Skip to main content

हंपीचा ध्यास-४ (कृष्ण मंदिर,लक्ष्मी नरसिंह,बदवी लिंग ,प्रसन्न विरुपाक्ष मंदिर )

लेखक Bhakti यांनी शनिवार, 20/06/2026 14:38 या दिवशी प्रकाशित केले.

कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.
मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.इ..स. १५१३ च्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, या मोठ्या आणि सुशोभित, पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) येथून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीने केली होती. पंचायतन शैलीत दोन आवारांसह बांधलेल्या या मंदिर संकुलात गर्भगृहासह मुख्य मंदिर, एक प्रवेशकक्ष, स्तंभयुक्त मंडप आणि सभागृहे, एक देवी मंदिर आणि अनेक उप-मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य मंदिराच्या आग्नेय दिशेला एक स्वयंपाकघर आणि नैऋत्येकडील पहिल्या आवारात एक स्वतंत्र भांडार आहे. भव्य मनोरा असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार हे विजयनगर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान कृष्णाची पौराणिक कथा असलेल्या भागवताचे आणि त्या काळातील जीवनाचे चित्रण कोरलेले आहे. महामंडपाच्या स्तंभांवर भगवान विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते. मंदिराच्या आवारात स्थापित केलेल्या एका मोठ्या शिलालेखावर या मंदिराची कथा आणि विजयाची कहाणी कोरलेली आहे.

आत शिरलो तर दोन्ही भिंतींवर कोरलेली शिल्पे दिसली अगदी वरपर्यंत साधारण १२- १५ फूटापर्यंत हे कोरीव शिल्पे होती.मी यापूर्वी कृष्णमंदिरातील शिल्पाविषयी एक व्हिडियो पाहिला होता.त्यानुसार यावरील विष्णूचे दशावतार शोधू लागले .अगदी पायथ्याशी लतासुंदरीचे आखीव शिल्प आणि त्या तिने हातात धरलेल्या लता -वेली वरपर्यंत गेल्या आहेत आणि त्यावर गोलात हे दशावतार कोरलेले आहेत.

लतासुंदरी

 

 

 

 

अगदी वर पाहिल्यावर या द्वाराच्या छतावर एक अनोखे कोरीवकाम आहे-चंद्रग्रहणाचे दृश्य.!त्यात चंद्रातील ससा आणि त्याच्याकडे सरकत येणारे राहू-केतू स्वरूपातील दोन सर्प दाखवले आहेत. हे चंद्रग्रहणाच्या पौराणिक कल्पनेचे कलात्मक चित्रण मानले जाते.या शिल्पात राहू हा सर्पाकार अथवा राक्षसी आकृतीच्या स्वरूपात दाखवला असून तो चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
भारतीय पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहूचे डोके भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने छाटले. मात्र अमृत पिल्यामुळे तो अमर झाला. तेव्हापासून सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून राहू वेळोवेळी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. सूर्य किंवा चंद्र काही काळ झाकले गेले की ग्रहण होते, अशी लोकमान्यता होती.ही कथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही तर  ती सामान्य जनतेला आकाशातील घटनांचे स्पष्टीकरण देणारी लोकप्रिय आख्यायिका होती. त्यामुळे मंदिरातील शिल्पकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटनेलाही कलात्मक रूप दिले.

समोर असणारे भव्य प्रांगण आणि मुख्य मंदिर आणि उपमंदिरांचे आकर्षक छोटी छोटी कलात्मक शिखरे पाहून मी थक्क झाले.अशी तीन उपमंदिरे या मंदिराच्या प्रांगणात आहेत.

