✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

म
मनस्विता यांनी
Sat, 08/17/2024 - 19:50  ·  लेख
लेख
M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते. श्रावणी आणि मी वेगवेगळ्या भागात पुस्तके पाहत होतो. तेवढ्यात तिथल्या तिथेच मला श्रावणीचा फोन आला. ती जिथे होती तिथे ती मला बोलावत होती. झालं असं की श्रावणी तिथे पुस्तकं पाहत असताना, तिथे आलेल्या इतर काही जणी चित्कारल्या 'ई.. हे बघ Mills & Boon!' आणि श्रावणीला तिथे Mills & Boon च्या पुस्तकांचा ढीग दिसला. तो पाहताच तिने मला लगोलग फोन केला. मी तिथे गेले आणि अत्यानंदाने दोन पुस्तके घेऊनच टाकली. काहींना Mills & Boon हे प्रकरण काय आहे हे माहीत नसेल म्हणून सांगते. रोमँटिक कथांची ही पुस्तके असतात. दर पुस्तक वेगळ्या लेखिकेचं आणि वेगळी कथा असलेलं. सहसा नवतरुणींना आवडणारा हा प्रकार. पण आमच्या घरात उलटी गंगा. श्रावणी आणि तन्वीच्या (माझ्या दोन्ही मुली) दृष्टीने अत्यंत cringe प्रकार. त्यामुळे त्या दोघी ह्या पुस्तकांना हात पण लावणार नाहीत. जैसी जिसकी सोच! तर आता ऐका माझी आणि Mills & Boon ची कहाणी. सेमी-इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षण घेऊन अकरावी-बारावीला SP कॉलेजमध्ये गेले. तिथे आमचे इंग्लिशचे बेलसरे सर म्हणून अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक होते. आम्ही कुठल्या प्रकारची पुस्तके वाचावी ह्यासाठी एका तासाला त्यांनी अनेक पुस्तकांची यादी दिली. त्यात त्यांनी आमच्यासारख्या इंग्लिशमध्ये धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना Mills & Boon वाचायचे सुचवले. त्यांनी आवर्जून सांगितले की ही पुस्तके ब्रिटिश पब्लिकेशनची असल्याने त्यातील भाषा व व्याकरण उत्तम दर्जाचे असेल. आम्ही पण अगदी प्रामाणिकपणे लिहून हे नाव लिहून घेतले. पण त्याच वेळी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलं मात्र टिंगल केल्यासारखी हसत होती. आम्हाला काही कळलं नाही. आणि तो विषय तेवढ्यापुरता संपला. बारावी झाल्यावर इंजिनीरिंगसाठी संगमनेरला जावं लागलं. १९९५ साली केबल टीव्हीचे चॅनेल पण जेमतेम सुरु झाले होते. फोन फक्त लँडलाईनच. कंप्युटरतर 286 वगैरे प्रोसेसर असलेले फक्त कॉलेजच्या लॅबमध्ये दिसणारे. त्यात आमचं होस्टेल in-time संध्याकाळचे ६:३० चे असायचे. मग रिकाम्या वेळात उद्योग करायचा काय हा मोठा प्रश्न! (अभ्यास करावा हे काही सुचतही नव्हते आणि जमतही नव्हते.) ह्या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे पुस्तकं. म्हणजे अभ्यासेतर पुस्तकं वाचणे. हॉस्टेलमध्ये कोणी ना कोणी पुस्तकं घेऊन यायचं. आणि ती मिळवून वाचायची असा अगदी आवडता उद्योग होता. माझ्या बरोबरच्या मुली मुख्यत्वे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या असल्याने हॉस्टेलमध्ये येणारी पुस्तकं इंग्लिशच असायची. तिथूनच मला इंग्लिश पुस्तक वाचनाची आवड लागली. त्यामुळे हॉस्टेलमध्ये आलेलं प्रत्येक पुस्तक आपण वाचलंच पाहिजे हा दंडक होता. अश्या ह्या पुस्तकांमध्ये अर्थातच Mills & Boon ची अनेक पुस्तकं असायची. बारावीत असताना ज्या पुस्तकांचे बारावीत असताना नुसते नाव ऐकले होते ती आता वाचायला सुरु केली. माझ्याकडे येणारी बहुतांशी पुस्तकं माझी मैत्रीण अनुप्रियाच्या मार्गे येत असत. म्हणजे बरीचशी पुस्तकं तिच्याकडे यायची आणि तिच्याकडून घेऊन मी नंतर वाचायची. तिचं वाचून झाल्यावर आपण कधी वाचणार ह्या कल्पनेने जीव कासावीस व्हायचा. पण अनुप्रियाला लवकर झोपायची सवय होती. आणि रात्री आम्ही आमच्या रूम्सना आतून कड्या न लावता झोपायचो. त्यामुळे १०:३० - ११ ला अनुप्रिया झोपली की हळूच तिच्या खोलीत जायचं आणि पुस्तक घेऊन यायचं. एक Mills & Boon चं पुस्तक वाचून संपवायला मला साडेतीन - चार तास लागायचे. तसं ते वाचून संपवायचं आणि सकाळी कॉलेजला जायच्या आधी तिला नेऊन द्यायचं असा उद्योग सुरु केला. अशी किती पुस्तकं वाचली त्याला सुमारच नाही. ही पुस्तकं वाचून माझी इंग्लिशची शब्दसंपदा वाढली. व्याकरण कळलं. कॉलेजच्या फुलपाखरी दिवसांना गुलाबी रंग लाभला. अगदी आता आणलेलं पुस्तक वाचल्यावरही, त्या रात्री मी स्वप्नात माझ्या होस्टेलची, त्या दिवसांची सैर करून आले. त्यामुळे 'ई... Mills & Boon' म्हणणाऱ्यांना इतकंच म्हणेन 'हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।' P.C. Internet
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3313 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

मस्त लिहीलय....

श्वेता२४
Sat, 08/17/2024 - 20:13 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मनस्विता
Sun, 08/25/2024 - 20:47 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

लिखाण आवडलं!

श्रीगणेशा
Fri, 08/23/2024 - 01:21 नवीन
लिखाण आवडलं! पण शेवटच्या "P.C. Internet" चा अर्थ कळाला नाही.
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

मनस्विता
Sun, 08/25/2024 - 20:48 नवीन
P.C. Internet - छायाचित्र इंटरनेटवरून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगणेशा

Picture Courtesy... PC

असंका
Sun, 08/25/2024 - 22:00 नवीन
Picture Courtesy... PC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्विता

मस्तच! आवडलं...मलापण इंग्लिश

Bhakti
Fri, 08/23/2024 - 08:31 नवीन
मस्तच! आवडलं...मलापण इंग्लिश पुस्तकं वाचायला वेळ लागतो.खरच कोथरूडचा तो सेल होता का? एका लायब्ररी सेलचा मेसेज खूप फिरत होता.अशा लायब्ररी बंद होणं दुःखदायक आहे पण दुर्मिळ पुस्तकं योग्य हाती पडणं महत्त्वाचे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

मनस्विता
Sun, 08/25/2024 - 20:50 नवीन
हो, ती लायब्ररी बंद झाल्याने त्यांनी पुस्तकं विकायला काढली आहेत. बहुतेक ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अच्छा!मला तो पत्ता व्यनि करता

Bhakti
Sun, 08/25/2024 - 22:03 नवीन
अच्छा!मला तो पत्ता व्यनि करता का?(डहाणूकर कॉलनी का?)तो मेसेज सापडत नाहीये.बहूतेक या आठवड्यातच तिथे जायला जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्विता

सापडला_/\_

Bhakti
Sun, 08/25/2024 - 22:07 नवीन
सापडला_/\_ लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८. वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील. संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७ फोन करून पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

नक्की जाऊन या.

मनस्विता
Mon, 08/26/2024 - 07:38 नवीन
कुठली पुस्तकं घेतली हे नक्की सांगा. आम्हाला पण अजून एक चक्कर मारायची आहे. तिथे अभ्यासाची पण खूप पुस्तकं आहेत. माझ्या मुलीला maths ची काही पुस्तकं मिळाली तर घ्यायची आहेत. विसरले होते. आता आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

भारीच लिहिलंय ....

भम्पक
Fri, 08/23/2024 - 16:22 नवीन
भारीच लिहिलंय ....
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मनस्विता
Sun, 08/25/2024 - 20:50 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

खूप अवघड आहे सगळं .

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 08/31/2024 - 23:09 नवीन
खूप अवघड आहे सगळं . मोबाइलने सगळं खाऊन टाकलंय .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा