कर्म विपाक सिद्धांत
कर्म विपाक सिद्धांत
‘कर्म’ हा शब्द माहीत नसलेला भारतीय मनुष्य विरळाच म्हणावा लागेल. आपल्या सर्वांच्या मनात पाप-पुण्य, कर्म, प्रारब्ध, संचित, दैव, नियती वगैरे विचार कधीनाकधी येतातच. चार्वाक सोडून हिंदू धर्माच्या सर्व परंपरा – बौद्ध, जैन सुद्धा – कर्मसिद्धांत मानतात. चार्वाकांचा कर्म विपाक सिद्धांताला विरोध आहे आणि एकप्रकारे त्यांचा विचार कर्म विपाक सिद्धांताभोवतीच फिरतो. त्यामुळे हिंदूंच्या हजारो वर्षांचे विचाराचे एक फलित (pun intended) म्हणून कर्म विपाक सिद्धांत समजून घ्यावा लागतो.
कर्म विपाक सिद्धांत थोडक्यात –
मनुष्याच्या प्रत्येक कर्माला दोन प्रकारचे परिणाम (फले) मिळतात – दृश्य आणि अदृश्य. जे दृश्य परिणाम असतात त्यातून मनुष्याला सुख आणि दु:ख प्राप्ती होते. जेंव्हा परिणाम अपेक्षेनुसार अथवा अपेक्षेपेक्षा जास्त असतो, तेंव्हा शक्यतो सुखाची निर्मिती होते. याउलट, परिणाम अपेक्षेपेक्षा कमी असतो, तेंव्हा शक्यतो दु:खाची निर्मिती होते. मनुष्याच्या कृतीचे दोन प्रकार आहेत – धार्मिक व अधार्मिक. भारतीय संस्कृतीत यज्ञ-याग यांना प्राधान्य होते, तेंव्हा धार्मिक कृत्यांमध्ये यज्ञाला प्रमुख स्थान होते. पुढे विविध परंपरा विकसित झाल्या आणि धार्मिक कर्माची कक्षा रुंदावली. आधुनिक काळात धार्मिक या शब्दाचे religious आणि moral असे दोन अर्थ आहेत. मूळ सनातन धर्मात धर्म म्हणजे – धारयति इति धर्म व अहिंसा परमो धर्म. सर्वकाही (व्यक्ति-समष्टि) धरून ठेवणारा तो धर्म आणि कमीतकमी हिंसेचा मार्ग म्हणजे धर्म. मनुष्याने धार्मिक असणे म्हणजे – आजुबाजूच्या सर्व जीवित-निर्जीव वस्तूंवर माझ्या कृतीने काय परिणाम होईल याचा विचार करून कमीतकमी हिंसेचा मार्ग स्विकारत कर्म करणे. यालाच कर्तव्य असे म्हणतात. चार पुरुषार्थातील धर्म पुरुषार्थ मनुष्याला सर्वसमावेशक कृती निवडण्यासाठी सतत मार्गदर्शन करतो. अर्थ (security या अर्थी) आणि काम (सुखप्राप्ती या अर्थी) हे दोन पुरुषार्थ, धर्म आणि मोक्ष या दोन पुरुषार्थांच्या मर्यादेत साधायचे आहेत ही सनातन धर्माची मूळ शिकवण आहे. संपूर्ण समाजरचना या भोवती केलेली आहे. आधुनिक काळात व्यक्तीकेंद्रित व्यवस्थेमुळे ‘कर्तव्यापेक्षा हक्क महत्वाचे बनले आहेत आणि त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक नीतीमूल्ये निर्माण करावी लागली आहेत. वैयक्तिक नीतीमूल्य म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत morality म्हणतो आणि सामाजिक नीतीमूल्यांना ethics म्हणून ओळखतो. सनातन धर्म व्यक्ति-समष्टिचा सखोल विचार करत असल्याने, नैतिकता - ethics आणि morality - हे आधुनिक मूल्य सनातन धर्मात स्वतंत्रपणे येत नाही, धर्म या विचारात नैतिकता अंतर्भूत झालेली आहे. सनातन धर्म आणि आधुनिकता यातला फरक समजला नाही तर आपण सतत आधुनिकतेच्या चष्म्यातून सनातन धर्माचा विचार करत राहतो आणि इथे गोंधळ व्हायला सुरुवात होते. धर्म म्हणजे ज्याला इंग्रजीत रिलीजन म्हणतात तो की नीतीमूल्याने वागणे हा प्रश्न पडत असेल तर हे समजून घ्यावे की आपण आधुनिकतेच्या चष्म्यातून सनातन धर्माचा विचार करत आहोत. आधुनिकतेच्या दृष्टीने रिलीजन म्हटले की कर्म-कांडे येतात आणि ‘आता यांची गरज नाही’ असा एक समज करून दिला जातो, ज्याला लगेच श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटतात. आधुनिकतेने वागणे म्हणजे ‘नीतीमूल्याने वागणे’ म्हणजे morality-ethics ने वागणे अपेक्षित असते.
