Skip to main content

पुणेरी पाट्या... नकोश्या

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 06/05/2026 14:07 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे. मग मी असं काय वेगळं करणार असा आळशी आणि निराशावादी विचार करून बघितला पण डोक्यातून हा सल काही जाईना. त्यात आता रोजच फिरायला जात असल्यामुळे फलकांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढही आता स्वस्थ बसू देत नव्हती. कधी राम नवमी, कधी हनुमान जयंती, कधी आंबेडकर जयंती तर कधी उगाच कुणाचा तरी स्मरणदिवस. बरं ते फलकही कार्यक्रमाच्या २-३ आठवडे आधीपासून लावलेले दिसायचे आणि तो दिवस उलटल्यावर फलक काढायचायी तसदी घेतानाही कुणी दिसत नव्हतं. 

१. मग पुणे महानगरपालिकेचं एक ऍप आहे (पीएमसी केअर) असा साक्षात्कार झाला. लगेच फोन मधे टाकून रोज सकाळी फिरायला जायच्या रस्त्यावर असतील नसतील तेवढे फलक ऍप वर टाकू लागलो. आठवडाभर वाट बघितली पण परिणाम शून्य. 

२. पालिकेच्या हेल्पलाईन वर कॉल करून माहिती काढली, क्षेत्रीय अधिकाऱ्याला जाऊन भेटलो तर त्यानं त्याच्या समस्यांचा पाढा वाचला, काहीतरी करतो म्हणाला पण तरीही एक दोन किरकोळ फलक काढण्यापलीकडे फारसं काही झालं नाही. 

३. सर्व फलकांच्या छायाचित्रांची प्रत लेखी तक्रारीला जोडून नगरसेवकाच्या कार्यालयात गेलो आणि सविस्तर बोलून परत एकदा विनंती केली. (त्या छायाचित्रांमध्ये मुद्दामच त्या नगरसेवकाचा फोटो असलेलंही एक छायाचित्र होतं). आंबेडकर जयंती होईस्तोवर थांबा अशी मला उलट विनंती झाली. जयंती होऊनही फलक तसाच उभा होता आणि रोज सकाळी माझ्याकडे बघून उपरोधानं हसतो आहे असं वाटायचं. 

४. गूगल वर बघितलं तर पुणे वाहतूक पोलीसांनी सुद्धा अनधिकृत फलकांविरोधात "धडक" मोहीम हाती घेतली आहे असं समजलं. "पीटीपी" नावाच्या त्यांच्या मोबाईल ऍप मध्ये पण लगेच तक्रार नोंदवली.  

५. या सगळ्यात, पीएमसीच्या कार्यालयातल्या “आकाशचिन्ह विभागात” जाऊन "पालिका उपायुक्तांना" लेखी तक्रार (आधी केलेल्या सर्व पाठपुराव्यासकट) देऊन आलो. 

या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल का काय कुणास ठाऊक पण बरेचसे फलक निघालेत. सुदैवानं का दुर्दैवानं म्हणा, काही फलक वाहतुकीस अडथळा होते आणि त्याचे योग्य प्रकारे छायाचित्रण करून ते “पीटीपी” ऍप वर नोंदवले असल्यामुळे कदाचित योग्य तो परिणाम झाला असावा. 

गेल्या आठवड्यात मला दोन तीनदा पीएमपी अधिकाऱ्याचा स्वतःहून फोन आला आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आता नोंदवलेल्या तक्रारींमधले फलक अतिशय तत्परतेने निघताना मला दिसताहेत त्यामुळं सतत, न कंटाळता पाठपुरावा करत राहिलं तर यंत्रणा काम करते हे बघून बरं वाटतंय. अर्थात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या गुन्हांचा आकडा फार कमी आहे. किती जणांवर खरोखर दंडात्मक कार्यवाही झाली हे स्पष्ट विचारल्यावर ती माहिती सुद्धा अधिकाऱ्याने गुलदस्त्यातच ठेवली. 