 

आता बाहेर पडतांना लक्ष समोरच्या गोपुराच्या शिल्पाकडे जाते .गुलाबी-लालसर रंगाचे हे काम अतिशय मोहक आहे,परंतु हवामान, वर्षाव आणि जीर्णता यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, तरीही उरलेले भाग अद्भुत आहेत.त्यामुळेच ASI कडून तिथे डागडुजीचे  काम सुरु असून अनेक रॉड लावले होते .कृष्ण मंदिराच्या गोपुरावर मूळत विष्णूचे विविध अवतार,कृष्णलीला,देव-देवता,गंधर्व,अप्सरा.याली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'युद्धप्रसंग' दाखवले आहे .
ही शिल्पे स्टुको (stuscco)शिल्पे आहेत.स्टुको ही चुनखडी, वाळू, गूळ, वनस्पतीजन्य घटक, शंखचूर्ण आणि कधी कधी अंड्याचा बलक किंवा इतर बांधणीकारक पदार्थ यांचे मिश्रण करून तयार केलेली सजावटीची कलाशैली आहे. या मिश्रणापासून मूर्ती, नक्षीकाम, देव-देवतांच्या आकृती आणि वास्तूवरील अलंकार घडवले जातात.दगड कोरून शिल्प तयार करण्याऐवजी स्टुकोमध्ये ओल्या मिश्रणाला आकार देऊन आकृती तयार केली जाते. नंतर ते वाळल्यावर त्यावर रंगकामही केले जात असे.
 

हे वरील छायाचित्र tales of gaurav या चॅनेलच्या सौजन्याने.

 

 

हे शिल्प दृश्य कृष्णदेवरायांच्या १५१२-१५१३ च्या कालिंग/उदयगिरी/ओडिशा मोहिमेतील विजय दर्शवते. त्यांनी गजपती राजा प्रतापरुद्रावर विजय मिळवला.हे शिल्पे त्या विजयाचे स्मारक आहेत.काही संशोधकांना हे फक्त "विजय" नव्हे तर युद्धातील हानी आणि मानवी भावनाही दाखवतात असे वाटते . उदाहरणार्थ, सैनिकांच्या चेहऱ्यांवरील विविध भाव.
हा लेख नक्की वाचा,हा युद्ध प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन आहे .
https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding…

या युद्धप्रसंगात योद्धे ढाली घेऊन.घोडे काही जोमदार, काही राजाच्या समोर,हत्ती युद्धरथ किंवा सैन्याच्या रांगेत(हे मला ओळखता आले नाही)
सैन्याची रचना, राजा कृष्णदेवराय  एका घोड्यावर स्वार दिसत आहेत,काही वर्णनांनुसार गंभीर चेहऱ्याने दिसत आहे. सैनिकांच्या चेहऱ्यावरील भाव काही हसरे, काही गंभीर किंवा दुखी दिसत आहेत.युद्धातील हालचाल, पडलेले सैनिक इत्यादी दाखविले आहे .व दुसऱ्या बाजूला गोपुरावर भगवान कृष्णाच्या लीला  संबंधित शिल्प आहेत.

 

आता आम्ही बाहेर पडलो.मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते.हा खरं तर मुख्य रस्ता -सपाट असा -रथांचा रस्ता होता, जो एकेकाळी 'कृष्ण बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याबाजाराकडे जात असे. अनेक मंडपात बाजारातील दुकाने होती.

 

लक्ष्मी नरसिंह


कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला,२०० ते ३०० मीटर अंतरावर विशाल एकाश्म नरसिंह मूर्ती आहे. दक्षिण भारतात  नरसिंह पूजा खूप प्रचलित आहे.हंपीतील ही मूर्ती त्या परंपरेचे एक प्रमुख उदाहरण आहे.ही मूर्ती कृष्णदेवराय १५२८ ई. यांच्या काळात, कृष्णभट्ट या शिल्पकाराने एकाच दगडातून घडवली. विजयनगर साम्राज्याच्या शिखर काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. कृष्णदेवराय वैष्णव भक्त होते आणि नरसिंह हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.मूर्ती सुमारे २२ फूट उंच असून ती एका अखंड ग्रॅनाइट शिळेतून घडवण्यात आली आहे.

विशेषतः होयसळ आणि विजयनगर स्थापत्यामध्ये उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह ही रूपे प्रामुख्याने दिसून येतात.

१. उग्र नरसिंह 
उग्र नरसिंह हे विष्णूच्या क्रोध आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या रूपात नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना दाखवला जातो. सिंहमुख, मोठे गोल डोळे, बाहेर आलेले दात, फुगलेल्या आयाळीचे केस आणि अनेक हातांत शस्त्रे अशी त्याची वैशिष्ट्ये असतात.
बहुतेक मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, द्वारशाखांवर किंवा मंडपातील शिल्पपट्टिकांमध्ये हे रूप कोरलेले आढळते. यामागील संकल्पना अशी की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांचे आणि देवालयाचे संरक्षण करणारा उग्र देव बाह्य भागात असावा.

