Skip to main content

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ - भाग १

लेखक एक_वात्रट यांनी गुरुवार, 06/08/2026 23:20 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. किंबहुना अगदी कालपरवापर्यंत, भारत म्हणजे आग्र्याचा ताजमहाल आणि वाराणसीतले गंगेचे घाट हे समीकरण परदेशी लोकांच्या मनात अगदी पक्के होते. संपूर्ण भारतात अनेक सहली झाल्या असल्या तरी आम्ही अजून उत्तर प्रदेश पाहिला नव्हता. नाही म्हणायला मी उत्तराखंडमध्ये 'फुलों की घाटी' अर्थात 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहायला गेलो असताना येताना आग्र्यात थांबलो होतो आणि ताजमहाल, फतेपुर सिक्री आणि आग्र्यातील इतर सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली होती. (ह्या सहलीतली अजून एक गंमत म्हणजे, पुण्याहून हरिद्वारला जाताना दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थानकावर उतरून, बॅगा अमानती सामानघरात [Cloak room] जमा करून स्थानकाजवळच असलेला 'हुमायुं का मकबरा' पाहायला गेलो होतो आणि तो बघून झाल्यावर तीन तासांनी परत हरिद्वारला जाणाऱ्या रेल्वेत चढलो होतो.) तसंच ओरछा आणि खजुराहो ही मध्य प्रदेशातील सहल केली, तेव्हा उत्तर प्रदेशातलं झांसीदेखील पाहून झालं होतं. पण उत्तर प्रदेश खऱ्या अर्थानं अनुभवायचा असेल तर लखनौ, प्रयागराज, वाराणसी या शहरांना भेट देण्याशिवाय पर्याय नाही!

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीतल्या घाटांवर हजारो दिवे लावले जातात आणि ते दृश्य मोठे विलोभनीय असते असे बऱ्याच ठिकाणी वाचले व अनेकांकडून ऐकले असल्याने वाराणसीत जायचे ते ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त पकडूनच हे मनात पक्के ठरवून टाकले होते. तेव्हा २०२४ साली नोव्हेंबरमध्ये, दिवाळी झाल्यावर, उत्तर प्रदेशला भेट देण्याचे ठरले. मूळ नियोजन वाराणसी, मग प्रयागराज (अलाहाबाद) आणि शेवटी लखनौ असे होते. मात्र यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा येत होती शुक्रवारी, तेव्हा ठिकाणांचा क्रम पहिल्यांदा लखनौ, नंतर प्रयागराज आणि शेवटी वाराणसी असा बदलण्यात आला.

शेवटी बेत असा ठरला:

शुक्रवार: पुण्याहून मुंबईकडे प्रयाण, मुंबई सेंट्रल येथे चुलत बहिणीकडे मुक्काम. 
शनिवार: मुंबई ते लखनौ रेल्वेने. 
रविवार: लखनौतील स्थानिक स्थलदर्शन 
सोमवार: लखनौतील राहिलेले स्थलदर्शन 
मंगळवार: लखनौ ते प्रयागराज रेल्वेने, प्रयागराज स्थलदर्शन 
बुधवार: प्रयागराज स्थलदर्शन 
गुरुवार: प्रयागराज ते वाराणसी रेल्वेने, वाराणसी स्थानिक स्थलदर्शन 
शुक्रवार: वाराणसी स्थलदर्शन, घाटांवर पणत्यांची आरास पाहणे
शनिवार: सारनाथ स्थलदर्शन, संध्याकाळी वाराणसीहून कल्याणला रेल्वेने 
रविवार: कल्याणला पोहोचणे, तिथून रेल्वे पकडून सोमवारी पहाटे पुण्याला पोहोचणे


