Skip to main content

कोकणातील कातळशिल्पे (चवे देवूदचा एकशिंगी गेंडा, पुळ्याची मानवाकृती आणि उक्षीचा प्रचंड हत्ती)

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 30/04/2026 10:28 या दिवशी प्रकाशित केले.

 

कोंकणचे भूरुप मोठे विलक्षण.  डावीकडे निमुळती होत जाणारी किनारपट्टी तर उजवीकडे सह्याद्रीची भिंत. ह्या दोन भागांत वसलेले आहे ते दऱ्याखोऱ्यांनी बनलेले कोंकण. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कोंकण लहानलहान टेकड्यांनी बनलेले दिसते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीची मुख्य रांग आणि किनारपट्टी जवळ आलेली आहे त्यामुळे त्याभागात कोंकणात डोंगर कमी आहेत. मात्र मधल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोकणाचा अनोखा भाग सामावलेला आहे. सह्याद्री  उतरुन जाताच अनेक डोंगररांगा कोंकणात ह्या भागात आहेत. कशेडी, भोस्ते घाट, परशुराम घाट ह्यासारखे अवघड घाट येथेच आहेत. मगरांनी युक्त असलेल्या वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्र येथीलच. रत्नागिरी जिल्ह्यातले कोंकणचे हे भूरूप मोठे वैचित्र्यपूर्ण आहे. येथील मानवी लोकवस्ती वस्ती वसली आहे ती किनाऱ्यानजीक असणाऱ्या दऱ्यांत, घळीत. कारण सह्याद्री उतरुन कोंकणात आल्यावर पठारी भाग पुन्हा उंचावलेला दिसतो. हा पठारी भाग बनलाय जांभ्याने युक्त असलेल्या कातळांपासून. जांभा सच्छिद्र असल्याने ह्यात पाणी राहात नाही. गवत उगवत नाही, त्यामुळे मनुष्यवस्तीला हा भाग योग्य नाही. ह्या भागाला सडा म्हणतात. दगडधोंड्यांचा खच सड्यासारखा येथे पसरल्यामुळे हा सडा. हे सडे किनारा जवळ येताच परत उतरणीला लागतात आणि पुढे दऱ्याखोऱ्यात कोंकणचा भाग नारळीपोफळींनी भरलेला हिरवाकंच दिसू लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात तुम्ही कुठेही गेलात तरीही तुम्हाला असेच भूरूप दिसते. केळशी, आंजर्ले, मूर्डी, हर्णै, कर्दे, मुरुड, दाभोळ, अंजनवेल, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, जयगड. मालगुंड, गणपतीमुळे, गणेशगुळे. ही सर्वच गावे दरीत, घळीत अशीच वसलेली दिसतात.  अजून फरक समजावून घ्यायचा असेल तर अलिबाग पासून येता केळशीपर्यंत गावे चौकोनी किंवा आयताकृती अशी दिसतात. ३/४ समांतर रस्ते आणि त्याला छेदणारे चौक. दिवेआगरात तर हे प्रकर्षाने जाणवते. मात्र केळशीपासून पुढे रत्नागिरीच्या शेवटाशी येता येता कोंकणातील सड्यांच्या भिंती किनारपट्टीला जवळजवळ लगटून येतात त्यामुळे ही गावे एका पट्टीसारखी लांबलचक झालेली दिसतात. एकच समांतर रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूंनी घरे, एका बाजूस समुद्र, दुसऱ्या भागात डोंगर. उदा. गुहागर, अगदी लांबलचक ३/४ किमी उभे असलेले गाव, मात्र मुख्य रस्ता एकच. पुढे सिंधुदुर्गात मात्र सपाटीमुळे गावे विस्तारलेली दिसतात. तिथे जरी जास्ती करुन सपाटी असली तरी तिथेही सडे दिसतातच.