आधुनिकतेतून कर्म विपाकाचा विचार करायचा असेल तर तशी काही गरज नाही. स्वघोषित आधुनिकतेच्या विचाराने पाहता कर्म विपाक सिद्धांत थोतांड आहे हा निष्कर्ष गृहीत असतो. चर्चा फक्त ते गृहीतक सिद्ध करण्यासाठी असते. कारण ‘आधुनिक’, ‘शास्त्रीय’ या शब्दांनी हे लगेचच सिद्ध होतं की जे जे विचार आधुनिक जग निर्माण होण्यापूर्वीचे आहेत, ते ते विचार मागासलेले आहेत.
‘आधुनिक’ हा शब्द स्वत:बरोबर अशी एक स्वघोषित कसोटी (criterion) घेवून येतो की ज्या कसोटीतून पुरोगामी-प्रतिगामी अशी विभागणी सहज करता येते. आधुनिक आणि ओघाने वैज्ञानिक विचार (reasoning) यांत फरक केला जात नाही कारण Modernity has appropriated scientific thinking. आधुनिकतेने वैज्ञानिक विचारावर अशी मालकी दाखवली आहे की जणूकाही आधुनिकतेशिवाय विवेकपूर्ण विचार करणेच शक्य नाही. ‘आधुनिक’ हा शब्दच सर्व ज्ञानाचे ध्रुवीकरण करून टाकणारा शब्द आहे. ध्रुवीकरण कसे होते ते पहा – कोणताही विचार आधुनिक आहे की नाही हे आम्ही कसे ठरवतो? आम्ही सर्वप्रथम स्वत:कडे न्यायाधीश म्हणून पाहतो. आधुनिक काळात आम्हाला मत देण्याचा अधिकार असल्याने आमच्या मनात दोन गोष्टी पक्क्या आहेत १) आम्हाला सर्व गोष्टीत बिनदिक्कतपणे - पात्रता असो वा नसो – विशेषतः पात्रता नसताना मत देण्याचा अधिकार आहे. आणि २) आमचे मत हे ‘एक योग्य मत म्हणून गणले जावे’ या हक्काची स्वघोषित जाणीव असते. ही जाणीव त्याच आधुनिकतेच्या व्यक्तीवादाच्या भूमिकेतून येते. व्यक्तीवाद – ‘मला अमुक-ढमुक वाटतं – यावर आधारित असतो. व्यक्तीवादाला कोणत्याही परांपरांचं वावडं असतं, त्यात अर्हता (qualification – अधिकार) हा मुद्दा गौण बनतो किंवा बाद केला जातो. वैज्ञानिक विचार (scientific temperament) हा आधुनिकतेचा एक विशिष्ट वरकरणी देखावा असावा अशी सध्याची अवस्था आहे. यातून परंपरेतून आलेल्या सर्व गोष्टींना कचऱ्याची टोपली दाखवायची सोय होते. कोणत्याही मुद्द्याला ‘सायंटिफिकली सिद्ध करा’ असा पवित्रा घेता येतो पण खरा उद्देश युरोपियन विचारानुसार जे सायन्स निर्माण झालं आहे त्यातल्या कुणी याला सिद्ध केलं आहे का हे शोधणे हा हेतू असतो.
कर्म विपाक सिद्धांताचा विचार करताना ही सनातन धर्म – चार पुरुषार्थ – ethics-morality – आधुनिकता-वैज्ञानिक विचार ची लांबड कशाला लावली तर त्याशिवाय आपल्या विचाराची चौकट ही सनातन धर्माची असली पाहिजे हे लक्षात यावे यासाठी. आता या पार्श्वभूमीवर आपण कर्म विपाक सिद्धांताचा विचार करूया.
कर्मविपाक सिद्धांत –
१. मनुष्याच्या प्रत्येक कर्माला दोन प्रकारचे परिणाम (फले) मिळतात – दृश्य आणि अदृश्य. दृश्य परिणामातून सुख आणि दु:ख निर्मिती होते.
