हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ५- बीर बिलिंग व बैजनाथ मंदिर

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
20 Jan 2023 - 12:29 am

भाग ४ येथे वाचा

कालची संध्याकाळ पालमपूर येथील सौरभ वनविहारला फेरफटका मारून खूपच छान व्यतीत झाली होती. पालमपूर म्हणजे धौलाधर पर्वतरांगेच्याकुशीतील एक नयनरम्य ठिकाण. कांगड्यातील धर्मशाळा-मॅकलॉडगंजनंतर पालमपूर हेच मोठे शहर. येथील निसर्ग व आजूबाजूच्या परिसरातील किल्ला, मंदिरे या गोष्टींमुळे पर्यटनासाठी हे एक उत्तम ठिकाण. येथील थंड व आर्द्र वातावरण, पाऊस तसेच नदी, ओढे यामुळे मिळणारे मुबलक पाणी, पाण्याचा निचरा व्हावा म्हणून जमिनीचा उतार असे चहाच्या पिकासाठी अगदी उत्तम वातावरण. ब्रिटिशांनी या गोष्टी हेरून येथे चहा माळ्यांची लागवड केली.
धर्मशाळेत चहाच्या बागा पाहून झाल्या होत्या, यापूर्वीच्या सहलींमध्ये मुन्नार तसेच दार्जिलिंग येथेही चहाच्या मळ्यांमध्ये फिरणे झालेले असल्याने आज आम्ही तिकडे फिरकणार नव्हतो. पहाटे जाग आल्यावर सकाळचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. आमचे हॉटेल महामार्गावरील बाजारपेठेपासून बरेच आतमध्ये (४ किमी) मारन्डा या छोट्याशा गावात होते.

हॉटेलच्या एका दिशेस महामार्गाकडे जाणारा चिंचोळा रस्ता व दोन्ही बाजूला दाट झाडी असलेले जंगल आहे. काही जण या बाजूस भटकायला बाहेर पडले.
झाडीतून दिसणारा सूर्योदय

आम्ही विरुद्ध दिशेने चालू लागलो. चौकशीत समजले की पालमपूर रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हळूहळू चालत स्टेशनला पोहचलो. अजून स्टेशनला जाग आलेली दिसत नव्हती.

पठाणकोट ते जोगिंदरनगर या दरम्यान ही नॅरो गेज (अडीच फुटी) रेल्वे चालते. अत्यंत धीम्या वेगामुळे पर्यटकांसाठी सोईस्कर नसली तरी स्थानिक लोकांसाठी खूपच उपयोगी. स्टेशनच्या बाहेर छोटीशी हेरिटेज गॅलरी आहे पण बंद असल्याने बघता आली नाही

स्टेशनवर एका फळ्यावर खूपच रोचक माहिती वाचायला मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ साली नगरोटा ते जोगिंदर नगर या मधील संपूर्ण रेल्वेच उचलून युरोपला नेण्यात आली होती. त्यानंतर १२ वर्षांनंतर लालबदूर शास्त्री यांच्या प्रयत्नाने १९५४ मध्ये ती पुन्हा सुरु करण्यात आली.

आता विद्युतीकरण किंवा आधुनिकीकरण झाल्याने बरीच उपकरणे बदलली आहेत. विस्मृतीत जाणारी काही जुनी यंत्रणा येथे पाहण्यास मिळाली.
रुळांचे सांधे बदलण्यासाठीचे खटके व टोल देण्यासाठी वापरात असलेले उपकरण.

सिग्नल यंत्रणा

रेल्वे स्टेशन आतील बाजूने व वेळापत्रक

स्टेशनच्या फलाटावर तसेच रुळांमधून चालत फेरफटका मारला. येथेच रुळांवर चालणारी ट्रॅक्टर उभी असलेली पहिली. यांचा उपयोग बहुतेक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी होत असावा.

आज अनपेक्षितरित्या प्रभातफेरीतच एका सुंदर ठिकाणाला भेट दिल्या गेली होती. थोडावेळ थांबून हॉटेलला परत आलो.

