Skip to main content

शिंजीराचं घरटं

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 20/04/2026 16:11 या दिवशी प्रकाशित केले.

वसंताच्या मध्यात काटेसावर बहरून येते, पांगराही फुलतो, मकरंदासाठी वेडावलेली पाखरं मग दिसू लागतात, आपल्या सुक्ष्मनळीसारख्या बाकदार चोचीने, पंखांची फडफड करीत फुलाशी लगट करणारा पिटुकला शिंजीर, कधी पिवळ्याधम्मक फुललेल्या बहाव्याच्या पुष्पगुच्छाशी जवळीक साधताना दिसतो तर कधी जास्वंदाच्या दांडीवर उलटं लटकून पंखांची फडफड करीत मकरंद चाखायची कवायत करताना नजरेस पडतो. 

पानगळीचे जंगल, शेताबांधांची पांढरी, माळराने सगळीकडे संचार असणारा हा पिटुकला, चिमणीपेक्षाशी लहान असणारा पक्षी, याला शहरी बागाही वर्ज्य नाहीत. चमकदार निळ्या-जांभळ्या रंगाचा, पिसाच्या वरच्या भागात शेंदरी रंगाचा एक छोटा पट्टा, वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, छातीवर काळा पट्टा. फुलातील मध खाण्यासाठी शरीराच्या मानाने लांब व बाकदार चोच अशी वैशिष्ट्ये लेवून दर्शन देणारा हा पक्षी मनस्वी आनंद देतो. 

वसंताच्या मध्यावर विणीचे वेध लागून घरटं बांधण्याच्या कवायतीत, गावाकडे, दरवाजाशेजारी बांधलेल्या कपडे वाळवण्याच्या एका दोरीची याने घरट्यासाठी निवड केली व त्या दोरीला टांगते, छोट्याशा लांबट थैलीसारखे घरटे आकाराला येऊ लागले. गवत, कापूस, कोळ्याचे जाळे, लाकडाचे छोटे तुकडे यांची एकमेकांत बेमालूम गुंफण करीत एवढासा पिटुकला पक्षी त्याच्या स्वप्नांचा ईमला बांधू लागला. 

बुलबुलच्या दोन-तीन वीण निरीक्षणांतून मिळालेल्या अनुभवाने पाखरांच्या वीण किती आव्हानात्मक, कस जोखणाऱ्या, थकवणाऱ्या त्याचवेळी सदासर्वदा अनिश्चित भविष्याच्या सावटाचा ताण वागवणाऱ्या असतात याची कल्पना होती, कपडे वाळवण्याच्या दोरीला लटकणारे, सहज हाताला येणारे घरटे पाहिल्यावर काळजीचं वाटली पण पाखरांच्या सुरक्षित जागांची पारख करण्याच्या क्षमतेवर शंका अनाठायीचं, त्यांच्या निवडी हे पिढ्यांच्या अनुभवातून विकसित नैसर्गिक जाणिवांचं नवनीत असतं त्याला आपल्या अनुमोदनाची गरज नसते. 

माझी फेरी ही तशी आठवड्याच्या अंतराने, गुंजा-गुंजाने वाढणारं घरटं अनुभवण्याचं भाग्य आमच्या नशिबी कुठलं ??  

मुख्यतः सकाळच्या वेळेत शिंजीराच्या जोडीचं दर्शन होत होतं, इतरवेळी फुलांचा अचूक वेध घेत मधुरस चाखण्यासाठी इकडे-तिकडे उड्या मारत झीट किंवा स्वीई असा आवाज करीत बागडणारा हा पक्षी, विणीत मात्र घरट्याच्या आसपास रेंगाळतो. घरटं पुर्ण झाल्याच्या खुणा दिसत होत्या, अंडी घातली होती की नाही कळायला काही मार्ग नव्हता, पिशवीसारख्या घरट्याच्या खालचा अंधार भाग कायम दृष्टीआड राहतो, आतील विश्वाचा थांगपत्ता लागू देत नाही. 

