विहीर
लेखनविषय (Tags)
"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे."
मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे.
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल.
माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण. दिलीपही ओळखीचा. दोघांचं लव्ह मॅरेज. दोघंही दिसायला देखणे, गोरेपान. एकमेकांना अनुरूप. प्रतिमा एम् ए झालेली. आवड म्हणून एका माॅंटेसरीत नोकरी करणारी. दिलीप ग्रॅज्युएट. एका शाळेत शिक्षक. त्यांना दोन मुलं. एक मुलगा.एक मुलगी. आदर्श संसार. दोघंही संसारापुरतं कमवायचे. संसार भागायचा.थोडी शिल्लकही पडायची. ते आधी पुण्यात राहात होते पण भाड्याने. त्यांचं एक स्वप्न होतं. स्वतःच्या मालकीचं घर असावं.
त्या मगाशी सांगितलेल्या खेड्यात, ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्यांनी लहानसा प्लाॅट घेतला. थोडी शिल्लक. थोडं लोन. तिथं एक बेडरूम,हाॅल, किचन असं लहानसं घर बांधलं.पण तिथं मोठी अडचण होती ती म्हणजे पाण्याची. परिसरात काही जणांकडे मोठ्या विहिरी होत्या. कुणाकुणाकडं क्वचित बोअरवेल्स होत्या.
तरीही त्यांनी तिथे राहायला जायचे ठरवले. शेजारी ज्यांच्या घरी विहीर होती. त्यांच्याशी बोलणी केली. व्यवहाराचं ठरवलं. महिन्याला विशिष्ट पैसे देऊन, त्यांच्या विहिरीचं पाणी घ्यायचं असं ठरवलं.
प्रतिमा आणि दिलीप रोज पहाटे उठायचे. शेजारच्या विहिरीचं पाणी आणायचे. त्यानंतर घरकाम उरकून,मुलांचे डबे तयार करून, त्यांना शाळेत पाठवून दोघंही नोकरीवर जायचे. दोघांनाही दगदग व्हायची.
मग दोघांनाही एके दिवशी विचार केला. असं लोकांकडून रोज रोज पाणी किती दिवस आणायचं? त्यापेक्षा आपणच आपल्या आवारात विहीर खोदून घेतली तर!?
दोघांचं एकमत झालं. त्यांनी एका कंत्राटदाराला बोलावलं. तो म्हणाला इतकी लहान विहीर खणणं मला परवडत नाही. त्यातून खणेन पण इतका इतका खर्च येईल.
तो खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात होता. नुकत्याच बांधलेल्या घराचं कर्ज ते फेडत होते.
मग दोघांनी 'तो'महत्त्वाचा निर्णय घेतला. अशक्यप्राय, अविश्वसनीय वाटणारा!खोटा ,असत्य वाटणारा!
आपण दोघांनीच विहीर खणायची.
दोघंही पांढरपेशे, कमावलेलं शरीर नाही. इतक्या कष्टांची दोघांनाही सवय नाही. पण निश्चय दृढ होता. विहीर खणायची. तीही आपण दोघांनी!
दोघांनी रजा टाकली. तिची बिनपगारी,त्याची पगारी. शेजारून दोन कुदळी, दोन फावडी, दोन घमेली उसनी आणली. शेजाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांचाही विश्वास बसला नाही. ठरलं तर मग! कामाला सुरुवात केली. अडीच फूट त्रिज्येचं एक वर्तुळ दोरीनं आखलं. पाच फूट व्यास झाला. विहीर फार मोठ्या परिघाची नकोच होती. कारण घराभोवतीची जागा लहान होती. राख आणि चुना एकत्र करून वर्तुळाच्या परिघात भरून विहिरीची मर्यादा निश्चित केली.
......आणि .... खणायला सुरुवात केली. दोघंही खणत होते. मधे येणारी झाडांची मुळं,दगड,माती,फावड्यानं घमेल्यात भरून बागेत फेकत होते. दोघंही दमून जायचे. घामानं कपडे चिप्प भिजायचे. दोघांचीही गोरी त्वचा काळवंडून गेली. हाताला फोड आले. अंग,खांदे,मान,पाठ,कंबर दुखायचे. एकदा, दोनदा तर अतिश्रमानं तिला चक्कर आली.
पण काम थांबलं नाही.
हळुहळू विहीर खोल खोल जायला लागली. विहिरीला आकार येऊ लागला. ती विहिरीसारखी दिसायला लागली. आता विहिरीत उतरण्यासाठी शिडी आणावी लागली. शिडीवरून आत उतरून दोघं खणायला लागले. ते खणलेला राडारोडा बादलीत ठेवून, कासऱ्याने वर ओढून बागेत नेऊन टाकू लागले.
त्यांच्या हातांना जखमा व्हायच्या. त्यांची नखं तुटली. बोटांना चिरा पडल्या. पायांनाही जखमा झाल्या. पण दोघांनीही जिद्द सोडली नाही. ते खणतच राहिले, खोदतच राहिले. एकदा, दोनदा दगड वर चढवत असताना दिलीपचा शिडीवरून पायच निसटला. तो खाली खोल पडला. त्याला सपाटून मार लागला. रक्त आलं. त्यानं चार दिवस काम थांबवले. पण प्रतिमा एकटीच खणत राहिली. माती , दगड काढून वर पोहोचवत होती. तिची मुलं तिला मदत करत होती. दिलीप बरा झाला.मदतीला आला.
अखेरीस चिखल लागला. दोघांनाही परमानंद झाला. पोरं आनंदानं नाचायला लागली.
मग चिखलात पाय रुतवत दोघेही फावड्यानं चिखल घमेल्यात भरायला लागले. दोघंही खणतच होते. त्यांची एकूण तीस फूट विहीर खोदून झाली. त्या तेवढ्या खोलीवरच आता ढप्पळभर पाणी लागलं. थोडे थोडके दिवस नाही तब्बल दीड महिना दोघे खणत होते. तीस फूट! पाणी लागलं तसे सगळे आनंदाने रडायला लागले. एकमेकांना मिठ्या मारुन ओरडायला लागले.
त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्या सर्वांना पेढे वाटले. मग गवंडी बोलावले. विहीर आतून दगडांनी बांधून घेतली. त्यासाठी सिमेंट, चुना आणला. पाणी ओढायला व्यवस्थित रहाट बसवला. विहिरीची,कळशीभर पाण्याची पाच सवाष्णींच्या हस्ते पूजा केली. विहिरीची पूजा झाल्यावर विहिरीची ओटी भरली. नारळ,विडा, पाच फळं, उदबत्ती, चोळीचा खण, विहिरीला अर्पण केला. फुलांची परडी पाण्यात सोडली. मग प्रतिमानं कळशीची पूजा करून, कळशीभर पाणी डोक्यावरून घरात आणलं. स्वयंपाकघरातील ओट्यावर ती कळशी ठेवून प्रतिमानं ते पाणी प्यायला दिले.
सगळे म्हणाले की "पाणी थंड आणि गोड आहे."
त्यांच्या हकिकतीचा शेवटही शीतल आणि मधुर आहे..
अनेक दशके लोटली, प्रतिमा, दिलीप यांनी हे जग सोडून गेल्यालाही खूप काळ लोटला. पुढच्या पिढीशी संपर्क राहिला नाही. आता ती विहीरदेखील कोण्या नवीन बिल्डिंग प्रोजेक्टच्या खाली गाडली गेली आहे. आता कोणी शहरी पांढरपेशे लोक अशी विहीर खणू जातील का? शंकाच आहे.
प्रतिक्रिया
त्या जोडप्याच्या चिकाटीला दाद
वाह !
छान
भारीच!
बापरे ! नमस्कार या पतिपत्नीला
ही एक उत्तम कथा होऊ शकते
वाह, छान वाटलं वाचून, आता
सुंदर लेख
सुंदर लेख!
प्रेरणादायक.
कमाल आहे जोडप्याची. तुमचं
"दोघंही दिसायला देखणे,
'दोघेही दिसायला अगदी सामान्य, सावळे' असते तर ?
कथेचा गाभा, मतितार्थ पाहिला
अवांतर शंका..
श्री चित्रगुप्त, तुमच्या मताशी सहमत.
एकाद्याला तसे वाटण्याबद्दल काही मानसशास्त्रीय कारण असावे का
इतर विशेषणे त्यांनी कमावली
अरे किती चिरफाड कराल?
मी माझा दृष्टीकोन मांडला,
आणखी एक, जसा आहे तसा असं काही
ओक्के!!
त्यात त्या जोडप्याचे कोणते ही कर्तुत्व दिसत नाही.
आजी हा आय डी
गोरे असणे याबद्दल काहीसे
चर्चा मुळ मुद्द्यावरुन घसरवु नका.
प्रेरणादायी
इथे विहिरीऐवजी गोरेपान
दांपत्याच्या जिद्दीला सलाम.
अतिशय छान गोष्ट
अतिशय छान गोष्ट
अतिशय छान गोष्ट
आजकाल स्वतः काम करण्याला
गवि- त्या जोडप्याच्या