स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-
१) माझ्याकडे बर्याच स्त्रिया येतात सोनोग्राफी साठी का तर पाळी नीट येत नाही म्हणून. म्हणजे केवळ "दोनच दिवस" अंगावर जातं
सोनोग्राफी केल्यावर मी त्यांना विचारतो तुम्हाला त्रास काय आहे? त्रास काही नाही पण "व्यवस्थित" ब्लीडींग होत नाही.
परत --त्याचा तुम्हाला काय त्रास होतो?
--त्रास काही नाही पण चार दिवस व्यवस्थित ब्लिडींग होत नाही.
मी त्यांना सांगतो हा प्रश्न का येतो? तर चार स्त्रिया एकत्र भेटल्या कि त्यातील एक सांगते "मला बाई कसं चार दिवस व्यवस्थित ब्लीडींग होतं".
मग जिला दोन दिवस होतं ती लटकली आणि जिला पाच दिवस होतं ती पण लटकली.
तुमचं सर्व अवयव व्यवस्थित आहेत. इतर बायका म्हणतात म्हणून तुम्ही डोकं पिकवून घेताय. एवढीच हौस असेल तर रक्तदान करा पुण्य तरी मिळेल. सॅनिटरी नॅपकिन वर खर्च कशाला करायला हवाय?
काही बायका विचारतात हे असं का?
मी त्याना सांगतो
सर्व बायकांना बारा महिने बत्तीस काळ वेळेवर पाळी आली तर स्त्रीरोगतज्ञांचं पोट कसं चालेल? तुमची गाडी बिघडलीच नाही तर मेकॅनिक चं पोट कसं चालेल
मुलुंड पूर्व मध्ये १५ स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि मुलुंड पश्चिम मध्ये ४५ तरी असतील. पण मुलुंड मध्ये एकही "केवळ" पुरुष रोग तज्ज्ञ नाही असं का?
पुरुषांचं आयुष्य सरळ गुंतागुंत नसलेलं आहे. त्यांना पाळी येत नाही, त्यांची पाळी जात नाही, त्यांची पाळी वरखाली होत नाहीत, पुरुष गरोदर राहत नाहीत, त्यांची प्रसूती होत नाही.
स्त्रियांवर निसर्गाने अन्याय केला आहे हे सत्य आहे पण त्यात स्त्रियांनी आपलं आयुष्य अशा प्रश्नांनी अधिक गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे.
२) माझ्या कडे येणाऱ्या जवळ जवळ शंभर टक्के गरोदर मुली भरपूर तणावाखाली असतात. पहिलटकरणी तर जास्तच.
पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या वेळेस गरोदर असणाऱ्या सुद्धा.
काही जणी मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मुलात इतके अंतर असते कि पहिल्या गरोदरपणाचे त्यांना काहीच आठवत नाही.
आणि ज्यांच्यात इतके अंतर नसते , त्या यावेळेस मागच्या वेळेसारखे नाही म्हणून तणावाखाली असतात.
मी सोनोग्राफी करताना सर्वच स्त्रियांना आवर्जून सांगतो कि गरोदरपण हे आजारपण नाही. १०० वर्षांपूर्वी क्षकिरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट) नव्हते कि स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) नव्हते. तुमच्या आज्या पणज्यानी यातील कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना मुलांना जन्म देऊन वंश तुमच्या पर्यंत आला याचा अर्थच असा आहे कि सोनोग्राफी "अत्यावश्यक" नाही.
ते विमा उतरवण्यासारखे आहे. ९९ % हे मानसिक समाधान असते कि सर्व काही व्यवस्थित आहे आणि १ % केसेस मध्ये काही गुंतागुंत हिऱ्यांची शक्यता असेल तर त्याचा वेळेत इलाज करता यावा यासाठी सोनोग्राफी केली जाते. तेंव्हा खा प्या आणि एन्जॉय करा
असे सांगितले तरी एक दोन दिवस ठीक जातात आणि सर्व स्त्रिया परत कुठल्या तरी कारणाने तणाव घेतात.
मग कोणी तरी शेजारची बाई म्हणते कि "अगं सातवा लागला ना? तुझं पोट दिसत नाही. बघ बाई बाळाची वाढ ठीक आहे कि नाही?"
किंवा
अगं तू काही खातच नाहीस. बाळाचं पोषण कसं होणार? आता तुला दोन जीवांसाठी खायचं आहे.
मी मुलींना आवर्जून सांगतो कि अंबानींच्या घरी पाच किलोची मुलं जन्माला येत नाहीत आणि आदिवासींच्या कडे दीड किलोची मुलं जन्माला येत नाहीत.
