Skip to main content

अपत्यहीन जोडप्याला छळण्याचे मार्ग

लेखक आगाऊ म्हादया यांनी बुधवार, 29/07/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

"एखाद्या जोडप्याला बाळ होऊ देणं अथवा न देणं हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे",असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे... "लग्नाला 4, 5, 8, 9 वर्ष झाली तरी घरी अजून पाळणा हलला नाही, असं कसं?"हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे. "एखादं मूल झाल्याशिवाय स्त्रीचं स्त्रीत्व पूर्ण होत नाही असं जर तुमचं मत असेल", तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. "करिअरमध्ये स्त्री कितीही उच्च असली, भले ती डॉक्टरेट झालेली असली, पण तिला जर मूल नसेल, तर समाजात तिची किंमत कस्पटासमान आहे" असं जर तुमचं मत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार लोकहो, आज मी घेऊन आलोय. आनंदी विवाहित जोडप्याला किंवा विवाहित आनंदी जोडप्याला सुखानं न जगू देण्याचा क्रॅश कोर्स. ह्यामध्ये समोरच्या जोडप्याला मूल नसणं हेच कसं प्रत्येक समस्येचं मूळ आहे, हे आपल्याला पटवून द्यायचं आहे आणि त्यासाठीच आपण कोणकोणते मुद्दे मांडू शकतो याच्यावर आपण चर्चा करूया. कारण मूल नाही तर काहीच नाही ना? ते समाजात राहूच कसे शकतात? फारच मोठी चूक केलेली आहे त्यांनी. तर सगळ्यात पहिले आपण आधी आडून आडून जाणून कसं घ्यायचं की समोरच्या जोडप्याला मूल आहे की नाही, हे बघूया. कारण डायरेक्ट वार केला तर कदाचित त्यांना राग येऊ शकेल. कारण, मूल होऊ न देणं किंवा मूल हवं तेव्हा, हवं त्या वेळेत होऊ देणं हा त्यांचा पर्सनल निर्णय कसा काय असू शकतो? खरं तर हा विषय किंवा ह्या विषया संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त त्या मुलाच्या आई-वडिलांना आणि मुलीच्या आई-वडिलांना असला पाहिजे. पण समाज म्हणून आपण हे ॲक्सेप्टच करू शकत नाही. त्यामुळे ह्या क्रॅश कोर्समध्ये आपण हिरिरीने सहभाग घेऊया आणि समोरच्याच्या भावनांचा महाल उध्वस्त करायला शिकूया. नमस्कार मंडळी. समोरच्या जोडप्याला काही अपत्त्य आहेत की नाही याचा आधी अंदाज बांधूया. जर रोजच्या ओळखीतली, रोजच्या पाहण्यातली जोडपी असतील, तर ही पहिली स्टेप करण्याची गरज नाही. तुम्ही थेट त्यांच्यावरती आघात करू शकता, त्यांचा अपमान करू शकता किंवा त्यांना टोचेल असं काहीतरी नक्कीच बोलू शकता. पण खूप दिवसांनी भेटत असाल किंवा तुमचा त्यांच्याशी काहीही संबंध नसेल, पण केवळ तुमच्यातला किडा तुम्हाला स्वस्थ बसू देत नसेल, तुमची सामाजिक जाणीव फारच तीव्र असेल तर अशा वेळेस आपण काय करूया; आधी हे समजून घेऊयात त्यांना मुलं आहेत की नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करता येईल, की ती जी मुलगी आहे, विवाहित जोडप्यातली, तिला आपण विचारूया की काय मग कसं चाललं आहे आयुष्य? आणि आणखीन काय काय चालू आहे तुझं? तिच्या रुटीन बद्दल जाणून घेण्याची आस्था दाखवत आपण हे मात्र नक्की जाणून घ्यायचं, की ह्या रुटीनमध्ये ती अशा कुठल्या गोष्टीचा उल्लेख करते आहे का, की ज्याचा संबंध बाळाशी आहे. जर तिने नाही केला...तर सापडला गडी! आता मात्र आपल्या स्टेप टू, थ्री, फोर मध्ये जे काही आघात आपल्याला त्या बाईवर करायचे आहेत, ते करायला आपण मोकळे आहोत. हेच जर पुरुषासोबत आपल्याला बोलायचं असेल, तर फार काही नाही, काही मुलं वगैरे आहे का असं तुम्ही सरळ विचारू शकता किंवा घरी कोण कोण असतं हा प्रश्न विचारायचा. आता त्याच्यात सुद्धा एखादा दीडशहाणा निघेलच जो सांगेल मी एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. त्यामुळे घरी कोण कोण असतं या प्रश्नाचे उत्तर इतकं लांबेल की त्याच्यात बाळ, मुलं हे शब्द आले का नाही हे आपल्याला कळूच शकणार नाही. मग अशा वेळेस जर हा उल्लेख आला नाही तर मग आपण असं विचारू शकतो की तुम्ही दोघं एकत्र कुटुंब पद्धतीतच राहता का कुठे वेगळा फ्लॅट वगैरे घेतलाय? जर घेतला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे विचारता येईल, मग तिथे कोण कोण असतं बरं? आता इथे सुद्धा जर मूल किंवा बाळ हा उल्लेख आला नाही तर आपण क्रॅश कोर्स मधली पहिली पायरी अतिशय उत्तम रित्या चढलेलो आहे आणि दुसरी पायरी जिथून त्या जोडप्याला गिल्ट देणे, अपमान करणे, त्यांना रडवणे, त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये एनक्रोचमेंट करणे म्हणजे अतिक्रमण करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण सिद्ध झालेलो आहोत. आता एक गोष्ट आपल्यासारख्या समुदायांना ही मान्य केली पाहिजे की आपली सामाजिक जाणीव तीव्र आहे, पण एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल, तर त्याच्यात पुरुषाचा सहभाग अगदीच नाममात्र असतो. त्यामुळे त्या जोडप्याला मूल का होत नाहीये, याचं दोषारोपण पूर्णतः त्या स्त्रीवर आपल्याला करायचं आहे, एवढं सगळ्यात पहिले आपण घोकून घेऊ. घोकून घोकून पाठ करायला हवं. एकदा का हे पाठ झालं की मग ती जेव्हा केव्हा एकटी सापडेल तेव्हा मग आपल्याला तिला दोन-तीन गोष्टी विचारायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे- १. मग बाळाचा प्लॅन कधी आहे? यावर तिचं उत्तर काहीही जरी असलं, तरी मूल