श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"
एखाद्या झोपलेल्या मराठी माणसाच्या कानावर जरी हे शब्द पडले तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्याचे भाव उमटतील आणि मनःचक्षूंसमोर 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटातील 'धनंजय माने' नामक भाडेकरू त्याची नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा प्रसंग उभा राहील ह्यात तिळमात्र शंका नाही!
२३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले 'सोनेरी पान' असा लौकिक प्राप्त झालेलया 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटाला आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
विश्वजीत आणि मेहमूदची प्रमुख भूमिका असलेल्या हृषीकेश मुखर्जींच्या 'बीवी और मकान' ह्या १९६६ सालच्या चित्रपटाचा रिमेक असलेला 'अशी हि बनवा बनवी' हा चित्रपट गेली साडेतीन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे आणि पुढेही हसवत राहील ह्याविषयी विनोदी चित्रपट रसिकांच्यात दुमत नसावे. एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचा अन्य भाषेत केला गेलेला रिमेक मूळ चित्रपटाप्रमाणे यशस्वी होईलच ह्याची कोणतीही खात्री नसते परंतु अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी अशा दिग्गज कलाकारांचा अफलातून अभिनय आणि त्यांची जबरदस्त संवादफेक, त्याला मिळालेली अन्य कलाकारांची उत्तम साथ, एक से एक भन्नाट संवाद आणि दमदार संगीताची जोड अशा सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे ह्या चित्रपटाला दणदणीत यश तर मिळालेच पण पुढे त्याचे तेलगु, कन्नड़, हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषेत रिमेकही झाले.
ह्या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद, संगीत, त्याची केलेली कित्येक पारायणे, सोशल मीडियावर त्यातल्या प्रसंग/संवादांचा वापर करून मोठ्या संख्येने तयार करण्यात येणारे आणि व्हायरल होणारे मिम्स ह्यावर गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी समीक्षण / परीक्षण / रसग्रहणात्मक लेखन करून झालेले आहे. सदर लेखाचा उद्देश त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करण्याचा नसून बनवा बनवीच्या पस्तिसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत त्यातले निवडक संवाद आणि प्रसंगांच्या व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे ह्या चित्रपटात आपल्या बहारदार अभिनयाच्या बळावर रंगत आणणारे 'विश्वास सरपोतदार' नामक घरमालकाची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते स्व. सुधीर जोशी आणि परशुराम उर्फ 'परशा' व 'पार्वती' हे स्त्री पात्र अशा दोन भूमिका साकारून प्रेक्षकांची धमाल करमणूक करणारे दिवंगत अभिनेते स्व. लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दोन महान कलाकारांना मानवंदना देण्याचा आहे!
चला तर मग आता सुरुवात करूयात अशोक सराफ, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्व. सुधीर जोशी ह्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणाऱ्या ह्या धमाल विनोदी प्रसंगा पासून...
१) "धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... "
सकाळी सकाळी घरमालक विश्वास सरपोतदारांनी दार ठोठावल्यावर त्यांच्या नकळत धनंजय मानेंसोबत राहाणाऱ्या परशाचं दरवाजामागे लपणं, मग हळूंच तिथून बाहेर पडणं आणि अचानक मालकांचं लक्ष त्याच्याकडे लक्ष गेल्यावर जणू काही आत्ताच आलाय अशा अविर्भावात दरवाजावर ठकठक करत "धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... " असे विचारणे काय, चार कपबशा पाहिल्यावर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आणि 'इस्रायलला जाणाऱ्या' परशुरामची ओळख करून देतानाच त्याची वीस रुपयांची निकड पूर्ण करण्यासाठी धनंजय मानेंनी केलेली थापेबाजी काय आणि सुधीर जोशींच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावमुद्रा काय... सगळंच अफलातून!
२) "माने तुम्ही हरामखोर आहात हो!"
