आपल्या देशात अनेक आदिवायी आणि त्यांनी जोपासलेल्या कला आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाशी जोडलेली घट्ट नाळ दिसून येते. त्याचबरोबरीने त्यांच्या समूहाचा एकत्रित अनुभव, आठवणी यांचं चित्रण असते.
मी काढलेले हे चित्र असेच एक उदाहरण आहे. एक आर्ट वर्कशॉप अशी सुरु झालेली सामूहिक क्रिया, मैत्रीण, घरची मंडळी अशा सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची ही एक गोष्ट आहे.
=======================
घरी जमा केलेला चित्रकलेचा जामानिमा वापरला जावा म्हणून मनात गेले कित्येक दिवस विचार घोळत होता. एखादा क्लास लावावा की युट्युबवर व्हिडिओ बघून काही करावे का? असं करता करता कृती काहीच होत नव्हती.
योगायोगाने माझ्या मुलीच्या चित्रकलेच्या टीचरने आर्ट kitty सुरू केली. दर महिन्याला एक अशी वेगवेगळी आर्ट वर्कशॉप्स असं त्याचं स्वरूप. मागच्या महिन्यात गोंड आर्टचे वर्कशॉप होते.
चित्रकलेचं काही तरी करणार म्हटलं की माझ्या मैत्रिणीशी जी स्वतः उत्तम कलाकार आहे तिच्याशी बोलून चर्चा करणे आलेच. तिला ह्या वर्कशॉपबद्दल सांगितल्यावर, तिने मला त्याची जुजबी कल्पना दिली. तसेच त्यांची चित्रं कशी असतात ह्याची कल्पना यावी म्हणून काही चित्रं पाठवली. तसंच त्या चित्रांमध्ये भरण्यासाठी काही नाजूक पॅटर्न असतात त्यांची प्रॅक्टिस करून जायला सांगितले. प्रॅक्टिस वगैरे करणं काही जमलं नाही पण निदान काय प्रकार आहे हे डोळ्याखालून घातले गेले.
वर्कशॉपच्या ऐनदिवशी बरं नाही असं वाटून जाऊ नये असं वाटायला लागलं. कोमल मॅमना फोनही केला की कदाचित मी येणार नाही. पण नवऱ्याने खूपच आग्रह केला की तू जा. जाऊन आलं की तुला बरं वाटतं. आणि आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त वेगळं असं काही केलंच पाहिजे ह्याबाबत तो आग्रही होता.
शेवटी हो-नाही करत वर्कशॉपला जाऊन पोचले. (हे वाचून असं वाटावं की घरापासून खूप कुठे तरी लांब गेले. पण प्रत्यक्षात घरापासून जेमेतेम १०० मीटर अंतरावर चालत जायचे होते.)
आमच्या टीचरने गोंड आर्ट ह्या कलेची थोडक्यात माहिती दिली. आणि आमच्या समोरचे कॅनवास आणि रेफरन्स चित्रं घ्यायला सांगितले. पण ह्यावेळी मी वर्गातल्या गुणी विद्यार्थिनीसारखी थोडा आधीच गृहपाठ करून गेले होते. त्यामुळे मैत्रिणीने पाठवलेल्या चित्रांपैकी एक चित्र काढायचे ठरवले.
पण आता गंमत अशी होती की कॅनव्हासवर पेंसिलने आधी चित्र काढायचे होते आणि मग रंगवायचे होते. आता आली का पंचाईत! कारण मी निवडलेल्या चित्रात दोन हरणं आणि एक झाड होते. आणि हे सगळे मोबाईलमध्ये चित्र बघून कॅनव्हासच्या मापाने काढायचे होते. आधी थोडं सध्या कागदावर काढून पाहिलं आणि मग कॅनव्हासवर चित्र काढायला सुरु केलं. एक हरीण आणि झाड काढून झाल्यावर आपलं चित्र वेळेत रंगवून पूर्ण होणार नाही ह्या भीतीने दुसरं हरीण काढायचा विचार cancel केला. पण मॅम म्हणाल्या की त्याशिवाय चित्र पूर्ण झाल्यासारखे वाटणार नाही. मग वर्गात विद्यार्थ्यांच्या वहीत कसं शिक्षक गणित पूर्ण करून देतात तसं मॅमने दुसरं हरीण काढून दिलं.
चित्र पूर्ण झाल्यावर रंगवणे सुरू झाले. आधी अशीच २ वर्कशॉप्स केली होती म्हणून रंगवायची इतकी भीती वाटत नव्हती. त्यात गोंड चित्रकलेत शेडींग नसते. बहुधा गोंड आदिवासी नैसर्गिक रंग वापरत असल्याने तसे असेल. रंग एकदम फ्लॅट द्यायचे होते. ते काम त्यामानाने सोपे होते. जे मोठे आकार होते ते व्यवस्थित रंगवून झाले.
गोंड चित्रकलेचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रातील सर्व आकार वेगवेगळ्या पॅटर्नने भरायचे असतात. त्यातल्या त्यात आपण पळवाट काढून पर्मनंट मार्कर वापरून ते काम करू शकतो. पण आमच्या प्रेमळ असल्या तरी शिक्षणाबाबत कडक असलेल्या शिक्षिका, आम्हाला एवढ्या सहजासहजी सोडणाऱ्या नसल्याने ब्रश आणि acrylic रंग वापरून ते नाजूक काम करायला सांगितले.
चित्र जर अपूर्ण राहिले तर घरी जाऊन अजिबात पूर्ण करणार नाही ह्याची स्वतःबद्दल जबरदस्त खात्री असल्याने, चित्र तिथेच पूर्ण करायचे ठरवले. बाकी बरेचसे चित्र रंगवून पूर्ण झाले. पण एका हरणाच्या अंगावर पॅटर्न रंगवताना घाईघाईत अत्यंत बेढब असा काही तरी प्रकार रंगवला गेला. ठरवल्याप्रमाणे झाडावर थोडे पॅटर्न रंगवायचे राहिले होते. पण मग वर्कशॉपची वेळ संपून अजून थोडा वेळ बसले तरी ते पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे घरी येऊन पूर्ण करायचे ठरवले.
घरी येऊन माझ्या मुलीचे acrylic रंग शोधून काढले. तिच्या ब्रशमध्ये बारीक ब्रश काही दिसला नाही. मग माझे वॉटर कलरचे ब्रश शोधून काढले. आणि झाडावरचा मला वाटला तेवढा पॅटर्न पूर्ण केला.
आणि मग माझ्या चित्रनाट्याचा दुसरा अंक सुरु झाला.
त्याच दिवशी रात्री मैत्रिणीला फोन केला आणि चित्र दाखवले. तिच्या कौतुकाची पावती मिळाल्याशिवाय मला चैन पडत नाही. सुरुवातीला तिने अर्थातच मी प्रयत्नपूर्वक काढलेल्या चित्राचे कौतुक केले. आणि त्यानंतर माझे चित्र परिपूर्ण व्हावे म्हणून तिने काही सूचना केल्या. ज्या हरणावरचा पॅटर्न चुकला होता, ते हरीण पुन्हा रंगवणे ही त्यातली एक सूचना. तसेच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तिने माझ्या लक्षात आणून दिला की गोंड चित्रकलेत रंगवलेल्या सगळ्या आकारांत पॅटर्न रंगवले पाहिजेत. हे त्या चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे.
माझं हे पहिलंच चित्र आहे तर आता त्यात राहू दे. कुठे जास्त काम करत बसू असा विचार करून टाळायचा प्रयत्न करत होते. पण तिचा आग्रह होता की तू करू शकतेस तर ते व्यवस्थित पूर्ण करायचा प्रयत्न कर.
Acrylic रंग एकावर एक देता येत असले तरी हरणाचा आधीचा रंग पूर्ण झाकला जाईल आणि जी आधीची रंगसंगती आहे त्यात चालेल असा रंग वापरावा लागणार होता. अर्थात कुठला रंग वापरावा हे मैत्रिणीनेच सांगितले.
दुसरे हरीण पूर्ण रंगवून झाल्यावर अर्थातच तिने माझ्या लक्षात आणून दिले की जे रेफ्रन्सचे चित्र आहेत त्यात झाडावर लाल रंग वापरून पॅटर्न केला आहे. एवढ्या मोठ्या झाडावर काम करायचं म्हणजे खूप अवघड काम वाटत होते. पण तिने दिलेल्या प्रोत्साहनाने तेही काम पूर्ण झाले.