होण्यासाठी स्त्रीलाच कसं आग्रही असावं लागतं, नवऱ्याला भुलवून त्याच्यासमोर शृंगार करून तुलाच कसं मूल पदरात पाडून घेता यायला हवं, हे धडे त्यांना देता येतील. झालंच तर मला कशी दोन मुलं आहेत, त्यातलं पहिलं कसं नैसर्गिक क्रमानं झालं आणि दुसरं मीच कसं मला हवं होतं म्हणून पदरात पाडून घेतलं, याच्या सुरस आणि कल्पना विस्तार केलेल्या कहाण्या त्या व्यक्तीला ऐकवता येतील जेणेकरून तिच्या मनातलं दुःख बाजूला सारून तिला तुम्ही दिलेली गिल्ट नीट स्वीकारता येईल. आता समजा तुम्हाला ती व्यक्ती एकटी सापडतच नाहीये. फारच गृहकर्तव्यदक्ष असल्यामुळे ती वेगवेगळी कामं करते आहे ती मुलगी. तर आता मग तेव्हा तिच्याशी हे विषय कसे काढणार बरं? मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल की जेव्हा आपल्या घरी काही कुळाचाराचे कार्यक्रम असतील तर जेव्हा तुम्ही ओटी भरत असाल, तेव्हा आऊट ऑफ नोव्हेअर, काहीही संबंध नसताना पुढच्या वेळेस...... असं म्हणून त्याच्यापुढे तुम्हाला जे जे काही मनातनं मांडायचं आहे, जे काही मनातनं टोचणी त्या मुलीच्या मनाला तुम्हाला लावायची आहे ती लावता येईल. मग एक गोंडस बाळ असू दे, एखादी दोन वेण्या बांधलेली मुलगी असू दे, असं काहीतरी आपल्याला नक्कीच बोलता येईल जेणेकरून सार्वजनिक आयुष्यात सुद्धा ती मुलगी आपल्याला एकटी सापडलेली नसली, तरी सर्वांसमोर आपल्याला तिचा उपमर्द नक्की करता येईल. आता हे सगळं करताना आपल्या घरी परिस्थिती काय आहे? आपल्या सासूबाई कशा चांगल्या किंवा वाईट होत्या? आपल्याच मुलाचे किती घटस्फोट झाले आहेत किंवा एक गंडलेलं प्रेम प्रकरण अस्तित्वात आहे, किंवा आपल्या मुलाला अपत्य झाल्यानंतर ती नवरी मुलगी चुना लावून छानपैकी पळून गेलेली आहे,अशा सर्व गोष्टी तुम्हाला सोईस्कररित्या विसरता यायला हव्यात म्हणजे समोरच्या मुलीला, जी आपल्या समोर छानपैकी निर्मळ मनाने उभी आहे, तिला गिल्ट देण्याचा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता येईल. हे करताना त्या मुलीचं मत आपल्याबद्दल वाईट व्हायला नको, एवढी काळजी जर तुम्हाला खरंच असेल तर मात्र हे सगळं बोलताना कंटिन्यूअसली सलगपणे एक वाक्य अगदी सरधोपटपणे वापरता यायला हवं की, बघ बाई, मला काही नाही पण तुझीच काळजी वाटते, तुझं वय निघून चाललं आहे किंवा आजकाल गर्भधारणा होताना खूप त्रास होतात. म्हणून मला तुझी कशी काळजी आहे हे मात्र तुम्हाला सारखं सारखं सारखं सरधोपटपणे बोलता यायला हवं. म्हणजे त्या मुलीला वाईट जरी वाटत असलं तरी ती मनातून हे मानायला बांधील होईल की नाही नाही ही समोरची व्यक्ती खरंच मनापासून बोलते आहे. आता आपण एवढं सगळं करून सुद्धा समोरच्या समोरच्या मुलीच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नसेल, तर मात्र आपला पवित्रा चुकतो आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. आता तिच्या डोळ्यातून पाणी झिरपावं, तिच्या तिचे डोळे पाण्याने डबडबावेत म्हणून काहीतरी करणं फारच गरजेचं आहे. मग अशा वेळेस तिनं करियरमध्ये कितीही उंची गाठली तरी माझ्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मी तुझ्याबद्दल काही बोलताना तुला मूल नाही हाच विषय कसा वारंवार येईल आणि तुझ्यामुळे आम्हा सर्वांची सामाजिक पत थोडीफार का होईना कमी होत आहे, याची जाणीव तुम्हाला त्या मुलीला करून देता यायला हवी. आता मात्र तिच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील आणि आपण नक्कीच दुसऱ्या पायरीवरती आलेलो असू. आपला या क्रॅश कोर्स मधला सर्वात महत्त्वाचा भाग आत्तापर्यंत शिकून झालेला आहे. आता पुढच्या काही ॲडव्हान्स टिप्स आहेत, त्या आपण तिसऱ्या किंवा झालंच तर चौथ्या पायरीवरती बघूया. तिसऱ्या पायरीवर आल्यानंतर कदाचित असं होऊ शकेल की ती मुलगी चांगुलपणानं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करील की कसे आम्ही अजूनही बाळ होण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, पण होत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही फारच उदारता दाखवत किंवा उदारमतवादी दृष्टिकोन घेऊन असं म्हणू शकाल की, "नवऱ्यामध्ये तुझ्या काही कमतरता आहे का? त्याला कुठल्या प्रकारची मदत हवी आहे का? माझ्याकडे काही पुस्तकं आहेत. माझ्या अनुभवानुसार मी त्याला काही माहितीपर सत्र देऊ शकतो. त्याच्यासमोरील समस्यांचं दुरीकरण किंवा निराकरण करू शकतो. तुला जर वाटत असेल, तर मी नक्की त्या तुझ्या नवऱ्याशी बोलेन" किंवा आपल्या खिशात दीड दमडी जरी नसली तरी मी तुझ्यासाठी कशी पैशांची तरतूद करू शकते किंवा शकतो याची जाणीव त्या मुलीला करून द्या. म्हणजे तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली आणि स्वतःच्या मूल जन्माला न घालण्याच्या किंवा न घालू शकण्याच्या परिस्थितीत परिस्थितीला कंटाळून तिच्या रागाचा, तिच्या भावनांचा उद्रेक होईल आणि पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांच्या कडा नुसत्या पाणावणार नाहीत तर तिचे पाण्याने डबडबून वाहायला लागतील आणि आपण तिसरी पायरी ओलांडून चौथ्या पायरीवरती पोहोचलेलो असू. आता ही चौथी पायरी कोणासाठी आहे सांगतो. समजा तुम्ही त्या समोरच्या जोडप्याच्याच वयाचे असाल आणि इतके वर्ष प्रयत्न करून तुम्हाला मात्र आता एखादं मूल झालेलं आहे आणि त्या समोरच्या जोडप्याला नाही झालेलं, तर या कोर्सच्या अतिशय आदर्श टप्प्यावर तुम्ही आहात. आता जगातलं सगळं तुम्हालाच कळतं, अपत्य जन्माला घालणं हे किती सोपं काम आहे, याच्याबद्दल तुम्ही सतत त्या मुलीला लेक्चर देत राहायला हवं. अगदीच वेळ पडली तर तुझा नवरा जर मूल जन्माला घालू शकत नसेल तर तूच त्याच्या अंगावर उताणी पडून कसं मूल जन्माला घालता येऊ शकतं, ही माहिती तिला अगदी सविस्तर द्यावी. ती मुलगी जेव्हा तुम्हाला चार-सहा महिन्यांनी भेटत असेल, अतिशय उत्साहाने तुम्हाला ती भेटायला आली की सगळ्यात पहिले माझ्या मुलानं काल शाळेमध्ये काय गंमत केली, काल तो कसा नटला होता, त्याला मी कोणते कपडे घातले होते ह्याबद्दल अगदी हिरीरीने सांगावं. असे चान्स आपण सोडले नाहीत म्हणजे नक्कीच त्या मुलीला प्रचंड गिल्ट आणि डिप्रेशन येईल. एवढं जमलं की आपण या क्रॅश कोर्सच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो असतो. खरं तर हा क्रॅश कोर्स इथेच संपलेला आहे, टप्पे वाढले तर ऍडव्हान्स कोर्सची शाळा मला घ्यावी लागेल. ती कदाचित मी नंतर कधीतरी घेईन. हा लेख जर इथपर्यंत तुम्ही वाचला असेल, तर माझं तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे, की या लेखातील उपरोध समजून घेण्यात यावा आणि ही गोष्ट किंवा या गोष्टीची खूणगाठ आपण मनाशी बांधायला हवी, की मूल जन्माला घालणं अथवा न घालणं हा त्या जोडप्याचा अत्यंत पर्सनल विषय आहे. त्या जोडप्याचे डोळे उघडणं, त्यात अंजन घालणं याचे मक्तेदार आणि ठेकेदार आपण कुणीही नाही किंवा असू शकत नाही. त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम त्या दोघांचे रिस्पेक्टिव्ह आई-वडील अवश्य करतील किंवा करतच असतात. आपण ही सामाजिक जबाबदारी स्वतःहून स्वीकारण्याची काही एक गरज नाही. आपण जेव्हा त्या जोडप्याला, वर चार-पाच पायऱ्या ज्या काही मी सांगितल्या त्यानुसार वारंवार खोदून खोदून किंवा आडून आडून विचारतो त्यांच्या अपत्यप्राप्तीबद्दल, तेव्हा त्यांना होणारं दुःख, त्यांना येणारी गिल्ट ही नक्कीच वाढत असते आणि या सगळ्या आपल्याला मात्र एक गोष्ट बिलकुल माहीत नसते, की ते जोडपं किती वर्ष अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे? ती मुलगी कोणकोणते उपचार स्वतःवर करून घेत आहे? किती सोनोग्राफ्या तिनं मनाच्या विरुद्ध जाऊन केल्या, किती हॉर्मोनची इंजेक्शने घेतली. आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, फ्लॉवर रेमेडी किंवा अशा असंख्य प्रकारच्या उपचार पद्धती कुणी ना कुणी सांगितल्यामुळे कोणाच्या ना कोणावरती असलेल्या विश्वासामुळे त्या जोडप्यानं स्वतःवरती त्यांचे उपचार घेतलेले असतील, हे आपल्याला ठाऊक नसतं. त्यानंतर दर महिन्याला जेव्हा त्या स्त्रीला पाळी येते, तेव्हा आपले अनेक कष्ट पुन्हा एकदा वाया गेल्याचं किंवा फलद्रूप न झाल्याचं दुःख त्या जोडप्याला वारंवार होत असतं. सेक्स ह्या प्रकारातील आनंद कधीच संपलेला असतो, कारण तो आता रिझल्ट ओरिएंटेड झालेला असतो. ते दर महिन्याला एका विचित्र मानसिक अवस्थेतून जात असतात. पुन्हा एकदा उभारी घेऊन नव्याने प्रयत्न करीत असतात अपत्यप्राप्तीसाठी. दर थोड्या दिवसांनी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा निगेटिव्ह येते तेव्हा मनाची घातलेली समजूत, पाळी येते की नाही ते बघू मग ठरवू असं मानून कमी केलेलं दुःख सांगायला ते आपल्यापर्यंत येत नसतात. या सगळ्यामध्ये समाज म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं, ज्या आजचा मॅच्युअर समाज, आजचा सुशिक्षित समाज अजिबात करत नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आणि मत आहे. तर वारंवार हे दुःख आणि गिल्ट त्या दोघांना न देता त्या जोडप्याचं आयुष्य सुकर करायचं असेल आपल्याला, तर आपण वर सांगितलेल्या चारही पायऱ्या नाही चढलो तरीसुद्धा त्या दोघांचं आयुष्य खूप सोपं होईल आणि समाजाशी किमान झगडण्यात त्यांचे जे कष्ट आणि मानसिक शक्ती खर्च होते, तिला आळा घालता येईल. प्रसंगी मूल होत नसल्याची एंग्झायटी जी त्यांच्या परफॉर्मन्स वरती, सेक्शुअल परफॉर्मन्स वरती प्रभाव टाकत असेल, तर किमान ती कमी होईल आणि त्या जोडप्याला अपत्त्यप्राप्ती होण्याची शक्यता वाढीस लागेल. याशिवाय मूल जन्माला घालण्यात पुरुषाचाही खूप वाटा असतो. त्यामुळे वरीलपैकी कुठलीतरी पायरी चढण्याची जर तुम्हाला इच्छा झाली, तर किमान त्या पुरुषाच्या परफॉर्मन्सला, त्याच्या सिमेन मधल्या स्पर्म काउंटला सुद्धा महत्त्व द्या आणि त्या जोडप्याशी अतिशय वाईट पद्धतीने बोलून जेव्हा तुम्ही त्यांना दुःख देत असाल, तेव्हा त्या मुलाला सुद्धा काहीतरी त्रास असू शकतो. एवढं मात्र नक्की कन्सिडर करा, कारण मूल जन्माला घालण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही किंवा त्या दोघांची मूल जन्माला घालणं ही जबाबदारीच नाही, तर तो त्या दोघांचा पूर्णतः ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे असं एखादं जोडपं जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तावडीत सापडलं, तर कुठल्या दिशेनं आपलं संभाषण न्यायचं याची जाणीव तुम्हाला झाली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो.

-आगाऊ म्हाद्या

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1032
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

लेखनविषय आणि लेख दोन्ही आवडले. आपण लिहिलेले वाचून सहज अशी चौकशी करणाऱ्यांपैकी कोणाला सुबुद्धी झाली तर चांगलंच आहे. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.


In reply to by श्वेता व्यास

सुबुद्धी व्हावी ह्या आशेनेच लिहीलं आहे. पण सोमि वरून पाठवले की,आम्हालाच बोललास असा समज करून घेणारेही आहेतच. 


एखाद्या जोडप्याला बाळ होऊ देणं अथवा न देणं हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.

१०० % सत्य

परंतु हा निर्णय त्यांनी पूर्ण विचारांती घेतलेला असला पाहिजे.

याचे दोन पैलू आहेत. 
१ ) आपल्याला मूल  हवं आहे पण ते होत नसले तर बरीच जोडपी आम्हाला मुलंच नको हे विधान ढाल म्हणून वापरतं. कारण समाजातील भोचक माणसांच्या नको त्या कुशंकांना उत्तर देण्याचा त्रास वाचतो.  

२) बरीच जोडपी अशी आहेत ज्यांना मुलाला जन्म देण्यापासून त्यांचे एकंदर पालनपोषण आपण करू शकू कि नाही याबद्दल मोठ्या प्रमाणावर शंका असतात.

A ) स्त्रियांच्या बाबतीत लग्न झाल्यावर त्यांनी नोकरी बदललेली असते किंवा करियर मध्ये स्थित्यन्तर झालेले असते मग मूल झाल्यावर असे स्थित्यंतर करून परत चालत्या गाड्याला खीळ घालायची भीती वाटत असते. आई किंवा सासू एकतर त्यांच्या बरोबर येण्याची शक्यता नसते किंवा ते आलेले नवरा बायकोला झेपणारे नसते. 
मग दोघांच्या संसारात मूल जन्माला घालून  होउ शकणाऱ्या त्रासाबद्दल  त्यांना एक भीती वाटत असते. प्रत्येक जोडप्याचे असे वेगवेगळे प्रश्न असू शकतात आणि याचे निराकरण त्या  जोडप्याने आपल्या ( दोघांच्या) आईवडिलांबरोबर सविस्तर चर्चा करूनच सोडवायचे. बाकी तिसऱ्या माणसाचा यात फारसा संबंध नसतो.        

B )  यात मुलाच्या पोषणासाठी लागणारे  आर्थिक गणित आपल्याला बसवता येईल का?  या आर्थिक गणिताची भीती घालायला आर्थिक सल्लगार कोपरयकोपर्यावर बसलेलं असतात. आजची पिढी FIRE Financial Independence, Retire Early या मानसिकतेने वागताना सहज दिसते. मग आपल्याला निवृत्त होण्यासाठी किती पैसे लागतील याचे मोठे मोठे हिशेब करून हे सल्लागार सल्ले देतात  कि आज आपले वय २८ आहे जर आपल्याला ४० व्य वर्षी निवृत्त व्हायचे असेल तर आपल्याकडे १० कोटी रुपये संचित निधी असायला हवा. या जोडप्याने हिशेब केला कि लक्षात येतं कि हा संचित निधी जेमतेम साडे तीन कोटी पर्यंत पोचेल. मग आपल्याला मूल  कसे परवडेल?                
आजकाल मोठ्ठ्या मोठ्या चकचकीत शाळा आजूबाजूला दिसतात त्यांची के जी किंवा पहिलीची फी २ लाख रुपये वर्षाला असते. बाकी इतर खर्च लाख रुपयांपर्यंत जातो  आता हे ३ लाख रुपये ( २५ हजार रुपये महिना) आपल्याला परवडतील का? आणि हा खर्च  वाढतच जाणार आहे. निदान मुलाचे पदवीपर्यंतचे शिक्षण आपल्याला करायला लागेलच. पुरुष २८ चा असेल तर पुढची २२ वर्षे म्हणजे ५० वयापर्यंत हा खर्च केल्यास  FIRE (Financial Independence, Retire Early) आपल्याला कसे झेपेल?   हि चिंता ही  असते.
अशा स्थितीमुळे बरीच जोडपी मूल तर हवं आहे पण आपल्याला झेपेल का? किंवा परवडेल का? या विचाराने मूल होऊ देणे पुढे ढकलत असतात.    

क्रमश:     


एकदा ट्रेन ने जात असताना माझ्या समोर एक सिनीयर जोडपे बसले होते.

चांगले सुस्थितीत सुशिक्षीत दिसत होते. ते गृहस्थ बैंकेचे मैनेजर म्हणून रीटायर्ड झालेले होते

काय कुठे चाललाय वगैरे बोलणे झाल्या नंतर काही काळाने काय करतो कुठे असतो   वगैरे चौकशा सुरु केल्या.

पण अचानक त्यानी  लग्न झाले आहे का विचारले. आणि नंतर मुले किती आहेत केवढी आहेत असे विचारले.

मला त्यांच्या  बोलण्याचे आश्चर्य वाटले. मी त्याना तसे सांगितलेही. पण त्याना त्यात काहीच  वावगे वाटले नाही.


अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील विषय. उपरोधिक मांडणी आवडली (अधेमधे उपरोध काहीसा सुटून खऱ्या भावना स्पष्ट शब्दांत येत असूनही) . विविध ट्रीटमेंटसचा उल्लेख उत्तरार्धात आला आहे. खरं तर "मी एक डॉक्टर सुचवतो, कुर्ल्यात क्लिनिक आहे. " किंवा "एवढी ही उदीची पुडी नेहमी खिशात ठेवत जा. खिशाला जड नाही" किंवा डाव्या हाताच्या तर्जनीत गोमेद (किंवा पुष्कराज किंवा कायतरी) तांब्याच्या अंगठीत बसवून घाल" असे उपाय देखील सुचविता येतील. आणि मूलबाळ होणे (झालेच पाहिजे) हा एकच विषय तुम्ही हाताळलात. 

 

भारतीय नागरिक म्हणून.. आणि त्यातही विशेषतः ज्येष्ठ नागरिक म्हणून, "नॉट माईंडिंग अवर ओन बिझनेस" इज अवर ग्रेटेस्ट व्हर्च्यू. 

 

त्यामुळे समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वयोगटानुसार: 

जॉब कुठे करतोस? करत नाहीस ? ओह ..कुठे ट्राय केलं का? अमुक कोर्स करून बघा. बँक भरती चालू आहे. ट्राय कर. मी एका एजन्सीचा नंबर देतो. 

 

लग्नाचं काय? किती वर्षे नुसतेच सिंगल बेडवर काढणार ? जेवणखाण नेहमी हॉटेलातच करायचे ठरवले आहे का? लग्न मूलबाळ सगळं वेळेत झालेलं बरं असतं. तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून हक्काने सांगतोय. माझ्या माहितीत एक विवाह मंडळ आहे. नंबर देतो. आणि ऑनलाईन पण हल्ली आहेत. पण जातीबाहेरची नको रे आणू. 

 

 

लग्नाला झालं का वर्ष ? मग काय? अजून प्लॅनिंगच सुरू आहे का? बास करा आता. आईवडील म्हातारे होत चाललेत त्यांना आता नातवंड बघू द्या. तुझा काका म्हणून सांगतोय. 

 

पाच वर्षे झाली ना अथर्व होऊन ? मग आता भावंड कधी ? हॅ हॅ हॅ.. नाही.. गमतीचा भाग सोड. पस्तीशी झाल्यावर मग दोष निघतात पोरांच्यात. आणि तू रिटायर व्हायच्या आत ती सेटल झाली पाहिजेत ना ? मरण्यापूर्वी एक शेवटची इच्छा म्हणून सांगतोय. 

 

अरे अथर्व काही जॉब करतो का? घरीच कसा दुपारी पण ? रिकामा बसू देऊ नको. 

 

 

पंचवीस वर्षांचा झाला ना रे अथर्व? मग त्याच्यासाठी काही स्थळं बिळं बघताय की नाही ? की तुमच्या क्लबात आणि दौऱ्यात मग्न? बघा पटपट आणि करून टाका. नाहीतर हल्ली ते लिव्ह इन वगैरे फार माजलंय. 

 

अथर्व आणि सूनबाई अजून पण प्लॅनिंगच करताहेत का? बास झाली म्हणावं आता मौजमजा. 

 

इत्यादि ...


मला एक मूल आहे नी दुसऱ्याची तयारी करा म्हणून अनेक जण सांगताहेत, मी त्याना सध्याची महागाई वगैरे सांगितल्यावर होत सगळ सांगताहेत! 

  एक काका काकुळतीने सांगत  होते खूप पस्तावशील एकाला दोन हवेच! तुला म्हातारपणी कळेल केवढी चूक केलीस वगैरे.


गंभीर विषयाला हात घातला आहे. उपरोधिक मांडणी आवडली. 


माझ्या ओळखीत एक जोडप्याने स्वतःच्या इच्छेने अपत्ये जन्माला न घालण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली आहे.  त्यांना ज्येष्ठांच्या भोचक चौकशीला सामोरे जावे लागते असा अनुभव आहे. दोघेही सुस्वभावी असल्याने ते अश्या लोकांना योग्य प्रकारे हाताळतात. 


In reply to by आगाऊ म्हादया

चांगली गोष्ट आहे,

कधी कधी स्वत:चे बोलणे औपरोधिक वाटत असले तरी ते सामाजिक आरोग्याला चांगलेच आहे.

असो.

लिहिले आहे छान, मूल नसल्यावर काय काय प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात ह्याची कल्पना आहे..तेच मूल झाले की आणि विशेष्त: तो मुलगा असला की कसा फरक पडतो ह्याचाही अनुभव आहे. सो असल्या भोचक लोकांना फाट्यावर मारणे किंवा सुरक्षित अंतरावर ठेवणे हाच पर्याय आहे. अगदीच न टाळता येणारे पब्लिक असले की मग त्याच्याकडे लक्ष देऊन न द्यायचे हाही उपाय काम करतो.... 

आपल्याला हवे तसे सुजाणपणे, सर्व गोष्टींचा विचार करुन जगणे हे ब्येस्ट.

आपल्या खरे डॉक्टरांशी आमचे राजकारणविषयक चर्चात पटत नाही पण आरोग्य आणि सामाजिक दृष्टीकोनाबाबत तो बिनतोड माणूस आहे हे निर्विवाद.


बऱ्याच वेळेस तुम्हाला मुलं का नकोत हे लोकांच्या जिज्ञासेचा विषय आहे.

कारण आपलं अपत्य असणं आणि आपले वंश सातत्य राखणे हि एक नैसर्गिक उर्मी आहे.

उत्क्रांतीच्या उतरंडीत प्राणी जितका खालच्या स्तरावर असतो तितके त्याच्या प्रजननाचे परिमाण जास्त असते.

उदा. माझे हजारो लाखो अंडी घालतात कारण यातील फार कमी जिवंत राहतात. उंदरीण दर महिन्यास विते आणि एका विणेत पाच ते सात पिल्ले असतात.

या उर्मीच्या विरुद्व हि जोडपी का जाऊ पाहतात याची एक नैसर्गिक जिज्ञासा बहुसंख्य माणसात असते? पण ती  किती पातळीपर्यंत न्यायची  याचे तारतम्य बऱ्याच लोकात नसते.

त्यातून वय वाढलं कि आपोआप आपल्याला अनेक अधिकार प्राप्त होतात अशी आपली समजूत होत जाते. त्यातून तुम्ही त्या जोडप्याला त्रास देत असता हे बऱ्याच लोकांच्या डोक्यातच येत नाही आणि जास्त पावसाळे पहिले कि आपल्याला जास्त ज्ञान झाले असे समजणे हे तर नित्याचे आहे.               
        
 गंमत म्हणजे मी आणि माझी पत्नी ( दोघे डॉक्टर असूनहि)  असे कोणालाही विचारत नाही याचेच आमच्या मुलांच्या मित्रमंडळींना आश्चर्य वाटते.

 

शिकत असताना नोकरी कधी करणार? नोकरीला लागल्यावर लग्न कधी करणार? लग्न केलं कि मूल केंव्हा होणार आणि लग्न करत नसेल तर ते करणं का आवश्यक आहे. मुलगीं गरोदर झाली कि तिला आहाराचे सल्ले देणे. मूल झाले कि मुलाला काय आणि कसं खायला द्यायचं आणि अपत्य संगोपनाचे धडे. मूल ३-४ वर्षाचे झाले कि आता दुसरा चान्स केव्हा घेणार. आणि न विचारता आमच्या वेळेस आम्ही कसे कष्ट काढले किंवा आम्ही मुलांचे संगोपन विपरीत परिस्थितीत कसे केले.  

हि संपूर्ण प्रश्नावली/ आज्ञावली तयारच असते.           

  


In reply to by सुबोध खरे

मूल, बारसं, मुंज, दहावी, नोकरी आणि लग्न ह्या मध्ये अजून एखादं मूल 
प्रत्येक पायरीवर न संपणारे प्रश्न आणि भोचकपणा न संपणारा आहे. 

 

पण मूल न होण्यामागे आजच्या काळात अनेक जैविक किंवा शरीरविज्ञानाशी संबंधित कारणे असू शकतात/असतात.  त्यामुळे तिथे असले त्रास लोकांनी आरंभले की जास्त त्रास होतो. 

