Skip to main content

नवरात्री निमित्ताने

लेखक Bhakti यांनी बुधवार, 24/09/2025 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
#नवरात्री निमित्ताने परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते. 'घट' हा मृत्तिकेपासून बनवलेला विविध हेतू‌साठी धार्मिक विधी, साठवणूक, सामाजिक प्रथांसाठी वापरला जात असे. 1 सिंधू संस्कृतीत व त्या नंतरच्या काळातही द‌फनविधी साठी घटाचा वापर होत असे.जे जन्म ,मृत्यू, पुनर्जन्म यांचे प्रतिक आहे.घट हा माती, पाणी यांनी तयार होतो. आणि हीच तत्त्वे नव्याने धान्य म्हणजेच सृजनासाठी आवश्यक आहेत. तसेच मानवी जन्म स्त्रीच्या उदरातून होतो तेव्हा स्त्रीचे उदर घटाप्रमाणेच गोलाकार दिसते. 'स्त्री ही सृजनकर्ता, घटरूपी सृजन मानली गेली. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळावा यासाठी मग दफनविधीसाठी घटांचा वापर होत गेला. घटरूपी आकारातून सृजन होते. अशावेळी कुंभाराकडून मृत्य व्यक्तीसाठी शरीर आकारानुसार घटरचना होत. लहान मुलांसाठी मध्यम आकाराचे मडके पुरेसे असत. तर मोठ्या माणसांसाठी मोठ्या आकाराचे चार-पाच मडके एकावर एक अशी आतून पोकळ बनवली जात. त्यात देह ठेवतांनाही त्याचे हात पाय छाती-पोटाजवळ ठेवले जात जे गर्भात असतानाही असेच असतात. अशाप्रकारे दफन केल्यामुळे ज्यातून सृजन होणार कशा गर्भासारख्या घटातून मृत्यूनंतर जीवनात योग्य जागी मृत व्यक्तीचे सृजन सहज व्हावे ही श्रद्‌धा! अशाप्रकारचा दफनविधी कमी झाल्यानंतर #पुनर्जन्माचे प्रतिक म्हणून केवळ एखादेच #मडके शवाजवळ दफन करतांना ठेवले जाऊ लागले. हळूहळू या 'स्त्री शक्तीची सश्रद्‌ध आराधना #घटस्थापना या रीतीरिवाजात झाली. घट ज्या आत पाण्यातून, मृत्तिकेच्या संपर्कातून बीजारोपण होऊन सृजन धान्यरूपातून उगवते. हा सर्व जागरही नऊ रात्री- गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे प्रतिक दर्शवितो. पुढे या घटाभोवती आनंदोत्सव गरबा गोलाकार आकारात खेळला जाऊ लागला. नंतर अनेक विधींमध्ये धातूचा कलश पाणी नारळ पाने सृजनाचे प्रतिक /देवीरूप म्हणून मांडले गेले. तत्कालीन जीवनातील जन्म- नश्वरतेचा विचार प्रत्येक कामात होत असे. मग तो सुतार लोहार, कुंभार कोणीही असे. सृजन आणि नाश‌ चक्र प्रत्येक ठिकाणी असतेच.घट घडवणाऱ्या कुंभारांनीही या सृजनाचा जागर समाज घडीत रचला. 1 तुकारामांनी थेट विठ्‌ठलालाच 'वेडा कुंभार' म्हटले आहे तर माणसाच्या जीवनाला मडक्याची उपमा दिली आहे. माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा आभाळचि मग ये आकारा। तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार|| पहिल्या ओळीचा अर्थ सरळ आहे माती , पाणी, उजेड, वारा या चार तत्त्वांचा उल्लेख पंचमहाभूतांशी पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्याशी जोडता येतो. मानवी शरीरही याच पंचमहाभूतांनी बनले ही धारणा आहे. वि‌ठ्ठल हे सर्व एकत्र करतो अक्षरशः या पसाऱ्याशी खेळतो. माती पाणी सृजनासाठी तर उजेड, वारा जीवनाला गती देतो, हीच गोष्ट कुंभार मडकी-घट बनवताना करतो. आभाळ आकाराला येते- आकाश विश्व जे विशाल आहे ते साकारले सजीवांसह जाते.तुझ्या घटांच्या 'उतरंडी म्हणजे माणसांच्या, सजीवांच्या लहान मोठ्या प्रजाती उद‌याला येतात. कुंभारही लहान ते मोठ्या आकाराची मडक्यांची उतरंडच बनवत असतो. अशा या मडकं बनवण्याच्या, सृष्टीच्या जीवांच्या जन्म मृत्यूच्या चक्राला, सीमेला कोणतीच सीमा नाही. घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे देव वेगळे । तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडले लोणी कुणामुखी अंगार|| आता घट म्हणजे मानव ठरले! या घटामध्ये मानवामध्ये किती ते दिसण्यात,व्यक्तिमत्वात,विचारात वैविध्य आहे. तर प्रत्येक 'घट' इतरांपासून निराळा आहे. प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व निराळे आहे.अशा प्रत्येक मनुष्याचे कर्म व दैव यांचा समतोल कसा साधता येतो की नाही हे ईश्वरालाच ठाऊक असते.त्यामुळे समतोल साधला असेल तर लोणी(आनंद) नाहीतर जीवनभर अंगार (दु:ख)! -भक्ती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1906
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अतिशय माहितीपूर्ण आणी एक नवा दृष्टीकोन उलगडून दाखवणारा लेख. आवडला हे वेगळे सांगत नाही. प्रचि सुद्धा छान आहेत.

इथे मात्र आपला संदर्भ चुकला. विठ्तूठला, तू वेडा कुंभार हे गाणे प्रपंच या चित्रपटातील असून चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला होता. मधुकर पाठक दिग्दर्शित, सुधीर फडके यांचे संगीत आणी आवाज. या चित्रपटातील गाणी अधुनिक वाल्‍मीकी गदिमा यांनी लिहीली होती. कथा पटकथा ही त्यांचीच होती. श्रीकांत मोघे,सुलोचना, सीमा देव,शंकर घाणेकर हे दिग्गज कलावंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला कौटुंबिक चित्रपट.

होते कधी कधी . त्याबद्दल क्षमस्व वगैरे काही गरज नाही. लिहायच्या ओघात होतात अशा चुका. बाकी पुन्हा एकदा म्हणेन की घट, सृजन,पुनर्जन्म, स्त्रीस्वरूप आणी नवरात्र याची चांगली सांगड घातली आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हो, हो, प्रभात च्या 'संत तुकाराम' ह्या १९३६ च्या चित्रपटामधील "आधी बीज एकले" ही शांताराम आठवल्यांची रचना कित्येकांना संत तुकाराम रचितच आहे की काय असे वाटले होते, कित्येक अभ्यासकांनी त्यासाठी समग्र गाथा पालथी घातली. इतकेच काय तर आजही युट्युबवर लिरिसिस्ट संत तुकाराम म्हणून उल्लेख आहे. आजही संत तुकारामाची भुमिका केलेले विष्णुपंत पागनीसांचे चित्र कित्येक ठिकाणी संत तुकारामाचे चित्र म्हणूनच वापरले जाते. खरे तुकोबाराय कसे दिसायचे ते माहीत नाही पण आपल्या मिपावरील तुकोबाराय हे सुध्दा चित्र पागनीसांच्या इमेजवरुनच केलेले चित्र आहे.

In reply to by अभ्या..

हो ना, चित्रकारांची ,कवींची कलादृष्टी अचंबित करते. ज्ञानेश्वर महाराजांचेही फेटा घातलेले पावलांवर सर्व शुमचिन्ह हे विशेष दृष्टी(अंध) गुलाबराव महाराज यांच्या कल्पनेने चित्रकाराकडून‌ साकारले आहे. येशूचे चित्र पहिल्यांदा कोणी साकारला असेल.रच्याकने तुम्ही चित्रकार आहात तेव्हा एक प्रश्न विंचीचे ' द लास्ट सपर ' हे चित्र तुम्ही पाहिले का?पाहण्याचा प्लॅन आहे का? दिवसाला फक्त २०-३० लोकांना ते पाहण्याची मूभा असते.विंची द कोड पुस्तकामुळे अक्षरशः एक एक तास हे चित्र मी आंतरजालावर पाहत असे. खुपचं विषयांतर झालं पण I am not robot ;)

In reply to by Bhakti

विंचीचे ' द लास्ट सपर ' हे चित्र तुम्ही पाहिले का?पाहण्याचा प्लॅन आहे का? नाही हो, म्हणजे चित्र हे अभ्यासक्रमात होते, त्याचे फोटोग्राफ्स आणि प्रतिचित्रे पाहिलेली आहेत. दा विन्ची कोड मध्ये पण त्याचा रेफरन्स पाहिला आहे. पण का कोण जाणे द विन्ची आणि मिकालान्जेलो हे सोबत नाव येते तेंव्हा मिकालान्जेलो उजवा वाटायचा. लिओनार्दो तिघामध्ये वयाने सिनियर होता, बहुप्रतिभांचा स्वामी होता, राफायेल आणि मिकालान्जेलो अभिमानाने फक्त चित्रकार आणि थोडे शिल्पकार होते. विंचीची उगीच प्रचंड हाईप होते असे वाटायचे. त्यामुळेच मला लास्ट सपर, मोनालिसा बघण्यात इंटरेस्ट नाहिये बिल्कुल. पण मिकालान्जेलोच्या 'क्रियेशन ऑफ अ‍ॅडम' साठी सिस्टीन चॅपेल आणि 'पिएता' साठी सेंट पीटर्स बॅसिलिका बघायचेच आहे. त्यासाठी पोपमहाशयांनी येऊ दिले तर व्हॅटिकनला जाऊन येणारे.

In reply to by अभ्या..

+१ क्रियेशन ऑफ अ‍ॅडम मध्ये गॉड ज्यात दाखवला तो भाग मेंदूच्या आकाराचा दाखवला आहे हा सिद्धांत वाचला होता.

अंतरजालावर जेष्इंठ कवयत्री इंदिरा संत यांच्या नावाने सापडते पण वस्तुता ही कवीता एक मिपाकर दिपाली यांनी लिहीली आहे. असे होते कधीकधी.