 

हे तसं नमनाला घडाभर तेलच झालं. आपल्याला ह्यात मुख्य करुन बघायची आहेत ती ह्या सड्यांवर खोदली गेलेली, कोरली गेलेली कातळशिल्पे. मार्चमध्येच कोंकणात रत्नागिरी जिल्ह्यात ५ दिवसांची सहल झाली त्यात कोंकणच्या ह्या अनोख्य भूवैशिष्ट्याचा आस्वाद घेत येथील गणपतीपुळे, उक्षी आणि चवे देवूद ह्या ठिकाणी असलेली कातळशिल्पे पाहता आली. सर्वसाधरणपणे इंग्रजीत ह्या कातळशिल्पांना petroglyphs म्हणत असले तरीही त्याना नुसतेच कातळशिल्पे न म्हणता भूशिल्पे अर्थात Geoglyphs असेही म्हटले जाते. कारण कातळशिल्पे म्हणजे नुसतेच कातळावर लहानसे कोरणे मात्र ही भूशिल्पे म्हणजे थोडक्या उंचीवरुन ह्या शिल्पांचा आवाका ध्यानी येणे. कारण ही शिल्पे लाईफ साईझ (प्रत्यक्षातील वस्तूंच्या आकारात) बरेचदा दिसतात.  आता ही शिल्पे कोरली कुणी आणि कोणत्या काळात? तर ह्याचे उत्तर असे आहे की इसवीसनपूर्व १५००० वर्षे ते इसवीसनपूर्व १००० इतक्या प्रदीर्घ काळात अश्मयुगीन ते ताम्रपाषाण युगांतील मानवांकडून ही कोरली गेली. आता ह्यांचा काळ कसा ठरवला गेला तर कार्बन डेटींग येथे निरुपयोगी ठरते तर दस्तावेजांचा येथे काहीच उपयोग नाही. येथे काळ ठरवण्यास मदत झाली ती थोड्या उत्खननाची, येथील कातळशिल्पांच्या साधेपणाची, त्यांच्या एकरेषीय शैलीची.  येथे प्रागैतिहासिक मानवांची दगडी हत्यारे आढळली आहेत. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे येथील भागांतून नामशेष झालेल्या प्राण्यांची कातळशिल्पेही येथे आढळतात.

 

अन्नाच्या, निवाऱ्याच्या शोधात जागोजागी हिंडणाऱ्या प्रागैतिहासिक मानवांनी त्यांना दिसलेले विविध प्राणी, मानवी आकृत्या, अमूर्त आकार येथील विस्तिर्ण कातळांवर आपल्या फावल्या वेळात कोरले आणि आज तोच आपला जागतिक वारसा होताना दिसतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ३००० कातळशिल्पे आत्तापर्यंत सापडली असून त्यात वाढच होताना दिसतेय.

 

आता आपण मी पाहिलेली काही कातळशिल्पे पाहूयात.

 

चवे देवूदची कातळशिल्पे

गणपतीपुळ्याला जाताना जाखादेवी हे गाव लागतं त्याच्यापासून जवळच एका विस्तिर्ण सड्यावर येथील अनोखी कातळशिल्पे आहेत. भोवताली सगळ्या जांभ्याच्या खाणी आहेत. त्यामुळे येथील अजून अज्ञत असलेली कातळशिल्पे देखील नष्ट होऊन जातील असे वाटते. मात्र येथील दोन ठिकाणांचे उत्तम संवर्धन केल्याचे दिसते. आजूबाजूला संरक्षक भिंत बांधून तीन चार फूट उंचीचा एक फलाट येथील शिल्पे नीट ध्यानात येण्यासाठी बांधला आहे.

येथील सर्वात महत्त्वाचे आहे ते एकशिंगी गेंड्याचे कातळशिल्प. कोंकणातून गेंडा सुमारे १५००० वर्षांपूर्वी नामशेष झाला. तर तो येथील शिल्परुपात कसा आला आणि एकदम अचूकपणे, ह्याचे कारण तो येथील मानवांनी तो त्याच काळात प्रत्यक्ष पाहिलेला होता.