सर्व आटोपून साडेनऊच्या सुमारास भटकंतीसाठी गाडी निघाली. कांगडा-मंडी हायवेला लागल्यावर पाऊण तासात (१८ किमी) बैजनाथ या ठिकाणी पोहचलो. येथील मंदिर खूप सुंदर आहे. आमच्यातील काही जणांना पॅराग्लायडिंग करायचे होते त्यामुळे येथे न थांबता आधी 'बीर' येथे जाऊन परतीच्या वेळी हे ठिकाण पाहण्याचे ठरले. बैजनाथमध्ये रस्ता काही भागात अरुंद असल्याने एकेरी वाहतूक सोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा आहे. सर्व चालकही शिस्तीत वाहने चालवत असल्याने कुठेही कोंडीत न अडकता पुढे निघालो व पुढच्या अर्ध्या तासात बीर येथे पोहचलो.
बीर हे जोगिंदर नगर व्हॅलीतील एक छोटेसे खेडे. भारतातील पॅराग्लायडिंगचे प्रमुख ठिकाण म्हणून बिरची ओळख आहे. तिबेटी समुदायाचाही येथे रहिवास असून अनेक बुद्धमठ येथे आहेत.
बीर हे पॅराग्लायडर उतरण्यासाठीचे ठिकाण असून बिलिंग हे उड्डाणाचे ठिकाण आहे. त्यामुळे हे ठिकाण बीर-बिलिंग म्हणूनच ओळखले जाते. हे पॅराग्लायडिंगसाठी जगातील दोन नंबरचे उंच ठिकाण मानले जाते. १९१५ साली भारतातील पहिली विश्व पॅराग्लायडिंग प्रतियोगिता येथे भरवली गेली होती. बिरहून बिलींगचे रस्त्याने अंतर जवळपास १५ किमी असून दोन्ही ठिकाणांच्या उंचीत ८०० मीटर इतका फरक आहे. पॅराग्लायडिंगच्या तिकीट किमतीतच बीर पासून बिलिंगसाठी खाजगी गाडीने आपल्याला सोडण्यात येते, हवेत उडण्याच्या २० मिनिटाच्या वेळात आपल्याला बीर व्हॅलीचे अद्भुत दर्शन होते. तिकीट खर्च जवळपास २५००/- अधिक गोप्रो कॅमेरा ५००/-.

बिरला आमच्या गाडीच्या मालकाने सुचवलेल्या एजंटकडे आम्ही पोहचलो व तिकीटाची चौकशी केली. बिरला वातावरण स्वच्छ असले तरी बिलींगला दाट धुके असल्याने वाट पाहावी लागणार होती. हे लोक वॉकीटॉकी द्वारे बिलिंगशी सतत संपर्क साधून होते. वातावरण निवळण्यास कमीतकमी एक दीड तास तरी वेळ लागेल असे सांगण्यात आले. थोडा वेळ त्यांच्या कार्यलयाच्या बाहेर बसूनच वाट पहिली. आजूबाजूचा परिसर खूपच रम्य दिसत होता.

येथेच कामशेत येथे स्वत:ची पॅराग्लायडिंग संस्था असलेले श्री. कुलकर्णी यांची भेट झाली. (मध्यभागी हॅट घातलेले). ते व त्यांचे जावई तीन आठवड्यांपासून येथे मुक्काम ठोकून होते. देश-विदेशच्या विद्यार्थ्यासाठी सोलो पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण वर्ग ते येथे चालवतात.

बसून कंटाळा यायला लागल्यावर थोडा फेरफटका मारला. जवळच पॅराग्लायडरसाठीचा लँडिंग पॉईंट दिसला. येथे प्रशिक्षणार्थींचे बरेच वर्ग सुरु असलेले दिसले. मधूनच काही सोलो पॅराग्लायडर्स उतरतांना दिसत होते.

परत येऊन चौकशी केली. लहरी हवामानाने आम्हाला निराश करण्याचेच ठरवले होते. आज पॅराग्लायडिंगचा कार्यक्रम संपूर्ण दिवसासाठी रद्द करण्यात आला होता. थोडे निराश झालो तरी काही हरकत नाही आपण दुसरे एखादे ठिकाण पाहू असे म्हणून आम्ही आमचा मोर्चा येथील एका बुद्ध मठाकडे वळवला.
पालपुंग शेराबलिंग मठ वस्तीपासून थोडाअलिप्त व शांत ठिकाणी आहे. ५०० पेक्षा जास्त भिक्षूंची येथे राहण्याची व्यवस्था आहे.
भव्य बुद्ध मूर्ती. हा भविष्यातला बुद्ध आहे असे सांगण्यात आले. समोरच विरुद्ध बाजूस बुद्धाची दुसरी लहान मूर्ती आहे जी भूतकाळातील मानल्या जाते. भूतकाळापेक्षा भविष्यकाळासाठी विचार मोठे असावेत ही यामागची भावना.

