Skip to main content

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : प्रवासाची सुरुवात आणि अनपेक्षित गोंधळ

लेखक नयना माबदी यांनी रविवार, 28/06/2026 14:25 या दिवशी प्रकाशित केले.

 

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर  : प्रवासाची सुरुवात आणि अनपेक्षित गोंधळ

१९ जानेवारी, रविवार.
उद्याच निघायचे असल्याने घरात सर्वजण तयारीत व्यस्त होते. प्रवासात बाहेरचे अन्न नेहमीच मिळेल, तरी उदया ट्रेन मधे खाण्यासाठी नेण्याच्या पदार्थांची तयारी सुरू होती. चिवडा, ठेपले, भरलेली कारली, चटणी, बिस्किटे, फळे, मिठाई आणि इतर खाऊच्या वस्तूंनी बॅगा भरू लागल्या.

संध्याकाळी सर्व सामानाची पुन्हा एकदा तपासणी केली. तिकिटे, ओळखपत्रे, हॉटेल बुकिंगचे प्रिंटआउट, औषधे आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर अखेर उद्याचा दिवस उजाडणार होता आणि आमचा बहुप्रतीक्षित हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर प्रवास सुरू होणार होता.

20 जानेवारी - सोमवार
मंमी सकाळी सर्वात आधी 4 वाजता उठली. तिला चिंचेचा  भात बनवायचा होता. चहा वगेरे बनवून मग तिने आंघोळ उरकली. मग आम्हाला उठवले .आम्ही ही सर्व आवरून 6:30 पर्यंत रेडी झालो. समीर आणि स्नेहा आम्हाला डायरेक्ट LTT ला भेटणार होते. त्याचप्रमाणे निलीमा व रोहन सुद्धा आम्हाला LTT ला भेटणार होते

मी, मंमी , बहीण आणि पप्पा आम्ही सर्व सामान टॅक्सीत टाकून  निघालो. 7:50 ची रेल्वे सुटणार होती.आम्ही 7:15 ला LTT पोहोचलो. समीर आणि स्नेहा सुद्धा आमच्या आधी आले होते. पण निलीमा आणि रोहन यांचा काही पत्ता नव्हता.

7:30 झाले तरी आलेत नाही. मग रोहनला फोन लावला तर आम्ही निघतोय असे म्हणाले. माझा जीव धाकधुक करु लागला  कारण 20 मिनिटांत गाडी सुटणार होती आणि त्यांना विलेपार्ले वरुन यायला अर्धा तास तरी लागला असता.

आम्ही गाडीत सामान ठेऊन त्यांची वाट पाहत होतो. सतत फोन  करत होतो. शेवटी ते न येताच गाडी सुट्ली.गाडीने स्टेशन सोडताच त्यांचा फोन आला की ते लोक पोहोचले पण मग गाडी थांबणार नव्हती.

गाडीचा पुढचा स्टॉप कल्याण होता जो 8:30 ला येणार होता आणि एवढ्या वेळात ते कल्याण पोहोचणे शक्य होणार नव्हते.

आम्हालाही काही सुचत नव्हते.आता हे लोक दुस-या दिवशी हरिद्वार कसे पोहोचतील याचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांना स्टेशन बाहेर एक टॅक्सीवाला भेटला जो त्यांना बोलला की इगतपुरी स्टेशनवरून गाडी पकडून देईल. दुसरा काहीच उपाय नव्हता. त्यांनी हे मान्य केले आणि टॅक्सीने निघाले. इकडे आमच्याही जीवाची घालमेल होत होती. सतत आम्ही यांच्या संपर्कात होतो. गाडीच्या स्टॉप लिस्टमध्ये इगतपुरी स्टेशन नव्हते. त्यामुळे मला जास्तच धाकधूक होती. 

त्या वेळी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की एक्सप्रेस गाडी इगतपुरी येथे अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी थांबणार आहे. आमच्या मनात काळजीच होती.10 वाजले आणि इगतपुरी  स्टेशन आले मी लगेच निलीमाला कॉल केला. तेव्हा ते लोक म्हणाले आम्ही स्टेशनवरच आहोत.त्या टॅक्सी चालकाच्या चपळाईमुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे ते दोघेही सुखरूपपणे आमच्यात सामील झाले. मात्र या संपूर्ण गोंधळाची किंमत निलीमाला मोजावी लागली. टॅक्सीचे अतिरिक्त भाडे आणि इतर खर्च मिळून तिला जवळपास ₹8,000 जास्त खर्च करावे लागले.

यामुळे आम्हाला एक महत्त्वाचा धडा मिळाला – प्रवासाला निघताना नेहमी वेळेच्या आधीच स्टेशनवर पोहोचले पाहिजे. शेवटी सर्व अडचणींवर मात करून आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

आमचा संपूर्ण दिवस ट्रेनमधूनच जाणार होता. दुपारी घरून आणलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत सर्वांनी जेवण केले. सकाळपासूनची धावपळ आणि तणाव यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली. खिडकीबाहेर वेगाने मागे सरकणारी गावे, शेते आणि निसर्गरम्य दृश्ये पाहण्यात वेळ कसा गेला ते समजलेच नाही.

संध्याकाळी चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही विविध खेळ खेळत गप्पांचा फड रंगवला. हशा, मस्करी आणि जुन्या आठवणींमुळे प्रवास आणखी आनंददायी झाला. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले आणि सुमारे दहा वाजता आपापल्या बर्थवर जाऊन विसावलो.

दिवसाची सुरुवात गडबड, धावपळ आणि काळजीने झाली असली तरी शेवट मात्र समाधानकारक झाला होता. ट्रेनच्या हलक्या डुलक्यांमध्ये कधी गाढ झोप लागली ते कळलेच नाही. उद्याच्या नव्या ठिकाणांच्या उत्सुकतेने मन भरून गेले होते.

2१ जानेवारी - मंगळवार
आज सकाळी ८ वाजता जाग आली. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत होते. त्यातच कळले की आमची गाडी तब्बल दोन तास उशिराने धावत आहे आणि आम्ही अजून दिल्लीदेखील पार केली नव्हती.

जानेवारीचा महिना असल्याने संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला होता. दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता आणि त्यामुळे गाडीला वेळेवर पोहोचणे आता शक्य नव्हते. नियोजनानुसार गाडी हरिद्वारला दुपारी १.३० वाजता पोहोचणार होती. आम्ही मनात हिशोब केला की जरी ३ वाजेपर्यंत पोहोचलो तरी हॉटेलमध्ये जाऊन आंघोळ उरकून संध्याकाळची गंगा आरती पाहता येईल.

पण बहुधा त्या दिवशी गंगा आरती आमच्या नशिबात नव्हती. गाडीचा उशीर वाढतच गेला आणि अखेर आम्ही संध्याकाळी सुमारे ५.१५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान हरिद्वारमध्ये दाखल झालो.

लगेच स्टेशनबाहेर येऊन आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी दोन रिक्षा केल्या. आजचे आमचे मुक्कामाचे ठिकाण होते उत्तर प्रदेश पर्यटन महामंडळाचे अलकनंदा हॉटेल. हॉटेलवरील सर्व सोपस्कार आटपून आम्ही खोल्यांमध्ये आलो. खोल्या साध्या असल्या तरी स्वच्छ, प्रशस्त आणि आरामदायी होत्या.

अलकनंदा हॉटेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्थान. हे हॉटेल गंगा नदीच्या घाटाजवळ वसलेले आहे. हॉटेलच्या मागील बाजूलाच त्यांचा खासगी घाट असून तेथे मुक्कामाला येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामात गंगास्नान करता येते. त्यामुळे गंगेच्या पवित्र प्रवाहाचा अनुभव अगदी जवळून घेण्याची एक वेगळीच संधी मिळते.

प्रवासाचा थकवा असला तरी गंगेच्या सान्निध्यात आल्यामुळे मन प्रसन्न झाले होते आणि हरिद्वारमध्ये आल्याची खरी अनुभूती याच क्षणी मिळाली.

सायंकाळचे ६ वाजले होते आणि गंगा आरती ७ वाजता सुरू होणार होती. गंगा आरती होण्याचे ठिकाण हर की पौडी आमच्या हॉटेलपासून बरेच लांब होते आणि आमच्या सर्वांची अंघोळ होईपर्यंत बराच वेळ जाणार होता. आता आपल्याला आरती पाहता येणार नाही हे आम्हाला कळून चुकले. मग आम्ही हॉटेलमागे असलेल्या स्नानघाटावर स्नान करण्यासाठी गेलो.

 

हॉटेलच्या मागे असलेले गंगा घाट

 

तेथील दृश्य अत्यंत मनमोहक होते. आयुष्यात पहिल्यांदाच गंगा नदी प्रत्यक्ष पाहत होते. ज्या पद्धतीने तिचे वर्णन ऐकले होते, तशीच ती आपल्या अल्लड स्वभावात शांतपणे वाहत होती. पाणी अतिशय गार होते आणि थंडीही चांगलीच जाणवत होती. तरी आम्ही तिथे तांब्याने थोडे पाणी अंगावर घेतले आणि नंतर खोल्यांमध्ये जाऊन स्नान उरकले.

त्यानंतर हर की पौडी पाहण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सर्वत्र निरव शांतता आणि अंधार पसरलेला होता. आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन ऑटोरिक्षा शोधू लागलो. थोड्या वेळाने एक रिक्षा मिळाली आणि आम्ही लगेच हर की पौडीकडे रवाना झालो.

गंगा आरती होऊन गेल्यामुळे तिथेही बरीच शांतता होती. घाटाजवळ फुले आणि दिवा घेऊन गंगापूजन करता येते. त्याप्रमाणे आम्ही फुले घेतली. आम्ही पूजा करणारच होतो, इतक्यात काही जण स्वतःला पंडित म्हणवत आमच्याकडे आले. त्यांनी दोन मिनिटे काही मंत्र म्हटले आणि फुले व दिवा नदीच्या प्रवाहात सोडायला सांगितले. त्यानंतर आमच्या प्रत्येकाकडून १०० रुपये घेतले.

 

जय गंगे माँ

त्या अनुभवातून आम्ही एक गोष्ट शिकलो. यापुढे कधी गंगामैयाच्या दर्शनाला आलो, तर फुले आणि दिवा घेऊन स्वतःच पूजा करायची. “जय गंगे माँ” म्हणत पूजा आटोपून आम्ही निघालो. तेवढ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जवळच्याच एका दुकानातून चना मसाला घेतला आणि खात खात फेरफटका मारला. त्यानंतर पाहण्यासारखे विशेष काही उरले नव्हते.

आम्हालाही हॉटेलवर जाऊन जेवण करून विश्रांती घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशला जाण्यासाठी गाडी येणार होती आणि तेथून पुढे जम्मूसाठी प्रस्थान करायचे होते.

त्यामुळे गंगा आरती पाहण्याची आमची इच्छा अधुरीच राहिली. आता पुन्हा कधी गंगामैयाचे बोलावणे येईल, तेव्हाच हा योग पुन्हा जुळून येणार होता.

हर की पौडीवरून निघून रिक्षाने आम्ही हॉटेलवर आलो. रूमवर जाऊन लगेच फ्रेश होऊन आम्ही हॉटेलच्या जेवणकक्षात पोहोचलो.

जेवण अतिशय स्वादिष्ट होते. डाळ फ्राय, भात, मशरूम मसाला, रोटी, पापड, सॅलड – सर्व काही गरमागरम वाढले जात होते. दिवसभरातील हेच आमचे पहिले व्यवस्थित जेवण असल्यामुळे सर्वांनी मनसोक्त ताव मारला.

जेवण झाल्यानंतर पुन्हा आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन, उद्याच्या ऋषिकेश भेटीची उत्सुकता आणि पुढील प्रवासाची स्वप्ने मनात रंगवत आम्ही निद्रेच्या अधीन झालो.

क्रमश: 

टीप : - खुप प्रयत्न करुन ही मला फोटोज टाकणे नाहि जमत आहे. मि सर्व प्रकारे लिंक टाकुन preview करुन पाहिल फोटोज  नाही दिसत आहेत.


 


वाचने 382
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

गूगल ड्राइव किंवा गूगल फोटोज >>share>> anyone with the link can view>> हे केल्यावरच लिंक कॉपी   करणे. ती इथे काम करते.


रेल्वेच्या वेळेला दोन तास अगोदर येणे हेसुद्धा ट्रिपचाच भाग असतो. वाटेतले ट्राफिक बिन भरोशाचे असते आणि नेहमी उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळेवरही येतात. शिवाय गाडी चुकली गेलो नाही तर रिफंड शून्य मिळतो., हॉटेल, टॅक्सी बुकिंगचे पैसेही वारतात.


त्या वेळी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की एक्सप्रेस गाडी इगतपुरी येथे अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी थांबणार आहे.

 

मुंबईतून बाहेर जाणाऱ्या गाड्या इगतपुरी मध्ये ते अतिरिक्त इंजिन काढायला थांबतात, जोडले जाते ते कसाऱ्याला कसारा घाट चढून गाडी देशावर येण्यासाठी केलेली ही योजना असते कारण तो घाट बराच कठीण चढणीचा आहे.

 

अलकनंदा हॉटेल उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे की उत्तराखंड पर्यटन विभागाचे ? त्यावर मी कन्फ्युज झालो  


In reply to by वृषभ खोंडे

जेव्हा आम्हि बुक केले ते up state gov च्या साईट वरुन केले होते.

"मुंबईतून बाहेर जाणाऱ्या गाड्या इगतपुरी मध्ये ते अतिरिक्त इंजिन काढायला थांबतात"
धन्यवाद माहिती बद्द्ल. त्या वेळी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते


In reply to by वृषभ खोंडे

वृषभ खोंडे,

 

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. इगतपुरीस मागून लावलेला जादा जोऱ्या काढला जातो. खरंतर तो कसाऱ्यास गाडीच्या मागे लावला जातो. तर तिक्षिकेने कसाऱ्यास सोडलेलंही चालून गेलं असतं. इगतपुरीपर्यंत जायची गरज नव्हती. बहुधा गर्दीमुळे कसारा टाळलं असावं.

 

आ.न.,

-गा.पै.


तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ ही ठिकाणे फसले आणी फसवणूक होण्या साठीच असतात. 

कधीच अशा ठिकाणी खरेदी किंवा दान पुण्य करू नये. 

 

मी आई,सासू,सासरे यांना काशी,प्रभाग आरोळ्या सन सत्त्याऐंशी मधे घेवून गेलो होतो. जाण्या आगोदर स्पष्ट सांगीतले होते. अजिबात  कुणीही पुजा वगैरेच्या भानगडीत पडायचे नाही. नाहीतर  लंगोटी घालून पायी  परत घरी जावे लागेल. 

 

लूटना म्हारो धर्म छे और लुटवाना थारो कर्म अशीच काहीशी परिस्थिती असते. 

बारा घाटांच पाणी पिल्यान हे शहाणपण आले पण घरवाले ऐक नाही. आता मी सुद्ध सांग नाही.