पण मग झाडावर जास्त पानंच नव्हती. मैत्रिणीने मला विचारलं की हरणं त्या झाडापाशी पानं असल्याशिवाय कशी येतील? इब्लिस विद्यार्थ्याने शिक्षकाला उत्तर द्यावं तसं हरणांनी पानं खाऊन संपवली असं सांगावं वाटलं. पण मी साधी, सरळ विद्यार्थिनी असल्याने असं उत्तर न देता. झाडावर फांद्या, पानं, फुलं असं सगळं काढलं. सुरुवातीला भुंडं असलेलं माझं झाड बहरुन गेलं.
एवढं झाल्यावर पुन्हा चित्र पाहिल्यावर माझी हरणं हवेत तरंगत आहेत असं जाणवलं. पुन्हा एकदा मैत्रीण मदतीला धावून आली. त्यांच्या पायाशी गवत काढावं असं तिने सुचवलं. मग गवत काढलं, ते रंगवलं. ते रंगवतानादेखील तिनेच जरा फिकट हिरवा रंग द्यावा हे सुचवलं.
गवतही झालं. पण मग तिच्या दृष्टीने सही केल्याशिवाय चित्र पूर्ण नाही. त्यामुळे सही कुठे आणि कशी करायची हे ठरलं. सही केली आणि चित्र पूर्ण झालं.
ड्रॉइंगच्या मॅमने वर्कशॉप आयोजित करून एक भक्कम सुरुवात करून दिली. आणि मैत्रिणीने प्रोत्साहन, मार्गदर्शन करत चित्र पूर्णत्वाला देण्याची प्रेरणा दिली. अशी प्रेमळ, मार्गदर्शक मंडळी अवतीभवती असतील तर स्वतःबद्दलची शंका, आळस सगळं बाजूला ठेवून काही तरी चांगलं काम हातून पूर्ण होतं.
इति लेखनसीमा!
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा...
अरे व्वा...
सुंदरच!चित्र काढ्ल्यावर…
सुंदरच!
चित्र काढ्ल्यावर त्याचे रसग्रहण ,कल्पना सांगणे खुप महत्त्वाचे असते.तुम्हि खुपच बारकाईने चित्राची माहिती दिलीये👍️
जरा दुरुस्त करून टाकलय. …
जरा दुरुस्त करून टाकलय. (पर्स्पेक्टिव्ह) मला वाटतंय तुम्हाला चालावे.

कसलं सुंदर आहे !
नैसर्गिक टोन्स पूर्ण उचलल्या आहे तुमच्या कुंचल्याने ! गोंड चित्रकलेवर अजून काम व्हायला पाहिजे म्हणजे वारली चित्रकलेवर जितके झाले आहे तितके तरी, कारण वारली चित्रकला जितकी (शहरी भागांत पण) सर्वश्रुत आहे तितकी गोंड कला दिसत नाही. गोंड समाज, गोंडी भाषा (हिला लिपी नसते, हल्लीच देवनागरी लिपी बेसला वापरून हिचे एक पुस्तक काढलेले बघण्यात आले होते) किंवा गोंडी जेवण हा पूर्ण भाग एका प्रकल्पासाठी नागविदर्भात फिरताना जवळून बघता आला सहसा हेमलकसा अन् लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढचे हे जीवन जास्त लोक पाहू शकत नाहीत.
अरे वा!!
चित्र आवडलेच पण त्यामागची प्रक्रिया सुद्धा सांगितली ते बरे झाले. आता थांबु नका. एकामागोमाग एक कॅन्व्हास भरत रहा म्हणजे हाताला वळण राहील.
असेच काही वर्षांपूर्वी वारली चित्रकलेच्या किड्यामुळे घरातील भिंतीवर काम करुन हा लेख टाकला होता
वारली चित्रकला | मिसळपाव
https://www.misalpav.com/fineart/28138
वरील लेखनात ज्या मैत्रिणीचा…
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
वरील लेखनात ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला आहे ती आता मुख्यत्वे वारली चित्रकलेचे काम करते. तिच्या नावावर 58 x 30 फूट भिंतीवर वारली चित्रकलेचे record आहे.
