आधीचा भाग-- भारताबाहेरचा भारत -अंदमान १
आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
आज पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉक बेटावर बोटीने जायचे होते. त्यामुळे पटापट नाश्ता करायला खाली उतरलो. पण अजून सातच वाजले असल्याने नाश्ता तयार नव्हता. त्यामुळे किचनमधून आम्हाला सँडविच आणि फ्रुटीची पाकिटे पार्सल म्हणून दिली गेली. ती सॅकमध्ये टाकून सामान घेऊन खाली उतरलो. तोवर गाडी आम्हाला घ्यायला आलीच होती.
१०-१५ मिनिटात जेट्टीवर पोचलो. आमच्यासारखे बरेच पर्यटक पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक प्रवास करणार होते त्यामुळे तिथे थोडी रांग लागली होती. विमानतळावर असते तशीच सुरक्षा तपासणी सुद्धा होत होती. सी आय एस एफ चे जवान बारकाईने लक्ष ठेवून होते. कदाचित इथे एकूणच सैन्याचा प्रभाव जास्त असावा. त्यामुळे की काय माहित नाही, पण एकूणच लोक शांत प्रवृत्तीचे वाटले. पूर्ण सहलीत कुठेही फार कटकटी, भांडणे वगैरे ऐकू आली नाहीत. सुरक्षा तपासणी करणाऱ्या एका जवानाच्या शर्टावर देशमुख असे नाव दिसले त्यामुळे मी पुढे होऊन जरा आस्थेनी मराठीत चौकशी केली. तर ते औरंगाबादचे होते. मराठी ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर जरा स्मित झळकले. परमुलखात अचानक माहेरची माणसे भेटल्यावर कसे होईल तसेच काहीसे. पुढे होऊन बाकड्यावर विसावलो. बोट यायला वेळ होता. २-३ टी व्ही लावले होते त्यावर टिपिकल बॉलीवूडी गाणी लावली होती. मिका सिंग, बादशाह आणि कोण कोण रॅपर्स अंगविक्षेप करताना दिसत होते. गाडीत सुद्धा तसलीच बॉलीवूडी श्रीमंती प्रेम विव्हळ गीते किंवा तेनुं काला चष्मा सारखी ढिनच्यॅक गाणीच वाजताना दिसत होती. एकुणातच इथले लोक बॉलिवूडचे दिवाने असावेत. आसपास पोरांचे रडणे,खाणे,आयांचे धपाटे घालणे असा मस्त गदारोळ चालू होता. त्यातल्या त्यात छान म्हणजे हनिमूनला आलेले बरेच लव्हबर्ड्स दिसत असल्याने नेत्रसुख होते. तर अशा तर्हेने वाट बघता बघता अर्धा तास गेला आणि एकदाची बोट बंदराला लागली. आधीचे उतारू उतरले आणि आम्ही आत गेलो. आमच्या बोटीच्या बाजूलाच भारतीय नौसेनेची तुलनेने प्रचंड जहाजे उभी होती. एक तर जवळजवळ ४ मजली होते.
यथावकाश बोट निघाली आणि पोर्ट ब्लेअरहून बाहेर पडून खुल्या समुद्रात जाऊ लागली.
खानपान सेवा सुरु झाली आणि त्याबरोबरच फोटो काढायची स्पर्धाही.
बोटीला सगळीकडे खिडक्या असल्याने लोक कुठे कुठे बसून फोटोसाठी पोझ देत होते. बाहेरही सुंदर देखावे दिसत होते. गुगल मॅप बोटीचे ठिकाण दाखवत होता. इथे रेंज मिळणार नाही अशा बेतानेच अंदमानला आलो होतो, पण मित्तल गुरुजेनच्या कृपेने बहुतेक ठिकाणी ५ जी सेवा मिळत होती. तरीही एक सूचना- जवळ बऱ्यापैकी रोख रक्कम ठेवावी कारण बऱ्याच ठिकाणी रेंज असली तरी यु पी आय चालले नाही.
जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर बोट हॅवलॉक बंदरात पोचली आणि सामानसुमान घेऊन बाहेर पडायची लगबग सुरु झाली. बाहेर पडायचा अरुंद मार्ग ,प्रवाशांची दाटीआणि त्यातच त्यांना घेण्यासाठी आलेले ड्रायव्हर लोक्स याची नुसती वर्दळ उडाली. सुदैवाने आमच्या ड्रायव्हरला मी आधीच फोन करून ठेवला असल्याने जास्त अडचण आली नाही आणि आम्ही गाडीपाशी पोचलो. ह्या ड्रायव्हरची हेअर स्टाईल बघून आम्ही त्याला उडता पंजाब नाव देऊन टाकले. दहाच मिनिटातच गाडीने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि दुपारी ३ वाजता तयार राहण्याची सूचना देऊन उडता पंजाब निघून गेला. हे हॉटेल पोर्ट ब्लेअरच्या हॉटेलपेक्षा मस्त होते.
प्रशस्त आणि स्वच्छ खोल्या, आजूबाजूला नारळ सुपारीचे झाडे यामुळे अचानक कोकणात आल्यासारखे वाटू लागले.
बाहेर ऊन सणसणीत तापले होते, त्यामुळे पहिले आत जाऊन ए सी लावला आणि गारेगार झालो. मग सावकाशीने अंघोळी वगैरे उरकल्या आणि खोलीवरच जेवण मागवले. टी व्ही ला मस्त अमेझॉन फायरस्टिक लावली होती, त्याच्यामुळे नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम,झी स्टुडिओ सगळेकाही उपलब्ध होते. त्यामुळे दुपार आनंदात गेली. गारेगार खोलीत तंगड्या ताणून पडलेले असतानाच पुन्हा उडता पंजाब चा फोन आला आणि नाईलाजाने खाली उतरलो.
संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे राधानगरी बीचवर पोहणे हा होता. १०-१५ मिनिटात गाडीने आम्हाला तिथे नेऊन सोडले. जगातला ७ क्रमांकाचा स्वच्छ बीच अशी ह्याची ख्याती आहे आणि खरोखरच "टरकॉईज ब्लु " (मराठीत??) रंगाचे नितळ पाणी बघून आम्हाला वेड लागायची पाळी आली.
कपडे बदलायला आणि अंघोळीला खोल्या आणि कपडे ठेवायला लॉकर अशी छान सोय असल्याने धन्य झालो. आपल्याकडे कोकणात इतके सुंदर समुद्रकिनारे आहेत, तिथे माफक दरात नाही का अशा सोयी करता येणार? असा विचार मनात आलाच.
सुरुवातीला थोडेफार फोटो काढून झाल्यावर सरळ पाण्यात शिरलो आणि २ तास मस्त दंगा केला. आजूबाजूला काही मराठी/गुजराती लोक पोहत होते त्यामुळे तुम्ही कुठले आम्ही कुठले वगैरे झाले. मनसोक्त पोहून झाल्यावर भूक लागल्याने नाईलाजाने बाहेर यावे लागले आणि तोवर निघायची वेळही झाल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे कपडे बदलून आणि थोडेफार खाऊन तेथून निघालो आणि हॉटेलवर येऊन पोचलो. उतरताना ड्रायव्हरलाच विचारले की जवळपास कुठली चांगली रेस्टोरंटस आहेत का? त्याने एक दोन नावे सांगितली.
रात्री जेवायला तिथेच गेलो आणि चांदण्यात , रातकिड्यांची आवाज ऐकत शतपावली करत हॉटेलवर परत आलो. दुपारी ब्रम्हास्त्र बघून डोके पिकले असल्याने यावेळी रिस्क न घेता दिल चाहता है लावला आणि बघता बघता झोपून गेलो. (क्रमश:)
वाचने
9440
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! झकास चालू आहे
चालू द्यात
छान चालली आहे
(No subject)
In reply to छान चालली आहे by धर्मराजमुटके
दुर्दैवाने अंदमानचे तिकीट
मलाही हाच प्रश्न पडला
In reply to दुर्दैवाने अंदमानचे तिकीट by सुबोध खरे
येथे थेट विमाने सुद्धा फुकटची
In reply to मलाही हाच प्रश्न पडला by राजेंद्र मेहेंदळे
मला वाटते..
In reply to येथे थेट विमाने सुद्धा फुकटची by सुबोध खरे
पावसाळ्यात पर्यटक अंदमान-निकोबारला जात असतील असे वाटत नाही.
In reply to मला वाटते.. by राजेंद्र मेहेंदळे
नाही
In reply to मला वाटते.. by राजेंद्र मेहेंदळे
प्रवासी भत्ता मिळतो याचा
In reply to नाही by सुबोध खरे
धंद्याचे गणित
In reply to येथे थेट विमाने सुद्धा फुकटची by सुबोध खरे
३ च्या रांगेत तुम्ही एकटेच
In reply to धंद्याचे गणित by चौकस२१२
अत्यंत सुंदर. काय शुभ्र
हा भागही आवडला!
नाही
In reply to हा भागही आवडला! by टर्मीनेटर
छान सुरु आहे सहल
वा!!
सुंदर