नमस्कार मंडळी
भटकायची आवड कधी लागली माहीत नाही पण साधारण १७-१८ वर्ष वयापासुन असावी. तोवर कुठल्याही रस्त्याने जाताना नेहमी दुरवरचे निळे हिरवे डोंगर बघुन तिथे जाता येईल का? हा विचार करत रहायचो. पण १७-१८ चा असताना एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर जोडला गेलो आणि फिरंतीची सुरुवात झाली ती झालीच. तेव्हा बरेच ट्रेक म्हणजे कल्याणहुन शेवटची कर्जत किवा कसारा लोकल पकडुन स्टेशनवर मुक्काम करणे किवा बस स्टॅंडवर मुक्काम करणे आणि सकाळच्या पहिल्या गाडिने किवा बसने पुढिल मार्गक्रमण करणे असा कार्यक्रम असे. कर्जत/कसारा स्टेशनवर कितीतरी मुक्काम झाले असतील. नाहीतर वांगणी, ईगतपुरी, नेरळ किवा गेलाबाजार मुरबाड, जुन्नरसारखी रेल्वे/बस स्थानके म्हणजे ट्रेकर मंडळींचे हक्काचे विश्रांती स्थान.
तर असाच एकदा एका नव्या उत्साही ग्रुप बरोबर पेब माथेरान ट्रेकला गेलो होतो. यापुर्वी नेरळ हुन चंदेरी केला होता पण पेब प्रथमच करणार होतो. रात्री उशिरा नेरळला पोचलो. मंडळी उत्साहात होती त्या भरात रात्रीच ट्रेक सुरु करायची टूम निघाली. कोणालाच रस्ता नक्की माहीत नव्हता पण विजेच्या तारांच्या अनुषंगाने रस्ता आहे ईतके नक्की माहीत होते. मी थोडा विरोध करायचा प्रयत्न केला आणि स्टेशनवरच रात्र काढुन उजाडताच निघुया असे सुचवुन पाहीले, पण माझे म्हणणे फाट्यावर मारले गेल्याने नाईलाज झाला. यथावकाश १ च्या सुमारास स्टेशनवरुन बाहेर पडलो आणि ट्रेक सुरु झाला. लवकरच चढण लागली. मस्त चंद्र प्रकाश असल्याने चालायला अडचण नव्हती.
डोक्यावर विजेच्या तारा जात होत्या तोवर सर्व सुरळीत चालु होते. मात्र कधीतरी वाटेत झाडी लागली आणि डावीकडे वळणे भाग पडले. तारा मात्र सरळ समोरच्या दरीत उतरुन नाहीशा झाल्या. आता खुणेची वाट दिसेना आणि पुढे कसे जायचे कोणालाच माहीत नाही. तरीही वाट दिसतेय तोवर जात राहु असे ठरवुन चालत राहीलो. थोड्या वेळाने ती वाटही संपली आणि खडी चढण आली. त्यावरुन जाताना मंडळी धसक फसक करत धडपडु लागली आणि एक एक करुन सर्वांचे अवसान गळाले. रात्रीचे ३-३.३० वाजले असावेत. पुढेही जायची वाट दिसेना आणि खाली उतरायचा धीर होईना अशा त्रिशंकु अवस्थेत वेगवेगळ्या झाडांना किवा गवताला धरुन सर्वजण तिथेच बसुन राहीलो. यथावकाश दोनेक तासांनी उजाडले आणि जरा धडपड करुन वरचा मार्ग सापडला. एक एक करुन सर्वजण पेबच्या कुठल्यातरी सपाट वाटेवर आलो आणि हुश्श केले. हा भर जंगलातला मुक्काम लक्षात राहीला. पुन्हा नीट वाट माहीत असल्याखेरीज नाईट ट्रेक करायचा नाही असा कानाला खडा लावला.
एकदा माझ्या आयुष्यातला पहीला ट्रेक , आणि सह्याद्रीतला ड्रिम ट्रेक अलंग,मदन,कुलंग करायला गेलो होतो. भले भले लोक याला ड्रिम ट्रेक म्हणतात हे तेव्हा माहीत नव्हते. किंबहुना हा ईतका भयानक ट्रेक आहे हेच माहीत नव्हते. ते एका अर्थी बरेच होते म्हणा. तर पहिल्या दिवशी कुलंगवर गुहेत मुक्काम केला. रात्री त्या २१ कि २२ कुंडांजवळ बसुन मस्त आकाशदर्शन झाले. दुसऱ्या दिवशी कुलंग उतरुन मदनकडे कूच केले. पण मदनच्या रॉक पॅच ला पोचेपर्यंत सुर्य मावळला आणि अर्धे लोक वर आणि अर्धे खाली अशी अवस्था झाली. मग वरच्या लोकांनी वरच रहायचे आणि खालच्या लोकांनी परत जाउन अलंग-मदन मधल्या खींडीत रहायचा तोडगा निघाला. मी खालच्या ग्रुप्मध्ये होतो. कसेबसे अंधारायच्या आत खिंडीत आलो.
