Skip to main content

भटकंती...-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 06/08/2026 09:45 या दिवशी प्रकाशित केले.

 

भटकंती - २

 

 

... त्यांचे व्यवहार, चर्च, सरकार आणि शाळा, व्यापार उदीम, कारखाने आणि मोठमोठ्या बागा आणि राजकारण (सगळ्यात भीतीदायक) या सर्व गोष्टी रानावनातील सगळ्यात कमी जागा व्यापतात याचा मला मनापासून आनंद होतो. एवढेच काय परमेश्वराचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. राजकारण हे एक चिंचोळे कुरण आहे आणि त्याला येऊन मिळणारे हमरस्ते त्याच्याहून चिंचोळे आहेत. मी तेथे कधी कधी प्रवाशांना रस्ता सांगतो. जर तुम्हांला राजकारणात जायचे आहे का? हा रस्ता पकडा आणि व्यापाराच्या मागे मागे जा तुम्ही बरोबर ईप्सित स्थळी पोहोचाल. नशिबाने त्याने सर्व विश्व व्यापलेले नाही. मी मात्र रानावनातून भटकताना जसे घेवड्याच्या शेताच्या वाटेसही जात नाही तसाच या राजकारणाच्याही रस्त्याला जात नाही. अर्ध्या एक तासात मी पृथ्वीवरील अशा टोकावर उभा राहतो जेथे वर्षानुवर्षे कोणी आलेले नाही आणि अशा ठिकाणी राजकारणी कशाला येतील? राजकारण म्हणजे माणसाच्या शरीराला चिकटलेला सिगाराचा धूर...

जेथे अनेक रस्ते मिळतात तेथे गाव तयार होते असा माझा समज आहे. ज्याप्रमाणे नद्या एका उथळ ठिकाणी पाणी ओततात आणि एक जलाशय तयार होतो तसेच. गाव म्हणजे एक शरीर आहे ज्याचे पाय आणि हात म्हणजे रस्ते! काही ठिकाणी फुटकळ रस्ते मिळतात तर काही ठिकाणी चार रस्ते मिळतात आणि चौक तयार होतो. या जागेला लॅटीनमधे क्वाड्रिव्हिअल असं म्हणतात. क्वाड्र्री म्हणजे चार आणि व्हाया म्हणजे ज्यातून ये जा होते ती जागा. जे एकत्र येऊन उपजीविका करतात त्यांना लॅटीनमधे व्हेलाटुरम असे म्हणत. त्यातूनच पुढे व्हिलेज हा शब्द तयार झाला असावा. गंमत बघा गावातून प्रवासी ये जा करतात आणि त्यांच्यामुळे हे गावकरी दमतात.

काही जण चालतच नाहीत. काही  जण फक्त हमरस्त्यावर चालतात तर काही व्यापाऱ्यासाठी चालतात. हमरस्ते हे फक्त घोडागाड्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी असतात असे माझे स्पष्ट मत आहे. मी शक्यतो हमरस्त्यांवरून चालत नाही कारण मला कसलीही घाई नसते. मला ना कुठल्या सराईत जायचे असते ना कुठल्या वाण्याच्या दुकानात, किंवा मला तबेल्यातही जायचे नसते आणि हे सगळे हमरस्ते शेवटी तिकडेच वळतात. चालण्यात मी घोडा आहे पण रस्त्यावर चालण्यासाठी नाही. चित्रकार चित्रे रंगवताना मनुष्याकृतींचा उपयोग रस्ता दाखविण्यासाठी करतात मात्र त्यांना माझा उपयोग नाही.. मी रानावनातून हिंडतो पण प्राचीन तत्त्वज्ञानी मुनींसारखे, किंवा मनू, मोझेस, होमर चाउसर जसे जंगलातून चालले असतील तसे. तुम्ही या देशाला अमेरिका म्हणता पण ही अमेरिका नाही. ना कोलंबसने ती शोधली, ना अमेरिकस्‌‍ने. खरी अमेरिका आपल्याला नेटिव्हांच्या दंतकथांमधूनच सापडेल.