 

नैसर्गिक उर्मी वगैरे सगळं ऐकायला तरी बरं आणि बरोबर वाटत आहे. 


आणि न विचारता आमच्या वेळेस आम्ही कसे कष्ट काढले किंवा आम्ही मुलांचे संगोपन विपरीत परिस्थितीत कसे केले.  

अगदि अगदि. शिवाय स्वत:ची मुले मोठी झाली की आम्ही तुमच्यासाठी यॅंव केलं, त्यॅंव केलं, लै खस्ता खाल्ल्या, स्वत: उपाशी झोपलो, पण तुम्हाला पोटभर खाऊ घातलं, असली टेप लावून गिल्ट देत बसणं वगैरे. असो, चांगल्या लेखात विषयांतर नको म्हणून येवढंच.


माझा अनुभव थोडा वेगळा आहे.

मी अपत्य जन्माला न घालण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार आम्ही अपत्यहीन जीवनशैली (चाईल्डफ्री लाईफस्टाईल) जगतोय. 

नातेवाईकांत माझे मिसळणे तसे थोडे कमी असते पण ज्यांच्याकडे जातो ते ही याबाबत मला सहसा काही विचारत नाहीत. 

गेल्या ११ वर्षापासून एका सोसायटीत राहतोय. मित्र मंडळी , ओळखीचे अनेक जण आहेत. पण फारसे कुणी जास्त विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत. 

कामाच्या ठिकाणी जेव्हा नवीन सहकारी / मित्र/मैत्रिणी बनतात तेव्हा ते विचारतात असा अनुभव आहे. आणि आम्हाला मुल नको हे सांगितल्यावर काही जणांना धक्का बसतो. क्वचित एखादा मित्र /मैत्रीण "असा निर्णय का ?" वगैरे विचारतात पण मला ते खराब वाटत नाही. ही जीवनशैली त्यांच्यासाठी नवीन असल्याने त्यांना उत्सुकता वाटणे साहजिक आहे आणि ह्याबद्दल आता माहित झाल्याने पुढे त्यांच्या कुटूंबातील तरुणांपैकी कुणी असा निर्णय घेतल्यास त्यांना तितकासा धक्का बसणार नाही किंवा अगदी त्यांच्या मुलांनी जरी असा निर्णय घेतला तरी ते टोकाचा विरोध करणार नाहीत असा विचार करुन मी माझ्या या निर्णयाबद्दल कुणी विचारलेच तर त्यावर चर्चा करण्यास तयार असतो.


इथे माझी मुलगी एकुलती एक आहे म्हणून तिचा छळ होतोय,सगळ म्हणता  "वाह एकटी मज्जाच, किती लाड, पार्टनर नाही-शेअरिंग नाहि...... अमुक धमुक"

 😅 ती म्हणते पण "मार, ओरडा पण मलाच एकटीला मिळतो. त्याला कोणी पार्टनर नाही हे पण पहा "😂


तुमच्या लेखामुळे मला इथे व्यक्त व्हावं असं वाटलं.
 
लग्नानंतर काही महिन्यांतच UPT पॉसिटीव्ह आली. सर्वांना होतो तसाच आम्हा घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. रुटीन चालू होतं. घर ते ऑफिस लांबचा पल्ला होता. तेव्हा WFH ची सोय आणि सवय दोन्ही नव्हते. प्रेग्नन्सीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात ऑफिसमध्येच असताना थोडा रक्तस्त्राव जाणवला. तशीच तडक घरी आले. जवळच्याच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेले. त्यांनी तातडीची केस म्हणून लगेच सोनोग्राफी केली. गर्भ जितक्या आठवड्यांचा असायला हवा होता तशी वाढ सोनोग्राफीमध्ये दिसत नव्हती. पण असं होऊ शकते असे सांगून त्यांनी रक्तस्त्राव थांबण्यासाठी गोळ्या दिल्या. पण त्याने काही फरक पडला नाही. माझं पाहिलं मिसकॅरेज झालं होतं. गर्भपात पूर्ण होण्यासाठी डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या. खूप वाईट वाटलं.
 
स्त्रीरोग तज्ज्ञांनी सध्या काही उपचारांची गरज नाही, एक महिना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करा सांगितलं. काही महिन्यांतच पुन्हा प्रेग्नन्सी राहीली. या वेळेस मी ऑफिसमधून घरून काम मागून घेतलं. पण काही दगदग नसतानाही पुन्हा एकदा ब्लीडींग सुरु झालं. या वेळेसही गर्भ जितक्या आठवड्यांचा असायला हवा तितकी त्याची वाढ दाखवत नव्हता. पुन्हा गोळ्या सुरु केल्या पण एक दिवस अचानक पोट खूप दुखू लागलं. वेदना सहन करण्या पलीकडच्या होत्या. मग तसंच सोनोग्राफीला गेलो. तिथे असं समजलं की embryo निघून ते ट्यूब मध्ये अडकलं होतं. DnC करावं लागणार होतं. नवऱ्याची बहीणच डॉक्टर असल्याने तातडीच्या सोनोग्राफी होत्या त्या लगेच व्हायच्या. या वेळेस DnC साठी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे लगेच ऍडमिट होता आलं. आता तर मन पूर्ण खचलं होतं.
 
थोडं महिनाभर कशाचाच विचार न करता दिवस घालवले. पुन्हा डॉक्टरांकडे गेलो. दुसऱ्या प्रेग्नन्सीवेळी डॉक्टरांनी काही टेस्ट करून घेतल्या होत्या. तेव्हा थायरॉईड गोळी चालू झाली होती. खूप जास्त पॉवरची नसली तरी प्रेग्नन्सीला पहिल्या तिमाहीला लागणाऱ्या मर्यादेपेक्षा माझं रिडींग वेगळं आल्याने गोळी चालू केली होती. या वेळी घरामध्ये चर्चा करून पुण्यातल्या नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञांकडे उपचार सुरु केले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे ओव्यूलेशन काळाच्या आठ ते दहा दिवसात दर दिवसाआड तिथे सोनोग्राफीला बोलवायचे. या सर्व गोष्टी ऑफिसमध्ये सांगणे शक्य होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा लांबच्या ऑफिसचा प्रवास आणि त्यामध्ये वेळ काढून ही सोनोग्राफी अशी तारेवरची कसरत चालू होती.
 
