अमुक तमुकचा खान्देश special भाग पहिला. त्यात दुधातली शेवभाजी याचा खुप कौतुक झालं. मी शेवभाजी खुप भारी तयार करते. असा माझा समज होता.
पण धुळे, जळगाव इथल्या ढाबा स्पेशल शेवभाजी तीही दुधातली यां बाबत नविनच समजलं.
दुधातले अधिक तर गोड पदार्थ खाल्ले जातात.
आज काहीतरी खास, वेगळं आणि खान्देशी स्टाईलचं बनवायचं!
मनात थोडी धाकधूक होती, कारण दुधातली शेवभाजी मी पहिल्यांदाच स्वतःहून तयार करत होते.
नगरच्या चाफे फरसाणची खुसखुशीत ताजी शेव, दूध, कांदा-टोमॅटो, आलं-लसूण आणि खान्देशी मसाले आणले. याशिवाय मी यात काजू पेस्ट, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीमही घातली. डिश आणखी रिच आणि मलईदार व्हावी म्हणून!
साहित्य
सर्वप्रथम लसूण-आलं पेस्ट, टमाटर कांदा खोबरे घेतलेली प्युरी यांची फोडणी केली.नंतर मसाले परतत असताना खान्देशी खास सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागला.शेवभाजीत इलायचीने खुप छान चव येते म्हणाल तर हिच यातली प्रमुख सामग्री आहे.
मग त्यात काजू पेस्ट घातली त्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येतात. फ्रेश क्रीम घालून सर्व मिश्रण तेल सुटू पर्यन्त परतले.
त्यानंतर हाताने चुरलेली कसुरी मेथी टाकली.
मग आला मुख्य टप्पा भरपूर दूध (४ कप )ओतलं! दूध उकळू लागल्यावर नगरच्या चाफे फरसाणची ती खुसखुशीत शेव हळूहळू टाकली. शेव मुरत असताना शेवटी परत कसुरी मेथी भुरभुरली. वाह! रंग गुलाबी-केसरी झाला, घट्टपणा अगदी मलईदार दिसू लागला आणि सुगंध तर असा दरवळला!!
शेव पूर्ण मऊ झाली होती. दूध, क्रीम, काजू आणि मसाल्याचा रस तिच्यात चांगलाच भिनला होता.कसुरी मेथी भुरभुरवली. पहिला घास घेतला आणि मी स्वतःच, अरे वा! म्हणून टाकलं.
खुसखुशीत शेव, खान्देशी तिखट-गोड-खारट चव, काजू-क्रीममुळे आलेला मलईदारपणा आणि कसुरी मेथीचा हलका सुगंध सगळं एकत्र इतकं अप्रतिम!!
माझ्या काही टिप्स
• मीठ शेवटीच टाका नाहीतर दूध फाटेल.
• काजू पेस्ट आणि फ्रेश क्रीममुळे डिश खूप रिच आणि लक्झरी वाटते,मात्र त्याचं प्रमाण जास्त ठेवू नका.
• कसुरी मेथी शेव शिजल्यावर शेवटी टाका, म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो.
• नगरच्या चाफे फरसाची शेव नक्की वापरून पाहा 😊ती खुसखुशीत, चवदार आणि शिजल्यानंतरही उत्तम लागते.
• जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल, तर खान्देशी मसाल्यात लाल तिखटाचं प्रमाण वाढवा.
-भक्ती
मिसळपाव


प्रतिक्रिया
अरे वा! होतो पाहून लक्षात…
अरे वा! होतो पाहून लक्षात येतय की बेत जमलाय! तोंडाला पाणी सुटले. खूप छान ताई!
तोंपासु
मस्त पदार्थ. मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधायला येवल्यास गेलो होतो तेंव्हा एका ढाब्यावर खाल्ली. चव अजून रेंगाळतेय.....
ऐकायला आणि पहायला
आकर्षक वाटली पण खायची हिंमत होणार नाही, मेंटल ब्लॉक समाजा पण दूध आणि शेव एकत्र करून खायची हिंमत होणार नाही.
ते चहात फरसाण एक बकना टाकून खा स्वर्गीय चव असते इत्यादी आचरटपणा सुद्धा आवडत नाही (पाककृतीशी क्षेत्रीय सांस्कृतिक भावना जोडलेल्या दिसल्या टायटल मध्ये म्हणून एक सेक्युलर डिस्क्लेमर)
दुधातली मेथी, दोडके बरेच जण…
In reply to ऐकायला आणि पहायला by वृषभ खोंडे
दुधातली मेथी, दोडके बरेच जण आवडीने खातात.
सुहाना रेडी टू कुक मसाले मी पूर्वी खुप वापरायचे. त्यातले मसाले दुधायचं मि्क्स करावे लागतं,मग ग्रेव्ही व्हायची.
उदा.Make a paste of Suhana Butter Chicken Mix with milk
मला फार ऑड वाटायचे दूधात ग्रेव्ही तयार करायला.
दुधाची सायं ग्रेव्हीसाठी सर्रास वापरतात, त्याने पदार्थाला वेगळीच चव येते.
खरंय
In reply to दुधातली मेथी, दोडके बरेच जण… by Bhakti
पण दुधातील दोडकी ऐकली नाहीत, मेथी मटर मलई इतपत ऐकले चाखले आहे एखादेवेळी. सुहाना इत्यादी रेडिमिक्स बद्दल इतकी कल्पना नाही, दुधाची साय (फ्रेश क्रीम) वापरतात ग्रेव्ही/ garnish करता इतपत ठीक आहे म्हणजे ते चमचाभर वरतून साय अशी गोल आकारात भाज्यांवर पसरलेली बघितली आहे तितपत ठीक वाटले पण एकदम चार ग्लास दूधच थेट भाजलेल्या मसाल्यात टाकणं म्हणजे एकदम ऑ झालं इतकंच.
हा प्रकार एकदम आवडता आहे…
हा प्रकार एकदम आवडता आहे. धुळ्यातल्या ढाब्यावर, चांदवडच्या पुढच्या ढाब्यांवर दूध शेवभाजी चाखली आहे. इथे हिंजवडीत देखील देसी ढाब्यावर मलई शेवभाजी एकदम भारी मिळते.
अबा, कर्नलकाका, प्रचेतस…
अबा, कर्नलकाका, प्रचेतस यांनी ही ढाबा स्टाईल शेवभाजी अनेकदा आवडीने चाखली आहे तर 😊👍
मला आता खान्देशात जाऊन ही शेवभाजी खायची आहे 😄
हं.
आपण सांगितलेली पाककृती वाचली. ( पाहिली सुद्धा ) तर, शेव आणि दुध ही जुळवणी अजिबात मनाला पटत नाही. पण एकदा त्याची चव चाखून बघायला हरकत नाही. पण, प्रयोग छान आवडला.
पाककृती टाकत राहा. पुपाप्र.
-दिलीप बिरुटे