Skip to main content

पॉश अँड चिक आणि मी

लेखक amitrkale यांनी शनिवार, 18/07/2026 22:09 या दिवशी प्रकाशित केले.

हेअर कटिंग सलून मध्ये जाऊन केस कापून येणे हे माझे अत्यंत आवडते काम आहे. एखाद्या रविवारी निवांत उठून सावकाश अप्पाच्या "स्टाईल हेअर कटिंग सलून" मध्ये जाऊन बसावे. टीव्ही वर लावलेली निर्थथक गाणी पाहावी किंवा व्हाट्सअँप वर ज्ञानवर्धक माहिती वाचावी. आपला नंबर आला की आपले डोके अप्पाच्या हाती देऊन टाईमपास गप्पा माराव्या आणि हेड मसाज घेऊन डुलत डुलत घरी यावे हा माझा आवडता उद्योग आहे. 
एके दिवशी माझ्या पत्नीला कुठून कुणास ठाऊक पण पॉश अँड चिक नावाच्या लग्झरी सलूनचे कुपन मिळाले आणि ते नेमके पुरूषांच्या केशकर्तनाकरिता होते. पत्नीने प्रेमाने दिलेल्या ह्या भेटीचा अव्हेर करणे मला शक्य नव्हते आणि जड अंतःकरणाने मी तिथे जायला तयार झालो. "आधी अपॉइंटमेंट घेऊन मगच जा. ते काही तुझ्या न्हाव्याचे दुकान नाहीये" अशी कडक सूचनाही मिळाली. 
अपॉइंटमेंट घेण्याकरिता फोने लावला तर पलीकडची बाई चक्क इंग्लिश मध्ये बोलू लागली. 
"Good Morning Sir! Welcome to Posh and Chic Salon. How can I help you"
"Good Morning! I my have appointment?"
"which  is your preferred location and date sir?"
"Pimple Saudagar for today"
"Sorry Sir! We are fully booked for today. Can you give me some other date Please?"
आमच्या अप्पाकडे कधी अपॉइंटमेंट घेऊन जाण्याची मला गरज पडली नव्हती. "अप्पा, किती वेळ लागेल?" असे विचारले की तो "१५ मिनिट" असे ठरलेले उत्तर द्यायचा. फार गर्दी असेल तर लाकडी बाकड्यावर दाटीवाटीने बसायचे, तिथे ठेवलेल्या मुंबई चौफेर किंवा संध्यानंद असल्या वृत्तपत्रातील "तरुण स्त्रिया प्रौढ पुरुषांकडे का आकर्षित होतात?" अथवा "दोन डोक्याचे घुबड स्वप्नात दिसले तर त्याचा अर्थ काय असतो?" असले अभ्यासपूर्ण  लेख वाचायचे की थोड्या वेळात नंबर येतो. "some other date" ची भानगड नसते. असो.
अपॉइंटमेंटचे सोपस्कार पूर्ण केले. अपॉइंटमेंटच्या आधी दोन दिवस मला खूप टेन्शन आले होते. माझ्या टीम मधल्या श्रीनिवास अरुमुगम ह्यालाही ते जाणवले. मी Posh and Chic नावाच्या सलून मध्ये जाणार आहे हे कळल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर मंद स्मित पसरले. "Very good salon sir. You must go." असे त्यानेही आग्रहाने सांगितले. "I also go there". आता हा अरुमुगम, कटाप्पाला भरगच्च केस आल्यावर तो जसा दिसेल, तसा दिसतो. हा लग्झरी सलून मध्ये जातो? "Both my girlfriend and me goes there." म्हणजे ह्या केशूभाई कटाप्पाला गर्लफ्रेंड आहे? च्यायला ह्या सलून मध्ये गेलेच पाहिजे. "मस्त बहारों का मै आशिक" असे गात मी झाडाभोवती नृत्य करत आहे आणि सोनेरी केसांची एक नवतरुणी माझ्या भोवती पिंगा घालत आहे असली स्वप्ने मला पडू लागली.