असो, हे सगळं करत असतांना वाईट एकाच गोष्टीचं वाटलं आणि ते म्हणजे मी जे करतो आहे ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना सांगितल्यावर मला मिळालेले उफराटे प्रतिसाद (ते ऐकून चिडल्यावर मनात त्यावर आलेल्या प्रतिक्रिया ज्या मनातच ठेवाव्या लागल्या). यापैकी एकानेही एक सहस्त्रांश सुद्धा प्रयत्न केला नसेल.

१. निराशावादी - अरे हे सगळे आतून एकमेकांना सामील आहेत. नुसते तोंडाला पानं पुसतात. काही उपयोग नाही. (तुम्ही फक्त बुडाला टिश्यू पेपर पुसा)

२. उपरोधिक - टिपिकल आयटीवाला आहेस. ऍप वापरलं की झालं तुमचं काम (इथे स्वतः च्या कर्तृत्वाचा पत्ता नाही)

३. उपरोधिक  - अरे वा पक्का जागरूक पुणेकर आहेस (तू झोपला आहेस त्याचं काय ?)

४. थॅंकलेस - अरे काही दिवसांनी तो फलक तसाही निघालाच असता ( काय बोलणार ?)

५. उपरोधिक  - तुला हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो ? ( ऑफिस मध्ये “पाट्या” नाही टाकल्या किंवा मोबाईलवर उगाच रिळं नाही फिरवली तर मिळतो ब्व्वा !!!)

६. उपरोधिक - तुला जीवनाचं ध्येय सापडलेलं दिसतं (ध्येय बरीच आहेत. त्यात तुलाही फलकावर लावायचं एक आहे)

त्यामुळं शेंडी तुटो की पारंबी तुटो, निदान माझ्या मॉर्निंग वॉकच्या मार्गावरचे तरी सगळे फलक तुटेस्तोवर हे उद्योग अखंड चालू ठेवायचे असं आत्तातरी ठरवलंय. 

 

 

लेखनविषय:

वाचने 588
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

त्यामुळं शेंडी तुटो की पारंबी तुटो, निदान माझ्या मॉर्निंग वॉकच्या मार्गावरचे तरी सगळे फलक तुटेस्तोवर हे उद्योग अखंड चालू ठेवायचे असं आत्तातरी ठरवलंय. 

 

खुपच महत्त्वाची माहिती दिली.आमच्या भागासाठी असे ॲप आहे का पाहते.


तुमचे खरेच कौतुक करावे तितके कमी आहे. वेढब असलेले हे फलक सगळ्यांच्या नजरेला खुपतात, परंतु त्यावर उपाय करण्याची हिंम्मत बहुतांशी लोकांमधे नसते. तुम्ही ती हिंम्मत दाखवली व त्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल आभार. 

आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना व त्यांचा निशक्रीयतेला फाट्यावर मारा  . . .  ते लोक तसेही कामाला येणार नाहीत. 

उपक्रमाला शुभेच्छा !!


मग कोणाच्या तरी तक्रारी आल्या की त्यांच्या खांद्यांवर बंदूक ठेवतात. म्हणूनच फोन करून खात्री करतात की खरंच तक्रारी आल्या का आणि तो माणूस उत्तर देतो का. 

त्यांना महिन्याची पार्टी ठरलेली असणार तर त्यांच्यावरच कारवाई कशी करणार?

पुणेरी पाट्या हे अधिकृत विनोदांचे प्रकरण आहे ते वेगळे. आणि हे आहेत पुणेरी फलक.


हे बहुसंख्येने मुबलक असणारे फ्लेक्स फलक केवळ कमी किंमत, कमी वेळ, कमी परवानग्या ह्याची परिणीती आहे.

