१. ज्या बॅंकेशी आपले ऑनलाईन upi , पेमेंट ऍप्प्स जोडलेली आहेत, त्या बँक खात्यात जास्त पैसे ठेवू नका. अगदी महिना खर्चायला लागतील असेच पैसे त्या खात्यात ठेवा.
२. बाकीचे पैसे दुसऱ्या बँक खात्यात ठेवा. खूप मोठी रक्कम शिल्लकीत असेल आणि लागणार नसेल तर सरळ तुमच्या घराजवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉसिट करून ठेवा. ते फिक्स डिपॉसिट १३ महिन्यांपेक्षा जास्त नको.
3. दोन पेक्षा अधिक बँक खाती ठेवू नका असा माझा सल्ला. शिवाय ती दोन बँक खाती शक्यतो घराजवळ अससेल्या बँकेत असावीत. त्यातले एक खाते मोबाईल मधील पेमेंट ऍप् ला संलग्न करा आणि यात जरुरी पुरते पैसे ठेवत जा.
४. तुमच्या मोबाईलवर शक्यतो एकच पेमेंट ऍप ठेवा. जेवढी जास्त पेमेंट ऍप्स असतील तेवढा अटॅक सरफेस वाढतो. सोप्या भाषेत, सायबर चोरांना अधिक संधी मिळते.
५. व्हॅट्सप्प, पेमेंट ऍप्स, फेसबुक सारखी अकांऊट, जि मेल किंवा इतर ई-मेल ऍप्स आणि इतर सर्व ऍप्स याना जिथे जिथे शक्य असेल तिथे २ फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करा.
६. कोणताही otp कोणालाही देऊ नका. जर तुम्हाला काही शंका असेल किंवा समोरचा जर opt साठी प्रेशर करत असेल तर आपल्या मुलांची, किंवा विश्वसनीय नातेवाईकांची मदत घ्या. लक्षात ठेवा: प्रचंड नुकसानीपेक्षा एखादे काम उशिरा झाले तर चालेल.
७. जर तुम्ही टेक savy नसाल आणि मोबाईल , इंटरनेट यासारख्या गोष्टी समजायला अवघड जात असतील तर माझे म्हणणे असे की फेसबुक , व्हाट्सअँप, मोबाईल पेमेंट वापरूच नका. दिवस वाईट आहेत. व्हाट्सअप , फेसबुक हॅक करणे, आणि मग त्यातून समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर तुमच्या नावाने टाकणे असे प्रकार घडले आहेत. करून जाणारा करून जातो आणि निस्तरायला ज्याच्या अकाउंट मधून प्रकार झालाय त्याला लागते.
८. व्हाट्सअँप , टेलिग्राम , नेटफ्लिक्स आणि अशा अनेक ऍप्स ला एकाच अकाउंट मधून अनेक डेव्हिसेस वर लॉगिन करता येते. या ऍप्स वर तुमच्या नावाने कुठे कुठे डिवाइस वर लॉगिन आहे हे दिसते. इतकेच काय तर त्या डिव्हाईस मधून कधी लास्ट लॉगिन केलाय तेही दिसते. ते नियमित चेक करा. त्यात शंकास्पद काही आढळलयास सर्व इतर डेव्हिसेस वरील सेशन लॉगऑफ करा. पाहिजे तर यासाठी आपल्या मुलांची, नातवंडांची मदत घ्या. "मी इतके पावसाळे पाहिलेत, तितके उन्हाळे पाहिलेत, तुम्हाला काय कळत ?" असं नव्या पिढीला म्हणायचे दिवस संपलेत.
९. तुम्ही घरात वाय फाय वापरात असाल तर त्याचा पासवर्ड खूप किचकट ठेवा, आणि गरज वाटली तर महिन्याला बदल करा. हे वाय फाय राउटर अशा ठिकाणी ठेवा की तुमच्या घरात व्यवस्थित रेंज मिळेल पण घराबाहेर ती मिळनार नाही.
१०. तुम्ही घरात सोबतीसाठी भाडेकरू, पेइंग गेस्ट ठेवले असतील , किंवा घरातील नोकर माणसे असतील तर त्यांना तुमचे वाय फाय वापरू देऊ नका.
लक्षात घ्या, तुमच्या वाय फाय वरून ज्या काही ऍक्टिव्हिटी होतील त्यासाठी ज्याच्या नावावर ते इंटरनेट कनेक्शन आहे त्याला कायदा प्रथम जबाबदार धरेल.
११. बिट कॉइन, क्रिप्टो करन्सी यात गुंतवणूक करूच नका. लक्षात ठेवा : जास्त परताव्यासाठी जोखीम पत्करायचे तुमचे दिवस केव्हाच संपलेत. या वयात तुमचे आहेत ते पैसे तुम्हाला सांभाळून वापरायचे आहेत, जपायचे आहेत, शेवटपर्यंत पुरवायचे आहेत आणि तुम्ही निसर्ग विलीन झाल्यावर उरले तर पुढील पिढीला वारसा म्हणून द्यायचे आहेत.
१२. तुम्ही भारतात एकटे असाल, आणि मुले परदेशात असतील तर तुम्ही राहत असलेल्या शहरात किमान ४ नातेवाईक असे हवेत की जे गरज पडल्यास तुमच्या मदतीस येतील. असे नातेवाईक शोधून ठेवायचे काम मुलांनी करावे. रेगुलर त्यांच्या संपर्कात राहावे.
१३. तुमचा मुलाला अपघात झालाय, त्याला पोलिसांनी अरेस्ट केलाय, असे धमकावणारे, घाबरवणारे फोन आले, तर प्रथम या नातेवाईकांना कळवा आणि त्यांची मदत घ्या. कोणालाही पैसे, otp, देऊ नका. तुमची खाजगी माहिती देताना ती व्यक्ती खरेच विश्वासार्ह्य आहे याची खात्री करून घ्या. अशी माहिती देताना खरंच त्या वक्तीला या माहिती असण्याची गरज आहे का याचा विचार करा. शंका आली तर माहिती देण्यास सरळ नकार द्या.
१४. शक्यतो शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखून असा. तुम्हाला सर्वात त्वरित मदत तुमच्या शेजाऱ्याकडूनच मिळू शकते.
१५. तुमचे बँक पासबुक वेळोवेळी अपडेट करून घ्या. [मोबाईल ऍप्स मध्ये प्रेसेंट बॅलन्स दिसतोच पण जर नसाल वापरात तर ... ]
१६. मीडिया , समाजात जे काही चाललंय ते कदाचित तुम्हाला पटत नसेल पण त्यावर प्रतिक्रिया देताना सावध असा. सध्या समाजाच्या संवेदना खूप नाजूक झाल्यात. एखाद्या तुमच्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ करून विघातक लोक तुम्हाला त्रास देतील. तेव्हा सावध असा.
१७. तुमच्या सर्व गुंतवणुकीवर नॉमिनी नोंद करून घ्या. नंतर वारसांना फार त्रास होतो.
१८. विल करून ठेवा.
१९. जेष्ठ नागरिकांच्या मुलांनी आपल्या पालकांना वरील सर्व कामांसाठी मदत करावी, त्यांच्या इंटरनेट बाबत ऍक्टिव्हिटी नेहमी मॉनिटर कराव्या. जर आपले पालक इंटरनेट आणि त्यासंबंधित बाबी समजून घेण्यासाठी असर्मथ असतील तर त्या गोष्टी त्यांना न दिलेल्याच उत्तम.
कौस्तुभ पोंक्षे
[सायबर सुरक्षा विद्यार्थी]
[८००७६०५०८२]
| लेखनविषय: |
|---|
वाचने
351
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला!खूप छान नी…
लेख आवडला!
खूप छान नी महत्वपूर्ण माहिती, अनेक वयस्क लोक फॅन पसंत करतात पण आपल्याला तंत्रज्ञान समजत नाही हे स्वीकारत नाहीत.
पहिल्या प्रथम!
१) वयस्क लोकांनी ऑनलाइन व्यवहार करू नयेत! ऑनलाइन व्यवहार केल्याने छदामही वाचणार नसतो! मग का उगीच उठाठेव?
२) upi lite वापरावे त्यात ५००० च्या वर पैसे टाकता येत नाही नी पेमेंट करताना पासवर्डही टाकावा लागत नाही, ह्यामुळे समजा फ्रॉड झाला तरीही ५००० चाय वर पैसे जाणार नसतात!