अखेर तो दिवस आला. त्याआधी मला एक दोन रिमाइंडरचे फोन सुद्धा येऊन गेले. अपॉइंटमेंटच्या बरोबर ५ मिनिट आधी मी तेथे पोहोचलो. एका सुबक रिसेप्शनिस्टने माझे स्वागत केले. तुम्हाला पुरुष हेअर स्टायलिस्ट हवा आहे की लेडी? असेही विचारले. मी लेडी असे उत्तर देणार होतो पण त्याच वेळी तिथे केशुभाई कटप्पा आणि त्याची प्रेयसी अली तर माझी नाचक्की व्हायची ह्या भीतीने पुरुष असे उत्तर दिले. "ठीक आहे सर, हेअर एक्सपर्ट आयुष थोड्याच वेळात तुम्हाला अटेंड करतील". थोड्या वेळात तिशीच्या एका युवकाने मला नम्रपणे एका खुर्चीत बसायला सांगितले आणि अतिशय नाजूकपणे माझ्याभोवती एक टॉवेल गुंडाळला. शेजारच्या खुर्चीत एका स्त्री विराजमान झाली होती. तिच्या चेहेऱ्यावर निळ्या रंगाचा लेप लावला होता. अंगात निळ्या रंगाचा गाऊन होता आणि केसांना निळ्या रंगाची चादर गुंडाळली होती. त्यामुळे ती इसापनीती मधल्या निळ्या कोल्ह्यासारखी दिसत होती. आयुषने माझ्या केसातून दोन तीन वेळा नुसताच हात फिरवला. "सर, लास्ट टाइम शाम्पू लावून आंघोळ कधी केली होती?" "परवा". माझ्या लेखी परवा ह्या शब्दाचा अर्थ पूर्वी कधीतरी असा होतो. "कुठला शाम्पू वापरता?" आता अली का पंचाईत? मी खरे तर अंगाचा साबणच केसांना फासतो. पण लग्झरी सलून मध्ये असे उत्तर चालणार नाही त्यामुळे "क्लिनिक प्लस" असे मी उत्तर दिले. "सर, कोणताही शाम्पू वापरून चालत नाही. केसांचे टेक्श्चर आणि स्कॅल्प कसा आहे त्यावरून शाम्पू चूझ करायचा असतो." हे ऐकून तो शेजारचा निळा कोल्हा उगाच हसला. 
“आम्ही फक्त लो-रिॲलचे प्रोफेशनल ग्रेड शाम्पूचा रेकमेंड करतो सर. आणि शाम्पू नंतर कंडिशनर मस्ट आहे. आमच्या सलून मध्ये मिळतील. १२०० पासून रेंज सुरु होते.“ त्याने महागडी उत्पादने विकण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
त्यानंतर त्याने माझ्या केसाना बायका लावतात तसल्या पिना लावल्या. त्यामुळे माझा चेहेरा काटे पिंजारलेले साळींदरासारखा दिसू लागला. 
"तुम्हाला कशी स्टाईल हवी आहे?" 
"नॉर्मल चालेल". 
"थोडा प्रोफेशनल लुक दिलेला चालेल का? तुम्ही काम कुठे करता?" 
"IT मध्ये" मी अभिमानाने सांगितले. 
"अच्छा. प्रोफेशनल लुक देऊया. कुठली कंपनी?" 
"कुर्लासॉफ्ट." मी परत अभिमानाने उत्तर दिले. 
"ओके. म्हणजे फार प्रोफेशनल लुक ची गरज नाहीये. इंटरनॅशनल कंपनी असती तर गोष्ट वेगळी होती." 
निळा कोल्हा पुन्हा एकदा हसला. 
"सर, तुमचा स्कॅल्प खूप ड्राय आहे आणि केस क्राऊन भोवती कमी होऊ लागले आहेत. केसांचे टेक्श्चर खूप खराब झाले आहे अँड थोडे केस काळे राहिले आहेत बाकी सगळे पांढरे झाले आहेत. तुम्ही ऑफिसला कसे जाता?" 
"बाईक वरून"
"अच्छा. कार नाहीये का?"
निळा कोल्हा हसला. 
"कार आहे, पण मला बाईकचा शौक आहे." मी उगाच बढाई मारली.
"कोणती बाईक?" हेअर एक्स्पर्ट माझा पिच्छा काही सोडत नव्हता.
मी "स्कुटी पेप" असे सांगणार होतो पण निळ्या कोल्ह्याला हसण्याची संधी मला द्यायची नव्हती. त्यामुळे "रॉयल एनफिल्ड" अशी थाप मी मारली. निळ्या कोल्ह्याच्या चेहेऱ्यावर "हे येडंबिद्र एनफिल्ड चालवतं?" असा भाव स्पष्ट दिसत होता.