थोडावेळ थांबून परतीच्या मार्गाला लागलो. सकाळी बघायचे बाकी राहिलेले बैजनाथ मंदिर येथे येऊन पोहचलो. बैजनाथ एकेकाळी किराग्राम म्हणून ओळखले जात असे. बैजनाथ मंदिर हे वैद्यांचा देव म्हणून शिवाला समर्पित आहे. रावणाने शंकराची उपासना केली होती व शंकर प्रसन्न झाल्यावर त्यांना लंकेला चलण्याविषयी विनंती केली होती. शंकराने नकार न देता लिंगस्वरूपात लंकेस घेऊन जाण्यास सुचविले. अट होती वाटेत लिंग जमिनीवर ठेवायचे नाही. काही कारणाने लिंग या जागेवर ठेवल्या गेले व ते कायमस्वरूपी येथे रुजले. या विषयी थोड्याफार फरकाने अनेक दंतकथा ऐकावयास मिळतात. शिवाचे उपासक मनुका व आहुका या दोन भावांनी १३ व्या शतकात या प्राचीन शिवलिंगासाठी मंदिर बांधले असे समजते.
मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हे पश्चिममुखी मंदिर असून मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अखत्यारीत आहे.

प्रवेश द्वाराच्या बाजूलाच गणेश व हनुमानाच्या मूर्ती आहेत

अनेक भग्न शिल्प, अवशेष प्रवेशद्वाराजवळच्या बंद खोलीत लोखंडी जाळीतून पाहावयास मिळतात.

प्रवेश करताच होणारे मंदिर दर्शन

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एकामागे एक असे दोन नंदी आहेत. पहिला नंदी एका छोट्याशा मंडपात असून तो बसलेल्या स्थितीत आहे.दुसरा नंदी उभा असून याला मंडप वगैरे काहीही नाही. दोन नंदी असण्याचे कारण समजले नाही.

गर्भगृहात दगडी शिवलिंग व गणेश, विष्णू,लक्ष्मी च्या मूर्ती आहेत.

मंडपाचे छत

मंडपाच्या दोन्ही बाजूस (डाव्या व उजव्या) खिडक्या असून खिडकीच्या खांबांवर सुंदर मूर्तिकाम केलेले आहे. दोन्ही खिडक्यांचा एकत्र केलेला फोटॊ

मंदिराच्या आतील खांब,तुळ्या तसेच मंदिराच्या बाह्य भिंतींवर नर्तक, वादक, अनेक देव देवता यांच्या प्रतिमा दिसतात. काही शिल्प ओळखता आली तरी माझ्यासाठी हे कठीण काम. येथे कोणी गाईडही मिळेना जो माहिती देऊ शकेल. भरपूर सुंदर सुंदर शिल्प आहेत येथे. सगळेच देता येणार नाहीत पण त्यातील काही फोटो एकत्र करून देत आहे. सोयीसाठी काही फोटोंना क्रमांकही दिले आहेत. जाणकारांनी प्रतिसादात यांची ओळख सांगितल्यास नंतर लेखात ही माहिती जोडता येईल.
गंगा-यमुना?

?

सूर सुंदरी?

?

?

कुबेर,राम?

बाह्य भिंत


मंदिराच्या दगडी कुंपणाच्या भिंतीवरही आतल्या बाजूने काही शिल्प दिसतात.
?

मंदिर नदीकडच्या बाजूने

येथून दिसणारा नदीकडचा भाग. (व्यास नदीची सहाय्यक नदी बिनवा)

मंदिर पाहून पालमपूरलसाठी परत निघालो. थोडावेळ बाजारपट्ट्यात फेरफटका मारला आणि अंधार पडता पडता हॉटेलवर परत आलो.

क्रमश:

प्रतिक्रिया

लेखमाला अत्यंत सुरेख चालू आहे. तपशीलवार.

ठिकाणेही एकाहून एक सरस. धन्यवाद.

Bhakti's picture

22 Jan 2023 - 4:32 pm | Bhakti

समोरच विरुद्ध बाजूस बुद्धाची दुसरी लहान मूर्ती आहे जी भूतकाळातील मानल्या जाते. भूतकाळापेक्षा भविष्यकाळासाठी विचार मोठे असावेत ही यामागची भावना.
सुंदर भटकंती, बुद्ध मठ छान दिसत आहे.

सुरेख! 'कांगडा घाटी रेल्वे' ची माहीती अणि पालमपुर स्टेशन परीसराचे फोटोज विषेश आवडले 👍
पॅराग्लायडिंगचा अनुभव मनाली येथे घेतला आहे, त्यावरुन ह्रुदयविकार-रक्तदाबाची समस्या नसलेल्या प्रत्येक व्यक्तिने आयुष्यात एकदातरी हा थरारक/रोमांचक अनुभव घ्यावाच असे म्हणतो...

गोरगावलेकर's picture

24 Jan 2023 - 7:55 am | गोरगावलेकर

ठरवून ठेवलेले एखादे ठिकाण सहलीत होत नाही पण पालमपूर रेल्वे परिसरासारखे एक सुंदर ठिकाण प्रभातफेरीत अचानक गवसल्याने खूप आनंद झाला होता. उत्तराखंडच्या सहलीत भीमताल येथे आमच्या ग्रुपमधील बहुतेकांनी पॅराग्लायडिंगचाअनुभव घेतला होता पण माझेच तब्येतीच्या कारणाने राहून गेले होते. यावेळी अनुभव घ्यायचाच असे ठरवले होते पण निसर्गाला ते मंजूर नसावे असे वाटते.

पॉइंट ब्लँक's picture

23 Jan 2023 - 11:52 pm | पॉइंट ब्लँक

खूप सुंदर माहिती आणि फोटो.
गंगा - यमुना शीर्षकाखालील डाव्या बाजूची यमुना असावी कारण खाली तिचा वाहन कासव दिसतंय. उजवीकडची गंगा नसावी बहुतेक, कारण खाली मकर नाही, हातात कलश नाही. कपाळा वर तिसरा डोळा कोरला आहे का ? तिच्या हातात कमळ दिसतंय, नीलोत्पाला असेल का ?
कुबेर राम असा शिर्षक आहे त्या खाली डाव्या बाजूची मूर्ती मला गरुदरुढ विष्णू सारखी वाटते
कुंपणाच्या भिंतीवरच्या मुर्त्यामध्ये, डाव्या बाजूची खालची हीरण्यकक्षपूचा वध करणारे नृसिंह असावेत. मधल्या मूर्तीच्या हातात खट्वांग आणि गळ्यात कवट्या ची माळ आणि खाली कुत्रा देखील आहे बहुतेक . त्यामुळे काळभैरव असावेत असा वाटतं.

पॉइंट ब्लँक's picture

24 Jan 2023 - 12:54 am | पॉइंट ब्लँक

माफ करा , थोड गूगलिंग केल्यावर यमुना च्या बाजूच्या मूर्तीच वर्णन वाराहीच्या यमी रुपाशी मिळणारं वाटतं - हातात नांगर, चामर, त्रिनेत्र आणि कमळ.

पॉइंट ब्लँक's picture

24 Jan 2023 - 6:30 am | पॉइंट ब्लँक

माफ करा , थोड गूगलिंग केल्यावर यमुना च्या बाजूच्या मूर्तीच वर्णन वाराहीच्या यमी रुपाशी मिळणारं वाटतं - हातात नांगर, चामर, त्रिनेत्र आणि कमळ.

गोरगावलेकर's picture

24 Jan 2023 - 7:56 am | गोरगावलेकर

यमुना आहे हे आपल्या व प्रचेतस यांच्या प्रतिसादातून निश्चित. इकडच्या भागात गंगा व यमुना यांना खूपच मानाचे स्थान दिसते. कांगडा किल्ल्यातही प्रवेश द्वारावर यांच्या प्रतिमा होत्या व या प्रतिमाही प्रवेश द्वाराजवळच आहेत त्यामुळे असा अंदाज होता.

प्रचेतस's picture

24 Jan 2023 - 6:56 am | प्रचेतस

१ -कूर्माधिष्टीत यमुना, उजवीकडची मात्र ओळखू येत नाही
२- डावीकडची बहुधा भैरवी, उजवीकडची महिषासुरमर्दिनी
५-डावीकडे कमळ आणि कलश धारण केलेली सरस्वती असावी, उजवीकडचे शिल्प लहान असल्याने ओळखू येत नाही.
११- कुबेर- राम लिहिलेले अनुक्रमे गरूडारूढ विष्णू आणि भैरव आहेत
७- मधले शिल्प भैरवी दिसतेय.

बाकी हा लेखही मस्त. नागर शैलीतले हे मंदिर सुरेख आहे.

गोरगावलेकर's picture

24 Jan 2023 - 7:58 am | गोरगावलेकर

आपल्याकडून माहिती मिळेल अशी अपेक्षा होतीच. ओळखण्यात आलेल्या मुर्त्यांबद्दल लेखात लवकरच बदल करीत आहे.
शिल्पाचे फोटो घेतांना त्यांचे वाहनही आले पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल.

प्रचेतस's picture

26 Jan 2023 - 6:52 am | प्रचेतस

शिल्पाचे फोटो घेतांना त्यांचे वाहनही आले पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल.

हे तर आवश्यकच आहे. मूर्ती ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचे असलेले लक्षण म्हणजे मूर्तीचे वाहन, त्यानंतर हातातली आयुधे.

गोरगावलेकर's picture

24 Jan 2023 - 7:51 am | गोरगावलेकर

गवि व Bhakti
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद

अथांग आकाश's picture

26 Jan 2023 - 12:53 pm | अथांग आकाश

सफर मस्त चालु आहे! प्राचिन मंदीर आवडले!!
1

गोरगावलेकर's picture

31 Jan 2023 - 10:45 am | गोरगावलेकर

@अथांग आकाश आणि इतर सर्व वाचकांचे आभार