२. कर्म करण्याचे दोन पर्याय मनुष्यापुढे असतात – धार्मिक आणि अधार्मिक. धार्मिक म्हणजे कमीतकमी हिंसेचा मार्ग स्वीकारून जे श्रेयस आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. आणि अधार्मिक म्हणजे ज्यातून इतर व्यक्ति-समष्टिवर दुष्परिणाम होवू शकतात, पण त्याची चिंता न करता जे श्रेयस आहे ते मिळवण्या साठी सोपा मार्ग वापरणे. इथं पुण्य आणि पाप यांचा उगम होतो.
३. धार्मिक कर्माने पुण्य मिळते आणि अधार्मिक कर्माने पाप! पाप-पुण्य फल हे सूक्ष्मात असते. म्हणजे अदृश्य कर्मफल असते. पाप आणि पुण्य यांच्या राशी बनतात. या राशींना ‘संचित’ कर्म म्हणतात.
४. मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचे दृश्य फल हे पूर्वीच्या पाप-पुण्यावर अवलंबून असते. परंतु पाप आणि पुण्य ही कधी फलित होतील याचा नियम नाही. त्यामुळे दृश्य फल जर अपेक्षेपेक्षा कमी अथवा जास्त आले तर कोणते पाप (फल कमी करण्यास) किंवा पुण्य (फल वाढवण्यास) कारणीभूत ठरले याचा नियम नाही.
५. सर्व अदृश्य फले मनुष्याच्या एकाच आयुष्यात फलित होतील याचा नियम नाही. इथे पुनर्जन्म असला पाहिजे असा अनुमान काढतात.
६. आता पुनर्जन्म व्हायचा असेल तर, स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांचा अनुमान करावा लागतो. कारण स्थूल शरीर येवून जर कर्म फल भोगणार असेल तर, भोगणारा या स्थूल शरीरात असला पाहिजे जो पूर्वीच्या शरीरातून मृत्यूनंतर बाहेर पडला असला पाहिजे, याला सूक्ष्म शरीर म्हणतात. लिंग शरीर असेही म्हणतात. सूक्ष्म म्हणायचं कारण ते दिसत नाही, पण अनुमानाने मानावे लागते. सूक्ष्म शरीर निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे ‘कारण शरीर’ मानावे लागते. या ‘कारण’ शरीरावर मनुष्याच्या सर्व कर्मांचे संस्कार (impressions या अर्थी) होतात. पाप-पुण्याच्या राशी त्या ह्याच! हिंदू धर्मात जन्म-मृत्यू हे चक्र सतत सुरु असते हे जे मानले जाते त्यामुळे कोणताही जन्म हा संचितांमुळे निर्माण होतो हा अनुमान काढावा लागतो.
७. संचित कर्म हे पाप-पुण्याच्या अनंत राशीनी भरलेले आहे. जीवाचा जन्म होताच या अनंत राशीपैकी जेव्हडा भाग त्या जीवाला मिळतो त्यावर त्या जीवाचे आयुष्यमान ठरते. या मर्यादित राशींना ‘प्रारब्ध’ म्हणतात. म्हणजे आपले आयुष्यमान हे प्रारब्ध भोंगेपर्यंत असते. ज्या क्षणी प्रारब्ध संपते, तिथे स्थूल शरीराचा त्याग करून सुक्ष्म शरीर कारण शरीरासकट नवीन स्थूल देहाच्या शोधार्थ बाहेर पडते. प्रारब्धामुळे मनुष्याला सुख-दुखा:चा अनुभव येतो.
८. मनुष्याचे स्थूल आणि सूक्ष्म शरीर त्रिगुणाने बनलेले असल्यामुळे, त्या गुणांच्या प्रादुर्भावाने मनुष्यात आवड-निवड (गीतेत याला राग-द्वेष म्हटलेले आहे) असते आणि कोणतेही कर्म करताना कर्म निवडीचे स्वातंत्र्य असते. या कर्म निवडीतून नवीन कर्म उदयास येते. मनुष्य कर्माचे दृश्य परिणाम भोगतो व अदृश्य परिणाम नवीन कर्माची निर्मिती करतात (संचित-प्रारब्ध).
९. मनुष्य सोडून इतर सजीवात कर्म निवडीचे स्वातंत्र्य अतिशय कमी प्रमाणात असते. त्यामुळे प्राण्यांना केवळ प्रारब्ध व फलभोग आहेत.