या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे या सहलीत राहण्याची व्यवस्था मी नेहमीप्रमाणे हॉटेलांमध्ये न करता लोकांच्या घरात (Homestays) केली होती. एअरबीएनबी या संकेतस्थळावर लोक आपल्या घरातील एक खोली किंवा संपूर्ण घरच राहण्यासाठी उपलब्ध करून देतात. या घरांची परीक्षणं (रिव्ह्यूज) पाहून आपण हे घर आरक्षित करायचे. ह्या घरात आपल्याला आपण झोपतो त्या खोल्यांव्यतिरिक्त, हॉल, स्वयंपाकघर अशी बरीच मोकळी जागा वापरायला मिळते, स्वयंपाक घर असल्यामुळे मॅगीसारखा एखादा पदार्थ, चहा बनवायची सोय होते आणि घरमालक स्थानिक नागरिक असल्यामुळे अनेक चांगले सल्ले व माहिती मिळते. घर मालकांनाही या पद्धतीने मासिक भाड्यापेक्षा बरेच जास्त पैसे मिळत असल्यामुळे त्यांचाही आर्थिक फायदा होतो. प्रयागराजचा एक अपवाद वगळता इतर दोन ठिकाणी आम्हाला या घरांचा अतिशय चांगला अनुभव आला. 

दिवस पहिला: आठ नोव्हेंबर 

आमची प्रगती एक्सप्रेस वेळेवर निघाली आणि चक्क वेळेच्या पंधरा मिनिटे आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. घरापासून फक्त १८० किलोमीटर दूर असूनही हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ मी अजून पाहिले नव्हते. बहिणीच्या घरी जायचे असल्याने आज मी ते थोडे घाईघाईतच पाहिले आणि मी भेट दिलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आणखी एका ठिकाणाची नोंद झाली. 

दुपार चुलत बहिणीच्या अतिशय गोड पिल्लासोबत खेळण्यात गेली. संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो आणि गेलो मरीन ड्राईव्हवर. मुंबईला भारताचा मुकुट म्हटले तर ह्या जागेला त्या मुकुटाच्या मध्यभागी बसवलेला लखलखता हिरा म्हणायला हवे. डोळे मिटा आणि मुंबई डोळ्यासमोर आणा, मला खात्री आहे मरीन ड्राईव्हचेच चित्र तुमच्या डोळ्यासमोर उमटेल. 




समुद्रावरून येणारा खारा वारा खात आम्ही इथे बराच वेळ बसलो आणि नंतर जवळचेच प्रसिद्ध 'के रुस्तुम' आईस्क्रीम खायला गेलो. दुकान बरेच लोकप्रिय असावे, कारण गर्दी चिक्कार दिसत होती. आईस्क्रीम सँडविच ही इथली खासियत आहे. चव ठीकठाकच होती, इतकी गर्दी होण्याइतकी खास नक्कीच नव्हती. ह्यापेक्षा अमुलचे आईस्क्रीम सँडविच कैक पटीने चांगले असते! [नुकतीच बातमी आली की ह्या दुकानाचा परवाना महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला.] 

दिवस दुसरा: नऊ नोव्हेंबर 

आज सकाळी आठ पंचवीसची रेल्वे पकडायची असल्यामुळे घरातून आम्ही थोडे लवकरच निघालो. पण रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्यामुळे तब्बल पाऊण तास आधी छ. शि. म. ट. ला पोहोचलो. अर्थात ही गोष्ट माझ्या तरी पथ्यावरच पडली. काल पहायचे राहून गेलेले हे स्थानक आज मला अगदी व्यवस्थित पाहता आले. या स्थानकाच्या दर्शनी भागाचे, फलाटांचे अगदी भरपूर फोटो मी काढले. कुणी कितीही नाही म्हटले तरी ब्रिटिशांना जी सौंदर्यदृष्टी होती ती स्वतंत्र भारताच्या सरकारकडे नाही हे मान्य करायलाच हवे, जर तसे नसते तर स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्षे होऊनही या तोडीचे दुसरे स्थानक आपल्याला का बांधता आले नसते? 








समोरची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची इमारतही कमालीची देखणी आणि भारदस्त आहे. 


टर्मिनसच्या दर्शनी भागाचे फोटो घ्यावेत म्हणून मी समोरच्या बाजुला आलो तर तिथे ही बाग दिसली. बागेत एक ट्राम उभी करून ठेवली होती. बाजूलाच त्या ट्रामची माहिती देणारा एक माहितीफलक होता. 




रेल्वेचा प्रवास २ टियर एसी या श्रेणीच्या डब्यातून असल्यामुळे अर्थातच सुखकारक झाला. बाकी रेल्वेच्या आजकालच्या प्रवासाविषयी काय बोलावे? २५ वर्षांपूर्वी स्लीपर क्लासची जी स्थिती होती ती आज ३ टियर एसीची झालेली दिसते आणि आजचा स्लीपर क्लास २५ वर्षांपूर्वीच्या जनरल क्लास सारखा भासतो. अर्थात यासाठी तरी मी सरकारला जबाबदार धरणार नाही, ते आपल्या परीने रेल्वेत अनेक सुधारणा करत आहेत. भारतीयांना एका जबाबदार नागरिकानं कसं वागलं पाहिजे याची जाणीव नाही, त्यांच्याकडे किमान सभ्यता नाही, त्याला कोण काय करणार? 

बरोबर नेलेली पुस्तके वाचत आणि आय आर सी टी सी च्या संकेतस्थळामार्फत मागवलेले रुचकर पदार्थ रिचवत (रेल्वेने केलेली ही आणखी एक चांगली सुधारणा) आजचा दिवस गेला. गाडी आतापर्यंत वेळेवर धावत होती, तेव्हा लखनौलाही ती वेळेवर पोहोचायला हरकत नव्हती. 

दिवस तिसरा: दहा नोव्हेंबर 

'मुस्कुराइये, क्योंकी आप लखनौमें है!' 

नवाबांचं शहर असलेल्या लखनौत आमची गाडी अगदी वेळेवर पोहोचली. एकीकडे ही एक चांगली गोष्ट असली तरी दुसरीकडे ती आमच्यासाठी थोडी अडचणीचीही होती. कारण असे की, आम्ही आरक्षित केलेल्या घरात आत शिरण्याची वेळ होती दुपारी एक वाजताची, आणि आत्ता वाजले होते फक्त आठ. मात्र घरमालकांनी आमचे सामान सांभाळण्याची आणि ताजेतवाने होण्यासाठी आम्हाला एक बाथरूम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आणि आम्ही त्यांच्या घराकडे निघालो. वाटेत 'आम्हाला कुठेतरी छानसा चहा पाजा' ही आमची सूचना ऐकल्यावर चालकाने गाडी घेतली लखनौमधल्या प्रसिद्ध 'शर्माजी की चाय' या दुकानाकडे. 

 

(फोटो आंतरजालावरून साभार!) 'शर्माजी की चाय' हे लखनौमधले खास चहासाठी प्रसिद्ध असे एक जुने दुकान आहे. म्हणजे लखनौमधल्या खादाडीचा विषय निघाल्यावर ह्या दुकानाचा उल्लेख टाळून पुढे जाऊच शकत नाही असे काहीसे. आजचा दिवस रविवारचा, तेव्हा पुण्यात रूपाली आणि वैशालीला पुणेकर जमतात तसे अनेक लखनौकरही इथं चहा प्यायला आलेले दिसत होते. 

मातीच्या कपात दिला जाणारा इथला इराणी पद्धतीचा चविष्ट चहा घेऊन आम्ही निघालो गोमतीनगरमधल्या आमच्या घराकडे. इथे आमचे सामान टाकून आणि थोडे ताजेतवाने होऊन आम्ही परत बाहेर पडलो लखनौ पहायला. आमचा पहिला थांबा होता शहराच्या मध्यवर्ती भागातली 'जामी मस्जिद'. मशिदीपाशी पोहोचलो तर सगळा सुनसान मामला. शिवाय कुंपणावर 'गैर-मुस्लीमांनी आत शिरू नये' अशी पाटीही. तेव्हा आम्ही बाहेरूनच मशिदीचे काही फोटो काढले आणि निघालो 'छोटा इमामबारा' या पुढील आकर्षणाकडे. 





लखनौ हे नवाबांचे शहर असल्यामुळे इथे मुघलकालीन इमारती खूप आहेत. छोटा इमामबारा आणि बडा इमामबारा ह्या अशाच दोन इमारती. 

इमामबाडा म्हणजे शिया मुस्लिमांची प्रार्थना करण्याची जागा. हा इमामबाडा अवधचे तिसरे नवाब मोहम्मद अली शाह यांनी १९३८ साली बांधला. आपल्याला आणि आपल्या आईला इथेच दफन करण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती, जी त्यांच्या मृत्यूपश्चात पूर्ण करण्यात आली. 