 

 

आपले पुढचे पाय उचलून आणि मागच्या मागचे जमिनीवर रोवून हा गेंडा झेप घेण्याच्या पावित्र्यात उभा आहे. गेंड्याच्या शरीवर त्याच्या जाड कातडीची रेषा तर आहेच ह्याशिवाय अनेक अमूर्त आकार देखील ह्यात कोरलेले दिसतात.

 

 

येथे गेंड्याच्या सोबतीला आहे ते हरणाचे शिल्प

 

येथे नीट निरखून पाहिल्यास आपल्याला दिसते ते वाघाचे शिल्प. 

वाघाच्या अंगावरचे केस उभे राहिले असून आखूड कानांचा आणि थोटक्या शेपटीचा वाघ जमिनीवर उभा राहिलेला आहे.

 

 

अगदी नीट पाहिल्यावरच हे ध्यानी येते.

 

ह्याशिवाय येथे आहे ते माश्याचे कातळशिल्प

 

 

ह्याच्यापासून पुढे अगदी दोन मिनिटांवर कातळशिल्पांची अजून एक साईट आहे. येथे काही मानवी आकृत्या आणि प्राण्यांची कातळकोरीव शिल्पे आहेत.

 

कातळशिल्पे संरक्षित केलेला भाग

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हा गवा असावा

 

येथील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मानवाकृती दोन्ही पाय फाकवलेल्या अवस्थातील आहे. हे एक गतिमान शिल्प आहे.

 

ह्याशिवाय येथे इतरही आकृत्या आहेत पण त्या सर्वच येथे देणे शक्य नाही.

 

गणपती पुळ्याची कातळशिल्पे.

 

गणपतीपुळ्यापासून जेमतेम ४ किमीवर असलेल्या सड्यावर ही कातळशिल्पे आहेत.

एक प्रचंड मानवाकृती, एक नामशेष झालेल पक्षी (Elephant Bird) अशी अनोखी कातळशिल्पे येथे आहेत.

 

दोन्ही हात पाय एकत्र जुळवलेली साधी सारळ उभी मानवाकृती

 

 

नामशेष झालेला पक्षी

 

हे बहुधा माकड असावं

 

तर हे रानडुक्कर

 

पूर्ण दृश्य

 

ह्यानंतर आपण पाहू ती उक्षीची कातळशिल्पे

 

उक्षी कातळशिल्पे

 

गणपतीपुळ्यापासून २५ किमी तर जाखादेवीपासून १०/१२ किमीवर उक्षीच्या सड्यावर कातळशिल्पांच्या २ जागा आहेत. एका जागेवर पूर्ण अमूर्त शैलीतील शिल्पे आहेत. त्यात निरनिराळ्या आकृत्या,  चौकोनी, गोलाकार इत्यादी विविध आकारांच्या नक्षी तर ओळखता न येणारे पशुपक्षी अशी विविध शिल्पे आहेत.

 

हा बहुधा कुठलातरी पक्षी असावा

 

विविध अमूर्त कातळशिल्पे

 

 

 

 

ह्या जागेच्या पुढेच काही मिनिटॲंवर आहे ते उक्षीचे एक अत्यंत महत्त्वाचे कातळशिल्प ते म्हणजे हत्तीच्या पूर्णाकृतीचे.

 

येथे शिल्पांचा भडीमार नाही, एकच एक शिल्प आहे जे ५.८.मी. ते ५.१२ मी. च्या आकारात कोरलेले आहे. हा हत्ती जरी द्विमितीय स्वरुपात असला तरी त्याचे दोन्ही कान, पाय आणि सोंड हे त्रिमितीय भास करुन देतात.  लांबलचक सोंड आणि दोन्ही सुळे हत्तीने मान वळवल्याचे दाखवतात. जणू काही हा एक खराखुरा जीवंत हत्तीच आहे.

