"हाक देऊनही जर कोणी ओ दिली नाही तर बेटा, एकटा चाल"..
"भिरी भिरी भ्रमंती" नावाचा अविनाश धर्माधिकारी यांचा एक धडा कुमारभारतीच्या कुठल्याशा पुस्तकात अभ्यासायला होता, पुढच्या मागच्या वर्गातील मुलांची पुस्तके काहीही करून मिळवून वाचण्याच्या माझ्या वेडापायी मी ह्या धड्याची अगदी सातवी-आठवीत असतानाचं पारायणे केली होती. महड गणपती दर्शनावेळी "एवढ्या दुपारी हे कोण ध्यान दर्शनाला आलं" असा गणपतीच्या नजरेतुन स्वतःचा केलेला उल्लेख, त्यानंतर पनवेलकडे जाताना मोडलेली सायकलची पेडल्स, रस्त्याच्या कडेला रात्री झोपणे, दुसऱ्या दिवशी उठून महाड गाठणे, काळ नदीत पोहणे, पुढे रायगडाच्या खुबलढा बुरुजाचे दर्शन घेत शिवथर घळीत मुक्कामाला जाण्याच्या ओढीने अंधारात वरंधा घाट चढणे व शेवटी घाटातील माझेरी गावातील शाळेच्या व्हरांड्यात रस्त्याच्या कामासाठी आलेल्या कष्टकरी लोकांसोबत जेवण आणि मुक्काम करताना वर्गीय जाणिवांचं विनोदी अंगाने विवेचन करणे, दुसऱ्या दिवशी ट्रकच्या साखळीला धरून वरंधा चढणे इत्यादी घटनांचा पट डोळ्यांपुढे उभा करणारा हा अभ्यासक्रमातील धडा.
तारुण्याची मस्ती जिरवण्यासाठी शोधलेला आदर्श असा सायकलवरून तीनेकशे किलोमीटरचा एकट्याने केलेला प्रवास असा धड्याचा विषय मला त्या वयातही प्रचंड प्रभावित करून गेला होता. आपणही असं अगदी "सेम-टू- -सेम" करणार हे मी त्याचवेळी ठरवून टाकलं होतं. पौंगडास्थेच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मला त्यावेळी हे सगळं अफलातून आणि आव्हानात्मक वाटलं होतं. त्यानंतर, मध्ये अनेक वर्षे गेली तरी हा विचार पाठ सोडत नव्हता, अधूनमधून ही ऊर्मी पुन्हा-पुन्हा जागृत होत राहायची. कुठल्याही सोलो प्रवासाविषयी काहीही वाचलं की त्या धड्याच्या आठवणी जाग्या व्हायच्या, प्रसंग समोर जिवंत व्हायचे, तो धडा जणु काही मेंदूत कुठेतरी रुतून बसला होता व सतत आव्हान देत राहायचा. स्वतःच स्वतःशी ठरवलेल्या पणाची आठवण करून द्यायचा. कॉलेज पुर्ण झाल्यावर मात्र मग मी यावर गांभीर्याने विचार केला. हा काळ २००६ च्या दिवाळीनंतरचा होता हे इथे नोंद घेणे गरजेचे आहे. कसं आणि कुठून जायचं ??, वाटेत काय करायचं ?? , मुक्काम कुठे व कसा करायचा ?? याचे आडाखे बांधले. जवळ काय बाळगावे ??, पैसे साधारण किती लागतील ?? याची अंदाजपत्रके बनवली.
सरतेशेवटी, पुण्यावरून भल्या सकाळी निघून महड गणपती, त्यानंतर कर्नाळा सुळका जिथुन दिसतो तो गोवा महामार्ग गाठणे व मग पुढे, पेण - नागोठणे - कोलाड - इंदापूर - माणगाव करीत महाडला पोहोचणे, महाडवरून रायगड, रायगड रोपवेने महाराज समाधी दर्शन करून खाली व पुन्हा महाड-शिवथर घळ पाहुन वरंधा घाटमार्गे भोर व मग पुणे असा शिवथर वगळता जवळपास धर्माधिकारी यांनी वापरलेलाच मार्ग निश्चित केला.
धर्माधिकारींनी हा प्रवास केला तो विसाव्या शतकाच्या नव्वदाव्या दशकात आणि मी करणार होतो तो एकविसाव्या शतकाचं पहिल दशक शेवटच्या टप्प्यावर असताना.. या साधारण दोन दशकांच्या कालखंडात अनेक गोष्टी बदललेल्या होत्या, रस्ते मोठे झाले तशी वाहतूकही प्रचंड वेगवान झाली होती. मोठ्या हायवेवर आणि प्रचंड लांबीच्या अवघड चढणीच्या घाटरस्त्यांवरून एवढा सायकलप्रवास करण्यात धोका तर होताचं पण मुख्य म्हणजे तेवढी शारीरिक क्षमताचं माझ्याकडे नव्हती. शिवाय, त्याकाळात पैशांपेक्षा माणुसकीचे वजन नक्कीचं जास्त होते त्यामुळे आताच्या काळात पुरेसे पैसे जवळ असणं ही चैन नव्हे तर मुलभूत गरज होती. त्याकाळी मुक्काम हे सार्वजनिक जागेत उघड्यावर सहज शक्य होते, आता असं एवढं सहज आणि सुरक्षित असं ते राहिलेलं नव्हतं.
या सर्वांचा विचार करून मी याबाबतीत स्वतःच स्वतःला बऱ्याचं सवलती देऊ केल्या. सर्वात महत्त्वाची सवलत म्हणजे सायकलवर फुली मारून बाईकवरून प्रवास ही, धर्माधिकारींच्या काळात मध्यमवर्गीयांचं वाहन सायकल होत आता लिटरला सत्तर-ऐंशी किलोमीटर पाळणाऱ्या बाईक्स हे मध्यमवर्गीयांचं वाहन बनलं होत. शिवाय एव्हाना माझ्याकडे माझी हिरो स्प्लेंडर आली होती, त्यामुळे आजच्या काळात हे "एक्सपिडिशन" करायचं तर बाईंक हाचं पर्याय मला नैसर्गिक वाटत होता. जेवण आणि मुक्काम यासाठी पैसे खर्च करायची तयारी ठेवून सोयीस्कर जागा निवडण्याची मोकळीक मी स्वतःसाठी ठेवली होती. धर्माधिकारी रायगड पायथ्याला गेले होते पण रायगडावर गेले नव्हते पण आता रोपवे ही वेगवान सोय उपलब्ध झाल्याने मी ती वापरून रायगडावर महाराज समाधीदर्शन घेऊन पुढं जायचं हे ठरवलं. धर्माधिकारी यांचा मुक्काम माझेरीत झाल्याने त्यांना शिवथर घळीत जाता आलं नव्हतं, मी मात्र शिवथर घळीत जाणारचं हे ठरवुन टाकलं.
आता प्रश्न होता रस्त्यांचा, लोणावळ्यापर्यंत रस्ता माहीत होता व एकदा गोवा हायवेला लागलो की पुढे रस्ता न सोडता महाडपर्यंत येणे यातही काही अडचण वाटत नव्हती, प्रश्न होता तो लोणावळ्याच्या पुढे निघणे, त्यानंतर महड गणपती व कर्नाळा सुळका जिथुन दिसतो तो गोवा हायवे गाठणे याचा, कारण यामार्गांवर एकट्याने स्वतःच्या जबाबदारीवर प्रवासाची वेळ तोपर्यंत कधी आली नव्हती. तसेच, महाड ते रायगड व नंतर महाड ते भोर यामार्गाची ही फारशी कल्पना नव्हती. आज गूगल मॅप आणि मोबाईल इंटरनेट यामुळे अनोळखी भागातून प्रवास करणं सोपं झालंय. त्यावेळी मात्र हे गूगल मॅप प्रकरण मला निव्वळ ऐकूनही माहीत नव्हतं, मोबाईल इंटरनेट फार प्राथमिक अवस्थेत होतं त्याला WAP वा GPRS असं काहीतरी म्हणत. माझ्याकडे नुकताच घेतलेला मोटोरोला V3i हा मोबाईल फोन होता पण त्याकाळी कॉल घेणं व करणं आणि १.२ मेगापिक्सल कॅमेऱ्याने १२८ एमबीच्या मेमरी कार्ड मध्ये बसतील तेवढेच फोटो काढणं एवढाचं मोबाईलचा मुख्य उपयोग माहीत होता, त्यामुळे रस्ते शोधण्यासाठी थांबुन लोकांना विचारून चौकशी करून पुढे जाणे हाच एकमेव मार्ग तेव्हा माझ्याकडे उपलब्ध होता.
धर्माधिकारींचे, सायकल प्रवासात दोन मुक्काम झाले होते, बाईकने माझा प्रवास हा त्यांच्यापेक्षा खूपच जास्त वेगवान होणार असल्याने एक मुक्काम पुरेसा असेल व काही अनपेक्षित अडचण आली नाही तर पुण्यात रात्री आठ नऊ वाजेपर्यंत नक्की पोहोचू असा अंदाज होता. मुक्काम कुठे होईल हे स्पष्ट नव्हते पण रायगड पायथा योग्य वाटत होता. शाळेच्या सहलीबरोबर पुर्वी येथे जाणं झालं होतं त्यावेळी राहण्या-जेवणाची सोय या भागात होते हे पक्क माहीत होतं व आता रोपवे सुरू होऊन काही वर्षे झाली असल्याने मुक्कामाची अडचण येणार नाही याची खात्री वाटत होती.
आता इतक्या साऱ्या सवलती स्वतःला दिल्यावर तुम्हाला वाटेल की यात तारुण्याची रग जिरवण्यासारखं आहे तरी काय नक्की, निव्वळ एकट्याने प्रवास हाचं काय त्यातल्या त्यात दखल घ्यावी असा मामला...
असो, पण त्यातही थ्रिल होत, थोडी भीती आणि खूप सारी उत्सुकता आणि उत्साह होता. प्रवास कुठल्याही टप्प्यावर अनपेक्षित घटनांचा कोलाज देऊ करण्याची क्षमता राखुन असतो व असे एकट्याने केलेले प्रवास एक वेगळाचं आत्मविश्वास ही देऊ करतात. अर्थात हे विचार नंतरचे, त्यावेळी धड्यात वाचल्याप्रमाणे दोन दिवस हुबेहुब जगणे व प्रवासातील अनिश्चिततेचा आनंद घेणे, आव्हाने आली तर एकट्याने सामना करणे एवढाच विचार केला होता.
शेवटी मनाची पुर्ण तयारी करून प्रवासासाठी दिवस नक्की केले, घरी कल्पना दिली, थोडा विरोधी सूर लागला, बरोबर कुणी असावे तर बरं अशा सुचना ही मिळाल्या पण कुणाला हाक द्यायचा प्रश्नचं नव्हता, एकटंचं जायचं हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणतात ना अगदी तसं "फिक्स" होतं.
माझी स्प्लेंडर-४६६२, एक सॅक आणि मी, सॅकमध्ये एक जोडी कपडे, पाणी बॉटल, थोडे खाण्याचे पदार्थ वगैरे..
सकाळी साडेपाचच्या सुमारास घर सोडलं, आदल्या रात्री साडेतीनशे रुपयांचे पेट्रोल भरून बाईकची टाकी जवळपास फुल्ल केली होती त्यामुळे त्यासाठी थांबायचा प्रश्न नव्हता. पेट्रोल त्यावेळी लिटरला पंचावन्न रुपयांच्या आतचं होते बहुतेक. मोकळ्या रस्त्यांवरून वेगाने प्रवास करीत खडकीमार्गे मुंबई रस्त्याला लागलो, तासाभरात वडगाव मावळ क्रॉस करून पुढे सुसाट सुटलो व साडेसातच्या सुमारास लोणावळा गाठला. लोणावळा तसा मी त्यावेळी बऱ्यापैकी पालथा घातलेला भाग होता, तिथे चहा घेतला व गाडी गावात घातली. पाच-सात मिनिटात लोणावळा धरणाजवळ पोहोचलो, मागे सुर्य उगवुन किंचित वर आला होता, कोवळी सूर्यकिरणे झेलत समोरचा पाणपसारा शांत पडला होता, जवळपास चिटपाखरूही नव्हते. दहा मिनिटे तो स्वर्गीय माहोल अनुभवला आणि माघारी फिरलो.
इथवरचा प्रवास हा तसा ओळखीच्या रस्त्यावरून होता त्यामुळे कुठलीचं अडचण वाटली नव्हती, खरी मजा आता घाटाखालून सुरू होणार होती, मी दुचाकीवर त्यापुर्वी त्या भागातुन कधीही गेलो नव्हतो. पुन्हा लोणावळ्यातून बाहेर येऊन खंडाळामार्गे दोन्ही बाजूने दरी असलेल्या पुलावर आलो, काही लोक थांबून तिथून दिसणाऱ्या दृश्यांचा आनंद घेत होते, मी ही तिथे दोन मिनिटे थांबुन पुढे निघालो. नऊच्या सुमारास खोपोलीत पोहोचलो असेन, रस्त्याच्या कडेने असणाऱ्या एका नाश्त्याच्या हॉटेलात शिरलो, बोर्डवर मेन्यू वाचला, नेहमीचा मिसळ-पाव तिथं नव्हता पण त्याची जागा भरून काढायला उसळ-पाव हा समरूप पदार्थ दिसला, ऑर्डर केला आणि दोन मिनिटात आला ही, पिवळ्या वाटाण्याची झणझणीत उसळ आणि पाव, भरपेट हादडला. हॉटेलबाहेर आलो, पुढचा टप्पा होता अष्टविनायकातील महड गणपती.
