Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ८: पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) - अमृतापूरी ११० किमी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 23/05/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्रालगत सायकलिंगचा आनंद 

✪ बॅकवॉटर आणि खाड्यांवरील पूल! 

✪ केरलममधल्या मित्रांसोबत गप्पा 

✪ कोस्टल रोड आणि वस्ती नसलेला केरलम 

✪ अमृतापूरी आश्रम- भजन, सत्संग आणि भक्ती रस 

✪ अम्मांच्या दर्शनाचा योग 

✪ रात्रीच्या वेळचा किनारा! 

 

नमस्कार. १९ जानेवारीची सकाळ. पिरावोमच्या आयसीएफ परिसरात सकाळी लवकर आवरून स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत चहा घेतला. इथे काल एक कार्यशाळा सुरू होती आणि गंमत म्हणजे त्यातले बरेचसे लोक महाराष्ट्रीयन होते! स्वामीजींसोबत परत गप्पा झाल्या. त्यांचं तमिळ नाडूतलं गाव, लोक संपर्क, संघाचं काम आणि नंतर ते चिन्मय मिशनसोबत जोडले गेले तो अनुभव! अतिशय मनमिळावू. स्वामी असल्याचा कोणताच अहंकार नाही! अखेर निघायची वेळ झाल्यावर त्यांचा निरोप घेतला आणि निघालो! आजचा टप्पा ११० किलोमीटरचा आहे. आणि काही अंतर गेल्यावर "तो" भेटणार आहे! इथून पुढे जवळ जवळ प्रत्येक दिवशी तो सोबत असेल! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

पिरावोममधून बाहेर येईपर्यंत थोडं अंतर कालच्या सारखा मोबाईल समोर ठेवून नकाशा लावला होता. मुख्य रस्त्यावर आल्यावर मोबाईल काढला. अनेक हॉटेल बघितल्यावर चहा- बिस्कीटासाठी एक हॉटेल ठीक वाटलं. इडली चटणीसुद्धा मिळाली. इथे पिण्याचं पाणी गरमच देतात. हॉटेलमध्ये नारायण गुरूंचा फोटो! मानस सरोवर मार्गावर धारचुलाच्या पुढे ज्यांचा आश्रम आहे ते नारायण गुरू मुळचे केरलमचे! हॉटेलवाल्यासोबत थोडं बोलणं झालं. मल्याळम कानावर पडताना खूपसं संस्कृतसारखं वाटतं! 

 .  .   

पुढे काही अंतर रस्ता सरळ आहे. अगदी राष्ट्रीय महामार्ग नसला तरी मोठा आहे आणि वाहतुकसुद्धा खूप आहे. समुद्र किनारा हळु हळु जवळ येतोय! पण चक्क हवामानसुद्धा बदललं आहे. एकदम ढगांची दाटी झालीय! थोडे थेंब पडायला सुरूवात होते आहे. छोट्या छोट्या उपनगरांमधून रस्ता पुढे जातोय. आलापुळ्ळा (Alapuzza) च्या आधी एक प्रचंड मोठा खाडी पूल लागला! इतका विस्तीर्ण पूल! पलीकडे दुसरा किनाराच दिसत नाहीय! सगळा अथांग समुद्रच वाटतोय. आणि असं‌ वाटतंय की, मी खोल समुद्रात जातोय का काय! पण रस्ता अगदी अरुंद असल्यामुळे निवांत थांबून फोटो घेता आले नाहीत. काय विलक्षण परिसर आहे! वाटेत एका ठिकाणी भागवत सप्ताहाचं आमंत्रण लाउड स्पीकरने दिलं जातंय! अगदी कोकणासारखा परिसर. लाल माती आणि कुठे कुठे कौलारू घरंसुद्धा! खाडीमध्ये होड्या! नारळाची झाडं! 

इथल्या छोट्या हॉटेलमध्ये चिक्कीसुद्धा मिळते आहे. त्यामुळे माझी चांगली सोय होतेय. पुढे सायकलची दुकानंसुद्धा लागली. परत एकदा ब्रेक चेक करून घेतला. काहीच झालेलं नाहीय, मॅकेनिकने सांगितलं. आलापुळ्ळामध्ये हायवेची बरीच डायवर्जन्स आहेत. इथून थिरूवनंतपूरम- कन्याकुमारीचा महामार्ग परत समोर आला. रस्ता अगदी समुद्राजवळून जातोय आता, पण अजून मोठा "तो" दिसत नाहीय! कारण घरं- दुकानं- वस्ती इतकी जास्त आहे की, मोकळा परिसरच नाहीय! बरंच पुढे आल्यावर आणि मुख्य मार्ग सोडून अमृतापुरीकडे जाणारा किनारी रस्ता घेतल्यानंतर कुठे खुला समुद्र दिसला! नंतर मग एका ठिकाणी रस्त्याला लागून मस्त वाळुचा किनाराच आला! विराट दर्शन झालं! अहा हा! आकाशही आता मोकळं झालं आहे. तिथेच एकाने मला थांबवून हिंदीमध्ये माझी छोटी मुलाखत घेतली! अनेक जण टीशर्टवर महाराष्ट्र लिहीलेलं बघून हिंदीतच बोलत आहेत! 