अशा प्रकारे कर्म सिद्धांत, पुनर्जन्म आणि फ्री विल (कर्म करण्याचे मनुष्याला असलेले स्वातंत्र्य) यांचा संबंध येतो.
कर्म विपाक सिद्धांत आणि प्रश्न
१. कर्म विपाक मनुष्यात निष्क्रियता निर्माण करतो का?
भगवंताने गीतेत याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥ अर्थात, ‘कर्म करणे मनुष्याच्या हातात आहे तथापि मनुष्य केलेल्या कर्माचे त्याला हवे तसे फल स्वत:च मिळवू शकत नाही. (ईश्वर हा कर्मफल दाता आहे.) पण केवळ हवे ते फल मिळणे हातात नाही यामुळे मनुष्याने कर्मच न करणे हा मार्ग स्वीकारू नये.’ बहुतेक वेळा या श्लोकाचा अर्थ, ‘कर्म कर पण फलाची अपेक्षा धरू नकोस’, असा केला जातो जो चुकीचा आहे. काही ठिकाणी ‘कर कर पण फलावर तुझा अधिकार नाही’, असा केला जातो, तोही चुकीचाच. कधी ‘अधिकार’ या शब्दाचा अर्थ हक्क असा केला जातो, तोही चुकीचा आहे. मुळात प्रेरणा नसेल तर कोणीही काहीही करायला कशाला तयार होईल? ईप्सित साध्य करण्यासाठी सर्वंकष विचार करून सर्वप्रकारची तयारी करावीच लागते आणि त्यानुसार पावले उचलावी लागतात. व्यवहारात आपण हेच करतो. आणि आपल्याला हेही माहिती असतं की प्रत्येकवेळी आपण जे मनाशी धरून कार्य करायचे ठरवतो ते जसेच्यातसे घडत नाही. गीतेत हेच सांगितले आहे. फक्त चुकीच्या भाषांतरांमुळे भगवतगीतेच्या या श्लोकाला बोल लावले जातात. दुसरे म्हणजे, अधिकार यांचा अर्थ ‘अर्हता – qualification’ असा आहे. या श्लोकातून भगवंत मनुष्याला कर्म निवडीचे स्वातंत्र्य आहे हे शिकवतो. पुढे अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला ‘इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥‘ असे म्हणतो. अर्थात, ‘हे गुह्यतम ज्ञान मे तुला सांगितले, आता यांचा विचार करून तुझी इच्छा असेल तसे कर.’ ‘यथेच्छसि तथा कुरु´- म्हणजे जशी तुझी इच्छा असेल ते कर’. इतरही काही ठिकाणी निष्क्रियतेने मनुष्य राहुच शकत नाही असे विवेचनही भगवंत करतो. एकूण काय तर गीतेच्या श्लोकातून कर्म निवडीचे स्वातंत्र्य सनातन धर्मात आहे हे सिद्ध होते.
२. कर्म विपाक मनुष्याला ज्या दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचे समर्थन करतो का? आणि आधीच हतबल असलेल्याला ‘याला तूच कारणीभूत आहेस, मग भोग आपल्या कर्माची फळं!’ अशी संभावना करतो का?
हा प्रश्न ‘वाईट, अधार्मिक लोक मजेत जगतायंत आणि गरीब, समजूतदार, सज्जन लोकांना मात्र त्रास सहन का करावा लागतो?’ असाही विचारला जावू शकतो. कधीकधी तर रागात किंवा उद्विग्नतेने प्रसंगोपात्त प्रश्न उभे केले जातात, जसे की, ‘एखाद्या स्त्री वर बलात्कार झाला तर कर्मविपाक सिद्धांतानुसार ते तिचे भोग आहेत आणि पूर्वीच्या जन्मातल्या कृत्याचे हे फल तिने भोगले पाहिजे, त्यात काय चुकीचे?’ एकूणच कर्मविपाकानुसार मनुष्याला सुख-दु:ख अनुभवास येते, पण अशा दुर्दैवी घटना दाखवून मूळ सिद्धांत या दुर्दैवी घटनांचे समर्थन करून अन्याय कारक आहे असं चित्र निर्माण केलं जातं. यातून सनातन धर्म विचार कालबाह्य झालाय, तो अन्यायकारक आहे हे ठसवायचं असतं. मुळात, कर्मविपाकात कुठलंही समर्थन नाही आणि ज्या व्यक्तीने अधार्मिक कृती केलेली आहे, अशा व्यक्तीला कर्मविपाकाच्या आड लपून आपल्या कृत्याची जवाबदारी टाळता येत नाही. अधार्मिक व्यक्तीला दंड देवू नये आणि दु:खी व्यक्तीचे दु:ख दूर करू नये असं कर्मविपाक सिद्धांत शिकवत नाही आणि असे सुचवतही नाही. कर्मविपाकातून वर्णव्यवस्थेचा पुरस्कार आणि सामाजिक न्याय हा तर म्हणजे भलताच बहकलेला विषय आहे. त्यावर वेगळे लिहावे लागेल.
