Skip to main content

भूज पर्यटन- डिसेंबर २०२५

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 21/04/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

भूज लेख. डिसेंबर २०२५.

कच्छ  रणोत्सव जाहिराती आणि विडिओ पाहून  ठरवलं की त्या टेंटसिटीमध्ये नाही राहिलो तरी तो भाग पाहून येऊ. यासाठी कच्छमधले मुख्य शहर भूज येथे   जाण्यायेण्याची रेल्वे तिकिटे काढली डिसेंबर २०२५ मधली. रेल्वे शिवाय विमानाचा पर्याय आहेच. विमानतळ चार किमिटरवर आहे.भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तान हद्दीजवळ असल्याने  भूजचे महत्त्व आहे.

भूजच्या आसपास पाहाण्यासारखी ठिकाणे...

शहरामध्ये - हमिरसर लेक, म्युझियम, रामकुंड, प्रागमहल, ऐनामहल, छत्तरडी, स्वामिनारायण मंदिर ( जुने आणि नवे),भुजियो डुंगर ही सर्व रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड पासून चार किमि परिसरात आहेत. ओटोने सहज जाता येते. स्पेशल ओटो/टॅक्सी वगैरे करण्याची जरूरी नाही.

भूज शहरापासून दूरची ठिकाणे - सफेद रण आणि टेंट सिटी. (८०किमि). धोलाविरा (८०किमी) , काळो डुंगर तिन्ही उत्तरेला आहेत. काडो   धोर्यो (४०किमी) . स्पेशल टॅक्सी करावी लागते. वाहन लागेल. भूजजवळ असलेल्या जैन आणि हिंदू मंदिरांना भेटी देणारे भाविक सकाळीच भूजमध्ये उतरतात. त्यात 'माता नो मढ' हे मुख्य आहे. तिकडचे कोल्हापूर असावे. इथली देवी आहे आशापूरा माँ.

मांडवी किनारा आणि विजय विलास पॅलेस. (८०किमि)दक्षिणेस आहे. 

भूज पासून जवळच असलेल्या चोभारी गावात केंद्र असलेल्या ठिकाणी जो भूकंप झाला २६ जानेवारी २००१मध्ये त्यांच्या धक्क्याने भूजमधील बरीच स्थळे नष्ट झाली होती. इथे पाहा https://en.wikipedia.org/wiki/2001_Gujarat_earthquake

हॉटेल्स राहाणे --

बस स्टँड ते स्टेशन रोडवर बरीच हॉटेल्स आहेत. १. सहारा २.आभा ३. अंजली ४. शिव रेसिडेन्सी.  या सर्वांमध्ये गर्दी दिसली पण रुम अंजली मध्ये मिळाली . साधारणपणे१६०० नॉन एसी, २४०० एसी रेट आहे.

खाणे रेस्टॉरंट्स --

आमच्या हॉटेल अंजलीच्या जवळ संकल्प आणि नीलम होते. महागडे. संकल्प मध्ये फक्त एक चहा एक कॉफी साठी १८० रुपये घेतले. ग्रीन पार्क जुनाट आहे. बस स्टँड मध्येच जलाराम भवनमध्ये १२० रु अमर्यादित शाकाहारी थाळी उत्तम होती. तर रामकुंडजवळ एक खानावळ आहे त्यात वीस रुपयांत अमर्यादित थाळी होती. चांगलं जेवण.  मेन रोडवर सकाळी टपऱ्या लागतात तिथे पोहे, चहा, कॉफी स्वस्तात चांगली मिळते पण आठच्या नंतर पोहे मिळत नाहीत. धार्मिक पर्यटन वाले सकाळीच येतात ते टपऱ्यांवर नाश्ता करतात.

स्वच्छता --

बस स्टँड आतमध्ये अतिशय स्वच्छ आहे. मात्र बाहेरचा परिसर फार अस्वच्छ आहे.

दोन दिवसांत काही जागा फिरलो त्यांची क्षणचित्रे देत आहे.

( नवीन मिसळपाव साईटवर फोटो थेट देता येत आहेत. बाहेरील photo sharing sites चा  आधार घ्यावा लागत नाही आणि त्या लिंक्स चालतही नाहीत. अगदी 5MB चा फोटोही थेट अपलोड होतो हे तपासले. परंतू असे फोटो बरेच दिल्यास लेख लवकर उघडणार नाही म्हणून इथे देण्याचे फोटो प्रथम 800kB -1200kB करून घेतले.)

फोटो  १. नकाशा १.भूजच्या जवळची ठिकाणं

२

फोटो  २.नकाशा २.भूजच्या जवळची ठिकाणं

२

फोटो  ३.हॉटेल अंजलीमधली रुम

 ३४

फोटो  ४.हमिरसर लेकच्या किनाऱ्यावरचे पक्षी

फोटो ५ नवीन स्वामिनारायण मंदिरापाशी..

..

फोटो  ६.नवे स्वामिनारायण मंदिर प्रवेशद्वार

६

आपण कच्छ रणोत्सव टेंटसिटीचे ऑनलाईन बुकिंग केले असेल( दोघांसाठी एक तंबू १८०००रुपयांपासून पुढे) तर भूज स्टेशनला लागूनच त्यांचे स्वागत कक्ष आहे तिथे गेल्यावर सर्वांना थांबवण्यात येते. मग त्यांच्या बसने टेंट सिटीला नेतात. त्यांचा चेक-इन टाईम दुपारी बारा असतो. तिथे राहिल्यावर तिथून चार किमि अंतरावर सफेद रण आहे. हे रण म्हणजे दीडशे किमी पसरलेले मिठागर आहे.  हा सर्व भाग पाकिस्तान हद्दीजवळ असल्याने आर्मीची परमिशन लागते. भूजमधून एकच एसटी बस सकाळी आठला स्टँडवरून निघते ती दोन तासात परमिट गेटला सोडते. तिकडे परमिट काढून स्पेशल बसने पुढे जाता येते. परतीसाठी बस नाही.  वाटेत  मेन रोड सोडून डावीकडे वळतो त्या भिरंडियारा गावाजवळ चहा नाश्तासाठी बस थांबते. गोड कुंदा मिळतो तो फारच गोड असतो. साधा खवा( मावा) देत नाहीत. भूज ते भिरंडीयारा पन्नास किमि आणि पुढे तीस किमि असे ऐंशी किमी अंतर आहे.  परतताना टेंटसिटी ते भिरंडीयारा(३०किमी)  प्रवासासाठी खाजगी टेंपो प्रत्येकी दिडशे रुपये घेतात. ड्रायवर बोलला की या सफेद रणोत्सवमुळे इकडच्या गाववाल्यांना रोजगार मिळाला.

बाकी टेंटसिटी मिठागरावरच आहे.टेंटसिटीच्या अगोदरही खाजगी वसतीस्थाने झाली आहेत.  इथे नोव्हेंबरला आलेलं समुद्राचे पाणी आटतं आणि जिकडे तिकडे मीठच मीठ दिसतं. वाळूऐवजी मीठ. पण या वर्षी पावसाळा लांबल्याने मीठ ओलंच होतं. जेव्हा वाळतं तेव्हा इकडच्या राहण्याच्या जागा भरून जातात. मे महिन्यात संपूर्ण टेंटसिटी उतरवतात आणि ऑक्टोबरला पुन्हा बांधतात. तंबूबाहेर बघण्यासारखं काही नाही. रात्री सांस्कृतीक नाच गाणी असतात. पारंपरिक जेवणात  बाजरीची भाकरी, गूळ, टोमॅटो शेव भाजी, भोपळ्याची, दुधीची भाजी आणि कढी असते. केवळ मार्केटिंग आहे. येणाऱ्या पर्यटकांत गुजरातचेच रहिवासी जे आता  परदेशांत आहेत ते असतात अमेरिकन गुजराती जास्तीच. त्यामुळे इथले दर आपल्याला महाग वाटतात. राजस्थानच्या जैसलमेर टेंट सिटीला पर्याय म्हणून काढले आहे पण वाळू ती वाळूच आणि मीठ ते मीठ. मजा नाही.

फोटो  . सफेद रण

सफेद रण

सफेद रणाकडे जाताना मीठ घेऊन जाणारे मोठे ट्रक दर पाच मिनिटाला दिसतात. हे मीठ कांडला किंवा मुंद्रा बंदरात नेतात. प्रवासात भूज आणि आसपासच्या प्रदेशांत असं चित्र दिसत राहातं.

फोटो  ७.

७

फोटो  ८.

८

फोटो क्रमांक ८ मध्ये हिरवी झाडे दिसताहेत त्याबद्दल रेल्वेने परत येताना तिकडच्या प्रवाशांना विचारलं की ही बाभळीची झाडं आहेत का? तर ते म्हणाले की नाही. दातणसाठी ज्या बाभळीच्या काड्या गुजराती लोक वापरतात ती बाभळही नाही. किंवा  ज्यातून गोंद काढतात तीही झाडं नाहीत. यांचा काहीच उपयोग नाही. इकडे सर्व उजाड खारी जमीन आहे त्यात कोणती झाडे जगतील हे त्या वेळच्या सरकारने शतकी खात्याला विचारल्यावर या बाभळी बद्दल सांगितले. मग सरकारने या बाभळीचे बी हेलिकॉप्टरमधून शिंपडले. आता ही झाडे घट्ट रुजली आहेत काढता ही येत नाहीत. फक्त सावली आणि हिरवे रान आहे. तरी आम्ही काही उंट या झाडांचा पाला खातांना रेल्वेतून पाहिले.

फोटो  ९.

९

फोटो  १०.

१०

 

 

प्राग महाल आणि ऐना महल हमिरसर लेकच्या उत्तरेला आहेत. भुकंपाने तडे गेले आहेत. ऐना महाल लवकर बंद होतो. तो पाहता आला नाही.

फोटो  ११ इथे बांधणी ( बंधेज)साड्यांचं मोठं मार्केट आहे.

११

फोटो १२ .प्राग महाल

११

फोटो  १३.प्राग महाल

१२

फोटो  १४.प्राग महाल

१४

फोटो  १५.प्राग महाल

१५

फोटो  १६.प्राग महाल

१६

हमिरसर लेकच्या दक्षिणेला आहे छत्तरडी. आता दुर्लक्षित ठिकाण. मुसलमान राजांच्या कबरी पाहून हिंदू राजेही समाध्या बांधू लागले होते.  या आहेत महत्त्वाच्या लोकांच्या   समाध्या म्हणजे छत्र्या. भुकंपात बऱ्याच  ढासळल्या आहेत. तीन प्रकारच्या आहेत. जे वीर युद्धात मेले आहेत त्यांची स्मारके अशी आहेत.चंद्र सूर्य प्रतिकासह.

प्राग महाल...१६ ब

..

 

फोटो १७ . फोटो १७-२६ हे छत्तरडी येथील आहेत.

१७

 ज्या राण्या/ स्त्रिया सती गेल्या त्यांचे असे हातशिल्प आहेत.

फोटो  १८.

१८

त्यांचे निधन झाले त्यांची पावले आहेत.

फोटो  १९.

१९

एखाद्या लढाइतील / युद्धातील   मेलेल्या  वीरांसाठी असे मोठे दालन असावे. छप्पर पडले आहे तरी कलेची कल्पना येते.

फोटो  २०.

२०

ही थडगी मात्र मुसलमान वीरांची असावीत.

फोटो २१.

२१

पटृराणीसाठी अशी समाधी असेल.

फोटो  २२. पाटी

..