काही रस्ते जुने असतात आणि एके काळी खूपच गजबजलेले असावेत पण आता लोकांनी त्याचा वापर करणे सोडून दिले आहे. ते आता ओसाड पडलेत. असा एक रस्ता मला माहीत आहे. त्याचे नाव आहे ओल्ड मार्लबोरो रोड. हा रस्ता आता मार्लबोरोला जात नाही. अर्थात आता तो जातो तेथील जागेचे नाव मार्लबोरो ठेवल्यास हे शब्द मागे घ्यावे लागतील. पण प्रत्येक गावात असे दोन तीन रस्ते तरी असतातच..

सध्या ज्या प्रदेशात मी राहतोय त्यात देवाच्या कृपेने बहुतेक जमीन ही खाजगी नाही. त्यामुळे भटकणाऱ्यांना तुलनेने पाहिजे तेथे भटकण्याचे स्वातंत्र्य आहे. पण भविष्यात एक दिवस असा येणार आहे जेव्हा या भूभागात बागांसाठी कुंपणे घालण्यात येतील. तेथे काही संकुचित मनाचे लोक संकुचित आनंद घेतील. मग कुंपणांची संख्या वाढेल आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या भूमीवरून चालणे हे अतिक्रमण समजले जाईल. एखाद्या गोष्टीची मजा घ्यायची असेल तर त्यापासून स्वतःला थोडेसे तरी अलिप्त ठेवले पाहिजे नाही का? ती वेळ येण्याआधी भटकण्यात अडथळा येणार नाही असे काहीतरी आपण केले पाहिजे..

बऱ्याच वेळा कुठे चालावे हा प्रश्न आपल्याला फार अवघड वाटतो. का बरं? मला वाटते निसर्गात एक अदृश्य शक्ती असते. तिला आपण कळत नकळत शरण आलेले असतो. ती शक्ती आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. ती शक्तीआपल्याशी त्रयस्थासारखी वागत नाही याची मला खात्री आहे. योग्य आणि चुकीचा असे दोन मार्ग असतात. पण मूर्खासारखे आपण चुकीच्या मार्गावर चालतो. ज्यावरून आपण अजून चाललेलो नाही त्याच मार्गावरून आपल्याला चालण्याचा मोह पडतो. या वास्तव जगात आपण ज्या मार्गावरून चालतो त्यासारखा मार्ग आपल्याला अंतर्यामी आवडलेला असतो. मग आपण दिशाहीन होतो कारण त्या मार्गाची कल्पना आपल्या मनात अजून दृढ झालेली नसते.