"सर, एक सजेशन आहे. हेल्मेट वापरा आणि हेल्मेटच्या आत एक कपडा गुंडाळा. म्हणजे हेअर डॅमेज होणार नाही आणि स्कॅल्प ड्राय होणार नाही."
"ओक"
"सर, हेअर कलर लावायचा का? म्हणजे सॉल्ट पेपर लुक येईल?
"काय?"
"सॉल्ट पेपर लुक. सध्या खूप ट्रेंडिंग आहे."
"नको, सध्या फक्त केस कापा." मी काकुळतीची विनवणी केली.
मग त्याने एक एक केस वैयक्तिकरित्या अतिशय नाजूकपणे कापायला सुरुवात केली. 
"लास्ट टाइम कुठे हेअर कट केला होता?"
“अप्पाकडे” असे अगदी माझ्या ओठांवर आले होते पण निळ्या कोल्ह्याकडे एक डोळा ठेवून मी "हबीब्स मध्ये" असे उत्तर दिले.
"सर, डोन्ट माईंड, पण हबीब्स चे काय झाले आहे ना की भरपूर ब्रॅंचेस त्यांनी ओपन केल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची क्वालिटी डिग्रेड झाली आहे. आता तुमचेच केस पहा ना, उंदरांनी कुरतडल्यासारखे कट केले आहेत."
निळ्या कोल्ह्याला असुरी आनंद झाला. ती बया जोरजोरात हसू लागली. अयुषही आपण लै भारी जोक मारल्यासारखा हसू लागला. 
"तरीही मी तुमच्या केसांना बेश्ट लुक दिला आहे. एकदा चेक करा."
"अजून जरा बारीक केले तरी चालतील"
"नाही सर, अजून बारीक केले ना तर केसांचा बाउन्स जाईल"
"काय?"
"बाउन्स सर! त्यामुळे केस लाइव्हली दिसतात. तुमचे केस लाइफलेस आणि तुमची केस होपलेस आहे.“ त्याने उगाच फालतू विनोद केला. शेजारची नीलसुंदरी दात विचकून हसली. चेटकिणीसारखे दात होते भवानीचे. “तुम्हाला सलूनच्या नाही तर Dentist च्या खुर्चीत बसायची गरज आहे" असे सांगण्याचा मोह मी आवरला.
“यंग आणि स्किनी चेहेऱ्याला बारीक केस सूट करतात पण तुमचा फेस तेवढा यंग नाहीये आणि चबी आहे त्यामुळे हीच स्टाईल तुमहाला त्यातल्या त्यात बरी दिसते"
निळ्या कोल्ह्याला आता तर हर्षवायू झाला होता. 
झाला तेवढा अपमान पुरे असे म्हणून मी त्या हॉट सीट वरून खाली उतरलो आणि निमूटपणे पैसे भरायला गेलो.
"सर, कसा होता एक्सपीरियन्स?"
"बिल किती झाले?'
"सर, तुमचे ना ३४४ रुपीज झाले इन्कलुडींग GST."
"इतके? माझ्याकडे डिसकाउन्ट कूपन आहे."
"हो सर, डिस्काउंट पकडूनच ३४४ झाले आहेत. नाहीतर नॉर्मल हेअरकट कॅन कॉस्ट मोअर दॅन फाईव्ह हंड्रेड"
अबब! मी गपगुमान पैसे दिले. 
"सर तुम्हाला ॲन्न्युअल मेम्बरशिप घ्यायची आहे का? फक्त १४९९ ला आहे आणि प्रत्येक सर्व्हिस वर २०% ऑफ मिळेल."
"नको!" मी अक्षरशः पळतच बाहेर पडलो.
पुढील वेळी शांतपणे अप्पाचे दुकान गाठले. 
"अप्पा, किती वेळ लागेल?"
नेहमीप्रमाणे उत्तर आले "पंधरा मिनिट."
त्या दोन शब्दांत मला असा मानसिक आधार मिळाला, जो Posh and Chic च्या पाचशे रुपयांच्या हेअरकटमध्ये, प्रोफेशनल लुकमध्ये, सॉल्ट अँड पेपरमध्ये, स्कॅल्प ॲनालिसिसनध्ये मिळाला नव्हता.
आजही अप्पाकडे गेलो की तो काही विचारत नाही.
‘स्कॅल्प ड्राय आहे का?’
‘टेक्स्चर कसं आहे?’
‘कार की बाईक?’
‘रॉयल एनफिल्ड की स्कुटी?’
‘सॉल्ट अँड पेपर लुक करू का?’
काहीच नाही.
सरळ एकच प्रश्न "नेहमीसारखंच ना?"
आणि मीही म्हणतो "हो अप्पा. नेहमीसारखेच"

