✪ पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम
✪ मला असं स्टेज करेज आणि प्रेझेंटेशन कधी करता येईल!
✪ भुशी डॅम सहल, पाऊस आणि मैत्रीची सुरूवात
✪ हॉस्टेलची मजा, दादागिरी आणि कला गुण!
✪ सोबत, सहभाग आणि सहभागातून शिक्षण
✪ शिकण्यासाठी दर्जेदार घटक आणि मन गुंतवणारं वातावरण
✪ समाज कार्याच्या विविध आयामांचा परिचय
२००६ च्या जुलै महिन्यात त्या विलक्षण दोन वर्षांच्या प्रवासाची सुरूवात झाली! अनेक अर्थाने मला "कर्वे महाविद्यालय" खूप जवळचं वाटलं. त्याचं कारण म्हणजे मी परभणीसारख्या छोट्या शहरातून आलो होतो. आणि बीए वाडिया महाविद्यालयातून पूर्ण केलं होतं. वाडिया कॉलेज चांगलं असलं तिथे कॉस्मोपॉलिटन वातावरण आणि इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे मी तिथे मनाने कधीच रुळलो नाही. अगदी थोडे मित्र- मैत्रिणी झाले. पण मी तिथे स्वत:ला परकाच मानत राहिलो. पण कर्वेमध्ये आल्यावर अगदीच घरच्यासारखं वाटलं. अगदी साधं- आत्मीयतेचं वातावरण. इंग्रजी बोलणारे प्राध्यापक- विद्यार्थी असले तरी वातावरण मराठी. मराठी मित्र- मैत्रिणी. शिवाय अभ्यासक्रमाची रचना व स्वरूप माझ्या स्वभावाला अनुकूल असं- भरपूर अभ्यास आणि चर्चा- ब्रेनस्टॉर्मिंग- प्रश्नोत्तरं.
(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
त्यामुळे मीच काय पण जे विद्यार्थी जास्त वेगळ्या पार्श्वभूमीचे होते, तेही तिथे हळु हळु रुळले. खरं तर खूप वेगवेगळी पार्श्वभूमी आणि अध्ययनाची तयारी घेऊन आलेले विद्यार्थी म्हणजे तशी कच्ची मडकी! चांगल्या शब्दांत सांगायचं तर अनेक जण unorganized असायचे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा फॅकल्टीजला सांगाव्या लागायच्या की, अशी फाईल बनवा. अशा नोंदी ठेवा. गटामध्ये सहभाग घ्या. पण फॅकल्टीज- बहुतांश प्राध्यापिका अगदी मन:पूर्वक ते सगळं सांगायच्या आणि खूप आदर करायच्या. "मी तुमची शिक्षिका नाही तर सहकारी आहे, आपण इथे बरोबरीचे आणि सोबत असतोय" असा सूर माझ्या लाडक्या नागमणी राव मॅडमसह सर्वांचाच असायचा.
सुरूवातीच्या ओरिएंटेशन लेक्चर्समध्ये अभ्यासक्रमाची रूपरेषा- विषयाचा आवाका आणि मुख्य विषय सांगितले गेले. नंतर जनरल लेक्चर्स आणि स्पेशलायजेशन लेक्चर्स सुरू झाले. पहिल्या वर्षी ८-९ जनरल पेपर्स आणि तीनच स्पेशलायजेशनचे पेपर होते. त्यामुळे ६० जणांचा वर्ग मुख्यत: जास्त वेळ एकत्र असायचा. अभ्यासक्रमात सगळ्या प्रकारचे सामाजिक गटांची चर्चा होती- कामगार, ग्रामीण भागातले लोक, आदिवासी, भूमीहिन, महिला व बालक, शारीरिक विकलांग इ. त्यासोबत समाज कार्याच्या पद्धतींची चर्चा होती- गट कार्य, केस वर्क इ. शिवाय त्यासह समुपदेशन, तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती, मानसशास्त्रीय पैलू, संवाद कौशल्यं, सरकारी योजना, सार्वजनिक आरोग्य इ. इ. घटक होते. शिवाय लिंगभेद, अनेक प्रकारची असमानता, वंचितांचं शोषण, पर्यावरण असेही घटक होते. माझं स्पेशलायजेशन युआरसीडी (Urban and Rural Community Development) होतं. त्यात आम्ही १३ जण सहकार, ग्राम विकास, स्थलांतरण अशा विषयांवर चर्चा करायचो. ऑगस्ट सुरू होईपर्यंत ६० जणांमधले दोन- तीन जण सोडून गेले आणि वेटिंगवर असलेले दोन- तीन जण उशीरा आले.