३) ऑनलाइन आलेला पोलिसाचा फोन वगैरेंना घाबरून जाऊ नये, कुण्या मित्राचाही फोन आला तर तो जेनुअन नंबर वरून आलाय का खात्री करावी, अनोळखी नंबर नी पैसे मागतोय म्हणजे १०० टक्के फ्रॉड!
बाकी ऑफलाईन फ्रॉडबद्दल ,
तुमचे पैसे पडलेत असे सांगून ज्येष्ठांच्या खिशातून मोबाईल काढीन घेणे,
चाक पंक्चर झाले तर ५०० रुपये घेऊन २ पंचर नी वाल्व बदलून घेणे,
एटीएम कार्डाची हेराफेरी,
पेट्रोल पंपा वर १०० -२०० ची हेरफार.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्याने कितीही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला तरीही मीटरवरून डोळा हटवू नये, स्त्रियाना शक्यतो पेट्रोल भरायला पाठवू नये, हे पंपावरील फ्रॉड करणाऱ्याचे फेवरेट गिरहाईक असते, स्त्रिया फसवणूक झाली हे मान्यही करणार नाहीत!
स्त्रियाना शक्यतो पेट्रोल…
In reply to लेख आवडला!खूप छान नी… by अमरेंद्र बाहुबली
स्त्रियाना शक्यतो पेट्रोल भरायला पाठवू नये, हे पंपावरील फ्रॉड करणाऱ्याचे फेवरेट गिरहाईक असते, स्त्रिया फसवणूक झाली हे मान्यही करणार नाहीत!
मनुवादी पुरुषप्रधान संस्कृती आंबेडकरवादी पुरुषांमध्ये देखील किती खोलवर भिनली आहे, नाही का?
आधुनिक स्त्री सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे आणि हे आंबेडकरवादी महाशय तिला पेट्रोल पंपावर पाठवू नका म्हणत आहेत!
अगदी अगदी
In reply to स्त्रियाना शक्यतो पेट्रोल… by कांदा लिंबू
अगदी अगदी, पक्के मनुवादी हे.
स्त्रियांना जोखडात बांधतात, स्कूट्या चालवू देत नाहीत, जरा गडबडल्या की त्याचे "पापा की परी" वाले व्हिडिओ टाकतात, पंपावर जाऊ नका म्हणतात.
मी तर म्हणतो जाऊद्या पंपावर त्यांना. होऊ द्या त्यांचे शिक्षण. कळू दे त्यांना सारासार हिशोब.
पंपवाले ऑपरेटर दहाबारा रुपड्याचा काटा मारतात त्याबद्दल विव्हळणारे पुरुष 'सरकार शिस्तीत तीस तीस टक्के इथेनॉल मिसळते त्यात कितीचा गाळा' ह्याबद्दल अवाक्षर का काढत नाहीत. आपण फसवलो जातोय हेही मान्य करत नाहीत.
नुसती अथर्वशीर्षाची पारायणे अन बुलेटवर नववर्ष स्वागतफेऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या स्कूट्यांची इंजिने कशी गंजवली जाताहेत हेही कळू दे त्यांना.
नुसते टूव्हीलरच नाही तर कारही चालवू द्या तिला. हायवेवर जाऊन कारचा रोड टैक्स कीती आणि परत टोल भरावा लागतो कीती हेही कळू द्या.
आंबेडकरांनी सांगितलेले "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हे स्त्रियांसाठी पण आहे.
कोण जास्ती फसतो?
ज्येष्ठ नागरिक का स्त्रिया ? असे वळण धागा घेऊ लागला आहे.
________________________________
विविध प्रकारची ऑनलाईन पेमेंट्स, क्रेडिट / डेबि ट कार्ड पेमेंटस यांमधून कशी फसवणूक होऊ शकते हे कळण्यासाठी त्याची माहिती देणारा धागा असावा. कोण कसा फसतो- स्त्री का पुरुष, तरुण का म्हातारे हा भाग आणखी वेगळा.
दोन गोष्टी मुख्य आहेत....
१. लालूच......पैसे परत मिळण्याची लालुच दाखवणे किंवा अमुक एक गोष्ट न केल्यास तुमचं तमुक होईल हा धाक दाखवून जाळ्यात ओढणे,
२. चुका........आणि मग पेमेंट पद्धतीतल्या सुरक्षित पायऱ्यांतील त्रुटी ओळखून फसवले जाणे.
