" नमस्कार, हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे सात वाजले आहेत. आपण ऐकत आहोत प्रादेशिक बातम्या "
हा आवाज गेले कित्येक वर्षे तमाम भारतीयांच्या कानात भरून राहिला आहे.
विविध भाषांमध्ये बोलीभाषांमध्ये प्रसारित केलेल्या बातम्या, विविध संगीताचे कार्यक्रम, ध्वनिमुद्रित केलेली नाटके, चित्रपटगीते ह्यांनी असंख्य भारतीय लोकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय चक्रीवादळे, 2004 साली आलेली भयंकर सुनामी अश्या संकटाच्या वेळी लाखो भारतीयांपर्यंत वेळेवर संदेश पोचवला आहे. अश्या त्या आकाशवाणी चा आज 100वा वाढदिवस!
आकाशवाणीची ती सिग्नेचर ट्यून ऐकताना मनात विचार आला, 100 वर्षे म्हणजे बराच काळ आपल्या आकाशवाणीने आपली सेवा केली आहे. मग त्याचा इतिहास काय असेल? भारतात रेडिओ कधी सुरु झाला असेल? आणि सध्याच्या FM च्या समोर आकाशवाणीने आपले स्थान अजूनही कसे टिकवून ठेवले असेल?
आपल्या देशात रेडिओची सुरुवात झाली ती मुंबईमध्ये. 1922 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबने काही ध्वनीमुद्रित कार्यक्रम प्रसारित केले आणि आपल्या देशात रेडिओची सुरुवात झाली. होय आपल्या देशातील पहिले रेडिओ स्टेशन हे खाजगी होते.
पुढे 1927 साली तत्कालीन ब्रिटिश इंडिया सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीला देशभरात दोन रेडिओ स्टेशन सुरु करायची परवानगी दिली. मुंबई केंद्र ( 23 जुलै 1927) आणि कलकत्ता केंद्र (26 ऑगस्ट 1927) ला सुरु झाले. या दोन्ही स्टेशन्स वरून फक्त इंग्रजी भाषेत कार्यक्रम होतं असत. पुढे 1 मार्च 1930 ला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी दिवाळखोरीत निघाली, आणि सरकारने दोन वर्षासाठी ती चालवायला घेतली. कंपनीचे नाव बदलले गेले आणि इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस ह्या नावाने रेडिओ सेवा सुरु झाली. 1932 साली हीच कंपनी सरकारने अधिकृत भारतीय रेडिओ म्हणून सरकारने घोषित केली.
8 जून 1936 ह्या सरकारी रेडिओ कंपनीचे अधिकृत नामांतर *ऑल इंडिया रेडिओ* म्हणून केले गेले. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा देश स्वतंत्र झाला, आणि पंडित नेहरूंचे ते ऐतिहासिक भाषण जेव्हा रेडियो वरून देशांने ऐकले. तेव्हा ऑल इंडिया रेडिओची देशभरात सहा केंद्रे ( दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, तिरुचिरापल्ली आणि लखनऊ) ही केंद्रे होती. 1956 साली पंडित नेहेरुंनीं ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण केले.
आजघडीला आकाशवाणीची देशभरात 420 केंद्रे आहेत, देशाच्या 92% भागापर्यंत रेडियो पोचला आहे. 23 भाषा आणि 129 बोलिभाषांमधून अखंड विविध कार्यक्रम, बातम्या देशभर प्रसारित होत आहेत.
देशाच्या रेडिओ क्षेत्रात आलेली दुसरी क्रांती म्हणजे FM रेडिओ ची सुरुवात.
1993 सालापर्यंत देशात रेडिओ हा फक्त सरकारी होता. 93 साली मुंबई आणि दिल्ली शहरांत केवळ 2 तासाकरता खाजगी रेडिओला प्रसारनाकरता परवानगी दिली गेली. खाजगी रेडिओ ला मिळणारा रिस्पॉन्स पाहून सरकारने 2001 साली FM स्टेज 01 अंतर्गत देशात 12 शहरांत 22 खाजगी रेडिओ चॅनेल ला परवानगी दिली. 2001 साली बंगलोर शहरांत सुरु झालेले रेडिओ मिरची हे पहिले खाजगी FM चॅनेल आहे.
पुन्हा 2005 साली दिलेल्या नवीन परवान्यामुळे बिग FM मुंबईत 2006 साली सुरु झाले. आजच्या दिवशी बघायचे झाले तर अनेक खाजगी FM चॅनेलस देशभर सेवा देतं आहेत. 2009 साली उत्तर प्रदेशातील नोएडा इथून सुरु झालेले Red FM आज देशात 57 शहरांत सेवा देत आहे.
90 साली सूरू झालेल्या जागतिकीकरणाच्या रेट्यात सुरु झालेल्या खाजगी FM वाहिन्या आणि आकाशवाणी ह्यात नाते कसे राहिले हे पाहूया पुढील भागात
(क्रमशः)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख
'ऑल इंडिया रेडिओ'चे नाव 'आकाशवाणी' करण्याचे श्रेय म्हैसूरच्या 'आकाशवाणी' रेडिओ स्टेशनला जाते (जे एम. व्ही. गोपालस्वामी यांनी १९३६ मध्ये सुरू केले होते). हा संस्कृत शब्द कवींद्रनाथ टागोर यांनी सुचवला होता, असेही म्हटले जाते. पुढे जनमताचा रेटा आल्यामुळे १९५६ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे हे नाव स्वीकारले असावे कारण १९५७ साली निवडणूक होती! (बहुदा नाईलाजाने केलेला बदल असावा. करायचाच असता तर आधीच केला असता. पण तसे केले नाही! कारण नेहरूंना देशी संस्कृत भाषेबद्दल जराही चांगली भावना नव्हती. चक्क साहेबाने दिलेले नाव बदलणे त्यांना कसे शक्य होते? त्यांना बहुदा उर्दू आणि इंग्रजी या भाषा जास्त महत्त्वाच्या वाटत असाव्यात. ख खो दे जा!)