माझ्यासोबत वाडिया कॉलेजमध्ये असलेली दृष्टिहिन गुंजना इथेही आली! बाकी कोणीच ओळखीचं नव्हतं. पण वातावरणच असं होतं आणि वेगवेगळे उपक्रम- ग्रूप असाईनमेंटस, प्रेझेंटेशन्स असे होते की, अगदी सगळ्यांसोबत हळु हळु ओळख झाली आणि लवकरच मैत्रीही झाली! जुलैमध्ये कॉलेज सुरू झालं आणि ऑगस्टमध्ये लोणावळ्याच्या भुशी डॅमची सहल झाली. खरं तर फार जास्त जणांशी मैत्री नव्हती झालेली. पण कदाचित म्हणूनच ती सहल ठेवली गेली असेल. स्टुडंट फोरमनेच तिचं आयोजन केलं. पहिल्या वर्षीचे व दुसर्या वर्षीचे एकत्र त्यात होते. सिनियर्ससोबतही हळु हळु मैत्री झाली. त्यांनी पहिल्या वर्षीयांचं वेलकम छान केलं. अनौपचारिक आणि सगळ्यांचा स्वीकार असलेलं वातावरण. प्रत्येकाच्या मनात असलेल्या शंका (inhibitions) जाव्यात ह्यासाठी अशा गोष्टी उपयोगी पडत होत्या. आपण कुठेतरी belong करतो हा भाव निर्माण होत होता. अशाच एका कार्यक्रमामध्ये मुलं- मुली आणि फॅकल्टीजही गाणी म्हणत होती. त्यावेळी संदीप बर्वेने ये रे ये रे पावसा हे गाणं अफलातून प्रकारे गायलं! अगदी आरडी बर्मन शैली, “मेरे नैना सावन भादो” आणि "कुछ तुम सोचो कुछ हम सोचे" च्या चालीमध्ये! खूप जबरदस्त! अशी खूप कलागुणांची उधळण बघायला मिळाली.
वर्गातल्या लेक्चर्सनी वेग घेतला. लेक्चर्सबरोबर स्किल लॅब सुरू झाल्या. सुरूवातीच्या दिवसांमध्ये इतरांना अगदी सहजपणे समोर येऊन बोलताना बघून हेवा वाटायचा की, मला हे कधी जमेल! मला कसं सगळ्यांपुढे येऊन सलग असं प्रेझेंटेशन करता येईल! अर्थात् माझ्यासारखे जणच जास्त होते, त्यामुळे दडपण असं आलं नाही. मराठी आणि इंग्रजी येत असल्यामुळे इंग्रजीला मराठी शब्द सुचवण्याची मला संधी मिळायला लागली. फॅकल्टीजला एखादा शब्द मराठीत हवा असेल तर माझं नाव घ्यायची सुरूवात झाली.
कर्वेमध्ये सगळी अध्ययन प्रक्रिया खूप सहभागावर आधारित होती. शिकवणार्या नागमणी राव मॅडम स्वत: म्हणायच्या- इथे वर्गात असं शिकण्यापेक्षा बाहेरचं पावसाचं वातावरण किती जास्त आनंदाचं आहे. पण म्हणून वर्गामधलं वातावरण तितकंच आनंददायी व्हावं, तितकीच मजा तिथे यावी असाही प्रयत्न केला जायचा. छोटे रोल प्लेज, ग्रूप टास्क्स किंवा रीडींग असाईनमेंटस ह्यामुळेही मजा यायची. अभ्यास त्यामुळे कंटाळवाणा कधीच वाटला नाही. उलट एक प्रकारे माझी अभ्यासाची भूक छान भागायला लागली. खूप वैचारिक खाद्य मिळालं. आणि कुठे काही अडलं तर हॉस्टेलवर सिनियर्स होतेच. एकदा IEC हा शब्द अडला. तेव्हा एका सिनियरने लगेच सांगितलं- Information, Education, communication! असं अनुभव आधारित शिकणं असल्यामुळे ते सोपं तर झालंच पण मनावर ठसलं.