रात्री दारूच्या नशेत आपली खोली समजून मालकांच्या घरात शिरलेल्या धनंजय माने, सुधीर आणि परशाने विश्वासरावांना टकलू, कुत्रा म्हणत चापट्या, टपला मारत घातलेला गोंधळ अविस्मरणीय आहे 😀
३) "तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले होते, परत द्या... परत द्या! "
रात्री दारू पिऊन ह्या त्रिकुटाने घातलेल्या गोंधळामुळे संतप्त झालेले विश्वासराव चार दिवसात खोली खाली करण्याचा इशारा द्यायला आले असताना पुन्हा परशाचे दरवाज्यामागे लपणे आणि बाहेर पडून दरवाजावर ठकठक करत "धनंजय माने इथेच राहतात का?" असे विचारणे, त्यावर भडकलेल्या मालकांनी त्याला शिव्या देत मारलेला फटका आणि इस्रायलहून डायबेटिसचे औषध आणण्यासाठी दिलेले 'सत्तर रुपये' परत मागणे वगैरे सगळंच मजेशीर 😀
४) "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे"
धनंजय माने आणि कंपनी आज खोली सोडून जाणार म्हणून आनंदित झालेल्या विश्वासरावांनी "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" गाणे म्हणत त्यावर केलेला नाच आणि "हि पीडा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या" , "तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण...काका कि मामा?" , "आमचे खण, नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत" वगैरे संवाद असलेला हा धमाल प्रसंग 😂
५) "त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले"
खोली सोडून निघालेल्या धनंजय मानेंच्या मागे "मिस्टर माने निघालात कुठे..निघालात कुठे? डायबेटिसच्या औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर" म्हणत फाटकापर्यंत आलेल्या विश्वासरावांना "काय झालं माहित्ये... मी तुम्हाला तो माझा मित्र म्हंटला होता ना, तो इस्त्रायल मधला मित्र... तो परवा अपघातात वारला हो! त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले" हे धनंजय मानेंनी दिलेले भन्नाट उत्तर 😂
ह्या प्रसंगानंतर चित्रपटातली सुधीर जोशींची भूमिका संपली असली तरी पुढे 'पार्वती' बनलेल्या परशाने चित्रपटाचा संपूर्ण ताबा घेत हसवणुकीत अजिबात खंड पडू दिला नाही. एखाद्या 'कॅरॅक्टर मध्ये घुसणं' म्हणजे काय असतं ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे अशी 'पार्वतीची' भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी साकारली आहे!
६) "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"
धनंजय माने आपल्या नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा हा अजरामर प्रसंग 😂
हा संवाद म्हणताना अशोक सराफ ह्यांनी 'हि माझी बायको पार्वती' ऐवजी चुकून 'हा माझा बायको पार्वती' असे म्हंटले होते, पण ती चूक न सुधारता सचिन ह्यांनी तो संवाद मुद्दाम तसाच ठेवल्याचे कुठेतरी वाचले होते. खरे खोटे माहित नाही, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला!
७) "देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही"
"तुझं एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. मला ह्या रानरेड्याशी संसार करावा लागणार आहे", "आणि मला गेंड्या बरोबर करावा लागणार तो..", "भाऊजी... तुम्ही सांगा ना नाव घ्यायला", "धनी... मी टाटा करायला आले होते","देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही" असे संवाद असलेल्या ह्या प्रसंगात पार्वतीचा खट्याळपणा आणि नखरे बघायचे आणि मजा घ्यायची 😀
८) "तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला"
खोलीत विग मांडीवर ठेऊन विडी ओढत पडलेल्या पार्वतीची अचानक लीला मावशींनी दार ठोठावल्याने उडालेली तारांबळ आणि त्यांनी तिला मूल होण्यासाठी 'निरंजन बाबांकडून मागवलेला प्रसादाचा आंबा' खाताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्याची मजाच न्यारी!
९) "नवऱ्यानं टाकलंय तिला..."
बाटल्यांना लेबलं लावायचे काम मिळवण्यासाठी कारखान्यात आलेल्या पार्वतीची हि आपली शेजारी राहात असून' नवऱ्यानं टाकलंय तिला' अशी धनंजय मानेंनी व्यवस्थापकाला करून दिलेली ओळख आणि 'पुरुष प्रसाधनगृहात' शिरणाऱ्या पार्वतीला हटकणाऱ्या मुलीचा धमाल प्रसंग 😂
१०) "लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची"
लीला मावशींचा पुतण्या 'बळीशी' मारामारी केल्यावर त्यांना आपल्या लहानपणीचे किस्से सांगणारी 'पैलवान' पार्वती वहिनी 😀
११) "अगं बया बया बया बया... केवढी मोठी झाली गं तूं"
छबुरावाचा तमाशा पुण्यात आल्याची बातमी वाचून आपली प्रेयसी कमळीला भेटायला पार्वतीच्या वेषात गेलेला परशा 😂
१२) "लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... "
टपरीवाल्याकडे बिडी मागतानाच्या ह्या प्रसंगात ते ज्या आवाजात "लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... " हे पहिले वाक्य म्हणतात तो आवाज चित्रपटातील परशाचाही नाही आणि पार्वतीचाही नाही. इथे लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या खास ठेवणीतल्या आवाजाचा वापर केला आहे.
