Skip to main content

एखाद्या गोष्टीचे पॅशन, आकर्षण आणि आवड असणे वेगळे .... आणि जमू शकणारे करियर वेगळे !

लेखक kvponkshe यांनी बुधवार, 06/05/2026 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी अभ्यासात कधीच हुशार नव्हतो .... प्रगती पुस्तकात मार्कंखाली लाल रेघ येणार नाही इतकेच माझे ध्येय होते. माझे सगळे भाऊबंध, मित्र हे हुशार कॅटेगरीतले होते. त्यामुळे मी कायमच बाजूला, एकटा पडायचो. विचार करत बसायचो की, आपणच इतके मठ्ठ का? आपल्यात काहीच कसे चांगले गुण नाहीत ?
हां , त्यातल्या त्यात मला अभिनयाची आवड होती. आणि तो जमायचाही. निदान शाळेतल्या गॅदरिंग पुरता तरी. त्या गॅदरींगच्या रिहर्सल्स सुरु असत तोवर माझा बोलबाला असे. नंतर मला कोणी विचारत नसे.
मग मला अभिनेता व्हायचे खुळ डोक्यात शिरले. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करू लागलो. त्याकाळी अल्फा टीव्ही वर स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सूरकर दिग्दर्शित पेशवाई सिरीयल सुरु होती. काही खटाटोपानंतर त्यात मला एक छोटा रोल मिळाला. भोर येथे शूटिंग होते. प्रभात रस्त्यावर स्मिता ताईंचा बांगला होता. तिथे सकाळी ६ ला जायचे होते. तिथून एक कॅब आम्हाला भोर येथे नेणार होती. मी आपल्याकडून उशीर नको म्हणून पावणे सहालाच तिथे पोहोचलो. अजून एक दोन जण तिथे आलेच होते. ते एका तरुणाशी बोलत होते. त्यांची आधीपासून ओळख असावी. तो तरुण बहुदा एडिटर असावा. त्याला एपिसोड एडिट करून मुंबईला रिलीझ साठी पाठवायचे होते. आणि त्या प्रेशर खाली तो होता. बहुदा रात्रभर झोपलाही नसावा. माझ्यासमोर २-३ सिगरेट संपवून परत आत गेला.
काही वेळाने कॅब आली आणि आम्हाला घेऊन आणि वाटेत अजून काहींना घेऊन भोर ला पोहोचली.
पोहोचल्यावर तिथे चहा नाश्ता झाला. माझा ३ मिनिटांचा रोल होता. तिथे मला स्क्रिप्ट दिले गेले आणि पाठ करायला सांगितले. तिकडे बाजीराव यांची भूमिका करणारे तुषार दळवी आणि चिमाजी यांची भूमिका करणारे प्रसन्न केतकर याचा मेकअप सुरु होता. तिथल्या लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की त्यांनी आदल्या रात्री २ वाजता शेवटचा सिन शूट केलाय आणि थोडी विश्रांती घेऊन ते परत सकाळच्या शिफ्ट ला हजार आहेत. इतके असून ही ते आजच्या शिफ्ट साठी तयार होते. कुठेही थकवा नाही ... चिडचिड नाही ....
इकडे मला कॉस्चुम बघणारे एक काका होते, त्यांनी पकडून मावळ्याचा पोशाख घातला. मी इतका बारीक होतो तेव्हा के काही ठिकाणी सेफ्टी पिन लावाव्या लागल्या. मेकअप मन वाले काका आले आणि मला मिश्या वगैरे लावून जरा भारदस्तपणा आणला. पुढच्या अर्ध्यातासात माझा सिन शूट होणार होता. सिन मध्ये माझ्या बरोबर अभिनेता श्रीकृष्ण कालमित्र होता.
पण काही कारणाने तो सिन दुपारी जेवणानंतर पोस्टपोन झाला. जेवणाच्या सुट्टी सुरु झाली. मला माझ्या मावळ्याच्या मिशा लावलेल्या असल्याने जेवता येईना. मेकअप काकांकडे गेलो आणि त्यांना मिशा काढून देता का विचारले. तर त्यांनी सांगितले , की एकतर तुझ्या आधीच्या छोट्या मिशांवर या मिशा बसत नव्हत्या, कशाबशा लावल्या आहेत. परत काढल्या तर पुन्हा बसवताना वेळ जाईल. आणि तितक्यात तुझा सिन आला तर मला बोलणी बसतील.