३. कर्म विपाकाचा मनुष्याला काय उपयोग?
कर्मविपाक सिद्धांत आणि त्या अनुषंगाने पुनर्जन्म, पाप-पुण्य हे विषय केवळ मोजमाप करून सिद्ध करू म्हटले तर सिद्ध करता येत नाहीत किंवा नाकारू म्हटले तर नाकारताही येत नाहीत. सनातन विचाराच्या चौकटीत कर्म विपाक, पुनर्जन्म आणि पाप-पुण्य मनुष्याला जबाबदार (accountable) बनवतात. यातून दुर्दैवी, दुर्धर आणि दु:खी परिस्थिती बदलत नाही पण मनुष्याला स्थिरचित्त राहून संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतो. कर्मविपाक हा सर्वांना एकसारखा लागू होतो. आणि त्यामुळे न्याय्य आहे. हा विश्वास मनुष्याला सनातन विचाराच्या चौकटीत मिळतो. पुनर्जन्म न मानता कर्मविपाकाचा विचार केला तर असा विश्वास निर्माण होणे शक्य नाही. पाप-पुण्याचा विचार मनुष्याला कर्तव्य करण्यास भाग पाडतो आणि मनुष्य धार्मिक बनतो. मराठीत आपण सहज म्हणतो – ‘देह ठेवला’, ‘या जन्मी इतकंच...’ – यातून या जन्माचे सार्थक करून ईश्वरेच्छेनुसार पुढील जन्माची वाटचाल करण्यास तयार होणे हा एक परिपूर्ण विचार स्वीकारला जातो. शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणत प्रत्येक मनुष्य जन्मात मुक्तीची साधना करणे हा प्रगल्भ विचार मनुष्याला तारुन नेतो.
४. कर्मविपाक, पुनर्जन्म, पाप-पुण्य सिद्ध करता येत नाही म्हणून ही सर्व थोतांड आहे का?
आता पाप-पुण्याचा विषय सुरू झाला की लगेच, ‘ते कुठं जमा होतं’, ‘त्याचा हिशोब कोण ठेवतं’ वगैरे प्रश्न सुरू होतात. कारण आपण आपली अशी समजूत करून घेतो की जणू काही मासिक/वार्षिक जमा-खर्च ताळेबंदासारखा एखादा तक्ता आपल्याला ‘प्रत्यक्ष’पणे पाहायला, तपासायला मिळेल आणि या एकमेव निकषावर जर कर्म विपाक सिद्धांत खरा ठरला तरच तो खरा, नाहितर थोतांड म्हणायला आम्ही मोकळे! तसंच पुनर्जन्माचा ‘प्रत्यक्ष’ पुरावा काय? कोणत्या जन्मातल्या कोणत्या कृत्याची मला सजा मिळते आहे? याला तार्किक प्रमाण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
थोडा विचार केला तर, ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हे काही भरवशाचे (reliable) प्रमाण नाही आणि आपण सर्व गोष्टी ‘प्रत्यक्ष’ प्रमाणाने मान्य करतो असेही नाही हे सहज समजण्यासारखे आहे. आयुष्यभर आपण ज्यांना आपले आई-वडील म्हणतो, त्यात आपल्या कडे कोणता असा प्रत्यक्ष पुरावा असतो? दोन व्यक्ति लहानपणापासून आपल्यावर प्रेम करतात, आजू-बाजूचे लोक वेगवेगळी कौटुंबिक नाती जोडतात, आपल्याला त्यांची सवय होते. थोडं कळायला लागल्यावर आपल्याला समजते की आपली जन्म तारीख – जन्म वेळ अमुक-अमुक आहे आणि याचं ‘प्रमाण’ म्हणजे आपला जन्माचा दाखला! जो दाखला पालिकेच्या कुणी एका क्लार्क ने कुण्या डॉक्टर-नर्स च्या सांगण्यावरून बनवलेला असतो, ज्याला आपण ओळखत नसतो. स्वत:चा जन्म याच आई-बापाच्या पोटी झाला याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्या कडे नसतो. पण व्यवहारात याने काही फरक पडत नाही. आई-बापाचं निर्व्याज प्रेम आणि कुटुंबाची मायेची ओढ यातून आपल्याला आपण कुटुंबाचा भाग आहोत ही ‘समज’ आपल्याला असते आणि ती पुरेशी असते. व्यवहारात आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेतो आणि वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग घेतो. आपण याच आई-बापाच्या पोटी जन्मलो याचा ‘प्रत्यक्ष’ पुरावा आपल्या कडे नसतानाही आपलं आयुष्य सुरू असतं कारण ‘हेच माझे आई-वडील याचं ज्ञान स्वस्थापित असते’, त्याला दुसऱ्या ‘प्रमाणा’ची गरज नसते. याचा अर्थ एव्हढाच की, ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हे परिपूर्ण प्रमाण नाही आणि त्याचा हट्ट धरणे म्हणजे कोणत्याही विषयाचे क्षुल्लकीकरण करणे.