मी ह्या क्षेत्रात काम केले आहे. ह्याची जी इंक असते (त्यातल्या त्यात स्वस्त वाली) ती डाय बेस्ड आणि प्रचंड विषारी असते. तेथे काम करणाऱ्यानाही श्वसन आणि पचनाचे विकार होतात. हे कधी न पाहिलेला माणूस एक तासभरही त्या प्रिंटर रुममध्ये बसू शकणार नाही. मिडीया (म्हणजे कापड) हे प्लास्टिक असते एक प्रकारचे. त्याचे विघटन होत नाही. अगदी १०-१५ रुपये स्केवर फुटाने प्रिंटींग करुन देणारे असतात. डीझाईन काय आजकाल कुणीही करते. नगरपालिकेची परमीशन न घेता कुठेही वासे दंटे ह्याच्या साहाय्याने लाकडी बैटन फ्रेमवर स्वस्तात फलक उभारले जातात.

ह्यावर पर्याय म्हणजे हि स्वस्त इंक, स्वस्त कापड आणि स्वस्त प्रिंटर ह्यावरच प्रचंड टॅक्स लावणे. असे ना तसे ते चायना मेडच असतात. (बंदी घातली तरी चालेल. असेही हे प्रिंटिंग फार काहि समाजोप्योगी नसतेच. तुलनेने अति महाग असलेल्या एको सोल्व्हंट प्रिंटरला फक्त पर्वानगी देणे , बोर्ड लावण्यासाठी फक्त अधिकृतच जागा देणे, प्लास्तिक ऐवजी पेपरवर प्रिंट करुन ते तुकडे जोडून बोर्ड लावणे असे पर्याय युरोपात वापरले जातात) 

कमर्शिअल आणि पॉलिटिकल अशा दोन बोर्डाच्या धंद्यात पॉलिटिकल बोर्डस मोठ्या साईज, डिझाईनला फार काटेकोरपणा नसणे, कामाची वारंवारता आणि ऑडिटचा अभाव अशाने प्रॉफिटेबल असल्याने प्रिंटर लोकही त्यात स्पर्धात्मक काम करतात.

नगरपालिकेने फलकाचा आकार, लावायची जागा आणि लावलेले दिवस ह्याच्या प्रमाणात प्रचंड शुल्क लावणे व निरपेक्षपणे ते वसूल् करणे. त्यासाठी घरभाडे वसूली साठी पथक असते तसे नेमणे. पण इथली राजकीय परिस्थिती पाहता हे होणे कठिणच आहे.

 


एक काम करता का किल्लेदार? एक छोटेखानी मेसेज, जो मला व्हॉट्सॲपवर पाठवता येईल, करून देता का ईथे? तुम्ही दोन ॲप्सचा उल्लेख केलाय. त्याची नावं / लिंक दिलीत तर मी ईथे मसुदा लिहितो त्याचा. लेखी तक्रार केलीत त्याचा मसुदा पण द्या शक्यतो. तुम्हाला ठीक वाटला तर पाठवेन व्हॉट्सॲपवर. मी वर्षातनं फारतर चारदा व्हॉट्सॲपवर मेसेज फॉरवर्ड करतो. पण असा मेसेज दर महिन्याला पाठवेन सगळ्याना! अगदी पुण्यात न रहाण्याऱ्या लोकाना सुद्धा - त्याना हा तुमचा स्तुत्य उपक्रम कळेल म्हणून. 

 

ॲप्स कशी शोधलीत? मुंबई आणि ईतर शहरातल्या नगरपालिकांची पण अशी ॲप्स असू शकतील. 

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.


आपले काम मुळीच छोटे नाही. प्रचंड चिकाटीचे कौतुक वाटले. अधिकाऱ्यांनी कारवाई केली हे वाचून निदान काहीतरी सकारात्मक घडत आहे असे वाटले.


In reply to by स्वधर्म

अधिकाऱ्यांनी कारवाई केली हे वाचून निदान काहीतरी सकारात्मक घडत आहे असे वाटले.

डोंबलं.

लै शाने कौव्वे असतेत.

