भाग ४ - एका अपयशाची कहाणी - प्रोडक्शन इंचार्ज चा असेम्ब्लर होताना !
२००३ मध्ये मी भूगाव पुणे येथे एका लिमिटेड कंपनीत प्रोडक्शन विभागात रुजू झालो. ऍक्सेस कंट्रोल आणि टाइम लॉग सिस्टिम्स हे आमचे उत्पादन होते. मुलाखतीचे दोन राउंड होऊन माझी निवड झाली होती. माझ्या बरोबर अजून दोन जण निवडले गेले होते.
माझा अनुभव आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील तांत्रिक ज्ञान थोडे जास्त असल्याने कदाचित मला त्या उत्पादन विभागाचा इन्चार्ज म्ह्णून नेमले गेले. हळू हळू अजून २ जण अभियंते म्हणून आणि ५ ते ६ जण असेम्ब्लर म्हणून जॉईन झाले.
आमचे मूळ उत्पादन रबाले येथे होत असे. आणि ते नंतर टप्प्या टप्प्याने आमच्याकडे पूर्णतः येणार होते. इथे भूगाव मध्ये आम्हा लोकांना बसायला खुर्च्या आणि काम करायला टेबल्स पण नव्हते. स्टोअर चा माणूस अजून जॉईन झाला नव्हता. इन्चार्ज या नात्याने या सगळ्या जबाबदाऱ्या मलाच पार पाडाव्या लागत होत्या. बसायला जागा नाही, काम करायला नीट टेबल्स नाहीत, SMD कामासाठी लागणारी टूल्स नाहीत, फर्मवेयर अपलोड करण्यासाठी संगणक नाहीत, पुरेसे हॅन्डओव्हर मिळालेलं नाही आणि या सगळ्यात डिलिव्हरी करायचे प्रेशर अशा बहूधारी कात्रीत मी काम करत होतो. सेल्स टीम ऑर्डर वर ऑर्डर पाठवत होत्या. स्टोअर मध्ये त्या ऑर्डर्स बनवण्यासाठी कच्चा माल पण नव्हता. इतकेच काय तो ऑर्डर पण केला गेला नव्हता.
या सगळ्यात भर पडली ती आमच्या टीम मधल्या अंतर्गत राजकारणाची. झाले असे, की मला इन्चार्जचे पद दिल्यामुळे माझ्या बरोबर जॉईन झालेले २ जण दुखावले होते. त्यांनी सगळ्यांनी खुर्च्या नाहीत, टेबल्स नाहीत स्टूल्स नाहीत म्हणून ओरड सुरु केली. अगदी संडासात पाणी नाही म्हणून आम्ही येणार नाही असे म्हणण्या तोवर त्यांची मजल गेली होती. बरेचदा एखादे टूल मुद्दाम लपवून ते टूल नाही म्हणून काम सोडून बसत असत. मी आपला फ्लोअरभर ते टूल शोधात फिरे. मी ऍडमिन आणि HR ला या मूलभूत गोष्टी तरी पुरवा म्हणून विनवत होतो. पण उपयोग शून्य. शेवटी हे एस्कलेशन अगदी ग्लोबल डिलिव्हरी मॅनेजर कडे गेलं.
मी अक्षरशः सकाळी ७ ला भूगावला जाण्यासाठी निघत असे, ते थेट रात्री ११ ला भूगाव वरून परत निघत असे. वर सांगितलेल्या कारणांनी प्रचंड दडपण होते.
बरेचदा कच्चे मटेरियल शनिवारी दुपारी येत असे, आणि मग मला इतर अभियंते आणि असेम्ब्लर याना रविवारी बोलवावे लागत असे. मग या ना त्या कारणाने नाराज असलेलं सगळे माझ्या विरुद्ध एक झाले. माझ्या बरोबर जॉईन झालेला एक जण जरा डॉमिनेटिंग होता, त्याने त्या सगळ्यांचे नेतृत्व स्वीकारले.