आणि समजले की डाळ तांदूळ पापड आमच्याकडे तर तेल चहा साखर वरच्या ग्रुपकडे राहीले होते. आता आली का पंचाईत? नशिबाने पाणी दोन्हीकडे होते. मग आम्ही कशीबशी अळणी खिचडी बनवुन पापड लोणच्याबरोबर खाल्ली आणि मोठी शेकोटी पेटवुन खिंडीतच रात्र काढली. वरच्या ग्रुपने चहा बिस्कीट खाउन रात्र काढली. भणाण वाऱ्यातला हा मुक्काम एकदम लक्षात राहण्यासारखा. पुढे हाच ट्रेक पुन्हा एकदा केला तेव्हा मात्र माहीतगार लोक आणि २ फ्री क्लाईंबर, रोप, बिले, डिफेंडर,कॅराबिनर सगळे सामान बरोबर असल्याने सगळे किल्ले पाहता आले. या ट्रेकमधला अलंग वरचा चांदण्या रात्रीचा मुक्कामही एकदम लक्षात राहण्यासारखा.
एकदा कॉलेजात असताना रतनगडावर गुहेत मुक्काम केला होता. जेवण वगैरे बनवायची तयारी घेउनच गेलो होतो. पण माकडांच्या त्रासाने एकाला कायम सामानाजवळ थांबायला लागत होते. दिवस भर फिरुन नेढं वगैरे बघुन रात्री गुहेबाहेर चुल लावली, किर्र अंधारात जेवलो आणि गुहेचे दार लावुन झोपलो. पण दाराजवळ झोपायला कुणीच तयार होईना. चांदण्या मात्र मस्त दिसत होत्या.
माझ्या अनेक वाऱ्यांपैकी एकदा पावसाळ्यात राजगडावर पद्मावतीच्या मंदीरात केलेला मुक्कामही असाच यादगार. पावसामुळे तुरळक लोक गडावर आलेले, तेही संध्याकाळी खाली उतरले. आमचा छोटा ग्रुप मात्र २ दिवस राहायसाठी आला होता. रात्रभर पत्र्यावर पावसाचा ताशा तडतड वाजत होता. पण थकल्यामुळे डोळे गपागप मिटत होते. कॅरीमॅट गार पडली होती. सकाळी बाहेर पडलो आणि मागच्या बाजुला बुरुजावर गेलो तर पाली दरवाजा दिसेना ईतके धुके. गडावरची माकडेही चिडिचुप होती ईतका पाउस होता. मग चहापाणी झाल्यावर गडदर्शन कॅन्सल केले आणि चोरदरवाज्याने गुंजवणीत उतरलो चुपचाप.
पुढे एकदा सुधागडावर पावसाळी ट्रेकमध्ये देवीच्या देवळात केलेला मुक्काम, गाणी, गप्पा आणि समोर दिसणारा तेलबैल्या, घनगड म्हणजे आठवणींचा खजिनाच.
एका उन्हाळ्यात सांधण दरी बघायला गेलो. रात्री कल्याणहुन बसने साम्रदला पोचायला २ वाजले. गावकऱ्यांना सांगुन ठेवल्याने रहायची सोय होती. मारुतीच्या देवळात पथारी पसरली आणि निद्राधीन झालो. त्या वेळी प्रथमच उन्हाळ्यात थंडी कशी वाजते ते समजले. खाली गार लादी . पाय पोटाशी घेउन स्वत:लाच शिव्या घालत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सांधण दरी उतरलो त्याचा वृत्तांत ईथे (जाहीरात)
सांधण दरी--जिथे एअरटेलचे नेटवर्क गंडते
दुसऱ्या दिवसाची रात्र अजुन भयानक. खाली उतरुन मंडळी पार दमली होती आणि मुक्काम कुठे? तर उघड्यावर जंगलात नदीकाठी. बरे पावसाळा जवळ आल्याने बेडकांची गाणी ऐकत झोपलो असतो, पण त्यांच्या शोधात साप आला तर काय घ्या? ही भीती मनात घेउन कुस बदलत कशीबशी रात्र काढली.
लिहिता लिहिता जवळजवळ पंचवीसेक वर्षांचा पट डोळ्यापुढे उभा राहीला पहा. असे म्हणेन की मी शरीराने तरी ट्रेकवर असतो किवा मनाने तरी. हे ट्रेक आणि त्यातले हे वैविध्यपूर्ण मुक्काम म्हणजे अत्तराच्या कुप्याच जणू. कधीही उघडाव्या आणि अत्तराच्या दरवळात हरवुन जावे.

मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सुंदर फोटो आहेत
ग्रूपबरोबर जाणे मला जमणार नव्हते आणि गडकिल्ले म्हणण्यापेक्षा मला डोगरांत भटकणे एवढाच उद्देश असे. त्यामुळे फारसे अनुभव आले नाहीत. गर्दीच्या उलट दिशाने जात असल्याने तसेच फक्त दिवसा उन्हात जात असे. गाववाले हेच गाईड असत.
लेख आवडला.
धन्यवाद कंजूस काका
फोटो पब्लिक आहेत. मी स्वत: काढलेले नाहीत
मस्त आठवणी.गडांवरील…
मस्त आठवणी.
गडांवरील मुक्कामाच्या आठवणी अशाच बहारदार असतात. माझ्याही अशाच काही पण थोड्या वेगळ्या आठवणी येथे लिहिल्या होत्या.
https://www.misalpav.com/story/36175
हायला!!
In reply to मस्त आठवणी.गडांवरील… by प्रचेतस
मस्त लेख आहे. हा सुटला होता वाचनातुन. बरे झाले प्रतिसादात मिळाला.
गडकिल्ले, डोंगरदऱ्यातील…
गडकिल्ले, डोंगरदऱ्यातील मुक्कामाचे साधे-साधे अनुभवही नंतर छान आठवणी बनून आनंद देत राहतात.
२००८ ला डिसेंबरच्या थंडीत राजगडावर आज ज्या ठिकाणी 'सदर' वा तट-सरनोबतवाडा ही वास्तू उभी आहे त्या वास्तूच्या चौथऱ्यावर मुक्काम करावा लागला होता. कारण संपुर्ण पद्मावती मंदीर परिसर, मालाड-मुंबईवरून राजगड प्रदक्षिणा मोहिमेसाठी आलेल्या साधारण शंभर एक माणसांनी भरून गेला होता.
तेव्हा टेंट्स, स्लिपिंग बॅग वा मॅट ऐपतीच्या बाहेरच्या गोष्टी, कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने त्यांना 'चोचले' म्हणुन हिनवीत आमची डोंगरकिल्ले भटकंती चालायची, अंथरून-पांघरून म्हणजे एखादी छोटी वजनाने हलकी बॅगेत मावणारी बेडशीट-चादर वगैरे...
प्रचंड थंडीत रात्री अकरानंतर बोचऱ्या वाऱ्यांनी झोपणे अशक्य करून टाकले, त्यावेळी सध्या लोक सदरेला लागून पुढे जी जागा खलबतखाना म्हणुन दाखवतात तिथे आत उतरून झोपलो होतो, ती जागा म्हणजे त्याकाळी जी काही थोडीफार दागडुजीची कामं गडावर चालत त्या कामांसाठी पाणी साठवून ठेवायची टाकी म्हणून वापरली जात होती जी त्यावेळी कोरडी होती.
सकाळी उठलो तेव्हा कळलं की त्या टाकीच्या आत कोपऱ्यानी छोट्या दगडाचे ढिगारे आहेत, एका ढिगाऱ्यावर फुरसे सापाची कात आढळून आली, मग काठ्यांनी दगड हलवले तर साप तर नाही पण दोन तीन गोमी मात्र पळताना दिसल्यावर तिथून देवाचे आभार मानीत चंबू गबाळे आवरले....
२०१० च्या जानेवारीत, हरिश्चंद्रगडावर मुक्कामी होतो, इतर गुहा आधीचं भरल्यामुळे, कोपऱ्यातील पाणी असणाऱ्या गुहेशेजारची गुहेत बॅग टाकल्या, इतरजण सरपण गोळा करीत असताना मी गुहेच्या तोंडाशी असणाऱ्या उंचवट्यावर पहुडलो होतो, अचानक कुत्र्याच्या पिल्लासारखा प्राणी जोरात आत गुहेत पळत गेल्याचा भास झाला, एका हातात बॅटरी, दुसऱ्या हातात काठी घेऊन आत गेलो, काही दिसेना म्हणून काठीने बॅगा हलवू लागलो तो एक मानेवर राठ उभे केस असलेली, एखाद्या प्रौढ मुंगसापेक्षाही मोठी अशी काळी-कभिन्न आक्रमक घुस मोठा विचित्र आवाज करीत दुसऱ्या अंधाऱ्या कोपऱ्यात पळाली, अचानक समोर आल्याने मी घाबरलो होतो हे नक्की पण भीतीच्या जोडीला मला त्या प्राण्यांची किळस जास्त वाटली, तडक बाहेर येऊन इतरांना गोळा करून पुन्हा तिला हाकलण्याच्या मोहिमेवर आत आलो, पंधरा वीस मिनिटं सगळ्यांना तंगवून तो किळसवाणा प्राणी बाहेर जाताना सर्वांनी पाहिला व त्यानंतर गुहेत रात्री थांबण्याची सर्वांचीच ईच्छा मेली.
काही वेळापुर्वी एक स्थानिक टेंटवाला माझ्याकडे कमी पैशात त्याचे राहिलेले दोन भाड्याचे टेंट्स घ्यावे ही ऑफर घेऊन आला होता, त्याला मी आम्ही एवढ्या लांब टेंटमध्ये नाही तर गुहेत राहण्याच्या अनुभवासाठी आलोय म्हणत माघारी धाडला होता, आता पुन्हा त्याला शोधीत गेलो तर त्याचे टेंट्स शिल्लक नव्हते, शेवटी एका अशा खोपटात राहिलो ज्याचा मालक त्या दिवशी गडावर आलेला नव्हता. आडोसा असुनही थंडीने वाईट अवस्था झाली होती.
२०१२ चा पावसाळा संपता-संपता एक दिवस सुधागडावर मुक्कामी होतो, दिवसभर भटकून साधारण पाच-साडेपाच च्या दरम्यान सरकारवाडा मुक्कामी आलो, वाड्याच्या चौकोनी पडव्या मुक्कामाच्या दृष्टीने छान वाटतात. मध्ये चौकात मोकळी जागा, त्यात थोडाफार वाढलेलं गवत, एक मोठं झाड असा परिसर, पावसाळी वातावरण, चहाची तयारी सुरू असताना पडवीत कडेला निवांत पाय पसरून लाकडी खांबाला टेकून बसलो होतो. पडवीच्या ओट्याखाली कसली तरी हालचाल जाणवली म्हणुन लक्ष गेलं तर साधारण तपकिरी रंगाचा मोठा साप हळुवार पुढे सरकत होता. कोणता होता समजलं नाही पण अलर्ट झालो, तो पडवी खालील कुठल्याशा बिळात गायब झाला, पाच मिनिटांनी मित्राला समोरच्या कोपऱ्यात निवांत पहुडलेला घोणस दिसला, तो तर जणु मुक्कामाला आल्यासारखा जागचा हलतही नव्हता, अजून एक विटकरी रंगाचा छोटा साप फिरताना दिसला, अंधार पडता-पडता अजून दोन साप दिसले त्यातील एक ठार तर रंगाने ठार काळा होता.
मग मात्र भित्यापाठी ब्रह्मराक्षस या उक्तीप्रमाणे सरकारवाड्याच्या पडवीच्या भिंतीतली छोटीछोटी बिळेही आम्हाला भिववू लागली, चौकात वाऱ्याने हलणाऱ्या गवताच्या पात्यातही सापांचा भास होऊ लागला, शेवटी तेथील चंबूगबाळे आवरून भोराईमातेच्या मंदिराचा आसरा घेतला, एका छोट्या सौर दिव्याच्या उजेडात रात्र घालवली.
त्यावेळी अनुभवताना-जगताना या गोष्टी फार काही विशेष वाटल्या नव्हत्या पण आज वळून आठवताना हे अनुभव "खास" होते हे जाणवतंय.
अगदी अगदी!!
In reply to गडकिल्ले, डोंगरदऱ्यातील… by चक्कर_बंडा
>>गडकिल्ले, डोंगरदऱ्यातील मुक्कामाचे साधे-साधे अनुभवही नंतर छान आठवणी बनून आनंद देत राहतात. <<
नक्कीच. जेव्हा आपण त्या अनुभवातुन जात असतो तेव्हा जाणवत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट दुर्मिळ होते, तेव्हा हे अनुभव अत्तराच्या कुपीसारखे सुगंध देतात.
माझ्या अतिशय आवडीचा विषय…
माझ्या अतिशय आवडीचा विषय. बोलण्यासारखे भरपूर आहे इथे, कदाचित स्वतंत्र धागाच काढावा कि काय.
गड लहान आहेत.
एकाच दिवशी बरेच लोक गडावर राहिले तर तिथला समतोल बिघडू शातो. आणि ऑक्टोबर ते मे या काळांत खूप जण येणारे असले तर पाणीसाठा संपून जातो.
मस्त लेख
मस्त लेख आणी आठवणी...
अश्याच अफाट अनेक आठवणी माझ्या ट्रेकिंग लाईफ मधल्या पण आहेत... त्यावर सह्याद्रीतील शब्दचित्रे नावाची सहा भागांची एक लेखमाला पण लिहिली होती काही वर्षांपुर्वी...https://www.misalpav.com/tourism/45567
छान आठवणी!
छान आठवणी!