२. योग नरसिंह
योग नरसिंह हे पूर्णतः वेगळे आणि शांत स्वरूप आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर क्रोध शांत होऊन नरसिंह योगध्यानात स्थिरावला आहे, अशी या रूपामागील कल्पना आहे.या मूर्तीमध्ये पद्मासन किंवा योगासन,गुडघ्यांभोवती योगपट्टा,ध्यानस्थ मुद्रा,प्रसन्न किंवा गंभीर मुखमुद्रा अशी वैशिष्ट्ये दिसतात.
होयसळ स्थापत्यातील अनेक नरसिंह मंदिरांच्या गर्भगृहात योग नरसिंहाची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. भक्तांना भय नव्हे तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देणे हा यामागील उद्देश असावा.

३. लक्ष्मी नरसिंह
हे नरसिंहाचे सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तिपर स्वरूप आहे. या रूपात लक्ष्मी देवी नरसिंहाच्या मांडीवर किंवा शेजारी बसलेली असते.लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे उग्रतेचे रूपांतर करुणा आणि संरक्षणात होते. त्यामुळे ही प्रतिमा शक्ती आणि सौम्यता यांचा सुंदर समन्वय दर्शवते.

हंपीतील नरसिंह कोणत्या प्रकारचा?

लक्ष्मी नरसिंह ह्या हंपीतल्या मूर्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ती 'उग्र नरसिंह' म्हणून प्रसिद्ध असली तरी ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी पारंपरिक उग्र नरसिंह प्रतिमा नाही. त्या मूर्तीमध्ये राक्षस नाही, युद्धदृश्य नाही आणि वधप्रसंगही दाखवलेला नाही.

मूळतः ती लक्ष्मी नरसिंह प्रतिमा होती. नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती. कालांतराने ताळिकोटच्या युद्धानंतर झालेल्या विध्वंसात लक्ष्मीचा बहुतांश भाग तुटून गेला.यामुळे मूर्तीचे मूळ सौम्य रूप हरवले आणि आज ती अधिक उग्र वाटते.  लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाल्यामुळे आज केवळ विशाल सिंहमुखी नरसिंह दिसतो आणि त्याच्या तीव्र मुखमुद्रेमुळे त्याला "उग्र नरसिंह" म्हणण्याची प्रथा पडली.म्हणून शिल्पशास्त्रीय दृष्टीने हंपीची मूर्ती लक्ष्मी नरसिंह आहे, तर लोकप्रिय पर्यटनपर भाषेत ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. हा फरक समजून घेणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.
यात अजून एक भर पडली ती ही मूर्ती योग नरसिंहही  आता भासते.हंपीतील लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा योग पट्टा हा मूर्तीच्या सर्वात चर्चित आणि लक्षात येणारा भाग आहे.योग पट्टा हा योगासनातील स्थिरतेसाठी वापरला जाणारा पट्टा आहे. तो गुडघ्याभोवती किंवा पायांना बांधला जातो, जेणेकरून दीर्घकाळ ध्यान/योग मुद्रेत बसता येते.ही मूर्ती क्रॉस-लेग्ड (पद्मासनासारखी) योग मुद्रा मध्ये आहे. पाय ओलांडलेले, हात गुडघ्यांवर आणि गुडघे एकत्र धरलेले दिसतात.१९८० च्या दशकात ASI ने जीर्णोद्धार केला.नवीन गुडघे आणि दगडी योग पट्टा जोडला गेला. हा पट्टा गुडघ्यांना एकत्र बांधतो.
यामुळे मूर्ती आता योग नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखली जाते. काहीजण या जीर्णोद्धाराला वादग्रस्त मानतात, कारण मूळ उग्र रूप बदलले गेले.