इमामबाड्याच्या आवारात दोन-तीन थडगी आहेत, एक हमाम (स्नानगृह) देखील आहे. इमामबाड्याच्या मुख्य इमारतीत काचेची अनेक झुंबरे आहेत आणि ताबूत आहेत. ही झुंबरे बेल्जियमवरून मागवली गेली होती असे आम्हाला तिथल्या गाईडने सांगितले. ज्या नवाबांनी हा इमामबाडा बनवला, त्यांचा राजमुकुट, त्यांचे सिंहासन, राणीचा दिवाण, कुराणाच्या काही प्रती आणि मोहरमला नाचवले जाणार ताबूत अशा काही गोष्टीदेखील आत आहेत. 







छोटा इमामबाड्यात दहा-पंधरा मिनिटे घालवून आम्ही बाहेर पडलो. इमामबाड्याच्या जवळच सातखंडा आहे ही इमारत आहे. खरंतर ही इमारत सात मजली बांधली जायची होती, मात्र काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. 


इमारत बाहेरूनच पाहून आम्ही निघालो शेजारच्या 'घंटाघर'कडे अर्थात क्लॉक टॉवरकडे. 

१८८१ साली बांधला गेलेला आणि पूर्णपणे दगडात बनवलेला हा मनोरा तब्बल ६७ मीटर उंच आहे. मनो-यासमोरच एक भले मोठे दगडी कुंड आहे. हे कुंड पाण्याने अगदी भरून गेलेले आहे अशी काही छायाचित्रे मला इंटरनेटवर दिसली खरी, पण आम्ही गेलो तेव्हा ह्या कुंडात पाणी नव्हते. 


जवळच एक छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. लखनौ आणि लखनौवर राज्य केलेल्या नवाबांची काही चित्रे इथे आहेत. गॅलरी पाहायला आलेल्या प्रेक्षकांना पकडणे, ते नको म्हणत असतानाही जबरदस्तीने माहिती सांगणे आणि नंतर निर्लज्जपणे बक्षीसाची मागणी करणे हा एक उबग आणणारा प्रकार इथे दिसला. ह्या गॅलरीत दहा पंधरा मिनिटे घालून आम्ही बाहेर पडलो. 




सातखंडा, छायाचित्र गॅलरीतून. 

बाहेर पडून दोन-तीन तास झाले होते आणि अजून आमची आंघोळही उरकली नव्हती, तेव्हा आणखी काही पाहण्यात वेळ न घालवता घराकडे मोर्चा वळवला. चला स्थलदर्शनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात तर उत्तम झाली होती!

आंघोळी वगैरे उरकून आम्ही तयार झालो तेव्हा दुपारचा दीड वाजता आला होता. सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. खायच्या ठिकाणांचा शोध घेत असताना, जवळच बाटी चोखा मिळणारे (ह्याच नावाचे) एक चांगले हॉटेल आहे असे दिसले. तेव्हा, तिकडेच जायचे ठरले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या बाटी चोखा ह्या खाद्यपदार्थातील बाटी म्हणजे सत्तूपासून बनवलेला, निखार्‍यावर भाजलेला एक छोटासा लाडू आणि चोखा म्हणजे भरीत. 

हॉटेलची अंतर्गत सजावटही उत्तर भारतातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यासारखी केली होती. म्हणजे रहाटगाडगे बसवलेली विहीर, बसायला लाकडी बाजा, बैलगाडी इत्यादी. 

जेवण अतिशय चविष्ट होते. बाटीवर टाकायला साजूक तूप अगदी वाटी भरभरून दिले जात होते. चोखा अर्थातच चवीला उत्तम होता. जोडीला मठ्ठा, म्हणजे भरपूर मसाला घातलेले ताक. जेवण भरपूर झाले, अगदी आता इथल्याच लाकडी बाजांवर झोपून जावे असे वाटण्याइतके. पण आम्हाला झोपून चालण्यासारखे नव्हते, तेव्हा आम्ही गाडी मागवली आणि निघालो लखनौतल्या सगळ्यात प्रसिद्ध आकर्षणाकडे, अर्थात 'बडा इमामबाडा'कडे. 

बडा इमामबाड्यात प्रवेश करण्याआधी दिसतो 'रूमी दरवाजा'. हा दरवाजा बडा इमामबाड्याच्या समकालीन आहे आणि त्याच राजाने बांधलेला आहे. याला तुर्कीश दरवाजा असंही म्हटलं जातं. पूर्वी या दरवाजातून वाहतूक होत असे, मात्र आताशा दरवाजा एका बाजूला ठेवून रस्ता त्याच्या कडेने वळवलेला दिसतो. 

रूमी दरवाजा गाडीतूनच पाहून आम्ही निघालो बडा इमामबाड्याकडे. 
डावीकडे सगळ्यात मागे दिसतो आहे तो रुमी दरवाजा. (ह्या दरवाज्याजवळून आम्ही एक/दोनदा गेलो पण मी त्याचा जवळून फोटो काढायला विसरलो!) 






बडा इमामबाड्याची इंटरनेटवर मिळालेली माहिती अशी: 

बडा इमामबाड्याची गोष्ट केवळ भव्यतेची नाही, तर माणुसकीची सुद्धा आहे. 

इ.स. १७८० मध्ये, नवाब असफ-उद-दौला यांनी बडा इमामबाडा बांधायला घेतला, तेव्हा संपूर्ण अवध प्रदेशात भयानक दुष्काळ पडला होता. नवाबांनी हा प्रकल्प फक्त एक धार्मिक वास्तू उभी करायची म्हणून नव्हे, तर हजारो लोकांना काम आणि रोजगार मिळावा म्हणून सुरु केला. त्यावेळी ह्या कामासाठी अंदाजे ५० लाख ते १ कोटी रुपये खर्च झाल्याचं म्हटलं जातं आणि काम पूर्ण झाल्यानंतरही नवाब दरवर्षी ४ ते ५ लाख रुपये याच्या सजावटीवर खर्च करत असत. एक आख्यायिका सांगते की, दिवसभर सामान्य लोक इमामबाडा बांधत असत आणि रात्री श्रीमंत लोक ते पाडत असत — काम कधीच पूर्ण होऊ नये, लोकांना सतत काम मिळत रहावं म्हणून. जवळपास दहा वर्षं चाललेल्या या कामामुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला, दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत त्यांना, त्यांच्या कुटुंबांना मोठाच आधार मिळाला. त्यामुळे हा देखणा इमामबाडा आज नवाबांच्या सौदर्यदॄष्टीचं प्रतीक म्हणून ओळखला जातोच, पण आपल्या प्रजेविषयी त्यांना वाटत असेलेल्या प्रेमाचं, आपुलकीचं प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा इमामबाडा आहे — पहिला आहे निजामत इमामबाडा (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल इथला). 

इमामबाड्यात पाऊल टाकताच, वेगवेगळ्या बांधकामशैलींचं एक सुरेख मिश्रण डोळ्यांसमोर उभं राहतं. मध्यभागी असलेलं प्रचंड सभागृह म्हणजे भारतीयांच्या त्या वेळच्या प्रगत अभियांत्रिक कौशल्याचं एक चांगलं उदाहरणं म्हणता येईल — ह्या भव्य हॉलची रचना ५० मीटर लांब, १६ मीटर रुंद आणि १५ मीटर उंच आहे — आणि विशेष म्हणजे, छताला कुठलाही लोखंडी किंवा लाकडी आधार नाही! असं म्हणतात की अशा पध्दतीनं बांधलेलं हे जगातलं सर्वात मोठं दालन आहे. 

पण हा मध्यवर्ती हॉल बडा इमामबाड्याची एकमेव खासियत नाही — बाजूला अजून तीन सुंदर हॉल्स आहेत, ज्यांनी बडा इमामबाड्याला एक सांस्कृतिक संगम बनवलं आहे. 

चीनी हॉलमध्ये शिरताच वरच्या छतावर नाचणारे ड्रॅगन्स आपलं लक्ष वेधून घेतात. पर्शियन हॉलमध्ये पाय ठेवल्यावर आरशांची कलाकुसर आणि फुलांचं नाजूक नक्षीकाम आपल्याला थेट सफविध राजसत्तेच्या काळात घेऊन जातं. ह्या दालनात लावलेल्या मेणबत्त्या जेव्हा ह्या हजारो आरशांमध्ये परावर्तित होत असतील, तेव्हा काय बहारदार दिसत असेल ते दॄश्य! भारतीय हॉलमध्ये एक सुंदर कमळाच्या आकाराचा घुमट आहे — हा हॉल आपल्या देशी, पारंपारिक वास्तुकलेचा सन्मान करतो. 

