खाडीवरचे दिवस!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
21 Feb 2026 - 2:33 pm

कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या.

मी गोष्ट सांगतोय साधारण ९० ते २००० या काळातील. कल्याणात जरी इमारती बांधायचे पेव फुटले होते तरी अजूनही कुठेकुठे कौलारू घरे होती. रस्त्यावर रिक्षांबरोबर टांगेही चालत होते. पारनाका ,दूधनाका, बाजारपेठ टिळक चौक, अहिल्याबाई चौक इतक्या भागात चालत फिरता येत होते आणि दैनंदिन गरजा भागत होत्या. पण कल्याणात फिरायला जाण्यासारखी ठिकाणे दोनच. खाडी किंवा रेतीबंदर आणि सुभाष मैदान. आता खाडी म्हणजे कल्याणची उल्हास नदी. पण नकळत्या वयापासून तिला कोणी कधी नदी म्हटल्याचे आठवत नाही.

तर लहानपणापासून अधेमधे माझ्या डोक्यात पोहायला शिकायचे खूळ यायचे. साधारण शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या की हे खूळ यायचे आणि पावसाळा नी शाळा सुरु झाली की संपायचे. कल्याणात तेव्हा स्विमिंग पूल नव्हताच. आताही आहे की नाही माहित नाही. त्यामुळे पोहायला जायचे तर उल्हासनगरच्या स्विमिंग पूल किंवा डोंबिवली जिमखान्याचा पूल गाठावा लागे. दोन्हीकडे सायकलने जायचे आणि तेही पोहून आल्यावर येताना सायकल होण्याची म्हणजे फारच कष्टाचे काम. त्यात सायकल नसलेला एखादा मित्र असेल तर त्याला डबलसीट न्यायची हजामत करावी लागे ती वेगळीच. शिवाय तिथे तिकिटाला पैसे पडायचे आणि स्विमिंग कॉस्च्युम नावाचा प्रकार घालायला लागायचा. बाकी स्विमिंग गियर तर माहीत सुद्धा नव्हते. येताना भयानक भूक लागायची त्यामुळे खाण्यापिण्यासाठी पैसे ठेवावे लागत ते वेगळेच.

आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर सांगतो की हे सगळे उपद्व्याप करायचे कारण खाडी जवळ असूनही तिथे पोहायला भीती वाटायची. एकतर खाडीचे पाणी कितपत स्वच्छ आणि खोल आहे माहित नाही , त्यात खाडी म्हणजे भरती ओहोटी वगैरे येणार . त्यात दरवर्षी खाडी एक बळी घेते वगैरे वदंता. कारणे अनेक. पण बारावीची परीक्षा झाल्यावर मात्र मी पोहायला शिकायचा चंगच बांधला. सुदैवाने आमच्या बिल्डिंगमधला एक जण खाडीवर नियमित पोहायला जायचा. त्याच्याबरोबर बोलून भीती कमी झाली. शिवाय "अरे घाबरू नकोस, मी तुला शिकवीन. आणि तसेही तू रोज आलास की आपोआपच शिकशील" असा दिलासाही मिळाला. अशा तऱ्हेने माझा पोहण्याचा श्री गणेशा तर झाला.

पहिल्या दिवशी त्याच्याबरोबर खाडीवर गेलो आणि वाळूच्या ढिगावर बसून खाडीकडे नीट बघितले. म्हणजे त्या आधी शेकडो वेळा बघितले असेन पण आजपासून मला त्या पाण्याशी दोस्ती करायची होती. मला बसलेले बघून सगळे म्हणायला लागले "आला आला अप्रेन्टिस आला." ही खास खाडीवरची टर्मिनॉलॉजी होती.अप्रेन्टिस म्हणजे नवशिका माणूस ज्याला पाण्यात उतरल्या उतरल्या अनुभवी मंडळी डुबक्या द्यायला सरसावत. ५-१० वेळा डुबक्या खाल्ल्या आणि नाकातोंडात पाणी गेले की पाण्याची भीती जाते असे तिकडचे लॉजिक होते. नैसर्गिक साबण म्हणजे खाडीकाठचा गाळ, ब्रिज म्हणजे रिचर्डसन क्रुडास कंपनीने कल्याण ते कोन बांधलेला लोखंडी पूल, जठार म्हणजे पुलाच्या दुसर्या टोकाला दिसणारे बेट, वायर म्हणजे वरून जाणार्या हाय टेन्शन टाटा कंपनीच्या तारा , क्रॉस मारणे म्हणजे पलीकडल्या काठाला जाणे, भरती ओहोटीच्या वेळा , पूर्ण भरती कधी असते, ड्रेजर (वाळू काढणारे) पासून लांब राहायचे अशा एक ना अनेक गोष्टी माहित करून घेणे त्याचबरोबर कोण विश्वासू आहे, कोण विश्वास घातकी आहे , कोणाबरोबर खाडी क्रॉस करायला जायचे किंवा नाही, आज फ्लो कुठला आहे अशा अनेक माहितीचा खजिना हळूहळू जमा होऊ लागला.