बोर्डाचे लाईफच चार पाच दिवस असते. त्यानंतर लावणाऱ्याला आणि बघणाऱ्याला त्याचे सोयरसुतक नसते. जितकी गरज तितके दिवस कार्यवाही होत नाही. नंतर काढायची मोहिम सुरु करतात. दाखवायला चार पाच बोर्ड आणि सांगाडे जप्त करतात. कापड विकत घेणाऱ्या लोकांना ते मिळते.(काहीजण पावसाळ्यात टारपोलीन सारखा आधार, वाळवणाला, झोपडी बांधायला ते विकत घेऊन वापरतात) वासे देवळाच्या नारळाप्रमाणे मूळ विक्रेत्याकडे परत जातात.

त्याच्यावर कडी म्हणजे नागरिकांचेच आक्षेप नेत्यांना/बोर्ड लावणाऱ्यांना दाखवून परत एक्स्ट्रा हफ्ता वसूलायला मोकळे.

.

बाकी किल्लेदारांचा प्रयत्न स्तुत्य आहेच पण सिस्टिम लै ड्यांबीस आहे.


In reply to by अभ्या..

तुमचे काही मुद्दे बरोबर असले तरी कामं पटापट होतानाही बघितली आहेत. मुख्य म्हणजे नॉन पॉलिटिकल फलक लगेच निघाले. केलेल्या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करून मधाचं बोट लावणंही अतिशय गरजेचं आहे कारण त्यांचाही थॅंकलेस जॉब असतो. शिवाय फालतू राजकारण्यांचा दबाव असतो ते वेगळंच.


In reply to by किल्लेदार

मुख्य म्हणजे नॉन पॉलिटिकल फलक लगेच निघाले. केलेल्या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करून मधाचं बोट लावणंही अतिशय गरजेचं आहे कारण त्यांचाही थॅंकलेस जॉब असतो.

नॉन पॉलिटिक्कलच निघतात लगेच. कारण ते सर्वसामान्य नागरिकांचे असतात. इन्फ्लुअन्स नसतो त्यांच्याकडे. (अर्थात तेही तितकेच नियम तोडायला तत्पर असतात. म्हणूनच सार्वजनिक जागी कसलीही जाहिरात करायला सज्जड शुल्क आकारायला पहिजे सार्वजनिक संस्थांनी. फक्त प्रिंटींग आणि डिझायनिंग आणि लावण्याचा खर्च हि जाहिरात नसायलाच पाहिजे. जागेचे भाडे पूर्णत: लोक नजरेआड करतात. ह्यातला एक प्रकार म्हणजे बसमध्ये, बसस्टॉपवर, एमेसीबीच्या डीपीवर, भिंतींवर, खांबावर, उडाणपुलाच्या खाली, चौकात आयलंडवर सर्वत्र प्लॉटिंगच्या किंवा नोकरी मिळवून देणाऱ्या जाहिराती.  आकाराने लहान असतात पण चिवट स्टीकरवर केल्याने वर्षानुवर्षे राहतात. त्यावर फोन नंबर असतात. अधिकाऱ्यांनी निदान त्या नंबरना संपर्क करुन शुल्क आकारणी सुरु केली/दिली नाही तर त्यांच्या धंद्याला अवैध घोषित करुन शुल्क वसूलले तरी रोज होणारे हे विद्रुपीकरण थांबेल .)

बाकी मधाच्या बोटाबद्दल हरकत नाही पण हे करावे लागते कारण त्यांना ते त्यांचे कर्तव्य वाटतच नाही ह्याला आपण काय करणार?


Bhakti - ज्जे बात. कधीपासून अशाच प्रतिसादाची वाट बघत होतो. आपणहून पुढाकार घेतलेल्या तुम्ही पहिल्या.  

सुक्या - यंत्रणा बनवण्याची आपली ताकद नाही पण जी आहे ती निदान वापरायची तरी इच्छा हवी.