माझ्या एका मित्राच्या वडिलांचे पूर्वी कुर्ल्याला वाईन शॉप होते आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या धाकट्या भावाचे वर्गमित्र असल्याने त्यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यावरही त्यांनी रंगभूमीशी फारकत घेतली नव्हती त्यामुळे मुंबई बाहेर त्यांच्या नाटकाचे प्रयोग असतील त्यावेळी त्यांना परतायला रात्री बराच उशीर व्हायचा, कित्येकदा मध्यरात्र व्हायची तेव्हा मुंबईतले बार / वाईन शॉप्स बंद झालेले असायचे. अशा आडनिड्या वेळी त्यांना बिअर मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे ह्या मित्राच्या वडिलांचे वाईन शॉप!
अनेकदा लक्ष्मीकांत बेर्डे नाटक मंडळींची बस घेऊन मध्यरात्री ह्या ठिकाणी येत असत. खाली दुकान वरती घर असे त्यांच्या एक मजली घराचे स्वरूप होते, खालून हाका मारून ते वरती घरात झोपलेल्या मंडळींना उठवून दुकान उघडायला लावत. झोपमोड झालेले मित्राचे वडील किंवा काका बाहेर व्हरांड्यात येऊन खालून हाका मारणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेंकडे मुद्दाम त्रासिक दृष्टिक्षेप टाकत काही वेळ उभे रहात असत. मग आपल्या ह्या खास ठेवणीतल्या आवाजात लक्ष्मीकांत बेर्डे "एक क्रेट बिअर दे रे... लवकर दे रे, बघतो काय रे" असे त्यांच्यावर डाफरले कि मगच ते खाली येऊन दुकान उघडून त्यांची मागणी पूर्ण करत 😀
चित्रपटातला हा प्रसंग मला त्यात वापरलेल्या 'त्या' विशिष्ट टोन मुळे आधीही आवडत होताच पण हा किस्सा मित्राच्या वडिलांकडून कळल्यानंतर तो जास्तच आवडू लागला. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हि महान कलावंत मंडळी आपल्या इम्प्रोवायजेशन साठी प्रसिद्ध आहेतच पण ते करताना कुठल्या गोष्टीचा वापर कुठे करायचा ह्याची त्यांना असलेली जाण किती विलक्षण आहे / होती हे अशा सध्यासुध्या गोष्टींतूनही जाणवते.
"लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... " हे पहिले वाक्य वेगळ्या आवाजात उच्चारल्या नंतर लगेच पुन्हा पार्वतीचे बेअरिंग पकडत "बघतो बघ मेला कसा... बाई कधी बघितलीचं नाही मेल्यानं" म्हणत त्यांनी ह्या प्रसंगात रंगत आणली आहे.
१३) "डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये"
पलंगावर बसून मस्तपैकी विडी ओढत बसलेल्या पार्वतीला पाहून अचानक खोलीत आलेल्या लीला मावशी चक्रवतात त्यावेळी धनंजय माने "डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये" असे सांगत सारवासारव करतात तो हा भन्नाट प्रसंग...
१४) "कुणीतरी येणारं येणारं गं"
श्रवणीयच नाही तर प्रेक्षणीय असे हे गाणे ह्या चित्रपटाचा 'कळसबिंदु' आहे असे म्हंटले तर वावगे नाही ठरणार! पार्वतीची भुमिका साकारताना लक्ष्मीकांत बेर्डेंनी तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम मनसोक्त एंजॉय केलाय हे चांगलंच जाणवतं आणि सुधाच्या भूमिकेत सचिन ह्यांनी कमाल नृत्य केले आहे.
१५) "जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ... "
पार्वती आणि सुधा ह्या स्त्रिया नसून पुरुष आहेत हे बिंग फुटायच्या आधीच्या ह्या प्रसंगात प्रेक्षकांच्या सर्वात जास्त लक्षात राहिलेल्या संवादांपैकी "जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ..." आणि "गेल्या वाटतं... नाही अजून नाही... " हे दोन इथे पाहायला मिळतात.
ज्याच्याविषयी बोलताना 'सर्वात जास्ती पाहिला गेलेला मराठी चित्रपट' आणि 'असा एकही मराठी माणूस नसेल ज्याने हा चित्रपट पहिला नसेल' असे गौरवोद्गार काढले जाण्याचे भाग्य लाभलेला 'अशी हि बनवा बनवी' हा चित्रपट आपल्यापैकी सर्वांनीच पाहिला असणार आणि कित्येकांनी माझ्याप्रमाणे त्याची परायणेही केली असतील ह्यात मलातरी शंका नाही. 'अशी हि बनवा बनवी' हा केवळ चित्रपट नसून 'कल्ट' आहे असे म्हंटले जाते ते हि मला बरोबरच वाटते आणि ह्या कल्टची म्हणजेच पंथाची दीक्षा मलाही मिळाली असल्याने त्याच्या पस्तिसाव्या वर्धापनदिनी आमच्या ह्या पंथाच्या प्रचार आणि प्रसाराचे पुण्य पदरी पडावे म्हणून केलेला हा लेखनप्रपंच इथल्या अन्य 'दीक्षितांच्या' पसंतीस उतरेल अशी आशा बाळगतो.
सर्व मिपाकरांना गणेशोत्सव आणि मिपाच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
तळटीप: सध्या काही तांत्रिक समस्येमुळे लेखात व्हिडीओ एम्बेड करण्यात अडचण येत असल्याने सर्व व्हिडीओ क्लिप्सच्या लिंक्स दिल्या आहेत तसेच रसिकांच्या सोयीसाठी 'वरील पंधरा व्हिडीओ क्लिप्स एम्बेड केलेल्या एका पानाचा बाह्य दुवा' देत आहे.
वाचने
24062
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
मी पयला.
माझा अतिशय आवडता चित्रपट
एक नंबर लेख
In reply to एक नंबर लेख by तुषार काळभोर
ता. क.
In reply to एक नंबर लेख by तुषार काळभोर
मागच्या वर्षी नेत्यानाहू भारतात आले, तेव्हाही
मस्तच
वा ! उत्तम !
चार पिढ्या एकत्र बसून मनापासून आनंद घेतात असा चित्रपट
हा अगदी कल्ट सिनेमाच ठरला.
In reply to हा अगदी कल्ट सिनेमाच ठरला. by गवि
पुलंची अनेक वाक्ये अशीच आहेत. भले अनेक लोक
लेख आवडला,
मोदींनी पुन्हा मेट्रोमार्गाचं
खुसखुशीत लेख!
मस्त
ये है आम जिंदगी और ये है
कल्ट सिनेमाचं एक नंबर रसग्रहण
सर्वात जास्ती पाहिला गेलेला
In reply to सर्वात जास्ती पाहिला गेलेला by कंजूस
>>>साडी नेसलेल्या पुरुष बायका
लेख छान !
लीला मावशींचा पुतण्या 'बळीशी'
भारीच
धमाल आणलीत राव.
रसग्रहण आवडले
भन्नाट
या धाग्यावरून गविंचा हा एक
यातली अशोक सराफ अन अश्विनी
वाह, सर्वकाळ आवडता आणि ताजा
वाहवा!
आज पुन्हा एकदा बघणार. ह्या
In reply to आज पुन्हा एकदा बघणार. ह्या by भागो
माझा पती करोडपती
In reply to माझा पती करोडपती by तुषार काळभोर
पडदे शिवा..
In reply to पडदे शिवा.. by गवि
कटी पतंग यावर आधारित आहे का हा सिनेमा..?
In reply to माझा पती करोडपती by तुषार काळभोर
ती मला प्रेमाने बैलोबा
In reply to माझा पती करोडपती by तुषार काळभोर
अनपेक्षितपणे सौ सचिन यांनी त्यांना तोडीस तोड साथ दिली आहे.
'अशी हि बनवा बनवी' वर मनापासून प्रेम करणाऱ्या
व्वा
छान आठवणी . सचिन यांचे
अवांतर
छान लेख
आम्ही वर्षातून एकदा तरी