Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 05/04/2023 - 09:01
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत. मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल. आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते. मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:
नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत.
यावर अधिक बोलणे न लगे. खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत. ok गेल्या ७ वर्षांमध्ये यू-ट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील. आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते. प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल. मी पाहिलेली (चित्रित) नाटके: * विजय तेंडुलकर शांतता ! कोर्ट चालू आहे अशी पाखरे येती सखाराम बाईंडर कमला *जयवंत दळवी बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर, नातीगोती *वसंत कानेटकर अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय * पु ल देशपांडे सुंदर मी होणार * आचार्य अत्रे तो मी नव्हेच * रत्नाकर मतकरी इथं हवय कुणाला प्रेम, आरण्यक, ब्लाइंड गेम * शं ना नवरे सूर राहू दे धुक्यात हरवली वाट * मधुसूदन कालेलकर शिकार * अशोक समेळ कुसुम मनोहर लेले {केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही } * प्र. ल. मयेकर आसू आणि हसू * उदय नारकर खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती) * शेखर ढवळीकर नकळत सारे घडले * डॉ. शिरीष आठवले मित्र * समीर कुलकर्णी तुझ्या माझ्यात * वसंत सबनीस कार्टी काळजात घुसली * मनोहर सोमण द गेम * विजय निकम रघुपती राघव राजाराम *सुरेश जयराम डबल गेम * चंद्रशेखर गोखले अनोळखी ओळख * शिवराज गोर्ले बुलंद * क्रांती बांदेकर कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक) *सुरेश खरे ती वेळच तशी होती * बाळ कोल्हटकर वेगळं व्हायचंय मला .. मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी मोठी शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो. कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो. ***********************************************************************************
  • Log in or register to post comments
  • 30128 views

प्रतिक्रिया

Submitted by हेमंतकुमार on Sun, 05/28/2023 - 06:26

Permalink

शिल्लक

शिल्लक सागर देशमुख. डॉ. विवेक बेळे, रूपाली भावे आणि इतर. एक निम्न मध्यमवर्गीय नायक आणि त्याचे चौकोनी कुटुंब. पत्नी एक सामान्य नोकरदार आणि गृहकृत्यदक्ष गृहिणी. मुलगा चार वेळेस बारावी नापास होऊन आता छोटी मोठी संगणक हमाली करतोय. मुलगी शाळेत आहे… सतत आर्थिक तंगी.. थकलेली उधारी.. या सगळ्या वातावरणात नाटक तसेच शांतपणे पुढे सरकते. परंतु शेवटच्या पंधरा मिनिटात जरा वेगळीच कलाटणी मिळते. नायक भ्रमिष्ट झालाय आणि काही वेळासाठी त्याच्यात ‘डोंबिवली फास्ट’ संचारलाय. काहीसा गूढ शेवट. नाटक जास्ती करून प्रकाशापेक्षा अंधारातच चालते. सामान्य घरातलं नेपथ्य अगदी उत्तम. सर्व कलाकारांचे उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट. एक तास वीस मिनिटांचा चांगला नाट्य अनुभव !
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Mon, 05/29/2023 - 18:37

Permalink

सौभद्र हे संगीत नाटक

सौभद्र हे संगीत नाटक नाट्यगृहामधे बघताना जाणवलेल्या नाट्यानुभवाबद्दल पुर्वी अन्य एका धाग्यावर प्रतिसाद लिहिला होता . हा धागाही नाट्यानुभवाशी संबधीत असल्याने ती प्रतिक्रिया येथेही मुद्रीत करत आहे . संगीत सौभद्र हे नाटक तुनळीवरही आहे . " कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात . नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे . अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची या नाट्यपदामधुन कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..". सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो . अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो . पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो . " ** मास्तर कॄष्णराव - माननीय संगीतकार श्री. कॄष्णराव फुलंब्रीकर .
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 05/31/2023 - 19:45

In reply to सौभद्र हे संगीत नाटक by सिरुसेरि

Permalink

वा ! उत्तम

"नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी"
छान आहेत ती पदे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 05/31/2023 - 19:46

Permalink

पर्याय

पर्याय जयवंत दळवी * उषा नाडकर्णी, सुधीर जोशी, जयंत सावरकर व इतर. एकत्र कुटुंब: कजाग सासू , मनमिळाऊ सासरा. मुलीचा नवरा ठोंब्या हुंडाबळी हा नकोसा आणि अंगावर येणारा विषय. शोकांतिका !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 06/03/2023 - 07:26

Permalink

इथं हवय कुणाला प्रेम

इथं हवय कुणाला प्रेम रत्नाकर मतकरी * राजन भिसे, चिन्मयी सुमित, स्वाती चिटणीस, वैभव मांगले व इतर एक नाटककार आणि त्याला प्रेमाचे नाटक लिहायचा आग्रह करणारी एक प्रसिद्ध नटी .. प्रेमाचे नमुने दाखवणाऱ्या विविध प्रसंग नाटिका. त्यांतून प्रेम, लग्न, संसार, निव्वळ सहजीवन, व्यापताप, घटस्फोट आणि जुन्या व नव्या जमान्यातील प्रेमाच्या व्याख्या या सगळ्यांवर मार्मिक भाष्य. श्रवणीय गीते आणि प्रेक्षणीय समूह नृत्ये. अखेरीस, “प्रेम असतं की नसतं” या पेचात पडलेला नाटककार आणि त्याच्या बायकोने त्याला एका प्रेमाच्या ‘नाटका’तूनच दिलेले उत्तर . सुंदर नाटक व संगीतिका !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 01/24/2024 - 16:01

Permalink

अधांतर

अधांतर जयंत पवार ज्योती सुभाष, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लीना भागवत *गिरणी कामगारांच्या लढ्याची पार्श्वभूमी.. त्या बंद पडणे ... वैफल्य * एका विधवेची तीन मुले आणि एक मुलगी *एक गुंड - सतत टाडा आणि मोकाची भाषा; दुसरा बेकार आणि तिसरा लेखक. * देशी-विदेशी साहित्यावर तात्विक चर्चा... ती देखील मुद्द्यावरून मुद्यावर येणारी * मुलगी कुमार्गाला लागलेली * बहुतेक सर्व संवाद चढया आवाजातील... तीव्र कौटुंबिक कलह.. शोकांतिका सर्वांचा अभिनय उत्तम !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 01/24/2024 - 16:03

Permalink

नाटक सुरू असतं

५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनानिमित्तचा " आणि नाटक सुरू असतं" हा कार्यक्रम छान आहे मराठी रंगभूमीची स्थित्यंतरे छान दाखवली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 01/24/2024 - 18:19

Permalink

या धाग्याच्या प्रेरणेने

या धाग्याच्या प्रेरणेने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?" पाहिले. कड्क आहे एक्दम ... लेखन, अभिनय, दिग्दर्शन एक नंबर ! एकच प्याला देखिल पाहिले : सुरुवात - अंशुमन विचारे, संग्राम संमेल यांच्या संचात आणि उत्तरार्ध : चित्तरंजन कोल्हटकर, रवि पटवर्धन यांच्या संचात ! भारी आहे ! एक नंबर सुंदर आहे हा धागा !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 01/24/2024 - 18:39

In reply to या धाग्याच्या प्रेरणेने by चौथा कोनाडा

Permalink

धन्यवाद !

डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?
+१११ अनेक वर्षांपूर्वी रंगमंदिरात पाहिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Wed, 01/24/2024 - 19:39

Permalink

थोडंसं अवांतर

गिरीश ओक आणि उत्कर्षा नाईक यांची आभास नावाची एक जुनी थरारक मालिका होती. आपल्या पत्नीला वेगवेगळे भास होतात असे वातावरण तयार करून तिला मानसिक रुग्ण ठरविणे आणि मग घटस्फोट घेऊन मैत्रिणीशी लग्न करणे असा नायकाचा डाव असतो. राजन वाघधरे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. हि मालिका मी युट्युबवर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडली नाही. कुणाला त्याची लिंक माहिती असल्यास त्याची माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 01/28/2024 - 17:23

Permalink

एक्झिट

२ व्या राज्यनाट्य स्पर्धेतले नाटक (२०२३) : एक्झिट लेखक - अरविंद लिमये दिग्दर्शक - उषा धावडे, मृणाल ढोले कलाकार : मृणाल ढोले, किशोर तळोकार एक गाजलेली अभिनेत्री नैराश्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या चाहत्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले एक 'नाटकातले नाटक'. ठीक आहे. ध्वनीमुद्रण सामान्य. अगदी बघितलेच पाहिजे असे नाही…….
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 02/02/2024 - 16:20

Permalink

गहिरे रंग

गहिरे रंग शं. ना. नवरे दि. : राज कुबेर गिरीराज, जयंत सावरकर, शकुंतला नरे, शशिकांत गंधे व इ. एक जोडपे.. नवऱ्यात प्रजननक्षमतेचा दोष.. बायकोवर झालेला बलात्कार आणि गर्भधारणा.. ते पापाचे मूल नको हा पुरुषी अहंकार...अखेर शोकांतिका. प्रमुख कलाकारांचा अभिनय उत्तम. जयंत सावरकरांचा बेरकी काडयाघालू ‘मामा’ देखील लक्षात राहण्यासारखा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिताके on Sat, 02/03/2024 - 00:04

Permalink

ओझ्याविना प्रवासी

ओझ्याविना प्रवासी https://www.youtube.com/watch?v=5KsQA-bP4qQ कलाकार - तुषार दळवी, भक्ती बर्वे, सुनीला प्रधान, किशोरी शहाणे, संदीप मेहता. हा एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद आहे. भूतकाळ विस्मृतीच्या पडद्याआड हरवलेल्या एका तरुणाचं खरं कुटुंब शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातून उघडकीला येणारे कौटुंबिक कलह अशी साधारण कथा आहे. जुन्या धनाढय फ्रेंच कुटुंबातली एकंदर विचारधारा आणि त्या ओघाने झालेला शेवट दाखवताना, खिळवून ठेवणारे संवाद आणि सर्व कलाकारांचा सुरेख अभिनय यामुळे नाटक प्रभावी वाटलं. मूळ नाटकातली नावं, वेशभूषा वापरल्यामुळे वेगळेपण जाणवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 02/03/2024 - 13:22

Permalink

या धाग्यामुळे "अशी पाखरे येती

या धाग्यामुळे "अशी पाखरे येती" आवर्जुन पाहिलं. सुंदर आहे. संजय नार्वेकर, हेमू अधिकारी, लीना भागवत, ज्योती सुभाष यांचा रंगमंचीय अभिनय किती ताकदीचा होता ते दिसुन येते. (यातला सं ना तर भलताच आवडला ... आणि लीना भागवत (पेशल बदाम, (( आपला क्रश :० )) दोन तीन उत्कट प्रसंगामुळे नाटक वर उचलले जाते. (सुरुवातीचे स्वगत बोर वाटले.. कालबाह्य म्हटले तरी चालेल.. पण त्यावेळाच्या नाटकाची गरज असावी) तर ... सांगायचं म्हणजे हा धागा लै भारी आहे .. नेहमी वर येत रहावा हीच इच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/03/2024 - 15:58

Permalink

+११११११

"अशी पाखरे येती"
प्रेमात पडावे असे आहेच !! वातावरणनिर्मिती उत्कृष्ट . आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 02/07/2024 - 17:32

In reply to +११११११ by हेमंतकुमार

Permalink

हा .... हा .... हा .... !

आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..
हा ... हा .... हा .... हा .... ! अगदी ... भारी "संस्कारीत" गप्पा ठोकणारा ! टिपि़अल हाफ पॅण्ट संघ दक्ष !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 02/08/2024 - 20:32

Permalink

अतिथी देवो भव

अतिथी देवो भव दिग्दर्शक : विजय केंकरे विनय येडेकर, राजन भिसे, लेखा मुकुंद. दिग्दर्शकांचे नाव बघून बघायला घेतले. ठीक आहे. शेवटच्या पंधरा मिनिटात दिलेली भावनिक कलाटणी चांगली आहे परंतु मुख्य ३/४ नाटक विशेष पकड घेत नाही. अतिथी म्हणून कुटुंबात आलेल्या एकजण शेवटी ‘भलताच’ निघतो. दोन्ही पुरुष पात्रे काहीशी आक्रस्ताळी वाटली. त्या मनाने लेखा मुकुंद यांचा वावर सहज आणि चांगला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 02/11/2024 - 07:39

Permalink

रंगमंचावर...

आपल्याकडे प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकांबद्दल वेगळा धागा नसावा असे वाटते. म्हणून इथेच लिहीतो. क्षमस्व ! … 217 पद्मिनी धाम काल पाहिले. एक उत्कृष्ट नाट्य अनुभव ! रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित नाटक. नाटकाचे नेपथ्य अतिशय सुंदर व प्रकाशयोजनाही गूढ वातावरणाला पूरक. ज्येष्ठ कलाकार मिलिंद शिंदे (माजखोर बेरकी रावराजे) आणि इतर सर्व तरुण कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. उद्योगपती रावराजे यांनी पोसलेले एक कॉलेज. त्यातल्या प्रयोगशाळेतला एक सहाय्यक. त्याचे व रावराजे यांच्या मुलीचे-पद्मिनीचे प्रेम असते. परंतु अखेर ते असफल राहते आणि शोकांतही. नंतर रावराजांनी दुष्टबुद्धीने घेतलेला ‘बदला’ हे नाटकाचे मुख्य सूत्र. दुसरा अंक सुरू होताना रंगमंचावर जो टांगा दाखवलाय तो केवळ अप्रतिम. टांग्यात बसलेला तो सहाय्यक आणि त्याच्या जोडीला कॉलेजला देण्यासाठी म्हणून दिलेली “भीतीदायक भेटवस्तू” असते. हे दृश्य अप्रतिम ! ती भेटवस्तू कॉलेजला पोचवण्याची ‘कामगिरी’ त्याला पार पाडायची आहे. परंतु वास्तवात काहीतरी भलतेसलतेच घडते. ते प्रत्यक्ष पाहण्यातच थरार आहे .. नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल. नेपथ्य लाजबाब व संस्मरणीय !! …. नाट्य अवलोकान युट्युबवर इथे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 03/04/2024 - 17:43

In reply to रंगमंचावर... by हेमंतकुमार

Permalink

सुंदर रसग्रहण.

सुंदर रसग्रहण. प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकाविषयी इथं लेखनाचं स्वागत ! वाचून पहायलाच हवे असं वाटतंय ! असं सुंदर नेपथ्थ्य नाटकात वेगळेच जबरदस्त वातावरण निर्माण करते
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 03/04/2024 - 17:58

In reply to रंगमंचावर... by हेमंतकुमार

Permalink

नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार

नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.
.... खूपच स्वागतार्ह आहे हे. आजकाल बर्‍याच नाटकांच्या शेवटी हे सत्र करतात ... याच वेळी रसिकांना त्यांच्यासमवेत फोटो काढायला मिळतात. नाटक व्यवसायाला टॉनिक मिळण्यासाठी हे खूप आवश्यक आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 03/01/2024 - 21:42

