मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - चांदके पार

बिपीन सुरेश सांगळे · · दिवाळी अंक
चांदके पार मुलाकडच्या लोकांचा होकार येईल की नाही? निकिताच्या आईबाबांना काळजी लागून राहिली होती. एकुलती एक पोर. तिचं लग्न जमवायचं चाललं होतं. स्थळं येऊन जात होती, पण जमत काही नव्हतं. कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाची काय अपेक्षा, एक ना दोन अनेक गोष्टी. तशात एक स्थळ येऊन गेलं. मुलगा चांगला होता. नोकरी भारी नाही, पण चांगली होती. मुख्य म्हणजे मुलगा देखणा होता. त्यांना तिच्यासाठी असाच मुलगा पाहिजे होता. तिला शोभणारा. म्हणून त्या मुलाने हो म्हणावं असं त्यांना वाटत होतं. निकी सावळी होती, पण ठसठशीत फीचर्सची, आकर्षक चेहऱ्याची अन भरलेल्या बांध्याची. कुठल्याही सर्वसामान्य पालकांप्रमाणेच तिच्या आईवडलांची काळजी होती. तर निकीची काळजी वेगळीच होती. ----- निकी शिक्षणासाठी बाहेरगावी राहिली होती. होस्टेलवर. तिथे सुरुवातीच्या दिवसांत एक मुलीशी तिची मैत्री झाली. रिवा नावाची ती पोरगी आग्र्याच्या बाजूची होती. दिसायला अफाट अन वागायला बेफाट! पण वागायला चांगली होती. तिच्या गावाकडच्या बऱ्याच मुली त्या कॉलेजमध्ये होत्या. तिला सिनियर. तिचा मोठा ग्रूप होता. तिची आणि निकीची चांगलीच मैत्री जमली होती. रिवा नेहमीच नवनवीन कपडे घालायची. तिचा फॅशन सेन्स छान होता. पैसेवाल्या घरातली पोरगी. तिला काय कमी? निकीला वाटायचं. पुढे असं झालं की तिच्याकडे नेहमीच नवीन वस्तू, कपडे, कॉस्मेटिक्स, परफ्यूम्स असं दिसायला लागलं. तशी रिवा खरोखरी पैसेवाल्या घरातली पोरगी होती. पण एकदा बोलताना ती निकीला म्हणाली, "माझा बाप लय कंजूस आहे!" तेव्हा मात्र निकीला प्रश्न पडला - जर हिचे वडील कंजूस आहेत, तर मग हिच्याकडे पैसा येतो कुठून? तेही मुबलक? एके दिवशी निकीने रिवाकडे भारी, इंपोर्टेड घड्याळ पाहिलं, तेव्हा तिने तिचं डोकंच खाल्लं. तेव्हा ती म्हणाली, "यार! काहेको दिमाग खाती है? दिलंय मला एकाने. काल रात्री मी त्याला खूश केलंय. तुला कमवायचा आहे का पैसा?" रिवा ऑकेजनल कॉलगर्ल बनून पैसे कमवत होती. गोरीपान, गुबगुबीत रिवा त्या वर्तुळात चांगलीच फेमस होती. बापरे! निकीला तर धक्काच बसला. पुढे - शिक्षण संपलं. रिवा तिच्या घरी गेली. बापाने लगेच तिचा ब्याह उरकून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघींचा फोन झाला. खूप गप्पा झाल्या. होस्टेलच्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. त्या गोष्टींवरही चर्चा झाली. आणि सरतेशेवटी ती चर्चा सेक्सवर आली. निकीने स्त्रीसुलभ कुतूहलाने त्याबद्दल विचारलं. तेव्हा रिवा म्हणाली, "छे! बोअर प्रकार!" "बोअर? अन ते का बाई?"