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 739
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

छान खुसखुशीत. 😃  Haircut या शॉर्टफिल्मची आठवण झाली.

तुमचं तरी बरंय, आम्हाला बायकांना असा कोणत्या अप्पाचा पण ऑप्शन नाही, छोटुश्या पार्लरमध्ये गेलं तरी हा सगळा भोचकपणा असतोच. 

 


टीव्ही वर लावलेली निर्थथक गाणी पाहावी

 

 

इल्ले cultured men who do not find peace in this cruel world go to आप्पा every weekend and listen to bangers from the 90s गाणी इमॅजिन करायची की दादा - 

- राह में उनसे मुलाकात हो गई

 - अकेले है तो क्या ग़म है

 - आज फिसल जाइयो तो

 - तुम सा कोई प्यारा कोई मासूम नहीं है 

- परदेसी परदेसी जाना नहीं

 

बाकी आप्पा लवर्स ऑफ द यूनिवर्स यूनाईट.


फ्रेश वाटले लेखन.

फार युनिव्हर्सल कोंटेंट असला तरी..

.

योगायोगाने आजच जाऊन आलो सलून ला.

.

माथ्यावर 3 नंबर आणि बाजूने मागे झिरो.

बोली भाषेत उबर द्रय आल्स नूल.

चार शब्दात हिशोब क्लोज. एक थम्स्प आणि 25 €.

फिलेन danke.


हाहा साधारण जिथे जास्त इंग्रजीने स्वागत होते तिथे रेट टाइटच असतात, हा रेड फ्लैग ओळखून मी आधीच किती होतील वगैरे न लाजता विचारून घेतो!


धमाल आहे. अगदी तंतोतंत. भारी जागी गेलं की केस कापायचे सोडून आधी स्वतः मधील दहा कमतरता ऐकाव्या लागतात. मग केस कापायला सुरुवात केली तरी क्रॉस सेलिंग चालूच असते. डँड्रफ ट्रीटमेंट, केस काळे करणे इत्यादि अजिबात स्वारस्य नसलेल्या गोष्टींचा जोरदार प्रचार चाललेला असतो. यातील प्रत्येक "ट्रीटमेंट" ही दंतवैद्याकडे जशी एकामागून एक बरीच सिटिंग्स असतात तशा प्रकारची असते. पाच आकडी किमती देखील दिसतात. माझ्या लहानपणीचे असे आप्पा किंवा अण्णा टाईप केशकर्तनकार आता नाहीसेच होत चाललेत. वर कुठेतरी उल्लेख आलाय तशी ही जुन्या काळातल्या सलून मधली गाणी हा वेगळाच विषय आहे. ती विशिष्ट गाणी केवळ सलूनमधेच ऐकायला मिळायची किंवा ऐकायला लागायची म्हणा. लिखनेवाले ने लिख दी है, मिलन के साथ जुदाई.