खरं म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही अडचण नसताना या सगळ्यांची म्हणजे त्या ओव्यूलेशन सोनोग्राफीची गरज होती का ते मी सांगू शकत नाही, पण तेव्हा तरी मला ते उगीचच आहे असं वाटलं होतं. कारण गर्भ टिकत नाही ही अडचण होती. असे एक दोन महिने गेल्यावर पुन्हा UPT वर क्षीण रेषा दिसली. मग काही दिवसांनी पुन्हा सोनोग्राफी झाली या वेळेस जुळ्या मुलांचा embryo दाखवत होता. पण वाढ म्हणावी तशी नव्हतीच. तेव्हा इतरांचं असं मत पडलं की जुळे असल्याने दोन वाढींसाठी म्हणून वेळ लागत असेल. पण या वेळीदेखील निराशाच पदरी पडायची होती. या वेळेस गोळ्या आधीपासूनच चालू असल्याने ब्लीडींग झालं नाही. पण दर वेळेस वॉशरूमला जाताना काय भीती असते ते मी शब्दात सांगू शकत नाही. पुन्हा एकदा DnC झालं.
 
थोडा ब्रेक घेतला. मी मला त्या स्त्रीरोग तज्ज्ञांची आता ट्रीटमेंट नको म्हणून सांगून टाकलं. मग पुन्हा एकदा घरी झालेल्या चर्चेनुसार थोडं पंचकर्म वगैरे करून प्रयत्न करू असं ठरलं. मग एक आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला लागले. त्यांनी दिलेलं पथ्य चालू केलं, तसं आधीपासून जीवनशैली आरोग्यपूर्णच होती त्यामुळे पथ्यासाठी फार वेगळं काही करावं लागलं नाही. पण त्या डॉक्टर बाईंना काही कारणाने अमेरिकेला जावं लागलं. पंचकर्म जितकं झालंय तेवढं पुरेसं आहे असं त्या म्हणाल्या आणि गेल्या. पण ते खरंच पुरेसं आहे की त्यांना जायचंय म्हणून त्या असं म्हणतात हे मला समजेना. पुढे काय कधी प्रयत्न करायचा याबद्दल संभ्रम होता. मुख्य म्हणजे आपण प्रयत्न करू आणि पुन्हा तसंच झालं तर ही भीती खूप मोठी होती. 
 
मग एक दोन महिने झाल्यावर आम्ही पुन्हा एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलो. या डॉक्टरांबद्दल मला आधीच्या डॉक्टरबाई होत्या तसं फीलिंग येईना. पण म्हटलं पंचकर्म तर पूर्ण करायचंय. घरापासून त्यांचं क्लीनिक बरंच लांब होतं. मी ऑफिसमधून ब्रेक घेतला होता. हे पंचकर्म पूर्ण करत असताना एक दिवस माझा उजवा पाय अचानक दुखू लागला. काहीतरी असेल म्हणून पहिले तीन चार दिवस दुर्लक्षच केलं पण मग घोट्यातली वेदना मांडीपर्यंत जाणवू लागली मग ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेलो असता त्यांनी DVT साठी कलर डॉप्लर करून घ्यायला सांगितलं. त्यामध्ये समजलं की DVT च आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे सगळं बाजूला राहिलं आणि ऍडमिट व्हावं लागलं.
 
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना अनेक चाचण्या झाल्या. त्यामध्ये मला अनुवांशिक Factor V Leiden असल्याचं समजलं. इतक्या महिन्यांच्या ट्रीटमेंट्स मुळे इस्ट्रोजेन वाढून कदाचित DVT होण्यासाठी ट्रिगर बसला होता. त्यातच ANA, CANCA, PANCA आणि DRVVT देखील पॉसिटीव्ह असल्याचं समजलं. माझ्या या डॉक्टरांनी मी इथून पुढे प्रेग्नन्सीचा विचार करणं म्हणजे हर्क्युलिअन टास्क असल्याचं सांगितलं. आणि मागे असं का होत होतं याचं कारण देखील कदाचित यातच दडलं होतं. Anticoagulant गोळी कायमची मागे लागली. माझ्या नवऱ्यानेच मग प्रस्ताव मांडला की आपण अपत्यहीन राहण्याचा विचार करू. घरातून दत्तक तरी घ्या म्हणून सुचवणी झाली. तिकडेही नाव नोंदवलं. तिथे सध्या कमीतकमी चार वर्षे तर थांबावंच लागतं. मी नवऱ्याला त्याला त्याचं मूल हवंच असेल तर मी त्याला घटस्फोट द्यायला तयार आहे असं मानभावीपणे सांगितलं. पण त्याला दुसरी पत्नी करून स्वतःची मुले असण्यापेक्षा आमचं नातं जास्त महत्वाचं वाटलं.
 
एवढं सगळं होऊन आम्ही दोघे नॉर्मल जगू लागलो. दोन तीन वर्षे मध्ये गेली असतील. यातच नवऱ्याच्या नातेवाईकांपैकी एकाला असंच अथक प्रयत्नांनी यश आल्यावर त्यातल्या स्त्रीने मला तिच्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. एवढं सगळं ठरलेलं असून, दत्तकसाठी नावनोंदणी केलेली असताना तिथे जाण्याची काय इच्छा झाली माहिती नाही. तिकडे एवढा सगळा इतिहास ऐकल्यानंतर त्यांनी थेट IVF चाच सल्ला दिला. पुन्हा त्याची गोळ्या, औषधे, Anticoagulant बंद करून पोटातील इंजेक्शन्स सुरु झाली. हे सगळं चार पाच महिने चाललं असेल. या काळात इस्ट्रोजेन च्या खूप हाय पॉवर गोळ्या चालू होत्या, मी त्या डॉक्टरना तशी भीती बोलून पण दाखवली की याने पुन्हा clot झाला तर? पण त्यांनी इंजेक्शन्स चालू आहेत असं सांगून ती शक्यता फेटाळून लावली. एके दिवशी embryo transfer करून आम्ही घरी परतलो. आणि दोन दिवसातच माझा उजवा पाय पुन्हा पूर्वीसारखाच दुखू लागला. हे काय आहे समजायला वेळ लागला नाही, मी पुन्हा एकदा DVT साठी ऍडमिट झाले. माझे हे डॉक्टर म्हणजे देव माणूस आहेत. त्यांनी मला आधीही सूचना दिलीच होती या वेळीही दिली. एवढं होऊन प्रेग्नन्सी टेस्ट पॉसिटीव्ह आलीच नाही.      
 
