बेसामे मुचो - एक शृंगारिक गाण्याची विविध रूपे
लेखनप्रकार
गेले काही महिने मला या "बेसामे मुचो" ("खूप चुंबने दे") गाण्याने पछाडले आहे. हे प्रथम ऐकले, ते आवडावे असे नाही. "अमेरिकन आयडल" या संगीतस्पर्धेत सँजाया मॅलकार (?संजय मालाकार?) याने मी ते गायलेले ऐकले, आणि अशा परिस्थितीत कुठलेही गाणे न आवडले, तर आश्चर्य ते काय?
पुढे यूट्यूबवर शोधता दिसले, की हे गाणे अनेक कलाकारांना आपली छाप लावून गावेसे वाटले आहे. तसे हे गाणे फार जुने लोकसंगीत वगैरे नाही. हे गाणे त्या मानाने अगदी हल्लीहल्लीच १९४०मध्ये कोन्सुएलो वेलास्केस या मेक्सिकन पियाने-वादिकेने रचले (शब्द आणि संगीत दोन्हीही). ते रचले तेव्हा ती सोळा वर्षांची होती - प्रेम-प्रेमभंग काय प्रियकराकडून चुंबनही तिने अनुभवले नसावे, असे म्हणतात. गाणे शब्दांच्यादृष्टीने तसे फार सोपे आहे. त्यात अर्थाचे पदर आणि गुंतागुंत गाणार्यांनी शोधली तर भरपूर आहे. पण फक्त शब्द वाचले तर सोपे, कच्च्या वयाची अतिशयोक्ती भरलेले आहे.
Bésame, bésame mucho,
como si fuera esta noche la última vez...
Bésame, bésame mucho,
que tengo miedo tenerte, perderte después
मुके दे, मुके तू खूप दे
रात आजची समजूया आहे शेवटली जसे
मुके दे, मुके तू खूप दे
भी लागे आज आहेस, उद्या तू नसशील इथे
हे गाणे १९४२ मध्ये मेक्सिकोमधील लोकप्रिय गायक एमिलियो तुएरो गायले, ते नाट्यमय अतिशयोक्त "रोमँटिक" भावनेने थबथबलेले आहे. गंमत म्हणजे यातले मधले-मधले म्युझिकपीस आहेत ते ऐकून मला १९७० काळातल्या हिंदी सिनेमातल्या गाण्यांची खूप आठवण येते.
कोन्सुएलो वेलास्केस हिने स्वतः हे गाणे गायलेले असेल तर ते मला सापडत नाही. पुढे १९६७ मधे तिने ते मेक्सिकन दूरदर्शनवरती पियानोवरती वाजवले. त्यात उत्तम पियानेवादन दिसते, ते दिसते. पण माझे लक्ष दुसरीकडे आहे. पियानोवरती ती शब्दांची लय जी दाखवते, शब्दांची ठेवण जी करते, ती निश्चितच वर तुएरो यांच्या गाण्यापेक्षा वेगळी आहे. आता हे लक्षात ठेवले पाहिजे, की १९४० मध्ये रचलेल्या गाण्याबद्दल खुद्द कोन्सुएलो यांचे विचार १९६७ पर्यंत बदललेले असणार. पण तरी...
