Skip to main content

ठार मेला. ग्रंथ आटोपला..आहे का अजून काही?

लेखक गवि यांनी मंगळवार, 16/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
सहज म्हणून एकदा एक पोस्ट लिहिली आणि मोठी लांबडी यादी झाली. म्हणजे कोकणच्या भाषेत बारीक घोण निघेल म्हणून बिळातली शेपटी धरायला जावी आणि चार हात लांबडं जनावर निघावं तसं झालं. इथे त्याविषयी लिहितोय. ... मरणं ही फार म्हणजे फारच कंपल्सरी चीज आहे..प्रत्येकाला बाकी काही जमलं नाही तरी किमान एकदा मेलंच पाहिजे.. मरणाची बातमी सर्व संबंधित पार्ट्यांना कळवणं आणि उत्साहाने पुढची सर्व सोय करणं हा तर काही जणांचा छंद.. मेलेल्या लोकांचे आकडे देताना महिलांचा आकडा वेगळा सांगतातच.. (मृतांत १८ महिलांचा 'समावेश' आहे..) तीन अतिरेकी ठार..दोन सैनिक शहीद.. एकाच छोट्या वाक्यात आपल्या सैनिकांचा आदर आणि अतिरेक्यांविषयी तिरस्कार.. 'मरणं' या एक गोष्टीसाठी मराठीत आपण किती शब्द करून ठेवलेत?? काही सहानुभूतीवाले..काही मेल्याचाच आनंद दाखवणारे..तिरस्काराने भरलेले..(मरणानंतरही..).. वाटतात त्यापेक्षा जास्त शब्द आहेत.. खूप जास्त.. यात काही लोकल (म्हणजे स्थानिक!!..मुंबईच्या लोकलचा मरणाशी घनिष्ठ संबंध असला तरी तो विषय इथे नाही.) संदर्भ असलेले शब्दही मी घेतले आहेत. (उदा. पुण्यात : ओंकारेश्वरावर जाणे..) १) मेला २) गेला ३) वारला ४) ठार ५) देवाज्ञा ६) कैलासवासी ७) गचकला ८) ग्रंथ आटोपला ९) चचला १०) उडाला ११) संपला १२) खपला १३) टपकला १४) ढगात गेला. १५) स्वर्गवासी झाला १६) वीरगती प्राप्त झाली १७) धारातीर्थी पडला १८) देह ठेवला १९) खर्ची पडला. २०) निजधामास गेला २१) निवर्तला २२) सोनं झालं २३) डाव बास (कुठेतरी ऐकलंय..पण Citation needed हां..!!) २४) म्युन्सिपाल्टीचा पास मिळाला २५) सद्गती २६) अमर झाला २७) कै. झाला २८) काळ आला २९) आटोपला /ली ३०) उत्थान ३१) उत्तमगति ३२) कालग्रस्त ३३) काळझोंप ३४) काळनिद्रा ३५) देवगत किंवा देवगति ३६)देह ठेवणे आता नंबर टाकून थकवा आला.. नुसतेच टाकतो शब्द.. समाधी घेणे वध खून पैगंबरवासी ख्रिस्तवासी बुद्धवासी पंचतत्वात विलीन मोक्ष पावला डोळे मिटले स्वर्गारोहण दम तोडला, मान टाकली, गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..) भोईवाड्याला पोचणे सरणावर ठेवणे नाकाला सूत लावणे निष्प्राण होणे गेम होणे पाताळात धाडणे कंठस्नान घालणे खांदा देणे राम म्हणणे बॅटरी संपणे फोटो लागणे निजधामास जाणे कूंकू पुसणे बांगडी फुटणे मसणात जाणे सोने होणे चंदन होणे शटडाउन करणे (!!!!) लॉग ऑफ होणे exit घेणे अखेरचा निरोप घेणे दिवस भरणे प्राणपक्षी उडून जाणे गार पडणे ढोल वाजणे बॅण्ड वाजणे मसाला संपणे प्राणज्योत विझणे उताणा पडणे डोळे फिरणे नाडी बंद विकेट पडणे दम तुटणे घाला घालणे हाय खाणे (याविषयी मला शंका आहे बरीच..) मातीत मिळणे नामशेष होणे देवाघरी जाणे कामी येणे हाराकिरी पेन्शन बंद पडणे खाते बंद होणे जाणे संपणे न उरणे उरकणे (उरकला..!!) मार्गस्थ होणे निजधामास जाणे आकाशातील तारा होणे पडदा पडणे भैरवी होणे निरोप घेणे देह सोडणे देह टाकणे देह ठेवणे समाधी घेणे मूठमाती देणे शाई संपणे, नेटवर्क तुटणे ! (हे काहीतरी नवीन!) वरचा कॉल येणे यमाचे दूत येणे यमपाश आवळणे रंभा उर्वशी सोबत मजा करायला जाणे. हाकेला ओ देण्या पलीकडे जाणे ! चिरशांती मिळणे थडग्यात जाणे, कलेवर होणे पार्थिव होणे मढे पडणे सेंड ऑफ होणे बरेचसे विचित्र काही बाही शब्द: ६नंबर चा फ़ॊर्म भरणे. ओंकारेश्वरावर जाणे आहे का कोणाकडे याखेरीज शब्द.. ????

वाचने 23845
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

लहानपणी कोणी ब्रह्मलिन झाले की देवगड ला गेले म्हणायचे.

म्हणजे हाता पायातली शक्ती जाणे. इंग्रजीत ज्याला feeling divastated म्हणतात ते.

प्राणज्योत विझणे
प्राणज्योत मालवणे असा अजुन एक शब्द प्रयोग. --- देवआज्ञा झाली देवाने बोलावले देवाघरी बोलावले चितेवर पोचला असेही काही शब्दप्रयोग आहेत. हाय खाणे = आत्महत्या करणे.

हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे दहशत घेणे तो वाक्प्रचार हाय खाऊन मेला असा आहे. म्हणजे घाबरून मेला. हाय खाणे म्हणजे मरणे मव्हे