माझ्या नकळत ठरवून आजारी असल्याचे सांगून सुट्ट्या घेणे, रविवारी येण्यास नकार देणे, माझ्या वर अरेरावी करून माझ्या तक्रारी अगदी ग्लोबल हेड पर्यंत करणे या सर्व गोष्टी सुरु होत्या. मी सलग तीन महिने रविवारी सुट्टी न घेता काम करत असे. माझ्यावर कुणाला दया आलीच तर एखादा असेम्ब्लर कामाला रविवारी येई. रोज माझ्या CD १०० SS वरून रात्री मी रडत येत असे.
मी प्रचंड वैतागलेलो होतो. आर्थिक अडचण होती त्यामुळे जॉब सोडणे शक्य नव्हते. त्यात माझा मृदु स्वभाव मला अडचणीत टाकत होता. माझ्या विरोधातील काहींनी तर स्पष्ट मला आम्ही तुला इन्चार्ज मानतच नाही असे संगीतले. ऑर्डर्स २ किंवा तीन आठवडे उशीरा जात होत्या. स्टोअर चा माणूस नसल्याने काहीही मटेरियल आले की मला धावाधाव करावी लागे. म्हणजे मटेरीअल खाली उतरव, मोज , टेम्पोवाल्याचे पैसे दे असे अनेक जॉब्स मी करत असे. माझा मूळ स्किल सेट हा अभियंत्यांचा होता. मी मॅनॅजमेण्ट चे काम कधीच केले नव्हते.
..आणि महत्वाचे मी महत्वाकांक्षी आणि डॉमिनेटिंग नव्हतो [आणि आजही नाही].
एस्कलेशन इतके वर गेले की मॅनॅजमेण्ट ने शेवटी मला इन्चार्ज पदावरून काढले. आणि मला माझ्या बरोबर जॉईन झालेल्या इतर दोघांप्रमाणे काम करायला सांगितले गेले. शिवाय कंपनीने एक मॅनेजर लॅटरल हायर केला. त्याने आल्यावर सगळी परिस्थिती बघितली. मला काय काय अडचणी आहेत त्या विचारल्या. मी डोळ्यातील पाणी कसेबसे आवरत सगळी कहाणी त्याला सांगितली. तो आल्यावर बहुदा मला डच्यु मिळणार असेच मला वाटले होते.
त्या मॅनेजर ने पहिले ऍडमिन आणि HR ला फोन केला. स्पष्ट शब्दात बोलायचे तर तो त्यांच्यावर चढ चढ चढला. आज दुपारी चार पर्यंत मला टेबल्स , खुर्च्या आणि अमुक अमुक टूल्स मिळाली पाहिजेत , आणि नसेल जमत तर राजीनामा तयार ठेवा आणि उद्यापासून येऊ नका असे ठणकावले. ही गोष्ट सकाळी साडे दहाची असेल. दुपारी साडे चार ला HR आणि ऍडमिन धापा टाकत आले. बरोबर टेम्पो होता ... त्यात टेबल, खुर्च्या , त्यांना जमतील तशी टूल्स त्यांनी आणली होती.
मॅनेजर ने मग कामाची वाटणी केली आणि सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स आमच्यात वाटून दिल्या. आता मला फक्त ऑर्डर पूर्ण करणे हेच काम राहीले. PCB टेस्टिंग आणि डी बगिंग हा तर माझा हातखंडा होता.
मॅनेजर सगळ्यांना फाटकावून काढत काम करून घेत होता. मी एका दिवशी त्या मॅनेजर ला विचारले .... जे काम [टेबल खुर्च्या टूल्स वगैरे ] मला ३ महिन्यात जमले नाही ते तुम्ही चार तासात कसे करून घेतले? शिवाय जी मला त्रास देऊन सळो का पळो करून सोडणारी माणसे होती त्यांना तुम्ही सुतासारखे सरळ कसे केलेत?
मॅनेजर तेव्हा फक्त हसला.
मी त्या कंपनीत पुढे ३ वर्षे काम केले, अगदी असिम्बलरचे सुद्धा ! मला विरोध करणारे मला "जगातले पहिले प्रोमोशन प्रोडक्शन इन्चार्ज ते असेम्ब्लर " असा टोमणा मारीत.