‘ ‘काय तू पण? इतक्या वेळा अनुभव घेतल्यानंतर खरंच मी पोरगी राहिले नाही. मी बाईच झाले. आता त्याच्यात काय मजा? त्याच्यात काय नावीन्यच नाय! अन एक सांगू, मिक्स फिलिंग आहे गं. कुठेतरी अपराधीपणाची जाणीव होते, त्यामुळे हबी जवळ आला की इच्छाच होत नाही. जाम लोचा झालाय माझा. पश्चात्ताप होतोय आता. काय करावं कळत नाही." थोडं थांबून ती पुढे म्हणाली, "आय होप - तुझं असं होऊ नये." जास्तीचे खर्च भागवण्यासाठी निकीनेही त्याचा अनुभव पुढे घेतलाच होता. ----- मुलाचा होकार आला. निकीचे आईवडील दोघेही खूप खूश झाले. शंतनूही सावळाच, पण उंच आणि मर्दानी चेहऱ्याचा तरुण होता. एखाद्या मॉडेलसारख्या लूकचा.. पण निकीला तर टेन्शनच आलं.. अनेक गोष्टींचं. लग्नाआधी सेक्स, त्याचे विविध अनुभव, त्याचे पडसाद पुन्हा पुढच्या आयुष्यात उगवले, तर? ते नवऱ्याला सांगायचं की नाही आणि मुख्य म्हणजे रिवासारखं झालं, तर? लग्न पार पडलं. सगळे विधी पार पडले आणि पहिली रात्र उगवलीदेखील. सुहाग रात - पब्लिकला साधारणपणे चित्रपटांमधून तिची पहिली ओळख किंवा माहिती होते. चित्रपटातून दाखवली जाणारी पहिली रात्र! नवीन जोडप्याचा डबलबेड जसा सजवून दाखवतात, तितकाच तो इव्हेंटही सजवून दाखवला जातो. पार वरपासून खालपर्यंत फुलांच्या माळाबिळा सोडून, बदामाचा शिरा अन मसाला दूध. घुंघट घेतलेली, खाली मान घातलेली, लाजून बसलेली, पतिदेवाची वाट पाहणारी दुल्हन. खऱ्या आयुष्यात असं काहीच नसतं! समरप्रसंगच असतो खरं तर, दोघांसाठीही. पण जास्त धास्तावलेला पक्ष अर्थात स्त्रियांचा असतो. इथेही तीच परिस्थिती होती, पण धास्ती वेगळीच होती. आणि जे व्हायचं तेच झालं. निकीने शंतनूला जवळ येऊच दिलं नाही. असं त्या रात्री झालं, त्याच्या पुढच्या रात्री झालं आणि रोज रात्री असंच होऊ लागलं. एकामागून एक रात्री सुन्या जाऊ लागल्या. शंतनूने सोडून दिलं. पण किती दिवस? त्यालाही मन होतं, त्यालाही शरीर होतं, त्यालाही भावना होती, त्यालाही इच्छा होती. त्याची चिडचिड होऊ लागली. होणारच ना. तरणाबांड गडी तो. पण त्याला काय करावं ते कळेना. काय कारण असावं तेच कळेना. ती त्याच्या जवळ येत नसे. त्याने मिठीत घेतलं, तरी पुढे काही करू देत नसे. बिचाऱ्याने साधे ओठ जरी पुढे केले, तरी ती तोंड फिरवत असे. साला वैशाखवणवा काही संपेचना. आषाढाचा पाऊस सोडा, वळवाची साधी सरही पडेना. आपण चुकीच्या मुलीशी लग्न केलंय असं त्याला वाटू लागलं. पण ही चूक सुधारायची कशी? बोलायचं कोणाशी? अजून तरी तो घरातल्यांना काही बोलला नव्हता. त्याची आई तर सुनेवर खूश होती. निकीचीही जाम घुसमट होऊ लागली. शंतनू वागायला चांगला होता. तीही त्या नवीन घरामध्ये अ‍ॅडजस्ट झाली होती खरी, पण रात्र? ती तिला नकोशी वाटू लागली होती. नवीन लग्न झालेली जोडपी रात्र उगवण्याची वाट पाहत असतात. इथे मात्र तिला रात्रच होऊ नये असं वाटू लागलं होतं. रात्रीची शीतलताही तिला दाहक वाटू लागली होती. एकदा त्याला वाटलं की तिच्यावर सरळ जबरदस्तीच करावी, पण त्याचा तो स्वभाव नव्हता. पण अशा अनेक रात्री कोरड्या गेल्यावर, त्याला लग्न मोडावं असं वाटू लागलं. ते त्याच्या डोक्यातच घोळू लागलं. नाहीतरी कोर्टाने असा एक विशेष निकाल अलीकडेच दिला होता, शारीरिक संबंध झाले नसतील तर असा विवाह पूर्ण होत नाही म्हणून. ----- एके रात्री दोघेही बेडवर पडले होते. तिच्या डोक्यात एकेक जुने अनुभव येऊ लागले. तिला एकेक जुने पुरुष आठवू लागले. राकट पुरुष, घामट पुरुष, जनावरांसारखे ओरबाडणारे पुरुष अन धसमुसळे पुरुष.. धसमुसळा याचा अर्थच मुळी मुसळासारखा धसणारा. त्या क्रियेतील बळाचा वापर सांगणारा थेट अश्लील शब्द. पण अर्थ माहीत नसल्याने सहजपणे घरी-दारी बंड मुलांसाठी वापरला जाणारा. अर्थात, तिला या शब्दाचा अर्थ माहीत नसला, तरी असे तिने पुरुष भरपूर प्रमाणात सहन केलेले होते. एकदा तिने नवीन इनर घातली होती. त्या दिवशी जे गिऱ्हाईक आलं होतं - रासवट, त्या xxxला एवढी घाई झाली होती की त्याने ती इनर जोरात ओढून काढली. जसं काही उशीर झाला तर ती पळूनच जाणार आहे. इतक्या जोरात ओढल्याने ती इलॅस्टिकपासून फाटून त्याच्या हातात आली होती. त्यावर ती ओरडली, तर त्याने तिला एक जोरदार थप्पड लगावली. "गप पड! पैशे मोजलेत! चड्डीचेबी पैशे देईन. तेपण एक नाही, तर चारचार." चार इनरचे पैसे त्याने खरोखरी मोजले, पण मग त्याने थोड्या वेळात तिचा दोन वेळा कस्सून उपभोग घेतला होता. आणि त्या वेळी ती खरंच गप पडून राहिली होती. जणू त्या बेडवर ती नव्हतीच. तोच काय तो एकटा होता. त्याचा त्याचा स्वतःच निचरा करून घेणारं एक जंगली श्वापद. बहुतेक पुरुष त्याच प्रकारात मोडणारे. एक अपवाद होता. नंदन त्याचं नाव. तरुण होता. बायकोची पहिली डिलिव्हरी झाल्याने ती माहेरी गेली होती. आणि मग हा बाहेर त्याची हौस भागवत होता. तो आला की तिला छान वाटायचं. तो तरुण होता. सुंदर होता. मुख्य म्हणजे तो फक्त सेक्ससाठी वखवखलेला नसायचा, तर त्याच्या त्या सगळ्या कृतीमध्ये तिला नेहमीच एक प्रेमळपणा जाणवायचा. तो हर प्रकारे तिच्याशी क्रीडा करायचा, पण कुठेही काही गडबड, घाई किंवा जबरदस्ती न करता. तिला तर ते खूप आवडायचं. तिला तेव्हा खरी मजा यायची. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटायचा. आणि वर पैसे - ते वेगळेच. जणू एका दगडात दोन पक्षी. त्याचं बोलणं शांत होतं. त्याचं वागणं आदबशीर होतं. त्याला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. इतर गिऱ्हाइकं जशी तिच्यापुढे नाना प्रकारच्या बढाया मारायची, पैशाच्या किंवा सत्तेच्या - वर्चस्वाच्या बाता मारायची, तसं तो कधीच करत नसे. किंवा त्याचं तिच्यावर प्रेम आहे, असंही तो कधी सांगत नसे. पण पुढे त्याची बायको आली असावी. तो यायचा बंद झाला. नको तेच लोक काय ते येऊ लागले. त्यांच्याच वर्तुळात एक मुलगी होती. एके दिवशी एका मवाल्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचं असं म्हणणं होतं की पैसे एकाचेच देईन, पण तू माझ्या मित्रालाही सोबत करावीस. त्यांची बोलाचाली झाली. त्या भांडणात त्या टपोरी गावगुंडाने तिचा जीवच घेतला. त्या वाईटात एक चांगली गोष्ट अशी घडली की या सगळ्यात मुलींनी कॉल घेणंच बंद केलं. पुढे शिक्षणही संपलं. ते दिवस मागे पडले. त्या क्षणाला तिला नंदनची खूप आठवण आली.. तर शेजारी पडलेल्या शंतनूला सेक्सची! त्याला ते हवं होतं. कुठल्याही परिस्थितीत हवंच होतं. त्यात निकी तर त्याची स्वतःचीच होती ना. त्याला ती खूप आवडू लागली होती. त्याचं तिच्यावरचं प्रेम हळूहळू वाढतही होतं, कुठल्याही अरेंज्ड मॅरेजमध्ये होतं, तसंच.. फक्त ती एक गोष्ट सोडता. एका क्षणात त्याला राग यायचा, तर दुसऱ्या क्षणाला त्याचं प्रेम उतू जायचं. गंमतच सारी, पण विचित्र. त्याला आज असं वाटलं की तिच्यावर सरळ जबरदस्तीच करावी. त्याचं डोकं फिरलं होतं. त्याचं शरीर बंड करत होतं. ते आतून बेभान उसळ्या मारत होतं. पण त्याचा तो स्वभाव नव्हता. तो विचार करत होता - आज शेवटची संधी. नाहीतर XXX गेलं. तुटलं! एकदा अजमावून तर बघू आधी, त्याला पुन्हा वाटलं. "आज शेवग्याचं वरण का केलं होतं?" त्याने तिला इशारा देण्यासाठी विचारलं. "का म्हणजे? त्याला काही कारण असतं का?" तिला काही कळेचना. "आम्हाला प्रॉब्लेम होतो." "प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम?" "जाऊ दे! तुला नाय कळणार." असं म्हणत त्याने कूस बदलली. त्या भाजीने इच्छा वाढते, असा समज आहे, पण तो हे काही बोलला नाही. तो असा वळला, नाराज झाला, म्हणून ती पाघळली. म्हणून ती त्याच्या जवळ आली. तसं त्याने तिला हळुवारपणे जवळ घेतलं. तिच्या गालावर त्याचे उष्ण ओठ टेकले. तिचं शरीर तो स्वतःच्या शरीराला जाणवू देत राहिला. तिलाही आज त्याची ती मिठी हवीहवीशी वाटत होती आणि ती तशीच त्याच्या मिठीत पडून राहिली. तो म्हणाला, "आमची राणी कधी प्रसन्न होणार?" आणि ती रडू लागली. तो तिला थोपटू लागला. त्याने तिला रडू दिलं. थोड्या वेळाने ती रडायची थांबली. बेडरूमचे पडदे वाऱ्याच्या झुळकेने हलत होते. तेव्हा त्याने विचारलं, "काय प्रॉब्लेम आहे?" "मला ते नाही जमणार. नाहीच जमणार असंच वाटतंय. त्यामुळे टेन्शन येतंय." "पण का? असं का वाटतंय? सुरुवातच होत नाहीये आपली, तर पुढचं कळणार कसं? एकदा सुरुवात झाल्यावर तुला कळेल ना की मी एक प्रेमळ प्रियकर आहे म्हणून. पाण्यात पडल्याशिवाय पोहणार कसं? एकदा माझी होऊन तर बघ - या जगातल्या तुझ्या सगळ्या चिंता क्षणात मिटवून टाकीन मी. फक्त एकदा त्या दुसऱ्या जगात प्रवेश करायचा अवकाश.. मग? चांदके पार!" त्याची ती तयारी, तो आत्मविश्वास पाहून ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने तिला आणखी जवळ घेतलं. त्याची ती मिठी आता आणखी आश्वासक होती. त्याच्या त्या आश्वासकपणाने तीसुद्धा त्याच्या जवळ आली. दोघांचे श्वास फुलले. उष्ण उष्ण झाले. एकमेकांत मिसळले. तिने त्याचे ओठ स्वतःच्या ओठात घेतले. त्याच्या सॅंडो बनियनमुळे त्याच्या घामाचा जास्त चाळवणारा वास येत होता. दोघांची शरीरं तप्त झाली. त्यात ऑक्टोबर हीट. पण त्यांना आता त्याचं मुळीच भान नव्हतं. नंतर निसर्ग पुढे आला. दोघांना एकमेकांच्या शरीराची ओळख पटली. दोघांची वस्त्रं बाजूला पडली आणि दोघेही पुढच्या आनंदी क्रीडेमध्ये रमून गेले. त्याच्या शरीराचा राकट आणि तिच्या शरीराचा मुलायम स्पर्श एक झाले. निकीला वाटलं - आज खरा आनंदाचा दिवस आहे. दिवस म्हणण्यापेक्षा रात्र! उगाच मनाच्या एका कोपऱ्यात असंही वाटून गेलं की शंतनू भारी आहे, नंदनपेक्षा भारी. तिच्या मनावरचं ते नकोसंसं ओझं उतरलं. ती तरारली. ती फुलारली. ती सुखावली. आता ती त्याला पूर्ण समर्पित झाली. तिच्या मनामध्ये आता चंद्र उगवला होता. मोठा, पौर्णिमेसारखा. त्याचा प्रकाश तिच्या अंगभर पसरला. काही वेळाने वादळ. काही क्षणांनी ते चंद्रवादळ शांतवलं. तो चंद्र हळूहळू मालवत गेला.. अन ते दोघे? चांदके पार.. स्त्रियांना बेडवर कसं खूश करायचं. यामध्ये शंतनू एक्स्पर्ट होता. म्हणून तर एवढे दिवस तो थांबू शकला होता. त्याने तिच्या कलाने घेतलं होतं. आज त्याने त्याचं कौशल्य जणू पणाला लावलं होतं. स्वतःला पाहिजे आहे ते स्त्रीकडून कसं काढून घ्यायचं आणि स्त्रियांना काय हवंय ते कसं द्यायचं, हे त्याला चांगलंच माहीत होतं. त्याला जवळ येणाऱ्या स्त्रियाच काय त्या माहीत होत्या. काही तर पेटलेल्या असायच्या, पण त्याच्यासाठी लांब पळणारी ही पहिलीच होती. त्याच्या आयुष्यात आलेला आजचा क्षण, दुर्दैवाने खूपच उशिराने उगवला होता. कॉलेजमध्ये असताना त्यालाही छानछोकीने जगायची सवय लागली होती. त्याच्यासाठी लागणारे पैसे कमवण्यासाठी तोही चुकीच्या मार्गाला लागला होता. त्यानेही काही दिवस जिगोलो म्हणून काम केलं होतं. --------------------------------------------------------------------------------------------------------- बिपीन सांगळे

वाचने 6699 वाचनखूण प्रतिक्रिया 17

कथा ठिक आहे. तुमच्या कथा वेगळ्याच असतात. नेहमीच आवडतात. कथा वाचल्यावर एक पडसाद उमटतो आपण त्याला हायला म्हणू तो उमटलाच नाही. सर्वच गोष्टी क्रमवार लिहील्याने वाचकाला विचार करण्यास वाव नव्हता. क्षमस्व, आपल्या कडून वेगळी अपेक्षा असणारा आपला फॅन. वेदना ही शशक आपलीच ना.....

टर्मीनेटर 31/10/2024 - 20:01
रब ने बना दी जोडी... 😂 दोघांनाही अगदी अनुरूप जोडीदार मिळाला की ! "लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात" असे म्हणतात त्यात नक्कीच तथ्य असावे 😀 श्लील आणि अश्लील मधल्या पुसट सीमारेषेचे भान ठेवत असे लेखन करणे फार थोड्या लोकांना जमते, त्यात तुमचाही समावेश आहे. कथा आवडली! धन्यवाद.

चौथा कोनाडा 03/11/2024 - 22:11
शेवट .... ! ओघवतं लेखन आणि उत्तम शैली या मुळं कथा वाचायला सुरूवात केली ते शेवटालाच पोहोचलो ! आपलं अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना जाणवतं एक वेगळी कथा वाचायला मिळाली !

सगळ्यात आधी - मला लिहिण्याची संधी दिली आणि १८+ ची - ही कथा स्वीकारून , प्रकाशित केली यासाठी सर्व संपादक मंडळ, मिपा व मालकांचे आभार. ----- अंकाचं निवेदन पाहिलं आणि १८+ विषयही पाहिला . या विषयावर लिहून पाहू असं ठरवलं. पण मनावर दडपण तर होतंच . विषय तर थेट आहे . त्याचे काही कंगोरे धरताना पातळी सुटणार नाही , याची काळजी घ्यायची होती . त्याचवेळी त्याला न्यायही द्यायचा होता. कथेची मांडणी कशी करायची ? तर प्रत्येकजण त्याला ज्या लोलकातून कथा जशी दिसेल तशी . मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. मला खरं तर लाईट मोडची किंवा विनोदी ढंगाने जाणारी कथा लिहायची होती . पण कमी वेळात तेवढं लिहिणं शक्य नव्हतं . एक अशी प्रतिक्रिया ऐकली - मिपाकरांनी बराच सभ्यपणे हा विषय घेतला आहे म्हणून . तूर्तास- मला ही गोष्ट चांगली वाटली. कारण इथे सगळ्याच प्रकारचा वर्ग वाचत असतो. महिला वर्गाने ही कथा बऱ्यापैकी वाचलेली असावी . त्यात श्वेता आणि भक्ती यांची नावे प्रतिक्रियेमध्ये दिसत आहेत. त्यांचे व इतरही महिला वर्गाचे आभार. त्यांच्या नजरेतून कथा भरकटलेली नसावी , वाचनीय असावी, अशी माझी आशा. ----- पाभे , श्वेता, शेखर मोघे, शानबा . भक्ती यांचे आभार. ----- कर्नलजी , आपल्या प्रतिक्रिया मनमोकळ्या असतात , त्यामुळे मी आपली प्रतिक्रिया स्वीकारतोय . माझ्या कथा वेगळ्या असतात, नेहमीच आवडतात , आपण माझे फॅन आहात - हे वाचल्यावर तर मी सर्दच ! कथा प्रकाराबद्दल बद्दल माझं मत- ती उत्कंठा वाढवणारी असावी. शेवटी ट्विस्ट किंवा काही रहस्य भेद असला उत्तम ! पण प्रत्येक कथेला तो आवश्यक नाही . खरी कथा ही कथा विषयाचं भावविश्व समर्थपणे उलगडणारी असावी , हे महत्त्वाचं . उलट सध्याच्या काळाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे इंटरेस्टिंग कथा लिहावी असं उगाच माझ्यावर दडपण येतं . ही कथा काही जणांना उत्कंठावर्धक वाटली आहे, काही जणांना शेवट आवडला आहे . कृपया हा माझा नम्र प्रतिसाद समजावा. लोभ असावा. ----- अमरेंद्र बाहुबली - आपल्या विशेष प्रतिक्रियेसाठी विशेष आभार. ----- टर्मिनेटर - आपण एका वाक्यात कथेचं सार मांडलं आहे . हे तर मलाही सुचलं नव्हतं . खरंच ग्रेट ! श्लील आणि अश्लील मधल्या पुसट सीमारेषेचे भान ठेवत असे लेखन करणे फार थोड्या लोकांना जमते, त्यात तुमचाही समावेश आहे.--- तुमची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे . या कथेसाठी . कारण प्रवाहातले नक्की कुठले आणि किती खाचखळगे धरायचे , याला अंत नाही . लेखकाचीच परीक्षा . साहित्य या शब्दाला प्राधान्य असावं असं मला वाटलं . ----- चौको - आपल्याला शेवट आवडला . आपण सुरुवातीपासून शेवटापर्यंत नॉन स्टॉप कथा वाचली यासाठी आभार . अनुभव विश्व समृद्ध आहे तुमची ही प्रतिक्रिया मोलाची . पण खरंच सांगतो मला स्वतःला तर खूप ते खूप तोकडं वाटतं . खूप अनुभव घेण्यासाठी एक आयुष्य पुरेसं नाही . सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा 05/11/2024 - 17:41
अंकाचं निवेदन पाहिलं आणि १८+ विषयही पाहिला . या विषयावर लिहून पाहू असं ठरवलं. पण मनावर दडपण तर होतंच . विषय तर थेट आहे . त्याचे काही कंगोरे धरताना पातळी सुटणार नाही , याची काळजी घ्यायची होती . त्याचवेळी त्याला न्यायही द्यायचा होता.
पर्फेक्ट न्याय दिला आहे आपण, हे अभिप्रायांवरून दिसतच आहे. सुंदर मनोगत, बिपीन सुरेश सांगळे ! धन्यवाद !

एका वयस्कर माणसाने मला विचारलं - तुझ्या या कथेची नायिका अशी का आहे ? तर - प्रत्येक व्यक्ती ही आदर्श नसते . जगात अशा व्यक्ती प्रत्यक्षात आहेत . त्यांचंही आयुष्य आहे , त्यांचीही काही बाजू आहे . बरी - वाईट . त्यांच्या आयुष्याचा एक तुकडा मला मांडावासा वाटला . मी कथा मांडली . ती कथा बरी - वाईट हे वाचकांवर . दुसरं - सगळी मुलं - मुली अशी नसतात . विशेषतः होस्टेलवर राहणारी असं मला म्हणायचं आहे . काही मुलांना ते नकारात्मक वाटू शकेल . काही जणांना ते चुकीचं आकर्षक वाटू शकेल . काही पालकांना टेन्शन येईल . विशेषतः ज्यांची मुलं हॉस्टेलवर राहतात . मला असं नको आहे . कथेतील पात्रं पूर्णपणे प्रातिनिधीक आहेत . सगळेच तसे नसतात . त्या माणसाने मला असं सांगितलं की - किती मुलं - मुली अशी आहेत , जे होस्टेलवर राहून स्ट्रगल करतात . त्यांचं करिअर घडवतात. मी त्या सहृदय माणसाशी सहमत आहे . ------------- चौको आभार -------------- सर्व वाचक मंडळींचेही आभार

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

टर्मीनेटर 06/11/2024 - 12:58
"एका वयस्कर माणसाने मला विचारलं - तुझ्या या कथेची नायिका अशी का आहे ?"
सांगळे साहेब, त्रेता आणि द्वापार युगातही उपलब्ध नव्हते इतके सत्शील, निर्भेळ सामाजिक वातावरण चक्क कलीयुगात लाभुन 'वयस्कर' होईपर्यंतचे जीवन अतिशय सरळसोट मार्गाने (किंवा झापडबंदपणे) व्यतीत केलेल्या त्या 'निरागस' व्यक्तीला, विनय शुक्ला लिखित/दिग्दर्शित 'मिर्च' हा २०१० साली प्रदर्शित झालेला सेक्स-कॉमेडी चित्रपट आवर्जून पाहण्याची शिफारस आपण माझ्यातर्फे करावी अशी विनंती 😀
"प्रत्येक व्यक्ती ही आदर्श नसते . जगात अशा व्यक्ती प्रत्यक्षात आहेत . त्यांचंही आयुष्य आहे , त्यांचीही काही बाजू आहे . बरी - वाईट . त्यांच्या आयुष्याचा एक तुकडा मला मांडावासा वाटला ."
"कथेतील पात्रं पूर्णपणे प्रातिनिधीक आहेत ."
+१००० "त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम; देवो न जानाति कुतो मनुष्यः।।" ह्या संस्कृत श्लोकातल्या 'त्रिया चरित्र' शब्दाचा उगम महाभारतात आहे म्हणे! तर ह्या संकल्पनेवर आधारित असलेल्या 'मिर्च' ह्या चित्रपटात दोन जुन्या काळातल्या तर दोन आधुनिक काळातल्या अशा चार कथा सादर केल्या आहेत. सांगायचा मुद्दा काय की, उपरोल्लिखित चित्रपटातल्या कथांमधील पात्रं आणि आपल्या ह्या कथेतली पात्रं 'प्रातिनिधीक' आहेत, त्यांच्याशी साधर्म्य असलेली उदाहरणे समाजात प्रत्यक्षात पाहायला मिळतात म्हणून तर तो चित्रपट आणि हि कथा दोन्ही आवडले, तसेच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या भल्या-बुऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती तुम्ही आपल्या कथांमधून दर्शवता हे देखील आवडते 👍

सविता००१ 07/11/2024 - 13:49
एक वेगळी कथा आवडली. हल्ली खूप तरूण तरुणी या जलद पैसे मिळवण्याच्या मोहात अडकलेले असतातच. अशाच जोडीचं आयुष्य भलत्या मार्गावर न जाता स्थिरावलं याचा आनंद वाटला. निकी चं भावविश्व बर्यापैकी दाखवण्यात यशस्वी झाला आहात. त्यामानाने शंतनूचं एका वाक्यात " तोही आधी जिगोलो होता "आलं. पण आवडलीये खूप. त्याच त्याच प्रकारच्या कथांपेक्षा वेगळी

सविता सौंदाळा आणि इतर अनेक वाचक खूप आभार स्त्री वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या , हे बरं वाटलं कथा त्याज्य वाटली नाही , आभार