
एक मिनिट हे टोमॅटो नाही...तर आहेत Rose Apple...
खरंतर ही उन्हातळी फळ आहेत. मी ही पाककृती 15-20 दिवसांपूर्वी केलेली आहे😅
नक्की वाचा. व्हिडिओ स्वतंत्रपणे पोस्ट करते.
घराच्या जवळ सापडलेल्या रोज ॲपलपासून बनवलेलं स्वादिष्ट जॅम!🍎✨
मी आणि माझे घरचे अचंबित होतात ते याच गोष्टीने! आमच्या भागात फणस, जांभूळ, पपई, विड्याची पाने, विविध फुले... कसे काय सापडतात तेही फक्त मलाच ? 😅
जिज्ञासा असेल तर माणूस निरीक्षण करतो आणि त्याला दृष्टीआड सृष्टीचे अद्भुत दर्शन होते.
मागच्या दोन आठवड्यापूर्वी रविवारी सकाळी फिरायला निघालो आणि तिसऱ्या गल्लीतच एक झाड दिसलं रोज ॲपल (जांब)च्या लाल-गुलाबी फळांनी लगडलेलं! नायर काकू फळं तोडत होत्या. मी गेटच्या आत शिरले आणि विचारलं, “काकू, काही फळं मिळतील का?”
काकूंनी हसत-हसत कंपाउंडच्या भिंतीवर चढून मला पिशवीभर ताजी फळं दिली. दोन महिन्यांपूर्वी कोकणात ५० रुपयांना वाटा घेतली होती ती आठवण डोक्यात आली. तेव्हा जॅम करायचा विचार होता, पण जमला नव्हता. आणि आज? *किलोभर ताजी, रसाळ फळं घरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर!*
रस्त्याने आंबट-गोड फळं खात-खात घरी पोहोचले. घरच्यांनी आश्चर्याने विचारलं, “अरे, तू आज कोकणात गेली होतास का?” मी हसत म्हणाले , “नाही बाई... तिसऱ्या गल्लीतूनच आणलीयेत ही!” सगळे थक्क झाले. “तुलाच बाई असं छान-छान सापडतं?” अशी टिप्पणी आलीच.
मग काय, रविवारचा दिवस आणि ताजी फळं... लगेच कामाला लागले . गूगल केलं आणि समजलं की रोज ॲपल जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त तीन साहित्य आणि थोडंसं प्रेम पुरेसं!
रोज ॲपल जॅम पाककृती
(Rose Apple Jam )
साहित्य
अंदाजे १ छोटा बाउल जॅम होईल
- १ वाटी रोज ॲपलचा रस (किंवा २-२.५ वाट्या फळं)
- १ वाटी साखर (चवीप्रमाणे समायोजित करा)
- अर्ध्या लिंबाचा रस
कृती:
१.फळं चांगली धुवा.मागचा आणि पुढचा शेंडा काढू टाका. फळाचे बारीक तुकडे करा.
२.ब्लेंडरमध्ये फळांची बारीक प्युरी करा. चाळणीने गाळून स्वच्छ १ वाटी रस घ्या.
३. जॅम शिजवा- जाड तळाच्या कढईत रस आणि साखर एकत्र करा. मंद ते मध्यम आचेवर ठेवा. सतत ढवळत राहा. साखर विरघळल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घाला.
४. घट्ट होईपर्यंत शिजवत राहावे लागते.मिश्रण जाडसर होईपर्यंत (साधारण १५-२० मिनिटं) शिजवा.
थोडासा जॅम थंड प्लेटवर टाका. बोटाने ओढला की रेष पडली तर तयार! गरम असतानाच स्वच्छ काचेच्या बरणीत भरून झाकण लावा.
५.थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. १ ते १.५ महिने सहज टिकेल..
गरमागरम पोळी सोबत jam चाखला...स्वाद अविस्मरणीय!स्वादही इकडं ताज्या फळांची आठवण करून देत होता. 😊

असा एक साधा रविवार, घराजवळ सापडलेली फळं आणि त्यापासून बनवलेलं घरगुती जॅम... केवळ चव नाही तर एक rose apple आख्यान झालं. 😅
तुम्हीही आजूबाजूला नजर फिरवा. कदाचित तुमच्या गल्लीतही एखादं जादूई झाड लपलेलं असेल!
-भक्ती
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा जैम दीर्घ काळ ( वर्षभर)…
हा जैम दीर्घ काळ ( वर्षभर) वापरायचा असेल तर काही प्रिझर्वेटीव वापरता येईल का?
लैच महाग ओ.
जावा अपल किंवा मलबार अपफेल नावाने मिळतात इथे. ट्रॉपिकल एशियन फ्रुट म्हणे.
बादवे तुमच्या पिशवीत 2 किलो जरी असते तरी रुपयात पंच हजारी सरदार असता बरका इथे...
हे घाटमाथ्यावरच्या…
हे घाटमाथ्यावरच्या जामफळांसारखेच दिसताहेत, मात्र ते फिकट पिवळसर पांढरट असतात. चवीला आंबटगोडच.
हे जाम कोकणात अगदी सामान्य फळे आहेत.
पांढरे, गुलाबी आणि थोडे जांभळेही मिळतात. जाम चांगला झाला आहे.
पेरूचा जामही(=जेली) फार छान होतो.
एक राहिलं.
आलुबुखार आता जुलैमध्ये येतात बाजारात. काळपट लाल घ्यावेत. त्याचा जाम होतो चांगला आणि टोस्टला लावून खायचा.
मंडळी जाम आवडला छान वाटलं🙏हे…
मंडळी जाम आवडला छान वाटलं🙏
हे फळ आमच्याकडे फक्त मलाच ज्ञात झालं आहे, इतकं ते या आमच्या पठारी लोकांना माहितीच नाही. म्हणून इतकं कौतुक 😅
पण खरंच स्वतः झाडहून ताज तोडून आणून पाककृती केल्यामुळे भारी वाटलं.
कंकाका, आलूबुखार पाहते आता.
रोझ अँपल जाॅम..
रोझरोझ खाता येतो का😁
मस्त.
😅नाही
In reply to रोझ अँपल जाॅम.. by कर्नलतपस्वी
😅नाही
छानच दिसतोय जॅम, रंग खूप…
छानच दिसतोय जॅम, रंग खूप सुरेख आला आहे.
हो, रंग अगदी नैसर्गिक सुंदर…
In reply to छानच दिसतोय जॅम, रंग खूप… by श्वेता व्यास
हो, रंग अगदी नैसर्गिक सुंदर येतो 👍