मुख्य सभागृहात नवाब असफ-उद-दौलांची समाधी आहे — आपण उभ्या केलेल्या या अमर स्मारकातच ते आपल्याला चिरविश्रांती घेताना दिसतात. 

पण खरी मजा तर पुढे आहे – "भूलभुलैय्या"! भूलभुलैय्या म्हणजे अरुंद, चिंचोळ्या, अंधा-या अशा एकमेकांना छेदणा-या अनेक वाटांचा गुंतवळा. भारतात अशी रचना दुसरीकडे फारशी आढळत नाही. सांगितलं जातं की इथे १०२४ वाटा आहेत — खरी संख्या अजूनही एक कोडंच आहे. आणि हा भूलभुलैय्या फक्त नावालाच भूलभुलैय्या नाही, एखाद्या नवख्याची इथे खरंच फसगत होण्याची शक्यत आहे. तस्मात् इथे एखाद्या जाणकार माणसाला घेऊन गेलेलं उत्तम, नाहीतर आत नुसते फिरत रहाल आणि अडकून पडाल! 

आम्ही गेलो तो रविवार होता, त्यामुळे बडा इमामबाड्यात चिक्कार गर्दी होती. इथं यायला आम्ही चुकीचा दिवस निवडलेला दिसत होता. जमिनीवर पडलेल्या एखाद्या कीटकावर मुंग्यांनी हल्ला करावा तसा या बडा इमामबाड्यावर हल्ला करून लोकांनी त्याचा एकेक भाग काबीज केलेला दिसत होता. अंगाला अंग चिकटत होते, प्रत्येक श्वासागणिक घामाचा दर्प आत शिरत होता आणि फेब्रुवारी महिन्यातही उकाड्याने जिवाची काहिली होत होती. पण नावे कुणाला ठेवणार म्हणा, आम्हीही या गर्दीचा एक भाग होतोच की! 

धीर करून आम्ही आत शिरलो. तिथे पहिल्यांदा एका गाईडने आमचा ताबा घेतला आणि नंतर मग बऱ्याच वेळाने आम्हाला दुसऱ्या एका गाईडकडे सोपवून तो निघून गेला. दहा एक लोक जमल्यावर शेवटी आम्ही निघालो. काही वेळ खालचे हॉल पाहून आम्ही जिन्याने थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो. इथून आम्ही ज्या दरवाजातून आज शिरलो त्याचे आणि शेजारील मशिदीचे दृश्य दिसत होते. लांबवर रूमी दरवाजाही दिसत होता. 

त्यानंतर आम्ही गेलो भुलभुलैय्यात. हा खरोखरच एक थरारक अनुभव होता. पहिला अर्धा तास आमचा गाईड आमच्यासोबत होता, पण नंतर 'हे पाहून झालं की तुम्ही खाली या' असं म्हणून त्याने पोबारा केला आणि आम्ही एकटेच फिरायला लागलो. अर्धा एक तास फिरल्यावर आणि बाहेर पडायचा रस्ता अजूनही सापडत नसल्याने पुरते हवालदिल झाल्यावर शेवटी दुसऱ्या एका गाईडला आमची दया आली आणि त्याने आम्हाला खाली जाण्याचा रस्ता दाखवला. एव्हाना सात वाजत आले होते. आम्ही बाहेर पडतोच आहोत, तेवढ्यात बडा इमामबाड्याचे आणि त्याच्या शेजारील मशिदीचे दिवे सुरू झाले. इतका वेळ सूर्यप्रकाशात न्हाहून निघालेला इमामबडा आता रात्रीच्या अंधारात चमकायला लागला. थोडा वेळ तिथे रेंगाळून शेवटी आम्ही बाहेर पडलो आणि घराकडे निघालो.

बडा इमामबाडा 

बडा इमामबाड्याचे मुख्य प्रवेशद्वार
 
बडा इमामबाड्याशेजारील मशीद
चला, 'नवाबोंके शहर' लखनौतला पहिला दिवस तर एकदम झकास गेला होता. ह्या शहराबाबत बरेच काही ऐकले होते, इथे आल्यावर मात्र जे ऐकले ते कमीच अशी काहीशी भावना होत होती.

हे खानदानी शहर उद्या आम्ही आणखी बारकाईने आणि चवीचवीने पाहणार होतो!


वाचने 141
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया