Skip to main content

दरम्यान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 24/02/2026 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो. हे सभोवतालचं माळरान रात्री किती अजस्त्र भासतंय. आदिम जगातल्या मानवांनी हे कितीतरी वेळा अनुभवलं असेल. रात्री गर्द झाडीखालून जाण्याएवढी दुसरी कुठली भिती नसेल. उठून बसावं, की तसंच झोपावं काही ठरवता येत नव्हतं. अशी मध्येच झोपमोड झाल्यावर सगळंच कसं भकास वाटू लागतं. अशी अपरात्री जाग यायलाच नको. हे आख्खं विश्व कुतुहलाने आपल्याकडे बघतंय. त्याची माझी नजरानजर होते. मी अगदीच केविलवाणा झालोय. आता ही रात्र सरणार कधी? की अशीच राहणार कायमची? म्हणजे आता कधी उजाडणारचं नाही? आणि का म्हणून उजाडेल? कुठेतरी काहितरी फॉल्ट झाला असावा नक्कीच. ते आपल्या हातात थोडीच आहे. एक दिर्घ श्वास घेऊन मी डोळे गच्च मिटून घेतो. ब्रम्हांड गरजतंय. खरंच? अब्जावधी स्फोटांचा गुरगुणारा आवाज. अवकाशाच्या पोकळीत धडका मारतोय. त्याचे प्रतिध्वनी विरघळत जातात. मी कान देऊन ऐकतो. शांततेशिवाय दुसरं काही मला सापडतच नाही. इतकी घनदाट शांतता बधीर करून सोडते. मी सताड डोळे उघडे ठेवून पुन्हा चंद्राकडे बघतो. चंद्र आता अवकाशात अक्षरशः तरंगतोय. बोचरी थंडी सुरू झाली आणि मी चादर चांगलीच वर ओढून घेतली. डोळे बंद केले तरी मन भटकत राहिले. मेंदूतले अवकाश कितीतरी खोल. कृष्णविवरासारखे प्रचंड खोल. अशी कितीतरी ब्रम्हांडे त्यात गटांगळ्या खात निघून जातील. त्याचा तळ गाठणे आता अगदीच अशक्य. सकाळी जाग आली तेव्हा डोकं जड वाटत होतं. चालायचंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 934
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सकाळी जाग आली तेव्हा डोकं जड वाटत होतं. चालायचंच.
अ‍ॅस्पिरीन घ्या . भरपूर पाणी प्या. हँगओव्हर उतरवायला या सारखे उत्तम औषध नाही.

चित्रदर्शी वर्णन. मला देखील कधी कधी अगदी असेच वाटते. >> शांततेशिवाय दुसरं काही मला सापडतच नाही. इतकी घनदाट शांतता बधीर करून सोडते. अगदी असेच होते. परंतु मला त्याबद्दल वैज्ञानिक कुतूहल देखील वाटते. यावरून मला खरेतर डीप स्पेस किती भयंकर असू शकतो मानवी मनांसाठी असा नेहमी प्रश्न पडतो. तुम्हाला एक सुचवतो. तुमच्या लेखातली फीलिंग पकडून ठेवा. काही दिवस अशीच. आणि कृपया three body problem या मालिकेतली तीनही पुस्तकं वाचा. नाही वाचलीत तरी किमान त्यांची ऑडिओ बूक ऐका. किंवा विस्तृत जिस्ट तरी ऐका. विशेषतः तिसरे पुस्तक. ही पुस्तके चढत्या क्रमाने नशीली आहेत. यानंतर काही दिवस तुम्हला खरोखर झपाटल्य सारखे होउन जाइल. कदाचित प्रचंड भीती देखील वाटेल पण एकदा त्या कल्पनेला थोडासा वेळ देऊन पाहा. कोणती कल्पना तर डार्क फॉरेस्टची. एकूण मला तुमचे लेखन आवडले, आवर्जून लिहित जा. असा स्वर या फोरमवर सापडणे दुर्मिळ आहे. मी वाचेन.

मजा आली कथा वाचताना. पण शेवटच्या वाक्याने फिलॉसॉफितुन कथा एक्दम जमिनीवर आली. ९० चा ईफेक्ट, दुसरे काय?