मस्त, छान वाटले मुक्तक. जत्रा वगैरे दिवाळी अंकांतील कथांची आठवण झाली.

माझा एक ठरलेला सलूनवाला आहे. मोकळा वेळ काढून, एक-दोन मित्रांना घेऊन मी तिथे जात असतो. दर रविवारी दाढी ट्रिम करायला व महिन्यातून एकदा डोईवरचे केस कापायला. माझे टक्कल फारसे दिसणार नाही अश्या बेताने केस कापतो व दाढी आकर्षक दिसेल अश्या बेताने तिला आकार देतो.

दुकान उघडल्यावर आधी सुब्बुलक्ष्मींचे सुप्रभातम् मग विष्णुसहस्त्रनामम् नंतर हनुमानचालिसा त्यानंतर तेलगू फिल्मी गाणी असा त्याचा संगीताचा क्रम असतो. टाइम्स, डेक्कन क्रॉनिकल ही इंग्रजी व इनाडू, साक्षी ही तेलुगु वर्तमानपत्रे ठेवलेली असतात. थंडगार एसी लावून केशकर्तन चालतं. स्थानिक राजकारणाच्या गप्पा चालतात. 


रच्याक, मागच्या काही वर्षांत दाढी ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे का?


लहानपणी सलून ,ब्युटी पार्लर वगैरे काही नसायचे. जनता सरळ त्याला नाव्ह्याचे दुकान म्हणायचे. नाव्ह्याला सुद्धा त्याबद्दल काही सुख दुख वाटायचे नाही. 

 

दुकानाचे एक विशेष रूप असायचे. उबड खाबड ,शेणाने सारवलेली जमीन,डुगडुगणारी लाकडी खुर्ची, लहान मुलांसाठी त्या खुर्चीच्या हातावर ठेवण्यासाठी लाकडी फळी.समोर चौकोनी आरसा,कुठे कुठे पारा गेलेला. आरश्या ला चिटकून एक लाकडी फळी आणी भिंतीला टेकून ग्राहकांना बसण्या साठी तशाच फळीचा लाकडी डुगडुगणारा बाकडा. केसरी,तरूण भारत, प्रभात सारखा एखादाच पेपर. समोरच्तुया फळीवर तुरटीचा भला मोठा खडा,पाण्याचा जर्मल चे भांडे, लाकडी वाटीत ठेवलेली गोदरेज साबणाची गोल वडी, घोड्याचे केस असलेला दाढीचा लाकडी ब्रश,एक वस्तारा, धार लावण्यासाठी भिंतीवर आडकवलेला चामड्याचा पट्टा. भिंतीवर गणपती,लक्ष्मीचे एखादे कॅलेंडर.....समग्र वर्णन करत बसलो तर वेगळी जिल्बी पाडावी लागेल.

 

असो, दुकानाचे नाव  होते चंद्रकांत केस कर्तनालय. मुंडन संस्कारा पासून माझे डोके आमच्या तिर्थरूपांनी चंद्रकांत च्या हवाली केले. पुढे मुंजीत  घेरा ठेवण्याचे केलेले काम तर वाखाणण्याजोगे होते. परफेक्ट  सर्कल...

 

आता फळीवरून खुर्चीवर बसण्याचे वय झाले, आतापर्यंत  महिन्यात एकदा रविवारी चंद्रकांत कडे जावे लागायचे.  गपचूप केस कापून घरी यायचे. हिशोब आमचे तिर्थरूपच बघायचे. आमच्या हातात कधी दमडी पडली नाही का चंद्रकांतने कधी मागितली नाही.