एका रविवारच्या कलत्या सकाळी दिदू खाली काहीतरी पडलंय असं सांगत आली, जाऊन पाहिलं तर बोटाच्या पेराएवढ्या आकाराच्या दोन अंड्यांचा खाली पडुन झालेला चक्काचूर दृष्टीस पडला, दोरीवरील टॉवेल काढताना, कमी उंचीमुळे तिने तो ओढून काढला व त्यामुळे दोरीला बसलेल्या हिसक्यामुळे घरट्यातून पडून त्या दोन अंड्यांचा चक्काचूर झाला होता. क्षणात माझ्या डोळ्यांपुढे शिंजीराची गेल्या काही दिवसांची अविश्रांत मेहनत उभी राहिली, कण-कण जमवुन उभ्या केलेल्या विश्वाला बसलेला हा जोरदार हादरा ते पचवू शकतील का ? या इवल्याशा निष्पाप पाखराच्या विश्वासाचा नकळत झालेला उपमर्द जास्त दुःख देत होता. 

पाखरं आसपास नाहीत तोवर ते अवशेष उचलून टाकण्याची व्यवस्था करावी लागली, थोड्यावेळाने चिर्रर..स्वीई असा थोडा वेगळा आवज काढीत ती हजर झालीचं, त्यांना हे कळेल-न-कळेल याची कल्पना नव्हती. मादी साधारण दोन किंवा तीन अंडी घालते, एक जरी अंड घरट्यात शिल्लक असेल तरी अजूनही वीण होण्याची आशा होतीचं, पाखरांना 'काउंटिंग' कदाचित येत नसेल पण काळजाच्या तुकड्याचे लचके तुटलेत हे कळायला कुठलं 'गणित' शिकायची गरज पडत नसते व हेचं शिंजीरांच्या देहबोलीतून दिसत होते. तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत कातडीबचाव धोरण स्वीकारणे व बाकी निसर्गाच्या स्वाधीन करणे एवढंच माझ्या हातात होतं. 

शिंजीर आता वीण पुढे सुरू ठेवतील की नाही ?? दोरीवरच्या घरट्याचं प्राक्तन काय ?? बहरेल की ओस पडेल ??  या प्रश्नांची उत्तरं काळचं देऊ शकणार होता. 

कालच्या रविवारी अगदी सकाळी, खिडकीतून घरट्याकडे पाहताना, एक बाकदार नळीचोच घरट्याच्या तोंडाशी दिसली, ग्रीलवर दुसरा शिंजीर ही दृष्टीस पडला, याचा अर्थ घरटं ओस पडलं नव्हतं, एकतर अजून एखादं अंड शिल्लक तरी असावं वा शिंजीरांच्या जोडीने पुन्हा नवी सुरवात करायचं ठरवलं असावं, पहिली शक्यता जास्त !!! 

धक्के पचवण्याची, पुन्हा उभं राहण्याची पाखरांची क्षमता अद्भुत असते. ती सुंदर तर असतातच पण निर्बलही वाटतात, चपळ असली तरी सहज चिरडली जातील अशी वाटतात, एकावेळी स्वयंभू तर दुसऱ्या क्षणी परावलंबी भासतात. ती "दैवी" असतात हे मात्र नक्की !!!

असो, काही असलं तरी शिंजीरांनी घरटं सोडलं नव्हतं 'वीण' आता पुढे जाणार होती... 

                || रुखडा बोले पानसे, सून पत्ते !!! मेरी बात |
              | इस घर की यह रिति,  इक आवत एक जात ||

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 354
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

माझ्या बाल्कनीत शिजींराची एक जोडी नेहमी येते फुलझाडावरील फुलांचा रस पिण्यासाठी. ( Russelia या झाडाला खूप सुंदर लाल फुलांचे झुपके येतात वर्षभर). पण घरटे दुसरीकडे बांधतात. या मार्चमध्ये सुतळीचे तंतू काढून नेत होते. मग खूप सुतळ्या बांधून ठेवल्या. त्या ओढून तंतू नेले.