गीतेत भगवंत म्हणतो - यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ १६-२३ ॥तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥, अर्थात, ‘जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे.’
इतिश्री ॐ नमो नारायणाय
वाचने
12437
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
#पिटेगासाला
वैज्ञानिक विचार (scientific
In reply to वैज्ञानिक विचार (scientific by कॉमी
‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या
In reply to ‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या by अभिजीत
‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या
In reply to ‘कर्मविपाक सिद्धांत आणि त्या by कॉमी
'मग बेसिस काय राहिला तुमच्या
In reply to 'मग बेसिस काय राहिला तुमच्या by अभिजीत
तुम्ही फॅक्ट किंवा फिक्षन
In reply to तुम्ही फॅक्ट किंवा फिक्षन by कॉमी
अश्या वेळेस काय आधारावर fact
विपाक अनुभवाला येत नाही
In reply to विपाक अनुभवाला येत नाही by कंजूस
आम्हाला विपाक अनुभवाला येतो
मर्मग्राही लेख
कर्मसिद्धांत आणि जबाबदारी
In reply to कर्मसिद्धांत आणि जबाबदारी by नठ्यारा
नठयारा,
दोन सणसणीत पुरावे, पण ....
In reply to दोन सणसणीत पुरावे, पण .... by चित्रगुप्त
स्वत:प्रमाण की परत:प्रमाण
In reply to दोन सणसणीत पुरावे, पण .... by चित्रगुप्त
"ग्राह्य पूरावा "
In reply to "ग्राह्य पूरावा " by चौकस२१२
मेक्सिको मधे ज्यूसिंग- थेरॅपी केंद्र आहे.
शुश्क वेदांती चर्चा करुन
In reply to शुश्क वेदांती चर्चा करुन by धर्मराजमुटके
जिथे स्वानुभाव येऊ शकत नाही
भगवद्गीतेत वर्णव्यवस्था ही
In reply to भगवद्गीतेत वर्णव्यवस्था ही by विवेकपटाईत
चूक.
In reply to चूक. by कॉमी
कसे काय?
In reply to कसे काय? by अहिरावण
त्यांनी दिलेत ते श्लोक वाचले
In reply to त्यांनी दिलेत ते श्लोक वाचले by कॉमी
सारांश
In reply to त्यांनी दिलेत ते श्लोक वाचले by कॉमी
>>तुमचा धर्म चिखलाच्या पणत्या
#कायठरलंमग
In reply to #कायठरलंमग by अहिरावण
आमचं तर ठरलंय -
काही वेगळ्या बाजू
In reply to काही वेगळ्या बाजू by माहितगार
माहितगार जी, तुमच्या
+१
In reply to +१ by राघव
धन्यवाद राघव जी!
कर्मविपाकाचा सिद्धांत
In reply to कर्मविपाकाचा सिद्धांत by उनाड
कोण श्रेष्ठ?
In reply to कर्मविपाकाचा सिद्धांत by उनाड
अगदी बरोबर.
कॉमी यांना प्रतिसाद
कर्मविपाक सिद्धांत थोतांड आहे का?
In reply to कर्मविपाक सिद्धांत थोतांड आहे का? by कर्नलतपस्वी
>>>असे सिद्धांत दुसर्यांना
अगदी असंख्य विज्ञान
कर्म प्रधान विश्व रचि राखा ।