✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस

प
प्रचेतस यांनी
Tue, 06/21/2016 - 22:40  ·  लेख
लेख
तसे पावसाळ्याचे वेध मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागलेले असतात. नैऋत्येहून निसटलेले चुकार काळे ढग इकडे लहानसं आकाश व्यापून टाकत असतात. बाजूंनी पांढरे, कापसांसारखे गुंतागुंतीचे, थराथरांचे आणि मध्यभागी काळसर असलेले ढग येथे दिसू लागलेले असतात. हे तसे दरवर्षीच सुरुवातीला दिसतात. मागाहून येणाऱ्या जलाने संपृक्त झालेल्या काळ्याभोर मेघांच्या लाटांची ते जणू वर्दी द्यायला आलेले दिसतात. कधीतरी एखादा वळीव बरसून गेलेला असतो, तेव्हा स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात ते ढगांचे पुंजके मोठे खुलून दिसत असतात. a संध्यारागोत्थितैः ताम्रैः अंतेष्वपि च पाण्डुभिः । स्निग्धैरभ्रपटच्छेदैः बद्धव्रणमिवांबरम् ॥ कधी संध्यासमयीच्या ताम्रवर्णी आकाशात हे कधी श्वेत तर कधी स्निग्ध दिसणारे ते मेघखंडांनी आच्छादित झालेले आकाश व्रणावर बांधलेल्या लालभडक पट्टीसारखे दिसते आहे. हळूहळू आकाशात मेघांची दाटी होऊ लागते. मेघखंडातनं मोकळं राहिलेलं आकाश काळ्याशार मेघांनी भरुन जाऊ लागतं. मधूनच दर्शन देणारा सूर्यही आता दिसेनासा होऊ लागतो. आकाशरुपी तरुणी सूर्याच्या किरणांद्वारे समुद्राचा रस पिवून नऊ महिने धारण केलेल्या गर्भरुपी जलाला जणू जन्म देत असते. सारथी जसा चाबकाचे तडाखे उडवून घोड्यांना जसा पुढेपुढेच दौडवत असतो , तसा हा सुसाटणारा वारा आपल्या मेघरूपी सेवकांना गोळा करून ते आपल्या दृष्टीस पडतील असे करतो आणि हे गगनमंडळ मेघांनी ग्रासून टाकले कीं त्या सिंहरुपी मेघांच्या गर्जनेचा गडगडाट दूर अंतरावरुनही ऐकू येत असतो. उत्तररात्रीही काजव्यारुपी प्रकाशशलाकांनी वृ़क्षच्या वृक्ष चमकू लागलेले असतात. a अयं स कालः संप्राप्तः समयोऽद्य जलागमः । संपश्य त्वं नभो मेघैः संवृतं गिरिसंनिभैः ॥ हा जलाची प्राप्ती करुन देणारा पावसकाळ जवळ आलाय, पर्वतासमान भासणार्‍या मेघांनी हे आकाशमंडळ जणू झाकोळून गेले आहे. काही मेघ वांझ गाईप्रमाणे उदकरहित आहेत तर काही वृष्टीजल प्रसवत आहेत अशा रितीनं हा पर्जन्य आपल्या मनासारखे रूप धारण करीत आहे. a संवत्सरं शशयानाः ब्राह्मणाः व्रतऽचारिणः वाचं पर्जन्यऽजिन्वितां प्र मण्डूकाः अवादिषुः ॥ एखादा ब्राह्मण जसं व्रतपालन करण्यासाठी वर्षभर मौन पाळतो तद्वतच हे बेडूक वर्षाकाळ सुरु होताच आनंदित होऊन डरांव डरांव असा कोलाहल सुरु करतात. त्या कृष्णवर्णी मेघांच्या गर्जना ऐकून नऊ मास रोखून धरलेल्या निद्रेचा त्याग करून जागे झालेले अनेक प्रकारच्या रूप, आकार, वर्ण आणि बोली असणारे बेडूक नवीन जलाच्या धारांनी अभिहत होऊन जोरजोराने बोलत असतात. जणू एखादा गायक समेवर येतो तद्वतच उत्तररात्री त्यांचा हा नाद तीव्रतम झालेला असतो. बालेंद्रगोपांतरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन । गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥ नूतन हिरव्यागार गवताने आच्छादित झालेल्या ह्या भूमीला लहान लहान रक्तवर्णी इंद्रगोप कीटकांमुळे, अंगावर लाखेच्या रंगाने रंगवून विचित्र शोभेने संपन्न केलेल्या स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त होत आहे. हे मखमली मृगाचे किटक केवळ पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसत असतात. a-a मेघकृष्णाजिनधरा धारायज्ञोपवीतिनः । मारुतापूरितगुहाः प्राधीता इव पर्वताः ॥ कशाभिरिव हैमीभिः विद्‌भिरिव ताडितम् । अंतः स्तनितनिर्घोषं सवेदनमिवांबरम् ॥ मेघरूपी काळे मृगचर्म, जलधारारूपी यज्ञोपवीत धारण केलेले, वायुने परिपुरीत हृदय असणारे हे पर्वत, ब्रह्मचार्याप्रमाणे जणु वेदाध्ययनास आरंभ करीत आहेत. सोन्याच्या चाबकाप्रमाणे भासणार्‍या ह्या विद्युल्लतांच्या नादाने तडित झालेले आकाश मेघांच्या गंभीर गर्जनेच्या रुपात आर्तनाद करु लागलेले आहे. आकाशामध्ये सर्व बाजूस मेघ विस्कळित झाले आहेत. कोठेतर त्या ढगांनी झाकले जाण्याने आकाश दिसतच नाही आणि काही ठिकाणी त्याला छिद्र पडल्यामुळे ते स्पष्ट दिसून येत आहे. ग्रीष्माच्या उन्हाने तापली गेलेली भूमी वर्षाकालच्या नूतन जलाने भिजून शोकसंतप्त सीतेप्रमाणे अश्रूपात करीत आहे. मेघरूपी घोडे जोडलेल्या, विद्द्युल्लतेरुपी चाबूक घेतलेल्या आकाशरुपी रथात बसून सर्वत्र संचार करणारी पर्जनरुपी देवता आपल्या पखालीचे टोक उलटे धरुन जमिनीवर सर्व खळगे पाण्याने भरुन टाकत आहे. कधी त्या देवतेच्या ध्यानी येतं की ह्या रानात बेडूक बोलू लागले नाहीत, काजवे लुकलुकू लागले नाहीत, खाचरं पाण्यानी तुडुंब भरली नाहीत अशा वेळी ही देवता आपल्या मेघरुपी पक्ष्यांचा थवा तिकडे धाडून पर्जन्यधारा बरसवू लागली आहे. a वर्षोदकाप्यायितशाद्वलानि प्रवृत्तनृत्तोत्सवबर्हिणानि । वनानि निर्वृष्टबलाहकानि पश्यापराह्णेष्वधिकं विभांति ॥ पहा ह्या वर्षाकाळात या वनांची शोभा अधिकच वाढत आहे. पावसाच्या पाण्यामुळे यांच्यात हिरवेगार गवत उगवले आहे. मोरांच्या झुंडीच्या झुंडींनी आपल्या नृत्योत्सवाचा आरंभ केला आहे आणि मेघ या वनात निरंतर जल वर्षाव करीत आहेत. चहूकडे हिरवं हिरवं होत आहेत, गाईगुजी जोगवू लागल्या आहेत, खाचरं जलांनी तुडुंब भरुन जात आहेत. डोंगरांवर भारंबीचे ठोंब, चवेणीला धुमारे फुटू लागले आहेत, रानकेळी उमलू लागलेली आहेत. कड्यांवरुन कोसळणारे प्रपात शुभ्र हिमासारखे भासू लागले आहेत, ह्या प्रपातांनी पहाडातून नद्या उगम पावू लागलेल्या आहेत. कोसळणारं शुभ्र जल जमिनीवर येताच गेरूसारखं लालभडक होऊन दर्‍याखोर्‍यांतून वाहू लागलेलं आहे. सार्‍या सृष्टीत अवघं चैतन्य पसरलेलं आहे. a महांतं कोशं उत् अच नि सिञ्च स्यंदंतां कुल्याः विऽसिताः पुरस्तात् । घृतेन द्यावापृथिवीइति वि उंधि सुऽप्रपानं भवत्व् अघ्न्याभ्यः ॥ हे पर्जन्या, तू मोठा निनाद करुन जेव्हा दुष्ट अवर्षणाचा नाद करत असतोस तेव्हा ह्या पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व आनंदाने डोलू लागलेले असते. काळसर, तांबडी झालेली जमिनी हिरव्यागार गवताने भरुन जाते. काळ्याकभिन्न छातीचे पर्वत हिरवा साज नेसू लागतात, मेघ पर्वताला धडकू लागतात, नद्या जलाने भरुन वाहू लागतात, पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात आनंदाने भरारी मारु लागतात, हरणं यथेच्छ जलपान करु लागतात, वानरं कल्लोळू लागतात, मोर नाचू लागतात, वाघ डुरकू लागतात. a वर्षप्रवेगा विपुलाः पतंती प्रवांति वाताः समुदीर्णवेगाः । प्रनष्टकूलाः प्रवहंति शीघ्रं नद्यो जलं विप्रतिपन्नमार्गाः ॥ घनघोर वृष्टी होत आहे. मरुतही जोराने वहात आहे, आणि नद्या आपल्या तटांना तोडून अत्यंत तीव्र गतीने जल वाहून नेत आहेत. आपल्या तीव्र जलौघांनी त्यांनी यात्रिकांचे मार्ग रोखून धरले आहेत. मेघांच्या समुदायानी समस्त आकाश आच्छादित झालेले आहे. रात्री तारे दिसत नाहीत, दिवसा सूर्य दिसत नाही. दिशा अंधःकाराने वेष्टिल्या गेल्यामुळे त्यांचे भान जणू नाहिसे झालेले आहे. दरीतून धुकटाचे लोट उठत आहेत. त्या मेघांच्या पर्वतांवर आदळणार्‍या झुंडी जणू एखाद्या सैन्यावर मत्त गजराज जाऊन कसे आदळावेत तशा भासू लागल्या आहेत. त्या पर्वतांतून वाहणारे प्रपात एखाद्या मदमस्त गजाच्या गंडस्थळातून वाहणार्‍या मदाप्रमाणे दिसत आहेत. a a अभि क्रंद स्तनय गर्भं आ धाः उदन्ऽवता परि दीय रथेन । दृतिं सु कर्ष विऽसितं न्यञ्चं समाः भवंतु उत्ऽवतः निऽपादाः ॥ पर्जन्य आपल्या गर्भातील उदकाने भूमीवर दिव्य घृताचे सिंचन करीत आहे. मोकळे केलेले झालेले निर्झर दुथडी भरून पुढे वहात जात आहेत. आपल्या मार्गात येणार्‍या सर्व सृष्टीला ते जणू तृप्त करत आहेत. ही पर्जन्यवृष्टी सकळ जनांना आनंदित करीत आहे. तिची ही कृपा आमच्यावर अशीच चालू राहात आहे. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
25062 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