मग मी कसाबसा कोरडे जे पदार्थ होते ते खाऊन पोट भरले. आमचा सिन पुन्हा पोस्टपोन झाला आणि तो आता रात्री घ्यायचा ठरले. मी आता बऱ्यापैकी कंटाळलो होतो. संध्याकाळचे ६ वाजले होते. माझ्या रुटीन मध्ये जरा जरी फरक पडला की माझे मायग्रेन ट्रिगर होते आणि ते आता झालेच होते. एकदा मायग्रेन ट्रिगर झाले की मी हतबल होतो. काहीही करू शकत नाही. आपण कसा सिन देणार याची चिंता लागून राहिली होती.
आमचा सिन एकदाचा लागला, सेटअप रेडी झाला ... आणि लाईट गेले ...
आता कोणीच काही करू शकत नव्हते. आणि तो सिन केल्याशिवाय सुट्टी नव्हती कारण तो एपिसोड रिलीझ due होता. अंधारात आम्ही सगळे बसून होतो. आमचा एकाच सिन शूट करायचा बाकी होता. शेवटी सव्वा नऊला लाईट आले.
माझे मायग्रेन पीक वर होते. मी आणि श्रीकृष्ण कालमित्र याना मेकअप काकांनी फायनल टच दिला. लाईट पुन्हा जातील ही भीती होती त्यामुळे रिहर्सल करायची नाही असे ठरले. का कुणास ठाऊक सगळ्यांना या सिन बाबत थोडी चिंता असल्याचे जाणवत होते.
"टेक .... ऍक्शन" असे शब्द ऐकू आले आणि ....
सिन शूट सुरु झाला ...
"कट"
सिन वन टेक ओके झाला .... सूरकर सर, तुषार दळवी, प्रसन्न केतकर यांनी स्वतः तो पहिला आणि ते खुश झाले.
शेवटी आम्ही रात्री ११ ला भोर वरून पुण्याकडे निघालो ... गाडीत सुनील गोडबोले सर पण होते .... सगळ्यांनी माझे आणि श्रीकृष्ण कालमित्र यांचे कौतुक केले.
इकडे मी विचार करत होतो ...
अभिनय मला कितीही आवडत असला तरी मला हे असे शेड्युल रोज जमणार आहे का ? आपल्याकडे तो शारिरीक फिटनेस आणि पेशन्स आहे का ? कमिटमेंट आहे का ?
एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती आपल्याला जमेलच असे नाही. तुमच्या पॅशन ला तुमचे करियर बनवा वगरे फेसबुकवर लिहिण्यापुरते ठीक आहे पण, हे क्षेत्र किंवा कोणतेही क्षेत्र, दिसते तसे सोपे नसते. आपल्याला फक्त ग्लॅमर , पैसे, रुबाब दिसतो, पण त्यामागे असलेले कष्ट दिसत नाहीत.
म्हणून आपल्या क्षमता, स्ट्रेंथ्स, वीकनेस, संधी , आणि धोके याचे नेहमी पृथकरण करत राहावे. ज्याला हल्ली कॉर्पोरेट मध्ये SWAT अनालिसिस म्हणतात.
आणि स्वानुभवरून सांगतो ...
आपल्या क्षमता वाढवायच्या नेहमी प्रयत्नात राहावे. ..
आपल्याला जमेल तेच करावे ...
जे तुम्हाला जमतंय तीच तुमची आवड आणि पॅशन असेलच असे नाही ....
आणि
तुमची पॅशन असलेली गोष्ट तुम्हाला लॉन्ग टर्म जमेलच असेही नाही....
दरम्यान माझ्या अभिनयाच्या आवडीचे पुढे काय झाले ही उत्सुकता असणाऱ्यांसाठी :
.
.
.
.
.
.
.
.
माझा सिन "पेशवाई" सेरिअलच्या भाग ३६ मध्ये आहे. २.४९ ते ५.३० इतका मोठा तो सिन आहे.
आणि हा माझा पडद्यावरचा पहिला आणि शेवटला ऍपियरन्स !
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२

वाचने 423
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

लेख आवडला! 
एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती आपल्याला जमेलच असे नाही.
+1


कधी छंद म्हणूनच राहाते तर कधी अर्थार्जनही करवते.

