Skip to main content

दिवाळी अंक २०२४ - मत म्हणजे मत म्हणजे मत असते

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
मत म्हणजे मत म्हणजे मत असते. तुमचे, आमचे, सर्वांचे सेम मात्र नसते|| लोकशाहीतील ते अमोघ अस्त्र असते. मतदाराच्या हातचे एक शस्त्र असते. कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते. प्रत्येक मताची एक किं'मत'असते. उगाच वाटायची ती खिरापत नसते. ते बदलायची कुणाची हिंमत नसते. मतदात्यांनापण ठाऊकच नसते, की मत देणे ही गंमत नसते. मत म्हणजे मत म्हणजे मत असते|| भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित, भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित, त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित, त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित! पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित, तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत. यासाठी द्यायची ती खैरात नसते. मत म्हणजे मत म्हणजे मत असते|| निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी, स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी! मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची. भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची. जागा त्यांना दाखवायची एकच संधी असते. मत म्हणजे मत म्हणजे मत असते|| तुझे आहे तुजपाशी, परी तू महत्त्व त्याचे विसरलाशी! जाणून मर्म, ओळखून धर्म, मतदानादिवशी. आपले आहे जे आपल्याचसाठी, 'दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी, हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते. मत म्हणजे मत म्हणजे मत असते. तुमचे, आमचे, सर्वांचे सेम मात्र नसते||

वाचने 3868
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

समर्पक रचना ... आवडली असं कसं म्हणाव ? रचना .. पण... पण लैच आदर्शवादी झालीय !
कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते. प्रत्येक मताची एक किं'मत'असते. उगाच वाटायची ती खिरापत नसते. ते बदलायची कुणाची हिंमत नसते.
नेते आणी गुंड याची दहशत असेल तर मत ही त्यांचीच मालमत्ता असते. या विरुद्ध बंड केले तर अन्नाला महाग झाल्याची उदाहरणे दिसुन येतात !
भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित, भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित, त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित, त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित! पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित, तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत.
.. पण दुर्दैवाने हेच सगळीकडं चाललंय ! घोडेबाजार कायमच तेजीत असलेला स्पष्ट दिसतो
निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी, स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी! मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची. भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची.
या बद्दल काय लिहिणार ? सगळी बजबजपुरी माजलीय ! महाराष्ट्रातील घोडा मैदान जवळच आहे .. पाहू काय होते ते !

आपल्याकडच्या निवडणूकांची पद्धत बदलायला हवी. जिंकणारा उमेदवार अन ज्याला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहे त्यांच्यात साधारण ४०% अंतर असले पाहिजे असला नियम हवा. तसेच समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा.

In reply to by पाषाणभेद

या घटकेला आपली पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. या पद्धतीत एक हाती सत्ता मिळते. निर्णय घेता येतात. गठबंधन सरकारात निर्णय घेता येत नाही आणि भ्रष्टाचार ही रोखता येत नाही. या शिवाय समाजाच्या सर्व घटकांना सत्तेत भागीदारी मिळते. उदाहरण, उत्तर परदेशात यादव आणि दलित दोन्ही समाजाचे मुख्यमंत्री बनले. हरियाणात जाट, विश्नोई, पंजाबी शरणार्थी, सैनी समाजाचे व्यक्ति मुख्यमंत्री बनले. राजस्थान सारख्या राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री बनू शकतो. बाकी गेल्या दहा वर्षांत एका ही निर्दोष व्यक्तीवर ईडीची धाड पडलेली नाही. किमान ईडीला बिना प्रमाण खोटे आरोप कोर्टात दाखील करता येत नाही. गेल्या दहा वर्षांत ईडी आणि आयकर विभागाने त्याधील दहावर्षांत जेवढा पैसा जब्त केल्या होत्या त्यापेक्षा 25 पट जास्त या दहावर्षांत केला आहे.

समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा. बरोबर आहे हे होऊच नये जर निवडलेले लोकप्रतिनिधी काम करतील तर .. आणि हो हे सर्व पक्षाच्या लोकांना लागू होते पण हे हि बरोबर नाही कि दरवेळी या संस्था "स्वत्रंत्र " नाहीत असे धरूनच चालणे हा रोग दशकांपासून चालू आहे , आणीबाणीत आणि मोदी काळात थोडी शिस्त आली तेवढीच ( आता त्यावर रणकंदन नको ) दोन्ही काळात काहीतरी चांगले घडले असावे कारण काही तरी वाचक पण मूलभूत हक्कांची पायमल्ली वगैरे... त्यावर रणकंदन वेगळे करू पुढल्या दिवाळी अंकात

कविता आवडली.

दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी, हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते.
+१ ज्या वेळेस १००% गेला बाजार ९०% टक्के तरी मतदान होईल तो सुदिन आहे.४०-४५% काय मतदान असतं का नुसती हक्कांसाठी लोकशाही,कर्तव्याचे काय?