 

 

जवळून

 

 

 

कोंकणात गणपतीपुळ्याला आलात तर ही कातळशिल्पे अगदी आवर्जून बघाच. पुळ्यापासून अगदी जवळ आहेत. जायचा रस्ता चांगला आहे, गूगल नकाशांवर ती प्रमाणित देखील आहेत.  आपल्या पूर्वजांनी सोडलेला वारसा आपल्याला पाहायला मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल.


वाचने 129
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

तुझे सचित्र आणि माहितीपूर्ण लेख हा मिपाचा USP आहे. 

लेख आणि माहिती आवडली. याच्य आजूबाजूला फिरूनही नेमकी ही ठिकाणं तेव्हा माहित नव्हती. आता चुटपुट लागून राहिली.


आमच्या लेखी कोकण म्हणजे समुद्र, मोदक, सोल कढी,फारच झाले तर देव दर्शन.  

 

कातळशिल्पे  कधीच बघीतली नाही. परंतु भोपाळ जवळील भिमबेटका  मधे गुफाचित्र बघीतली आहेत. 

 

पुढच्या वेळेस  नक्कीच बघू. 

 

धन्यवाद. 


आजुबाजुच्या रिसॉर्टवाल्यांनी याची जाहिरात करायला पाहिजे. तिकडे नेऊन आणण्याची आणि दाखवण्याची व्यवस्था करायला हवी. 

" प्रत्येकी दोन जेवणे, दोन चहा नाश्ता, आंघोळीला गरऽम पाणी , दहा वर्षांवर फुल चार्ज पडेल" हे सांगण्यात पुढे.  "मुलांसाठी खेळ कॅरम, टेबल टेणीस आहे". 


In reply to by कंजूस

नको,आपल्याकडे अभ्यासक ,दर्दी पर्यट्क कमी आणि हुल्लडबाजी करणारे अधिक आहेत.चित्रातले प्राणीच गायब होतील.ज्याला खरच मनोमन इच्छा असेल ,त्यालाच इथ पर्यंत पोहचता यावे😇


खास पाहण्याकरीता गेलो होतो सहकुटुंब. पण तीथे पोहोचण्यास फार अडचण आली. शिवाय कुठेही कुंपण नव्हते. फारच शोधावे लागले कारळशिल्पे सहज दिसत नव्हती. एका स्थानिक मेंढपाळाने आम्हाला पाहण्यास मदत केली..पण तुमच्या फोटोंवरुन आता कुंपण केल्यामुळे पाहणे सोपे झाले असावे असे वाटते. लेख नेहमीप्रमाणेच आवडला.


खुप छान ओळख !

तसे या खोद्चित्रांचा शोध फार उशीरा १९९०-२०१५ या काळात लागत केला.परंतु २०१२ च्या आसपास सुधीर (भाई) रिसबूड  निसर्ग अभ्यासकाने निव्वळ उत्सुकतेपोटी कोंकणातील कातळशिल्प या विषयात अत्यंत अल्प किंबहुना शून्य माहितीवर पाऊल टाकले.  ह्ळु हळु अभ्यासक जोड्ले गेले.आज पर्यंत त्यांनी २००० खोद्चित्रांचा शोध लावला आहे.या कामामुळे आज याचे संरक्षण मोहिम शासन करु लागले आहे.(मी त्यांचे एक ऑन लाईन व्याख्यान लाइव्ह ऐकले-पाहिले होते)

कोकणातील कातळशिल्पे

प्रा.प्र.के.घाणेकर यांच्या सुचनेनुसार या कलेला "खोदचित्रे" हे नाव अधिक योग्य आहे.कारण शिल्पाप्रमाणे ते थ्रीडी कोरलेले नाही,खोद्लेले चित्र आहे.आणि तो दगड जांभा आहे कातळ(बेसालट)नाही.

 खोद्चित्र

 

 


परू मध्ये अशीच पण अतिशय अजस्त्र कातळशिल्प आहेत. तीथं कधी जायला मिळतंय माहीत नाही. इथे जावं लागेल.