विडिओ पाहिला आवडले काम.


कमी श्रमात जास्त पैसे जिथे मिळतील ते काम करावे या मताचा मी आहे. अशा रितीने एकदा पोटाची सोय लागली की मग बोंबलत फिरायला मोकळे. मग तिथे जी काय आवड असेल ती बाळगावी, पैसे मिळो न मिळो ,बहुधा मिळत नाहीतच उलट जातात :)


अगदी अगदी,सहमत. 

 

लहानपणापासून  एक वाक्य  मनावर बिंबवले "सगळ्याची सोंगे काढता येतात पण पैशाचे नाही", त्यामुळे प्रयत्न जमेल त्या मार्गाने पैसे कमवायचे आणी जमवायचे. अर्थातच समाज आणी कायद्यात मान्य असलेले. 

 

आता, जमापुंजी अंता पर्यंत कदाचित गरजेपुरते, पुरतील असे वाटल्याने इतर बिनपैशावाले ,अगोदर कधी न करू शकलेले, लोकांच्या दृष्टिने फालतु उपद्व्याप करत असतो.

 

नाही पुरली तर पुढचे पुढे बघू, उरले तर मुलाबाळांचे....


छान .,,, सुरेख आठवण ! 

 

अश्या आठवणी अमुल्य असतात.... किती त्रास झाला तरी आठवल्या की सुख देऊन जातात ! 


इफ युवर पैशन डझ नॉट हेल्प यू  इन अर्निंग , इट्स नॉट पैशन ,बट इट्स पॉईझन..... 

मुंबईत असे पैशन म्हणून नाटक करायचे या नादात उमेदीची  दहा बारा वर्ष अक्षरश: वाया घालवतात. आणि नंतर आयुष्यात करण्यासारखे काहीच उरत नाही. असे काही लोक पाहिले आहेत. छबिलदास च्या गल्लीत कट्ट्यावर उभे असतात.

माझ्या पहाण्यात एका प्रतिष्ठीत नाटकाच्या निर्मात्या कडे एकजण नटांच्या कपड्याना इस्त्री करणारा आहे. त्याची बरेच जण टर उडवत असायचे.  तो बरेच वर्षांपूर्वी नाटकात काम करायचे म्हणून कोकणातून मुंबईला आला होता. नाटक या प्रकाराशी काहीतरी संबंध राहील म्हणून त्याने  ते काम स्वीकारले.... आणि त्याचा कायमसाठी इस्त्रीवाला झालाय.


पैशन ( आवड) , ज्ञान , मिळकत ( अर्निंग )  आणि लोकोपयोग या वर आधारीत इकिगायी बद्दल सविस्तर लेख लिहीतो..


माझ्या मागच्या कंपनीत एक इंजियर कलीग होता, त्याला इलेक्ट्रिक पार्ट्स वर काम करायची लहानपणापासून आवड होती, इतर इंजिनिअर गरजेपीरते काम करून मशीन चालू करून बाजूला व्हायचे पण हा विविध प्रयोग करत बसायचा, त्यामुळे वेळही जायचा नि काही पार्टही उडायचे. शेवटी त्याला त्या कामातूनच बाजूला काढण्यात आले. 
कुणी आवड म्हणून काम करत असेल नी तेच काम एखादा व्यावसायिक पद्धतीने करत असेल तर आउटपुट मधे बराच फरक पडतो! व्यावसायिक पद्धतीने किंवा व्यवसाय म्हणून काम करणारे उत्तम गुणवत्ता नी रिझल्ट देतात!