पहिल्याच आठवड्यात माझ्यासारखीच शिकाऊ मंडळी भेटत गेली आणि आमचाही एक ग्रुप तयार झाला . त्यामुळे मला घेऊन येणार्यालाही मोकळीक मिळाली. तो बिन्धास मला किनाऱ्यावर सोडून हात पाय मार किंवा तसलेच कायतरी सांगून क्रॉसिंगला जाऊ लागला. आता या शिकाऊ मंडळींची मजल फारतर ८-१० फूट खोल आणि काठापासून तितकेच लांब इथवरच असे. जे काय हात पाय मारायचे ते इथेच. पण त्याच भागांत होड्या नांगरून ठेवलेल्या असत. त्यामुळे पोहून दमलो कि एखाद्या होडी वर जाऊन गप्पा हाणत बसणे किंवा होडीवरून पाण्यात उड्या मारणे असे उद्योग चालत. मग एक्सपर्ट लोक परत येताना दिसले की ओरडत " गाढवानो तिकडे काय बसलात , पाण्यात उतरा" , की गप्पांचा अड्डा बंद करून मंडळी धडाधड पाण्यात उड्या मारत.

खाडीवर बरीच तऱ्हेवाईक मंडळी येत. काही जण चार-साडेचार पासून येऊन बसत आणि २-३ लोक आले की क्रॉसिंगला जात. माझा ट्रेकिंग मधला गुरु संज्या पावणेसातला येत असे आणि काठावर कपडे बदलणाऱ्या लोकांना "थांबा क्रॉस करून आलोच " असे सांगून पंधरा मिनिटात क्रॉस करून म्हणजे पलीकडल्या काठाला हात लावून येत असे. गण्या मदन नावाचा एकजण आपली एकदम अजब सायकल घेऊन येत असे. त्याच्या चड्ड्या ड्रेजरवर वाळत घातलेल्या असत आणि टॉवेल तर तो नेहमी लोकांचाच वापरत असे. एकदा त्याने भरती असताना सायकल सकट जेट्टीवरून खाडीत उडी मारलेली. आणि खाडीकाठचा गाळ तो साबण म्हणून अंगाला फासत असे. तो बोटींच्या सुकाणूवर लगडलेले खेकडे कच्चे खातही असे. पोहायला आलेले अप्रेन्टिस शिकवणार्यांना शिव्या देताना ऐकायला यायचे. म्हणजे काय की कोणाच्या तरी सल्ल्याने ते कोणाचा तरी हात धरून पोहायला शिकायला आलेले असत. पण प्रत्यक्ष पाण्यात उतरल्यावर त्यांची फाटत असे. मग पहिले विनवणी करून ,मग मारामारी करून आणि तेही जमत नाहीसे दिसले की बावन्न पिढ्यांचा उद्धार करून ते सुटायला बघत. पण शिकवणाराही काही कमी नसे. तो वाटेल ते करून याला पोहायला शिकविनाच असा पण करून आलेला असे त्यामुळे त्या शिव्या त्याच्या कानावर पडत नसत. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये याचे उत्तम उदाहरण.जुन्या पिढीतले आता पोहण्यापासून सन्यास घेतलेले लोक काठावर वाळूच्या ढिगावर बसून पाहत. एकूण ते एक वेगळेच जग होते.