परंतु या एकाच मूर्तीने तिन्ही उग्र,योग,लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणे खरंच खूप अद्भुत योगायोगच म्हणावे लागेल :)
नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार जो मानवी शरीर + सिंहमुख दर्शवतो.जिथे मानव = बुद्धी ,सिंह = शक्ती म्हणजेच शक्ती आणि विवेक यांचा समतोल सृष्टीत दाखवतात .मूर्ती पाहताक्षणी सर्वांत प्रथम लक्षात येतात बाहेर आलेले  डोळे आणि उग्र चेहरा. सिंहाचे केस, तीक्ष्ण दात आणि भयावह अभिव्यक्तीमुळे तिला उग्र नरसिंह म्हणून ओळखले जाते. पण त्याच वेळी ती योगासनात बसलेली आहे. गुडघ्याभोवती योग पट्टा (बांधलेला, जो दीर्घकाळ ध्यानस्थ राहण्यासाठी वापरला जातो.
मूर्ती अदिशेषनागाच्या तीन वळणांवर बसलेली आहे. शेषनागाचे सात फणे  डोक्यावर उभे राहून एक दिव्य छत्र तयार करतात.भारतीय तत्त्वज्ञानात शेष म्हणजे अनंत काळ,विश्वाचे आधारतत्त्व,ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून ही मूर्ती केवळ देवप्रतिमा नसून "विश्वरक्षक" संकल्पना दर्शवते .मूळतः नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीदेवी बसलेल्या होत्या आता केवळ तिचा एक हात कंबरेभोवती दिसतो. हात, अलंकार आणि लक्ष्मीची पूर्ण आकृती १५६५ च्या तालीकोटा युद्धानंतरच्या आक्रमणात नष्ट झाली, तरीही ही मूर्ती आजही उभी आहे जणू इतिहासाला आव्हान देत!
जर तुम्हाला आवारात आत जाण्याची संधी मिळाली (मला मिळाली नाही,मूर्ती सामान्यांसाठी कारणपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे ), तर तुम्हाला देवीचा हात विष्णूच्या पाठीवर आलिंगन अवस्थेत विसावलेला दिसतो,असे सांगितले जाते .

बदवीलिंग 


नरसिंहापासून काही पावलांवरच शेजारीच बदवीलिंग आहे.हे हंपीतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे-सुमारे ३ मीटर (९-१० फूट) उंच!!
एकाच दगडातून कोरलेले ह्या लिंगावर तीन डोळ्यांची नक्षी स्पष्ट दिसते.मंदिराचे गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.ह्या शिवलिंगाचा पाया २ ते ३ फूट 
सतत पाण्यात  राहते. तुंगभद्रा नदीतून एक छोटी कॅनॉल ने पाणी मंदिरात आणले जाते, ज्यामुळे वर्षभर पाणी आटत नाही. गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.पूजा करणारे भक्त किंवा पुजारी पाण्यात चालत लिंगाजवळ जातात.

"बदवी" किंवा "बडाव" म्हणजे कन्नड भाषेत गरिब किंवा दरिद्री असा होतो.
कथेनुसार, हे लिंग एक गरिब शेतकरी स्त्री  ने आपल्या भक्तिभावाने बनवले किंवा बनवण्यास प्रेरणा/अर्थ साहाय्य दिले. तिच्या साध्या-सोप्या श्रद्धेमुळे हे नाव पडले. ही कथा हंपीच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

नरसिंह आणि बदवीलिंग शेजारीच का?हा प्रश्न अनेक संशोधकांना पडतो.वैष्णव आणि शैव परंपरा अनेकदा वेगळ्या मानल्या जातात.परंतु विजयनगरमध्ये दोन्ही परंपरांना समान महत्त्व होते.त्यामुळे नरसिंह  'विष्णू' आणि बदवीलिंग 'शिव' या दोन प्रतिमा एकत्र उभ्या राहून धार्मिक समन्वय दर्शवतात.

पुढच्या ठिकाणाकडे आता चालू लागलो -प्रसन्न विरुपाक्ष मंदिराकडे ...रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळीच्या बागा होत्या ,त्यामुळे चालायला मजा येत होती .पण नंतर लक्षात आले कि मंदिराकडचे अंतर खूप आहे ,तेव्हा रिक्षा करून तिकडे गेलो.

