Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user चामुंडराय
Submitted by चामुंडराय on Mon, 03/18/2024 - 02:05
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही. जिज्ञासूंनी Hard problem of Consciousness हा विषय गुगलोत्खनन करून पहावा. ह्या संदेश गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये डोळ्याचा म्हणजेच प्रकाशाचा महत्वाचा, सिंहाचा वाटा आहे. प्रकाश हा तरंग (wave) आणि पुंज (photon - particle) अशा दुहेरी स्वरूपातील (wavicle) इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन आहे. आपण आपल्या डोळ्याद्वारे ह्या स्पेक्ट्रम मधला अतिशय थोडा म्हणजे साधारणतः ४०० ते ७०० nanometer तरंग लांबीचा भाग (ता ना पि हि नि पा जां) पाहू शकतो. खालील चित्र पहा. तुमच्या लक्षात येईल की आपण 'प्रॅक्टिकली ब्लाइंड' आहोत. डोळ्यांच्या व्यतिरिक्त इन्फ्रा रेड - उष्णता, धग आणि अल्ट्रा व्हायोलेट - सन बर्न (डिलेड सेन्सरी रिस्पॉन्स) ह्या स्वरूपात त्वचेद्वारे प्रकाश जाणून घेता येतो. Prakash आंतरजालावरून साभार. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या बरोबरीने स्वतःभोवती देखील फिरण्याच्या गतीमुळे दिवस रात्रीचे म्हणजेच अंधार आणि प्रकाशाचे चक्र कोट्यावधी वर्षें अव्याहत चालू आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी उत्क्रांत होताना साहजिकच ह्या अंधार प्रकाशाच्या चक्राशी बांधली गेली आहे. अलीकडील काळातील वैज्ञानिक प्रगतीमुळे वीज आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागून रात्रीच्या अंधारावर प्रकाशाचे सावट पडले आहे. आपल्या शरीरामध्ये जैविक घड्याळ असून त्या घड्याळाप्रमाणे आपण दररोज शारीरिक, मानसिक आणि वर्तनाच्या स्थित्यंतरचक्रातून जात असतो त्याला सरकेडीयन ह्रिदम् / सायकल असे म्हणतात. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता असली तरी अतिरिक्त प्रकाशामुळे जैविक घड्याळावर अनिष्ट परिणाम होतो असे आता लक्षात आले आहे. डोळ्यांची जळजळ, रक्तदाब, निद्रानाशापासून ते अगदी स्थूलता, कॅन्सर आणि नैराश्यापर्यंतचा त्रास रात्रीच्या अतिरिक्त प्रकाशामुळे होऊ शकतो असे आता सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च संस्थेने रात्रपाळीचे काम हे probable human carcinogen आहे असे म्हटले आहे. तुलनेने अलीकडच्या काळात शोध लागलेले, सध्या डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट आणि डायट इंडस्ट्रीसाठी "इन थिंग" असलेले आपल्या पोटातील सूक्ष्म जीव (मायक्रोबायोटा) देखील सरकेडीयन चक्राशी बांधलेले असतात. प्रकाश प्रदूषणामुळे हे चक्र बिघडले तर मायक्रोबायोटावर अनिष्ट परिणाम होऊन विविध व्याधी जडतात असा दावा करण्यात येतो. रात्री स्क्रीन लाईट आणि अति तीव्र अशा प्रकाशामुळे मेंदूला अजूनही दिवस चालू आहे असा संदेश जाऊन झोप येण्यासाठी आवश्यक असणारे मेलोटॉनिन संप्रेरकाचे स्रवन थांबते त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. रात्रीच्या अनावश्यक प्रकाशामुळे जीवसृष्टीचे चक्र देखील बिघडते असे आढळून आले आहे. मानव हा पृथ्वीवरच्या समस्त जीवसृष्टीचा एक भाग आहे परंतु मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर जीवसृष्टीवर आक्रमण केले आहे. प्रकाश प्रदूषणामुळे निशाचर जीवांच्या जीवनात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरील तीव्र प्रकाशाच्या दिव्याभोवती असंख्य कीटक घोंघावताना दिसत आहे, स्थलांतर करणारे पक्षी मार्ग चुकत आहेत इतकेच नव्हे तर समुद्रकिनारी वाळूत अंडे फोडून बाहेर येणारी कासवाची नवजात पिल्ले समुद्राकडे जाण्याऐवजी किनाऱ्यावरील विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन समुद्राच्या अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत ही तर मोठी चिंतेची बाब आहे. अशा प्रकारच्या प्रकाशाच्या अनियंत्रित आकर्षणाला positive phototaxis असे नाव आहे. ह्याचे कारण अजून पुरते ज्ञात नाही. ज्योतिवर झेप घेऊन प्राणाहूती देणाऱ्या पतंगाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. "जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी । झड घालून प्राण देतो दिपकाचे वरी ।।" - होनाजी बाळा रात्रीच्या प्रकाशामुळे positive