मस्त!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 06/21/2016 - 22:50 नवीन
फोटो अन वर्णन सुपर्ब!! शेवटला फोटो कुठला?
  • Log in or register to post comments

सुरेख वल्ली शेठ !!!

राघवेंद्र
Tue, 06/21/2016 - 22:55 नवीन
शेवटचा फोटू अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

अरे वल्लीशेठ.. काय कातील फोटो

गवि
Tue, 06/21/2016 - 23:02 नवीन
अरे वल्लीशेठ.. काय कातील फोटो आहेत..!!!
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या मालक!

किसन शिंदे
Tue, 06/21/2016 - 23:04 नवीन
दंडवत घ्या मालक! शेवटचा रोहिडाय बहुतेक कि कोरीगड? आणि उभा राह्यलेला तो गणेशा आहे माझ्या आठवणीप्रमाणे..
  • Log in or register to post comments

रोहिडा आहे. गणेशा नाही तो.

प्रचेतस
Tue, 06/21/2016 - 23:18 नवीन
रोहिडा आहे. गणेशा नाही तो. कुणी अनामिक आहे. सहज टिपलेला फोटो तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ख़ास च फोटो प्रचुर ;)

धनंजय माने
Tue, 06/21/2016 - 23:11 नवीन
ख़ास च फोटो प्रचुर ;) हे 'झाड' 2000 वर्षापूर्वी हरवलेलं ऐतिहासिक कोणीतरी आहे याबाबत खात्री पटु लागली आहे.
  • Log in or register to post comments

वाह!