आता मला साधारण महिना होत आला होता आणि बऱ्यापैकी पोहायला येऊ लागले होते. चार वाजले की उन्हाचा तडाखा कमी व्हायचा आणि खाडीवर जायचे वेध लागायचे. असाच एक दिवस एकटाच खाडीवर गेलो होतो.पोहायला उतरलो असताना ब्रिजकडचा फ्लो होता. आज मुले कमी होती त्यात एक थोड्या ओळखीच्या माणसाने मला विचारले "चल ब्रिजकडे येतो का?" एकतर मीही तिकडे कधी गेलो नव्हतो. सोबत मिळतेय म्हटल्यावर मी तयार झालो. पाण्याचा फ्लो अनायासे त्या बाजूकडे असल्याने फार मेहनत ना करता पोचलोही. ह्या पुलाला ९ खांबांच्या जोड्या आहेत, त्यापैकी मधल्याच एका खांबाला भेटायचे ठरले होते. तसे आम्ही भेटलोही. खांबाला जोडणाऱ्या पटरी वर बसून जरा दम खाल्ला. तोवर भरती सुरु झाल्याने प्रवाह बदलला आणि जठार कडचा फ्लो सुरु झाला. आता पुन्हा पाण्याच्या प्रवाहानुसार हातपाय मारायचे आणि रेतीबंदराला परतायचे असे ठरवून आम्ही पाण्यात उड्या मारल्या. आणि काही वेळ पोहल्यानंतर माझ्या पायात उजव्या पायाच्या बोटात वाम आला. म्हणजे पायाचे बोट एकावर एक चढले आणि तो पाय चालायचा बंद झाला. पोहताना पायात किंवा पोटरीत वाम येणे म्हणजे संकटच . होडीचे एक वल्हे बंद पडले की होडी कशी भरकटेल तशी अवस्था. मी त्याला ओरडून माझी अवस्था सांगितली. आता नियमानुसार त्याने मला जरा मदत करून काठापर्यंत न्यायला हवे होते. पण या माणसाला स्वतः वर तेव्हढा कॉन्फिडन्स नव्हता. त्याने नुसतेच बडबड करून "अरे काही होत नाही, चल तू आपण पोहचू" वगैरे पोकळ धीर द्यायला सुरुवात केली. यथावकाश मी त्याला उत्तर देणे बंद केले आणि कमीत कमी श्रमात किनार्याकडे कसे जाता येईल यावर प्रयत्न करायला लागलो. पण पाण्याचा जोर वाढत होता आणि मी किनाऱ्यापासून नक्की किती दूर आहे ते नक्की समजत नव्हते. कारण पाण्यात असताना दिसणारी अंतरे फसवी असू शकतात.पायही ठीक होत नव्हता त्यामुळे हातावर फार जोर येत होता. संकटात भर म्हणजे आता सूर्यही मावळू लागला होता. वाहता वाहता मी इतका दमलो की प्रयत्न करायचे सोडून मी पाठीवर आडवा पडलो आणि फक्त फ्लोटिंग करायचे ठरवले. खाडीवर पोहताना एका बाजूला ब्रिज आणि दुसर्या बाजूला टाटा पॉवरच्या विजेच्या तारा ही आमची हद्द होती. पण लवकरच मी त्या तारांच्या खाली पोचलो आणि माझे धाबे दणाणले. आता काही करून मला तारांच्या पलीकडे जायचे नव्हते. त्यासाठी मी जीवापाड प्रयत्न करू लागलो. हाक वगैरे मारायची ताकद कधीच गेली होती. असा किती वेळ गेला माहित नाही. पण कोणतरी जलद पोहत माझ्याकडे येताना दिसला. तो विवेक होता. आज कसा काय माहित पण तो उशिरा पोहायला उतरला होता. माझ्याबरोंबर पोहणारा किनाऱ्यावर पोचला होता आणि किनाऱ्यावरच त्याने मी आत राहिल्याची बातमी पोचवली होती. त्यामुळे विवेक सरळ माझयाकडे आला होता. "काय रे? दमला का?" असे विवेकने विचारल्यावर मी फक्त मान हलवू शकलो. विवेकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो बेडकासारखा पायाने पोहायचा त्यामुळे त्याचे हात मोकळे राहायचे. त्याने मला त्याच्या खांद्यावर धरायला सांगितले आणि झपझप पाय मारत पाचेक मिनिटात मला काठावर घेऊन आला. अंधार पडला होता आणि साडेसात वाजून गेले होते. पण पोहायला आलेले सगळे तिकडेच थांबून वाट बघत होते. मी किनाऱ्यावर पोचल्यावर सगळ्यांनी घेराव घालून माझी तब्येत कशी आहे, नक्की काय झाले होते वगैरे प्रश्नांचा भडीमार सुरु केला. मी एकदम हिरो झालो होतो. पण त्याच बरोबर अनोळखी आणि शिकाऊ माणसावर विश्वास टाकून मी कसा काय आत गेलो यावरून शिव्याही पडत होत्या. असो. शेवट गोड झाला. नाहीतर खाडीचा यावर्षीचा बळी माझा होता बहुतेक.

पण यानंतर कसे कोण जाणे , माझा शिरकाव एक्सपर्ट लोकात झाला आणि क्रॉसिंगला जाताना ते मला घेऊन जाऊ लागले. आता भरती असेल तर खाडी रुंदावयाची आणि ओहोटीला आक्रसायची. त्यामुळे ओहोटीला क्रॉसिंग करणे सोपे असायचे. पण भरतीला पाचव्याचा सहाव्या खांबपर्यंत गेलो की मस्त उबदार पाणी असायचे त्यामुळे मजा यायची. शिवाय पलीकडल्या काठाला गाळ लागायचा नाही कारण पाणी वर चढलेले असायचे. वर सांगितल्याप्रमाणे ब्रिज ९ खांबांचा होता त्यामुळे किती अंतर कापले हे किती खांब पार झाले यावर ठरायचे.

आता अजून एक कार्यक्रम बाकी होता. बरेच वेळा ब्रिजकडे फ्लो असताना आम्ही पोहत जायचो आणि ब्रिजच्या पटरीवरून वर चढत ब्रिजवर जायचो आणि दुर्गाडी किल्ल्याच्या मागून चालत रेतीबंदराला यायचो. याला फॅशन शो असे नाव होते कारण सगळे उघडे असत. आणि लोक टकमक बघत. पण कधी ब्रिजवरून खाली उडी मारली नव्हती. जाताजाता अभिमानाने सांगायला हरकत नाही की माझे वडील आणि काका अशा उड्या मारायचे. तसे तर ते खाडीकाठी चरायला सोडलेले घोडेही चालवायचे. पण ते असोच. तर हे काम राहिले होते. तेव्हा एकदा आम्ही ४ जण ब्रिजकडे गेलो आणि पटरीवरून वर चढलो. आज उडी मारायचीच असे ठरवूनच आम्ही निघालो होतो. आणि वर जय पर्यंत त्यावर एकमत होते. पण वर गेलो आणि एकेकाची फाटायला लागली. वरून दिसणारी उंची, खाली जोरात वाहणारे पाणी, आणि थंड वारा यामुळे पोटात खडडा पडला होता. तिथे खाडी किती खोल आहे कोणालाच माहित नव्हते. गप्पा ठोकत सगळे धिटाईचा आव तर आणत होते, पण आतून बुडबुडे येत होते. अगदीच काही जमले नाही तर फॅशन शो करत चालत जायचा पर्याय होताच. पण त्यामुळे रेतीबंदरावर आमची नाचक्की झाली असती. पाचेक मिनिटे गेली असतील. तितक्यात माझा गुरु संज्या पोहत येताना दिसला. पोहतानाच तो आमच्याकडे बघून तोंड भरून हसला. पटपट चढून वर आला आणि आमच्या चेहऱ्याकडे बघून त्याला काय तो अंदाज आलाच. पहिलेच वाक्य "अरे काय बायल्या सारखे बसून राहिलात , हाणा उड्या तेंचायला " आम्ही. " अरे xxx तुझ्या xx मध्ये दम आहे, पण आमचे काय?" संज्या "अरे काय होत नाही, मी पहिले उडी मारतो आणि थांबतो तुला घ्यायला, मग तर झाले?" आता तत्वाचा प्रश्न होता. मागे फिरलो तर प्रोटेक्शन असताना शेपूट घातली असा डंका वाजणार. पुढे गेलो तर मरण आहेच. काय करावे सुचेना. पण फार वेळ न घालवता मी होकार दिला. मी उडी मारणार म्हटल्यावर अजून एक तयार झाला. उरलेल्या दोघांची मात्र मनाची तयारी होईना त्यामुळे त्यांनी फॅशन शो करायचे ठरवले. संजयने फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत बरेच काही होते. "माझ्यामागे उडी मारली नाहीस तर......" अशी धमकीही होती. आणि तो ती खरी करणार यात वादच नव्हता. मला अजूनही आठवतेय त्याने हात घट्ट दोन्ही बाजूने मांडीवर धरले धाडदिशी उडी मारली. त्याच्या पॅंटमधे वारा घुसून फरफर आवाज होताना मला ऐकायला येत होता. तो अर्ध्यात पोचला असेल नसेल आणि मी एक पाय पुढे टाकला. पुढे काय झाले मला नक्की आठवर नाही. पण माझे सगळे पोटातले अवयव घशात आले होते बहुतेक. आणि दोन सेकंदातच माझ्या नाकातोंडात खारे पाणी शिरले आणि सगळीकडे पाण्याचा हिरवा रंग दिसू लागला. अखेर मी ब्रिजवरून उडी मारली होती. झपाझप हात मारून मी पाण्यावर डोके काढले आणि वर बघितले तो माझा दुसरा साथीदार वटवाघळासारखा पंख पसरून हवेत होता. मी बाजूला झालो नसतो तर तो थेट माझ्या डोक्यावरच आदळला असता. त्यामुळे मी पाण्यात बुडी मारून बाजूला झालो आणि धपकन चहूबाजूला पाणी उसळले. काही सेकंदांनी तोही वर आला. आम्ही एक मोठी बाजी मारली होती. यथावकाश किनाऱ्याला पोचलो आणि तिकडे आमच्या मित्रांनी आमचा सत्कार करायचेच बाकी ठेवले. खाडीवरच्या दोन महत्वाच्या क्रायटेरिया मध्ये आता आम्ही बसत होतो, क्रॉसिंग कारणे आणि ब्रिजवरून उडी मारणे. "डर के आगे जीत है " हा डॉयलॉग तेव्हा माहित नव्हता. पण तशीच काहीशी भावना मनात घेऊन तरंगतच घरी आलो. अर्थात घरी हे सगळे ऐकल्यावर शिव्या पडल्याच पण त्याची सवयच असल्याने काही वाटले नाही.

यथावकाश बुद्ध पौर्णिमा आली आणि खाडीवरचे पोहणारे लोक जरा कमी कमी होत गेले . एक तर तेव्हा भरती फार असते. दुसरे म्हणजे हळू हळू कोणाकोणाचे क्लासेस वगैरे चालू झाले. आणि काही दिवसातच डोंगरात कुठेतरी पाऊस झाला आणि खाडीला लाल लाल मातकट पाणी येऊ लागले. त्या पाण्यात वाहणारी लाकडे, क्वचित प्राणी वगैरे दिसू लागले आणि त्या वर्षी पोहणे बंद झाले. आणि मनाच्या कुपीत त्या सगळ्या स्मृती बंद करून मी ही पुढच्या शैक्षणिक वर्षीच्या तयारीला लागलो.(समाप्त)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

Bhakti's picture

21 Feb 2026 - 4:11 pm | Bhakti

"डर के आगे जीत है "

कांदा लिंबू's picture

21 Feb 2026 - 4:22 pm | कांदा लिंबू

व्वा! काय मस्त लिहिलंय! अगदी चित्रदर्शी! त्या नदीच्या प्रवाहासारखेच सतत वाहते निवेदन!

अजून अश्याच आठवणी येऊ द्या.

- (पोहता न येणारा) कांदा लिंबू

केदार भिडे's picture

21 Feb 2026 - 7:49 pm | केदार भिडे

जबरदस्त

गामा पैलवान's picture

22 Feb 2026 - 1:00 am | गामा पैलवान

राजेंद्र मेहेंदळे,

मस्तं आठवणी आहेत. मुंबईच्या आसपास केवळ कल्याण, डोंबिवली व मुंबरा इथेच उघड्यावर पोहलं जातं. इतरत्र ऐकलं नाही. उघड्यावर नैसर्गिक वातावरणांत पोहोण्यात जी मजा आहे ती बंदिस्त तरणतलावांत नाही. केवळ पायाने पोहणाऱ्या विवेकास दंडवत.

मला उंचावरून पाण्यांत उडी वा सूर मारणाऱ्यांबद्दल अतीव आदर आहे. मला व्यवस्थित पोहता येतं, पण मी कधीच सूरबिर मारू शकलो नाही. चष्म्याचा नंबर प्रचंड असल्याने चष्मा काढल्यावर सगळं धूसर दिसतं. मग ओळखीची जागाही अनोळखी होते. आणि चष्मा लावून पोहणे अशक्य. डोळ्यांवरनं पडला तर गेलाच. जी जागा नीट दिसंत नाही तिथे उडी आजीबात मारायची नाही हा स्वत:वर घालून घेतलेला नियम. त्यामुळे मी नेहमी पाण्यात सावकाश उतरणे अनिवार्य. यावरून माझी काही लोकांनी टिंगलही केली आहे. पण सुरक्षा प्रथम हे ब्रीद असल्याने उड्याबिड्या रद्द.

अवांतर :
या लेखाची आठवण झाली : https://www.maayboli.com/node/42452

आ.न.,
-गा.पै.

रामचंद्र's picture

22 Feb 2026 - 1:42 am | रामचंद्र

जबरदस्त!
मस्तच, आणि एका अर्थाने हे म्हणजे तिथल्या स्थानिक इतिहासाचं काही प्रमाणात दस्तऐवजीकरण.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2026 - 3:55 am | अमरेंद्र बाहुबली

खूप छान लिहिलेय! आवडले!

सोत्रि's picture

22 Feb 2026 - 7:46 am | सोत्रि

एक नंबर!!

माझ्या लहानपणी गावाकडे, घाटावर, विहीरीत पोहायला शिकावं लागायचं. मुलगा ४-५ वर्षांचा झाला की वडीलच मुलाला विहीरीत ढकलून द्यायचे आणि मुलाला पोहायला शिकण्यावाचून पर्यायच नसायचा. माझ्या अनुभवांची आठवण झाली हा लेख वाचताना.

- (पट्टीचा पोहणारा ) सोकाजी

आठवणीतील नोंदी आवडल्या आहेत. कामाच्या नोंदी आहेत.

प्रचेतस's picture

23 Feb 2026 - 10:59 am | प्रचेतस

एकदम जबरदस्त लेखन.
आता कल्याणची खाडी सुद्धा पोहण्यासारखी राहिली नाही. काळे पाणी आहे नुसते. तुमचे वर्णन वाचून माझ्या पोहण्याच्या दिवसांची आठवण झाली. इकडे पवनेत कधी बुडी मारली नाही पण नाशिकला रामकुंडात, गांधी तलावात आणि कर्‍हाडला संगमावर नदीत पोहोण्याचा आनंद लुटला आहे. अर्थात तुमच्यासारखा पट्टीचा पोहणारा मी नव्हे.

अवांतरः कल्याणात सुभाष मैदानाच्या कडेला रिक्रिएशन व्यायामशाळेच्या वर आत्याचे घर होते. आत्याचे यजमान महाराष्ट्र वेटलिफ्टिंङ असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि रिक्रिएशनचे सर्वेसर्वा. त्यामुळॅ कल्याणातल्या बर्‍याच आठवणी आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2026 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

@गा पै-- या मुलीला(बाईला म्हणायला पाहिजे खरेतर--) आणि त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो. आमच्या घरापासुन हाकेच्या अंतरावर राहत. तिच्या वडीलांनी बर्‍याच लोकांना पोहायला शिकविले. त्यांच्याच एका विद्यार्थ्याबरोबर/कडुन मी शिकलो. मी पोहायला लागलो तोवर ते पोहण्यातुन निवृत्त झाले होते. (आठवले काकांच्या प्रसंगामुळे असेल)

@प्रचेतस- जोशी सरांबद्दल आपण बोललो होतो मागे एका कट्ट्याला. पुढचा लेख "रिक्रिएशनचे दिवस" असणारे

गामा पैलवान's picture

23 Feb 2026 - 2:20 pm | गामा पैलवान

राजेंद्र मेहेंदळे,

त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो

वाटलंच मला. तुमच्या लेखातली काही नावं त्या लेखातही सापडली. त्या काळी त्या भागातलं कल्याण अगदीच चिमुकली वस्ती होती. माझं आजोळ शंकरराव चौकापाशी आणि मी राहायला ठाण्यात. त्यामुळे फक्त रेलवे स्थानक, शिवाजी चौक, थोडाफार आगरा रोड वगैरे भाग परिचित आहेत. खाडीवर कधी जाणं झालंच नाही.

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2026 - 4:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे नीता नॉवेल्टीच्या मागे किवा गजानन विद्यालयच्या ईथे? की बाजारपेठ/कुंभारवाडा?

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2026 - 4:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझे आजोळ तलावपाळीला ठाण्यात आणि मी रहायला कल्याणात--एकदम उलट---आहे की नाही गंमत?

गामा पैलवान's picture

23 Feb 2026 - 9:13 pm | गामा पैलवान

सुधा कुटीर, डोळ्यांच्या दवाखान्यापाशी.
-गा.पै.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

23 Feb 2026 - 3:09 pm | हणमंतअण्णा शंकर...

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत)

त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल.

पोहण्यासारखा आनंद नाही.

हा lekh

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

23 Feb 2026 - 3:09 pm | हणमंतअण्णा शंकर...

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत)

त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल.

पोहण्यासारखा आनंद नाही.

हा लेख आवडला हे वे सां न ल.

कर्नलतपस्वी's picture

23 Feb 2026 - 4:31 pm | कर्नलतपस्वी

आमचे गाव भिमानदीच्या काठी. दोन अडीच किलोमीटर लांबीचा किनारा आणी बर्‍यापैकी रूंद आणी खोल नदीपात्र.पावसाळी नदी तरीही फेब्रुवारीपर्यंत पाणी असायचे.

मित्राची लिंबाची बाग,बागेत विहीर.मित्राचे वडील साहेबांच्या सैन्यात सुभेदार, सेवानिवृत्त व हायस्कूल मधे गणिताचे शिक्षक नंतर हेडमास्तर ही झाले.धिप्पाड,गोळीबंद कमावलेली शरीरयष्टी करडी शिस्त आणी बेदरकार स्वभाव. जिवंत साप हातात घेउन जमीनीवर आपटायचे.

वयाच्या सहा,सातव्या वर्षापासून त्यांच्या बागेत पडीक असायचो. नवव्या वर्षी मित्राच्या वडिलांनीच विहिरीत ढकलून दिले. नाक तोंडात भरपूर पाणी गेले. तळ गाठायच्या आगोदरच बखुटीला धरून वर काढले.

दुसर्‍याच दिवसापासून कमरेला पांगरीच्या वाळलेल्या लाकडाचा पेटा बांधून विहिरीत स्वताच उतरलो. एका आठवड्यात कमरेचा पेटा सुटला व पोहायला शिकलो.

गावात शंकराच्या मंदिरात मोठे चौकोनी कुंड. चारी बाजूला पडवीवजा खोल्या. जुने दगडी बांधकाम ,पडवीच्या छतावरून कुडांत उड्या मारणे,सूर मारणे,पाठीवर हातपायाचे मुटकुळे करून उडी मारणे अशा अनेक कला बरोबरच्या वरिष्ठ पोहोचलेल्या मित्रांनी शिकवले.(फुकट शिकवणी)

आता,अस्मादिकांची पावले नदीकडे वाळाली. पोहायला येत होते.आळीतल्या लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर आली होती. पेटा नव्हता मग डालडाचा डबा सिलबंद केला आणी तो पोरांच्या कमरेला बांधून पोहायला शिकवले.

मोठ्या भावाचा किवां वडिलांचा पायजमा फ्लोटर म्हणून वापरण्याची क्लुप्ती कुणीतरी शिकवली. पायजम्याची तिन्ही ओपनिंग सुतळीने घट्ट बांधून ओल्या पायजम्यात तोंडाने हवा भरून फुगवाची आणी दोन्ही पाय व्यवस्थित फुगले की मग ते पोटाखाली घ्यायचे. पोहणारा फुलपाखरू बनायचा.

असे त्या वेळचे (१९६२-६३) अनेक इम्प्रोवाईज्ड स्वीमिंग फ्लोटर्स.

पावसाळ्यात नदीला खुप पुर यायचा. नदीकाठी मोठा वड ( आजही आहे पण माझ्या सारखाच शिनियर झालाय) आणी सात चिंचाची मोठी झाडे ( झाडे गेली तीथे सिमेंटचे जंगल बनले आहे). पुराच्या पाण्याने त्यांना वेढा घातला म्हणजे मोठी मुले खुप लांबून पोहत यायची. थेट दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावर निघायची. पुढे ही कला आमच्या पिढीला हस्तांतरीत झाली. लहानपण थरारक होते. ना मोबाईल, ना टि व्ही....

आजही तरणतलावात पाठीवर हातपाय न हलवता आर्धा आर्धा तास पडून राहू शकतो. (नातवंड आणी सोसायटीतील लहान मुलांना आता शिकवतो.)

आमच्या गावात एका पेक्षा एक पोहणारे महाग्रू आहेत. जेन झी व अल्फा मात्र या कले पासून वंचित आहे आणी राहणार.चास कमानच्या धरणाने पाणी आडवले असल्याने पूर येत नाही.नदीपात्रात जेमतेमच पाणी असते.

लेख आवडला हे वेगळे सांगणे नकोच.

खटपट्या's picture

23 Feb 2026 - 9:57 pm | खटपट्या

यावरून एक खूप जुनी गोष्ट आठवली,
ठाण्यात कोलशेत रोड ला त्याकाळी सण्डोज नावाची कंपनी होती (आता तीचे नाव नोवार्टीस झाले आहे) त्या कंपनितले काही परदेशी अधिकारी कारखान्यात आले होते. कंपनिच्या मागच्या बाजूने पुढे गेल्यावर खाडी लागते. तिला वसई खाडी म्हणतात पण ती ठाण्यातच होती /आहे.
तर हे परदेशी अधिकारी तिथे पोचले तेव्हा तिथे काही स्थानिक कोळी तरुण खाडीत पोहत असताना दिसले. ते तरुण पलीकडच्या तिरावर होते. अधिकार्‍यानी त्याना सहज हात करुन बोलावले. त्यातील सात ते आठ तरुण सरळ उडी मारुन खाडी पार करुन ऐलतिरावर आले.
परदेशी अधिकारी इतके इम्प्रेस झाले की त्या सर्व तरुणांना त्यानी सण्डोज कंपनि मधे कामगार म्हणून भरती करुन घेतले. अशा रीती ने स्थानिक जनतेचा परदेशी कंपनिवर काही कारणास्तव राग होता तो ही नाहीसा झाला. त्यातील बरेच लोक आता निव्रुत्त झाले आहेत.

गामा पैलवान's picture

23 Feb 2026 - 10:23 pm | गामा पैलवान

राजेंद्र मेहेंदळे,

माझे आजोळ तलावपाळीला ठाण्यात आणि मी रहायला कल्याणात--एकदम उलट---आहे की नाही गंमत?

होय तर. गंमत आहेच. तलावपाळीवर कुठेशी आलं तुमचं आजोळ? तरणतलावापाशी असेल तर आपण दोघे एकमेकांच्या आजोळी पोहायला शिकलो.

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Feb 2026 - 11:39 am | राजेंद्र मेहेंदळे

किवा जयंतीलाल वाडी

मी पोहायला शिकलो तो तरणतलाव लालबागेतंच आहे. आपण परस्परमातुलग्रामतरणशिक्षासंबंधी जाहलो. म्हणजे एकमेकांच्या आजोळी पोहावयास शिकलो.
-गा.पै.

सौंदाळा's picture

24 Feb 2026 - 5:43 pm | सौंदाळा

खाडीत पोहायला शिकणे म्हणजे डेंजर काम आहे.
मी ६-७ वर्षाचा असताना टीव्ही बघून पलंगावरुन कार्पेटवर उड्या मारुन पोहण्याची अ‍ॅक्शन करायचो त्यामुळे मोठ्या अपेक्षेने वडीलांनी मला आणि पाण्याला घाबरत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीला महापालीकेच्या जलतरण तलावावर नेले. (बहीण एक-दोनदा बीचवर गेलो होतो तेव्हा पाण्याला पाय लावायला पण घाबरत होती.)
पण खरोखर पोहायची वेळ आली तेव्हा माझी तंतरली. रडून धिंगाणा आणि नंतर ताप त्यामुळे कसाबसा दोन-तीनदाच गेलो. उलट बहिण मात्र आठवड्यातच छान पोहायला शिकली.
त्यानंतर एकदम २५ व्या वर्षी कामचलावू पोहायला शिकलो. ते अजून पण पोहतो कसेबसे ५० मीटर!! पण अगदीच काही न येण्यापेक्शा बरे. तेवढेच कुठे रिसोर्टवर वगैरे गेलो की बायकोसमोर (स्वतःच्या) शायनिंग मारता येते आणि तिला चिडवता येते की कोकणात राहून पण पोहायला शिकली नाहीस म्हणून.
त्यामानाने खाडीत पोहणारे म्हणजे भारीच नुकतीच बेरीज / वजाबाकी शिकलेल्यासमोर इंटेग्रेशन करणारा विद्यार्थी :)