phototaxis सारखा परिणाम negative phototaxis मुळे सुद्धा होतो आणि जीव प्रकाशापासून लांब पळतात. जगभरात सर्वत्र घरोघरी आढळणारा गलिच्छ आणि किळसवाणा मिशाळ जीव (ओळखा पाहू) हा negative phototaxis चे उदाहरण आहे. रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाच्या झगमगाटामुळे 'अर्बन ग्लो' तयार होऊन रात्रीचे आकाश झाकोळून जाते आणि चमचमते तारे दिसेनासे होतात. आजकाल सर्वत्र कमी वीज वापरणारे आणि स्वस्त असणारे LED दिवे वापरतात. हे दिवे अति तीव्र पांढरा प्रकाश (high lumen) बाहेर फेकतात आणि आसमंत उजळून निघतो त्यामुळे कित्येक शहरवासीयांनी तर चमचमते आकाश कधी बघिलेलेच नसते. ह्या संदर्भात एक मजेशीर घटना घडलेली आहे. जानेवारी १९९४ मध्ये लॉसअँजेलिस् शहराला ६.७ रिष्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होऊन दिवे गेले आणि शहर पूर्णपणे अंधारात बुडाले. त्यामुळे प्रकाश प्रदूषण नाहीसे होऊन एलएचे आकाश असंख्य चमचमत्या ताऱ्यांनी उजळून निघाले आणि विशेष म्हणजे आपली मिल्कीवे आकाशगंगा स्पष्ट दिसू लागली. ते दृश्य पाहून आकाशातून एलियन्सनी हल्ला केला आहे (आणि त्यामुळे भूकंप झाला) असे समजून आणि घाबरून जाऊन एलएवासीयांनी तेथील आपत्कालीन सेवेला असंख्य फोन केले. अर्थात अमेरिकन् लोकांकडे बघता हे आश्चर्यजनक नाही ... म्हणजे, दोन त्रितीयांश अमेरिकन्सनी प्रकाश प्रदूषणामुळे एव्हढे स्वच्छ आकाश कधी बघितलेलेच नसते. आपल्याकडील शहरांची स्थिती अर्थातच काही फारशी वेगळी नाही. 'अर्बन ग्लो' मुळे आकाश निरीक्षकांना शहरातून आकाश दिसत नसल्याने, कृत्रिम उजेडापासून म्हणजे शहरापासून दूर जाऊन आकाश निरीक्षण करावे लागते. त्या बरोबरीने ज्यांना रात्रीच्या आकाशीय प्रकाश चित्रणाची आवड आहे असे हौशी प्रकाशचित्रकार ह्या समस्येने ग्रस्त आहेत. वेगवेगळे फिल्टर्स लावून देखील त्यांना चांगले प्रकाशचित्र मिळणे दुरापास्त झाले आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही खिडकीतून आकाशाकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल आणि या आधी पिठूर चांदणे पडलेले चांदणचुर आकाश कधी बघितले होते असा तुम्हाला प्रश्न पडेल. एखाद्या ठिकाणावरून दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशाची दृश्यमानता (brightness) मोजण्यासाठी Bortle Scale तयार करण्यात आले आहे. हे स्केल एकूण नऊ पातळ्यांचे आहे. पहिली पातळी स्वच्छ, दृश्यमान आकाशाची आहे (म्हणजे निम्न प्रकाश प्रदूषण) ते नववी पातळी ही अत्युच्य प्रकाश प्रदूषणाची (अर्बन ग्लो) असून त्या ठिकाणावरून आकाशातील ताऱ्यांचे दर्शन होत नाही. तुम्ही जेथे राहता तेथील ठिकाणाचे Bortle रेटिंग काय आहे हे शोधून आकाश निरीक्षण करावे म्हणजे ह्या समस्येची तीव्रता लक्षात येईल. सुदैवाने आता प्रकाश प्रदूषणाबाबत जागरूकता वाढत असून प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. इतर सर्व प्रदूषणांपेक्षा प्रकाश प्रदूषण कमी करण्यास तुलनेने सोपे आणि सहजसाध्य आहे. रस्त्यांवरील दिव्यांचे डिझाइन बदलून, दिवे बदलून आणि शहरातील विविध भागांतील प्रकाशमानता ठरवून (झोनिंग) हे करता येईल. International Dark-Sky Association ने ह्या संदर्भात काही मानके ठरवून दिली आहेत. लॅम्प शेड द्वारे प्रकाश फक्त रस्त्यांच्या दिशेला वळवणे, दिव्यांची luminosity कमी करणे, घराबाहेरील, दुकानांचे आणि ऑफिस बिल्डिंग्जचे दिवे रात्री १ ते सकाळी ७ वाजे पर्यंत बंद ठेवणे इत्यादी. वैयक्तिक पातळीवर घरातील दिवे गरज नसेल तर बंद ठेवणे, प्रकाशाची तीव्रता कमी करणे किंवा तीव्रता प्रसंगानुरूप बदलता येईल असे दिवे (dimmable) वापरणे असे उपाय करून प्रकाश प्रदूषण कमी करण्यास हातभार लावता येईल. त्यामुळे ऊर्जेची बचत आणि अर्थिक फायदा होऊन पर्यावरणाची वृद्धी होईल. "तमसो मा ज्योतिर्गमय" अशी प्रार्थना करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी प्रगत मानवाला रात्रीच्या वेळी प्रकाशमानता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी कल्पना देखील केली नसेल. वैज्ञानिक प्रगती करताना तारतम्य राखून पर्यावरणाची देखील काळजी घेतली तर पृथ्वी वरची सगळी मानवेतर जीव सृष्टी मानव जातीला दुवा देईल ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
  • 4390 views

प्रतिक्रिया

Submitted by रामचंद्र on Mon, 03/18/2024 - 08:14

Permalink

हा विषय कितीही गंभीर असला तरी

हा विषय कितीही गंभीर असला तरी आपल्याकडे या संदर्भात सार्वत्रिक जाण आणि प्रत्यक्ष कृती होणे फार कठीण आहे. अन्य प्रदूषणप्रकारांसारखेच याही बाबतीत व्यक्तिगत पातळीवरच आपण काय ते करू शकतो अशी परिस्थिती आहे. व्यवसाय करण्याच्या पद्धती आणि उत्सव हे दोन मोठे अडथळे यात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 03/18/2024 - 08:44

Permalink

माहितीपूर्ण लेखन

एका महत्त्वाच्या विषयावरचे माहितीपूर्ण लेखन भावले. तांत्रिक बाबी क्लिष्टता टाळून सहजपणे कळतील अशा लिहिल्या आहेत. नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी शहरी भागापासून लांब जाण्याचा अनुभव घेतला आहे. त्यावेळी शहरांच्या प्रकाश प्रदूषणाचा परिणाम काय असू शकतो हे अनुभवलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Mon, 03/18/2024 - 08:56

Permalink

एकदम मस्त लेख.शहरापासून जसं

एकदम मस्त लेख.शहरापासून जसं दूर जाऊ तसं रात्रीचा खरं , कृत्रिम प्रकाश विरहित आकाश अनुभवायला मिळतं. कोणत्याही तरी भयंकाराच्या दारात आपण आहोत हे अजूनही माणसाला समजले नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Mon, 03/18/2024 - 09:33

Permalink

खुप गंभीर विषय

प्रकाशाचे प्रदूषण ही फार गंभीर बाब आहे दुर्दैवाने या बाबत अजिबात जागृत नाही , त्यात आता स्वस्त एल इ डी मुळे अजुबाजूला रात्र भर असतो , मनशांती साठी अंधार शोधावा लागतो , जसा प्रकाश देणारा दिवा आसतो तसा आंधार देणारे एखादे उपकरण शोधावे लागेल आता , या कृत्रिम प्रकाशा मुळे रात्रीची झोप ही कठीण झाली आहे, एका चागल्या विषयास वाचा फोडली म्हणून मंडळ आभारी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 03/18/2024 - 09:59

Permalink

अतीशय सुंदर लेख.