 

खुर्चीवर  बसण्याच्या वयात आल्यावर थोडी अक्कल पण वाढली होती. मित्रांचे ऐकून चंद्रकांतला असे केस काप ,तसे नको कापू म्हणायला गेलो तर त्याची मुक्ताफळे ऐकायला मिळाली. "तुझ्या बापाने सांगीतलय तसेच कापणार नाहीतर तो माझी भादरेल " ,अशी अलंकारिक भाषा वापरत मला धुडकावून लावले. 

पुढे पुण्यात  शिक्षण आणी सैन्यात नोकरी मुळे चंद्रकांतचा सहवास संपला. 

 

सेवानिवृत्त झाल्यानंतर सोसायटी जवळच्या एका दुकानात केस कापण्यासाठी गेलो. दुकानाच्या पाटीवर,PHD ,एवढेच लिहीले होते.

कुतूहल वाढले. एक विशीचा तरूण केस कापताना दिसला. त्याला विचारले,काय रे पाटीवर असे काय लिहीलय?तो म्हणाला काका, "पर्सनल हेअर ड्रेसर ,PHD", असा त्याचा फुल फाॅर्म आहे. आता मात्र माझ्या डोक्याचा गोविंदा झाला. 

पुढे, चांगली ओळख झाली. त्या तरूणाचे वडिल पण आमच्याच गावतले निघाले. खोलात जाऊन चौकशीनंतर कळाले की तो तरूण आमच्या चंद्रकांत चा पणतू आहे.

 

काय योगायोग, मनात विचार  आला की पृथ्वी गोल आहे ,हेच खरे......

 

 


लेख आवडला आणी त्या निमित्ताने लहानपणी निर्व्याज प्रेम केलेल्या व्यक्तीचे स्मरण झाले.

 

धन्यवाद. 


मला कधीतरी केश कर्तनालयात जायचे वेळ येते. फारतर तीन चार मिनीटात काम आटपते. पण तो माणूस चार्जेस मात्र संपूर्ण घेतो.

 


पूर्वी बरीच वर्षे मी "साईडने बारीक करा. कानावर डोळ्यावर यायला नकोय" असे उगीच एक सूचना म्हणून सांगत असे. मला ते तसे तिथे अर्धातास बसण्याचा खूपच कंटाळा येतो. हल्ली मी थेट पूर्ण डोक्यावर मशीन मारून टाकायला सांगतो. साईडचे असे, वरचे तसे.. असे आता काही नाही. एकच निकष. किमान दोन महिने परत यायला लागले नाही पाहिजे.


आठवणीचा पेटारा उघडला लेख वाचुन.

 

लहानपणी घरी दर महीन्याला मारुती नावाचा एक न्हावी यायचा. घरच्या सगळ्या पुरुषांचे केस कापणे हेच त्याचे काम. तेव्हा रडारड नको म्हणुन गोळी मिळायची हीच काय ती माझ्यासाठी जमेची बाजु. लवकरच तो जमाना संपला नी मी हाताच्या मुठीत २ रुपये घेउन कोपऱ्यावरच्या मोहन केश कर्तनालयात जाउ लागलो. बहुतेकदा तिथे गर्दी असे आणि मी अंग चोरुन एका कोपऱ्यात बसलेला असे. मग तो मोहनच माझा नंबर लक्षात ठेवुन मला एखाद्या खुर्चीत फळी टाकुन जागा करुन देई. "केस शाळेसाठी बारीक कापा" हे एकच वाक्य मी तिथे सांगायचो. बाकी स्टाईल वगैरे नाहीच. 

पुढे कॉलेजात गेल्यावर संजय दत्त, सलमान खान वगैरेंच्या प्रभावाने केस वाढवायचे डोक्यात आले होते, पण तोवर पोहणे सुरु झाले आणि सर्दी न होण्यासाठी केस बारीक ठेवण्याची तंबी घरुन मिळाली. पोहणे बंद न व्हावे यासाठी ती पाळणे भागच होते. मात्र सलून बदलत गेली आणि जरा स्टायलिश झाली. मात्र तीच १९९० ची गाणी कयामत से कयामत तक, आशिकी, दिल, बेटा,राजा, खिलाडी वगैरे वगैरे नॉस्टैल्जिक प्रकार अजुनही चालतो.

