काही भटकी कुत्री चार वर्षाच्या मुलाचे लचके तोडत असतानाचा एक व्हिडिओ कोणतीही पूर्वसूचना न देता कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मला तो दहा सेकंदसुद्धा पाहण्याचे धाडस झाले नाही. पुढे काय असेल या कल्पनेनेच थरकाप उडाला, आणि मन प्रचंड उदास, अस्वस्थ झाले. इतकं की मला आज थेरापिस्ट कडे जावे लागले.
कुत्रा नामक गोष्टीची भिती खूप लहानपणी बसली. मला कुत्रा लहानपणी चावला नाही, पण धाकट्या भावाला एक कुत्रा चावला. करंगळीच फाडली होती. तो धसका बसून मी कुत्र्यांपासून प्रचंड सावध वागू लागलो. नंतर एका बालमित्राला एक पिसाळलेला कुत्रा चावला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ दवाखान्यात काम करत असल्याने लगेच उपचार केले गेले. तेव्हा तो वर्गातला एक तप्त विषय झाला होता. पिसाळलेला कुत्रा कसा ओळखावा अश्या चर्चा मी करत असे. एकाने सांगितले- 'त्याची शेपूट हूकासारखी वाकडी राहते. तो पळत जातो तेव्हा त्याला वळता येत नाही आणि एका सरळ रेषेतच तो धावत सुटतो. त्याच्या तोंडातून सतत लाळ गळत असते.' ते वर्ष केवळ अशी कुत्री ओळखण्यात गेले. या लक्षणांनी बहुतांशी कुत्री ही मला पिसाळलेलीच वाटत. मी सायकल प्रचंड वेगाने दामटवत अशा कुत्र्यांपासून शक्य तितका लांब पळे.
हळू हळू ही भिती कमी होत गेली.
मी सातवीच्या अखेरीस असेन. तेव्हाची ही गोष्ट. शनिवारी सकाळची शाळा संपवून मी साडेबारावाजता मला आवडणारा टीव्हीवरचा एक कार्यक्रम पाहावा म्हणून उत्साहाने घरी आलो. आजोबा दाढी करत होते. पटकन आवरून रिमोट हातात घेताच दाराबाहेर शिरम्या नावाचं एक गुराखी पोरगं (माझ्याहून दोनेक वर्षं मोठं असेल) जोरजोरात हाळ्या देत आलं. 'शांताआज्जी शांताआज्जी' असं ओरडत धापा टाकतच तो घरात घुसला. 'तुमच्या रेडकाला पारध्यांची कुत्री फाडायल्यात ओ, चला लवकर' म्हणत दंगा करू लागला. मला काही समजायच्या आतच आजोबांनी खुंट्यावरची बंदूक काढली आणि दिवळीवरच्या लहान दिवळीतून दोन काडतुसे घेतली. माझा काका, शिरम्या आणि आजोबा पळत पळत माळाच्या दिशेने धावू लागले. माझी आजी आणि मी घाबरून पडवीजवळ उभे राहिलो आणि काय होतंय हे पाहू लागलो.
घरापासून साधारण चारशे मीटर अंतरावर आमच्या दोन म्हशी शिरम्याच्या जित्रापांबरोबर चरायला गेलेल्या. त्यातली एक म्हैस तीन आठवड्यांपूर्वी व्याली होती. तिचं रेडकू दावं सुटल्याने तिच्या आईच्या मागोमाग माळाकडं पळालं होतं. ते सुटल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. फासेपारध्यांची एक वस्ती त्या माळावरच होती आणि त्यांच्यात खूप कुत्री असत. ती कुत्री मांसाला बर्यापैकी चटावलेली होती.
काय होतंय याचा अदमास घेत होतो तेव्हा एक मोठा बार काढल्याचा आवाज आला. जित्रापं आवाजानं भेदरून हंबरत इकडं तिकडं धावू लागली. एक कुत्रं टिपलं गेलं आणि आवाजानं, माणसांना पाहून बाकीची कुत्री पांगली असावीत. अर्ध्या तासानं काका त्या जखमी रेडकाला घेऊन आला. त्याचा एक कान लोंबकळत होता. अंगावर खूप जखमा झाल्या होत्या आणि ते वेदनेनं अतिशय विव्हल हंबरत होतं. त्याला पाहताच माझ्या आजीनं डोळ्याला पदर लावला आणि ती धावत मला घेऊन आत गेली. माझा सगळ्यात धाकटा काका अकलूजवरून एक व्हेटर्नरी डिप्लोमा करून आला होता. तो गावातच दळण आणायला गेला होता. आजीने त्याला त्वरेनं घेऊन यायला मला सांगितलं. मी लगेच सायकल काढून गिरणीतनं त्याला घेऊन आलो. घरी जनावरांची प्राथमिक उपचाराची औषधं त्यानं आणून ठेवली होती. जमतील तशा जखमा गरम पाण्याने साफ करून त्यातली कसलीतरी पिवळट पावडर त्यानं पटकन जखमांवर शिडकली. तोवर मधला काका जनावराच्या डॉक्टरांना आणायला टू व्हीलर काढून रवाना झाला.
थोड्या वेळाने आजोबा म्हशींना घेऊन आले. माझ्या आजीच्या वाहत्या डोळ्यांना खळ नव्हता.
जखमा खूप खोलवर झालेल्या होत्या. पावडरने माखलेला कानही तसाच लोंबकळत होता. रेडकू प्रचंड भेदरलं होतं, घायकुतीला आलं होतं.
साधारण दोनेक तासांनी डॉक्टर आले.
सगळ्या मोठ्या लोकांनी काय ठरवलं कोणास ठाऊक. आजोबांच्या हाताखाली काम करणार्या एका मैलकुलीला बोलवण्यात आलं. तो शेतात खड्डा खणू लागला. माझी आजी मला पोटाशी धरून रडत होती. मला ती तिकडं जाऊ देईना. काका एक टेरिकॉटचं नवं शुभ्र कापड घेऊन आला.
डॉक्टर कसल्यातरी इंजेक्शनची तयारी करू लागले. शेवटी तो निर्णायक क्षण आला.
कुठून करूणेची झरा त्या मैलकुलीच्या हृदयात पाझरला आणि तो म्हणाला- "मला औषधं द्या, मी सांभाळतो रेडकाला". शेवटचा सोपस्कार कुणालाच नको होता.
डॉक्टरांनी त्याचा कान कापून काढला. जखमा पुन्हा नीट धुतल्या. काही औषधं लिहून दिली. रेडकाला मैलकुली घेऊन गेला. ते जगलं, वाढलं. काही महिन्यांनी चरायलाही जाऊ लागलं.
कुत्र्यांविषयी, विशेषतः भटक्या कुत्र्यांविषयीचा माझा फोबिया प्रचंड उफाळून आला. मी शाळेतून घरी शॉर्टकटने यायचो तेही पूर्ण बंद केलं. त्यांची दहशत बसली.
यथावकाश मी मोठा झालो, पुण्याला राहायला आलो.
एकदा ऑफिसमध्ये खूप उशीरा थांबलो. बाणेर रस्त्यावर केएफसीसमोर एस-बी-आय बँक आहे तिथं. रात्रीचे साडे अकरा वगैरे वाजले असावेत. रस्त्यावरची रहदारी बरीच कमी झाली होती. मला आठवतं, के एफ सी / पिज्झा हट ही दुकाने लागून लागून होती आणि ती अजूनही चालू होती. माझी गाडी मी रस्त्याच्या त्या बाजूला पार्क केली होती. तिच्याकडे जाताना कुठूनतरी अचानक साताआठ कुत्री गोळा झाली आणि माझ्या दिशेनं भुंकू लागली. मी हाड हाड म्हणत दुभाजकापर्यंत गेलो. ती कुत्री मला धड पलिकडेही जाऊ देईनात ना अलीकडे. मला दुभाजकावरच अडकवून ठेवला. ती घाबरत सुद्धा नव्हती. एकदम डू ऑर डाय अशी सिच्युएशन. एखादी गाडी मधून गेली तरी कुत्री मागे सरकेनात. सुदैवाने माझ्या मागून माझा टीम लीडर खाली आला आणि त्याला पटकन लक्षात आलं. त्याने आरडा ओरडा केला आणि अजून दोन माणसं रस्त्यावर आणली. समोरच्या बाजूने देखील तिथला वॉचमन काठी आपटत आला. एका कुत्र्याला दाणकन काठी हाणली तशी कुत्र्यांनी माघार घेतली.
पुण्यात भर रस्त्यावर, तेही बर्यापैकी रहदारीच्या, माझ्यावर अशी पाळी येईल असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्यानंतर अनेक दिवस मी बॅगेत चक्क दगडं ठेवत असे.
राहत होतो तो परिसर तसा उच्चभ्रू होता. एका प्रसन्न सकाळी मी चालत चालत दूध आणायला जात असता पलिकडच्या बंगल्याजवळून एक कुत्रा शांतपणे बाजूने आला त्याने थेट माझ्या कंबरेला चावा घेतला. मी किंचाळलो आणि समोरून कुणीतरी त्याला हाकललं. जीन्स असल्याने त्याचा एकच दात घुसला होता. उरलेल्या दातांचे व्रण पडले होते. शेवटी इतक्या वर्षांनी माझा घात झालाच. कुत्रा भटकाच होता. बंगल्यातले लोक त्याला गेटबाहेच खायला घालायचे म्हणून तो तिथेच आसपास असायचा.
मी तीन इंजेक्शने घेतली. आता इंजेक्शने पोटात घ्यायला लागत नाहीत हे बरं आहे. माझ्या लहान भावाचे चौदा इंजेक्षने घेऊन पोट सुजून बसले होते.
भटक्या कुत्र्यांच्या देशात आपण राहत नाही हे एक खूप मोठे सुख आहे, हे मला आता जाणवते. इथे माणसांची खानेसुमारी एकवेळ चुकेल, चुकेल का, चुकतेच. पण कुत्र्यांची आणि मांजरांची खानेसुमारी मात्र चुकणार नाही. माझा इथला मॅनेजर मला गमंतीने म्हणत असे, इथे कुत्र्यामांजरांचा ट्रेस माणसांहून जास्त काळजीपूर्वक ठेवला जातो आणि त्यांची काळजीही माणसांहून जास्तच घेतली जाते त्यामुळे पुढला जन्म त्याला पेटचाच मिळो. मला हे नेहमी प्रत्ययास येतं.
रोज फिरायला जातो तेव्हा किमान चार कुत्री मला क्रॉस करतात. अर्थात, सोबत त्यांचे मालक-मालकीणी त्यांना फिरवायला आलेले असतात. एकही कुत्रा माझ्यावर भुंकत नाही तरी मी आपला चार हात लांबूनच जातो. कधी कधी काही कुत्री इतकी लोभस असतात की आवर्जून त्यांची विचारपूस करतो. माझा रोजचा ट्रॅक मोहरीच्या विशाल शेतांतून जातो आणि मध्ये मध्ये छान गवती रानही आहे. गवतांमध्ये खेळायला या कुत्र्यांना खूप आवडतं. माझ्या ऑफिसमध्ये एका सहकार्याचा मिलू नावाचा डाक्सहुंड जातीचा एक खूप मायाळू कुत्रा रोज त्याच्याबरोबर येई. तळ्यावर पोहायला गेल्यावर एका मित्राचा एक गोल्डन रिट्रीव्हर तर हमखास पोहायला सोबत येई. माझ्या घराशेजारी एक वेडसर पण मायाळू म्हातारी राहते. ती नेहमी जाता येता भेटल्यावर एक प्रश्न हमखास विचारत असते - "तुम्ही माझ्या लालसर कुत्र्याला खेळताना पाहिलंय का हो? त्याचं नाव मॅक्स". उन्हाळ्यात ती रात्री एक-दीडवाजता मॅक्स मॅक्स असं ओरडत हिंडतेदेखील. एकदा खूप वेळ जागत होतो तेव्हा खिडकीतून मी माझ्या डोळ्यांनी तिला फिरताना पाहिलं आणि तिच्या आयुष्यात, स्मृतींत मॅक्स किती खोलवर रुजला आहे हे जाणवून आलं.
माझी कुत्र्यांविषयीची भीड खूप चेपली आहे.
तरीही कधी कधी चिमधार करुणेने भरलेले ते तीन आठवडे वयाचे डोळे आठवतात आणि मन गहिवरून येते.
वाचने
9296
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
करूण गोष्ट.
लेख सुंदरच उतरला आहे. एक
सामोरं जाणं
In reply to लेख सुंदरच उतरला आहे. एक by गवि
वाह !
सहमत
खूपच छान..
अर्र!! तो व्हिडिओ भयंकर आहे
कुत्र्यांचे निर्बिजीकरण जर
भयंकर व्हिडीओ आहे.
तुमचे अनुभव
आज नेमका आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर पण
कुत्तरडी आणि त्यांचे पाळंदे डोक्यात जातात
अरे देवा !
In reply to कुत्तरडी आणि त्यांचे पाळंदे डोक्यात जातात by ज्ञानोबाचे पैजार
माझी बऱ्याच दिवसांपासूनची
In reply to कुत्तरडी आणि त्यांचे पाळंदे डोक्यात जातात by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to माझी बऱ्याच दिवसांपासूनची by गवि
पैजारबुवांशी सहमत. मागे मी
In reply to कुत्तरडी आणि त्यांचे पाळंदे डोक्यात जातात by ज्ञानोबाचे पैजार
पटलाय हा लेख
अतिशय सुंदर लेख
माणसाने, इजा पोहोचवू शकतील
मोकाट कुत्र्यांच्या त्रासावर मला सुचलेले उपाय
मला आवडतात कुत्रे,इतर प्राणी.
आमचे लाडके श्री शरचंद्रजी पवारजी
In reply to मला आवडतात कुत्रे,इतर प्राणी. by कंजूस
फोरेट गुगलून पाहिलं. ते
In reply to आमचे लाडके श्री शरचंद्रजी पवारजी by रंगीला रतन
फोरेट वापरायचे.
आंतरिक उर्मी ने कुत्रे
कोर्स पूर्ण केल्यावरसुद्धा रेबिज
लसबळी?
In reply to कोर्स पूर्ण केल्यावरसुद्धा रेबिज by हणमंतअण्णा शंक…