✪ "कर्वे समाज सेवा संस्था"- Karve "way of life"
✪ २० वर्षांपूर्वीचा तो जुलैमधला एक दिवस
✪ अध्ययन, शिक्षण आणि सहजीवनाचं वेगळं पर्व
✪ हॉस्टेलचे मित्र आणि सोबत शिकणार्या व शिकवणार्या मैत्रिणी
✪ फॅकल्टीज, त्यांचा दरारा आणि त्यांची शिकवण
✪ अनेक प्रकारे पडणारे पैलू
दर वर्षी जुलै महिन्यात कधी तरी "तो दिवस" आठवतोच! अगदी काल परवा झाल्यासारखे ते प्रसंग डोळ्यांपुढे येतात. मनाला वाटतं की, अगदी नुकताच घडलेला हा प्रसंग! पण बुद्धी सांगते की, ४ जुलै २००६ म्हणजे तब्बल २० वर्षं झाली त्या गोष्टीला! विश्वाससुद्धा बसत नाही! पुण्यातल्या कर्वे समाज सेवा संस्थेमधली दोन वर्षं म्हणजे आयुष्यातली अत्यंत चैतन्यमय अशी दोन वर्षं! तिथे पूर्ण केलेलं एमएसडब्ल्यू (मास्टर इन सोशल वर्क) अतिशय वेगळा आणि समृद्ध करणारा अनुभव. खूप काही शिकवून जाणारा आणि अनलर्नसुद्धा करणारा. अनेक प्रकारे पैलू पाडणारा! त्या विलक्षण प्रवासाची सुरूवात झाली ४ जुलै २००६ ला संचालकांच्या सत्रातून.
आजही डोळ्यांपुढे येतं ते दृश्य- कर्वेनगरमधलं डोंगरावरचं कॉलेज! चढाचा रस्ता. हिरवागार आणि शांत परिसर. कॉलेजमधला पटेल हॉल! घाईघाईमध्ये सगळे जण पोहचत आहेत! आतमध्ये सगळे बाक भरून गेले आहेत. काही जण मागे ठेवलेल्या बैठ्या टेबलवर बसले आहेत. काही उशीरा पोहचत आहेत! पाऊस आणि मस्त ढगाळ वातावरण! डॉ. वालोकर सरांचं व्याख्यान! आणि तिथून सुरू झालेली सुरूवातीची सत्रं (ओरिएंटेशन लेक्चर्स). वेगवेगळ्या विषयांवरची प्राध्यापकांची व्याख्यानं! समाज सेवा म्हणजे काय, मानसशास्त्र, समानता, समता, विकासाची परिभाषा, स्त्रीवाद! ह्या ओरिएंटेशन लेक्चर्सपासून एक प्रकारे दोन वर्षांची वेगळी मैफिल सुरू झाली! नागमणी राव मॅडमचं लेक्चर सर्वाधिक भावलं.
माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील. ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
एक एक गोष्ट किती उत्तम होती हे हळु हळु कळत गेलं. विद्यार्थ्यांचे केलेले वेगवेगळे गट. गटाने मिळून करण्याच्या गोष्टी. नंतरचे ओरिएंटेशन व्हिजिटस- वेगवेगळ्या विषयांमध्ये सामाजिक काम करणार्या संस्थांना दिलेल्या भेटी. काही भेटी खूप लक्षात राहिल्या. बौद्धिक अक्षम- specially abled मुलांवर काम करणारं प्रिझम फाउंडेशन, नळ स्टॉप जवळचं सेंट क्रिस्पिन्स होम आणि अशा त्या संस्था! आपापल्या गटामध्ये एकत्र जमून तिथे जायचं, फॅकल्टी त्या संस्थेची माहिती देणार, तिथले अधिकारी मुला- मुलींसोबत संवाद करणार, चर्चा आणि परत असं ह्या भेटींचं स्वरूप! त्यात होणार्या गमती जमती डोळ्यांपुढे येतात! सोमवारी मुंबईवरून येणारे डायरेक्ट त्या ठिकाणी यायचे. कोणी रस्ता चुकायचे. तेव्हा आमच्यापाशी गूगल नव्हतं! मदतीला फक्त मित्र- मैत्रिणी असायचे. शिवाय प्रत्येक गटामध्ये मराठी किंवा हिंदी न येणारे आणि मराठी- इंग्रजी येणारेही मुलं- मुली असायचे. ह्या सोबत येण्या- जाण्यातूनही मैत्री व्हायला मदत होत होती. शिवाय डबा खाल्ल्यानंतर खरकटं कोण उचलतं आहे, कोण ती जागा साफ करत आहेत, ह्यामधून नकळत जेंडर संवेदनशीलता उमगत होती.