त्यामुळे वारली चित्रकलेबद्दल एक वेगळी आत्मियता आहे.
चित्र आवडलं.गोंड आदीवासी अशी…
चित्र आवडलं.
गोंड आदीवासी अशी चित्रं कुठे काढतात? म्हणजे भिंतीवर, साड्यांवर किंवा जमिनीवर रांगोळी? वारली चित्रकला घरांच्या मातीने सारवलेल्या भिंतींवर असते. दोघांमध्ये आजुबाजूचा निसर्ग असतो.
पण बाकी बराच वेगळेपणा असतो.
खूप सुंदर झालं आहे. आपणही…
खूप सुंदर झालं आहे. आपणही हाती ब्रश घेण्याची इच्छा व्हावी इतकं सुंदर!
अवांतर : आवडनावड संभ्रम
अवांतर :
मनस्विता,
मला चित्रकलेतलं अक्षरश: काहीही समजंत नाही. सदर चित्रं मला आवडलं की नावडलं की आजून काही ते ही कळंत नाही. ज्या दोन गोष्टी जाणवल्या त्या लिहितो.
१. गवत नाहीसं कल्पून चित्रं पाहण्याचा प्रयत्न केला. पण हरणं हवेत तरंगेनात.
२. लाल हरणाची मान निळ्या हरणाच्या मानेपेक्षा बरीच लांब दिसते आहे. निळं हरीण पिल्लू आहे का? की एक हरीण तुम्ही आणि दुसरं बाईंनी काढलं म्हणून असं झालंय? उत्सुकता आहे.
आ.न.,
-गा.पै.
१ . मी पण कल्पून पाहिले,…
In reply to अवांतर : आवडनावड संभ्रम by गामा पैलवान
१ . मी पण कल्पून पाहिले, नारिंगी हरीण तरंगतेय, निळे तसे वाटत नाही, मग विचार केला फोटो खालच्या बाजूने कापला गेला असेल.
छान आहे चित्र!
छान आहे चित्र!
चित्र व लेखन दोन्ही आवडले…
चित्र व लेखन दोन्ही आवडले.
अजून येऊ द्या.
- (न-चित्रकार) कांदा लिंबू
चित्र आवडलंच
पण त्याच्या मागची निर्मितीप्रक्रीया ही वाचनीय आहे...
सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे.
@जयंत कुलकर्णी तुम्ही crop केलेले चित्र छान दिसत आहे. धन्यवाद. फोटो माझ्या मुलीला काढायला सांगितला होता. तिच्या दृष्टीने तो perspective चांगला होता. आदिवासी चित्रकलेसाठी rustic background.
@Bhakti, @राजेंद्र मेहेंदळे, @श्वेता व्यास, @कांदा लिंबू,
चित्राला सुरूवात करून पूर्णत्वाला नेणे हे माझ्यासाठी खरंच मोठे काम होते.
आणि मिसळपाव सारखा मोकळेपणाने व्यक्त होऊ देणारा मंच असल्याने माझा सगळा प्रवास सविस्तर मांडू शकले.
@वृषभ खोंडे तुम्ही गोंड आदिवासींचे जीवन जवळून पाहिले असल्याने, तुमच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप खासच आहे.
@कंजूस ही चित्र सहसा भिंती आणि जमिनीवर काढली जातात असं अर्थातच गूगलने सांगितले. जे सयुक्तिक वाटते.
@राजेंद्र मेहेंदळे तुमचे फारच कौतुक. कारण भिंतीवर चित्र काढणे तसे सोपे नाही. अचानक मनात येऊन ती कृती प्रत्यक्षात उतरवणे हे सोपे नाही.
@गामा पैलवान original reference मध्ये झाडाच्या बुंध्याचा पायथा आणि हरणाचे पाय एका लेवलवर होते. पण झाडाचा निळा रंग देताना तो ब्रशचा stroke खालपर्यंत आला. आणि हरीण झाडासमोर असल्याने त्याचे पाय वर असणे justify होत नव्हते.
दुसरे हरीण reference मध्ये पण लहान आहे. पिल्लूच आहे.
@श्रीगुरुजी आपलेही आभार.
चित्र दिसत नाही
चित्र दिसत नाही