पण त्या मॅनेजरने जेव्हा त्यांनाही फाटकावूंन कामे करून घेतली तेव्हा मला विरोध करणारे मला त्यांच्या घोळात घेऊ लागले. पण मी माझा फोकस माझ्या स्किल सेट वाढवण्यावर ठेवला. पुढे आमच्या उत्पादनात कोणताही फॉल्ट आला तर तो पहिले मला बघायला सांगत. माझ्याच्यानी प्राब्लेम सुटला नाही तर मग तो सरळ RND ला एस्कलेट होत असे. करता करता मी RND आणि उत्पादन यांच्यातील एक महत्वाचा दुआ बनलो. आणि काही अत्यंत क्रिटिकल प्रॉब्लेमस सोडवायला मी मोठे योगदान दिले.
तीन वर्षांनी म्हणजे २००६ साली मी इलेक्ट्रॉनिकसला रामराम ठोकून IT मध्ये डेस्कटॉप अभियंता म्हणून जॉईन केले. [ही एक वेगळीच कहाणी आहे, मूड झाला तर लिहीन कधीतरी].
माझ्या त्या कंपनीच्या शेवटच्या दिवशी त्या मॅनेजरने मला भेटायला बोलावले. कुठे चाललास ? आम्ही तुला थांबवण्यासाठी आम्ही काही करू शकतो का? असे विचारले. मी आभारपुरवर्क नकार दिला. पण तीन वर्षांपूर्वी वर विचारलेला प्रश्न मी त्याला परत विचारला.
त्याने सांगितले , की "तुझ्या हाताखालचे तुझे तेव्हाच ऐकतील जेव्हा त्यांची पगार वाढ ठरवणे तुझ्या हातात असेल. तुला कंपनीने नुसती जबाबदारी दिली पण त्यासाठी लागणारे अधिकार दिले नाहीत. त्यांचा आणि तुझा पगार ठरवणे माझ्या हातात पहिल्या दिवसापासून होते. मग तो अधिकार वापरून त्यांच्याच कडून काय कोणाही कडून मी काम करून घेतलेच असते."
दुसरे त्याने मला सांगितले की "तुझा स्वभाव बदल. इतके मृदू राहून चालत नाही." त्याने मला माझेच उदाहरण दिले. वर सांगितल्या प्रमाणे माझ्या विरोधातील लोक बरेचदा एखादे टूल मुद्दाम लपवून ते टूल नाही महान काम सोडून बसत असत.
तेव्हा मी त्यांना असे म्हणू शकलो असतो " टूल सापडत नसेल तर मी शोधून देतो, आणि जर मला मिळाले तर तुझा महिन्याचा पगार माझा ... आहे का तयारी ?"
तसेच ... टूल तू हवे तेव्हा शोध .... आज सिस्टिम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही .... आणि त्याचा वरटाईम पण मिळणार नाही "
झक्कत त्या असेम्बलरने टूल शोधले असते . "नुसता तांत्रिक एक्सपर्टटाइज उपयोगाचा नाही .... पीपल मॅनॅजमेण्ट जमलेच पाहिजे."
राहता राहिला प्रश्न ४ तासात टेबल खुर्च्या उपलब्ध करून द्यायचा .... तिथे माझी पोस्ट कामाला आली ... मला हायर करताना मीच कंपनीला अट घातली होती की मी मागेन ते रिसोर्सेस मला लगेच उपलब्ध पाहिजेत ... तर मी इन टाइम डिलिव्हरी देईन ... आणि जर तुम्ही रिसोर्स द्यायला चुकलात तर मी मला योग्य वाटेल तो टाइम डिलिव्हरीसाठी घेईन ....
या अटीवर मी जॉईन झालो .... आणि पहिल्या दिवशीच त्या अटीला साद देऊन सगळे उपलब्ध करून घेतले.