रस्त्याची चौकशी केली, खुणा लक्षात ठेवल्या व पुढच्या पाऊणेक तासात महडला पोहोचलो, गर्दी अजिबात नव्हती, दहाचं मिनिटात साग्रसंगीत दर्शन पार पडलं, सकाळची वेळ असल्याने बाप्पाला अजिबात आश्चर्य वाटलं नसावं की आता हे ध्यान कुठून आलं... वगैरे विचार मनात आले, पहिला लँडमार्क मी मार्क केला होता, आता कर्नाळा सुळका खुणावत होता. बाहेर आलो, तळ्यातील बदके पाहत पाचेक मिनिटे थांबलो, नंतर एका प्रसादाच्या दुकानात रस्त्याची चौकशी केली, कर्नाळा जाण्यासाठी त्यांनी जागोजागी पळस्पे फाटा विचारत जा असे सांगितले, त्याप्रमाणे महड सोडुन पुढे निघालो, दोन-चार ठिकाणी रस्ता चुकलो, थोडासा भरकटलो, लोकांना थांबवत, विचारत, थोडं मागे-पुढे करीत, पुन्हा मार्गावर येत, पनवेलच्या बऱ्याच अलीकडे कुठल्यातरी गावातून एकदाचा गोवा मार्गाला लागलो व थोडा निर्धास्त झालो, आता महाडपर्यंत हा रस्ता सोडायचा नव्हता त्यामुळे मनावरचा ताण पुष्कळसा कमी झाला. बारा-साडेबाराचा सुमार असावा, रस्त्याला लागलो.
आजूबाजूचा परिसर औद्योगिक झोन वाटत होतं, कडेला जागोजागी ट्रक-ट्रेलर थांबले होते. रस्त्यावरूनही अनेक पळत होते. या सगळ्या गर्दीत कडेने निवांतपणे गाडी हाकीत आरामात निघालो आणि पुढच्या दहा मिनिटात समोर कर्नाळ्याचा सुळका दिसू लागला. महड गणपती आणि आता कर्नाळ्याचा सुळका, धर्माधिकारींच्या धड्यातले दोन 'लँडमार्क्स' मी मार्क केले होते. मिनिटांगणिक सुळका अजून जवळ-जवळ येत स्पष्ट दिसू लागला, मनात चिंधी-नाग्याच्या गोष्टीची उजळणी चालू झाली, "जैत-रे-जैत" ची सुंदर गाणी पार्श्वभूमीवर वाजू लागली. त्या बाजूचे गर्द जंगल व हिरवाई नकळत नजरेला थंडावा देत होती. सुळका जवळ येत चालला होता. बाईक एकसमान वेगाने धावत सुळक्याचा पायथ्याला लागून असलेल्या जंगलाला खेटून असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या फलकापासून दूरदूर जात होती आणि मला कित्येक वर्षांपासुन बाळगलेल्या एका स्वप्नाच्या पूर्तीचा आनंद देऊ करीत होती.
पुढच्या तासा-दीडतासात पेण वगैरे गावं मागे पडली, कापणी झालेली भाताची शेती सर्वदूर दिसत होती, छोटी-मोठी तळी, वाहत्या पाण्याचे प्रवाहही अधेमध्ये दिसत होते. कोलाडला कुंडलिका नदीच्या पुलावर थांबुन स्वच्छ वाहत्या पाण्याच्या दृश्याचा आनंद घेतला व पुढे निघालो. माणगावला एस टी स्टँड समोरच्या एका वडापावच्या हातगाडीवर थांबलो तेव्हा साधारण चार साडेचारचा सुमार असावा. दोन वडापाव आणि चहा घेऊन गाडीला किक मारली. आता लक्ष्य महाड, पण माणगाव ओलांडून थोडं पुढं गेलो तर तिथे रायगडकडे असा एक बोर्ड दिसला, थांबुन चौकशी केली तर इथून पंचवीस-तीस किलोमीटरवर रायगड आहे असं कळलं, जवळपास निम्म अंतर वाचणार म्हणुन खुश झालो, आठ-दहा फूट रुंदीचा पुर्ण उखडलेला खडीचा रस्ता समोर दिसत होता पण दोन-तीन जणांनी ग्वाही दिली की दुचाकी सहज जाते व तासाभरात गडाच्या पायथ्याला पोहोचशील त्यामुळे घातली गाडी आणि निघालो.
रस्ता दिव्य व भुलभुलय्या होता, जागोजागी फाटे फुटलेले, सारख विचारायला थांबावं लागत होतं, पाचेक किलोमीटर वर गेल्यावर निर्जन भाग सुरू झाला, घरे दूरदूर पर्यंत दिसत नव्हती, वळणाचे रस्ते त्यामुळे अगदी समोर आल्यावरच कुणीतरी आहे हे कळत होते, सुदैवाने संध्याकाळी गुरं परतायची वेळ असल्यामुळे लोकं भेटत होते, रस्ता सांगत होते, चुकत-माकत शेवटी मी एका आडव्या जाणाऱ्या रस्त्याला लागलो, तिथून दोनेक किलोमीटरवर एक वाडी लागली, तिथं तिठ्यावर पुन्हा रस्ता विचारला, आता ही उजव्या अंगाची पट्टी सोडू नकोस कुठंच बाळा, थेट पाचाडात जाऊन पोचशील बघ असा सल्ला मिळाल्यावर पुढे निघालो.
चढ-उताराच्या रस्त्याने पुढच्या तासाभरात पाचाडच्या जिजाऊमाँसाहेब स्मारकासमोर गाडी लावली व दहा मिनिटात जिजाऊ माँसाहेब स्मारक दर्शन घेऊन पाचाडच्या वाड्यासमोरून हिरकणीवाडीच्या रोपवे भागात गेलो तेव्हा कातरवेळ झाली होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधारही अंमळ लवकरचं पडणार होता. रोपवे बहुदा नुकताच बंद झाला होता व सुचनाफलकाप्रमाणे आता उद्या सकाळीचं सुरू होणार होता.
रोपवे शेजारीचं बहुदा 'औकीरकर' यांच्या इथे मुक्कामासाठी बोलणी केली, शंभर रुपये राहण्याचे, चाळीस रात्रीचे जेवण, असे व चहानाश्ता वेगळं असं ठरवून पथारी पसरली. गरमागरम चहा झाला तोपर्यंत गुडुप अंधार झाला होता. मघाशी आलो तेव्हा तुरळक असणारी गर्दी आता पुर्ण नाहीशी झाली होती. हिरकणी वाडीत फेरफटका मारला, पाच-पंचवीस घरांची छोटीशी वाडी रायगडाच्या पायथ्याला एका अरुंद चिंचोळ्या पट्टीत वसलेली आहे. जवळपास प्रत्येक घरात पर्यटकांसाठी काहींना काही सुविधा पुरवण्याचा व्यवसाय हे अलीकडील काळात रोजगाराचे मुख्य साधन झालेलं दिसत होतं.
शेकोटी भोवती बसलेले स्थानिक दोन-तीन ठिकाणी आढळले बाकी संपुर्ण शांतता, एका बाजूला उभा रायगडाचा पत्थर तर खाली उतरत जाणारी झाडाझुडपांनी, त्याआड भाताच्या कापणी झालेल्या खाचरांनी भरलेली दरी. तिथून वर चढत जाणारं थंडगार धुकं, गूढ वातावरण आणि जोडीला पोलादी दुर्गराजाचे सान्निध्य.... निव्वळ आनंद आणि समाधान, दुसरे शब्दचं नाहीत...
परत आलो, दारात पायरीवर बसुन दिवसभराचा विचार केला, फारशी दगदग झाली नव्हती, गाडीनेही कोणता त्रास दिला नाही, तशी माझ्या गाडीला सतत पंक्चर व्हायची खोड होती, यापुर्वी अनेकदा थोड्या अंतरावरही तिने मला दगा दिला होता. पण आजच्या जवळपास दोन-अडीचशे किलोमीटर दौडीत ती विनातक्रार धावली होती. एकट्याने प्रवासात वाहनाने कुठलाही अनपेक्षित त्रास न देणे किती दिलासादायक असते हे असे अनुभव घेणारे लोक फार जवळुन रिलेट करू शकतात.