तुमचा वजन ६० किलो आहे आणि नवव्या महिन्यात बाळाचं साधारण ३ किलो असतं म्हणजे तुमच्या ५ %
आता १०५ % साठी तुम्ही २०० % खाल्लं तर तुम्ही खुर्चीत मावणार नाही.
हे रोजचे संवाद असतात.
३ ) काही महिन्यांपूर्वी एक जोडपं आलं होतं होते. ती पाच महिने गरोदर होती. त्यातील नवरा मला विचारत होता कि डॉक्टर हि सारखं टेन्शन घेते, कितीही समजावलं तरी समजतच नाही हे असं का ?
मी त्याला सांगितलं साहेब तुम्ही प्रेमविवाह केलेला आहे, दोघं स्टेट बँकेत ऑफिसर आहात, तुमचा पगार सारख,, हुद्दा सारखा, समाजात मान सारखा आहे बरोबर? तो हो म्हणाला.
मी त्याला विचारलं साहेब तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला गिफ्ट दिली नाही म्हणून तुम्ही रुसून बसाल का? तुमची बायको रुसून बसेल ना?
हे असं का? याचं उत्तर तुम्हाला मिळालं तर मला सुद्धा द्या.
आम्ही तिघेही हसू लागलो.
मी पुढे त्यांना म्हणालो कि साहेब तुम्ही दोन महिन्यांनी गोव्याला जायचं ठरवलं तर जायच्या आदल्या दिवशी तुम्ही दोन जीन्स च्या पॅण्ट्स आणि चार टी शर्ट घ्याल कि तुमचं पॅकिंग संपलं.
पण तुमची पत्नी दोन महिने विचार करून आपलं डोकं पिकवून घेईल. सकाळी कोणता ड्रेस घालायचा, त्यावर टॉप कोणता, मग बीचवर कोणता घालायचा? त्याला मॅचिंग कानातलं गळ्यातलं कोणता घालायचं.
संध्याकाळी डिनर साठी कोणता ड्रेस घालायचा त्यासाठी पायात चप्पल कोणती घालायचीय एक ना दोन.
त्यावर तो नवरा म्हणाल सर काय सांगताय? मागच्या जानेवारीत मध्ये आम्ही गोव्यालाच गेलो होतो तर तिने आधी महिना भर मला पण हा ड्रेस चांगला दिसेल का तो? आणि याला कानातलं कोणतं घालू? सॅंडल चांगले कि चप्पल?
मग हे सॅंडल या ड्रेसवर जातील का असं सारखा विचारून मला अगदी काव आणला होता.
मी सांगितलं तुला हवा तो ड्रेस, गळ्यातलं, कानातलं घाल. या वर तिने माझ्याशी भांडण पण केलं होतं.
आम्ही तिघेही परत हसू लागलो. ( कारण हे बायकोला सुद्धा पटलं होतं)
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
🤣🤣🤣
?
लेखाच्या शिर्षकाचे आणि गाभ्याचं सुत जुळलं नाही! तसच, लेख विस्कळीत झाला आहे त्यामुळे नेमकं काय म्हणायचंय ते क्लीयर होत नाही.
- (विचारात पडलेला) सोकाजी
लेख आवडला. छान उपयोगी…
लेख आवडला. छान उपयोगी सल्ला आणि थोडेसे खुसखुशीत किस्से यांचं मिश्रण.
डाॅक्टर ची दैनंदिनी.....
हा काॅलम सुरू करा.
बाकी, हे डाॅक्टर च्या जीवनात आणी जिवनभर घडणारे किस्से आहेत.काही गुदगुदवणारे काही रडवणारे.
छान सांगितलंत हो डाॅ. साहेब …
छान सांगितलंत हो डाॅ. साहेब !!
धन्यवाद..!!
अनुभव
हा अनुभव आतापर्यंत जितक्या वेळा गोव्याला गेलो आहे तितक्या वेळेला म्हणजे केवळ ११ वेळा घेतला आहे :)
खुसखुशीत लेख!!
पुरुषांचं आयुष्य सरळ गुंतागुंत नसलेलं आहे. त्यांना पाळी येत नाही, त्यांची पाळी जात नाही, त्यांची पाळी वरखाली होत नाहीत, पुरुष गरोदर राहत नाहीत, त्यांची प्रसूती होत नाही.😁
हे एक बरे आहे, नाहीतर ईतकी सहनशक्ती आपल्याला कुठे? मला तर बायको नेहमी म्हणते "तुम्हा पुरुषांना अंगाला सुई लावुन घ्यायला नको, जे काय करायचं ते बायकांनीच"