Permalink

माझी आई तिचा बाप

फ्रान्सिस ऑगस्टीन प्र. भू. : मोहन जोशी, स्मिता जयकर अनाथालयात वाढलेला एक मुलगा आणि एक मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात. आता आपल्याला मूल होण्याआधी आपल्या घरात आजी-आजोबा पाहिजेत हा त्यांचा विचार. दोघेही अनाथ, त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील माहित नाहीत. मग ते जोडते आपण समाजातून आई-वडीलच दत्तक का घेऊ नयेत असा विचार करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. यानंतर घरात त्या चौघांच्या गमती जमती आणि एकंदरीत कौटुंबिक नाटकाचा बाज. नाटक पूर्वार्धात पारशी पकड घेत नाही. तसेच, “तिच्या मनात आलं म्हणून तिने चहात आलं घातलं” यासारखे बाष्कळ विनोद अधूनमधून आहेत. शेवटच्या 25 मिनिटात नाटकाला कारुण्याची छान किनार दिलेली आहे. तसेच एका जोडीचे गुपित उघड झाल्याने कलाटणी मिळते. त्यामुळे नाटक काहीसे वर उचलले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 03/28/2024 - 10:39

Permalink

काचेचा चंद्र

काचेचा चंद्र सुरेश खरे * शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर कर्मठ कुटुंबातील उपवर तरुणी. आईबाप तिचे लग्न जमवायच्या खटपटीत आहेत. त्या दरम्यान तिला एका चित्रनिर्मात्याकडून चित्रपटात काम करण्याची मागणी येते. त्यावरून घरात वाद होतो. त्यांच्या घरात तिचा एक सावत्र भाऊ देखील नांदत आहे. चित्रपटात जाण्यासाठी आई-वडिलांचा विरोध तर सावत्र भावाचा हट्ट असा तो पेच असतो. एकंदरीत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून वडिलांना कर्जमुक्त करण्यासाठी ती चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेते. त्या क्षेत्रात वावरताना तिचा सावत्र भाऊ तिचा व्यवस्थापक अर्थात पुरुषी मालक बनतो. पुढे त्याच्या अहंकारापुढे ती पार कोमेजून जाते. तो तिला मद्यव्यसनी बनवतो आणि तिचे पूर्ण दमन करतो. .... शोकांतिका ! (आवडले होते व ४ वर्षांनी काल दुसऱ्यांदा पाहिले)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 04/14/2024 - 12:33

In reply to काचेचा चंद्र by हेमंतकुमार

Permalink

खूप छान नाटक. आवडले.

खूप छान नाटक. आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 04/14/2024 - 09:30

Permalink

आईशिवाय घर नाही

आईशिवाय घर नाही लेखक : राजन लयपुरी व इतर कलाकार : विलास व क्षमा राज, आकांक्षा वनमाळी आणि इतर तरुणांमधील गर्दचे घातक व्यसन या सामाजिक-आरोग्य विषयावर. उद्योगपती पुरुष आणि त्याची आमदार बायको यांचे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष नसल्यामुळे त्याला लागलेले व्यसन. शोकांतिका
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Mon, 04/15/2024 - 19:29

Permalink

कोर्ट मार्शल शोधतांना .....

Shauryawaan हा डब्ड हिंदी सिनेमा तू-नळीवर दिसला. अर्धा पाहिला. उरलेला उद्यापरवा पाहीन. जबरदस्त आहे. डॉक्टर तुम्हीसुद्धा आवडले. सखाराम बाईंडर, अधांतर पाहिली. फारच अंगावर आली. खूप अस्वस्थ झालो. मित्र, वेड्याचे घर उन्हात, काचेचा चंद्र, लागूंचे नटसम्राट,ऑक्टोपस पूर्वी पाहिली होती. छान आहेत. नाट्यगृहात जाऊन पाहिली त्यातले सुधा करमरकर आणि फैयाजचे वीज म्हणाली धरतीला आवडले. एकदोन गाजलेली नाटके सुमार दर्जाची निघाली. तेव्हापासून हे धारिष्ट्य करीत नाही. त्यापेक्षा तू-नळी बरी. नाही आवडले तर सोडून देता येते. छान धागा. धन्यवाद. अवांतरः तू-नळीवर पाहिलेले लघुपट मात्र मोठ्या संख्येने चांगले निघाले. अनेक लघुपटात प्रथितयश कलाकार भूमिका करतात हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 04/16/2024 - 17:46

