Skip to main content

बारामती विमान अपघात: वैमानिकाची 'मानवी चूक' की 'तांत्रिक अभाव'?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 30/01/2026 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
बारामती येथे कोसळलेल्या 'व्हीटी-एसएसके' (VT-SSK) या लियरजेट ४५ बिझनेस विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रभर दुःख, आवेग आणि शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दादांविषयी व सहप्रवाशांविषयी हळहळ व्यक्त होत आहे. विमान रनवेवरून घसरले असेल, अपघात होता होता टळला, अशा बातम्यांची अपेक्षा होती; पण हळूहळू वास्तव स्वीकारावे लागले. मन तयार नसले तरी, जे घडू नये ते घडले. आठ आसनी विमानाच्या दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान ही घटना घडली, असे बोलले जात आहे. अपघात कसा घडला असेल याबाबत विविध शक्यता आणि कुशंका व्यक्त होत असताना, प्रथमदर्शनी पायलटचा निर्णय चुकला असे वाटत आहे. मानवी चूक कोणाकडूनही होऊ शकते, हा काही कोणावर 'ब्लेम' करायचा विषय नाही. पण भविष्यात अशा चुका टाळता येऊ शकतात का? या विमान अपघातावेळी नेमकं काय काय घडलं? ब्लॅक बॉक्समधून काही हाती येतं का? तपशील नंतर येतीलच. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी (२८ जानेवारी) एक निवेदन जारी करून, बारामती येथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला आहे. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी ८:४४ वाजता, एटीसीला (ATC) रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) कडे सोपवण्यात आला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे. एटीसीची (ATC) जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे: २८ जानेवारी २०२६ रोजी विमान 'VI-SSK' ने सकाळी ८:१८ वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला. यानंतर विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं. या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की, सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारण ३००० मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर विमानाने 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली; मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी 'गो-अराउंड' केला. गो-अराउंडनंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता, क्रूने पुन्हा 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेत असल्याची माहिती दिली. रनवे दिसल्यास कळवण्यास सांगितले असता, क्रूने "सध्या रनवे दिसत नाही, दिसताच कळवू," असं सांगितलं. काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली. यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, क्रूकडून लँडिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पायलटला रनवे दिसला नाही, हीच अधिक शक्यता वाटत आहे. चुकीच्या ठिकाणी उतरत आहे असे वाटत असताना, विमान तंत्र भाषेत 'स्टॉल' (Stall) होणे, त्यामुळे काही फुटेजमध्ये एक पंखा वर झाल्याचे दिसते; यामुळेच हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिला राऊंड मारून झाल्यानंतर, दुसऱ्या वेळीही तीच परिस्थिती होती असे वाटते. त्यामुळे पुन्हा दुसराही राऊंड घेतला असता आणि 'विमान उतरवणे शक्य नाही', असा स्पष्ट स्टँड पायलटने घेतला असता आणि विमानाने घिरट्या घेऊन अन्य कोणत्या विमानतळावर विमान उतरवले असते, तर ही घटना टळली असती असे वाटून जाते. अर्थात, निर्णय प्रक्रियेत 'जर-तर'ला काही अर्थ नसतो. विमानतळावर आधुनिक तंत्रज्ञान सोयी-सुविधांचा अभाव. पायलटवर विमान उतरवण्याचे एक आंतरिक दडपण आणि अशा असंख्य गोष्टी या घटनेमागे असू शकतील. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. डीजीसीए दुवा

वाचने 8761
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेल्या भीषण अपघातप्रकरणी विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) याबाबतचा प्राथमिक अहवाल आज प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये विमानतळावरील कमी दृश्यमानता आणि सुरक्षिततेतील त्रुटींवर बोट ठेवण्यात आले. वैमानिकाने ऑपरेटर्सचा न ऐकता विमान उतरवण्याबाबतचा निर्णय घेतला अशा निष्कर्षाकड़े हे प्रकरण जायला लागले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुसऱ्या खेपेलाही विमान उतरवताना धावपट्टीच्या रेषेत नव्हतेच. [[ आणि वैमानिकाला ते समोर येणारे झाड दिसल्यावर त्यातून वाचवायला तिरके करण्याचा प्रयत्न वाया गेला असेल, त्या झाडाकडे वेगाने जाणारे विमान पाहून कोपायलट पाठकच्या तोंडून आलेले शब्द मायक्रोफोन चालू असल्याने ग्राउंड ओपरेटरला ऐकू आले असतील ते त्याने इतरांना सांगितले असेल. पण अपघातामुळे नंतर त्याबद्दल बोलण्याचे टाळले असेल. फक्त त्याच्या डिपार्टमेंटच्या चौकशी टेबलावर तो ते सांगू शकतो. "मला धावपट्टी दिसते आहे" हे वैमानिकाने ओपरेटरला सांगतानाच ते ऐकले असेल. अर्थात हा पुरावा किंवा रेकॉर्ड म्हणून घेतही नसतील.]] कंसातील तर्क माझा. झाडाला आपटून विमान पेटले असेल तर त्याच्या( जळलेल्या झाडाच्या) काही पुसट खाणाखुणा कदाचित सापडल्या असतील. आग मोठी होती मान्य पण झाडाचे जमिनीतले मूळ शाबूत असेल.

In reply to by कंजूस

कोपायलट पाठकच्या तोंडून आलेले शब्द मायक्रोफोन चालू असल्याने ग्राउंड ओपरेटरला ऐकू आले असतील ते त्याने इतरांना सांगितले असेल. ह्याचा काही विदा? कारण ही बातमी पेरलेली वाटते आहे. ओह शिट असे को पायलट बोलली असे कुठेही बातमीत वाचले नाही.

विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल दुव्यावर आहे, सविस्तर वाचून कोणीतरी विश्लेषण करावे. -दिलीप बिरुटे ( व्यग्र )

ते अहमदाबाद घटनेचा संपूर्ण रिपोर्ट कधी येणार आहे? असे काय खोदकाम चालले आहे ब्लॅकबॉक्स मध्ये? की आहे तो डेटा लपवत आहेत? भाजप सरकार असल्याने सरकारी संस्थानावर विश्वास राहिलेला नाही, सगळ्या ईडी सारख्याच भाजपसाठी काम करतात असे वाटतेय, निदान इंग्लंडचे नागरिक मेले असल्याने इंग्लंडने तरी लक्ष घालून सत्य बाहेर काढण्यासाठी भारत सरकारवर दबाव टाकायला हवा.

थांबा, रोहीत पवारांचे आणखी बरेच विडिओ येणार आहेत. आज एक नवीन आला. विमान झाडावर आपटलं नाहीच. पेट्रोलच्या कॅन नव्हताच.

सर्व रीपोर्ट काळजीपूर्वक वाचला. हा अहवाल निव्वळ म्हणजे बनवाबनवीच आहे. कोणी तरी कोणाला तरी वाचवत आहे, इतकं नक्की. आता ते काय त्याची चौकशी झाली पाहिजे. तपशीलवार नंतर सर्व क्रमवार टाकतो. सध्या सर्वात महत्वाचा भाग. ढिगारा आणि आघाताची माहिती (Wreckage and Impact Information)
बारामती टॉवरकडून लँडिंग क्लिअरन्स मिळविल्यानंतर विमान धावपट्टी 11 वर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. तथापि, विमान धावपट्टी 11 च्या थ्रेशोल्डच्या समांतर डाव्या बाजूला क्रॅश लँड झाले. जवळच्या गावात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असे दिसून येते की, जमिनीवर आदळण्यापूर्वी विमानाने उजवीकडे कल (banked right) घेतला होता. धावपट्टीच्या पृष्ठभागापेक्षा कमी उंचीवर असलेल्या जमिनीवर आदळण्यापूर्वी विमानाने प्रथम झाडांना धडक दिली. विमानाचा जमिनीवरील आघात (ground impact) धावपट्टी 11 च्या कडेपासून डावीकडे सुमारे 50 मीटरच्या पार्श्व अंतरावर होता. अपघातादरम्यान विमानाला आग लागली ज्यामध्ये संपूर्ण कॉकपिट आणि केबिनचा भाग जळून खाक झाला. या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले. अपघात स्थळावरील ढिगाऱ्याच्या वितरणाचा चार्ट खालील आकृती 4 मध्ये दिला आहे.
( अहवालातून ) आपण सर्वांनी पाहिलं आहे की, विमान डाव्या बाजूला कलले आहे, उजव्या नव्हे. आणि ते कुठंही झाडाला धडकलेले दिसत नाही. सरळ सरळ जमीनीवर आपटले आहे. दुसरी गोष्ट ब्लॅक बॉक्स यंव जळाला आणि त्यंव जळाला. एकून दिलेल्या माहितीवरुन सर्व संवाद त्यातून उलगडला आहे, तरीही ब्लॅक बॉक्समधे आता कोणता संवाद राहिला आहे, जो कंपनीला पाठवून त्याचा पूर्ण उलगडा होणार आहे ? विमान नक्की कोण उडवत होतं ? दया कुछ तो गडबड है. अहवालाचा सविस्तर एकेक मुद्दा पुढील प्रतिसादात घेऊच.......! -दिलीप बिरुटे

प्राथमिक अहवालानंतर आमदार रोहित पवार यांची तपशीलवार माहिती व्हीडीयो. ( तुनळीवरुन साभार ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोहित पवारांचे प्रश्न अगदी रास्त आहेत! काहीतरी लपवाछपवी/ बनवाबनवी चालू आहे हे दिसतय, अजित दादांचा घातपातच झाला असावा असे वाटते!

runway पहिला गो अराउंड कन्फूज असल्यामुळे रनवेवर उतरु शकला नाही, दुस-या वेळी डावं-उजवं करीत होते रनवे दुस-यावेळीही दिसला नाही. विमान इतक्या खाली आलं की त्याला पुन्हा वर घेण्याच्या काही स्कोप नव्हता. आपण कुठं जायचं असलं की मॅप सेट करतो आणि त्या मार्गाने आपण चालतो. विमानातही अशीच सीस्टीम असते त्या अँगलने विमान उतरते. इथे ही सेटींगही चुकलेली. पायलटला तर अंदाजच आला नाही, अति आत्मविश्वासामुळे चूक होत गेली. विमान चालवणा-या पायलटचा अभ्यास झालेला होता तो पायलट आला नाही, ऐन वेळी दुसरा पायलट बीना प्लॅनचा अनुभवाच्या जोरावर आला. दृश्यमानता कमी होती. अजिबात रनवे दिसला नाही, विमान उतरवण्याची गरज नव्हती. विमान कंपनी हे अगोदर सर्व तपासून घेते मार्ग, दृश्यमानता आणि तरच विमानाला परवानगी देते. सगळा भोंगळ कारभार या अपघातामागे स्पष्ट दिसतो. -दिलीप बिरुटे

बदललेला पायलटही अगदी पहिलटकरीण नव्हताच. खूप तासांचे उड्डाण केलेला. विमान कंपनी आणखी काय करणार? सर्वांचेच कमनशीब. रोहीतचे अपघात विश्लेषण.... #पायलटनेच घातपात करवला.. #कुणीतरी हा अपघात घडवण्यासाठी याच पायलटला पाठवले... #विमान कंपनीचे विमानाच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही.... आता रोहीत पवार गेले दिल्लीला जो कोणी हा प्रश्न राज्यसभेत विचारेल असं वाटतंय त्यांना भेटतोय. हा महिना गाठीभेटींचा आहे.( या अगोदर सुप्रिया सुळे विविध नेत्यांना भेटून आल्या. आदरणीय शरद पवारांना पसंतीची मतं द्या विनंती करायला.)

In reply to by कंजूस

१. बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर अत्याधुनिक 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम' (ILS) चा अभाव असू शकतो, ज्यामुळे लँडिंग अधिक आव्हानात्मक बनते. 'अप्रोच चार्ट' (Approach Chart) प्रमाणे ठरवून दिलेल्या मार्गावरून आणि योग्य कोनातून (Glide Slope) न येता, विमानाने चुकीचा मार्ग पकडला. चुकीच्या अँगलने आणि चुकीच्या मार्गाने खाली आल्यामुळे ऐन वेळी विमान नियंत्रित करणे वैमानिकांना शक्य झाले नाही. २. खराब हवामान ही एक 'परिस्थिती' आहे, ते अपघाताचे 'मुख्य कारण' असू शकत नाही. अपघाताचे खरे कारण 'खराब हवामान असतानाही लँडिंग करण्याचा वैमानिकांचा निर्णय' हे आहे. मात्र, अहवालात हवामानावर जास्त भर देऊन, वैमानिकांचा चुकीचा निर्णय आणि कंपनीच्या 'गो-अराउंड' नंतरच्या SOP (Standard Operating Procedure) उल्लंघनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले. ३. चुकीची रनवे दिशा : लँडिंगच्या वेळी विमानाची दिशा आणि रनवेची दिशा तंतोतंत जुळणे आवश्यक असते. 'नेव्हिगेशन सिस्टीम'मध्ये चुकीची दिशा सेट केल्यामुळे विमान रनवेच्या मध्यभागी न येता बाजूला भरकटले ते कसे ? ४. विमान उतरवताना जेव्हा खराब हवामानामुळे धावपट्टी दिसत नाही, तेव्हा विमान पुन्हा हवेत झेपवण्याच्या प्रक्रियेला 'गो-अराउंड' किंवा 'मिस्ड अप्रोच' (Missed Approach) म्हणतात. पहिल्या प्रयत्नात वैमानिकांना रनवे दिसला नाही म्हणून त्यांनी योग्यरित्या गो-अराउंड केले. मात्र, सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक दुसऱ्या प्रयत्नात झाली. हवामान आणि दृश्यमानता सुधारलेली नसतानाही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान जवळच्या मोठ्या विमानतळावर (उदा. पुणे किंवा मुंबई) वळवण्याऐवजी, त्याच खराब हवामानात पुन्हा लँडिंगचा अट्टाहास करणे हे उड्डाण नियमांचे (SOPs) घोर उल्लंघन होते. ५. कंपनीने अपघातग्रस्त विमानाचे इंजिन प्रत्यक्षात ८,००० तासांहून अधिक काळ वापरले होते. मात्र, कागदोपत्री त्याची नोंद अशी केली गेली की इंजिनची क्षमता अजून ३,००० तास बाकी आहे. सुटे भाग आणि इंजिनची सुरक्षितता मर्यादा संपलेली असतानाही केवळ पैशांच्या बचतीसाठी विमानाचा वापर सुरूच ठेवण्यात आला. ६. अपघाताच्या दिवशी बारामती विमानतळावरील दृश्यमानता (Visibility) ५ किलोमीटर या किमान मानकापेक्षा खूप कमी होती. असे असतानाही कंपनीच्या वैमानिकांनी विमानाला लँडिंगचा प्रयत्न का करू दिला आणि विमान सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुणे किंवा मुंबईला का वळवले नाही, ही अत्यंत मोठी चूक मानली जात आहे. तसेच, मुंबई-बारामती या छोट्या प्रवासासाठी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन (अतिरिक्त इंधन टाक्या) भरलेले होते. ७. विमानाचा 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर' (CVR) आणि 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' (FDR) म्हणजेच ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात या ब्लॅक बॉक्सच्या फोटोंवर उष्णतेमुळे किंवा आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या (Thermal damage) कोणत्याही खुणा नाहीत. याचा अर्थ महत्त्वाची तांत्रिक माहिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याचा मोठा संशय आहे. ८. AAIB च्या प्राथमिक अहवालात विमानाने 'उजवीकडे' (Right) कल घेतल्याचे नमूद केले आहे. मात्र, रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून हे सिद्ध केले की, विमानाने स्पष्टपणे 'डावीकडे' (Left) कल घेतला होता. तपासातील ही अत्यंत प्राथमिक आणि मोठी चूक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ९. कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी या प्रकरणाची माहिती गोळा करणाऱ्या टीमला धमकावले आणि आपले वरपर्यंत राजकीय संबंध असल्याचे सांगून तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. या सर्व बाबींवरून हे स्पष्ट होते की व्हीएसआर कंपनीने केवळ या एका दुर्घटनेत नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीतच प्रवाशांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून अत्यंत बेजबाबदार आणि बेपर्वा वर्तन केले आहे. बाकी, राज्यसभेच्या निवडणूकीतील उमेदवाराच्या बाबतीत ती महाराष्ट्रात बिनविरोध होत आहे, बाकी, राजकारण्यांचा जो फायदा असेल तो असेल होईल न होईल पण एका महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या प्रवासात इतकी हलगर्जी कशी होऊ शकते. हा विमान कंपनीचा बेजवाबदारपणा आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्लॅक बॉक्समधून मिळालेली संभाषणाची माहिती इतकी चक्रावून टाकणारी आणि काहींना/ कुणाला गुंतवणारी असेल की ती न सांगितलेलीच बरी असाही प्रकार असेल. त्यामुळे तो ओडिओ रेकॉर्डच खराब झाला हे सांगणंच योग्य वाटत असेल. झालं गेलं संपलं असा प्रकार आणि गप्प बसणे.

कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी या प्रकरणाची माहिती गोळा करणाऱ्या टीमला धमकावले ह्याचा अर्थ सक्रुत दर्शनी विमान कम्पनी ची चुक आहे कारण राजकिय घातपात असता तर त्यानी सरंळ आपल्या मालकाला निस्तरायला लावला असता