Skip to main content

सहली/ पर्यटन- दिखावा, मनस्ताप कि मन:शांती

लेखक रणजित पारेकर यांनी सोमवार, 06/07/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.

आजकाल सोशल मीडियावर पर्यटनाचे, कौटुंबिक सहलीचे, मित्रांच्या मौजमजेचे फोटो/ व्हिडिओ यांचा भडीमार होत असतांना दिसतो. दैनंदिन धावपळीच्या आयुष्यामुळे येणारा मानसिक ताण सहलीमुळे  दूर होतो. निसर्गाच्या सानिध्यात किंवा नवीन ठिकाणी वेळ घालवल्याने मनाला शांतता लाभते. प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेले  जास्त काळ लक्षात राहते म्हणूनच, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी वेळोवेळी पर्यटन सहलींचे आयोजन केले पाहिजे. नात्यांमधील गोडवा कायम राहण्यासाठी, इतिहासाची उजळणी करण्यासाठी, नवनवीन खाद्यसंस्कृती व परंपरा जाणुन घेण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे.

 'जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे' या म्हणीचे प्रात्यक्षिक कोरोनामध्ये पाहिल्यावर एकंदरीतच लोकांचे जीवनमान, सवयी, खर्च-गुंतवणुक प्रमाण यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. मात्र पर्यटनवाढिमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती सोशल मीडियाने. लोकांना फारशी माहिती नसलेले धबधबे, किल्ले, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे इ. ठिकाणांची माहिती कधी मुळ फोटो, व्हिडिओ, ड्रोनव्हिव मधुन तर कधी AI व्हिडिओ माध्यमातून सहज उपलब्ध होत असल्याने जाहिरातबाजी मुळे आकर्षण वाढत आहे.  यामुळे आर्थिक देवाणघेवाण व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो.

मात्र अभ्यास दौरे, धार्मिक श्रद्धा, उत्सुकता यापेक्षा निव्वळ मौजमजेच्या अपेक्षेने पर्यटन स्थळावरील स्वैराचार व अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर नुसता दिखावा करणा-या showy behaviour असलेल्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र त्याचवेळी एखाद्या ठिकाणी विकेंडला जाऊन किती मनस्ताप झाला अशा प्रतिक्रिया येत आहेत. पर्यटकांच्या बेशिस्तपणाच्या वागणुकीमुळे झालेल्या दुर्घटनांना प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार धरल्या जाते. पर्यटनस्थळी होत असलेले प्रदूषण, मद्यधुंद युवक युवतींच्या ग्रुप टुरीझममुळे होणारा धिंगाणा व हुल्लडबाजी याला कोण जबाबदार असू शकते. भंडारद-याला जाऊन रात्री शांतपणे काजवे पाहण्याऐवजी हुल्लडबाजी करणारे पर्यटक व रत्नागिरीतील वेळास बीचवर कासवा महोत्सव दरम्यान पर्यटकांना दाखविण्यासाठी नवजात पिल्ले टोपल्या खाली झाकून ठेवणारे दोघेही याकरीता सारखेच दोषी असतात. मुंबई पुण्याचे लोक आठवड्यातील पाच दिवस पहाड उचलून ठेवल्यागत काम केल्याने विकेंडला बाहेर गेलेच पाहिजे या मानसिकतेतून 36 तासापैकी 12 तास प्रवासातच असतात. उत्तर भारतातील अध्यात्मिक व बर्फ पडणा-या थंड हवेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी वाढली आहे. यंदा तर रात्री दोन वाजता शिमल्यात ट्राफीक जाममध्ये फसलेला मित्र सकाळी 11 वाजता बाहेर पडल्याचे वैतागून सांगत होता. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आजकाल सर्वच पर्यटन स्थळी भेडसावणारी समस्या म्हणजे वाहन पार्किंग व ट्राफीक जाम.

याव्यतिरिक्त टुरिझम इंडस्ट्रीजचा भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा आहे. 140 कोटी जनतेला प्रशासकीय शिस्तीपेक्षा Civic Sense ची खुप गरज आहे. त्यामुळे पर्यटनाचा वापर हा मन:शांती करीता होईल अशी अपेक्षा करुया.


वाचने 252
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विचारांशी सहमत, सध्या कोणत्याही पर्यटनस्थळी जाऊन गर्दीचा सामना करण्यापेक्षा घरी थांबणेच जास्त श्रेयस्कर वाटू लागले आहे.