 

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात रहस्यमय आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. याला सामान्यतः भूमिगत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर विजयनगर काळात बांधले गेले असून, जमिनीच्या पातळीपेक्षा काही मीटर खाली स्थित आहे. मंदिराकडे जाताना अनेक पायऱ्या उतरत खाली जावे लागते .मग चारी बाजुंना चिरेबंदी दगडांसारखे दगड वापरून भिंती बांधल्या आहेत .यामुळे हे ठिकाण अजूनच गूढ वाटते.

आजच्या जमिनीच्या पातळीवरून पाहिले तर मंदिराचे छप्पर जवळजवळ जमिनीच्या समांतर दिसते, परंतु मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह खालच्या स्तरावर आहेत. यामुळे संपूर्ण मंदिर जमिनीत दडलेले असल्याचा भास होतो, म्हणूनच त्याला भूमिगत मंदिर म्हणतात.
या मंदिराचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाणी. गर्भगृह आणि आतील भाग वर्षभर पाण्याने वेढलेले असतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखी वाढते. काही संशोधकांच्या मते हे पाणी तुंगभद्रा नदीशी जोडलेल्या जलमार्गांमुळे येत असावे, मात्र याचे नेमके कारण आजही निश्चितपणे ज्ञात नाही. पाण्यात बुडालेले असलेले शिवलिंगाचे दर्शन येथे खास अनुभवास येते.
हे मंदिर विजयनगर स्थापत्यशैलीचे असले तरी हंपीतील इतर भव्य मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे साधे दगडी स्तंभ, अलंकरणाचा कमीतकमी वापर, प्रशस्त महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधी आणि प्रभावी रचना दिसते. हजारराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम येथे आढळत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी वापरले जात असावे.
या मंदिराबाबत एक रोचक बाब म्हणजे ते जवळजवळ चारशे वर्षे माती आणि गाळाखाली पूर्णपणे झाकले गेले होते. १९८० च्या दशकात उत्खनन आणि संवर्धनाच्या कामांदरम्यान ते पुन्हा प्रकाशात आले.
प्रसन्न विरुपाक्ष नावाचे विशेष महत्त्व आहे. हंपीतील मुख्य विरुपाक्ष मंदिर हे भव्य सार्वजनिक तीर्थक्षेत्र आहे, तर हे भूमिगत मंदिर शिवाच्या प्रसन्न, शांत आणि कृपाळू स्वरूपाला समर्पित मानले जाते.
आता आम्ही पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराकडे निघालो ....

-भक्ती

 


वाचने 409
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

किती बारकाईनं बघितल्यावर कळते. आपले लेख वाचून  वाटते  एक संपुर्ण आयुष्य जरी हम्पी मधे घालवले तरी सर्व एक्सप्लोअर करता येणार नाही.

 

उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील शिल्पकला अबाधित  राहिली आहे.

सुंदर लेख. 


हा भागही मस्त. ही सर्व मंदिरे पाहून झाल्याने अजून रिलेट होता येत आहे.  

हंपी खरंतर इतकं प्रचंड आहे की येथील मंदिरे कित्येकदा पाहिली तरी काहीतरी निसटून जात असतं, पुढच्या फेरीत ते गवसतं आणि असं दरवेळीच होत असतं. इथला लक्ष्मी नृसिंह फार आवडता. फोटोत त्याची भव्यता येत नाही. प्रत्यक्ष बघायला हा अतिशय नेत्रदीपक आहे. हंपीतला हा  लक्ष्मीनृसिंह, रामटेकचा मांडीवर हात टेकवून असलेला क्लासिक केवल नृसिंह आणि वेरूळच्या दशावतात लेणीमधला स्थौण नृसिंह ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या नृसिंहमूर्ती.


   

 

 'केवल नरसिंह एकदमच 'राजसी 'आहे 🙏

कर्नलकाका, कंकाका खरंय हंपी एक अद्भुत ठिकाण आहे. तिथे खुप काळ रमता येईल.

प्रचेतस, होय रामटेकचा वाकाटकांचा 'केवल नरसिंह एकदमच 'राजसी 'आहे 🙏

आधी याला वर्षानुवर्षे शेंदूर फासल्यामुळे चक्क हनुमान म्हणून पुजला गेला. नंतर संशोधकांनी शेंदूर दूर करत ते अनुपम 'केवल नरसिंह'रूप जगासमोर आणले.


नुकतेच या केवल(आनंदी) नरसिंहाचे बदामीला रुप पाहुन अहाहा!!उद्गार निघाले😇
‘केवल नरसिंह’ ही संज्ञा विष्णूच्या सिंह-मानव अवताराच्या स्वतंत्र, एकाकी आणि शांत स्वरूपाला सूचित करते, ज्यात लक्ष्मी किंवा सक्रिय युद्धाचे घटक दर्शवले जात नाहीत. अनेक अभिजात ग्रंथ केवल -एकांत स्वरूपाला बसलेल्या, ध्यानस्थ मुद्रेशी गिरीष/गिरीजा किंवा योग नरसिंह जोडतात, परंतु बदामी लेणी ३ मधील शिलात उभ्या केवल नरसिंहाचे एक दुर्मिळ, प्रारंभिक स्वरूप सादर झाले आहे.
नेहमीच्या स्थूल /स्थौण नरसिंहाच्या जो हिरण्यकशिपूला सक्रियपणे फाडून टाकतो विपरीत, हा नरसिंह शांतपणे त्रिभंग स्थितीत उभा असून एक हात सहजपणे गदेवर ठेवतो. त्याच्या अत्यंत शांत, जवळजवळ हसऱ्या चेहऱ्यामुळे हे राक्षसाच्या वधानंतरचे क्षण दर्शवते, जिथे दैवी शक्ती शांत झाली आहे आणि तो सर्वोच्च स्वामी म्हणून एकटा उभा आहे "केवलाचे सार"!!
चार हातांचा नरसिंह पाय पसरून उभा आहे. त्याचे मस्तक कमळाने सुशोभित आहे, जे सर्व प्रारंभिक नरसिंह मूर्तींमध्ये आढळते.
त्याने यज्ञोपवीत, मकर किंवा मालाकार, कौपीनासारखे अधोवस्त्र आणि हार इत्यादी अलंकार धारण केले आहेत.
उजवा खालचा हात उजव्या स्तनाजवळ धरला असून त्यात अस्पष्ट वस्तू आहे. वर दोन जोड्या गंधर्व-युग्म उडताना दाखवले आहेत.
देवाच्या उजवीकडे खाली असुर प्रह्लादाची बटु आकृती आहे.डावीकडे मानवी रूपात (पंखांसह) गरुड उभा आहे.
हातांतील आयुधे: एका हातात अस्पष्ट वस्तू, चक्र (व्यक्तीरूप), शंख (व्यक्तीरूप) आणि गदा.
अशा प्रतिमेबाबत कोणत्याही प्रतिमाशास्त्रीय ग्रंथात विधान आढळत नाही, तरीही ही मूर्ती देवाची ती अवस्था दर्शवते जिथे त्याने आपले कार्य हिरण्यकशिपूचा वध पूर्ण केल्यानंतर शांत झाला आहे, आणि प्रह्लाद ज्यामुळे अवतार आवश्यक झाला उपस्थित आहे. हातांत व्यक्तीरूप आयुधे धारण करणे विशेष उल्लेखनीय आहे, कारण ते प्रारंभिक चालुक्य शिल्पकलेत अत्यंत दुर्मिळ आहे.
सुरुवातीच्या बदामी चालुक्यांनी या प्रतिमाशास्त्राचा धोरणात्मक वापर करून शांतताप्रिय पण विलक्षण शक्तिशाली एकाकी नरसिंहाच्या चित्रणातून दख्खन प्रदेशावरील आपले स्वतंत्र, अनियंत्रित सार्वभौमत्व (केवल सत्ता) दृष्यरूपात प्रतिबिंबित केले.कर्नाटकात या प्रकारच्या नरसिंहाची फक्त दोन उदाहरणे आढळतात.दुसरे ऐहोळ येथील दुर्गा मंदिरात आहे.
संदर्भ- प्रख्यात कला इतिहासकार डॉ.श्रीनिवास व्ही.पेडिगार-
The Cult of Vishnu in Karnataka from Earliest Times to 1336 a D Based on a Study of Inscriptions and Sculpture