कंजूस - अगदी बरोबर. त्यांची टोलवाटोलवी असली तरी आपण टोले मारणं सुरु ठेवायचं. काही होईल किंवा होणार नाही. पण प्रयत्नच केले नाहीत तर शंभर टक्के काहीच होणार नाही.

अभ्या.. - चांगली माहिती दिलीत. म्हणजे नुसतं एस्थेटिकली नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा किती घातक आहे हा मुद्दा जास्त उचलून धरला पाहिजे. पण राजकीय परिस्थिती पाहता यात सुधारणा कठीण आहे असं म्हणून टाकलं की संपत नाही. आपल्यापैकी कितीतरी लोक असंच बोलून सोडून देतात. आपल्याला सहज शक्य असलेल्या सोप्या गोष्टीही प्रत्यक्ष करायचा आपण कंटाळा करतो. इतर लोकांच्या ऐकीव आणि वाचिव अनुभवांवरून परिस्थिती बदलू शकत नाही असा निष्कर्ष न काढता, ज्या गोष्टीसाठी आपण आतून आग्रही आहोत त्याकरता स्वतःसाठी तरी प्रत्यक्ष प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

मिसळपाव - नक्की पाठवतो. आपणहून पुढाकार घेतल्याबद्दल खरोखर धन्यवाद.
पुण्यासाठी - PMC Care 
मुंबईसाठी - MyBMC 
पुणे वाहतूक पोलीस - PTP App 
मी केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रं फोटो काढून पाठवतो.  

स्वधर्म - धन्यवाद. पुढची पायरी म्हणजे माझ्यासारख्याच वैतागलेल्या लोकांना एकत्र करून एक मोठा शॉट मारायचा आहे :) बघू काय होतंय. 
        


मिसळपाव... मी लेखी तक्रारी चे फोटो काढून ठेवलेत. कुठे पाठवू ?


In reply to by किल्लेदार

फार लांब आहे का पत्र? 
"....नमस्कार, अमुक तमुक रस्त्यावरच्या पाट्यांबद्दल तक्रार करायची आहे. अमुक तमुक ठीकाणी लावललेली पाटी जुनी झाली आहे / अनेक दिवस आहे. ती लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी आपल्याला हे पत्र लिहीत आहे...." अशा स्वरूपाचा कच्चा मसुदा व्हॉट्सॲपच्या निरोपात देता येईल.

 

तुमच्या लिखाणाचं शिर्षक बदलून "रस्त्यावरचे फलक / फ्लेक्स काढून टाकायचेत?" असं काही कराल का? 'पुणेरी पाट्या' फार चघळलेला विषय आहे म्हणून वाचनं कमी असावीत का? (मी पण उघडणार नव्हतो की काही नेहेमीचंच असेल म्हणून!)

 

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.


In reply to by मिसळपाव

पुणेरी पाट्या असं मुद्दामच लिहिलं. वाचायला इंटरेस्ट यावा म्हणून. नाहीतर असा रटाळ विषय कोण वाचणार.

मी आमच्या पिताश्रींकडून शासकीय भाषेत लिहून घेतलं. मुद्दाम हस्तलिहित तक्रार दिली आणि त्याची प्रत माझ्याकडे ठेवली. महापालिकेच्या शिक्क्यासह. आधी तुमच्या कॉन्टॅक्टस् ला ऍप वापरून सुरुवात करू देत नाहीतर प्रत्रातली रूक्ष भाषा बघून त्यांचा अर्धा उत्साह कमी व्हायचा :)

 


चिकाटीचे कौतुक आहे तुमच्या खूप. अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा होते काय की, सुरूवातीच्या २-३ वेळा आपल्याला शून्य किंवा तोंड देखलं प्रतिसाद मिळाला की काम करण्याची इच्छाच मरून जाते, म्हणून तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटले.


क्या बात है, आवडलं काम. आणि पुढेही सुरु ठेवा. 
कौतुक आहे. 

-दिलीप बिरुटे