आज कळतं की, वर्गामध्ये आणि औपचारिक संरचनेमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जात होत्याच, पण त्याही पलीकडे सहशिक्षणामध्ये- सहजीवनामध्येही अनेक गोष्टी शिकवल्या जात होत्या. वेगवेगळे गट आणि गटांमधून करण्याच्या कृती- छोटी मोठी प्रेझेंटेशन्स, असाईनमेंटस, चर्चा- हे सुद्धा एक गट कार्य (ग्रूप वर्क) होतं! वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आणि अनुभवांचे मुलं- मुली एकत्र शिकत होते. पहिल्या वर्षीचे वेगवेगळे विषयसुद्धा छान होते- गट कार्य, सार्वजनिक आरोग्य, संशोधन, समाज कार्य, केस वर्क, मानसशास्त्र असे त्यांचे आशय! “ये जीवन है, इस G1 का यही है रंग रूप" हे गाणं तेव्हा प्रत्येकाला आठवायचं!
फॅकल्टीजचा खूप दरारा होता. शिवाय सिनियर्सकडून अनेक गोष्टी कानावर पडायच्या- “ती फॅकल्टी तर लय स्ट्रिक्ट!” काही फॅकल्टीजची तर दहशतच होती! पण ती दहशतसुद्धा मुलांना अधिक सहभागी करण्यासाठी आहे, असं वाटायचं. थोड्या दिवसांमध्येच फॅकल्टीज- प्राध्यापक आणि जास्त प्राध्यापिका- सोबतचं "आईस ब्रेकिंग" झालं आणि चांगला "रॅपो बिल्ट" झाला! नागमणी राव मॅडम, गीता राव मॅडम, शर्मिला सहदेव मॅडम, मायदेव मॅडम, उज्वला मसदेकर मॅडम, रूमा बावीकर मॅडम (त्यांनी शिकवलेल्या असोशिएटिव्ह लर्निंगमुळे लक्षात राहिलेला तो पपी), राजुस्कर मॅडम, अनुराधा पाटील मॅडम, महेश ठाकुर सर (सगळ्यांचे शाहरूख खान आणि “पुरानी जीन्स और गिटार” फेम), करूणा सर आणि इतर हळु हळु परिचित झाले. त्यांचे सत्र, चर्चा, रोल प्लेज, स्किल लॅब आणि रिसर्च लॅब! सगळे अगदी आपुलकीने आणि बरोबरीने वागवतात, ही जाणीव सुखद होती. शिक्षकेतर कर्मचारी- ग्रंथपाल हेसुद्धा आपुलकीने वागायचे. स्पेशलायजेशन्सची लेक्चर्सही सुरू झाली! माझं युआरसीडी (समुदाय विकास) होतं. तिथे स्पेशलायजेशनचा वेगळा गट व वेगळं सह- शिक्षण सुरू झालं. हे लिहीताना सर्वांबद्दल मनामध्ये कृतज्ञता येते.
२० वर्षांपूर्वीचा तो काळ अजून डोळ्यांपुढे उभा राहतो! आज मी आणि अनेकांसाठी कर्वेमधले दिवस हे "Life’s way” निश्चित करणारे दिवस ठरले. तिथे खूप जण जीवाभावाचे भेटले. करिअरला एक स्पष्ट दिशा मिळाली. एक आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळाली. पुढे अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेले किंवा रूढ अर्थाने समाज कार्यामध्ये राहिले नाहीत. तरीही कर्वेमध्ये झालेली जडण- घडण नेहमी त्यांना वेगळी दिशा देत राहिली.
हॉस्टेल! हॉस्टेलवर राहण्याचा माझा पहिलाच अनुभव! खूप दडपण होतं. पण वातावरणच असं होतं की हॉस्टेलवरही छान मैत्री झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधली आणि काही महाराष्ट्राबाहेरची मुलं! शिवाय पहिल्या वर्षी काही अडलं तर मदतीला सिनियर्स. त्यामुळे तिथले दिवसही तितकेच एंजॉय केले. हॉस्टेलच्या मित्रांनी खरं तर सामाजिकीकरण (सोशलायजेशन) केलं. वर्गात जे शिकत होतो, ते त्यांनी प्रत्यक्षात केलं! आणि सोबत शिकणार्या मैत्रिणींनी स्त्रियांबद्दल संवेदनशीलता निर्माण केली आणि ग्रो होण्यासाठी मदत केली.
२० वर्षांपूर्वीचा ह्या रम्य आठवणी ह्या लेखमालेत लिहीणार आहे आणि जणू पुन: ते दिवस अनुभवणार आहे. सगळं इतकं छान असलं तरी वाटेतले अनेक टप्पे अवघड होते! “केस वर्क" आणि "रिसर्च" पेपरच्या आदल्या रात्री हॉस्टेलचं वातावरण कमालीचं तणावाचं होतं! पहिल्या वर्षी अंतर्मुख असलेला मी मित्रांची दादागिरी सहन करत होतो! पण वर्षभरात हे चित्र बदललं!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस २: भुशी डॅम सहल आणि फिल्ड वर्कची सुरूवात
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 29 जुलै 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया
शैक्षणिक घडवणूक
मार्गी,
शैक्षणिक घडवणुकीचे कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवस म्हणजे सोनेरी कालखंड असतो. पाठ्यक्रम भरगच्च असेल तर जरा ओढाताण होते. पण एकंदरीत आयुष्य आस्वादनीय असतं.
हे विधान वाचून अंमळ गंमत वाटली :
सामाजिक सेवेत स्त्रीवाद कशाला आणायला पाहिजे, असा प्रश्न पडला. तसंच समता आणि समानता यांच्यात नेमका फरक काय असेल यावर जरावेळ डोकं खाजवलं. पण तागास तूर लागला नाही. बहुतेक इंग्रजी संज्ञा कळल्या तर अधिक प्रकाश पडेल.
आ.न.,
-गा.पै.
वाह MSW विषयी ,तेही कर्वे…
वाह MSW विषयी ,तेही कर्वे महाविद्यालयाबबत वाचायला आवडेल.डेक्कन.एफसी,सपा,पुणे विद्यापीठ येथे शिकायचे राहिलेच😅
इथल्या खुप हुशार लोकांचा कायम आदर वाटायचा.आता लेकीने तरी इथे शिकावे असे वाटते.
धन्यवाद
धन्यवाद!
@ गा. पै. जी, समानता- इक्वलिटी, समता किंवा समनीयता- इक्विटी. स्त्रीवाद आणि इतर विषय हे खूप महत्त्वाचे होते. समाजातले प्रश्न समजून घेण्यासाठी तो पाया लागतो.
@ भक्ती जी, धन्यवाद. :)
पाया पक्का करणे
In reply to धन्यवाद by मार्गी
मार्गी,
हाच पाया पक्का करण्यासाठी जमल्यास कृपया मदत करावी. सुरुवात स्त्रीवादापासून करूया. स्त्रीवादाचा सामाजिक सेवेशी नेमका संबंध काय?
आ.न.,
-गा.पै.
येऊ द्या....
In reply to पाया पक्का करणे by गामा पैलवान
ही चर्चा वाचायला आवडेल.
येऊ द्या....
उत्तम
सुरुवात. पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
MSW अभ्यासक्रमाबद्दल अधिक विस्ताराने वाचायला आवडेल.
बराच खडतर आहे म्हणे.
In reply to उत्तम by नंदन
बराच खडतर असल्याचं ऐकिवात आहे.
-गा.पै.
MSW अभ्यासक्रमाबद्दल अधिक…
MSW अभ्यासक्रमाबद्दल अधिक विस्ताराने वाचायला आवडेल. + १
समाज सेवा म्हणजे नक्की काय ?
समाज सेवा म्हणजे नक्की काय ?
>>>सोबत शिकणार्या…
>>>सोबत शिकणार्या मैत्रिणींनी स्त्रियांबद्दल संवेदनशीलता निर्माण केली आणि ग्रो होण्यासाठी मदत केली.
आपल्या लहानपणी आजुबाजुला आई, आजी, पणजी, काकू, मावशी, आत्या, बहिणी, वहीनी घरात आणि शेजारी स्त्रिया नव्हत्या? की त्यांनी तुमच्यात संवेदनशीलता रुजवली नाही? आणि ग्रो मोठा होण्यास मदत केली नाही?
राज (जाणण्यास उत्सुक) जोशी