नंतर आम्ही सगळा विचार सोडून रुटीन आयुष्य चालू ठेवलेलं असताना, कोविडमध्ये दुसऱ्या साथीमध्ये घरातील एका सदस्याने सगळयांना कोविडचा प्रसाद आणला. सासू सासरे ऍडमिट झाले, मी आणि नवऱ्यासाठी घरातच गोळ्या औषधे चालू होती. अचानक पुन्हा एकदा प्रेग्नंसीची चाहूल लागली. कितीही आधी मनाची तयारी होती तरी जीव सुखावून गेलाच. पुन्हा एकदा Anticoagulant बंद करून लगेच इंजेक्शन्स सुरु केली. त्यातच नवऱ्याला थोडा ऑक्सिजन आणि श्वासाचा त्रास पुन्हा सुरु झाला. मग आम्ही दोघेही ऍडमिट झालो. माझ्या प्रेग्नन्सीसंबंधी सगळी ट्रीटमेंट देखील तिथेच सुरु झाली. या वेळेस embryo ची प्रगती चांगली होती. पण चांगली वाढ होऊनही discharge नंतर केलेल्या सोनोग्राफी मध्ये पुन्हा एकदा वाढ थांबल्याचंच दिसलं, कोविडच्या हाय पॉवर औषधांनी असेल कशाने असेल माहिती नाही. 
 
आता इथून पुढे खूप लहान बाळाला मोठं करण्याची जबाबदारी आपल्याला झेपेल का याचा विचार करून CARA ची तीन वर्षे झाल्या नंतर तो फॉर्म सुद्धा पुन्हा कंटिन्यू केला नाही. फॉर्म भरून एखाद्या वर्षातच मिळालं असतं तर असा वयाचा आणि जबाबदारीचा विचार मनात आला नसता. चार पाच वर्षे थांबून मूल हवं असेल तर दत्तकसाठी खूप आधीच विचार करून ठेवायला हवा. सगळं विसरून आता आम्ही आमचं रुटीन छान सुरु केलं आहे.
 
पण अपत्यहीन जोडप्याला छळण्याचा कोर्स केलेले लोक अनेकदा समोर येतच असतात. सासरकडच्या मंडळींमध्ये बरेचसे डॉक्टर असल्याने ते कधी काही त्रास होईल असं तेव्हाही बोलले नाहीत, आताही बोलत नाहीत. घरातून कधीच कसला त्रास झाला नाही. पण इतर ओळखींमध्ये वगैरे ओटी भरताना तसे आशीर्वाद देणारेही भेटतात. मुलं किती वगैरे सहज विचारणारेही भेटतात. अमके डॉक्टर खूप चांगले आहेत तिकडे बघा ना एकदा प्रयत्न करून असे फुकटचे सल्ले देणारेही भेटतात. पण मी कसलंच वाईट वाटून घेत नाही. आपला इतिहास यांना काय माहिती, जी जगरहाटी आहे त्या गोष्टी ते विचारणारच असं म्हणून सोडून देते. काही वर्षांपूर्वी असं काही सगळं मी पब्लिक फोरमवर लिहू शकले नसते. नवऱ्याला अशा चौकशांचा काही त्रास होतो का मला कल्पना नाही, पण निदान दाखवत तरी नाही तो.

In reply to by श्वेता व्यास

बापरे. जाम धीराच्या आहात तुम्ही. अधिक काय लिहिणे.

-गा.पै.


In reply to by श्वेता व्यास

खुपच सोसलं आहे तुम्ही, खुपच मनातलं लिहिले आहे 🙏स्त्रिया अधिक भावनिक असल्याने त्यांना जास्त शारीरिक व मानसिक त्रासातून जावे लागते. पुरुषांच्या मनाची अवस्था या विषयी त्यांनीही व्यक्त व्हायला पाहिजे.


In reply to by श्वेता व्यास

तुम्ही ज्याच्यातून गेल्या आहात त्यावर बोलण्याची लायकीही नाही माझी. पण तुमच्या यजमानांच्या स्थिरबुद्धीला आणि नीतिमत्तेला सुद्धा माझा प्रणाम. जशा आहात तशा नेहमी आनंदी रहा आणि निरोगी रहा हिच देवाचरणी प्रार्थना !


In reply to by श्वेता व्यास

श्वेता ताई

आपल्याला सल्ला द्यायची माझी लायकी आहे का ते मला माहिती नाही. पण माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी जे सांगतो तेच तुम्हाला सांगू शकेन. 
हि एक विचार पद्धती आहे.  

या वर्षीच माझ्या कडे सोनोग्राफी साठी दोन गरोदर स्त्रिया आल्या होत्या ज्यांचे वय पन्नास ( ५०) होते. त्यांच्या मनात प्रचंड भीती होती. इतकी वर्षे प्रयत्न केल्यावर दोघीना कृत्रिम फलन प्रक्रियेने गरोदरपण प्राप्त होण्यात यश आलेले होते. त्यांनी मला हाच प्रश्न विचारला होता कि या वयात गरोदर होण्याचा आमचा निर्णय योग्य आहे का?       
मी त्यांना एकच विचारले तुम्हाला मूल हवे आहे का? उत्तर होय असेल तर तुमचा निर्णय योग्य आहे.

लष्करात एक सांगितले जाते --जोवर तुम्ही लढायचे थांबवत नाही तोवर युद्ध संपलेले नसते. No fight is lost until you stop fighting.

पन्नास व्हायला मुलात व्यंग असण्याची शक्यता बरीच जास्त (१०० पट जास्त) असते. वयाच्या   २१ व्या वर्षी हि शक्यता ३००० मध्ये  एक असते तर ५० व्या  वर्षी ३३ मध्ये एक अशी असते. पण ३३ मध्ये १ चा अर्थ शंभर पैकी ९७ मुलं अव्यंग असतील ना?

मग तुम्हाला मूल  हवं आहे का याचा पक्का निर्णय दोघांनीच घ्याचा आहे. त्याचबरोबर दुर्दैवाने तुम्ही त्या ३ % मध्ये असलात तर गर्भपात करण्याची मनाची तयारी  ठेवूनच पूढे जायचं. 
या नंतर त्या दोघीनी पुढे जायचे ठरवले आणि दोघीनी  सिझेरियन ने व्यवस्थित अव्यंग बालकाना जन्म दिला.

तुम्हाला हाच निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा आहे. जो काही  निर्णय असेल तो तुमच्या दृष्टीने बरोबरच असतो.  

आमच्या सारख्या लोकांना त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता नसते.    

         

    


In reply to by श्वेता व्यास

काल प्रतिसाद वाचल्यापासून, मला हे ठरवता येईना की लेखामुळे मी तुमची खपली काढली की काय.? तुम्हाला आलेले अनुभव थोड्याफार फरकाने मैत्रिणींना आलेच होते. त्यांचं पाहिलेलं दुःखसुद्धा मनात पार्श्वभूमीवर होतंच.

 

असो. तुम्ही फार धीराच्या आहात.  समजून घेणारा समाज निर्माण करणे हे आपण आता हाती घ्यायला हवं हे नक्की.