 

मग काही काळ परदेशी वास्तव्य झाले आणि मशीनने केस कापणे काही झेपेना. मग दरवेळी २५ डॉलर देणे जिवावर यायचे त्यामुळे एकदाच जाउन बारीक केस करुन यायचे.

 

आता वयाप्रमाणै केस विरळ झालेत त्यामुळे एकच कट, बाकी कटकट नाही. जावेद हबीब, ॲपल वगैरे हुच्चभ्रु लोकांशी कधी संबंध आला नाही. येउही नये.


अजून एक आठवण. आमच्या इथे ''मायापुरी'' नावाचं मासिक असायचं. ते नट नट्यांचं आणि फिल्मी नॉलेज वाढवण्यासाठी पुरायचं. त्यामध्ये कधी कधी नट्यांचे थोडे उत्तान फोटो असायचे. ते पटकन कोणी बघत नाही असे समजून बघून घ्यायचे. 
पण अप्पा सारख्या सलून मध्येच समाधान मिळतं. थोडं अनहायजिनीक असतं. पण किंमतीच्या मानाने बेस्ट व्हॅल्यू फोर मनी. 

हे लग्झरी सलून्स वगैरे मध्ये कधी कधी तशी गावठीच पोरं काम करत असतात. पण आव असा आणतात की खूप मोठ्ठे फॅशन डिझायनर आहोत की काय. एकदा कपिल्स मध्ये गिऱ्हाईक कमी आणि पोरं जास्त होती. त्यांना बसल्या बसल्या पुतळ्यांना हेअरस्टाईल करायचे काम दिले असावे बहूतेक. काहीही हेअरस्टाईल करत होते की त्याला हेअरस्टाईल कसेकाय म्हणावे. आणि वर इतर गिऱ्हाईकांची अशीच टर उडवत होते. जाम वैताग आलेला. तेव्हापासून अप्पाकडेच जाणे पसंत करतो. 


ठाण्यात आमची भादरण घराजवळच्या राम्मारुती ( हो, असाच उच्चार आहे ) रोडावरल्या सत्कार सलूनात व्हायची. पण तिथे कधीकधी म्यानपावर कमी असायची. म्हणून मग खात्रीच्या डायमंड हेअर कटिंग सलूनात जायचो. ते चरईत जुन्या मुंबई रस्त्यावर होतं. जरा पॉश होतं. वाट बरीच पाहायला लागायची, पण मासिकं भरपूर होती. त्यातली काही तर चक्क इंग्रजी. रेडियो दणादणा बोंबलंत असायचा. ही कुठली स्टेशनं, आहेत असा निरागस भोभाप्र लहानपणी केला होता. तेव्हा पब्लिक लई हासलं. मी फारसं मनावर घेतलं नाही. मला पुस्तकांत मुंडकं खुपसून बसायला आवडे. केस कापतांनाही मासिक हातात धरता येईल का याची चाचपणी करून बघितली. पण डाळ शिजली नाही.

 

हल्ली इथे इंग्लंडात सध्या कटिंगसाठी भरपूर पैसा मोजावा लागतो. कारण की केस कापण्याचा खर्च किरकोळ असला तरी माणूस वापरायचा खर्च बराच असतो. आमचे माथेरान उजाड झालेले असल्याने लहान मुलांच्या दरांत काम होत असे. करोना काळांत बायकोने कापणी करून पहायचा प्रस्ताव टाकला. फक्त फावडंच तर मारायचंय, इति बायको. ( फावडं हा माझा शब्द, ती ट्रिमर म्हणते. ) मग घेतलं ते फावडं आणि केली मनसोक्त मशागत. अहो आश्चर्यम. चक्क जमली. मग तेव्हापासनं दुकानांत जातंच नाही. 

 

-गा.पै.


आता युनिसेक्स सलोन नावाची न्हाव्याची दुकानं ( खूप चकचकाट केलेली) उघडत आहेत. पाच सहा महिन्यांनी बंद होतात.