कृत्रिम प्रकाश विझवून नैसर्गिक अंधार केल्याशीवाय माणसाला झोप येत नाही ही निसर्गाची सत्ता आजही अबाधित आहे याची प्रचिती. अप्रतिम लेखा बद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 03/18/2024 - 09:59

Permalink

अतीशय सुंदर लेख.

कृत्रिम प्रकाश विझवून नैसर्गिक अंधार केल्याशीवाय माणसाला झोप येत नाही ही निसर्गाची सत्ता आजही अबाधित आहे याची प्रचिती. अप्रतिम लेखा बद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Mon, 03/18/2024 - 10:20

Permalink

सुंदर लेखन. विस्तृत

सुंदर लेखन. विस्तृत प्रतिक्रिया सावकाश देतो
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 03/19/2024 - 09:46

Permalink

दुर्लक्षीत विषयाकडे

दुर्लक्षीत विषयाकडे लक्षवेधणारा चांगला लेख. मिणमिणत्या दिव्याची सर कशाला? पण मानवाला बहुधा एवढ्या शांततेची सवय राहीलेली नाही. ऑफीसेसमेध्ये कर्मचार्‍यांना झोप येऊ नये म्हणून भगभगीत दिवे प्रकाशमान केलेले असतात. मोठाली दुकानेच नाही तर पथारी दुकानदार सुद्धा मालाची विक्री वाढवण्यासाठी भगभगीत प्रकाशमान होत असताना दिसतात. वाहनांच्या दिव्यांचे झोताने होणार्‍या समस्येबाबत दोन पिढ्या आधीच्या गाडी चालकांना अल्पतरी जाण होती नव्यापिढीस तेही ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Tue, 03/19/2024 - 10:07

Permalink

प्रकाश प्रदूषण असे काही असू

प्रकाश प्रदूषण असे काही असू शकते हे लेख वाचेपर्यंत माहितीच नव्हते. छान लेख. महत्वाची माहिती सोप्या शब्दात मिळाली.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 03/21/2024 - 19:22

In reply to प्रकाश प्रदूषण असे काही असू by सौंदाळा

Permalink

सेम पिंच…

प्रकाश प्रदूषण असे काही असू शकते हे लेख वाचेपर्यंत माहितीच नव्हते.
सेम पिंच… मलाही असे काही असू शकते हे लेख वाचेपर्यंत माहिती नव्हते 😀 माहितीपूर्ण लेख खुप आवडला 👍
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Sat, 03/23/2024 - 01:33

In reply to सेम पिंच… by टर्मीनेटर

Permalink

निद्रानाशाचा त्रास झाल्यावर त्यावरील उपायांचा शोध घेत असताना

टर्मिनेटर सर, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला तीव्र आणि भगभगित प्रकाशाचा पूर्वीपासूनच तिटकारा आहे. पुढे निद्रानाशाचा त्रास झाल्यावर त्यावरील उपायांचा शोध घेत असताना प्रकाश प्रदूषणाबद्दल कळले आणि त्या संदर्भात वाचन झाले. प्रप्र कमी करण्याच्या अनुषंगाने काही उपाय योजना केल्या तेव्हा पासून ह्या विषयावर लिहिण्याचे डोक्यात होते. थोडेफार लिहूनही ठेवले होते. कुमारेक सरांचा "लेखक घडतो कसा" लेख वाचून हा लेख लिहून पूर्ण केला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Tue, 03/19/2024 - 19:25

Permalink

आपल्या प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार.

आपल्या प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Tue, 03/19/2024 - 19:29

Permalink

झिरपणारा प्रकाश (light trespass)