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/21/2016 - 23:14 नवीन
वाह! असा यायला हवा पाऊस. ! ======= अवांटर- @ अंतेष्वपि च पाण्डु"भिः ››› =))
  • Log in or register to post comments

_/\_ फक्त!!

रातराणी
Tue, 06/21/2016 - 23:19 नवीन
_/\_ फक्त!!
  • Log in or register to post comments

हे कोणी लिहिलेय हे पुन्हा

एस
Tue, 06/21/2016 - 23:24 नवीन
हे कोणी लिहिलेय हे पुन्हा एकदा वर जाऊन पाहिलं. :-) अतीव सुंदर!
  • Log in or register to post comments

फारच सुरेख लिहिलंय.

पद्मावति
Wed, 06/22/2016 - 02:23 नवीन
फारच सुरेख लिहिलंय. नेहमीप्रमाणेच क्लास!! फोटो छान आहेत. फोटोंची जोड देण्याची कल्पना मस्तं!
  • Log in or register to post comments

अप्रतिम! अफाट! अतुल!

चांदणे संदीप
Wed, 06/22/2016 - 02:52 नवीन
. ___/\___ Sandy
  • Log in or register to post comments

लेखन आणि फोटो एकमेकाला पूरक

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/22/2016 - 05:18 नवीन
लेखन आणि फोटो एकमेकाला पूरक... आणि एक नंबर !
  • Log in or register to post comments

छान

उल्का
Wed, 06/22/2016 - 06:39 नवीन
अप्रतिम फोटो!
  • Log in or register to post comments

निसर्गाच्या अनंत, उदात्त

दीपा माने
Wed, 06/22/2016 - 06:57 नवीन
निसर्गाच्या अनंत, उदात्त रूपापुढे त्याला मानव त्या लाल रंगाच्या किटकाएवढाच किंमतीचा!
  • Log in or register to post comments

अहाहा

शरद
Wed, 06/22/2016 - 07:14 नवीन
नवयौवनसंपन्न युवतीला अलंकारांनी सुशोभित करावे तसे छायाचित्रांनी लेखनाला अलंकृत केले आहे. वा ह वा. शरद
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम

चौकटराजा
Wed, 06/22/2016 - 07:14 नवीन
मान गये आपकी नजर .....
  • Log in or register to post comments

झकासच

स्पा
Wed, 06/22/2016 - 07:17 नवीन
झकासच
  • Log in or register to post comments

विलक्षण अप्रतिम

नाखु
Wed, 06/22/2016 - 08:30 नवीन
दुसरे शब्दच नाहीत . नुसते मोती जसे कुशल कारागीराने साधेच पण मोहक हारात गुंफावेत तसा लेख आणि छायाचित्र मेळ आहे. जोडचित्र (एकाखाली एक) केवळ प्रत्ययी आहेत. आपल्या मनातल्या पावसालाही अशीच वाट फुटू दे,आणि मळ्भ निराशेची रखरख दूर होवो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना. भीजपावसातला नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

मस्त..

जेपी
Wed, 06/22/2016 - 08:36 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments

भन्नाट लिहलय!!!

प्रदीप साळुंखे
Wed, 06/22/2016 - 08:40 नवीन
भन्नाट लिहलय!!!
  • Log in or register to post comments

बालकवी

कंजूस
Wed, 06/22/2016 - 08:47 नवीन
बालकवी
  • Log in or register to post comments

कहर

टवाळ कार्टा
Wed, 06/22/2016 - 09:14 नवीन
कहर
  • Log in or register to post comments

फोटो लै म्हणजे लैचं भारी.

गणामास्तर
Wed, 06/22/2016 - 09:39 नवीन
फोटो लै म्हणजे लैचं भारी.
  • Log in or register to post comments

वरवर भिजवणारा पाउस हल्ली

५० फक्त
Wed, 06/22/2016 - 10:18 नवीन
वरवर भिजवणारा पाउस हल्ली आतपर्यंत जातो.. खोल दडलेल्या बिजाला अंकुरुन वर आणतो.. .. .. .. . बाकी लेखन आणि फोटो दोन्ही भारी रे..
  • Log in or register to post comments

रम्य फोटो आणि रसभरीत वर्णन.

सस्नेह
Wed, 06/22/2016 - 10:50 नवीन
रम्य फोटो आणि रसभरीत वर्णन. एक निरीक्षण : प्रचेतस सर अलीकडे दगडे सोडून काव्यात रमू लागले आहेत. (कोण तो विचारतोय, 'आता ही काव्या कोण' म्हणून )
  • Log in or register to post comments

मस्त ...

अभिजीत अवलिया
Wed, 06/22/2016 - 10:51 नवीन
मस्त ...
  • Log in or register to post comments

सुंदर

अनिरुद्ध प्रभू
Wed, 06/22/2016 - 10:52 नवीन
भाउ....
  • Log in or register to post comments

मस्त लेखन

शान्तिप्रिय
Wed, 06/22/2016 - 10:56 नवीन
मस्त लेखन
  • Log in or register to post comments

भारीच रे...

सतिश गावडे
Wed, 06/22/2016 - 11:01 नवीन
भारीच रे...
  • Log in or register to post comments

सुरेख

पैसा
Wed, 06/22/2016 - 11:19 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

जबरा

महासंग्राम
Wed, 06/22/2016 - 11:21 नवीन
जबरा फोटो आणि लिखाण लिखाणाला फोटोंमुळे जणू अलंकार चढवला आहे असे वाटते. इतके जिवंत आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

वाह!!!

पिशी अबोली
Wed, 06/22/2016 - 11:33 नवीन
वाह!!!
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लेखन आणि फोटो

प्रीत-मोहर
Wed, 06/22/2016 - 11:52 नवीन
अतिशय सुरेख लेखन आणि फोटो
  • Log in or register to post comments

सुंदर !!

प्रसाद गोडबोले
Wed, 06/22/2016 - 12:08 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अनिता ठाकूर
Wed, 06/22/2016 - 12:59 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Wed, 06/22/2016 - 13:02 नवीन
आता बहूदा ह्या वर्षी वल्ली सहकुटुंब होणार असे दिसतेय.
  • Log in or register to post comments

__/\__

नीलमोहर
Wed, 06/22/2016 - 14:12 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

सुंदर

जगप्रवासी
Wed, 06/22/2016 - 14:28 नवीन
फोटो कहर आहेत त्याला शोभतील अशी संस्कृत काव्ये आणि त्याचा सुंदर असा अनुवाद (भावानुवाद). प्रचेतस सर तर आधुनिक कालिदास झालेत.
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 14:37 नवीन
रूढार्थाने हा अनुवाद किंवा भावानुवाद नाही. श्लोकांचं अगदी स्वैर रूपांतर पहिल्या एकदोन ओळीत केलंय. त्याखाली त्याला जोडून जे वर्णन आहे ते स्वतंत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

तुफान!

लॉरी टांगटूंगकर
Wed, 06/22/2016 - 16:03 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Wed, 06/22/2016 - 16:27 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

नया है वह
Wed, 06/22/2016 - 16:57 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

क्लास !!

स्मिता_१३
Wed, 06/22/2016 - 17:30 नवीन
क्लास !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम फँन्टॅस्टिक सुपर्ब

अजया
Wed, 06/22/2016 - 19:18 नवीन
अप्रतिम फँन्टॅस्टिक सुपर्ब क्लास....अजून आठवलं की लिहिन! फोटोंनी जादू केलीये लेखात.
  • Log in or register to post comments

साहेबा दंडवत घ्या. खुप छान.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 06/22/2016 - 22:46 नवीन
साहेबा दंडवत घ्या. खुप छान. शेवटचा फोटो तर कळस.जियो.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर!!

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 06/24/2016 - 18:09 नवीन
लेखन आणि फोटो..दोन्हीही सुंदर!! काय अधिक सुंदर हे सांगता येणार नाही. बाकी शिल्पकला असो की निसर्गवर्णन..वल्लीची लेखणी तशीच तळपते. _/\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन आणि अप्रतिम फोटो

श्वेता व्यास
गुरुवार, 10/21/2021 - 12:11 नवीन
अप्रतिम लेखन आणि अप्रतिम फोटो !
  • Log in or register to post comments

लेखन आणि प्रचि

अनन्त्_यात्री
गुरुवार, 10/21/2021 - 18:46 नवीन
समसमा संयोग!
  • Log in or register to post comments

व्वा, भारी !

चौथा कोनाडा
Mon, 10/25/2021 - 17:03 नवीन
वाह, क्लासिक !

💖

  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Mon, 05/15/2023 - 08:49 नवीन
फोटो अन वर्णन सुंदर !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा