कृती मुळे येथे समाजसुधारणा मोठ्या प्रमाणावर झाली त्यामुळे स्त्रियांनासुद्धा बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळू शकले हि गोष्ट गुजराती मारवाडी समाजात श्रीमंती येऊनही अजूनही अभावानेच दिसते.

बिहारी माणसे त्यांच्या मानाने अल्पसंतुष्ट असल्याने उद्योगापेक्षा कमी पगाराच्या नोकऱ्याच स्वीकारत राहिले.

उत्तर प्रदेश  बिहार मध्ये उद्योग धंदे नसल्याने सरकारी नोकरी सोडून दुसरा पर्यायच नाही. यामुळे तेथील हुशार मुले चार पाच वर्षे सुद्धा खर्ची घालून आय ए एस साठी प्रयत्न करत राहतात. याउलट आपल्याकडे एक दोनवर्षे गेली कि आपली मुले गप नोकरी पकडतात. कारण हुशार माणसाला येथे बऱ्यापैकी नोकरी मिळते         .

 

महाराष्ट्रात 


In reply to by राज जोशी

बिहारकडे दुषित नजरेने सतत पाहिले गेले. त्यामुळे तिथे उद्योग वाढले नाहीत आणि त्यांना दुसरीकडे जावे लागले. 

हे आण्खी एक अतीविनोदी वाक्य.

म्मला तर आत्तापर्यंत वाटत होते की भारतीय राजकारणात बिहार फैक्टर महत्त्वाचा असायचा. होऊन गेलेल्या रेल्वे मंत्र्याम्पैकी ६०% बिहारीच होते की.  रेल्वे , खाण इत्यादी महत्त्वाची मंत्रालये बिहारला मिळायची.

बिहारकडे दुषीत नजरेने कोण आणि कशासाठी पाहील ते सांगा.

महाराष्ट्राात उद्योगास पूरक वातावरण मिळाले म्हणून इथे उद्योग वाढले.  ते आपोआप निर्माण होत नसते. ते तयार करावे लागते.जोपासावे लागते.

आणि ते करणारे हे कोणी बाहेरचे लोक नसतात स्थानीकच असावे लागतात.

 


In reply to by गामा पैलवान

> टाटांनी जमशेदपुरात पोलादाचे कारखाने उभारले होते. त्यांचा या वस्तुवितरणसमानता धोरणाशी संबंध नाही. पण आज पुण्यात वा पिंचिंत बड्या कारखान्यांच्या सोबत जशी सहायक उद्योगव्यवस्था ( = आन्शिलियरी इंडस्ट्री ) उभी राहिली तशी काही जमशेदपुरात वा धनबादेत दिसते का? ( उत्तर बहुधा नकारार्थी असावं. )

काही चुकीच्या समजुती आहेत.

अर्थशास्त्राच्या नियमानुसार जर वजन न गमावणारा कच्चा माल तुम्हाला वस्तुवितरणसमानता धोरणाने उपलब्ध केला तर त्या मालाला वापरणारे कारखाने बाजारपेठेच्या जवळ निर्माण करणे जास्त फायदेशीर ठरते. म्हणून गोदरेज आणि बोयस हि विक्रोळी मध्ये चालू शकली. हिरो कंपनी पंजाब मध्ये चालू शकली. मोठी ग्राहक बाजारपेठ, बंदर (निर्यातीसाठी), अनुभवी कामगार वर्ग आणि बंदरामुळे स्वस्त आयात सुटे भाग उपलब्ध आहेत (उदा. मुंबई-पुणे, चेन्नई किंवा गुजरात), तिथेच उत्पादन करणे नफ्याचे ठरले.


जमशेदपुरात सहायक उद्योग (Ancillary) उभे राहिले नाहीत" हा दावा वस्तुस्थितीला धरून नाही

आदित्यपूर औद्योगिक क्षेत्र (Adityapur Industrial Area): जमशेदपूरला लागूनच (खरकई नदीपलीकडे) असलेले आदित्यपूर हे आशियातील सर्वात मोठ्या ऑटो-अँसिलिअरी क्लस्टर्सपैकी एक आहे.

 

जर हे धोरण आले नसते, तर:

जमशेदपूर केवळ 'टाटां'पुरते मर्यादित न राहता भारताचे सर्वात मोठे स्वतंत्र अवजड यंत्रसामग्री व ग्राहक उत्पादनांचे (Consumer Durables) केंद्र बनले असते.

पूर्व भारताचा नैसर्गिक भौगोलिक फायदा (Locational Advantage) हिरावून घेऊन उर्वरित भारताचे औद्योगिकीकरण अनुदानाच्या जोरावर झाले, ज्यामुळे स्थानिक स्तरावर प्रचंड भांडवली गुंतवणुकीची संधी हुकली.

आदित्यपुर मध्ये हे उद्योग का आले त्याचे आणखीन वेगळे कारण आहे ते म्हणजे आयात प्रतिस्थापन धोरण. पण त्यावर आणखीन कधी...

 


In reply to by साहना

आयात प्रतिस्थापन धोरणामुळे टाटा स्टील किंवा इतर मोठ्या कंपन्यांना लागणारे सुटे भाग परदेशातून आणणे महाग झाले. त्यामुळे हे सुटे भाग भारतातच बनवणे गरजेचे होते. 

आदित्यपूर हे जमशेदपूरला लागूनच असल्यामुळे, तेथे कच्चा माल (लोखंड व पोलाद) सहज उपलब्ध होता. या कच्च्या मालाचा वापर करून लहान कंपन्यांनी टाटाच्या गाड्यांसाठी आणि यंत्रांसाठी सुटे भाग बनवायला सुरुवात केली. एक मोठा कारखाना आला आणि लहान कारखाने त्याला जोडले गेले.

पण जर नेहरूंनी ही समाजवादी पॉलिसी लागू केली नसती, तर पूर्व भारतात कच्चा माल स्वस्त मिळाल्यामुळे तिथे आणखी जास्त मोठे कारखाने उभे राहिले असते. निसर्गाने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना लोखंड आणि कोळसा खनिज संपत्तीची  देणगी दिली आहे. अर्थशास्त्राच्या नियमानुसार, उद्योगांना कच्च्या मालाच्या जवळ स्थापन होण्याचा नैसर्गिक फायदा मिळायला हवा होता. कच्चा माल असूनही तिथे मोठे कारखाने आले नाहीत, ज्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी लुटल्या गेल्या आहेत.

मुंबई-पुणे, चेन्नई किंवा गुजरात या भागांना या धोरणाचा प्रचंड फायदा झाला. त्यांना पूर्व भारतातील स्वस्त लोखंड आणि कोळसा वाहतूक खर्चाचा कोणताही अतिरिक्त भार न सोसता मिळाला. यामुळे या राज्यांमध्ये ऑटोमोबाईल, अवजड यंत्रसामग्री आणि इतर मोठे उद्योग वेगाने वाढले. पूर्व भारताचा नैसर्गिक भौगोलिक फायदा हिरावून घेतला. यामुळेच पूर्व भारताचा आर्थिक विकास मागे राहिला आहे.
 
 

In reply to by निनाद

पूर्व भारताचा आर्थिक विकास मागे राहिला

याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्व भारतात मुंबई सारखे बारमाही उत्तम आणि सुरक्षित बंदर नाही. त्यासाठी तेंव्हा सरकारने काहीही केले नाही. स्वातंत्र्यानंतर १९ वर्षांनी परादीप बंदर सुरू झाले. चेन्नई बंदर १८८० पासून होते पण तेथे त्या मानाने उलाढाल फार कमी होती  
शिवाय बंगाल मध्ये कम्युनिस्टां चा प्रभाव होता त्यामुळे कोणताही उद्योग तेथे जाऊ इच्छित नव्हता.

याशिवाय ओडिशा झारखंड छत्तीसगड हे प्रदेश खनिजांची  भरपूर संपत्ती असली तरी वाहतुकीची साधने प्रशिक्षित मनुष्यबळ यात फार मागासलेले होते आणि तो भाग मोठ्या प्रमाणावर जंगलांनी व्यापलेला असल्याने एकंदर सोयी सुविधात फार मागे होता.

अवजड उद्योगांसाठी रेल्वे रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात सरकार अपयशी ठरले.  

शिवाय रेल्वेने वाहतूक करायची तर  नोकरशाही इतकी मंद आणि आळशी होती कि खाजगी उद्योग जायचे म्हटले तरी जाऊ शकणार नाहीत शिवाय लायसन्स राज इतकं त्रासदायक होतं कि उद्यमशील माणसाने तेथे जाणे म्हणजे आत्महत्याच होती.         


महाराष्ट्र आजही औद्योगिक उत्पादनात आघाडीवर आहे पण हे पुढचे दहा पंधरा वर्षे जास्तीत जास्त टिकेल. MIDC मध्ये स्थानिक नेते आणि त्यांच्या पाळीव गुंडांचा वाढता त्रास महाराष्ट्राला वेगाने पश्चिम बंगाल च्या दिशेने घेऊन चालला आहे. इथं गुजरात मध्ये पावलापावलावर दिसणारी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, येणाऱ्या इंडस्ट्रीला लागणारी सर्वीस आणि सप्लाय इको सिस्टीम उभी करत स्वतः डेवलप‌ होण्याची गुजराती माणसांची तळमळ आणि प्रयत्न हे सगळं पाहत असताना आपला महाराष्ट्र कसा गोत्यात चालला आहे, हे वास्तव जास्त ठळकपणे दिसतं मला‌.

आपले राज्य कर्ते फालतु चे प्रश्न उगाच ताणून धरतात जेणेकरून लोकांचं लक्ष  खऱ्याखुऱ्या प्रश्नावरून फालतुगिरीकडे विचलित होत राहिले पाहिजे आणि पंधरा पंधरा दिवस तिच फालतु गिरी चारही बाजूंनी लोकांना दाखवत रहायची. लोकं जरा मुळ प्रश्नाकडे वळत आहेत दिसलं कि नवी फालतु गिरी. मागील काही वर्षांपासून हिच कामाची पद्धत झाली आहे. 

 


In reply to by भीमराव

जरांगें कोणालाही कधीही झुंडशाही करत आडवणूक करतात.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून सरकार नमते घेते.

जरांगे आणि त्यांच्या समर्थकाना एक प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या समाजाने ७५ वर्षे राज्य केले त्या समाजावर ही वेळ का  यावी?


Haftas, commissions and contracts: Extortionists call the shots, industrialists live in fear.

The issue assumes significance after the Talegaon-Chakan belt, which is one of Pune’s largest industrial hubs, was recently in the news over persistent infrastructure problems, including traffic congestion, poor roads and power disruptions.

https://indianexpress.com/article/cities/pune/pune-industrial-belt-extortion-hafta-takka-chakan-bhosari-midc-10856021/

Aug 31, 2026 08:11 PM IST

 

महाराष्ट्र सद्य स्थिती -- जय भवानी टाक खंडणी 


साहना,

 

पूर्व भारताचा नैसर्गिक भौगोलिक फायदा (Locational Advantage) हिरावून घेऊन उर्वरित भारताचे औद्योगिकीकरण अनुदानाच्या जोरावर झाले, ज्यामुळे स्थानिक स्तरावर प्रचंड भांडवली गुंतवणुकीची संधी हुकली.

 

यासबंधी तीन प्रश्न आहेत. कृपया प्रकाश टाकावा ही विनंती.

 

समजा पुण्याचा भौगोलिक स्थानलाभ हिरावून घ्यायचा असेल तर काय धोरण ठरवावं लागेल? मुद्दा नीट समजावून घेण्यासाठी हा प्रश्न करतो आहे.

 

याच मालिकेतला दुसरा प्रश्न असा की बिहारला भौगोलिक स्थानलाभ परत मिळवून द्यायचा झाला तर काय धोरण हवं? तरीपण बिहारी मुंबईतच गर्दी करतील का, हा तिसरा प्रश्न.

 

आ.न.,

-गा.पै.

 

 

 


In reply to by गामा पैलवान

>समजा पुण्याचा भौगोलिक स्थानलाभ हिरावून घ्यायचा असेल तर काय धोरण ठरवावं लागेल? मुद्दा नीट समजावून घेण्यासाठी हा प्रश्न करतो आहे. 

 

भौगोलिक स्थानलाभ म्हणजे नक्की काय तर त्या भागांत अशी एक गोष्ट आहे जी इतर ठिकाणी नाही. त्यामुळे ह्या भागाला स्पर्धात्मक अनुकूलता मिळते. हि काढून घ्यायची असेल तर ती गोष्ट इतर ठिकाणी subsidize करावी जेणेकरून त्या भागाचा स्थानलाभ कमी होईल.

पुण्याच्या संदर्भांत खालील स्थानलाभ आहेत.
- मोठ्या उद्योगासाठी पाण्याची मुबलकता. 
- मोठ्याप्रमाणावर उच्च मानवी भांडवल असलेले मनुष्यबळ. 
- मुंबईच्या बंदराला थेट एका दिवसांत गाठण्यासाठी एक्सप्रेसवे 
- मुंबईच्या तुलनेत कमी जमीनदर आणि व्याप्ती वाढविण्यासाठी आणखीन उपलब्ध असलेली जमीन. 
- ऐतिहासिक कारणामुळे अस्तित्वांत असलेली युद्धविषयक सामुग्री निर्माण करणारी उद्योगव्यवस्था. 
- योग्य हवामान.


- माझ्यामते पुण्याला गंडवायचे असेल तर पुणे मुंबई इंडस्ट्रियल ट्राफिक वर भयंकर कर लावावा पण इतर मार्गांवर उदाहरणार्थ समृद्धी महामार्गावर लावू नये. अर्थानं "कर" नको असेल तर इतर महामार्गांवर सबसिडी द्यावी. 
- औद्योगिक क्षेत्राला दिला जाणारा पाण्याचा हक्क काढून टाकून तो कृषी ला द्यावा. पाणी राहिले तर ते उद्योगांना मिळेल अशी तजवीज करावी. 
- पुण्याच्या आजूबाजूला शेतजमीन अधिग्रहणावर संपूर्ण बंदी आणावी. 
- पुण्यात ऑर्डीनन्स फॅक्टरी किंवा DRDO चे मटेरियल सायन्स चे जे प्रकल्प आणि विभाग आहेत ते इतरत्र हलवावेत. 
- पुण्यांत सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्थांवर फक्त मराठी किंवा पुणे भागातीलच मुलांना ऍडमिशन देण्याची सक्ती करावी.

मुंबई इतके चांगले शहर असताना पुण्याची वाढ का झाली हा एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर बर्वे कमिटी हे आहे. १९६० च्या आसपास ह्या कमिटीने ज्या सूचना केल्या त्यामुळे MIDC ची स्थापना झाली. ह्या MIDC ने उद्योगधंदे मुद्दामहून मुंबईतून पुण्याच्या दिशेने नेले. हे सर्व आठवणीतून सांगत असल्याने चूकभूल देणे घेणे आणि AI ला जास्त विचारणे.

---

> बिहारला भौगोलिक स्थानलाभ परत मिळवून द्यायचा झाला तर काय धोरण हवं?


दुर्दैवाने मला ठाऊक नाही. कोळसा लोहखनिज इत्यादी आता जास्त महत्वाचे राहिले नाही. बिहारी मनुष्यबळ सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ टोकाची भूमिका म्हणून कदाचित चिनी लोकांना बिहार १०० वर्षांच्या लीज वर द्यावे वगैरे म्हणून शकते. मला तरी उत्तर ठाऊक नाही.

> तरीपण बिहारी मुंबईतच गर्दी करतील का

बिहारी लोकसंख्यावाढ पाहता मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, गोवा सर्वत्र बिहारी लोक स्थानांतरण करतील ह्यांत मला तरी शंका नाही. धोरणे काहीही असली तरी त्याचा फायदा दिसून येण्यासही किमान १० वर्षे तरी जातील पण ह्या कालावधींत कोट्यवधी बिहारी तरुण राज्य सोडून इतर ठिकाणी संधींच्या शोधांत जातील. चांगली बाब आहे. त्यांना शुभेच्छा.

 


In reply to by साहना

बिहार मध्ये उद्योग नाहीतच. 

दिन दयाळ उपाध्याय( पूर्वीचे मुघलसराय)  स्टेशन  सोडून बिहार मध्ये प्रवेश केल्यास मैलोगणती प्रदेशात केवळ शेती आणि गावे दिसतात.

 

 अगदी पाटणा जवळ आल्यावरही कोणताही उद्योग दिसत नाही. मुंबईत प्रवेश करण्याच्या अगोदर ७० किमी दूरपर्यंत म्हणजे बदलापूर किंवा शहाड आंबिवली पर्यंत भरपूर कारखाने आणि उद्योगधंदे दिसतात किंवा पुण्याला जाताना देहूरोड नंतर उद्योगांची रांग  दिसते असे बिहार मध्ये कुठेही दिसत नाही.    

सर्व शेती हि मूठभर जमीनदार आणि राजकारण्यांच्या हातात आहे आणि हेच लोक वर्षानुवर्षे जातीधर्माचे राजकारण खेळत आपली सत्ता टिकवून आहेत. आणि हे लोक शेतमजुरांना किमान वेतन सुद्धा देत नाहीत. 

 यामुळे गरीब लोकांना बिहार सोडून दिल्ली पंजाब किंवा मुंबईकडे पोट भरण्यासाठी जाण्यावाचून पर्यायच नाही. 
पंजाब मध्ये बहुसंख्य शेतमजूर हे बिहारीच आहेत. जीवाशी बेतलं तरी काश्मीर मध्ये सुद्धा हे लोक जाण्यास तयार असतात  
 

गुंडगिरी आणि कायद्याची सर्रास पायमल्ली होणे हा स्थायीभाव आहे. नितीश बाबू यांनी या विरुद्ध फारसे काहीही केलेले नाही. 

लालू प्रसाद यादव यांच्या राज्याबद्दल तर न बोललेलंच बरं.

बिहार मध्ये एक आठवडा राहून या. केवळ महाराष्ट्रातच जन्माला आल्याबद्दल तुम्हाला देवाचे आभार मानावेसे वाटतील.  

आमचे जितके लष्करी मित्र बिहारी आहेत त्यातील एकही निवृत्त झाल्यावर परत बिहारमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेला नाही. यावरून काय ते समजा. बहुसंख्य मुंबई पुण्यात, दिल्ली उपनगरे, चंदिगढ किंवा बंगळुरू मध्ये स्थायिक झालेले आहेत.          
यावरून काय ते समजा.     


In reply to by सुबोध खरे

मी एकदा काही सहकर्मचाऱ्यासोबत राजस्थान मध्ये फिरायला गेले होते. एक युवक त्यातील बिहारी पण अमेरिकेत स्थायिक असलेला होता. त्याला बिहार मध्ये एका लग्नाचे आमंत्रण होते. तो तिथे गेला आणि तिथे त्याचा मॅकबुक चोरीला गेला. आम्ही म्हटले एक पोलीस कंप्लेंन दे आणि कॉपी घेऊन ये. ती कंपनीला देऊ आणि दुसरा ऑर्डर करू. पोलिसांनी त्याला तक्रार लिहायला २ हजार रुपये घेतले. आमचे काम संवेदनशील असल्याने मॅकबुक विना कंपनी परवानगी चालू करणे अशक्य होते त्यामुळे चोरांसाठी त्याचा उपयोग फारतर शोभेची वस्तू म्हणून होता. मग आम्ही राजस्थान फिरून आपल्या वाटेला गेलो आणि हा युवक दिल्लीला गेला. दिल्लीत ह्याला बिहार पोलिसांनी फोन करून सांगितले कि त्यांनी चोरांना पकडले आहे आणि त्याने येऊन आपला लॅपटॉप घेऊन जाणे. आम्हाला न सांगता हा तिथे गेला. तिथे पोलिसांनी संगणक व्यवस्थित जपून ठेवला होता. येताच ह्याचे यथोचित स्वागत करून त्याला तो संगणक अनलॉक करून आपलाच आहे हे सिद्ध करायला सांगितले. त्याने करण्याचा प्रयत्न केला पण कंपनी पॉलिसी मुळे संगणक अनलॉक करून सुद्धा ताबतोब पुन्हा कायमचा लॉक झाला. तेंव्हा अचानक चोर मंडळी सुद्धा बाजूच्या खोलीतून बाहेर आली आणि ह्याला शिवीगाळ आणि नंतर मारहाण करून अनलॉक करण्यासाठी भाग पाडू लागली. त्याने गयावया केली शक्य नाही हे सर्व सांगितले तरी सुद्धा मंडळी ऐकायला तयार नाही. शेवटी ह्याला गाडीत घालून ATM मध्ये नेवून जितके शक्य असेल तितके पैसे काढण्याचा प्रयत्न केला. iPhone काढून घेतला इत्यादी आणि ह्याला कुठेतरी हायवे वर सोडून चोर मंडळी गेली. त्याच्या सुदैवाने त्याच्याकडे भारतीय अकाउंट मध्ये जास्त पैसेच नव्हते. आयफोन सुद्धा कंपनीचा होता त्यामुळे त्याला नवीन मिळाला आणि चोरांचा बहुतेक लॉक केला असावा.

माझ्या इतर सहकाऱ्यांच्या मते हि निव्वळ थाप असून सदर कर्मचाऱ्याने लॅपटॉप आणि फोन काही प्रकारे अनलॉक करून विकला असावा. एक बिहारी सब पे भारी ! 


In reply to by सुबोध खरे

पंजाब मध्ये बहुसंख्य शेतमजूर हे बिहारीच आहेत. 

आजकाल आपल्याकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरात पण शेतीवर वस्तीला राहणार सालदार/ सालगडी म्हणून बिहारी लोक दिसू लागले आहेत. एकतर ते सहकुटुंब राहतात, त्यात पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटतो सरकारी शाळांमुळे, वर्ष वर्ष गावी जात नाही, रिझर्व्हेशन मिळाले तर छठ पूजा नाहीतर ती पण नाहीच, रानातल्या विहिरीपाशी पूजा करून मोकळे होतात. ईमानदार असतात, रानात एक शेड काढून दिले तरी राहतात, जनावरांची निगा घेतात ती अलग.

 ह्या उलट, आमच्या एका नातलगाचा भोसरी एमआयडीसी मध्ये एक युनिट आहे त्याच्याकडे आधी कोकणी कामगार होते, एक तर सोडून गेला कारण काय ? तर "रत्नागिरी जिल्ह्यातील घरापासून खूपच दूर पडते भोसरी" म्हणत ! बाकी गणपती/ शिमगा आले का युनिट बंद करायची पाळी येत असे दरवर्षी ! कारण काय ! कोकण ! शिमगो अन् गणपतीक जायचे हाय सायबा करत सुट्टी/रजा मंजूर करा का करू नका ह्यांची फौज गायब होणार ! 

बरं जरा काय बोललं का लोकल भूमिपुत्र टाईप संघटना, पेंटर पार्टी इत्यादी घेऊन येणार, लोकल पोरांना कामे का देत नाही म्हणून. मग काय तुम्ही इतरत्र म्हणाले तसे जय भवानी दे खंडणी. 

शेवटी त्याने मनाचा हिय्या करून पद्धतशीरपणे सगळे बिहारी ठेवले अन् कोकणी घालवून टाकले बिहाऱ्यांना राहायला युनिटच्या कंपाऊंड मधेच एक चाळ बांधली आहे, तिथेच राहतात, तिथेच खातात, आठवडी सुट्टीला बाजाराला जातात, येताना देशी/ कोंबडा इत्यादी घेऊन येतात खातात पितात परत कामावर हजर.

मराठी वगैरे शिकलीत पोरे ती आता नीट त्रास एकच कामावर असले तरी तल्लीन होताना (का होण्यासाठी) शेजारी जोरात मोबाईल वर भोजपुरी गाणी वाजवत बसतात. 🤣🤣


In reply to by सुबोध खरे

अहो डॉक्टरसाहेब इतके स्पष्ट बोलू नका

जोशीसाहेबाना वाइट वाटेल.


मला एकदा माझा एक बिहारी कलीग बोलला , “तू मूर्ख आहेस, सहा फुटांचा असून कंपनीत काम करतोय, मी तुझ्या जागी असतो तर लोकांना रस्त्यावर अडवून लूटले असते.”


In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>बिहारी कलीग

त्याची उंची किती होती / आहे?

सहा फुट असले तरच लुटता येते? पाच फुटी असल्यास नाही येत असा नियम आहे का?


In reply to by राज जोशी

त्याची उंची बरीच कमी होती, ५’४ असेल. 

सहा फुट असले तरच लुटता येते?>> बहुतेक हो, उंची आणी शरीर लूटमारीत बहुमूल्य भूमिका बजावतात, बाउन्सर त्या करताच उंच नी धिप्पाड घेतलेले असतात, बाऊंसरची शरीरयष्टी पाहून लोक थंड पडतात.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

हो का ? मला वाटलं चाकू, सुरी, कट्टा, घोडा असलं पाहून लोक थंड पडतात. चांगली माहीती दिलीत. अजुन काही माहिती असेल तर द्या.. हा धंदा कसा सुरु करायचा वगैरे.. अकादमीक स्वारस्य... बाकी काही नाही.


In reply to by राज जोशी

फार कमजोर काळजाचे असतील तर चाकू सुऱ्याना घाबरतात, नाहीतर लोक मारामारीवर उतरतात एखादा हडकुळा लुटारू असेल तर त्याला तिथेच धुतात, पर्व समृद्धीवर लुटारुनी त्या महिलेच्या बाळाला रस्त्यावर फेकले तिने पटापट पाटल्या बांगड्या काढून दिल्या.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अच्छा ! पण एक हडकुळाच्या ऐवजी आपण चार हडकूळे घेतले तर काही फरक पडेल का ? एक से भले दो... दो से भले चार... 


In reply to by राज जोशी

बाला तुझे वय फक्त एक महिना आहे, कशाला वाईट गोष्टी शिकतोस?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा ते जुने जाणते सदस्य आहेत. 

नवीन वय दिसत असले म्हणून काय झाले..

कोणाला कुठे अडवायचे हे चांगलेच जाणतात

 


In reply to by विजुभाऊ

तरीच म्हटले मनुवादी शब्दावरून भडकले का ते😜


In reply to by विजुभाऊ

>>>कोणाला कुठे अडवायचे हे चांगलेच जाणतात

तुम्ही अडलात? नाही ना? मग का मला उगाच दुषणे देता? ऑ !! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आज शिकलो तर उद्या तुमच्याएवढा झालो की कुणी मला तुम्हाला दिला तसा सल्ला देणार नाही. 


मी एक किस्सा ऐकला आहे, यूपी की बिहारचा माहीत नाही, एक बस थांबवून लुटण्यात आली, नंतर लूट करणाऱ्यांनी जवळच्या पोलिसाना फ़ोन केला, इतके मिळाले! पोलिसाचे नी त्याचे टक्केवारीवरून वाद झाले, डाकुनी पुन्हा बस मधे फिरुन प्रत्येकाला त्याचे पैसे /दागिने पाकीट/ घड्याळ जे काही लुटले होते परत दिले, जाताना सगळ्यांना आपापल्या वस्तू मिळाल्या ना? विचारले. कारण कळले की तोडगा न निघाल्यामुळे सामान परत केले म्हणजे लूट झालीच नाही तर कुणी तक्रारही करणार नाही.


डी एफ सी चा सर्वात जास्त फायदा गाजियाबाद गौतम बुद्ध नगर आणि मेरठ या जिल्ह्यांना होणार. सध्या मोठ्या संख्येने एक्सपोर्ट युनिट इथे आहे. बाकी योगी सरकार आल्यानंतर लोक रात्री पण फिरू लागले आहेत भीती नष्ट झाली. बाकी बिहारी लोकांना नावे ठेवण्यात आम्ही मराठी लोक पटाईत. 


In reply to by विवेकपटाईत

खुद्द महाराष्ट्रात जन्म घेऊन इथेच वाढलेले अन् मराठीवर पोसलेले. आम्ही बिहारी जनतेला शिव्या घालत नाही, ते जे कोणी त्यात पटाईत आहेत त्यांना नाव घेऊन बोला, उगाच पूर्ण मराठी लोकांना त्यात ओढण्याचे काही खास कारण नाही. धन्यवाद.


In reply to by विवेकपटाईत

>>>बाकी बिहारी लोकांना नावे ठेवण्यात आम्ही मराठी लोक पटाईत. 

 

पटाईत तुम्ही आहात


मी कुठेतरी वाचले होते की बांगलादेश/पूर्व पाकिस्तान व्हेल झाल्यामुळे कोलकाताचे महत्व फार म्हणजे फार कमी झाले नी त्याचा परिणाम संपूर्ण पूर्व भारतावर पडला!