वरील लेखात एक मुद्दा लक्षात घ्यायचा राहिला तो म्हणजे झिरपणारा प्रकाश (light trespass). रात्रीच्या वेळी जेव्हा अनावश्यक प्रकाश घरात येतो त्यास लाईट ट्रेसपासिंग असे म्हणतात. नगरपालिकेने रस्त्यांवर लावलेला दिवा, आजूबाजूच्या परिसरातील एखादी दुकाने, ऑफिसेस् असणारी प्रकाशाने उजळून निघालेली झगमगीत इमारत किंवा तुमच्या शेजाऱ्याने घराबाहेर लावलेला प्रखर दिवा ही प्रकाश झिरपण्याची कारणे आहेत. ह्यांवर सर्व प्रथम अतिरीक्त प्रकाश निर्माण करणारी कारणे कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि ते शक्य नसेल तर घराच्या खिडक्यांना प्रकाशाला प्रतिबंध करणारे पडदे लावावेत ज्यामुळे प्रकाश झिरपण्याचे प्रमाण कमी होईल. कित्येकदा झोपताना पूर्ण अंधार करणे शक्य नसते उदाहरणार्थ विमान अथवा रेल्वे प्रवास किंवा घरातील इतर सदस्यांना काही कामे असताना तुम्हाला मात्र झोपायचे आहे अशावेळी दोन्ही डोळे झाकणारा ब्लॅकआऊट स्लीपिंग आय मास्क वापरावा. मास्कमुळे व्यक्तिगत पातळीवर लख्ख काळोख (pitch dark) होऊन तसा संदेश मेंदूला जातो आणि मेलोटॉनिनचे स्रवन चालू होते. मास्क आरामदायी, बाहेरील प्रकाशाला प्रतिबंध करून दोन्ही डोळे व्यवस्थित झाकणारा आणि योग्य प्रमाणात घट्ट बसेल (adjustable strap) असा असावा. व्यक्तिगत पातळीवर अंधार तयार करायला अतिशय उपयुक्त असून power nap किंवा मेडिटेशन करतानाही वापरता येतो. त्याच्या स्वच्छतेची मात्र योग्य ती काळजी घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 03/19/2024 - 19:57

Permalink

अतिशय उत्तम लेख.

अतिशय उत्तम लेख. केवळ प्रकाशाचे प्रदूषण एवढाच हा मुद्दा नाही. रात्री शहरात बहुसंख्य लोकांना बाहेरचा प्रकाश येऊ नये म्हणून दारे आणि खिडक्या बंद ठेवावे लागतात. जाड पडदे लावावे लागतात . ( याशिवाय बाहेरचा आवाज कमी करण्यासाठी सुद्धा दारे आणि खिडक्या बंद ठेवावे लागतात) यामुळे येणार प्रकाश कमी होतो परंतु हवेचे अभिसरण बंद होते. यामुळे शयनकक्षाच्या आत मध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त होते आणि सकाळी उठल्यावर झोप अपूर्ण झाल्याची भावना असते आणि ताजे तवाने वाटतं नाही. हीच माणसे आपल्याच गावी गेल्यावर घराच्या छतावर झोपल्यावर झोप छान लागते आणि सकाळी लवकर जाग आली तरी झोप झाली नाही किंवा अपुरी झाल्याची भावना अजिबात येत नाही. हा अनुभव आपल्या सर्वाना आलेला असेलच. बऱ्याचशा गावांमध्ये एकंदर बाहेरचा प्रकाश कमी असतो त्यामुळे रात्री झोप चालवली जाण्याचे प्रमाण कमी असते. शहरात दारे खिडक्या उघडी ठेवता येत नाही गच्चीत झोपायला गेल्यास बाहेरील आवाज आणि प्रकाशामुळे लवकर झोप येत नाही. यामुळे माणसे आपल्याच घरात दारे खिडक्या बंद ठेवून झोपणे पसंत करतात. याशिवाय दूरदर्शन संगणक किंवा भ्रमणध्वनी यांच्या पडद्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे शहरी माणसांची झोप अपुरी अर्धवट होत असल्यामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. ज्याची सात तास नीट झोप होत नाही अशा रुग्णांचा मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात आणणे जास्त कठीण असते असे सिद्ध झालेले आहे. झोप नीट झाली नाही तर लठ्ठपणा येतो, हृदयविकार नैराश्य आणि दमा हे विकार होतात/ बळावतात हेही सिद्ध झालेले आहे. जे लोक खिडकीला लावलेले वातानुकूलन यंत्र वापरतात त्यांनी शक्य असले तर त्याचा नियंत्रक फ्रेश एअरवर ठेवावा. म्हणजे बाहेरून आत येणारी ताजी हवा आपली झोप पूर्ण आणि जास्त चांगल्या दर्जाची करून देईल. आणि जे लोक स्प्लिट ए सी वापरतात (यात फ्रेश एअर चा पर्याय नसतो) त्यांनी खोली गार झाल्यावर मध्यरात्री जर दारे/ खिडक्या उघडल्या तर जास्त ताजी हवा मिळून झोप चांगली होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Fri, 03/22/2024 - 23:27