In reply to कोर्ट मार्शल शोधतांना ..... by सुधीर कांदळकर

Permalink

मासा ही अमृता सुभाष यांचा

मासा ही अमृता सुभाष यांचा लघुपट आवर्जून पहा. एक वेगळाच आनंद देऊन जाईल. https://www.youtube.com/watch?v=orayV2fpOmY&t=15s
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 04/16/2024 - 17:47

In reply to मासा ही अमृता सुभाष यांचा by चौथा कोनाडा

Permalink

अर्थात पाहिली नसेल तर !

अर्थात पाहिली नसेल तर !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 04/16/2024 - 19:46

In reply to मासा ही अमृता सुभाष यांचा by चौथा कोनाडा

Permalink

मासा

मी तो आधीच पाहिलेला असून त्याची नोंद लघुपट असल्यामुळे इथे केली होती :) छानच . . .
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 04/19/2024 - 14:16

In reply to मासा by हेमंतकुमार

Permalink

धन्यवाद कुमार१... छान संदर्भ

धन्यवाद कुमार१... छान संदर्भ ! आता त्या धाग्यातले फिल्म्स / नाटक सवडीसवडीने पाहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/17/2025 - 20:56

Permalink

तेंडुलकर . . .

कन्यादान * विजय तेंडुलकर यांच्या सामाजिक नाटकाचे हिंदी रूपांतर * नाथच्या भूमिकेत दर्शन जरीवाला तर ज्योतीच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले या रूपांतरात अधूनमधून मूळ मराठी वाक्ये कायम ठेवली आहेत. मराठी नाटक बघण्याचा कधी योग आला नव्हता. जातीयता या विषयावरील दमदार आणि प्रक्षोभक नाटक. काही प्रसंग अक्षरशः अंगावर येतात. नाटकाच्या अखेरच्या दहा मिनिटातला नाथ व ज्योतीचा संवाद थरकाप उडवतो आणि ‘मूल्य’ नामक गोष्टींच्या चिंधड्या उडवतो. तिच्या तोंडचे, “राक्षस पण तोच आहे आणि कवी पण तोच आहे”, हे वाक्य सदर नाटकात मराठीतच ठेवून उत्तम परिणाम साधला आहे. https://www.youtube.com/watch?v=Y7G7z_3VWjM . . . एकेकाळी तेंडुलकरांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “कन्यादानमधील नाथ देवळालीकर हा मी आहे आणि तो माझ्या पिढीतले मला कळणारे अनेक ‘लिबरल’ प्रवृत्तीची माणसे आहे”.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/17/2025 - 20:58

Permalink

एलकुंचवार व अन्य

गार्बो महेश एलकुंचवार प्रायोगिक नाटक आहे. नेपथ्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. फारसे कथानक असे नाही. सामाजिक टीकाटिप्पणीचा भाग आहे. प्रायोगिक बघायची सवय नसल्यामुळे डोके जड पडते. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. https://www.youtube.com/watch?v=c_Wln9ImFhA . . . . कथा कुणाची व्यथा कुणा गो. गं. पारखी नाटक दुसऱ्यांना पाहिले. चांगले आहे. रहस्यकथा वाचून त्यातून खून करण्याची कल्पना मिळते हा विषय. प्रसाद पंडित यांनी खलनायकाची भूमिका उत्तम वठवली आहे. https://www.youtube.com/watch?v=Tak73S-b1Xg
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com