फोटो २३ एका छत्री वरचे शिल्प...

..

फोटो २४ 

..

फोटो २५ छत्री

..

फोटो २६ हा कुणी राजा लढाईत मारला गेला असेल...

..

फोटो २७ हमीरसर तलावामागचे दृष्य..

..

 

फोटो २८ भक्तनिवास 

..

 

सकाळी दहा वाजल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला आणि आकाशात फायटर जेट उडताना दिसले. पाच दहा मिनिटांनी आणखी एक उडाले. असं बरेच तास चालू होते. भूज एअरपोर्ट आर्मी आणि नागरी वाहतुकीचा एकच आहे. तर हा विमानांचा सराव सतत चालू असतो दिवसा.

बरीच ठिकाणं पाहिली नाहीत. भूज कसं काय आहे हे थोडक्यात समजलं. भूजच्या अगोदर गांधिधाम जंक्शन हे नवीन स्टेशन केलं आहे. इथे गाडीची एंजिनं फिरवतात.  इथून मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे जाणारे रेल्वेमार्ग आहेत. 

-----------------------    

 

भूजमध्ये २००१ मध्ये मोठा भूकंप झाला होता त्यात बऱ्याच इमारती पडल्या. प्राग आणि ऐना महालांना तडे गेले आहेत. जुने स्वामी नारायण मंदिरही पडले. भक्त निवास आहे.

माहितीसाठी दुरुस्ती आणि सूचनांचे स्वागत. 

 

[नवीन मिसळपाव ड्रुपल ११ वर सुरू झाल्यावर आठ दिवसांनी हा लेख लिहिला होता त्यात संस्थळाने विशेष साईटचेच स्टोरेज दिले होते त्याचा उपयोग करून फोटो टाकले होते. पण नंतर ती स्टोरेज सोय थांबवण्यात आली. मग काही अधिक फोटो मात्र गूगल फोटोज या शेअरिंग साइटवरून लिंकमार्फत इथे आणले आहेत. ]

============================


वाचने 651
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मिपा writing box उघडून फोटो अपलोड करताना काही वर खाली झाले आहेत. पूर्वी मी नोट ॲपमध्ये सर्व लेख लिहून फोटोंच्या इमेज लिंक्स टाकून तयार करत असे. तो मिपाच्याच व्यनिमध्ये तपासून घेत असे. आता तसं करता येत नाही.


यामध्ये पिक्सेल रीसाईज केले आहेत. फोटोची साईज रीसाईज झाली आणि कमी रेझलूशनचा फोटो उमटला आहे.

पूर्वी html tags वापरून रेझलूशन कमी न करता फोटो रीसाईज करता येत होता.

उदाहरणार्थ 

<img src="https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMKOYq6Yr_VT5nHOUS-LDLr59a1GJ…" width="100%" alt "राणीची समाधी"/>

यातील लिंकने  1 MB चा फोटो येऊ शकतो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMKOYq6Yr_VT5nHOUS-LDLr59a1GJxgn_3-j-WocSYg1o-gZWrHTCdt5k5x0c0U0GFMlSkMCA6uUBOz8JPDdaREGuUnvbcL4-ae6pz_VZTgzrnB7j7zhkZ1-BZS8nZwGj7FpzuhwhOOvDyYp505M_ly=w2262-h1698-s-no-gm?authuser=0  


कंकाका, खूप कमी फोटो टाकले आहेत तुम्ही आणि लेखापेक्षा तुम्ही सरळ विडिओ व्लॉगिंग करत जावा. युट्यूबला. तिथे आपल्याला काही लिमिट नाही काही अडचण नाही. एडिटिंग देखील फारसे अवघड नाही तुम्हाला काही एक प्रयत्नानंतर सहज जमेल. 

लेख आणि फोटो तुम्ही फिरता त्या मानाने खूप त्रोटक वाटले. खाण्यापिण्याचे फोटो पण दिसत नाहीत. त्यापेक्षा आपण विडिओ व्लॉग करणे मनावर घ्यावे ही विनंती.


In reply to by हणमंतअण्णा शंक…

पण आपल्या हातात डिजिटल माध्यम जरा उशीराच आलं. 

तरीही लक्षात ठेवेन. विडिओ अधिक टाकेन.

माझी भटकंती थोडक्यातली आहे आणि एखाद्या जागेला का जावे याची उत्सुकता निर्माण करणे आहे  रेल्वे, स्थानिक बस प्रवास आहे.. हे करू शकतो तर स्वतःच्या वाहनाने जाणारे नक्कीच करू शकतील आणि जलद करू शकतील. म्हणून रूट ट्रेसिंग नकाशे आवर्जून देतो. 

हल्लीच पुण्याचे एक सचिन कार्लेकर धार्मिक तिर्थाटनाचे विडिओ टाकत आहेत. छान असतात. ( Explore with Carlekar) 


वाळवंट सहन होत नसल्याने प्रत्यक्ष जाणे होणार नाहीच. त्यामुळे मिपावरच फिरून घेतो.


भुज एकदम भारी दिसते आहे. एकदा तरी कच्छचे रण बघायचे आहेच. स्वत:च्या गाड्या परमिट गेटच्या पुढे नेऊ देतात का? की फक्त स्पेशल बसनेच जायला परवानगी आहे?

छत्तरडी पण आवडली. कलाकुसर छान आहे.


In reply to by प्रचेतस

परमिट देण्याच्या जागेपुढे विशेष काही नाही. चार किमीच्यापुढे फक्त मीठ आहे. यावर फक्त स्पेशल बसनेच जावे लागते. आधार कार्ड अथवा इतर पुरावा पाहून परमिट मिळते.

...............

इतर ठिकाणं म्हणजे धोलाविरा वस्ती. मोहें जो दडो सारखी वस्ती होती. पण विशेष काही वस्तू मिळाल्या नाहीत. शहर रचना कशी होती याची थोडी कल्पना येते. यूट्यूबवरचे विडिओ कल्पना देतील. 


In reply to by कंजूस

आणि ते चांदण्या रात्री रण बघायचे असेल तर काय करावे लागते? प्रतिबंधित क्षेत्र वगळून पांढरे रण इतर ठिकाणावरून बघता येते का?


In reply to by प्रचेतस

आपण जर सफेद रण टेंटसिंटीकडे न वळता भिरंडियारावरून तसेच पुढे काळो डुंगरकडे जात राहिलो तर एका ठीकाणी धोलाविराकडे जाण्यासाठीचा फाटा उजवीकडे लागतो. मग तो रस्ता आता road to heaven म्हणून प्रसिद्ध होत आहे. नोव्हेंबरपर्यंत रस्त्याच्या दोन्हीकडे पाणी असते ते नंतर आटून मीठ पसरते. मग धोलाविराची टेंटसिटी ( ही वेगळी आहे.) लागते. ती थोडी स्वस्त आहे म्हणतात. तिकडून पोर्णिमेच्या रात्रीचे रण पाहता येईलच. 

इकडे सफेद रण टेंटसिटीकडून पौर्णिमेला संध्याकाळी विशेष परमिटने नेऊन आणतात/दाखवतात. ( इतर वेळी परमिट हे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असते.)

परमिट देण्याची जागा ही टेंटसिटीच्या बाजुलाच दीड किलोमिटरवर आहे आणि तिथेही थोडेफार मीठ असतेच.

यूट्यूब विडिओ आणि परमिट साईटवर माहिती मिळवता येते. 

काळो डुंगरलाही परमिट लागते.

जाताना वाटेत लागणारी काडो धोरयो सुद्धा चांगली जागा आहे. विशेष खडकांची रचना आहे. स्वतः च्या वाहनाने थांबून पाहाणे सहज शक्य आहे. परमिटची जागा नाही.