In reply to अतिशय उत्तम लेख. by सुबोध खरे

Permalink

कर्ब-द्वि-प्राणिल वायूचे प्रमाण वाढत असेल हा मुद्दा

डॉ. साहेब, तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. रात्री दारे खिडक्या बंद करून झोपल्यास कर्ब-द्वि-प्राणिल वायूचे प्रमाण वाढत असेल हा मुद्दा लक्षात आला नव्हता. थंड प्रदेशात तर दारे, खिडक्या फक्त बंद करत नाहीत तर एअर टाईट करतात. थोडी देखील बाहेरील हवेची झुळूक घरात येऊ देत नाहीत. त्यामुळे वायूविजनासाठी घराच्या छपरावर व्हेंटिलेटर लावतात. घरात तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी उपकरणे असतात परंतु O२ किंवा CO२ मोजण्याची घरगुती वापरासाठीची उपकरणे पाहिली नाहीत, शोध घ्यावा लागेल. स्मोक आणि CO (कार्बन मोनॉक्साइड) साठीचे अलार्म सर्वत्र असतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 03/21/2024 - 17:59

Permalink

ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात

ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही. जिज्ञासूंनी Hard problem of Consciousness हा विषय गुगलोत्खनन करून पहावा.
मस्त! एका मोठ्या लेखमालेचा विषय आहे हा. बाकीचा लेख उत्तम आहे. - (रात्रीचा प्रकाश टाळण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Mon, 03/25/2024 - 02:04

In reply to ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात by सोत्रि

Permalink

यू-ट्यूब वर स्वामी सर्वप्रियानंद ह्यांचे ह्या विषयावरचे अनेक व्ह

सोत्रिजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. खरंच, ह्या विषयावर एक लेखमाला लिहायला घ्या. यू-ट्यूब वर स्वामी सर्वप्रियानंद ह्यांचे ह्या विषयावरचे अनेक व्हीडिओज् उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Sat, 03/23/2024 - 01:48

Permalink

एक अगदी सार्वत्रिक उदाहरण

एक अगदी सार्वत्रिक उदाहरण म्हणजे दुचाकी/चारचाकी वाहनांचे हेडलाईट. खरं तर त्यामुळे डोळे दिपून जाऊ नयेत म्हणून नियमानुसार त्यांच्या मध्यभागी काळा ठिपका आवश्यक आहे. पण किती वाहनांना अगदी अधिकारी/मंत्रीगण अशांच्यासुद्धा वाहनांना असा काळा ठिपका आपल्याला दिसतो? आणि दुकानांच्या पाट्या उठून दिसाव्यात म्हणून जे आजकाल एकेक चौरस फुटाचे फ्लड लाईट लावण्याची प्रथा सुरू झाली होती तिची प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. एकूणच भडकपणा, बटबटीतपणा, निसर्गाच्या मुळावर उठण्याची वृत्ती हे आपल्या समाजाचे ठळक वैशिष्ट्य होत चाललंय असं वाटतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Mon, 03/25/2024 - 02:16

Permalink

वाहनांचे प्रखर हेडलाईट्स रात्रीच्या प्रवासात धोकादायक ठरू शकतात.

इतर प्रकारच्या प्रकाश प्रदूषणामुळे सुरक्षिततेला थेट धोका नसला तरी वाहनांचे प्रखर हेडलाईट्स रात्रीच्या प्रवासात धोकादायक ठरू शकतात. डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता वाढते. आपण फार तर अँटी-ग्लेअरचा चष्मा वापरू परंतु समोरच्या वाहनाने समंजसपणा दाखवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 03/25/2024 - 07:03

Permalink

प्रखर हेडलाईट्स!

वाहनांचे प्रखर हेडलाईट्स यात तीन अनुभव येतात १) सतत मुद्दामून हाय बीम वर ठेवणारे उद्दाम महाभाग ( त्याबद्दल काही नियम नाहीत का?) दिव्याच्या मध्ये काळा ठिपका रंगवणे हे आज काळ चालू -जरुरी असते का? २) संमोरुन येणारी गाडी उंच असली ( ४ व्हील ड्राईव्ह किंवा बस/ ट्रक ) तर ( साहजिक आहे त्यांचे दिवे जमिनी पासून सर्वसाधारण गाडी पेक्षा उंचावर असणार मग साध्या गाडीच्या चालकाला त्रास होणारच ) ३) गेल्या काही वर्षात गाडीचे दिवे फ्लुरो असतात ते फार भागाभगीत वाटतात ( जरी हाय बीम नसेल तरी )
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com