https://youtu.be/NTr2IXYM-pc?si=xd0kvHUqd0Ez5g2Z

 

पक्षीदर्शन म्हणजे योगायोग, अप्रत्याशित,आश्चर्यकारक  घटना व धक्के. असाच एक दिवस  फिरत असताना शिंजीर  नर व मादी  एकमेकांना साद घालत  होती. अचानक वेगाने  नाहीशी झाली.त्याच वेगाने मी ही नजर फिरवली. बघतो तर एका सुरक्षीत जागी त्यांनी अपला संसार थाटला होता. 

 

पुढचे तीन महिने तासंतास तो बघताना कसे निघून गेले कळालेच नाहीत.  सर्व काही छायाचित्रकात कैद केले. अप्रतिम  अनुभव  होता. छोटी चित्रफित तूनळीवरून वर चोप्यपस्ते केली आहे,कदाचित आवडेल.

 


आपले विवीधविषयावचे लेखन सुंदर असते हे वेगळे सांगावयास नको. 

 

ही चित्रफित मी स्वताच चित्रीत केली आहे आणी सूर्योदय सुद्धा ..... आमच्याच  घरातून दिसणारा सुर्योदय कुठल्याही हिल्स स्टेशनवरच्या कमी नसतो.

जवळपास  दोनशे वेगवेगळे पक्षी बघीतले,छायाचित्रीत केले आहेत.  अप्रतिम अनुभव असतो. 

धन्यवाद, असेच लिहीत रहा. पुलेशु. 


In reply to by कर्नलतपस्वी

अप्रतिम !!!

आवडीचे काम असले तरी यामागील तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटते. 


 

वर कर्नलतपस्वी यांनी दिलेला व्हिडिओ एंबेड करता आला. 🙂


जरा कसे केले ते सांगाल काय?

 

प्रचि संपादन करतानाही इमेज छोटी करता येत नाही.


In reply to by कर्नलतपस्वी

त्यामुळं ऑनलाईन शॉर्ट कट्स शोधतो.

iframely नावाची एक वेबसाईट आहे. तिथे आपली यू ट्यूब लिंक टाकली की रेडिमेड एंबेड कोड मिळतो. तो कॉपी करुन इथे मिपावर टाकला की झालं.


रिसाईझ केले.

 

img src="/sites/default/files/inline-images/40914_7.jpg" data-align="center" data-entity-uuid="db188cdd-61dc-4b6b-bf73-08cd675fbfc0" data-entity-type="file" width="292" height="282"


  • लेखातील प्रत्येक वाक्यासाठी एक प्रचि आहे.तेंव्हा लेख एक चित्र कथा म्हंटले तरी वावगे ठरणार;नाही.   

अगदी,अगदी.....

 

नुकताच पुण्यात अभूतपूर्व वादळी पाऊस झाला. घरा समोरील निलगिरीच्या झाडावर शराटी,कुदळ्या (Red napped ibis) जोडप्याने  घरटे बांधून संसाराला सुरवात  केली होती. त्यांच्या मधुचंद्रा पासून मी लक्ष ठेवून होतो. पुढे एक वंशाचा दिवा पण घरट्यात दाखल झाला. मस्त संसार चालू होता. 

त्या अचानक आलेल्या अभूतपूर्व वादळी पावसात  वंशाचा दिवा विझून गेला. आईवडील तीन चार दिवस  खुपच अस्वस्थ दिसले. दिवस दिवस  विस्कटलेल्या घरट्यात  आपल्या जीवाच्या विसाव्याला शोधत होते.

कदाचित  वस्तुस्थितीचे भान झाले असावे. पक्षांनी घरट्यात  येणे बंद केले. 

 

आता पुन्हा शराटीला डोहाळे लागलेत.....

बघू काय होते ते....

चित्रीकरण चालू आहे.