टवाळी
-- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक)
१९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते. आणि ’त्या’ व्यक्तीच्या हाताखाली पी०एच०डी० केली तर ती आत्महत्या ठरेल, असा सल्ला माझ्या हितचिंतकांनी दिला होता. त्यामुळे मी ताकास तूर लागू दिला नव्हता. साहजिक त्याचा परिणाम माझ्या बढतीवर झाला होता. शिवाय इतर काही कारणं होतीच...
तर सांगत काय होतो की हा माझा सहकारी अत्यंत बुद्धीमान आणि तितकाच विक्षिप्त. अत्यंत गुंतागुतीची differential equations, tensor calculus तास-न-तास हाताने फक्त कागद आणी पेन घेऊन करत बसायची अचाट क्षमता त्याच्यात होती.
त्याने प्रचंड प्रयत्न करून भटकरांना माझ्या प्रमोशन इंटरव्ह्युसाठी राजी केले. प्रमोशन इंटरव्ह्युसाठी मी अशा माणसाला (expert) आणेन की भटकरच काय त्यांचा बाप पण तोंड उघडु शकणार नाही, हे त्याने मला दिलेले आश्वासन होते.
त्याचा तो अभिनिवेश बघुन मी त्याला विचारले,
"who is in your mind for my interview"
विनाविलंब विचार करता त्याने सांगितले,
"Prof. Govind Swaroop"
प्रा. गोविंद स्वरुप तेव्हा पुणे टिआयएफआर चे संचालक होते.
माझ्या मित्राने एक दिवस त्यांच्या घरी मला त्यांच्याकडे नेले. त्या दिवशी प्रा. गोविंद स्वरुपांच्या घरी विकांत पार्टी होती. मी काहीसा भांबावुन गेलो होतो. माझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार्या माझ्या मित्राचे मला खुप कौतुक वाटत होते. पण सावधपणे पार्टीत जमेल तेव्हढा (दारू सोडुन) सहभाग घेत होतो.
त्या दिवशी त्या पार्टीत मला नारळीकरांची जी ’टवाळी’ बघायला मिळाली त्यानंतर नारळीकरांची माझ्या मनातली प्रतिमा खाड्कन उतरली. एक नमूद करणे आवश्यक आहे, ते असे की प्रा. गोविंद स्वरूप त्या टवाळीपासुन अलिप्त होते. त्या टवाळीचे कारण नंतर लक्षात आले - त्या सुमारास नारळीकरांच्या steady state theory चे जागतिक पातळीवर थडगे बांधले गेले होते (अथवा सुरुवात झाली होती).
असो ...
नंतर भटकरांनी गोविंद स्वरूपांसारख्या व्यक्तीला माझ्या बढतीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही, असे सांगुन घूमजाव केले. नंतअर माझी बढती झाली पण ती होउ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत होते.
टीप - या पोस्टचा मुख्य हेतू हा की एखाद्याचा ’देव’ दुसर्या व्यक्तीचा दगड असू शकतो. दगडाला देवत्व देण्याचे काम माध्यमे आणि समाजातील भाबडे लोक करतात. ज्यांना अधिक वाचायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे- https://archive.org/details/cosmologycontrov00helg
प्रतिक्रिया
9 Feb 2026 - 4:24 pm | विजुभाऊ
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये.
नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे .
या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे.
त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही.
गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत.
पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये
10 Feb 2026 - 12:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
विजुभाउ तुम्ही अजुन असे लेख वाचता? अर्र्र्र्र्र्र्र्र्रर्र्र
9 Feb 2026 - 8:26 pm | गामा पैलवान
कुतुहलार्थ : नारळीकरांची टवाळी की त्यांच्या सिद्धांताची टवाळी चालली होती? की दोन्हींची?
-गा.पै.
10 Feb 2026 - 2:07 am | हणमंतअण्णा शंकर...
आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली
10 Feb 2026 - 2:09 am | हणमंतअण्णा शंकर...
चार नव्हेत एक पूर्णांक चार, गुगल वॉइस ने दगा दिला
10 Feb 2026 - 9:58 am | युयुत्सु
श्री० गा०पै०
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे.
हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.
10 Feb 2026 - 11:08 am | सुबोध खरे
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही
पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा.
जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत.
बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो.
जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात.
भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच.
वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत.
पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते).
असो.
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.
10 Feb 2026 - 11:12 am | चंद्रसूर्यकुमार
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का?
बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे.
(एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु
10 Feb 2026 - 11:14 am | सुबोध खरे
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले
पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात.
न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही.
जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत.
अॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे?
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच
10 Feb 2026 - 10:01 am | कपिलमुनी
सध्या तुम्ही रिटायर आहात का ?
10 Feb 2026 - 10:10 am | युयुत्सु
हो! ... हा हा हा!
10 Feb 2026 - 1:47 pm | कांदा लिंबू
बालकाने पिपाणी टाकून देऊन पोंगा (की पुंगी) हाती घेतलेला दिसतोय!
कार्ल मार्क्सा, वाचव रे... त्या बालकाला!
11 Feb 2026 - 10:29 am | युयुत्सु
श्री० चंद्रसूर्यकुमार
तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते.
नारळीकरांच्या थिअरीला कचर्याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल.
बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल.
बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल.
असो...