अथांग सागर! त्याची गर्जना! कुठे कुठे तर रस्ता इतका जवळून आहे की, लाटांचे तुषारही अंगावर येत आहेत! इतके डोंगर आणि चढ उतार पार केल्यावर मिळणारी समुद्राची अथांग स्थिरता! जणू मनाच्या सर्व विकारांचा अनुभव घेतल्यावर मिळणारी ध्यानाची समता! 

अमृतापुरीला पोहचण्याच्या आधीचे तीस किलोमीटर थोडे अवघड गेले. एक तर समुद्रालगतची आर्द्रता. शिवाय मला वाटेमध्ये ८०- ९० किलोमीटर झाल्यावर जेवण किंवा ब्रेकफास्टचं हॉटेलच मिळालं नाही. अमृतापुरीकडे जाणारा किनारी रस्ता तसा खूप शांत. पर्यटनाच्या नकाशाच्या बाहेर असावा, इतका शांत! इथे हॉटेल्स अगदीच थोडे. त्यातले बह्वंशी नॉन व्हेजचे. त्यामुळे तसंच पुढे पुढे यावं लागलं. पण समुद्राचा सत्संग असल्यामुळे हळु हळु जात राहिलो. वाटेत अनेक छोट्या खाड्यांवरचे पूलही लागले! अमृतापुरीपर्यंत समुद्राने सोबत केली!  .  .  .   

अमृतापुरी येईपर्यंत बाहेर काहीच खुणा दिसल्या नाहीत. अमृता विद्यापीठ खाडीच्या पलीकडे आहे. आणि इकडे आश्रम. मला आश्रमातच जायचं आहे. दुपारी ३ वाजता आश्रमात पोहचलो. आजचे ११० किमी पूर्ण झाले. पोहचल्यावर रवीजींना फोन केला. मूळचे गोव्याचे असलेले ब्रह्मचारी रवीजी अनेक वर्षांपासून इकडेच राहतात. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. नोंदणी- प्रवेश प्रक्रिया सोपी करून दिली. इतकंच नाही‌ तर जेवणाची वेळ संपूनही त्यांनी माझ्यासाठी ताट आणून दिलं! मराठीत छान गप्पा सुरू झाल्या! नंतर थोडा वेळ आराम केला. 

अमृतापुरी आश्रम! आणि माँ अमृतानंदमयी अम्मा! त्यांच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. पण रवीजी म्हणाले की, त्या इथे आहेत आणि त्यांचं दर्शनही होईल. फार काही अवघड नव्हतं. थोडा वेळ रांगेत थांबून अम्मांचं दर्शन घेतलं! त्या लोकांना कसं दर्शन देतात, कसा आशीर्वाद देतात आणि जवळ घेतात हे बघितलं आणि मलाही तोच अनुभव मिळाला. अनेक वयाने मोठे असलेले लोकही रडल्यासारखे वाटत आहेत! मला जवळ घेऊन त्या कानात काही कुजबुजल्या! असं दर्शन झालं! प्रसादही मिळाला. बाकी‌ तिथले भजन- कीर्तन थोडा वेळ बघितलं! चक्क आश्रमामध्ये लक्ष्मी नावाची हत्तीणही आहे! अनेक विदेशी लोक दिसले. रवीजी सांगत आहेत की, जे लोक अम्मांना ओळखतात, त्यांच्यासाठी त्या देवच आहेत. 

रवीजींनी त्यांच्या सोबतच्या ब्रह्मचारींसोबत माझी ओळख करून दिली. कोणीच साधक असल्याचा काही विशेष भाव ठेवलेले वाटत नव्हते. सहजपणे बोलत होते. आश्रमात भारतभरातून लोक आलेले दिसले. संध्याकाळी रवीजींनी मला पूर्ण आश्रम फिरून दाखवला. अम्मा कोण होत्या, काय काय करत गेल्या, हा आश्रम कसा सुरू झाला, त्या लोकांना कसं सतत दर्शन देतात हे सांगितलं. त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. 

रात्री रवीजींनी मला समोरच्या आश्रमाच्या खाजगी बीचवर नेलं! रात्रीच्या भर अंधारात बीचवर जाण्याचा अनुभव! अंधारात न दिसणारा तो! पण त्याची उपस्थिती, त्याची विलक्षण गाज आणि वारं! अहा हा! काही क्षण तिथे घालवले. खूप वेगळा अनुभव वाटला. आठवा दिवस पूर्ण झाला. एक खूप वेगळ्या ठिकाणी व वेगळ्या वातावरणात राहता आलं! इतके स्वामी, ब्रह्मचारी व साधकांसोबत राहता आलं! पुढच्या दिवसांमध्येही हा क्रम सुरू राहील! आणि आता दररोज सोबतीला "तो" असेल! आजच्या दिवसाबद्दल अजून एक- आज ओशो पुण्यतिथी होती! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ९: अमृतापूरी- थिरूवनंतपूरम १०० किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 मे 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 81
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तुमचे प्रवास वाचून आम्हाला बसल्याबसल्याच दमायला होतं. किल्लेदार नाव सार्थ करत आम्ही बालेकिल्ल्यात बसून फक्त तुमच्या लेखातून सायकल चालवून येतो. पाच दहा मैलांपलीकडे आपली मजल नाही बुवा.