हॉस्टेलबद्दल मनामध्ये सुरूवातीला नक्कीच भिती होती. की इथे रॅगिंग तर होणार नाही किंवा इतर मुलं त्रास तर देणार नाहीत ना अशी शंका होती. तसं काही झालं नाही. मुलं सगळीच तशी खूप वेगळी होती. काही थोडे शहरातले तर जास्त ग्रामीण भागातले. काही थोडे मध्यमवर्गीय कुटुंबातले तर बरेच जण वंचित समुदायांमधले. कोणी दगड फोडणार्याचा मुलगा तर कोणी शेतमजुराचा मुलगा. त्यामुळे सुरूवातीला सगळ्यांनाच थोडं नवीन होतं. कळत नकळत मनामध्ये पूर्वग्रहही होते. पण हळु हळु ते सगळे वाहून गेले. आणि एक सोबत शिकणारे विद्यार्थी असं नातं तयार झालं.
अर्थात् तरी हॉस्टेलची सुरूवात जडच गेली! रात्री मी लवकर झोपायचो पण बाजूला गोंधळ सुरू असायचा. मोबाईल तेव्हा बरेच कमी होते आणि इतके आवाज न करणारे होते. पण एफएम रेडिओ खूप चालायचे! ते उशीरापर्यंत सुरू असायचे. मग कानात कापूस आणि डोळ्यांवर रुमाल ठेवून झोपायचं! काही जण दादागिरी करायचेच! काही जण मजेशीर आवाज काढायचे! ऐकत राहावं अशा रांगड्या शैलीत बोलायचे! काही जणांची प्रेमाची शिवी ठरलेली असायची! असे ते दिवस. असे नवे मित्र आणि मैत्रिणीसुद्धा!
वाडिया कॉलेजमध्ये जवळची मैत्रीण अशी कोणी मिळाली नव्हती. काही मराठी मुली होत्या पण परकेपणा होता. पण इथे ती सगळी कसर भरून निघाली! बर्याच मुली जवळच्याच हॉस्टेलवर राहायच्या. काही मेसवरही सोबत असायच्या. त्यामुळे भेटी छान व्हायच्या! माझ्यासारखी लहान गावातून आलेली जी मुलं मुलींशी जवळून कधीच बोलली नाहीत त्यांना "मिस यू" म्हणणारी किंवा हातात हात धरून रस्ता ओलांडणारी मैत्रीण मिळाली! हासुद्धा खरं तर सूक्ष्म असा एक कल्चरल शॉक होता! पण मजासुद्धा होती. व्यक्तिमत्वात असलेली भिती- इनहिबिशन्स त्यातून दूर व्हायला लागले.
मला व इतर तीन जणांना फिल्ड वर्कसाठी "प्रथम" ही वस्तीमध्ये मुलांच्या शिक्षणावर काम करणारी संस्था मिळाली. विद्यार्थ्यांचे कल आणि क्षमता लक्षात घेऊन अशा संस्था त्यांना दिल्या जायच्या. बावीकर मॅडम फिल्ड वर्क मार्गदर्शिका मिळाल्या. आठवड्यातून दोनदा तिथे जायचं, त्या संस्थेचं काम समजून घ्यायचं, तिथल्या मुलांशी- शिक्षकांशी बोलायचं आणि छोटी छोटी टास्क्स करायची असं स्वरूप होतं. तिथे तेव्हा कर्वेचेच पास आउट- तात्या घनवट होते. फिल्ड वर्कनंतर त्याचे वृत्तांत लिहायचे. डायरी ठेवायची. अशा गोष्टी होत्या. कोणाला खूप अंगावर येणार्या संस्थाही दिल्या होत्या. जसं शेवटच्या टप्प्यात असलेल्या कँसर रुग्णांची शुश्रुषा करणारी संस्था. किंवा बौद्धिक अक्षम मुलांसोबत काम करणार्या शाळा. इतरांकडून तिथले अनुभव कळायचे. असं खूप शिकायला आणि तितकंच एंजॉय करायलाही मिळायला लागलं. अगदी पहिल्या महिन्या- दोन महिन्यातच खूप छान वाटलं- हे दोन वर्षं अगदी स्वप्नवत असणार आहेत ही जाणीव झाली!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस ३: परीक्षेच्या पूर्वसंध्येला हॉस्टेलवरची तणावपूर्ण शांतता -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 4 ऑगस्ट 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आठवणी आहेत तुमच्या. 🙂
छान आठवणी आहेत तुमच्या. 🙂