त्या मॅनेजरचे शेवटचे वाक्य माझ्या कायमचे लक्षात आहे " ही पैशाची दुनिया आहे पैशाच्या बाबतीत कोणी कोणाचे नाही .... आपण आपली जॉब किंवा व्यवसाय सुरक्षा बघायची .... बाकी गेले तेल लावत "
टीप: मला विरोध करणाऱ्यांपैकी सगळे माझ्या मित्र यादीत आहेत .... बघूया हे वाचल्यावर काय म्हणतात ते !
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२
वाचने
698
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिऊत्तम अनुभवी लेखन पोंक्षे…
अतिऊत्तम अनुभवी लेखन पोंक्षे साहेब, मृदू स्वभावाचा लोक फायदा घेतात! तुमचे हे अनुभव नक्कीच मार्गदर्शक असतात. मिपावरील इतरानीही आपले
अनुभव लिहायला हवेत.
सुरेख!!धन्यवाद!!(शेवटची टीप…
सुरेख!!
धन्यवाद!!
(शेवटची टीप आपल्याला वैयक्तिकरित्या आवश्यक वाटत असेल तर ठीक, मात्र ती एकंदर लेखाचा इम्पॅक्ट थोडा तरी बदलून टाकणारी आहे. अंतर्मुख करणारा लेख होता, मात्र त्या टिपेमुळे एकदम काहीतरी डिस्टर्बन्स आला त्या अनुभवामध्ये...)
ऊस गोड लागला कि मुळापासून…
ऊस गोड लागला कि मुळापासून खाल्ला जातो हे नेहमी लक्षात ठेवावे.
ह्म्म
वरुन आलेले प्रेशर खालच्यांना समप्रमाणात देता येणे हा नोकरीतील महत्त्वाचा भाग आहे. डेलिगेशन जमले तरच मोठमोठी कामे होऊ शकतात आणि दिलेली टार्गेट्स वेळेवर पूर्ण होऊ शकतात. नाहीतर बॉस बसलाय १२-१ वाजेतो ऑफिसात नी हाताखालचे लोक ५ च्या ठोक्यालाउत्तम.मग दोन्हीकडुन मार ठरलेला. तस्मात कोणी कोणाचा नसतो हे जाणुन "माझ्यावर प्रेशर आहे त्यामुळे मी तुझ्यावरही टाकणार" असे सरळ सांगुन कामे करुन घेणे उत्तम.
शिवाय अप्रेझलबाबत वगैरे कोणी भांडायला आले तर मी सरळ सांगतो" प्रयत्न करेन, गैरंटी नाही". आणि अखेरचा पर्याय म्हणजे सांगतो " तू तुझ्या होम लोन साठी काम करतोस आणि मी माझ्या, त्यामुळे सर बीर म्हटलेस किवा नाहीस याने शष्प फरक पडत झाले."तू तुझे काम नीट कर म्हणजे झाले."
१०० % सहमत-- Post retirement your bank account balance will help
मी सुद्धा माझ्या नोकरीतुन शिकलेली दुनियादारी:-
Post retirement your bank account balance will help you not designation or loyalty to company or tumhca चांगला स्वभाव.
1) प्रत्येक काम लिखित द्या timeline सह. रोजचा daily summary चा ई-मेल सर्व स्टेकहोल्डर्स ना पाठवा .
2) आपल्या वरिष्ठ आणि त्यांचे सिनिअर्स यांच्याशी कनेक्ट बिल्ड kara- this is मस्ट
3) कामचुकार जुनिअर्स ची माहिती वेळोवेळी सर्व सिनिअर्स ना मेल मध्ये आणि भेटून देत राहा
4) टीम must बे क्रॉस transitioned फॉर all tasks & build बॅकअप्स फॉर ऑल SME s
5) स्वतःची CTC आणि designation सदैव कमी आहे अस्से बोला आणि भासवा . IT mahde promotion demand करणाऱ्याला देतात, deserving ला नाही.
6) एक्सट्रा काम केले कि स्वतःचे ढोल नक्की वाजवा . Clients कडून appreciation mails मागवा
7) most imp - सिनिअर्स ने जॉब switch मारला तर त्याच्याकडे जॉईन व्हा आणि 2 वर्षाने पुन्हा दुसरा जॉब शोधा