धागा आवडला. ज्येष्ठांच्या…
धागा आवडला. ज्येष्ठांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी उद्बोधक चर्चा होईल अशी अपेक्षा आहेत.
(मी अजून ज्येष्ठ नसलो तरीही)
लेखात सांगितलेला पहिला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मी स्वतःही असेच करतो. माझी, उत्पन्न येणारी बँक खाती ही वेगळ्या मोबाईल नंबर वर आणि त्यातून पैसे काढणे सहज सोपे नाही अशी आहेत.
पेमेंट करण्यासाठी केवळ एकच यूपीआइ, केवळ एकाच बँकेला जोडलेले आहे. त्यामध्ये अधून मधून लागेल तशी रक्कम घालत राहतो. कार्ड पेमेंट साठी फक्त एकच क्रेडिट कार्ड वापरतो. ज्या ठिकाणी पेमेंट करण्याबद्दल साशकता असेल तिथे रोखीने पेमेंट करतो.
दुसरा मुद्दाही महत्त्वाचा आहे. चालू खात्यात किंवा बचत खात्यात केवळ मिनिमम बॅलन्स लागेल तेवढीच रक्कम ठेवतो. जेव्हा चेक पेमेंट वगैरे करायचे असेल त्याचे एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी शक्यतो सकाळी सातच्या आधी रक्कम जमा करतो.
तिसरा मुद्दा सर्वांसाठीच लागू होईल असे नाही.
बाकी फोन पीसी वाय-फाय टीव्ही वगैरेंचा वापराबद्दल - सध्या चालू असलेले तंत्रज्ञान शिकणे हे अपरिहार्य आहे. कंटाळणार न करता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून किमान प्राथमिक सुरक्षिततेच्या बाबी शिकून घेणे महत्त्वाचे आहे.
केवळ ज्येष्ठांनाच नव्हे सर्वांनाच -
१. घराबाहेर पडताना खिशात स्वतःच्याचे आधार कार्ड थोडीशी रोख रक्कम ही कायम बाळगावी. अगदी सकाळी फिरायला जाताना सुद्धा!
मी घराबाहेर पडताना वरील व्यतिरिक्त घराची चावी व स्कूटरची चावी घेऊनच बाहेर पडतो. घराच्या आणि स्कूटर च्या चाव्यांच्या अनेक प्रती आहेत. घरातल्या सगळ्या सदस्यांसोबत एक एक प्रत कायम असते त्याशिवाय अजून एक प्रत विश्वासू शेजाऱ्याकडे कायम ठेवलेली असते.
२. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन स्मार्टफोन बाळगावेत. दुसऱ्या स्मार्टफोन मध्ये फक्त कुटुंबीयांना आणि अगदी जवळच्या मित्रांना माहीत असलेला फोन नंबर ठेवावा. त्या फोनमध्ये अकारण डेटा मागणारी पण वापरायला आवश्यक असलेली ॲप्स ठेवावीत. उदा राज्य राज्यांची डिजिलॉकर ॲप्स, महामार्ग, आरोग्य सेतू, मेक माय ट्रिप, बुक माय शो, स्विगी, अमेझॉन वगैरे.
बाकी इतर गोष्टी जशी आठवल्या तशा लिहीन.
तातडीची पेमेंट...
करण्याचे फोन कॉलस आले की त्यांना एकच उत्तर देतो..." चाललो मी बँकेत, बँक समोरच आहे घराच्या" की ते गयावया करतात.." नाही, ते तिकडे नाही होणार, इथे आम्हीच करून देऊ शकतो."
काय ते समजायचे.
________________
दुसरे असे एक उत्तर बऱ्याच ठिकाणी कामाला येते..... "हे सर्व काम माझा मुलगा/ मुलगी करते, सांगतो तसे करायला. लगेच त्यांना समजते की प्लान फसला आहे.
ह्म्म
साधारण्त: बरेचसे घोटाळे यापैकी एका बकेटमध्ये येतात
१.तातडी दाखवणे--(पटकन करा नाहीतर जास्त पैसे पडतील/ दंड पडेल वगैरे)
२. भीती घालणे--(कस्टम मधुन/पोलिसातुन/बॅंकेतुन बोलतोय--अमुक अमुक करावे लागेल)
३. आमीष दाखवणे--(१०० रुपयाचे तिकीट घ्या, जिंकलात तर १ लाख मिळतील, शेअर मार्केट्मध्ये फायदाच फायदा करुन देउ)
४. मदतीचा बहाणा करणे--(मी करुन देतो, तुम्हाला जमणार नाही, कष्ट पडतील,मी तिकडेच चाललोय)
५. ब्लॅक्मेल करणे--साधा व्हिडिओ कॉल करुन फोटो /व्हिडिओ घेणे आणि त्याचे ए आय ने विकृती करण करुन धमकावणे
६. याचना करणे- मी अडचणीत आहे, मुलाचे ऑपरेशन करायचे आहे, कोणीतरी वारले आहे
७. मी तोच आहे(आयडेंटीटी थेफ्ट)--तुम्ही ज्याला फोन केला तो मीच, मला पैसे/सामान द्या.
८. फेसबूक अकाउंट, फोन, ईमेल हॅक करणे/पासवर्ड मिळवणे आणि त्याद्वारे नातेवाईक/जवळच्यांची फसवणूक
९. कांगावा करणे- तुमची गाडी मला घासुन गेली आता मी कंप्लेंट करणार, यात जर बळजबरी केली, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, विनयभंग केला वगैरे ॲड झाले तर मेलातच
असो, अखंड सावधान असावे, कदा दुश्चित्त नसावे असे समर्थ म्हणुनच गेल्येत. तेव्हा वर अनुभवी लोकांनी सांगितलेले सल्ले लक्षात ठेवावेत. मुख्य म्हणजे गडबडीत, गांगरुन, घाबरुन, मोहाने, धाकाने, लाजेकाजेस्तव काही करु नये. नंतर बघ्तो/सांगतो/करतो म्हटले तर ७०-८० वर्षाच्या आयुष्यात काही मोठे नुकसान होत नसते. आणि झालेच शे दोनशे रुपयाचे तर गेले अक्कलखाती.
व्यतिगत व प्रवास सुरक्षितता
आमच्या कुटुंबातील आम्ही सर्व जण एकमेकांचे गूगल मॅप लोकेशन सर्वांशी कायम शेअर केलेले आहे. त्याव्यतिरिक्त अगदी जिवलग दोन मित्र व दोन नातेवाईक यांच्याशीही आम्हा सर्वांचे लोकेशन कायम शेअर केलेले आहे. म्हणजे कोण कुठे आहे हे इतर सर्वांना कायम दिसत राहते.
कुणीही प्रवासाला निघताना आमच्या कौटुंबिक व्हाट्सअप ग्रुपवर आठ तासांसाठी लोकेशन शेअर करतो, रेल्वे, विमान किंवा इतर तिकिटे टाकतो. उबर राईड शेअर करतो. कारने जात असेल त्याचीही कल्पना देऊन ठेवतो. पोहोचल्यावर उदा "बेंगलोरला हॉटेलात सुखरूप पोहोचलो" असे न विसरता टाकतो.
हेच सोसायटीतील जिवलग मित्रांच्या गृपमध्येही करतो.
मी व पत्नी - घर व कामाचे ठिकाण
अपत्ये - घर व कॉलेजचे ठिकाण
इथून बाहेर पडल्यावर व इथे प्रवेश केल्यावर इतर सर्वांना रिअल- टाइम नोटिफिकेशन मिळेल असे शेअर केलेले आहे.
कारमध्ये एक फोन कायम ठेवलेला असतो. त्याचे लोकेशन इतर सर्वांशी कायम शेअर करून ठेवलेले असते, म्हणजे कार कुठे आहे हे नेहमी दिसत राहते. प्रवास करताना त्या फोनचा उपयोग नेविगेशन, म्युझिक वगैरेसाठी करतो.
कारमधल्या डॅशकॅमचे बॅकअप नियमितपणे घेऊन ठेवत असतो. त्यासाठी एक वेगळी १टीबी एसएसडी आहे. घराच्या सीसीटीवी कॅमेऱ्यांचा रिअल-टाइम फीड व हिस्टरी सर्वांना सतत उपलब्ध राहते.
हुश्श्य!