असो, जेवणातील मेन्यू आता नेमका आठवत नाही पण मटकीसारखी उसळ, बटाटा असावा बहुतेक, भरपेट जेवण करून मी झोपलो ते सकाळी गजराला उठलो, प्रचंड थंडीत गार पाण्याने आंघोळ उरकली, चहा, नाश्ता होईपर्यंत उजाडलं होतं. रोपवेकडे गेलो, तिथे रांगेत मी एकटाचं होतो, तिकीट खिडकी बंद होती, तिच्यासमोर उभा राहिलो. डाव्या बाजूला ग्रिलने बंदिस्त जागेत आलेल्या एकाने विचारले किती जण आहात ??, मी एकटाचं आहे कळल्यावर त्याने ग्रील सरकवून मला तिथुनच आत घेतले, इथुन मी त्याच्यामागून जवळच्या मार्गाने थेट रोपवेच्या ट्रॉली पाशी पोचलो. मला आत घेणारी व्यक्ती ही गडाच्या वर असणाऱ्या रोपवे स्टेशनवर ड्यूटीसाठी असणार होती, खालची तिकीट खिडकी उघडली नसल्याने व मी एकटाच असल्याने वरच्या स्टेशनवर ड्युटीसाठी निघालेल्या रोपवे कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या फेरीमध्ये मला त्यांनी वर नेले. माझे तिकीट मला वर गेल्यावर परतीच्या प्रवासावेळी दिले गेले. त्यावेळी शंभर च्या आसपास असे काहीसे ते होते. खात्रीने आठवत नाही.
सकाळी उन्हं वर यायच्या आत मी गडावर होतो, झटपट चढून मी राणीवसा, राजवाडामार्गे अंबरखान्यातून समाधीकडे गेलो, समाधीपर्यंत पोहोचेपर्यंत अगदी चार पाच जणचं दिसले तेसुद्धा गडावरचे रहिवासीच असावेत बहुदा, समाधी व जगदीश्वर मंदीर परिसर पुर्णपणे निर्मनुष्य होता. समाधी परिसर असा निर्मनुष्य भेटणे हे किती मोठी गोष्ट आहे हे आता रायगडावर वेगवेगळ्या वेळी झालेल्या अनेक फेऱ्यांनंतर समजलं. दहा मिनिटे समाधीपाशी घालवून मी झटपट चालत टकमक टोकाकडे गेलो, तिथुन संपुर्ण रायगड घेरा परिसर न्याहाळला, रहाळातील गर्द झाडी, त्यापलीकडे छत्री निजामपूर, काळ नदीचं खोरं सारा परिसर सकाळच्या उन्हात चमकत होता. तिथून पुन्हा होळीच्या माळाकडे आलो, रायगडाची गडदेवता शिरकाई मातेचं दर्शन घेत अंबरखान्यामार्गे सदर व तिथून पुन्हा रोपवेकडे गेलो. वाटेत तुरळक पर्यटक नजरेस पडले. खाली जाण्यासाठी रोपवेच्या प्रतिक्षालयाकडे आलो, दरम्यान तेथील कॅन्टीनमध्ये दोन वडापाव चापले व ट्रॉली आल्यावर खाली आलो.
लगेचच सामान उचललं आणि गाडीला किक मारून महाडच्या रस्त्याला लागलो, महाड शहरात आलो, गावच्या बाजारपेठेत गाडीवरच फेरफटका मारला, चवदार तळ्याचा रस्ता विचारीत तिथेही गेलो, पाच मिनिटात पुन्हा बाहेर आलो व महाडबाहेर पडलो, पेट्रोलचा काटा अजूनही बराच वर होता, तरीही सावधगिरी म्हणुन शंभर रुपयांचे पेट्रोल टाकले व दोन्ही चाकातील हवा चेक करून घेतली. पुढे दोन-तीन ठिकाणी रस्ता विचारीत सावित्री नदीवरचा पूल ओलांडत अलीकडे आलो व वरंध रस्त्याला लागलो तेव्हा सुर्य माथ्यावर होता.
महाडमध्ये दिसली ती सावित्री नदी मग धर्माधिकारी ज्या काळ नदीत पोहले ती नदी कुठे असा प्रश्न पडला, तेवढ्यात आणखी एक पूल लागला, पण ती ही सावित्री नदीचं होती. जवळचं एका गुराख्याला विचारलं तर त्याने डाव्या हाताला बोट दाखवून काळ नदी इकडून येते असं सांगितलं, अजून पुढे गेल्यावर जवळून दिसेल हे ही सांगितल्यावर मी पुढे निघालो, दोन-चार किलोमीटर पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक नदी दिसू लागली, गाडी एका झाडाखाली लावून, शेत तुडवत नदीकाठी गेलो, पाणी फार नव्हतं पण वहातं होत, बूट काढुन त्यात पाय सोडून थोडावेळ बसलो, धर्माधिकारींनी काळ नदीत आंघोळ केली होती, आपण आंघोळ नाही पण निदान पाय तरी भिजवलेच की यात समाधान मानीत धड्यातील अजून एक लँडमार्क काबीज केल्याच्या आनंदात तिथून पुढे निघालो.
पुढच्या अर्ध्यापाऊण तासात एका कौलारू एसटी थांब्यापुढे वरंध अशी पाटी दिसली, शिवथर घळीकडे जाण्याच्या रस्त्याच्या चौकशीसाठी थांबलो, वरंध गावातूनही एक रस्ता घळीकडे जातो असे कळले पण घाटातून ही एक रस्ता आहे आणि तो जवळ पडतो असेही कळले, घाटातील रस्ता हा धर्माधिकारी यांनी धड्यात उल्लेखला होताच त्यामुळे तिकडूनचं जाऊ असे ठरवून घाट चढायला सुरुवात केली.
दहा-पंधरा मिनिटातचं रस्त्याकडेला एक मंदीर व काही घरे दिसली म्हणुन थांबलो, एका टपरीवजा दुकानात विचारलं तर हेचं माझेरी गाव होतं. दुकानाच्या बाजूलाच मंदीर आणि एक घर सोडुन झाडात लपलेली शाळेची छोटीशी इमारत होती, धड्यातील अजून एक लँडमार्क सापडला होता. शाळेच्या छोट्याशा आवारात गेलो, दोन-चार खोल्यांची छोटीशी शाळा, वर्ग कुलूपबंद होते, व्हरांडयात गेलो, दोन मिनिटे बसलो, धर्माधिकारी यांनी दोन दशकांपूर्वी याचं शाळेत, इथे ह्याचं व्हरांड्यात मुक्काम केला असावा का ?? हे बांधकाम तसे फार जुने वाटत नव्हते कदाचित शाळा नव्याने बांधलेली असावी किंवा कुणास ठाऊक, अगदी नवीन जागीही असावी कदाचित, कुणाला विचारावं तर काय म्हणुन त्यामुळे तो मोह टाळला, एवढं मात्र खरं होत की वरंधा घाटात असणाऱ्या माझेरीतील जिल्हा परिषद शाळेत मी उभा होतो. धड्यातील अजून एका लक्षवेधी जागेला मी स्पर्श करू शकलो होतो.
या आनंदात पुढे निघालो, अगदी चार दोन मिनिटांवरचं शिवथर घळीची पाटी दिसली, रस्ता पाहीला तर पाच सात फुटांचा वाटावा असा कच्चा रस्ता, दोन्ही बाजूने वाढलेले गवत रस्त्यावर आल्याने अजूनच अरुंद पायवाटेसारखा दिसणारा हा रस्ता, तरीही निघालो, दुपारचं ऊन मी म्हणत होतं, घरे, माणसे, गुरे यांचं काहीचं चिन्ह दिसत नव्हतं, त्यात भर म्हणजे रस्ता उत्तरोत्तर खराब होत चालला होता. नाही म्हणायला, मध्ये एक छोटी पण तेव्हा निर्मनुष्य अशी वस्ती लागली त्यामुळे धैर्य ठेवून पुढे जात राहिलो. गाडी वेग घेत नव्हती, साधारण पाऊण तास दहा पंधराच्या गतीने खड्डे, दगड गोटे तीव्र उतार व वळणे अशा रस्त्याने चालल्यावर सपाटी लागली व घरे दिसू लागली, झाडीतून एका तीव्र वळणानंतर सुंदर मठाची रंग उडालेली अशी वाटणारी इमारत व शेंदरी रंगात रंगवलेली कमान दिसली.
तिथेच एका घराच्या समोर पत्रे उतरवून त्यात ठेवलेल्या प्लास्टिक टेबल खुर्च्यांच्या बाजूला गाडी लावली, तिथे बेसन-भाकरीची ऑर्डर देऊन दर्शनाला गेलो, वातावरणात दमटपणा भरून राहिला होता, घामाने अंग निथळत होतं. कमानीतून काही पायऱ्या चढून वर गेलं की चप्पल स्टँड दिसले, तिथे पादत्राणे ठेऊन, नळाखाली गार पाण्याने हातपाय आणि तोंड धुवून उजव्या हाताला डोंगराच्या कडेने जाणाऱ्या पाऊलवाटेने घळीकडे गेलो, काचेच्या पार्टीशनने बंदिस्त केलेल्या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताना व शिष्य कल्याण स्वामी उतरवून घेताना अशा जिवंत वाटणाऱ्या सुरेख मुर्ती आहेत. तिथुन पुढे पावसाळ्यात जलप्रपात जिथे कोसळून वाहत पुढे जातो तो प्रचंड शिलाखंडांनी भरलेला ओढा पाहता येतो. पाण्याची बारीक धार सुरू होती. दुपारची वेळ, एकदोन सेवकांशिवाय आसपास कुणीच नाही, शांतता, अगदी पक्ष्यांचा ही आवाज नाही, जणु घड्याळही थांबलंय असं वाटायला लावणारी ती पंधरा-वीस मिनिटांची जागेपणातील समाधीसदृश्य अवस्था अनुभवून बाहेर पडलो. मघाच्या छोट्याशा हॉटेलात आलो, तांदळाची मऊ भाकरी आणि बेसन पोटभर खाऊन व गरमी वर उतारा म्हणुन कोकम सरबत घेऊन पुढे निघालो.
परत आल्यामार्गाने अर्ध्यापाऊण तासात वरंध घाटात रस्त्याला लागलो, घाटातील रस्ताही यथातथाच, खड्डेयुक्त चढ, त्यामुळे वेगावर मर्यादा आली होती पण वाहतूक अत्यंत तुरळक असल्याने विशेष त्रास नव्हता, जागेवर वर चढणारं एक प्रचंड वळण घ्यायला टाकावा लागलेला फर्स्ट गियर वगळता विशेष काही त्रास झाला नाही. घाट मात्र मोठा, संपता संपत नाही, उजव्या हाताला उंच कडे, डाव्या हाताला वळणागणिक खोल होत जाणारी दरी, मध्यात पोहोचल्यावर खाली दिसणारं दाट झाडीने भरलेलं नीरा नदीच्या उगमाचं खोरं... भोर गाठलं तेव्हा अंधार पडला होता. गावची बाजारपेठ बंद होऊ लागली होती. झटपट एक चहा घेऊन पुढच्या रस्त्याला लागलो, हायवेला लागल्यावर वेग वाढवत कात्रज घाटात पोहोचलो तेव्हा अवाढव्य पसरलेलं पुणे शहर रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात चमचमत होतं. घाट उतरून ट्रॅफिकमध्ये शिरलो व स्वारगेटमार्गे घर गाठलं तेव्हा घड्याळात अकरा वाजले होते.
आज या गोष्टीलाही तब्बल दोन दशके होत आली आहेत तरीही हा प्रवास मनामध्ये ताजा आहे व अगदी छोट्या छोट्या तपशिलासहीत लख्ख आठवतो देखील आहे. हा प्रवास मी पर्यटन म्हणुन नाही तर पुस्तकातील एका लिखाणाने मनात जागवलेली ऊर्मी जपण्यासाठी केला होता. पौंगडावस्थेत वाचलेला व मनात घर केलेला एक पाठयपुस्तकातील धडा जगण्यासाठी केलेला हा उपद्व्याप. लौकिकार्थाने ह्यातुन मला काय मिळालं माहीत नाही पण जाणिवांच्या पातळीवर हा अनुभव विशेष होता. नकळत्या वयात ठरवलेलं एक छोटंसं उद्दिष्ट पुर्ण केलं, वाचताना ज्या जागा मनाला स्पर्शून गेल्या होत्या त्यांना प्रत्यक्षात स्पर्श करू शकलो. नंतरही मी या सर्व जागी काहीवेळा गेलोय पण त्यावेळी अगदी ठरवुन आणि तेच करायचं या उद्देशाने गेलो होतो, अगदी एकट्याने गेलो होतो, स्वतःचं स्वतःशी केलेला एक अलिखित करार पुर्ण करण्यासाठी गेलो होतो.
धर्माधिकारींनीच लिहुन ठेवल्याप्रमाणे कधी कधी, कुणालाही हाक न देता चालण्याचा आवेग येतो, स्वतःच्या धुंदीत, जगाला बाजूला सारून अलिप्ततेने काही गोष्टी करण्याची भावना प्रबळ होते, तिला मस्ती म्हणतात.
"ही मस्तीचं तर तारुण्याचा स्थायीभाव आहे. मस्तीची भावना जितकी प्रबळ तितकी अनवट वाटांवरून चालण्याची इच्छाशक्ती प्रबळ"...
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान झाले आहे प्रवास वर्णन…
छान झाले आहे प्रवास वर्णन. अजून फोटो असते तर मजा आली असती.
एकट्याच्या भटकंतीचे वर्णन…
एकट्याच्या भटकंतीचे वर्णन आवडले. पुस्तकात एखादा धडा वाचून त्या उर्मीने काही लक्ष्य साध्य करणे रोचक वाटले. लोकांसाठी साधी गोष्ट असते, पण आपलं आपणच काहीतरी ठरवून ते साध्य करणे ही आपणच स्वतःला दिलेली शाबासकी असते. चित्रेही छान आहेत.