१९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध भारतीवरून 'जयमाला' सारखे विशेष कार्यक्रम प्रसारित केले जात असत, या कार्यक्रमांना खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
नाइलाज, नाही लाज
In reply to छान लेख by निनाद
1927 – खाजगी कंपनी Indian Broadcasting Company (IBC) ने मुंबई आणि कलकत्ता येथे प्रसारण सुरू केले.
1930 – IBC दिवाळखोर झाली. त्यानंतर ब्रिटिश भारत सरकारने ती सेवा ताब्यात घेतली आणि Indian State Broadcasting Service (ISBS) या नावाने चालवू लागली.
8 जून 1936 – ISBS चे नाव बदलून All India Radio (AIR) करण्यात आले.
1935–36 – याच काळात म्हैसूरमध्ये डॉ. एम. व्ही. गोपालस्वामी यांनी स्वतंत्रपणे "आकाशवाणी" नावाचे खाजगी रेडिओ केंद्र सुरू केले. याचा AIR शी सुरुवातीला कोणताही संबंध नव्हता.
1947 – स्वातंत्र्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आले.
1950 – गोपालस्वामींचे मूळ "आकाशवाणी" केंद्र AIR नेटवर्कमध्ये समाविष्ट झाले.
1956 – भारत सरकारने AIR साठी अधिकृत भारतीय नाव म्हणून "आकाशवाणी" स्वीकारले.
म्हणजे एका काळात दोन स्वतंत्र गोष्टी अस्तित्वात होत्या:
पुढे गोपालस्वामींचे केंद्र AIR मध्ये विलीन झाले आणि नंतर AIR नेच "आकाशवाणी" हे नाव स्वीकारले.
.
उगी ६ वर्षाचा उशीर हा २० वर्षाचा करुन "नेहरुंच्या, त्यांच्या साहेबी, इंग्रजी, उर्दू प्रेमाच्या, संस्कृतद्वेषाच्या आणि आणि त्यांच्या एक वर्षाने होणाऱ्या निवडणूकांमुळे केलेल्या राजकीय चलाखीचा " माथी मारण्याचा प्रयत्न काबिले तारीफ आहे पण त्यानिमित्ताने नेहरु लक्षात ठेवताय हेही नसे थोडके.
असो नाईलाज असतो, तो दिसतो..
छान लेख
सहकुटुंब सहपरिवार बिनाका/ सिबाका गीतमाला ऐकण्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. अमीन सयानींचे निवेदन, पहिल्या क्रमांकावर कोणते गीत असेल हे या बद्दल रंगलेल्या चर्चा, मग कृष्णधवल टीव्हीवर पाहिलेले क्रिकेट सामने ते आता ओटीटी ॲप्स पर्यंत झालेली प्रगती थक्क करणारी आहे.
रेडीओ ला लायसन्स घ्यावे लागायचे.
माझ्या लहानपणी रेडीओ ची साईज दोन बाय अडीच फुट किंवा त्याच्यापेक्षा थोडी मोठी असायची. पावर सप्लाय करता मोठी बॅटरी लागत असे. यातली प्रिमीटिव्ह तंत्रज्ञानामुळे आकारमान मोठा असायचा.
रेडीओ घेताना पोस्ट ऑफिसमधून लायसन्स घ्यावे लागायचे व वर्ष झाल्यावर रिन्यू करावे लागत असे. वर्षाची फि तीन रूपये असे.
पुढे तंत्रज्ञान बदलले व ट्रान्झिस्टर आले.
आमच्या घरी बरेच लोक गाणे,श्रुतिका ऐकायला येत असत.
रेडीओ साठी एरीयल बांधावी लागत असे. एक लांब जाळीदार चार इंची पट्टी दोन उंच बाबूंवर बाधाली होती.
खरेच रेडीओ ते आजचे टेलिव्हिजन खुपच मोठा बदलीचा प्रवा मी बघीतला आहे.
लेख आवडला ,जुन्या आठवणीत थोडावेळ रमलो.
मोठया रेडिओच्या आठवणी
In reply to रेडीओ ला लायसन्स घ्यावे लागायचे. by कर्नलतपस्वी
हो, परमिट वाल्या रेडिओच्या आठवणी माझ्या आजोबांनी ही मला सांगितल्या आहेत. त्यावेळी ठाण्यात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफीस मधेच रेडिओ परवाना मिळे, ही आठवण माझ्या आजोबांनी सांगितली आहे
मला रेडीओ, शक्यतो…
मला रेडीओ, शक्यतो विविधभारतीच, ऐकायला फार आवडतो माणसाचा वेळ न खाता पूर्ण होऊ शकेल असा छंद आहे हा. स्वत:हून गाणी निवडून ऐकण्यापेक्षा रेडीओवर गाणी ऐकण्यात काही और मजा आहे. पुढे कोणतं गाणं येईल हे आपल्याला माहिती नसतं आणि अचानक छान; आपल्या आवडीचं गाणं लागलं की होणारा आनंद स्वत: गाणी निवडून ऐकण्यात नाही.