हेच गाणे सुसाना साबालेता ही मेक्सिकन संगीत-नाटक गाणारी नटी गायली त्यात नाट्यमयता पूर्णपणे वेगळी आहे. (धोक्याचा इशारा : या गाण्यातल्या आर्जवामध्ये, गाण्याच्या पद्धतीमध्ये एका प्रकारची रतिलोलुपता जाणवते. कोणाला वखवखलेपणा वाटेल. असे ऐकायची इच्छा नसेल तर ऐकू नये.) पण हे गाणे दुसर्यांदा ऐकताना, ते रति-आमंत्रण दुहेरी अर्थाने भरलेले मला जाणवले. या स्त्रीचा प्रियकर तिला सोडून जाणार आहे, त्याची पूर्वकल्पना तिला पक्की झालेली आहे. २:२२च्या सुमारास जवळजवळ आवाज खरवडून "मुके घे" म्हणणार्या निर्लज्जतेच्या पुढे लगेच २:२७ला "भीती वाटते तुला नंतर हरवायची" मधली हादरावणारी जिवाची भीती तितकीच खरी वाटते. मग तो "निर्लज्जपणा" वेगळ्याच प्रकारे मी बघायला लागतो. लिंगपिसाट रतीत धुंद झाल्यापासून, प्रियकर हरवणार या प्राणांतिक भयापर्यंत चुटकीसरशी नेणारे हे गाणे आहे. एखादे गाणे पट्टीच्या गायकाकडून ऐकावे, तसे मला वाटते पट्टीच्या नटा-नटीकडूनही ऐकावे - वेगळेच पैलू दिसू शकतील असे हे उदाहरण आहे. एकही शब्द न बदलता ही कथा सांगितलेली आहे - एका पुरुषाने या स्त्रीला नादाला लावली, आणि तिचे शरीर उपभोगून तो तिला सोडणार आहे. त्या शरिराची पूर्णाहुती देऊन ती त्याला वश ठेवण्याचा शेवटचा निराश प्रयत्न करत आहे. (त्या १६ वर्षांच्या कोन्सुएलोला हा अर्थ मुळीच मनात नसणार, असे वाटते. पण गाणायात गीतकाराच्या मर्यादेपेक्षा खूपखूप वेगळा अर्थ गायक/नट भरू शकतो.)
आता हेच गाणे देशांतर करून कसे गायले जाईल बघा. ही माझी आवडती आजीबाई गायिका सेसारिया एवोरा. (नातवंडांबरोबर बागडताना वगैरे तिचे फोटो प्रसिद्ध आहेत, त्यामुळे "आजीबाई" म्हणणे म्हणजे उगीच ठराविक साच्यात टाकणे नव्हे.) सेसारियाबाईंचे सांगीतिक मूळ आहे काबोवेर्दे नावाची बेटे. आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या या बेटांवर पोर्तुगिज-आफ्रिकन मिश्रणाने जी काय भाषा, जी काय संस्कृती तयार झाली तिची ही परिणती. सुरुवातीला चाल बहुधा कोन्सुएलो यांनी दिल्यासारखीच असली तरी त्यात सेसारिया यांचे काबोवेर्दे-शैलीचे हेलकावे वगैरे येतातच. (१:४०, १:४७ वरती एका स्वरावरून दुसर्या स्वरावर त्या विशेष प्रकारे "घसरण्या"ची लकब ही खास तिथली.) वाद्यांची संगतही वेगळी आहे. पण या गाण्यात मला एक संयत "व्हायचे ते व्हायचे, तू जाणार ते कळतंय मला" अशी भावना दिसते. वेदना जाणवते, पण रडणार नाही असा खंबीर शृंगार उभा होतो आहे.
आता आपण पुन्हा काही पुरुष गायकांची उदाहरणे घेऊया. जगातल्या बहुतेक समाजांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्यात आणि वर्तणुकीमध्ये फरक असतो. मिलनाच्या रात्री जर उद्याचा विरह स्पष्ट दिसत असेल, तर ते पुरुष दूर जात असल्यामुळे, असा विचार आपल्या मनात येतो. अर्थातच पुरुष गायकाकडून आपल्याला याच गाण्यात वेगळा भाव जाणवतो.
ही एक आश्चर्यकारक दुहेरी फीत मला यूट्यूबवरती सापडली - (आणि अशीच अनेक गायकांची तुलना करणारा लेख लिहावा, तो विचार यातूनच सुचला.) हे आहेत ब्राझिलचे दोन अग्रणी गायक कायतानो वेलोसो आणि जोआंव जिलबेर्तो. (कायतानो वेलोसो हा चेहरा मोठ्या विचित्र प्रकारे वेडावाकडा करत गातो, शक्यतोवर त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुरांकडे लक्ष द्यावे.) दोघांच्या गाण्यात ब्राझिलियन बोस्सानोव्हा शैलीचा छाप जाणवतो.
१:१०च्या सुमारास कायतानो वेलोसो गातात. या ठिकाणी संयत "स्वच्छ" गाण्यात उलट एक प्रकारचा कलंदर (की बिलंदर) वृत्ती मला ऐकू येते. "आता प्रेम करूया, मी इथे टिकणार नाही हे मलाही माहिती आहे, तूही समजून घे" - असा काही भाव मला ऐकू येतो. ४:१५च्या सुमाराला जोआंव जिलबेर्तो तेच गाणे म्हणतात, तेव्हा वेगळा भाव मला जाणवतो. "तुला" सोडून जाणार याबद्दल गायकाला करुणा वाटते आहे, असे वाटते. एखासा सुर ताणून पुढच्या मात्रेतला भाग "चोरून" पुढचा स्वर तोकडा म्हणायची लकब, यात अधूनमधून दिसते, तेव्हा तो स्वर कुरवाळल्याचा, त्याच्याबरोबर ज्या प्रेयसीला सोडणार तिला कुरवाळण्याचा भास होतो.
आता ही शेवटची चित्रफीत वेगळ्या देशातली आणि वेगळ्या भाषेतली - याला "बेसामे"चा इंग्रजी अनुवाद म्हणावा की वेगळेच गाणे म्हणावे, इतका फरक आहे. गाण्याचे "भाषांतर" केले आहे सनी स्कायलार यांनी :
Besame besame mucho,
Each time I bring you a kiss
I hear music divine
So besame, besame mucho
Yeah I love you for ever
Say that you'll always be mine
या भाषांतरात उद्या विरह अटळ आहे, हा भावच नाहिसा झालेला आहे. (न दिलेल्या पहिल्या अंतर्यातही "जर तू मला सोडलेस तर माझा जीव जाईल - माझ्यावर सदासर्वकाळासाठी प्रेम कर" इतपतच आहे, विरह अटळ नाही.) मग गाण्यात फरक पडणारच. हे आपल्या सर्वांच्या ओळखीचे बीटल्स :
(सँजायाने प्रयत्न केला ते बीटल्सचे गाणे. त्याचा दुवा देत नाही. यूट्यूबवर सहज सापडेल.)
एखादेच गाणे वेगवेगळ्या, खूप, गायकांकडून ऐकण्याचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. सांगीतिक तपशील, नेमके कायकाय बदलले आहे, हे न कळतासुद्धा भाव कमालीचे वेगवेगळे उत्पन्न होतात, हे मला कळते. मला वाटली तशी गंमत, किंवा त्याहूनही अधिक जाणकार मनोरंजन वाचकांचे झाले असावे हीच इच्छा.
वाचने
7347
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
भैरवी
In reply to भैरवी by घाटावरचे भट
सुंदर!
In reply to सुंदर! by धनंजय
सुरेख
In reply to सुंदर! by धनंजय
सहमत
In reply to भैरवी by घाटावरचे भट
छान
"भी लागे"? :-)
असाच
In reply to असाच by मेघना भुस्कुटे
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तसंच
दोन मूड...
In reply to दोन मूड... by श्रावण मोडक
येस!
In reply to येस! by चतुरंग
अवांतर...
सुरेख
In reply to सुरेख by यशोधरा
असेच म्हणतो
असंच एक
अशा प्रकारच्या गाण्यांना 'टँडम' म्हणतात
हा धागा
वाह...
गाणं तसं
मिपा क्लासिक -१
In reply to मिपा क्लासिक -१ by मारवा
खरंय.
In reply to मिपा क्लासिक -१ by मारवा
+१००
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
होऊन जाऊ द्या. मी पण शोधतो.
एस कॉम्ट मिअऽ श्पानिश फोर!! =