मी जेव्हा चालण्यासाठी घराबाहेर पडतो आणि ठरवतो की आज पावले नेतील तिकडे जायचे तेव्हा, तुम्हांला अतिशयोक्ती वाटेल, पण माझी पावले नैऋत्य दिशेला कुठल्यातरी डोंगराकडे, जंगलाकडे, पाणथळीकडे किंवा कुरणाकडेच वळतात. शेवटी मी तेथेच पोहोचतो. माझ्या दिशादर्शकाची सुई जरा उशिरा स्थिर होते आणि ती नैऋत्य दिशा नेहमी अचूकपणे  दाखविते असेही नाही पण साधारणतः दक्षिण आणि नैऋत्य या दोन दिशांमधे ती असते. (जेव्हा मला नैऋत्य पाहिजे असते तेव्हा) मला वाटते माझ्या भटकंतीचे भवितव्य त्याच दिशेला आहे. त्या दिशेला पृथ्वी मला नेहमीच ताजीतवानी, टवटवीत आणि निसर्गाने श्रीमंत वाटते. माझ्या चालण्याची जर परिघरेषा काढली तर तिचा आकार वर्तुळाकार नसेल. पॅराबोला असेल किंवा धूमकेतूच्या कक्षेसारखा असेल. या रेषा भेटत नाहीत तर दूरदूर जातात. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर या रेषा नैऋत्य दिशेला जातात आणि या कक्षेत माझे घर हे सूर्याची जागा घेते. वर म्हटल्याप्रमाणे मी काही न ठरवता भटकण्यासाठी बाहेर पडलो तर मी अर्धा एक तास चकरा मारतो आणि शेवटी फिरणाऱ्या धूमकेतू सारखा नैऋत्य दिशेला सटकतो. मी जर ठरवलेच तर पूर्वेला मी जातो पण ते मनाविरुद्ध. पश्चिमेला मात्र मी अगदी आवडीने जातो. त्या दिशेला मला कुठलाही उद्योग खेचत नाही. का कोणास ठाऊक पूर्वेच्या क्षितिजापलीकडे मला भावणारा, खुणावणारा निसर्ग मला भेटेल असं मला वाटत नाही. मग तेथे चालायला जाणे मला वेळेचा अपव्यय वाटतो. या उलट पश्चिमेला जंगलांचा विस्तार अफाट आहे. पार सूर्यास्ताच्या बिंबापर्यंत पसरले आहे ते. जणू त्याला अंतच नाही आणि शिवाय त्या दिशेला एकही शहर नाही की गाव नाही. त्यामुळे एकांतभंगही नाही. मला माझ्या इच्छेप्रमाणे जेथे राहायचे आहे तेथे राहू देत. या बाजूला शहर आहे तर त्या बाजूला अनादी अरण्य. मी दिवसेंदिवस शहरातून माघार घेतोय, अरण्याकडे ओढला जातोय हे खरं. जर माझ्या गावबंधूंनाही असेच वाटले असते तर मी या गोष्टीला एवढे महत्त्व दिलेही नसते. पण दुर्दैवाने तसं नाही. मी ओरेगॉनच्या दिशेने चालले पाहिजे ना की युरोपाच्या. आणि देशाची वाटचालही त्याच दिशेने चालू आहे. माणसाची प्रगतीही पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी होत आली आहे. गेले काही वर्षं आग्नेय दिशेकडे, ऑस्ट्रेलियात  स्थलांतर होताना दिसत आहे. पण मला तर ती अधोगतीच वाटते आणि ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या पहिल्या पिढीची नैतिकता पाहिल्यास हा प्रयोग मला तर फसल्यासारखा वाटतोय. पश्चिमेच्या तार्तारांना तर वाटते की थिबेटच्या पुढे काहीच नाही. ‌‘‌‘ जग तेथे संपते.. त्याच्यापलीकडे किनारा नसलेला एक महासागर आहे..‌’‌’ असे त्यांचे म्हणणे आहे. ते आपले अढळ अशा पश्चिमेला राहतात.

आपण पूर्वेला जातो ते इतिहास समजण्यासाठी, कलांचा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी. या दिशेला आपण जातो ते मानवाचे मूळ शोधण्यासाठी. या उलट पश्चिमेला जातो ते भविष्यातील प्रगतीसाठी आणि उद्योग व साहसासाठी. ग्रीक पुराणात एका लेथीन नावाच्या नदीचा उल्लेख आहे. या नदीचे पाणी जो प्यायचा तो सगळं विसरत असे. मला वाटतं अटलांटिकाचे पाणी आपल्या मार्गातील लेथीन असावी. जो कोणी याचे पाणी चाखतो त्याला प्राचीन जग आणि त्या काळातील संस्था विसरण्याची संधी प्राप्त होत असते. जर ही संधी हुकली तर अजून एक संधी हुकली तर निराश होण्याचे बिलकूल कारण नाही. स्टाईक्स नावाच्या अजून एका नदीचा उल्लेख ग्रीक पुराणात आहे. या नदीच्या पलीकडील तीरावर पाताळ आहे असे त्यात मानले गेले आहे. समजा पहिली संधी हुकली आणि आपल्या पिढ्या स्टाईक्सच्या किनाऱ्यावर थबकल्या तर अजून एक लेथीन आपल्या सेवेस हजर आहे. त्याचे नाव पॅसिफिक. आणि तुम्ही जुने सगळे विसरायचा चंग बांधला असल्यामुळे देवाने याच्या पात्राची रुंदी अटलांटिकाच्या चांगली तिप्पट ठेवली आहे.

आता चालण्याशी आपल्या पिढ्यांच्या प्रवासाचा संबंध लावणे किती सयुक्तिक आहे याची मला कल्पना नाही पण पक्षी आणि काही कीटकांच्या स्थलांतराच्या उपजत ज्ञानाने खारींवर परिणाम केला होता. खारींनी त्या प्रभावाखाली काही गूढ हालचाली केल्याचे मला स्मरते. काही खारींनी आपली शेपूट शिडासारखी वर करून तलाव पार केले तर काही खारींनी नद्याही पार केल्या. काही ठिकाणी त्यांनी आपल्या जमातीतील मेलेल्या खारींचा पुल बांधला व ते पाणी पार केले असे सांगितले जाते. आमच्या येथे गूज पक्षांचा एकही कळप उतरत नाही पण आमच्या येथील जमिनीच्या किमतीवर त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम होतोच. मी जर जमिनीचा दलाल असतो तर यांच्या आवाजाचा निश्चितच विचार केला असता. थोडक्यात मानव जातीचा चालण्याशी संबंध लावण्यास हरकत नसावी.

जेव्हा मी सूर्यास्त पाहतो तेव्हा त्या दिशेला दूरवर जावे अशी ऊर्मी माझ्या ह्रदयात दाटून येते. तो ही पश्चिमेला रोज स्थलांतर करतो आणि आपल्याला त्याच्या मागे येण्यास खुणवतो. पश्चिमेचा तो पहिला स्थलांतरित आहे असे म्हणायला हरकत नाही. आपण रात्रभर क्षितिजावर धूसर दिसणाऱ्या डोंगर रांगांची स्वप्ने पाहतो, ज्या रांगांना कालच त्याने सोनेरी किरणांनी मढवलेले असते. अटलांटीसचे बेट आणि हेस्पराईडस्‌‍च्या बागा म्हणजे जणू स्वर्गच. हे सगळे प्राचीन काळातील गूढतेत आणि काव्यात लपेटलेले ग्रेट वेस्टच आहे. एखाद्या रम्य संध्याकाळी बुडणाऱ्या सूर्यबिंबाकडे पाहत असताना या बागांची स्वप्ने कोणाला बरं पडत नाहीत ?

कोलंबसने पश्चिमेला प्रस्थान ठेवले कारण त्या दिशेला जाण्याची त्याची ऊर्मी इतरांपेक्षा कितीतरी जास्त होती म्हणून. त्या ऊर्मीला किंवा ह्रदयाच्या आदेशाला तो शरण गेला म्हणून त्याने कॅस्टील व लिऑन या प्रांतांसाठी नवीन जग शोधले. आता एवढा मोठा प्रदेश आणि तो सुद्धा इतका सुपीक आणि समृद्ध, आपल्याला या पृथ्वीच्या पाठीवर कुठे सापडणार ? शिवाय हवामानही युरोपातील जनतेला मानवणारे. फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ मिशूला या प्रदेशातील काही भाग माहीत होता. तो लिहितो, ‌‘‌‘मोठ्या झाडांच्या प्रजाती या प्रदेशात विपुल आहेत. तीस फुटांहून जास्त उंच वाढणाऱ्या १४० प्रजाती येथे अमेरिकेत आढळतात तर फ्रान्समधे फक्त ३० ते ४०.‌’‌’  नंतर अनेक वनस्पतिशास्त्रज्ञांनी त्याच्या या निरीक्षणाला मान्यता दिली. हंबोल्ट अमेरिकेला आला ते झाडांचा अभ्यास करायला आणि ॲमॅझॉनमधील वृक्षसंपदा पाहून तो अचंबित झाला. त्याने त्याचे सविस्तर वर्णन सुंदर शब्दात करून ठेवले आहे. भूगोलतज्ञ गियूने, हा युरोपातील होता, अमेरिकेत फार खोलवर प्रवास केला. इतका की मला त्याच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा नेहमीच मोह होतो पण त्याच्या एका वाक्याने मी तो रस्ता सोडला. तो म्हणाला, ‌‘‌‘वनस्पती  प्राणी जगतासाठी बनल्या आहेत त्याचप्रमाणे अमेरिका ही जुन्या जगासाठी बनलेली आहे.... म्हणजे युरोप... पण प्राचीन माणसाने त्याची वाटचाल केव्हाच चालू केली आहे. त्याने आशियातील कुरणे सोडली आणि अनेक मुक्काम करीत युरोप गाठले. त्याच्या प्रत्येक पावलाला त्याला नवनवीन पण पहिल्यापेक्षा श्रेष्ठ अशा संस्कृतींची ओळख होत गेली. शेवटी तो अटलांटिकाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचला. त्या अनोळखी पाण्याच्या तीरावर तो थबकला. त्या सागराच्या सीमा त्याला माहीत नव्हत्या. तो मग उलटपावली परत फिरला असावा. जेव्हा युरोपातील कसदार जमिनी संपल्या तेव्हा त्याने परत एकदा पुनरुत्थित केले व आपल्या साहसाला पश्चिम दिशेला वाट करून दिली.‌’‌’

या पश्चिमेच्या उद्यमशील लोकांची गाठ अटलांटिकाच्या अडथळ्याशी गाठ पडली आणि आधुनिक व्यापार उदीम व उद्योगांचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. मिशू (धाकटा) याने १८०२ साली अलिगेनीच्या पश्चिमेला जो प्रवास केला त्यात तो म्हणतो, ‌‘‌‘ मी जाईन तेथे ते मला एकच प्रश्न करीत. तो म्हणजे मी कुठून आलोय हा. तो डोंगराळ प्रदेश जगातील सगळ्या लोकांची भेटण्याची जागा आहे..असं त्यांना वाटत होते की काय कोण जाणे..‌’‌’

थोडक्यात सांगायचे झाल्यास मला एक प्राचीन लॅटीन वाक्य आठवते - एक्स ओरिएन्टे लक्स; एक्स ऑक्सिडेंटे फ्रुक्स. पूर्वेकडून प्रकाश आणि पश्चिमेकडून फळं.

एक इंग्लिश प्रवासी होता. त्याचे नाव होते सर फ्रान्सिस हेड. हा माणूस नुसता प्रवासी नव्हता तर तो कॅनडाचा गव्हर्नर जनरलही होता. तो म्हणायचा, ‌‘‌‘या नवीन जगाच्या दोन्ही गोलार्धात परमेश्वराने फार मोठ्या प्रमाणावर निसर्गाची उधळण केली आहे. पण पूर्वीपेक्षा या नवीन जगात त्याने हे चित्र चमकदार आणि महागड्या रंगाने रंगवले आहे. अमेरिकेचा स्वर्ग हा जास्त उंचीवर आहे आणि आकाश जास्त निळेशार आहे. हवा स्वच्छ आहे, हिवाळा कडक आहे आणि चंद्र मोठा आहे. तारे जास्त चमकदार आहेत तर विजांचा गडगडाट कानठळ्या बसवणारा आहे.  विजांचा रंग चमकदार आहे तर वाऱ्याचा जोरही जास्त आहे. पाऊस दमदार आहे आणि डोंगरही आकाशाशी स्पर्धा करणारे आहेत. नद्या खळाळत दूरवर वाहतात आणि जंगलेही दाट आणि मोठी आहेत. कुरणे सपाट आणि अफाट आहेत...‌’‌’ बफॉनने या प्रदेशाची जी बदनामी केली आहे ती हे वाक्य खोडून तरी काढेल.

लिन्नाउसने पूर्वीच म्हटले आहे, ‌‘‌‘अमेरिकन वृक्ष एवढे मुलायम व आनंदी का असतात हे मला माहीत नाही...‌’‌’ आणि शिवाय एक तो विसरला. या अमेरिकन जंगलात क्रूर आफ्रिकेतील श्वापदे नावालाही सापडत नाहीत. (आफ्रिकेची श्वापदे असं रोमन लोक म्हणायचे. मी म्हणत नाही.) हे या भूमीवर वस्ती करण्याचे अजून एक कारण आहे. परवाच मला कोणीतरी सांगितले की सिंगापूरच्या बेटावर कितीतरी वाघ रोज माणसांना उचलून घेऊन जातो पण येथे उत्तर अमेरिकेत श्वापदांना न घाबरता माणूस जंगलात उघड्यावर झोपू शकतो.

या कहाण्या तशा उत्साहवर्धक आहेत असं मी म्हणतो. युरोपात चंद्र दिसतो त्यापेक्षा येथे मोठा दिसत असेल तर कदाचित सूर्यही मोठा दिसत असेल. अमेरिकेच्या स्वर्गाची उंची जर जास्त असेल किंवा तारे जर जास्त चमकदार असतील तर हे सगळे अमेरिका पुढे जी धर्म, अध्यात्म आणि साहित्यात उंची गाठणार आहे त्याचे प्रतीक आहे असे मला वाटते. कारण वातावरणाचा माणसाच्या वृत्तीत फरक पडतो यावर माझा विश्वास आहे. डोंगरात मुक्तपणे वाहणाऱ्या वाऱ्याने माणसात स्वतंत्र वृत्ती बाणवते आणि एवढेच नाही तर त्याच्या ध्येयासक्ती उत्पन्न करते. या अशा वातावरणात माणसाची बुद्धी आणि शरीर तरतरीत न राहिले तरच नवल. का माणसाच्या आयुष्यात कितीही ढगाळ दिवस आले तरी चालते ? मला नाही तसं वाटत. मला वाटते आपली कल्पनाशक्ती आपल्या आकाशाइतकीच अफाट होते, आपले विचार या अफाट या आकाशाइतकेच स्वच्छ, निर्मळ होतात. आपली आकलनशक्ती या अफाट कुरणांइतकीच व्यापक होते आणि आपली  तीक्ष्ण होते आकाशात चमकणाऱ्या विजांप्रमाणे, नद्यांप्रमाणे आणि उत्तुंग डोंगरांप्रमाणे. आपले ह्रदयही या प्रदेशात वाहणाऱ्या विशाल नदांप्रमाणे विशाल होते. कदाचित येथे प्रवास करणाऱ्यांना येथे काहीतरी वेगळे आढळत असेल नाहीतर अमेरिकेचा शोध का लागला असता ? (हे वाचल्यावर मला सह्याद्रीची तिव्रतेने आठवण आली.)

जर कोणी म्हणाला, की अमेरिकेत जंगलात राहणाऱ्या माणसापेक्षा ॲडम स्वर्गात जास्त सुखी होता तर एक देशप्रेमी म्हणून माझी मान शरमेने निश्चितच खाली जाईल. कारण असे होऊच शकत नाही...

क्रमशः

-थोरो

अनुवाद - जयंत कुलकर्णी.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 111
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

मी मध्ये थोरोचे चरित्र आणि काही निबंध असे पुस्तक लिहिले होते, सदर लेख हा त्या पुस्तकातील आहे. इंग्लिशमध्ये मला वाटते थोरोचे एसेज या नावाने पुस्तक आहे आणि मला वाटते नेटवर उपलब्ध आहे.